Blog

  • Fatal motorcycle crash Chandrapur । भीषण अपघात! दुचाकींची समोरासमोर धडक; चंद्रपुरात बाप-लेकासह तिघांचा जागीच मृत्यू

    Fatal motorcycle crash Chandrapur

    Fatal motorcycle crash Chandrapur : चंद्रपूर: मूल-मारोडा मार्गावरील बल्की देवाजवळ बुधवारी (दि. ८) दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास झालेल्या दोन दुचाकींच्या समोरासमोरच्या भीषण धडकेत बाप-लेकासह एकूण तीन जण ठार झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. धडक इतकी जोरदार होती की, तिघांनाही आपले प्राण गमवावे लागले.

    अपघाताचा तपशील:

    मूल तालुक्यातील मारोडा येथील रहिवासी असलेले देवीदास कवडू शेंडे (४५) आणि त्यांचा मुलगा यश देवीदास शेंडे (२२) हे दोघे शेती संबंधित ऑनलाइनचे काम पूर्ण करण्यासाठी मूल येथे दुचाकीने (क्र. एमएच ३४ बीएक्स ८८६३) गेले होते. काम आटोपून ते दोघे गावाकडे परतत असताना, भादुर्णी येथील वासुदेव कुसन सहारे (५४) हे त्यांच्या दुचाकीने विरुद्ध दिशेने मूलकडे येत होते.

    Also Read : चंद्रपूर मनपाच्या प्रांगणात गिट्टी फेकणार, खासदार धानोरकरांचा इशारा

    भयावह अपघात:

    मूल-मारोडा मार्गावरील बल्की देवाजवळ या दोन्ही दुचाकींची समोरासमोर अत्यंत जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भयावह होता की, यश शेंडे आणि त्यांचे वडील देवीदास शेंडे या बाप-लेकाचा जागीच करुण अंत झाला.

    दुसऱ्या दुचाकीवरील वासुदेव सहारे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले जात असताना, वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. एका क्षणात तीन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. Mul-Maroda Road Accident 2025

    अपघाताची माहिती मिळताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व्यंकटेश दोनोडे पुढील तपास करत आहेत.

  • Hatloni village farmer death । कर्ज व अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

    Hatloni village farmer death

    Hatloni village farmer death : चंद्रपूर – अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान व कर्जाला त्रासून कोरपना तालुक्यातील हातलोणी येथील तरुण शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली. गजानन पुनम मालेकर 38 रा.हातलोणी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

    Also Read : अंमली पदार्थ रोका चंद्रपूर वाचवा, भाजपचे पोलीस प्रशासनाला निवेदन

    उपचारादरम्यान मृत्यू

    सतत येणाऱ्या अति पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान व कर्ज असल्याने तो चिंताग्रस्त असल्याचे समजते. मंगळवारी रात्री विष प्राशन केल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे आणण्यात आले.त्यानंतर त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचारादरम्यानच त्याचा मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास रुग्णालयातच मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवाचे बुधवारी शव विच्छेदन करण्यात आले.

    त्याची कुकुडबोडी येथील शेत शिवारात एक हेक्टर शेत जमीन आहे. त्याच्यावर जिल्हा बँकेचे कर्ज होते. त्यांच्या मागे आई वडील , पत्नी , एक मुलगा ,एक मुलगी व बराच मोठा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

  • Congress membership drive Chandrapur । 🗳️ महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हनुमान नगरातील नागरिकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

    Congress membership drive Chandrapur

    Congress membership drive Chandrapur : चंद्रपूर : शहर काँग्रेस कार्यालयात आज मोठ्या उत्साहात प्रभाग क्रमांक १ हनुमान नगरातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर, राज्याचे माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस शहर कमिटीचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ता एजाज रिझवी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

    Also Read : शिवसेनेचे महायुती सरकारविरुद्ध आंदोलन

    नागरिकांचा कांग्रेस पक्षावर विश्वास

    या प्रसंगी नवीन कार्यकर्त्यांचे हार्दिक स्वागत करून नेत्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हनुमान नगर परिसरातील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी काँग्रेसच्या जनआंदोलन व लोकाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.

    यात प्रकाश केशवराव खुटेमटे, अरुण सेवकजी तुर्डे, सलीम खान तड़वी, सैय्यद अहमद, कमलेश देवगडे, सुरेश रागीत, बबन गणपतराव जेमकावडे, अरुण सोनकर, चंपतराव नंदे, विजय मसाडे, वसंत पांडुरंग गुंडो, मनहव डुक्से, प्रकाश टोंगे, बाबा जिवतोड़े, रउफ इब्राहिम शेख, मोहन राजेश्वर गंधारे, विजय वानखेड़े, सुनील धवस, मोतीराम वडाई यांचा समावेश आहे.

  • Save Chandrapur from drugs । 🚨 “अमली पदार्थ रोखा – चंद्रपूर वाचवा!” – भाजपचे पोलीस प्रशासनाला निवेदन

    Save Chandrapur from drugs

    Save Chandrapur from drugs : चंद्रपूर : चंद्रपूर शहरात नुकत्याच मुंबईहून आलेल्या एका  व्यक्तीकडून तब्बल ५२८ ग्रॅम एम.डी. अमली पदार्थ जप्त करण्यात आले, ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. या घटनेमुळे शहरात अमली पदार्थांची विक्री व सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    युवकांच्या आयुष्याशी आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या अमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर अंकुश आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर जिल्हा तर्फे माजीं पालकमंत्री मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेप्रमाणे आज जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. एम. सुदर्शन यांना निवेदन सादर करण्यात आले. Chandrapur BJP demands crackdown on narcotics

    Also Read : दुर्गापूर पोलिसांच्या कारवाईत ६० ग्राम एमडी पावडर जप्त

    या निवेदनात अमली पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून खालील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत –

    संशयित ठिकाणी पोलिसांचे विशेष छापे आणि सतत गस्त.

    शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम.

    पोलिस, अन्न व औषध प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त टास्क फोर्सची स्थापना.

    गुन्हेगारांवर कठोर शिक्षा आणि द्रुतगती न्यायप्रक्रिया.

    युवकांना क्रीडा आणि संस्कारवर्धन उपक्रमांकडे वळविण्याची मोहीम.

    या निवेदनादरम्यान डॉ. मंगेश गुलवाडे महामंत्री, भारतीय जनता पक्ष – जिल्हा चंद्रपूर यांच्यासह विशाल निंबाळकर, मनोज सिंघवी, यश बांगडे, गणेश रामगुंडेवार, उमेश आष्टणकर आणि अमित निरंजने, मनिष खापरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    भाजप शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाला आवाहन केले की, चंद्रपूरमधील युवकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि समाजातून अमली पदार्थांचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी तात्काळ आणि प्रभावी कारवाई करण्यात यावी.

    “अमली पदार्थ रोखा – चंद्रपूर वाचवा!” हे फक्त घोषवाक्य नसून, ही संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे या वेळी डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले.

  • Chandrapur community leadership election । महासंघाच्या निवडणुकीत ‘कपाट’चा झेंडा फडकणार

    Chandrapur community leadership election

    Chandrapur community leadership election : चंद्रपूर: महासंघाची त्रैवार्षिक निवडणूक येत्या रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी हिंगणघाट येथे संपन्न होणार आहे. या निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघातून आपल्याला तीन (३) सक्षम प्रतिनिधींची निवड करायची आहे. महाराष्ट्र विश्वकर्मामय सुतार (झाडे) समाज महासंघाच्या त्रेवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

    Also Read : ५ दिवसांची डेडलाईन अन्यथा मनपा प्रांगणात फेकणार गिट्टी, खासदार धानोरकर यांचा इशारा

    या अनुषंगाने,चंद्रपूर तालुका मतदार संघातून तीन कार्यक्षम आणि अनुभवी उमेदवार ‘कपाट’ या चिन्हासह निवडणुकीत उभे आहेत. त्यांनी सामाजिक कार्यात आपला अमूल्य ठसा उमटवला आहे. Chandrapur federation election

    निवडणुकीत उभे असलेले प्रमुख उमेदवार:

    • श्री. महेश ल. शास्त्रकार:
      • कुशल नेतृत्व आणि समाजात समाजकार्याचा ठसा उमटवणारे व्यक्तिमत्त्व.
      • सुतार झाडे समाजाचे कुशल नेतृत्व.
      • चंद्रपूर कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष.
    • श्री. महादेव राव जी. वांढरे:
      • कर्तव्यतत्पर, उद्योगी आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य.
      • महासंघाचे माजी सदस्य.
      • पडोली कार्यकारिणीचे माजी अध्यक्ष.
    • सौ. संतोषी अरुण राव भठारकर:
      • महिला विभागातून प्रतिनिधित्व.
      • समाजसेवेकरिता सदैव कार्यतत्पर असणारे नेतृत्व.

    हे तिन्ही उमेदवार महासंघाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत.

    स्नेही मंडळाच्या या तीनही उमेदवारांना (श्री. महेश ल. शास्त्रकार, श्री. महादेव राव जी. वांढरे आणि सौ. संतोषी अरुण राव भठारकर) त्यांच्या ‘कपाट’ चिन्हासमोर मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

    मतदारांना विनंती:

    महासंघाच्या कामांना नवी दिशा देण्यासाठी आणि आपल्या प्रतिनिधींना बळकट करण्यासाठी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘कपाट’ चिन्हासमोर मतदान करून स्नेही मंडळाच्या उमेदवारांना आपला अमूल्य पाठिंबा द्यावा.

  • Protest against the Mahayuti government । शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसैनिक आक्रमक; चंद्रपूरात धरणे आंदोलन!

    Protest against the Mahayuti government

    Protest against the Mahayuti government : चंद्रपूर: महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात आणि त्यांच्या निष्क्रियतेविरोधात आवाज उठवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले. जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकरी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची ३१ हजार ६२८ कोटीची मदत

    यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांनी स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष रस्त्यावर उतरला आहे आणि जोपर्यंत जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील.” अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या अतोनात नुकसानीनंतरही शासनाकडून कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे, तोच या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.

    प्रमुख मागण्या

    शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षाने शासनासमोर खालील प्रमुख सात मागण्या (Seven Key Demands) ठेवल्या आहेत:

    1. चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करण्यात यावा.
    2. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती (Complete Loan Waiver) झाली पाहिजे.
    3. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना प्रति हेक्टरी ५०,०००/- रु. तत्काळ मदत (Immediate Relief of ₹50,000 per Hectare) मिळावी.
    4. शेतकऱ्यांचा पीक विमा (Crop Insurance) सुरुवातीच्या नियमांनुसार शिथिल करून, नव्याने लागू केलेला ‘एकच ट्रिगर’ (Single Trigger) पद्धत बंद करावी आणि पहिल्याप्रमाणे पीक विमा योजना लागू करावी.
    5. राज्य सरकार सोबतच केंद्र सरकारने सुद्धा मोठा पॅकेज (Special Package from Central Government) जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
    6. पावसाच्या अतिवृष्टी व पूर (Heavy Rain and Flood) यामुळे वाहून गेलेल्या शेतकरी बांधवांच्या गुरे-जनावरांचा मोबदला (Compensation for Livestock Loss) त्वरित देण्यात यावा.
    7. कापसाला ₹१५,०००/- प्रति क्विंटल आणि सोयाबीनला ₹१०,०००/- प्रति क्विंटल हमीभाव (Minimum Support Price – MSP) देण्यात यावा.

    आंदोलनात प्रमुख उपस्थिती:

    या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख प्रा. शालिक फाले, बबन उरकुडे, माजी जिल्हाप्रमुख सतीश भिवगडे, माजी जिल्हा संघटिका कुसुम उदार ताई, महानगर प्रमुख सुरेश पचारे, युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे, उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, माजी तालुका प्रमुख (चंद्रपूर) संतोष नरुले, मूल तालुका प्रमुख राजू ठाकरे, पोंभुर्णा तालुका प्रमुख आशिष कावटवार, चंद्रपूर तालुका प्रमुख विकास वीरूटकर, राजुरा तालुका प्रमुख रमेश झाडे, मूल शहर प्रमुख बादल करपे, युवासेना समन्वयक विनय धोबे, युवासेना शहर प्रमुख (पोंभुर्णा) महेश श्रीगिरवार, उपमहानगर प्रमुख सिकंदर खान, सोनू ठाकूर, प्रमोद कोलारकर, अरमान शेख, लोकेश कोटरंगे, वैभव काळे, सागर धनस्कर, रिझवान पठाण, रोहन आंबटकर, फैझान खान, सूरज शेंडे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    या धरणे आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महायुती सरकार काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • MP Pratibha Dhanorkar ultimatum । ५ दिवसांची डेडलाइन; अन्यथा ‘गिट्टी फेक’ आंदोलन – प्रतिभा धानोरकरांचा मनपाला सज्जड इशारा

    MP Pratibha Dhanorkar ultimatum

    MP Pratibha Dhanorkar ultimatum : चंद्रपूर : शहरातील रस्त्यांच्या दयनीय आणि जीवघेण्या अवस्थेवरून चंद्रपूर शहर महानगरपालिका (मनपा) प्रशासनाला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मनपा आयुक्तांना थेट ५ (पाच) दिवसांचे ‘अल्टिमेटम’ दिले असून , या निर्धारित वेळेत काम न झाल्यास, मनपाच्या निष्क्रियतेविरोधात महानगरपालिकेच्या प्रांगणातच “गिट्टी फेक” आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

    Also Read : चंद्रपूर अजब गजब, रस्ता खड्ड्यात गेला काम मात्र दुभाजकाचे

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये मध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकला आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    जीवघेणी बाब

    रस्त्यांवरून ये-जा करणे आता नागरिकांसाठी मोठी अडचण आणि ‘जीवघेणी बाब’ बनली आहे. विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवर अपघात झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मनपा आयुक्तांना स्पष्टपणे कळवले आहे की, चंद्रपूर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती ५ दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निष्क्रियेतेचा तीव्र निषेध करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रांगणात ‘गिट्टी फेक’ आंदोलन सुरू करण्यात येईल.असा इशारा त्यांनी दिला आहे. 

  • Maharashtra flood relief package 2025 । महाराष्ट्र सरकारची 31,628 कोटींची मदत पॅकेज: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

    Maharashtra flood relief package 2025

    Maharashtra flood relief package 2025 : मुंबई, दि. 7 : राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये 29 जिल्हे प्रभावित झाले आहेत. या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त 253 तालुके आणि 2059 मंडळांमध्ये मदतीसाठी 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी 31 हजार 628 कोटींच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे. जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न राहणार असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. Maharashtra flood relief package 2025

    Also Read : चंद्रपुरातील अजबगजब कारभार, रस्त्याचं काम सोडून दुभाजकावर पैश्याची उधळण

    मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी देऊ केलेल्या मदतीची माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले,  मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल आदी उपस्थित होते. Maharashtra flood relief package 2025

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांसह पिके, जनावरे, गोठे, दुकाने, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही जणांचे मृत्यूही झाले आहेत. मंत्रिमंडळातील सदस्यांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन नुकसानग्रस्तांना तातडीची 10 हजार रुपयांची मदत, गहू, तांदूळ आदी देण्यात आले. यासाठी 2200 कोटी रुपयांचा पहिला हप्ता तातडीने मंजूर करण्यात आला. विमाधारक शेतकऱ्यांना लवकर मदत मिळवून देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान स्वत: प्रयत्न करीत असून विमाधारकांव्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांनाही 17 हजार रुपये प्रति हेक्टरी इतकी रक्कम दिली जाणार आहे. या भरपाईसाठी 18 हजार कोटींहून अधिकची तरतूद केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. Maharashtra flood relief package 2025

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात एक कोटी 43 लाख 52 हजार 281 हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड झाली. त्यापैकी 68 लाख 67 हजार 756 हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी घरांचे नुकसान झाले, तिथे नव्याने घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मदत करण्यात येणार आहे, तर डोंगरी भागात घरे बांधण्यासाठी अतिरिक्त 10 हजारांची मदत देण्यात येईल. तसेच ज्या दुकानांचे नुकसान झाले असेल त्यांना 50 हजार रुपये, 

    मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांसाठी तीन जनावरांची अट न ठेवता प्रति जनावर 37 हजार 500 रुपये तर 100 रुपये प्रति कोंबडी अशी भरपाई देण्यात येईल. जमीन खरडून गेलेली शेती पुन्हा लागवडीयोग्य होण्यासाठी 47 हजार रुपये प्रति हेक्टरी थेट मदत तर तीन लाख रुपये मनरेगा मधून दिले जातील. बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून प्रति विहीर 30 हजार रुपये देण्यात येतील. त्याचप्रमाणे मत्स्यशेती तसेच बोटींच्या नुकसान भरपाईसाठी 100 कोटींची तरतूद केल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. Maharashtra flood-hit farmers relief 2025

    मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना मदत देताना ॲग्रीस्टॅकमधील माहिती ग्राह्य धरली जाईल. त्यासाठी कुठलीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी 10 हजार कोटी रुपये, तसेच पूरग्रस्तांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून 1500 कोटी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या भागात टंचाई परिस्थितीत लागू असलेल्या सर्व सवलती ओली टंचाई समजून लागू करण्यात येणार आहेत. बळीराजा वीज सवलत योजनेमुळे कृषी पंपांना आधीच वीज देयक माफ केले आहे, त्यामुळे वीज देयकाची वसूली होणार नाही. Maharashtra farmers compensation 2025

    या अभूतपूर्व संकटात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मोठ्या प्रमाणात मदत येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले अनेकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी देण्याचेही मान्य केले. जी मदत नियमांमध्ये बसणार नाही अशा प्रकरणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून देण्यात येईल. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवर्जून सांगितले.

    संकट काळात बळीराजाच्या मदतीसाठी शासन तत्पर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची 10 हजाराची मदत देण्यात आली आहे. अशा संकट काळात अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आले आहे. सर्व अटी – शर्ती बाजूला ठेवत शेतकरी हिताला शासनाचे प्राधान्य असून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन तत्पर आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले. Maharashtra flood relief package 2025

                उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात 65 लाख हेक्टर जमिनीवर शेतीचे नुकसान झाले आहे. जमीन खरडून गेल्यामुळे भविष्यात पीक घेण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. मात्र शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नसून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पूरग्रस्त भागातील नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन सर्व उपाययोजना करीत आहे. खरडून गेलेल्या जमिनींना प्रति हेक्टरी 47 हजार रूपये मदत देण्यात येणार आहे. तसेच मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मधून तीन लाख रूपये प्रति हेक्टरी देण्यात येतील. Maharashtra flood relief package 2025

    रब्बीच्या हंगामासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10 हजाराची मदत मिळणार आहे. केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर केंद्रही शेतकऱ्यांना मदत करणार आहे. केंद्र शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकरी सन्मान योजनेतून मदत करीतच आहे. राज्य शासनही नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रूपयांची मदत देत आहे. या मदतीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभे राहण्यास निश्चितच मदत मिळणार असल्याची खात्रीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. Maharashtra flood relief package 2025

    एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार

                राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त असून त्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन हेक्टरपर्यंत मदतीचे निकष बाजूला ठेवून तीन हेक्टरपर्यंत मदत करण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. Maharashtra flood relief package 2025

                पावसामुळे आलेल्या पुरात शेतजमिनी खरडून गेल्या ओहत. अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत पावली असून गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन पॅकेजच्या माध्यमातून भरीव मदत करीत आहे. या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. तरीही कुणी मदतीपासून राहून गेले असल्यास त्यांनाही निश्चित मदत करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.   

    असे आहे पॅकेज…

    मृतांच्या कुटुंबीयांना: 4 लाख प्रत्येकी, जखमी व्यक्तींना : 74 हजार रुपये ते 2.5 लाख रुपये, घरगुती भांडे, वस्तूंचे नुकसान: पाच हजार रुपये प्रति कुटुंब, कपडे, वस्तूंचे नुकसान: पाच हजार रुपये प्रतिकुटुंब, दुकानदार, टपरीधारक: 50 हजार रुपये, डोंगरी भागात पडझड, नष्ट पक्क्या घरांना : एक लाख 20 हजार रुपये, डोंगरी भागात पडझड, नष्ट कच्च्या घरांना : ए‍‍क लाख 30 हजार रुपये, अंशतः पडझड: 6,500 रुपये, झोपड्या: आठ हजार रुपये, जनावरांचे गोठे: तीन हजार रुपये, दुधाळ जनावरे: 37,500 रुपये, ओढकाम करणारी जनावरे: 32 हजार रुपये, कुक्कुटपालन: 100 रुपये प्रति कोंबडी. Maharashtra flood relief package 2025

    निकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी 10 हजार कोटी रुपये अतिरिक्त, खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47 हजार रुपये प्रति हेक्टर थेट मदत आणि मनरेगाअंतर्गत तीन लाख रुपये प्रतिहेक्टर, खचलेली किंवा बाधित विहीर: 30 हजार रुपये प्रति विहीर, तातडीच्या मदतीसाठी 1500 कोटी रुपये जिल्हा नियोजन निधीमध्ये राखीव.

    दुष्काळी सवलती लागू

    जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा, महाविद्यालय परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

  • Ghuggus mobile snatching case । घुग्गुस पोलिसांची जलद कारवाई, २ तासात आरोपी अटक

    Ghuggus mobile snatching case

    Ghuggus mobile snatching case : चंद्रपूर/घुग्गुस ७ ऑक्टोबर २०२५ (NEWS ३४ वृत्तसेवा) – सायंकाळच्या सुमारास जॉब वरून घरी परतणाऱ्या महिलेचा पाठलाग करीत अंधाराचा फायदा घेत एका अनोळखी इसमाने महिलेचे तोंड दाबत खाली पडले व तिच्याजवळील ५ मोबाईल हिसकावून पळून गेला. मात्र घुग्गुस पोलिसांनी अवघ्या २ तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

    Also Read : ६० ग्राम एमडी पावडर जप्त, दुर्गापूर पोलिसांची कारवाई

    घुग्गुस शहरातील केबी खान कॉम्प्लेक्स समोरून घरी पायदळ जाणाऱ्या महिलेचा एका अनोळखी इसमाने पाठलाग केला व अंधाराचा फायदा घेत तिच्याजवळील मोबाईल हिसकावीत पळ काढला, घडलेल्या प्रकाराबाबत त्या महिलेने तात्काळ घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.

    बिहार राज्यातील आरोपी अटकेत

    पोलीस स्टेशनमध्ये तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला, पोलीस निरीक्षक राऊत यांनी सदर गुन्ह्याचा छडा लावण्याकरिता पथक तयार केले, विशेष बाब म्हणजे सदर गुन्ह्यात कसलाही सुगावा नसताना अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करीत पोलिसांनी अवघ्या २ तासात २१ वर्षीय चंदन कुमार सहानी राहणार बिहार हल्ली मुक्काम खान कॉम्प्लेक्स घुग्गुस याला अटक केली. आरोपीकडून चिरी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला. Ghuggus police fast crime action

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या नेतृत्वात सपोनि सचिन तायवाडे, सपोनि प्रफुल डाहुले, पोउपनि गणेश अनभुले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, अनिल बैठा, नितीन मराठे, प्रसनजीत डोर्लीकर, रवि वाभीटकर, महेश भोयर, विजय ढपकास व पवन डाखरे यांनी केली.

  • Chandrapur police drug bust MD powder । दुर्गापूर पोलीसांनी ६० ग्रॅम एमडी पावडरसह ३ आरोपींना केली अटक

    Chandrapur police drug bust MD powder

    Chandrapur police drug bust MD powder : चंद्रपूर (NEWS ३४ वृत्तसेवा) – चंद्रपूर जिल्हा नशामुक्त व्हावा याकरिता जिल्हा पोलीस दल तत्पर असून अंमली पदार्थविरोधी मोहीम राबवित आहे, या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने सर्वात मोठी कारवाई करीत ५२८ ग्राम एमडी पावडर जप्त केले. तसेच ७ ऑक्टोबर रोजी दुर्गापूर पोलिसांनी ६० ग्राम एमडी पावडर व ३ आरोपीसह ११ लाख ६२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. MD powder seized Chandrapur

    चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, जिल्ह्यात विविध ठिकाणी अंमली पदार्थ विकल्या जात आहे, विशेष बाब म्हणजे अनेक अल्पवयीन मुले या धंद्यात गुंतलेले आहे. जिल्ह्यात कधी नागपूर तर कधी मुंबई मार्गे एमडी पावडर ची वाहतूक होत आहे. चंद्रपूर पोलिसांच्या धडक मोहिम अंतर्गत नशेचा व्यापार करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे.

    Also Read : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ५२८ ग्राम एमडी पावडर जप्त

    अकोला जिल्ह्यातील २ तर चंद्रपुरातील एका आरोपीला अटक

    ७ ऑक्टोबर रोजी दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तुकूम परिसरात काही इसम एमडी पावडरची विक्री करण्याकरिता येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला असता यावेळी २१ वर्षीय मुदसिर नासिर शेख हुकूम राहणार तुकूम, २४ वर्षीय शेख मुस्तफा शेख रहीम राहणार अकोला व ३९ वर्षीय अब्दुल राजे अब्दुल रशीद राहणार अकोला यांना ताब्यात घेत, त्यांच्याजवळून ६० ग्राम एम पावडर किंमत ४ लाख २० हजार जप्त केले.

    यावेळी आरोपीजवळून एमडी पावडर सह चारचाकी वाहन किंमत ७ लाख रुपये, ४ मोबाईल किंमत २६ हजार रुपये, रोख रक्कम १६ हजार १६० रुपये असा एकूण ११ लाख ६२ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

    सदर कार्यवाही सदरची कामगिरी मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अपर पोलिस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन दुर्गापूरचे ठाणेदार पो नी संदीप एकाडे पाटील यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रविण बिंकलवार, पो हवा योगेश शार्दुल, मंगेश शेंडे, रुपेश सावे, किशोर वलके, सोनल खोब्रागडे, मोरेश्वर गोरे यांनी केली.