Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपुरात शासन निर्णयाची होळी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीकरीता सोमवारपासून चंद्रपुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे हे 11सप्टेंबर पासून आंदोलनाला बसले आहेत.

     

    राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी चंद्रपुरात पहायला मिळाली. मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या, मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे या मागणी विरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

     

    मराठा समाजाच्या मागणीचा चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ओबीसी (विजा, भज आणि विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे. त्यामध्ये आता मराठा समाज समाविष्ठ झाले तर आपल्याला समाजाला न्याय मिळणार नाही, मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. आतापर्यंत मराठा समाजाने मोठमोठे मोर्चे काढून मागणी रेटून धरली आहे. मात्र आपल्याला एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे त्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी चंद्रपुरात पुढाकार घेत 17 सप्टेंबर ला हजारो ओबीसी बांधवांच्या महामोर्चातुन आक्रोश व्यक्त केला.

     

    त्याचा एक भाग म्हणून चंद्रपूरात आज गांधी चौक येथे कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाद्वारे गेल्या दहा दिवसापासून सूरू असलेल्या ओबीसी बंधू रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचे ओबीसीकरन करण्याकरिता काढलेल्या शासना निर्णय क्रमांक मआसु 2023/प्र. क्र.03/16-क जिआर ची महाराष्ट्र शासन निर्णयाची होळी करून मनीषा बोबडे, गोमती पाचभाई, कुसुमताई उदार,मीनाक्षी गुजरकर, सरिता लोंढे, सुनीता काळे, प्रभा साळवे,सविता वैरागडे, ममता क्षीरसागर, सुलभा जक्कुलवार, रीना येरणे, कविता वैरागडे, सरला झाडे,रीना त्रिवेदी, रूपा जुमडे,सरोजिनी वैद्य,मनीषा यामावार,कल्पना यामावार,किरण पावसकर,माया चौधरी, रजनी गोखले,चंदाबाई सोरते,, स्नेहल चौधडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

     

    रवींद्र टोंगे यांच्या समर्थनार्थ युवकांचे सामूहिक मुंडण

    उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांच्या उपोषण स्थळी उद्या दिनांक 21 सप्टेंबर 2023 ला दुपारी 12वाजता ओबीसी समाजातील युवक राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन करणार आहेत.

  • चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू

    News34 chandrapur

    प्रशांत गेडाम

    सिंदेवाही – सिंदेवाही तालुक्यातील वासेरा जवळील मौजा सिरकाडा येथील काही महिला प्रदीप यादव बोरकर रा. सिरकाडा यांच्या शेतात निंदन काढण्यासाठी गेले. मात्र निसर्गात अचानक बदल होऊन वीज कडकडाटा सहित पावसाने रौद्र रूप धारण केल्याने महिला घराकडे जाण्यासाठी निघाली असता वीज पडून 64 वर्षीय सौ. महानंदा मोतीराम अलोणे रा. सिरकाडा या जागीच ठार झाल्या.

     

    तर सौ. रोषणा प्रफुल गेडाम (जख्मी ) रा. सिरकाडा वय अंदाजे 35 वर्ष या गंभीर जख्मी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलवले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

     

    20 सप्टेंबर बुधवारी दुपारी 1 वाजता शेतात निंदन झाल्यावर महिला घराकडे निघाल्या असत्या अचानक विजेचा गडगडाट होऊन पाऊस सुरू झाला, अचानक महानंदा यांच्यावर वीज कोसळली.

     

    घटनेची माहिती मिळताच पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला.

  • रामनगर पोलिसांची व्हिडीओ गेम पार्लरवर मोठी कारवाई

    News34 Impact

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने वृत्त प्रकाशित केल्यावर पोलीस व जिल्हा प्रशासनाने बातमीची दखल घेतली व व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

     

    स्थानिक गुन्हे शाखेने पडोली येथील रॉबिन व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई केल्यानंतर रामनगर पोलिसांनी सुद्धा मोठी कारवाई करीत या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

     

    पेट्रोलिंग करीत असताना रामनगर पोलिसांना सराय मार्केट येथील मनपाच्या गाळ्यात सुरू असलेले राजविर व्हिडीओ गेम पार्लरवर जाऊन चौकशी केली असता त्या पार्लर च्या परवान्यात अनेक त्रुट्या आढळल्या, परवाना व्यतिरिक्त राजविर व्हिडीओ गेम पार्लरमध्ये अतिरिक्त 4 मशीन आढळल्या, पोलिसांनी त्या 4 अतिरिक्त मशीन जप्त केल्या.

     

    रामनगर पोलिसांनी दुकान चालक व कांग्रेस पक्षाचे असंघटित कामगार सेल चे शहराध्यक्ष विनोद संकत व दुकानात काम करणारे राहुल झाडे यांना अटक करण्यात आली.

    कारवाई झाली आता पुढे काय?

    चंद्रपूर शहर सहित जिल्ह्यात पोलीस विभागाच्या या मोहिमेमुळे नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर चालकाचे धाबे दणाणून गेले आहे.

    याबाबत पोलीस अधीक्षक परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जिल्ह्यात सुरू असलेली ही मोहीमेत नियमबाह्य पार्लर धारकांच्या कागदपत्रे व परवान्याची पडताळणी केल्यावर त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार असून परवाना बाबत पुढील कारवाई आता जिल्हाधिकारी महोदय करतील.

     

    जुगार कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करीत विनोद संकत व राहुल झाडे यांना जामिनावर सोडण्यात आले, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे व रामनगर गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

     

  • भाग 2 चंद्रपुरातील या भागात सुरू आहे विना परवाना अवैध बार

    News34 chandrapur भाग 2

    चंद्रपूर – दुर्गापुरात चालतो अवैध सट्टा या पहिल्या सत्रानंतर आता आपण या बातमीत बघणार आहो की दुर्गापुरात कसे खुलेआम विना परवाना अवैध बार सुरू आहे.

     

    विशेष म्हणजे या बार मध्ये कमी किमतीत आपल्याला दारू प्यायला मिळते, महत्वाची बाब म्हणजे दुर्गापुरात 1 नाही तर 2 विना परवाना अवैध बार सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 कोटी 11 लाखांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त

     

    मागील अनेक वर्षांपासून हा अवैध दारूचा गोरखधंदा नित्याने सुरू आहे, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखल्या जातो, कामगार वर्गाची संख्या याठिकाणी असंख्य आहे.

     

    त्याचा फायदा घेत काही 2 नंबरी चालकांनी थेट दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या अवघ्या 500 मीटर अंतरावर हे विना परवाना अवैध बार सुरू आहे, पोलिसांना हे माहिती नसेल असे मुळीच नाही.

     

    या विना परवाना बार मध्ये आपल्याला हॉटेल सारखी व्यवस्था केली जाते, विशेष करून चकना सुद्धा मोफत मिळतो.

     

    पण हे सगळं अवैध व छुप्या पद्धतिने सुरू आहे, विना परवाना अवैध बार धारक काही अंतरावर दारूच्या बॉटल्स लपवून ठेवतात, उर्जानगर येथील कोयना गेट च्या बाजूला तर शक्तीनगर गेट च्या आधी हे दारूचे दुकान थाटण्यात आले आहे.

     

    दुर्गापुरात अनेक ठिकाणी असंख्य घरी दारू मिळते, याबाबत दुर्गापूर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाला पुरेपूर माहिती असून सुद्धा यावर कारवाई करण्यास हे दोन्ही विभाग टाळाटाळ करतात.

     

    या अवैध बार मुळे शासनाचा महसूल तर बुडतंच आहे सोबत परवाना धारक बार धारकांकडे आता या कमी किमतीच्या दारूमुळे आता व्यसनाधीन नागरिकांनी पाठ फिरविणे सुरू केले आहे.

     

    नकली दारूमुळे असंख्य नागरिकांचा जीव जातो मात्र तश्या घटनेचा उद्रेक जेव्हा होणार त्यावेळी उत्पादन शुल्क विभाग व दुर्गापूर पोलीस नक्की जागे होतील हे निश्चित….क्रमशः… पुढील भागात नक्की भेटूया…नव्या माहितीसह

  • चंद्रपुरात सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला गणेश मंडळाने दिले समर्थन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. Obc vs Maratha

     

    19 सप्टेंबर पासून गणरायाच्या आगमनाला सुरुवात झाली असून वेंडली येथील न्यु यंग बाल गणेश मंडळाने सरकारला सदबुद्धि देण्याची मागणी करीत टोंगे यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे.

     

    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न द्यावे, स्वाधार योजना व प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह सुरू करावे अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे 11 सप्टेंबर पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे.

     

    ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी राज्यभरात ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहे, मात्र अजूनही ओबीसी आंदोलनाची गंभीर दखल शासनाने न घेतल्याने आंदोलन आजही सुरूच आहे.

     

    चंद्रपुर तालुक्यातील वेंडली येथील गणेश मंडळाने अनोख्या पद्धतीने समर्थन दिल्याने सध्या या गणेश मंडळाची जिल्हाभरात चर्चा आहे.

    यावेळी गणेश मंडळाचे नंदू टोंगे, रणजित पिंपलशेंडे, राजू टोंगे, अमित टोंगे, प्रकाश चालूलकर, गजानन देवाळकर, अनुज नैताम, पंचफुला झाडे, रेखा गोरे, गिरीजा देवाळकर, मनाबाई देवाळकर आदींची उपस्थिती होती.

  • चंद्रपुरात व्हिडीओ गेम पार्लरवर कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर वर News34 च्या बातमी नंतर चंद्रपूर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

     

    चंद्रपूर शहरात मागील अनेक वर्षांपासून व्हिडीओ गेम पार्लर च्या नावाखाली जुगार सुरू असल्याची बातमी 18 सप्टेंबर ला News34 ने प्रकाशित केली होती.

    Local crime branch
    स्थानिक गुन्हे शाखा व पडोली पोलिसांची संयुक्त कारवाई

    बातमी प्रकाशित झाल्यावर पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी पोलीस दल व स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

     

    19 सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पडोली येथील हैदर कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेले रॉबिन व्हिडीओ पार्लर च्या परवान्याची पडताळणी करण्यात आली असता त्या परवान्यात त्रुट्या आढळून आल्या असत्या स्थानिक गुन्हे शाखेने व्हिडीओ गेम पार्लर मधील एक मशीन जप्त केली आहे.

     

    परवान्यात असलेल्या त्रुट्या जोपर्यंत नियमात बसत नाही तो पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात व्हिडीओ गेम पार्लर ला पोलीस प्रशासनाने सिल ठोकले असून याबाबतचा पुढील अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येणार आहे.

     

    सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम यांनी संयुक्तपणे केली.

     

  • चंद्रपुरात आमदार पडळकरांच्या प्रतिमेला मारले जोडे

    News34 chandrapur

    चंद्रपूर:- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या बालिश व मतिमंद गोपीचंद पडळकर याच्या निषेधार्थ चंद्रपूर येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

     

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्यावर वारंवार अतिशय खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या पडळकरांचा स्थानिक चौकात घोषणा देत निषेध करण्यात आला. मागे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित दादांच्या विरोधात लढलेल्या गोपीचंद पडळकर याची बारामतीकरांनी डिपॉजीट जप्त केली होती. त्या धक्क्यातून अजूनही न सावरलेल्या पडळकरांच्या डोक्यात फरक आलेला असुन वारंवार येत असलेल्या झटक्यामुळेच पडळकर निर्बुद्ध सारखे विधाने करीत फिरत असते. यामुळे यांच्यावर उपचाराची गरज असुन याकरिता लागणारा खर्च राष्ट्रवादी काँग्रेस उचलणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

     

    राजकारणात एकमेकांवर टीका या अपेक्षित असतात, मात्र वारंवार वैयक्तीत व अतिशय खालच्या पातळीवर टीका करने या असभ्यपणाचे लक्षण आहे. राज्याच्या राजकारणात अतिशय असभ्य नेते म्हणून कुप्रसिद्ध असणार्या पडाळकरांचा आज जोडे मारुन निषेध करण्यात आला.

     

    सदर आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाधक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले असुन शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, रायुकॉ शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नौशाद भाई, ओबीसी सेलचे निलेश उपरे, माजी उपाध्यक्ष संजय खेवले, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, माजी सरपंच अमोल ठाकरे, गणेश बावणे, संजय सेजूळ, रोशन फुलझेले, संदीप बिसेन, तिमोटी बंडावार, अनुकूल खन्नाडे, पवन बंदीवार, नितीन घुबडे, संजू बिश्वास, मनोज सोनी, राहुल वाघ, राहुल भगत, भोजराज शर्मा, अमर गोमासे, राकेश रप्पेलीवार, अंकित ढेंगारे, सौरभ घोरपडे, केतन जोरगेवार, विकी रायपूरे, निलेश टोंगे, भोला पवार, मुन्ना टेंभुरकर, साहिल शेख, फरहान शेख सहभागी होते.

  • आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पाचे आगमन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणराया विराजमान झाले. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्यांनी गणेश मुर्तीची विधीवतरित्या स्थापना केले. यंदा हे त्यांचे ९३ वे वर्ष असुन जोरगेवार कुटुंबियांची दुसरी पिढी हि परंपरा चालवत आहे.

     

    गणेशोत्सवाची महती जोरगेवार कुटुंबीयांनी मनाच्या गाभार्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. आज गणेश चर्तुथी निमित्त त्यांच्या घरी गणराया विराजमान झाले. त्यांच्या या उत्सवाला ९३ वर्षांची पंरपरा असुन स्वातंत्रपुर्व काळापासुन ते हा उत्सव सहकुटुंब साजरा करत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील जनप्रतिनिधी बाबतीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पाचं आगमन सर्वात वर्ष 1930 पासून होत आहे.

  • News34 च्या बातमीनंतर पोलीस अधीक्षकांनी दिले हे निर्देश

    News34 impact

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात नियमबाह्य पध्दतीने सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर News34 च्या बातमीची जिल्हा पोलीस अधिक्षकाने दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.

     

    चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात नियमबाह्य पध्दतीने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लवर अखेर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा पुकारला आहे.

    विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात मनपा च्या गाळ्यात ही दुकाने सुरू आहे, नियमानुसार अश्या दुकानांना परवानगी देता येत नाही, व्हिडीओ गेम पार्लर संचालकांनी मनपा गाळे घेताना कशाचा आधार घेत व्हिडीओ गेम पार्लर सुरू केले याची चौकशी मनपा प्रशासनाने केल्यास त्यामध्ये प्रचंड तफावत आढळणार.

    मनपाच्या गाळ्यात आज व्हिडीओ गेम पार्लर सुरू आहे, उद्या कुणी जुगार क्लब, बिअर बार साठी परवानगी मागितली तर त्यांना ती परवानगी मिळणार काय? हा मोठा प्रश्न आहे.

     

    एक व्हिडिओ गेम पार्लर पासून दुसरे व्हिडीओ गेम पार्लर सुरू करायचे असल्यास त्यामध्ये तब्बल 75 मीटर अंतर असावे लागते, मात्र शहरात राजकला टॉकीज क्षेत्रात असे कोणतेही नियम पाळण्यात आले नाही.

    व्हिडीओ गेम पार्लर पासून तब्बल 75 मीटर अंतरावर शाळा, धार्मिक स्थळ हे दूर असावे, या संदर्भात वर्ष 2015 मध्ये सामाजिक कार्यकर्ता हिमायू अली यांनी 4 दिवस आमरण उपोषण करीत व्हिडीओ गेम पार्लर च्या मनमानी कारभार विरोधात लढा दिला होता.

     

    व्हिडीओ गेम पार्लर परवान्यात किती मशीन ची परवानगी व सध्या किती मशीन लावण्यात आल्या? त्या मशीनमध्ये अशी काय सेटिंग केली की तिथे कुणीही पैसे जिंकत नाही, हा खेळ म्हणजे एक प्रकारचा जुगार आहे.

    News34 ची बातमी झळकताच जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी कारवाईचे निर्देश दिले.

    जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर व्हिडीओ गेम पार्लर मध्ये काही अवैधपणे व नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास त्यावर कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहे.

    विशेष म्हणजे शहर पोलिसांनी राजकला टॉकीज परिसरातील काही पार्लर बंद केल्याची माहिती मिळाली आहे, पोलीस सध्या नियम तपासून त्यांच्यावर पुढील कारवाई करणार आहे.

    विशेष म्हणजे सदर व्हिडीओ गेम पार्लर वर राजकीय आशीर्वाद असल्याने हे धंदे सर्रासपणे सुरू आहे.

  • तो शासन निर्णय रद्द करा – आमदार सुधाकर अडबाले

    News34 chandrapur

     

    चंद्रपूर : राज्यातील प्रशासनावरील खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विविध विभागातील कामे ही बाह्ययंत्रणेमार्फत करून घेण्यात येणार आहे. यात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदेही कंत्राटी तत्वावर भरण्याचा समावेश आहे. या शासन निर्णयाला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

     

    राज्यात एकीकडे ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून शिक्षकभरती प्रक्रिया राबवण्यात येत असताना, दुसरीकडे शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिक्षक हे समाजाचे आधारस्तंभ असतात. शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल. शिक्षकांना स्थिरता मिळणार नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्थिरता निर्माण होईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल.

     

    प्रशासकीय खर्च आटोक्यात ठेवून विकासकामांना पुरेसा निधी उपलब्ध होण्यासाठी शक्य तिथे बाह्ययंत्रणेद्वारे काम करून घेण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. त्यानुसार नऊ खासगी सेवापुरवठादार कंपन्यांमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शासन निर्णय ६ सप्‍टेंबर २०२३ रोजी निर्गमित केला.

     

    आमदार अडबाले यांनी सरकारला आवाहन केले की, शिक्षकांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्याचा शासन निर्णय तात्‍काळ रद्द करावा. शिक्षकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी. शिक्षकांची बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्यास शिक्षकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागेल. शिक्षकांना नोकरीच्या सुरक्षिततेची हमी मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल. आमदार अडबाले यांनी सरकारला या शासन निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने विरोध दर्शविला आहे.