Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ‘नागपूर आणि चंद्रपूर हा परिसर जगात ‘टायगर कॅपीटल’ म्हणून ओळखला जात असला तरी या दोन्ही जिल्ह्यांत बाबासाहेबांनी 1956 सालीच वाघाची डरकाळी दिली आणि संपूर्ण देशाने ही डरकाळी ऐकली आहे. या महामानवाने दिलेल्या संविधानात स्वातंत्र्य, अधिकार, जबाबदारी आणि कर्तव्याचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संविधान वाचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा व त्यातून जगण्याची प्रेरणा घ्यावी,’ असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल ट्रस्टच्यावतीने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी महामानवाला अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण घोटेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे आदी उपस्थित होते.

     

    देशात आज 750 पेक्षा जास्त जिल्हे आहेत, मात्र नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांचे विशेष महत्त्व आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘14 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तर दोन दिवसांनी म्हणजे 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. हे दोन्ही जिल्हे आज वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. पण 1956 मध्येच बाबासाहेबांची डरकाळी संपूर्ण देशाने ऐकली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसारच देशाची आणि राज्याची वाटचाल सुरू आहे. संविधानात प्रत्येक गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, अधिकार यासोबतच प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची आणि कर्तव्याचीसुध्दा जाणीव करून देण्यात आली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे केवळ स्मरण करून थांबू नये तर, त्यांच्या विचारांवर अंमल करावे लागेल. आणि त्यासाठी प्रत्येकाला संविधानाचे वाचनही करावे लागेल.

     

    महापुरुषांना भारतापुरता मर्यादित समजू नये

    ‘भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरतेच मर्यादीत नाही तर संपूर्ण जगाला वैचारीक प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा जीवन जगण्याचा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला आहे. गौतम बुद्धांचा शांततेचा आणि समतेचा संदेश संपूर्ण जगात पोहचला आहे. केंद्र शासन आज बुद्धगया, नालंदा, विक्रमशिला, सारनाथ, कपिलवस्तू, राजगीर, वैशाली, श्रावस्ती या ठिकाणांना जोडणारे बुद्ध सर्किट तयार करीत आहे,’ असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    एस.एन.डी.टी. विद्यापीठ आणि चंद्रपूर फ्लाईंग क्लब ठरणार विद्यार्थ्यांसाठी गेमचेंजर

    कौशल्य विकासावर आधारीत प्रशिक्षण आणि रोजगारासाठी चंद्रपूरमध्ये एस.एन.डी.टी विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येत आहे. तसेच आगामी काही महिन्यातच चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आदी विद्यार्थी–विद्यार्थीनींसाठी या बाबी गेमचेंजर ठरणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • चंद्रपुरातील अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील वाहतुकीने सतत कोंडलेल्या जटपुरा गेटवरील अपघाताचा थरारक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे, या व्हिडीओ मध्ये भरधाव वेगात असलेल्या ऑटोने 65 वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली आहे.

    या व्हायरल व्हिडिओत 65 वर्षीय इसम रस्त्यावरून पलीकडे जात असताना त्यांना भरधाव वेगात येत असलेल्या ऑटो ने जोरदार धडक दिली, या धडकेत 65 वर्षीय प्रकाश खोडे राहणार जलनगर हे गंभीर जखमी झाले आहे.

     

    चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे, मात्र यावर वाहतूक विभागाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असून शहरातील भरधाव वेगात चालणाऱ्या वाहनांवर कारवाई फक्त नावापुरती होत असल्याचा आरोप वारंवार वाहतूक विभागावर लागत आहे.

     

    विशेष बाब म्हणजे शहरातील विविध भागात लागलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कंट्रोल रूम हे चंद्रपूर वाहतूक विभागात आहे.

  • 3 जिल्ह्यातील दुचाकी चोर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीवर अंकुश लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने कंबर कसली आहे, 16 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे एका दुचाकी अट्टल चोराला ताब्यात घेतले, त्याची अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरीचे मोठे घबाड उघडकीस आले.

     

    16 ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखा दुसऱ्या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम कमी किमतीमध्ये दुचाकी वाहन विकण्यासाठी बस स्टॅण्ड वर ग्राहक शोधत आहे. मात्र त्या वाहनांचे कागदपत्रे त्याच्याजवळ नव्हते, पोलिसांना संशय आला असता त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

     

    पारधीगुळा धोपटाला येथे राहणारा 28 वर्षीय प्रदीप संजय शेरकुरे असे त्या इसमाचे नाव, सदरचे दुचाकी वाहन प्रदीप ने वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, प्रदीप कडून दुचाकी वाहन क्रमांक MH34BC5968 जप्त करण्यात आली.

    प्रदीप ने इतर काही गुन्हे केले का याबाबत सखोल चौकशी केली असता वरोरा, गडचांदूर, नागपूर व यवतमाळ जिल्ह्यातील दुचाकी व LED टीव्ही चोरी केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

     

    प्रदीप ने 7 मोटार सायकल व एक टीव्ही चोरी केली होती, आरोपिकडून तब्बल 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, आरोपीला पुढील कारवाईसाठी वरोरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, पोलीस कर्मचारी अतुल डांगे, जमिर पठाण, नितेश महात्मे, प्रसाद धुळगळे, दिनेश अराडे व रुषभ बारसिंगे यांनी केली.

  • चंद्रपुरात 5 दिवसीय माता महाकाली महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार व माता महाकाली महोत्सवाचे संयोजक किशोर जोरगेवार यांनी 19 ऑक्टोबर पासून शहरात 5 दिवसीय महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे.

     

    विधानसभेतील नागरिकांना मूलभूत समस्या न भेळसाव्या यासाठी ठोस पावले उचलणारे आमदार जोरगेवार आपल्या वेगळ्या कार्यप्रणालीमुळे नेहमीच चर्चेत असतात, मात्र 2022 पासून त्यांनी चंद्रपुरातील आराध्य दैवत माता महाकाली महोत्सवाचे आयोजन केल्याने विविध राज्यातील भाविकांच्या मनात आमदार जोरगेवार यांनी आपली लोकप्रिय छवी निर्माण केली आहे.

     

    यंदा महाकाली महोत्सव हा 5 दिवसांचा असून यावर्षी अनेक मुख्य आकर्षण या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिक अनुभवणार आहे, जगप्रसिद्ध जागरण गायक लखबिर सिंग लख्खा, अनुराधा पौडवाल, निरंजन बोबडे, वैशाली सामंत, युवा कीर्तनकार सोपान दादा कनेरकर व मंदिर अब बनने लगा है गाण्याची पार्श्वगायिका इशरत जहाँ यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

     

    असा असेल हा ऐतिहासिक कार्यक्रम

    19 ऑक्टोबर ला जैन मंदिर संस्था व सराफा असोसिएशनच्या वतीने श्री माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीची शोभायात्रा द्वारे महोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. सायंकाळी गायक लखबिर सिंग लख्खा यांच्या भक्तिमय संगीताचा कार्यक्रम.

    20 ऑक्टोबर ला सारेगामा फेम निरंजन बोबडे सह 151 कलावंतांचा भक्ती स्वराभिषेक कार्यक्रम, 21 ऑक्टोबर ला गोंडवानाचा महायोद्धा वीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर आधारित नाटक, वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात गीत संगीताचा कार्यक्रम.

    22 ऑक्टोबर ला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार सोपान दादा कनेरकर यांचे कीर्तन, गायिका अनुराधा पौडवाल यांचा भक्तिमय संगीत कार्यक्रम, सोमवार 23 ऑक्टोबर ला श्री माता महाकाली नगरप्रदक्षिणा पालखी काढण्यात येणार आहे, गायिका इशरत जहाँ यांचा रोड शो, उत्तरप्रदेश राज्यातील केदारनाथ धाम येथील झांज डमरू पथक, शिवतांडव अघोरी नृत्य, बाहुबली हनुमान वानरसेना यांचे बोलके दृष्य अश्या अनेक विविध आकर्षण सहित शोभायात्रा शहरातून प्रदक्षिणा घालत परत माता महाकाली मंदिरात पोहचणार आहे.

    विशेष कार्यक्रम

    19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान 9 हजार 999 बालिकांचे कन्यापूजन व कन्याभोजन, 20 ते 23 ऑक्टोबर ऐतिहासिक हेरिटेज वॉक, बाई पण भारी देवा, मला पण आज बोलायचंय, महिला व मुलींकरिता मुक्त व्यासपीठ, चंद्रपूर जिल्ह्यातील वनवैभव दाखविणारे चित्र प्रदर्शन, पोलीस विभागातर्फे महिलांकरिता मार्गदर्शक सूचना केंद्र, आत्मनिर्भर दुर्गा यांचा सत्कार, चित्रकला व चित्र प्रदर्शनाचे आयोजन.

    5 दिवसीय कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

    अश्या विविध कार्यक्रमाची मेजवानी महाकाली महोत्सवाच्या 5 दिवसाच्या काळात भाविकांना अनुभवायला मिळणार आहे, श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवाचा लाभ नागरिकांनी उपस्थित राहून घ्यावा असे आवाहन संयोजक व आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

  • चंद्रपुरात थोर स्त्रियांचा जागर करणारा दांडिया उत्सव

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरच्या नानाजी नगर महिला मंडळातर्फे आयोजीत वुमेन्स पाॅवर दांडियाचे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते रविवारी 15 ऑक्टोंबर रोजी रात्री 8 वाजता थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख,माजी नगरसेविका अनुराधा हजारे, जनविकास सेनेचे घनश्याम येरगुडे व मनीषा बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.

     

    विशेष म्हणजे या दांडिया मध्ये नऊ दिवस राजमाता जिजाऊ, महाराणी हिराई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,आद्य शिक्षिका फातिमा शेख, प्रथम वैद्यकीय चिकित्सक रख्माबाई राऊत, माता रमाई भिमराव आंबेडकर व मदर टेरेसा या 9 थोर स्त्रियांच्या कार्याची माहिती देऊन त्यांचा जागर करण्यात येणार आहे. तसेच चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 9 महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच विधानसभेत जनसामान्यांचे अनेक प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आमदार धानोरकर यांचा साडी-चोळी देऊन नानाजी नगर महिला मंडळाच्या सदस्यांनी सत्कार केला.

     

    उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार प्रतिभा धानोरकर यांनी महिलांनी सक्षम होऊन स्वबळावर उभे राहण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.तसेच नवरात्र उत्सवातून थोर महिलांच्या कार्याचे स्मरण करण्याची संकल्पना समाजातील नवीन पिढीला दिशा देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
    या दांडिया उत्सवामध्ये नऊ दिवस चंद्रपूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांचा सत्कार करण्यात येणार असल्याने सर्वसामान्य मुली व महिलांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळेल अशी भावना यावेळी माजी नगरसेवक देशमुख यांनी व्यक्त केली.

     

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती गावंडे या मुलीने केले. यावेळी तिने जिजाऊची वेशभूषा परिधान केल्याने सर्वांचे लक्ष वेधले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व राजमाता जिजाऊ च्या कार्याचे वाचन माधुरी शास्त्रकार तर आभार प्रदर्शन नंदू पाहुणे यांनी केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नानाजी नगर महिला मंडळाच्या शुभांगी गावंडे,संगीता पाहुणे,मनिषा गावंडे, संगीता वानखडे,अलका लांडे ,जयश्री लांडे,प्रविण बरडे, वैशाली हिवरकर,साधना शेंडे, सपना राणा,कविता भांदककर यांनी अथक प्रयत्न केले.

  • चंद्रपुरात गर्भवती महिलेला मारहाण

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यातील मूल शहरात 14 ऑक्टोबर ला रात्रीच्या सुमारास शेजाऱ्यांनी गर्भवती महिलेला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे, या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राज्यात एकीकडे सरकार महिलांच्या सन्मानार्थ विविध योजना काढत आहे मात्र दुसरीकडे महिलांवर अत्याचार वाढत आहे, असाच एक संतापजनक प्रकार मूल शहरात उघडकीस आला.

     

    शहरातील वॉर्ड क्रमांक 17 मध्ये राहणारे 27 वर्षीय आकाश बोर्डावार राहतात, मोल मजुरी करीत ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, 6 महिन्यांपूर्वी आकाश चे लग्न दामिनी सोबत झाले, सध्या दामिनी ही 3 महिन्याची गर्भवती आहे.

     

    आकाश यांच्या घराशेजारी राहणारे राहुल प्रेमलवार राहत असून त्यांच्यासोबत नेहमी होणारे वाद बघता आकाश बोर्डावार यांचे बोलणे बंद आहे. 14 ऑक्टोबर ला रात्री 11.30 वाजताच्या सुमारास राहुल प्रेमलवार, छोटू तोटावार, ईश्वर लोनबले व बादल बावनवाडे हे बोर्डावार यांच्या घरापुढे येऊन जोरजोरात ओरडत शिवीगाळी करू लागले.

     

    त्यांचा आवाज ऐकून आकाश व त्यांची आई शोभा बोर्डावार यांनी शिवीगाळी का करता म्हणून हटकले, हटकले म्हणून चौघांचा पारा चढला व त्यांनी आकाश सोबत मारहाण केली, आकाश ला मारहाण होत असताना त्यांच्या गर्भवती पत्नीने पतीला वाचविण्यासाठी मध्ये गेली मात्र चौघांनी दामिनी ला सुद्धा मारहाण करीत तिला अश्लील शिवीगाळी केली.

     

    या मारहाणीत दामिनी जखमी झाली, पती आकाश ने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले.

     

    आकाश ने याबाबत मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, पोलिसांनी राहुल प्रेमलवार, छोटू तोटावार, ईश्वर लोनबले व बादल बावनवाडे यांच्यावर कलम 324, 294,  506 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

  • चंद्रपुर जिल्ह्यात ओबीसींच्या भविष्यासाठी भेटीगाठी जनजागृती अभियान राबविणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मातोश्री सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघ , ओबीसी संघटना व जात संघटनायांची बैठक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली.

     

    यासभेत ओबीसीच्या मागण्यांसाठी 21 दिवस अन्नत्याग आंदोलन, मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, या व इतर 22 मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेले आंदोलन 30 सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांगता करण्यात आले.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दिनांक 29 सप्टेंबर ला राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले. तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिले. उपोषण सोडायला आलेले उपमुख्यमंत्री यांनी पुढील तीन दिवसात या सर्व मंजूर मागण्यांचे इतिवृत्त प्रकाशित करू असे बोलले. परंतु अजून पर्यत इतिवृत्त दिलेले नसल्यानें सरकारचा निषेधाचा ठराव करण्यात आला.

     

    ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विजय बलकी व प्रेमानंद जोगी यांचा नागरी सत्कार कार्यक्रम दिनांक 30 ऑक्टोबर प्रियदर्शन सभागृहात सायंकाळी 6 वाजता घेणार आहे , ओबीसीत मोडणारे खासदार ,आमदार यांनी अजून पर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून देऊ नये असे निवेदन सरकारला दिले नाही आहे , त्यांना तसे निवेदन देण्यासाठी भाग पाडणे आणि 1 नोव्हेंबर 2023 रविंद्र टोंगे यांच्या वेंडली ता चंद्रपूर गावापासून “ओबीसींच्या भविष्यासाठी भेटी गाठी जनजागृती अभियान “सुरू करून जिल्ह्यातील संपूर्ण 15 तालुक्यात अभियान राबविण्यात येणार असून सामारोप चिमूर तालुक्यात करण्यात येइल.

     

    यावेळी सभेला विदर्भ तेली महासंघाचे प्रा सूर्यकांत खणके, माळी महासंघाचे अरुण तिखे, रामभाऊ खडलिंगे, प्रा अनिल शिंदे नंदू नागरकर, पप्पु देशमुख, रविंद्र टोंगे, विजय बलकी , प्रेमानंद जोगी, डॉ दिलीप कांबळे, शाम लेडे ,राजेश बेले, श्रीधर मालेकर,कृनाल चहारे, अरूण देऊलकर, एम वि पोटे, प्रा सुरेश विधाते, प्रा बबन राजूरकर, देवराव दिवसे, प्रदीप पावडे, दिनेश कष्टी, विनोद शेंडे, गणपती मोरें, अक्षय येरगुडे, देवा पाचभाई, शखील शेख, पांडूरंग गावतुरे बंडू लेनगुरे, नाझीर गुलाब कुरेशी, महेश खगार, विलास माथनकर सुधाकर काकडे सुनिल मचणवार,देवराव सोनपित्तरे, अवधुत कोटेवार, रणजित डवरे, भाऊराव झाडे, बाबूराव पारखी,गणेश आवारी, हितेश लोडे,मनिषा बोबडे, कुसुमताई उदार, रजनी मोरे, गोमती पाचभाई उपस्थित होते.

  • संरक्षण भिंत तोडून घरात घुसला अनियंत्रित ट्रक

    News34 chandrapur

    बल्लारपूर (रमेश निषाद)

    शुक्रवारच्या रात्री एक भरधाव हायवा ट्रक बल्लारपूर- आलापल्ली मार्गावरील येनबोडी येथील एका घरात संरक्षण भिंत तोडून घरात घुसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरमालक हेमंत भगत यांची संरक्षण भिंत तुटल्याने आणि अंगणात ठेवलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.

     

    शुक्रवारच्या मध्यरात्री बल्लारपूरकडून आलापल्ली जाणारा हायवा क्रमांक एमएच ३३ टी ४४१० सुसाट वेगात होता. येनबोडी जवळ येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्ता दुभाजक ओलांडून आणि सुरक्षा जाळी तोडून ट्रक हेमंत भगत यांच्या घरात घुसला अंगणात ठेवलेली दुचाकी क्रमांक एमएच ३४ बिएन ७७१३ चा चुराडा करीत ट्रक घराच्या भिंतीवर जाऊन आदळला.

     

    सुदैवाने रात्रीची घटना असल्याने मोठी दुर्घटना टळली. येनबोडी येथे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय असल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत येथे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. घटनेच्या वेळी भगत कुटुंबीय गाढ झोपेत होते. पंरतु, आवाजाने त्यांनी घराबाहेर धाव घेतली, शेजारीही धावून आले. घटनेनंतर चालकाने पळ काढला होता. घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली.

     

    ठाणेदार उमेश पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. लोहखनिज वाहून नेणाऱ्या ट्रकांमुळे या मार्गावर अपघात वाढले असून, यापूर्वी रस्त्यालगच्या घरांमध्ये ट्रक घुसल्याच्या घडल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे दिवसेंदिवस अपघाताच्या मालिकेत वाढ होत आहे. या मार्गावर रोज कुठे ना कुठे अपघात घडत आहेत.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनीचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत अत्यंत उत्कृष्ठ असे मल्टिमिडीया छायाचित्र  प्रदर्शन असून नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन महामानवाचा जीवन प्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी केले.

     

    धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांच्या सहयोगाने चंद्रपूर येथील दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे तीन दिवसीय “डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जीवनप्रवास” या विषयावर आधारित मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

     

    कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधिक्षक रीना जनबंधू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दीक्षाभूमी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर, माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नंदनवार, आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, राहूल घोटेकर उपस्थित होते.

     

    यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे म्हणाले की, केंद्रीय संचार ब्यूरोने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहितीची प्रदर्शनाच्या रुपात उत्तम मांडणी केली आहे. प्रत्येक छायाचित्राच्या खाली प्रत्येक घटनेचे वर्णन लिखीत स्वरूपात मांडण्यात आले आहे. जेणेकरून प्रदर्शन पाहणाऱ्यांना माहिती जाणून घेणे सोपे होईल. नागरीकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महामानवाचा जीवनप्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

     

    अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू म्हणाल्या की, केंद्रीय संचार ब्यूरोने माहितीपूर्ण असे प्रदर्शन लावले आहे. या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल संस्थेने कायमस्वरुपी अशाप्रकारचे प्रदर्शन दीक्षाभूमी येथे स्थापन करण्याबाबत विचार करावा, जेणेकरून चंद्रपूरच्या नवीन पिढीला डॉ. बाबासाहेबांची माहिती पोहचविणे शक्य होईल, अशी सूचना त्यांनी केली.

     

    अरुण घोटेकर म्हणाले, केंद्रीय संचार ब्यूरोने या प्रदर्शनाच्या माध्यमातून चंद्रपूराला उत्कृष्ठ अशी भेट दिली आहे. या प्रदर्शनातील माहिती अवलोकन करण्यासारखी आहे. बाबासाहेब आंबेडकरांवरील हे प्रदर्शन दुर्मिळ आहे. नागरीकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी तर संचालन उमेश महतो यांनी मानले.

    17 आक्टोबरपर्यंत प्रदर्शन नागरिकांसाठी खुले

    हे प्रदर्शन 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत नागरीकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत विविध दुर्मिळ छायाचित्र लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन हंसराज राऊत यांनी केले आहे.

  • चंद्रपुरातील 3 डॉक्टर्स विरोधात पोलिसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : बल्लारपूर ग्रामीण रुग्णायात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेवर स्थानिक डॉक्टरांनी निष्काळजीपणे उपचार केले असून, सिझर केलेल्या ठिकाणचे टाके खुलल्याने महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे पीडित महिलेवर चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार करावे लागले. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकीत्सक आणि बल्लारपूर पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात निष्काळजी केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई संबंधित डॉक्टरांवर करण्यात आली नाही.

     

    २५ ऑक्टोबरपर्यंत या डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा पीडित महिलेची बहीण प्रज्ञा कडूकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

     

    दीपा संपत पेरकर या महिलेला प्रसूतीसाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सिझर करून प्रसूती करण्यात आली. यानंतर पाच दिवसाने तिची रुग्णालयातून सुटी करण्यात आली. परंतु, या कालावधीत तिच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाही. घरी गेल्यानंतर सिझरचे टाके खुलून तिची प्रकृती गंभीर झाली. यानंतर तिला परत रुग्णालयात नेले असता तिन्ही डॉक्टरांनी हात वर केले.

     

    या प्रकरणात डॉ. मृणाल, डॉ. डोंगरे, डॉ. रामटेके यांनी निष्काळजीपणी केल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. परंतु, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. डॉ. मृणाल या बल्लारपुरातील काँग्रेस नेत्याच्या कुटुंबातील असल्याने त्यांच्यावर कारवाई टाळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

     

    दरम्यान, या तिन्ही डॉक्टरांवर जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच चौकशी करून त्यांची वैद्यकीय सेवा निलंबित करण्यात यावी, अन्यथा २५ ऑक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला राजेश बेले, प्रज्ञा कडूकर, पीडित महिलेचा भाऊ उमेश नगराळे उपस्थित होते.