Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपुर शहरात 23 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत माता महाकाली मंदिरापासुन नवरात्रोत्सवानिमित्त रॅली निघणार आहे. सदर रॅली माता महाकाली मंदिर-गिरणार चौक-गांधी चौक जटपुरा गेट-परत मौलाना चौक-गिरणार चौक ते माता महाकाली पर्यंत काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून या मार्गावरील सर्व वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे.

     

    त्याअनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951 च्या कलम-33(1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी सुरळीत रहदारी व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व नियमणासाठी सदर रॅलीकरीता असलेल्या मार्गावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास व गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करणेबाबतची अधिसुचना पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी निर्गमीत केली आहे.

     

    दि. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत माता महाकाली मंदिर-गिरणार चौक-गांधी चौक-जटपुरा गेट-परत मौलाना चौक-गिरणार चौक ते माता महाकाली मंदिर पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरीता बंद राहील. तसेच हा मार्ग “नो पार्कंग झोन आणि नो हॉकर्स झोन” म्हणून घोषित करण्यात येत आहे.

     

    या कालावधीत सर्व वाहतुकदारांनी या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा :

    बल्लारपूरकडून येणाऱ्या तसेच बाबुपेठ, बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी भिवापूर-हनुमान खिडकी-दादमहल वार्ड या मार्गाचा वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटार सायकल व ऑटो यासाठीच राहील. बागला नगर, महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चारचाकी वाहनांने बाहेर जाण्यासाठी किंवा परत येण्यासाठी लालपेठ कॉलरी-पठाणपुरा गेट-बिनबागेट या मार्गाचा वापर करावा. तसेच शहराबाहेर ईतरत्र जाण्यासाठी कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा. नागपूर व मुलकडून शहरामधील पंचशिल चौक, श्री टॉकीज चौक, पठाणपुरा परिसर वार्ड मध्ये जाणाऱ्या सर्व नागरीकांनी (जड वाहने वगळून) वरोरा नाका-संत केवलराम चौक-विदर्भ हाउसिंग चौक -रहेमतनगर – बिनबा गेट मार्गाचा वापर करावा. तसेच नागपूर व मुलकडून शहरामधील रामाळा तलाव, बगड खिडकी, गंजवार्ड, भनापेठवार्ड मध्ये जाणाऱ्या सर्व नागरीकांनी (जड वाहने वगळुन) सावरकर चौक-बस स्टॅन्ड चौक-आर.टी.ओ. ऑफिस- रयतवारी कॉलरी या मार्गाचा वापर करावा.

     

    यात्रेकरीता बाहेरून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था : (नियोजीत वाहनतळ)

    डी.एड. कॉलेज बाबुपेठ, राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज, श्री. बागला यांची खाजगी जागा (बागला चौकीजवळ), बैल बाजार (माता महाकाली मंदिरासमोर), श्री. चहारे यांची जागा (चहारे पेट्रोलपंपच्या मागे), श्री. कोठारी यांची खाजगी जागा (महाकाली मंदिरासमोर), श्री. पटेल यांची खाजगी जागा (महाकाली मंदिरासमोर) आणि कोहीनुर तलाव ग्राउंड (अंचलेश्वर गेटजवळ) ही नियोजित वाहन स्थळे असून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरीकांनी निर्देशाचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

  • भक्तिमय गीताने गाजलं चंद्रपूर महाकाली महोत्सव

    News34 chandrapur

    चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित श्री माता महाकाली महोत्सवात जगप्रसिद्ध देवी गीत जागरणकार लखबिर सिंग लक्खा यांच्या भक्तिमय गीतांनी रंगत भरली. यावेळी लखबिर सिंग लक्खा यांनी गायलेल्या भक्तीगीतात चंद्रपूर तल्लीन झाला.

    गुरुवारी महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते महाकाली महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमानंतर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी चंद्रपूरकरांनी अनुभवली यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर चंद्रपूरातील स्थानिक कलाकारांनी व शालेय विद्यार्थ्यांनी नृत्य जल्लोष हा कार्यक्रम सादर केला.

    तर सायंकाळी 9 वाजता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेल्या जगप्रसिद्ध देवी गीत जागरणाकर लखबिर सिंग लक्खा यांचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी माता भक्त हजारोच्या संख्येने महोत्सव स्थळी जमा झाले होते.

     

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्यानी किशोर जोरगेवार, महाकाली माता महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, कोषाध्यक्ष पवण सराफ, सदस्य बलराम डोडाणी, कुक्कु सहाणी, मिलींद गंपावार, संजय हरणे यांच्यासह इतर पदाधिका-यांनी लखबिर सिंग लक्खा यांना मातेची चुनरी, मातेची मुर्ती आणि शाल श्रीफळ देत त्यांचे स्वागत केले. आमच्या विनंतीला मान देत आपण येथे आलात. या महोत्सवात रंगत भरली असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. आये नौरात्रे माता के या भक्तीगीताने लखबिर सिंग लक्खा यांनी कार्यक्रमाला सुरुवात करताच संपूर्ण परिसरात भक्तीचा महासागर अवतरला.

    तर माता महाकालीच्या आरती आणि भजनाने महाकाली महोत्सवाच्या दुस-या दिवसाची सुरवात करण्यात आली यावेळी 11 वाजता भावना तन्नीरवार यांचा प्रवचन कार्यक्रम पार पडला, त्यानंतर नवरात्री दरम्यान जन्मलेल्या कन्यांच्या पालकांना श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने चांदिचे नाणे देण्यात आले. नंतर कवी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात आले.

    उद्याचे कार्यक्रम

    सकाळी 9 वाजता माता महाकाली आरतीने महोत्सवाला सुरवात होणार आहे. दुपारी 10 वाजता ग्रामगीता महिलोन्नती या विषयावर बाल किर्तनकार साक्षी अवतरे कीर्तन सादर करणार आहे. 11 वाजता प्रतिमा स्वरुप देवता या विषयावर स्तंभ लेखिका मुर्तीशास्त्र अभ्यासिका डॉ. रमा गोलवकर यांचे व्याख्यान होणार आहे. दुपारी 12.30 वाजता विठ्ठल दिंडी तसेच चिंगारी हु मै या पथनाट्याचे सादरीकरण एकता बंडावार व त्यांचा समुह सादर करणार आहे. दुपारी 2 वाजता लोकजागृती नाट्य मंचाच्या वतीने गोंडवाना के महायोध्दा शहीद विर बाबूराव शेडमाके यांच्या जीवनावर नाटक प्रस्तृत करण्यात येणार आहे. 5 वाजता माता महाकालीची आरती होईल त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली सामंत यांच्या गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

  • चंद्रपुरात भाऊच्या दांडियाची धूम

    News34 chandrapur

    चंद्रपूर : स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने आयोजित केलेल्या ‘दांडिया’मध्ये तरुणाई डोलायला लागली आहे. ‘ढोली तारो ढोल बाजे, पंखिडा… पंखिडा…’ अशा विविध गाण्यांवर दांडिया, गरब्याचाच बोलबाला आहे.
    Chandrapur dandiya
    भाऊच्या दांडियात अधिकाऱ्यांची उपस्थिती
    या उत्सवात जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक जितेंद्र रामगावकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संचालक पाठक, महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवार, सार्वजनिक बांधकाम मंडळ अधीक्षक अभियंता गाडेगोणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचाले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चौव्हाण, कार्यकारी अभियंता कुंभे, कृषी अधिकारी शंकरजी तोटावार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे, गोडसेल्वार, दिलीप माकोडे, संवाद प्रतिष्ठानचे प्रा. विजय बदखल, उद्योजक चंदू वासाडे, प्रा. कीर्तिवर्धन दीक्षित, प्रा. डोहे यांची विशेष उपस्थिती  होती. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते वरील अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
    यावेळी भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा चंदाताई वैरागडे, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, काँग्रेस नेते विनोद अहिरकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस नेते उमाकांत धांडे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, काँग्रेस नेते महेश मेंढे, ओबीसी नेते उमाकांत धांडे, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, भद्रावती तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, डॉ. सागर वझे, मोनू चिमुरकर, ओबीसी नेते नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, अजय बल्की, सुरज बोबडे, रतन सिलावार, किशोर हेमके यांची उपस्थिती होती.
    या दांडियात आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत.
    ———————————————————

    २१ ला प्रिन्स नरुला, २२ ला प्रथमेश परब

    चंद्रपूर शहरात भाऊचा दांडियात धूम आहे. यामध्ये तरुणाईचे आकर्षक झालेले प्रिन्स नरुला हे २१ ऑक्टोबर व प्रथमेश परब हे २२ ऑक्टोबर रोजी येणार आहेत.
    ————————————————————

    मान्यवरांतर्फे बक्षिसांचा पाऊस

    ग्रुप दांडियामध्ये स्वर्गीय राजमलजी पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजमलजी पुगलिया फाउंडेशन तर्फे १ लाख रुपये, कपल करिता स्वातंत्र सेनानी स्व. उत्तमचंद राजमलची पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुगलिया परिवारातर्फे ५० हजार रुपयाचे बक्षीस तसेच सोलो (मुलगा) गटाला संवाद प्रतिष्ठानतर्फे ५० हजार, सोलो (मुलगी) ५० हजार, काँग्रेस चंद्रपूर शहर अध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडून लहान ग्रुपचा मुलांना ११ हजार रुपये व लहान मुलींसाठी ११ हजार रुपये तसेच काँग्रेस नेते महेश मेंढे यांच्याकडून ३५ वयावरील (पुरुष) ११ हजार रुपये, ३५ वयावरील (महिला) ११ हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाचा एल्गार

    News34 chandrapur

    चंद्रपूर/पोम्भूर्णा – पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा हटविल्यावरून चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलन 20 ऑक्टोबर ला चांगलेच चिघळले.

     

    प्रशासनाकडून आदिवासी संस्कृती व समाजाची थट्टा केल्याने आज वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, परिस्थिती हाताळण्यासाठी गेलेले उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे याना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली, त्यांनतर तणावाची स्थिती निर्माण झाली, मात्र पोलीस विभागाने यावर नमती भूमिका घेतल्याने अनुचित प्रकार घडला नाही.

     

    जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका आदिवासी समाजाने घेतली होती, यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल असा इशारा सुद्धा देण्यात आला होता.

     

    वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील अटल बिहारी वाजपेयी इको पार्क मध्ये आदिवासी संस्कृती घडविणारे पुतळे व झेंडे लावण्यात आले होते, मात्र प्रशासनाकडून पुतळे व झेंडे हटविल्याने हा वाद सुरू झाला. आदिवासी बांधव वनविभागाच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलनाला बसले, मागण्या पूर्ण करा अश्या भूमिकेत आदिवासी समाज त्याठिकाणी ठाण मांडून बसला आज आंदोलन चिघळल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

     

    कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू आंदोलन स्थळी दाखल झाले व आंदोलनाचे नेतृत्व करणारे जगन येलके यांच्याशी चर्चा केली मात्र कोणताही तोडगा निघाला नाही.
    बिगडत चाललेली परिस्थिती पाहता ३०० हून अधिक पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.

  • शासन निर्णयाविरोधात चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी रस्त्यावर

    News34 chandrapur
    चंद्रपूर – शासकीय नोकरीचे खासगीकरण व शिक्षणाचे कंत्राटीकरण या शासन निर्णयाविरोधात चंद्रपुरात शिक्षण व नोकरी बचाव समितीने जन आक्रोश मोर्चा काढत सरकारचा निषेध नोंदविला.

     

    महाराष्ट्र शासनाने खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे त्या विरोधामध्ये आज चंद्रपुरात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बेरोजगार युवक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या स्वयंस्फूर्तीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाची सुरुवात दीक्षाभूमी परिसरातून करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

     

    यावेळी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित झाले होते. हातात फलक आणि घोषणाबाजी करत या मोर्चाची सुरुवात करण्यात आली.

     

    खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाचा निर्णय हा त्वरित मागे घ्यावा या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी एकजूट झाले. सोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील या मोर्चात पाठिंबा दर्शवण्यासाठी सहभागी झाले.

     

    विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा मोर्चा निघण्यापूर्वी काही राजकीय पक्षाच्या अतिउत्साही पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा आमच्या पक्षाचा आहे असे दर्शविले होते, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाईने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

    शिक्षण व नोकरी बचाव समितीद्वारे आयोजित ह्या मोर्च्यात हजारोच्या संख्येत तरुणाई सामील झाली.

    आश्वासन नको, अध्यादेश काढावा

    कंत्राटी भरतीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर आंदोलने केली जात आहेत. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेने चंद्रपुरातील आंदोलनकर्त्यांचे समाधान झालेले नाही. राज्यातील युवकांविषयी तळमळ असेल, तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंबंधीचा शासन निर्णय जारी करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोबतच सप्टेंबर महिन्यात काढलेले सर्व शासन निर्णय, परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने करण्यात आली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असेही सांगण्यात आले.

     

    तरुणाईची मुख्य मागणी

     

    उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्ययंत्रणेमार्फत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नोकरी हा महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणाचा हक्क आहे. मात्र, राज्य शासन बाह्ययंत्रणेमार्फत पदभरती करून सुशिक्षित बेरोजगारांचे शोषण करण्याचे परवाने वाटप करीत आहे. शासनाने सदर आदेश तत्काळ रद्द करून सर्व विभागातील रिक्त जागेवर कायमस्‍वरूपी पदभरती करावी, ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, एनपीएस रद्द करून शिक्षक-राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, एमपीएससी व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्‍पर्धा परिक्षेचे शुल्‍क कमी करून १०० रुपये ठेवावे, आयबीपीएस, टीसीएस किंवा इतर खासगी संस्‍थामार्फत विविध पदाच्या स्‍पर्धा परीक्षा न घेता सर्व परीक्षा एमपीएससी आयोगाद्वारे घेण्यात याव्‍या, विविध शासकीय पदभरतीसाठी होणाऱ्या स्‍पर्धा परीक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समूह शाळा संकल्‍पना रद्द करणे, राज्‍य शासनातील शासकीय कार्यालयातील रिक्‍त पदे व अनुदानित संस्‍थेमधील शिक्षक- प्राध्यापकांची रिक्‍त पदे तत्काळ भरावी आदी मागण्यांसाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

    जन आक्रोश मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रुपांतर झाले. यावेळी राज्‍यातील विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, शिक्षक, राज्‍य कर्मचाऱ्यांना न्‍याय द्यावा अन्‍यथा शिक्षण-नोकरी बचाव समिती जिल्‍हा चंद्रपूरच्या वतीने सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करून राज्‍यव्‍यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्हा चंद्रपूरच्या वतीने देण्यात आला.

    जनआक्रोश मोर्चात शिक्षण – नोकरी बचाव समिती जिल्हा चंद्रपूरचे सर्व सदस्य यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विविध विभागातील शासकीय कर्मचारी, विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्‍थित होते. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सुधाकर अडबाले, आमदार ॲड. अभिजित वंजारी, आमदार प्रतिभा धानोरकर हे मोर्चात प्रामुख्याने सहभागी झाले होते.

    मोर्चातील मागण्यांवर विद्यार्थ्यांनी शासनाप्रती रोष व्यक्त केला. त्यानंतर विविध महापुरुषांच्या वेशभुषेतील युवक-युवतींच्या हस्ते निवासी जिल्हाधिकारी यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले व सदर मागण्यांचे निवेदन शासनाकडे तात्काळ पाठविण्यात येईल, अशी ग्वाही दिली. शेवटी शपथ घेऊन राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली.

     

  • चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्लात गुराखी ठार

    News34 chandrapur

    मूल (गुरू गुरनुले): गुरे चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घेवुन ठार केल्याची घटना वनविकास महामंडळाच्या कांतापेठ बिटातील कक्ष क्रं. 523 घडली. बंडु विट्ठल भेंडारे वय 60 रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे.

    मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडु विट्ठल भेंडारे हे आज 20 ऑक्टोबर ला गुरांना चराईसाठी जंगलाकडे घेऊन गेले होते, दरम्यान दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगलाकडुन गुरे धावत येत असल्याने कांतापेठ येथील नागरीकांना संशय आल्याने त्यांनी जंगलाच्या दिशेने गेले.

     

    यावेळी बडु विट्टल भेंडारे यांना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहचुन पंचनामा करीत आहे.

  • अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – सावली रेंज मधील उप क्षेत्र राजोली अंतर्गत मूल सिंदेवाही मार्गावर अज्ञात वाहनाच्या धड़केत १ महिन्यापूर्वी बिबटयाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु झाला ही घटना ताजी असताना १९ आक्टो. रोजी रात्रि सावली – मूल मार्गावर पुन्हा एकदा ३ वर्षीय बिबटयाला आपला जीव गमवावा लागला.

     

    ही चिंताजनक बाब असून जंगल सोडून वन्य जीव लोकवस्ती कडे अन्नाच्या शोधात येत असतील तर वन्य जीवांच्या संगोपन आणि संरक्षण याकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसुन येत आहे, त्यामुळे वन्य हिंस्र जीवांची अन्नचि मात्रा वनात संपली की क़ाय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

     

    सावली वनपरिक्षेत्र जंगल व्याप्त असून मोठ्या प्रमामात जंगल आहे त्यामुळे या रेंज अंतर्गत असलेल्या पाचही उप क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वन हिंस्र पशुचे वावर आहे त्यामुळे या रेंज मधे अनेक घटना नेहमी घडत असतात आता तर वन्य जीव लोकवस्ती कडे येण्याचा सपाटा सुरु झाल्याने तालुक्यात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

     

    भयावह परिस्थितीत या भागातील शेतक ऱ्याना शेती सांभाळन्याची वेळ निर्माण झाली आहे गावात राहणे , शेतात जाने कठिन होऊन बसले आहे ऐवढ़ी दहशत वन हिंस्र पशुचि निर्माण झाली असताना वनातील अन्नाच्या कमतरतेमुळे अन्नाच्या शोधात भटकत असलेला बिबट सावली उप क्षेत्रा अंतर्गत नियत क्षेत्र टेकाडी भागात फिरत असताना सावली – मूल मार्गावर स्टार ढाबा जवळ अज्ञात वाहनाच्या धड़केत ठार झाला.

     

    घटनेची माहिती होताच सावली रेंज चे वनकर्मचारी घटनास्थळी गेले, मृत बिबटयाला ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी टि. टी. सी. सेंटर चंद्रपुर येथे नेण्यात आले. यावेळी सावली वनपरीक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी पि. जी. विरुटकर सावली उप क्षेत्राचे उपक्षेत्र सहा. आर . जी. कोडापे वनरक्षक बोनलवार , वनरक्षक चौ धरी व इतर वनकर्मचारी उपस्थित होते.

     

  • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवेदनशीलपणा

    News34 chandrapur

    मुंबई/वृत्तसेवा – राज्यातील दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, मात्र मदतीच्यावेळी जेव्हा कुणी समाजमाध्यमाची मदत घेतात त्यावेळी त्यांना काय अनुभव येतो हे एका ताज्या उदाहरणातून समोर आलेले आहे.

     

    दिव्यांग तरुणी विवाह करण्यासाठी नोंदणी कार्यालयात गेली पण कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होते, जाण्यासाठी लिफ्ट नव्हती, विवाह नोंदणी च्या कागदपत्रांवर सही त्या तरुणीचे हस्ताक्षर हवे मात्र खाली यायला कुणी तयार नव्हते, त्यावेळी त्या तरुणीने ट्वीटर आताचे x ची मदत घेतली आणि तात्काळ त्या तरुणीच्या समस्येवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेत तात्काळ यंत्रणेला कामाला लावले.

     

    16 ऑक्टोम्बर ला मुंबई भागातील खार येथील विवाह नोंदणी कार्यालयात गेलेल्या वीराली मोदी या तरुणीला हा अनुभव आला, विराली ही दिव्यांग मॉडेल म्हणून काम करते, ती व्हीलचेअर वर विवाह नोंदणी कार्यालयातील इमारतीजवळ दाखल झाली, मात्र नोंदणी कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होते, कार्यालयात जाण्यासाठी लिफ्ट ची व्यवस्था नव्हती.

     

    विवाहासाठी विराली च्या हस्ताक्षराची गरज होती, मात्र वर जाण्यासाठी होत असलेला त्रास बघता कार्यालयातून कागदपत्रे खाली आणावे व हस्ताक्षर घेण्यात यावे अशी मागणी विराली ने केली मात्र कुणी यायला तयार नव्हते.

     

    विराली ने होत असलेल्या त्रासाची तक्रार थेट ट्विट करीत x वर राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करीत केली, आधी वाटलं की गृहमंत्री उत्तर देतील काय? मात्र एक जनप्रतिनिधींचा संवेदनशील पणा काय असतो याचा अनुभव काही क्षणात विराली ला आला.

     

    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ त्या ट्विट ची दखल घेत, विवाह नोंदणी अधिकाऱ्यांना कामाला लावत संपूर्ण यंत्रणा हलवून टाकली, अधिकारी तात्काळ विराली जवळ पोहचत त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल माफी मागत विवाह नोंदणी प्रक्रिया पार पाडली.

     

    गृहमंत्री फडणवीस यांनी आधी नम्रपणे विराली ला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागत यापुढे असा त्रास कुणाला होऊ नये याची पुढे दखल घेतल्या जाणार असे आश्वासन दिले, त्यांनतर विराली ने विवाह प्रक्रिया पार पडल्यावर लग्नाचे फोटो पुन्हा ट्विट करीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

    फडणवीस यांनी विराली ला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या, पुढे याबाबत काळजी घेतल्या जाणार असे आश्वासन सुद्धा दिले.

  • आमदार धानोरकर यांच्या मागणीमुळे आता एक शाळा एक गणवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये एक शाळा एक गणवेश अशी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने पूर्ण झाली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने या मागणीला मंजुरी दिली आहे. अनेकदा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचं प्रमाणे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन विनंती केली होती.
    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मागणीसाठी पाठपुरावा केला होता.  त्यांच्या प्रयत्नांमुळे राज्य सरकारने या मागणीला मंजुरी दिली आहे.
    या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये एकसमान गणवेश असेल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि समरसता वाढेल, असा विश्वास आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.
    महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विविध प्रकारचे गणवेश असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होता. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात द्वेष आणि मतभेद निर्माण होत होते. यावर उपाय म्हणून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी एक शाळा एक गणवेशची मागणी केली होती.
    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार
    या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि समरसता वाढेल.
  • जनआक्रोश मोर्चा संबंधी कांग्रेसने संभ्रम निर्माण करू नये – विजय मुसळे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे 20 ऑक्टोबर ला शहरात भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, मात्र हा मोर्चा कांग्रेसतर्फे हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला असून शिक्षण व नोकरी बचाव समिती तर्फे शिवानी वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमांवर टाकलेले व्हिडीओ डिलीट करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

    युवा कांग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार यांनी समाज माध्यमांवर 20 ऑक्टोबर च्या मोर्च्याबाबत व्हिडीओ प्रसारित केले आहे, सोबतच वृत्तपत्रांचे कात्रण टाकत जन आक्रोश मोर्चा हा कांग्रेसचा आहे असे दर्शविण्यात आले आहे.

     

    ही बाब शिक्षण व नोकरी बचाव समिती सदस्यांना कळताच त्यांनी यावर आक्षेप घेत सदर व्हिडीओ समाज माध्यमातून डिलीट करावा अशी मागणी करण्यात आली आहे, समनव्य समितीचे सदस्य विजय मुसळे यांनी वडेट्टीवार यांच्या या कृत्याबाबत आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे, सदर मोर्चा हा युवक व विद्यार्थी वर्गाचा सरकारवर असलेला रोष आहे, सरकारने शासकीय नोकरी चे खासगीकरण व शिक्षणाचे कंत्राटीकरण करण्याच्या शासन निर्णय काढला आहे, त्यावर राज्यातील विद्यार्थी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बेरोजगारांचा तीव्र निषेध असून त्याचा विरोध करण्यासाठी 20 ऑक्टोबर ला चंद्रपुरात भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

     

    मुख्य मागणी

    सर्व विभागातील रिक्त जागेवर कायमस्‍वरूपी पदभरती करावी, ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, NPS रद्द करून शिक्षक-राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, MPSC व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्‍पर्धा परिक्षेचे शुल्‍क कमी करून १०० रुपये ठेवावे, IBPS/ TCS किंवा इतर खासगी संस्‍थामार्फत विविध पदाच्या स्‍पर्धा परिक्षा न घेता सर्व परिक्षा MPSC आयाेगाद्वारे घेण्यात याव्‍या, विविध शासकीय पदभरतीसाठी होणाऱ्या स्‍पर्धा परिक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समूह शाळा संकल्‍पना रद्द करणे, राज्‍य शासनातील शासकीय कार्यालयातील रिक्‍त पदे व अनुदानित संस्‍थेमधील शिक्षक – प्राध्यापकांची रिक्‍त पदे तात्काळ भरावी आदी मागण्यांचा जनआक्रोश मोर्चात समावेश आहे.