Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • लॉयड्स मेटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीच्या CSR कार्याची चौकशी करण्याचे आदेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लॉयड्स मेंटल स्पेन आर्यन अँड पॉवर कंपनीच्या CSR कार्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दिनेश चोखारे यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत एक पत्र जारी केले आहे.

    या पत्रात म्हटले आहे की, श्री. दिनेश दादाजी चोखारे यांनी 18 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात एक तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी कंपनीने CSR फंडातून केलेल्या खर्चाबद्दल चौकशीची मागणी केली होती.

    या तक्रारीची दखल घेत, जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा उद्योग केंद्राला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने 2013 पासून आजपर्यंत CSR फंडातून केलेल्या खर्चाची माहिती आणि त्या खर्चातून केलेल्या कार्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावी, असे आदेशात म्हटले आहे.
    या चौकशीचे निष्कर्ष आल्यानंतर त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले

    आहे.

  • चंद्रपुर जिल्ह्यात दुर्दैवी घटना

    News34 chandrapur

    बल्लारपूर (रमेश निषाद)

    बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आदित्य प्लाझा बामणी येथे राहणारी सुषमा पवन काकडे ही महिला आपल्या चार वर्षाच्या मुलासाठी चॉकलेट घेण्यासाठी दुचाकी मोपेडवरून घरातून निघाली होती.

     

    बामणीहून राजुरा येथे जात असताना , दुचाकीचा तोल गेल्याने वाहन वर्धा नदीच्या पुलावरून खाली पडले. या घटनेत गरोदर महिलेचा मृत्यू झाला, तर चार वर्षाच्या मुुुलाचा जीव वाचला.. निरागस बाळ रात्रभर आईच्या मृतदेहा शेजारी रडत राहिले.

    आज पहाटे पाच वाजता पुला खालून मुलाचा रडण्याचा आवाज कुटुंबीयांना ऐकू आल्याने त्यांनी खाली जाऊन पाहिले असता सुषमाचा मृतदेह शेजारी लहान बाळ रडत असताना आढळले. त्या चार वर्षाच्या मुलालाही किरकोळ दुखापत झाली आहे.

     

    बालकावर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी महिलेला दवाखान्यात नेले तिथे डॉक्टरांनी सुषमा काकडे यांना मृत घोषित केले.

    महिलेने आत्महत्या केली की काही घात झाला याबाबत पुढील तपास बल्लारपूर पोलीस करत आहेत. महिलेचा पती हा कर्मचारी पंजाब नॅशनल बँकेत कार्यरत आहे.

  • वीज ग्राहकांनो आता स्मार्ट मीटर आपल्या घरी

    News34 chandrapur
    चंद्रपूर – वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील.

    उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे.

    राज्यातील महावितरणच्या २ कोटी ४१ लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून त्या ऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येतील. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीज ग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील.विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येईल. किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हे सुद्धा ग्राहकांना समजेल.

    मुख्य म्हणजे ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळेल. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.

    सध्याच्या पद्धतीत वीज ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रिडिंग घेतले जाते व त्यानुसार बिल पाठविले जाते. एखाद्या ग्राहकाने नेहेमीपेक्षा जास्त वीज वापरली तर मोठे बिल येते व त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक नियोजन बिघडते. वीज वापरली असल्याने त्याचे बिल भरण्याशिवाय पर्याय नसतो. पण नव्या प्रीपेड स्मार्ट मीटरच्या बाबतीत वीज ग्राहक आधी पैसे भरून तेवढ्याच रकमेची वीज वापरणार असल्याने ग्राहकांना नियोजन करून विजेवरील खर्च पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येईल.

    अचानक रात्री वीज खंडीत होणार नाही

    प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीज पुरवठा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हे सुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल.
    घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाईन पेमेंटचीही सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाईलवर मेसेज पाठविण्याची व्यवस्था आहे. एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीज पुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीज पुरवठा चालू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीज पुरवठा चालू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होईल, अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे.
  • विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चंद्रपुरात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – श्री महाकाली माता महोत्सव समितिच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्या गुरुवारी सकाळी 9 वाजता उद्घाटन करण्यात येणार आहे. सदर महोत्सवासाठी ते सकाळीच चंद्रपूरात दाखल होणार असल्याची माहिती महाकाली महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

     

    उद्या पासून सुरु होणार असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. या महोत्सवात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी 7 वाजता जैन मंदिर संस्था सराफा असोशिएशनच्या वतीने जैन मंदिर येथून श्री माता महाकालीच्या चांदीच्या मुर्तीची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सदर शोभायात्रा जैन मदीर,गांधी चौक होत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी दाखल होणार आहे.

     

    येथून गिरणार चौक मार्गे शोभायात्रा महाकाली मंदिर येथील पटांगणात आयोजित श्री माता महाकाली महोत्सवच्या पेंडालात पोहचणार आहे. त्यांनतर पेंडालात श्री माता महाकाली मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
    त्यांनतर महाआरतीने महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर चंद्रपूर दौ-यावर असून त्यांच्या हस्ते सदर महोत्सवाचे उद्घाटन केल्या जाणार आहे. नंतर मान्यवरांच्या हस्ते नवरात्रोदरम्यान जन्मास आलेल्या कन्यांना चांदिचे नाणे देण्यात येणार आहे.

     

    दुपारी 12 ते 1 वाजता महिला सुरक्षा या विषयावर अतिरिक्त पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता श्रीमद् भागवत प्रवक्ता, प्रवचन किर्तनकार सरोज चांदेकर यांचे संगीतमय प्रवचन कार्यक्रम पार पडणार आहे. दुपारी 2.30 मी. वाजता शहरातील शाळेंचे विद्यार्थी धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक विषयांवर समुह नृत्य सादर करणार आहे. सायंकाळी पाच वाजता श्री माता महाकाली जागरण गृपच्या वतीने माता महाकाली आरती व भजन गायल्या जाणार आहे.

     

    सहा वाजता नृत्य जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री 8 वाजता जगप्रसिध्द देवी गीत जागरणकार लखबीर सिंग लक्खा यांचा कार्यक्रम पार पडणार आहे. सर्व माता भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री महाकाली माता समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

  • बाळू भाऊच्या स्वप्न पूर्तीसाठी प्रतिभाताई सोबत राहा : माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जाण्याने एक सहकारी मी गमावला आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासोबत राहण्याचे आवाहन खासदार नरेशबाबू पुगलीया यांनी केले.
    चंद्रपूर शहरातील भाऊचा दांडिया उत्सवाचे उद्धघाटन माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्याहस्ते  करण्यात आले. यावेळी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया सपत्नीक आले होते.
    दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या उपस्थितीत मागील वर्षी भाऊचा दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यांच्या जाण्याने या उत्सवाचं आयोजन करण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्यावर आली.
    यावेळी त्यांनी पुगलिया कुटुंबियांकडून दांडियातील स्पर्धकांकरिता दीड लाखांची बक्षिसे जाहीर केली. ग्रुप दांडियामध्ये नगरपरिषद चंद्रपूर निर्वाचित प्रथम अध्यक्ष स्व. राजमलजी पुगलिया यांच्या स्मुर्तीप्रित्यर्थ राजमलजी पुगलिया फाउंडेशन, चंद्रपूर तर्फे एक लाख चे प्रथम पुरस्कार व कपल डॉन्स मध्ये ज्या ग्रुपचा प्रथम क्रमांक येईल त्या कपल गृपला स्वतंत्र सेनानी स्व. उत्तमचंद राजमलजी पुगलिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५० हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे.  
    याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या कि, दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या जाण्याने न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांची क्रीडा, सांस्कृतिक व इतर क्षेत्रात आवड होती. तो वसा पुढे नेण्याकरिता मी पुढे देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

    यावेळी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, भद्रावती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, काँग्रेस नेते गजानन गावंडे, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, इंटक नेते के. के. सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, माजी महापौर संगीताताई अमृतकर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, अनुसूचित जाती महिला नेत्या अश्विनीताई खोब्रागडे, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल शेख रजा, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, वरोरा शहर अध्यक्ष विलास टिपले, भद्रावती शहर अध्यक्ष सुरज गावंडे, वरोरा तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, माजी नगरसेवक अशोक नागापुरे, माजी नगरसेवक देवेंद्र बेले, यवतमाळ महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई आवारी, वसंत जिनींग संचालिका साधनाताई गोहोकार, शारदाताई ठाकरे, संध्याताई गोहोकर, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, भालचंद्र दानव, रतन शिलावार, नरेंद्र बोबडे, डॉ. सागर वझे, उमाकांत धांडे, सुरजकुमार बोबडे, मोनू चिमुरकर, सचिन घाटे, प्रमोद मगरे, बसंत सिंग, बाळू चिंचोलकर, सुनंदा धोबे, मीनाक्षी गुजरकर, शालिनी भगत, सौरभ ठोंबरे, मोनू रामटेके यांची उपस्थिती होती.

     ‘भाऊचा दांडिया’ उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे.  चांदा क्लब ग्राउंडवर २४ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता दांडियाची घूम राहणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ द मराठा चॅरिटेबल स्ट्रट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी च्या वतीने करण्यात आले आहे.

  • महोत्सव आला….भक्तीगीतांच्या सिडीचे फडणवीस यांच्या हस्ते विमोचन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – श्री माता महाकाली महोत्सवा निमित्त तयार करण्यात आलेल्या आला आला हो .. महोत्सव आला या भक्तीगीत सिडीचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे विमोचन करण्यात आले. यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, समितीचे सचिव अजय जयस्वाल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अशोक मत्ते, मोहित मोदी आदींची उपस्थिती होती.

     

    श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने 19 ऑक्टोंबर पासून चंद्रपूरात होऊ घातलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. यासाठी महाकाली मंदिर पटांगणात भव्य मंडप उभारण्यात आले आहे. सदर महोत्सवाच्या टिझरचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. सदर महोत्सवात सुप्रसिध्द कलाकार भक्तीमय गीतांची मेजवानी सादर करणार आहे.

     

    सदर महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे पुजन व भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर नवरात्री दरम्यान जन्मास आलेल्या कन्यांना श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने चांदीचा सिक्का देण्यात येणार आहे. चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती राज्यभरात पोहोचावी यातुन येथील पर्यटनाला चालना मिळावी हा या महोत्सवा मागचा मुळ उद्देश असल्याचे समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

     

    सदर महोत्सवासाठी श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने माता महाकालीच्या भक्तीमय गीतांची सीडी तयार करण्यात आली आहे. यात बोलो नमोस्तुते महाकाली, आला आला हो महोत्सव आला, दृष्ट पापीओं दूर हटो, मुझे भा गया महाकाली का देश, चंद्रपूरची महाकाली गोंधळाला आली, चला करुया जागर अशी भक्ती गीते सदर सिडीमध्ये असणार आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे या भक्तीगीतांच्या गाण्याच्या सिडीचे विमोचन करण्यात आले आहे. सदर गाणी महाकाली भक्तांच्या मुखात बसेल या गाण्यांच्या माध्यमातून माता महाकालीचा जागर राज्यभर होईल असा विश्वास यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने व्यक्त करण्यत आला आहे.

  • शुक्रवारी चंद्रपुरात जनआक्रोश मोर्चा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्‍य सरकारने बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली कंत्राटी पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करावी, राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, MPSC व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्‍पर्धा परिक्षेचे शुल्‍क कमी करून १०० रुपये ठेवावे यासह इतर मागण्यांना घेऊन शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्‍हा चंद्रपूरच्या वतीने शुक्रवार, दिनांक २० ऑक्‍टोंबर २०२३ रोजी दुपारी १२ वाजता दीक्षाभूमी (डॉ. आंबेडकर कॉलेज) येथून चंद्रपूर जिल्‍हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश माेर्चा काढण्यात येणार आहे.

     

    उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शासन निर्णय ६ सप्‍टेंबर २०२३ रोजी निर्गमित केला. त्यानुसार शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्ययंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहे. शासकीय नोकरी हा महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणाचा हक्क आहे. बाह्ययंत्रणेमार्फत पदभरती करून सुशिक्षित बेरोजगारांचे शोषण करण्याचे परवाने वाटप केल्या जात आहे.

     

    महाराष्ट्र राज्य सरकार या शासन निर्णयाच्या माध्यमातून नवी वेठबिगारी निर्माण करू पाहत आहे काय? हा शासन आदेश तात्काळ रद्द करून सर्व विभागातील रिक्त जागेवर कायमस्‍वरूपी पदभरती करावी, ‘दत्तक शाळा योजना’ राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, NPS रद्द करून शिक्षक-राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, MPSC व इतर विभागाकडून घेण्यात येणाऱ्या स्‍पर्धा परिक्षेचे शुल्‍क कमी करून १०० रुपये ठेवावे, IBPS/ TCS किंवा इतर खासगी संस्‍थामार्फत विविध पदाच्या स्‍पर्धा परिक्षा न घेता सर्व परिक्षा MPSC आयाेगाद्वारे घेण्यात याव्‍या, विविध शासकीय पदभरतीसाठी होणाऱ्या स्‍पर्धा परिक्षेतील पेपर फुटीवर नियंत्रण आणण्यासाठी कडक कायदा करण्यात यावा, विद्यार्थी हितासाठी २० पटाखालील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी समूह शाळा संकल्‍पना रद्द करणे, राज्‍य शासनातील शासकीय कार्यालयातील रिक्‍त पदे व अनुदानित संस्‍थेमधील शिक्षक – प्राध्यापकांची रिक्‍त पदे तात्काळ भरावी आदी मागण्यांचा जनआक्रोश मोर्चात समावेश आहे.

     

    वरील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून राज्‍यातील विद्यार्थी, सुशिक्षीत बेराेजगार, शिक्षक, राज्‍य कर्मचारी यांना न्‍याय द्यावा अन्‍यथा शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्‍हा चंद्रपूरच्या वतीने सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करून राज्‍यव्‍यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राज्‍याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांना पत्राद्वारे देण्यात आला आहे. आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मातोश्री सभागृह तुकूम येथे नियोजन सभा पार पडली. यावेळी सर्व शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

     

    या जनआक्रोश मोर्चात विद्यार्थी, युवक, पालक, कर्मचारी, सर्वसामान्‍य नागरिक यांनी रस्‍त्‍यावर उतरून सरकारने सुरू केलेले खासगीकरण व कंत्राटीकरण धोरण रद्द करण्यासंदर्भात विराेध दर्शवावा, असे आवाहन शिक्षण – नोकरी बचाव समिती, जिल्‍हा चंद्रपूरच्‍या वतीने करण्यात आले आहे.

  • चंद्रपुरातील ते देशी दारूचे दुकान तात्काळ हटवा – चंद्रपूर शिवसेना आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपुर :- जिल्ह्यातील चंद्रपुर शहर महानगरपालिका हद्दीतील अष्टभुजा वार्डातील बायपास रोड जवळील पुरातन अष्टभुजा देवीच्या मंदिरालगत शासनाच्या नियमाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने परवाना देण्यात आलेले मालक-हरीश भोजा शेट्टी यांचे सरकारी देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्यासंदर्भात चंद्रपुर शिवसेना तालुका प्रमुख तथा ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला.

     

    आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल, चंद्रपुरच्या वतीने जिल्हा महामंत्री दिपक रेड्डी यांनी दि.06/09/2023 ला निवेदन देवून सदर विषयाची दखल न घेतल्यामुळे संदर्भीय पत्राच्या अनुसंगाने चंद्रपुर शहर मनपा येथील अष्टभुजा वार्डातील बायपास रोड जवळील पुरातण अष्टभुजा देवीचे मंदिर असून येथे देशभरातून येणाऱ्या भक्त भाविक मोठ्या संख्यने पूजा अर्चना करण्यासाठी येत असुन मंदिरालगत नुकतेच नव्याने देशी दारूचे दुकान (मालक-हरीश भोजा शेड्डी ला. नं. 133/2023-24) देण्यात आले आहे.

     

    यामध्ये शासनाच्या नियमाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने दारूचा परवाना देण्यात आलेल्या सरकारी देशी दारूच्या दुकानात सर्रासपणे विदेशी दारू व बियरची विक्री केली जात असल्यामुळे दारू पिवून दारूच्या नशेत देवीच्या मंदिरात भक्त भाविक पूजा अर्चना करण्यासाठी ये-जा करीत असतांना अश्लील भाषेत शिविगाळ करुन अपशब्दात बोलत असतात.
    त्यामुळे मंदिर येणाऱ्या महिला, पुरुष, मुले, मूली व लहान बालकांना सदर प्रकरणापासून फार मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहे.

     

    त्याकरिता पुरातण अष्टभुजा देवीच्या मंदिरालगत शासनाच्या नियमाची पायमल्ली करुन नियमबाह्य पद्धतीने सरकारी देशी दारूचे दुकान तात्काळ हटविण्याचे आदेश देवून देशभरातून येणाऱ्या भक्त भाविकांना पूजा अर्चना करणे सोइस्कर होईल याची दक्षता घेण्यात यावी.

     

    अन्यथा आम्हाला शिवसेनेच्या पद्धतीने सदर प्रकरण हाताळावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे चंद्रपुर शिवसेना तालुका प्रमुख तथा ग्राहक संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे इशारा दिला. यावेळी चंद्रपुर तालुका संघटक संजयकुमार शिंदे,आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा महामंत्री दिपक रेड्डी, राजू रायपुरे, सुरेंदर अंचल, गोविन्द प्रसाद व पप्पू कोठारिया उपस्थित होते.

  • 15 वर्षीय मुलाने उचलले धक्कादायक पाऊल

    News34 chandrapur

    चिमूर – 17 ऑक्टोबर ला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण गाव हादरुन गेला, तालुक्यातील बेलारा येथील 9 व्या वर्गात शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

    बेलारा येथील करण मारोती गुरणुले वय १५ वर्ष असे मृतक मुलाचे नाव आहे तो मदनापूर येथील जय लहरी जय मानव विद्यालय येथे ९व्या वर्गात शिकत होता, आज १७ ऑक्टोबर ला दूपारी ३.३० वाजताच्या दरम्यान सदर घटना उघडकीस आली.

    तब्बेत बरी नसल्याने काही दिवस करन शाळेत गेला नव्हता. आज शाळेत जातो म्हणुन गणवेश व बॅग घेऊन तयारी केली. मात्र घरी कुणीही नसल्याचे पाहुन त्याने दोराने गळफास लावुन आत्महत्या केली. दुपारी मोठा भाऊ घरी आल्या नंतर हि घटना उघडकीस आली. घटनेची माहीती चिमूर पोलिसांना देण्यात आली.

     

    पोलिस निरीक्षक मनोज गभने,पोलिस उप निरीक्षक भिष्मराज सोरते,पोलिस कर्मचारी भारत घोळवे, राहुल चांदेकर यांचेसह घटनास्थळावर पोहचुन घटनेचा पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.आत्महत्येचे कारण अजुन स्पष्ट झाले नसुन पुढील तपास सुरु आहे .

  • येल्लो मोझॅक ने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्हात आलेल्या पुराने, संततधार पावसाने बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढवलं होतं. या संकटाशी दोन हात करीत बळीराजाने शेती उभी केली. मात्र सोयाबीनचा पेरा केलेल्या बळीराजावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे.येल्लो मोझाक रोगाने सोयाबीनचे पीक उध्वस्त झाल. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात जनावरे सोडलीत तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीनचे शेत नागरून काढलं.

     

    सरकार मदत करेल ही आशा बळीराजाला होती.मात्र अद्याप साधे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा भारत राष्ट्र समितीने निषेध नोंदवीला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मदत देण्यात यावी अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे नेते भुषण फुसे यांनी केली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात 67 हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केल्या गेली .त्यापैकी जवळजवळ 53 हजार हेक्टरवरील सोयाबीनवर येल्लो मोझाक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. नगदी पिकाचे नुकसान झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.येल्लो मोझाकचा प्रादुर्भाव जिल्हात ऑगस्टमध्ये आढळला होता. त्यानंतर यावर उपाययोजना करायला हवं होतं. मात्र महाराष्ट्र शासन व कृषी विभागाच्या निष्क्रियतेमुळे वेळेत उपाय झाले नाहीत.त्यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले.

     

    सरकार मदत करेल ही आशा बळीराजाला आहे. मात्र अद्याप सोयाबीन शेतीचे साधे पंचनामे सुद्धा झालेले नाहीत.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन व प्रशासन उदासीन आहे.शेतकरी विरोधी असलेल्या शासन व प्रशासनाचा भारत राष्ट्र समितीने जाहीर निषेध केला आहे. तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज जाहीर करा व त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करा अशी मागणी यावेळी भारत राष्ट्र समितीने केली आहे. अन्यथा भारत राष्ट्र समिती पीडित शेतकऱ्यांसोबत मिळून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आलेला आहे. याप्रसंगी भारत राष्ट्र समिती राजुरा महिला समन्वयक ज्योतीताई नळे, नळे सर, राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, धनंजय बोर्ड सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.