Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा

    News34 chandrapur

    मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यासाठी दुग्धव्यवसाय उद्यमशीलतेचा विकास या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली.

     

    यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, राष्ट्रीय गोकुळ मिशनचे सहआयुक्त डॉ. भूषण त्यागी, राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाचे अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

     

    यावेळी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी तयार करण्यात आलेल्या नवीन दुग्धविकास प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. प्रकल्पाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यात आले असून पुढील पाच वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.

     

    उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राज्य शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्पांचे सहकार्य घेण्यात येईल.तसेच यातून 3,30,000 रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. राज्य सरकार यासाठी निधी देणार आहे.

     

    पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले,विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राज्य शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतील.

    तसेच यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धव्यवसायासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

  • चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा युवासेना मध्ये असंख्य युवकांनी 3 नोव्हेम्बरला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

     

    चंद्रपूर युवासेनेची सूत्रे हाती घेतल्यावर विक्रांत सहारे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले, युवक व युवतीच्या समस्यांना न्याय सुद्धा त्यांनी आपल्या माध्यमातून न्याय देण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

    मागील अनेक महिन्यापासून असंख्य युवक युवासेनेत प्रवेश घेत आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होत, शहरातील असंख्य युवक आज युवासेनेत सामील झाले.

     

    यावेळी युवासेना शहर अधिकारी शहबाज शेख, उपशहर प्रमुख संघदीप रामटेके व प्रवेश घेणारे राहुल कोवे, सिधु कोवे, आदेश वाघमारे, यश भडके, मोहित कांबळे, अरबाज खान, तन्मय उमाटे, श्रेयस कांबळे, जय निखारे व आदी युवकांची उपस्थित होती.

  • कोरपना तहसील वर धडकला शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा

    News34 chandrapur

    कोरपना – शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी , शेतकरी युवा आघाडी व स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपना च्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा शुक्रवार दिनांक ३ ला शेतकरी नेते , माजी आमदार अड वामनराव चटप यांचे नेतृत्वात तहसील कचेरीवर धडकला.

     

    अतिवृष्टीत पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी , खरवडून गेलेल्या शेतीला एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, परसोडा येथील प्रकल्पग्रस्ताच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना पट्टे देण्यात यावे, शेती पंपाला पूर्ण दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा, केंद्र सरकारने विदर्भ राज्य ची तातडीने निर्मिती करावी, गडचांदूर आदीलाबाद रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात यावे, जिल्हा परिषद शाळेचे खाजगीकरण करू नये आदीसह 15 मागण्याचे निवेदन तहसीलदार कोरपना यांना देण्यात आले.

     

    या मोर्चाला शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण पाटील नवले , माजी समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे, डॉ. भास्करराव मुसळे, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत मालेकर, मदन सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे , अरुण रागीट,विकास दिवे, दशरथ बोबडे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अड श्रीनिवास मुसळे, स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष नरेश सातपुते , बंडू राजूरकर ,सुभाष तुरानकर , प्रवीण गुंडावार अनंता गोडे,भास्कर मत्ते ,रवी गोखरें, शब्बीर जहागीरदार, पद्माकर मोहितकर, रत्नाकर चटप , सचिन बोंडे, विजय धानोरकर आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी – शेतमजुर उपस्थित होते.

  • लॉयडस मेटल स्पंज आर्यन अँड पॉवर कंपनीचा मुद्दा पोहचला उद्योगमंत्र्यांच्या दालनात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस, उसगाव आणि वडा या गावांमध्ये असलेल्या लॉयडस मेटल स्पंज आर्यन अँड पॉवर कंपनीने CSR फंडातून खर्च केलेल्या सन 2013 पासून आजपर्यंतच्या केलेल्या कार्याची चौकशी होणार आहे. याबाबत चंद्रपूरचे काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांनी निवेदन दिल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील या कंपनीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रदूषणामुळे परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कंपनीने वर्षातून चार वेळा कंपनीच्या माध्यमातून प्रदूषणग्रस्त लोकाकरीता आरोग्य शिबिर लावायला पाहिजे होते. परंतु तशी कुठलीही प्रक्रिया किंवा योजना कंपनीमार्फत राबविली जात नाही. तसेच कंपनीद्वारे अनेक प्रकारचे नियम धाब्यावर बसून कामगारांचे शोषण केले जात आहे.

     

    याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील दिनेश चोखारे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना पत्र दिले. या पत्रात त्यांनी कंपनीच्या CSR फंडच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

     

    मंत्री सामंत यांनी ही मागणी मान्य केली आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीच्या CSR फंडच्या खर्चाची सखोल चौकशी केली जाईल. या चौकशीमध्ये प्रदूषण, कामगार शोषण यासह इतरही बाबींचा समावेश असेल.

    या चौकशीनंतर कंपनीवर कोणती कारवाई होते हे पाहावे लागेल.

  • ग्रामपंचायत निवडणुकीत BRS पक्षाचा मास्टर स्ट्रोक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राजुरा विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतेचा निवडणूक होत आहेत. या तीन ग्रामपंचायतेत भारत राष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले आहेत.जिल्हात नव्यानेच एन्ट्री केलेल्या बीआरएसने जनतेला आकर्षित केले आहे. रामपुर ग्रामपंचायत निवडणूकीत उभे असलेल्या बीआरएसच्या उमेदवारानी थेट स्टॅम्प पेपरवरच शपथ पत्र लिहून दिले आहे. विजयी झाल्यास गावाचा विकासासाठी काय करणार ? शपथ पत्रात त्यांनी सांगितलं आहे. बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली जात आहे. फुसे यांनी थेट विकासाच्या मुद्द्याला हात घातल्याने प्रस्थापितांची कोंडी झाली आहे.

     

    राजुरा विधानसभा क्षेत्र आजही मागासलेलं आहे. जीवती, गोंडपीपरी, कोरपणा, राजुरा तालुक्याचा हवा तसा विकास झालेला नाही.या चार तालुक्यात अनेक प्रश्न आजही उभे आहेत. या क्षेत्रातील आमदारांचे विकासा बाबत कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य जनतेत रोष बघायला मिळते. अश्यात जिल्हात भारत राष्ट्र समितीने एन्ट्री केली. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेला चेहरा भूषण फुसे यांच्याकडे धुरा आली. अल्पवधित बीआरएसने राजुरा विधानसभा क्षेत्रातील जनतेचा विश्वास जिंकला.तेलंगनाला लागून असलेला या भागात ” अब की बार, किसान सरकार ” नारा गुंजू लागला.

     

    विधानसभा क्षेत्रातील तीन ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत.या निवडणूकित बीआरएसच्या उमेदवाराची कृती लक्षवेधक ठरली आहे.रामपूर ग्रामपंचायतीत बीआरएसने उमेदवार उभे केले आहे. या उमेदवारानी गावासाठी काय करणार ? हे थेट स्टॅम्प पेपरवर शपथ पत्रच लिहून दिला आहे.सरिता रायपोचम काटन, ज्योती नळे,माधुरी आंबेकर,विजय हजारे,कपिल धेटे,रामपोचम काटम या उमेदवारानी शपथ पत्र लिहिलं. या शपथ पत्राची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    काय लिहिलं शपथ पत्रात..

    उमेदवारांनी शपथपत्रांमध्ये गावविकास करण्याची शपथ घेतली.गावात पाण्याची समस्या आहे.ही समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिलं. सोबतच गावातील अंतर्गत रस्त्याची निर्मिती करणार,गावाला डुक्कर मुक्त करणार, नाली, कचराकुंडीचे बांधकाम करणार असं शपथपत्रात त्यांनी लिहून दिल आहे.

  • आमदार धानोरकर यांनी महावितरण कार्यालयाला ठोकले कुलूप

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती. या मागणीला सरकार कडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नसल्याने शुक्रवार 3 नोव्हेम्बरला सकाळी 11 वाजता कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या वरोरा, कार्यालयावर शेतकरी व पदाधिकारी तसेच कार्यकत्यांनी मोर्चा काढत कार्यलयावर जाऊन अधिकाऱ्यांना खोलीत बंद करून ठिय्या आंदोलन करून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात हुकूमशाही सरकारच्या निषेध केला.

    जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. जिल्ह्यांत कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी बांधव हवालदिल आहेत. १ एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात कृषिपंप जोडणी च्या मागण्या प्रलंबित आहेत. ज्यांना कनेक्शन दिलेत त्यांना अखंडित वीजपुरवठा होत नाही. भारनियमना ऐवजी म. रा. वि. वि. कंपनीने थ्री फेस वीजपुरवठ्याचे जिल्ह्यात वेळापत्रक घोषित केले आहे. आठवड्यातून ४ दिवस आणि ३ दिवस रात्री ८ तास कृषिपंपाना वीजपुरवठा करण्यात येत आहे. परंतु २४ तास थ्री फेस पुरवठा दिल्यास शेतकऱ्यांना सोयीचे होईल.

     

    महाजनको कडून ग्रीड मार्फत संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार थ्री फेस वीजपुरवठा मिळालाच पाहिजे हि आपली आग्रही भूमिका असून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.

    ग्रामीण भागात असल्यामुळे वीजपुरवठा १ फेस असल्यामुळे इतर उपकरणे चालत नाही. पाणी टाकी वीजपुरवठा सुरळीत नसल्यामुळे भरली जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी पुरवठा देखील अनेकदा सुरळीत सुरु नसतो. असे अनेक प्रश्न उद्भवत असतात. या समस्या तात्काळ निकाली काढण्याकरिता चंद्रपूर जिल्हात २४ तास थ्री फेस वीजपुरवठा करा अशी लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती.

    धानोरकर यांच्या या मागणीला कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आमदार धानोरकर यांनी बेधडक आंदोलन करीत वरोरा वीज वितरण कार्यालयाला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन केले.

  • चंद्रपुरातील नागरिकांना महानगरपालिकेने केले महत्वाचे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर  –  चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर कारवाई करण्यात आली असुन अनधिकृत रीतीने उभे करण्यात आलेले मार्कींगचे सिमेंट खांब तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.

     

    ठक्कर कॉलनी येथे ईरई नदी पात्राजवळ मौजा गोविंदपुर रीठ सर्वे नंबर ७३/१ असलेल्या भूखंडावर अनधिकृत ले आउट टाकुन प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला असल्याची माहीती मनपा पथकास मिळाली होती. त्यानुसार पाहणी केली असता सदर भूखंड हा पूरग्रस्त भागात असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही. यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५२अन्वये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास नोटीस देण्यात आली होती. मात्र नोटीस स्वीकारण्यास सदर बांधकामदाराने नकार दर्शविला होता त्यामुळे सदर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ले आऊटवर प्लॉटची विक्री करण्यास मार्कींग सुद्धा करण्यात आली होती.

     

    चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की  केवळ नोटरीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्रीची कारवाई करू नये भविष्यात यासंबंधी कुठल्याही संशय उद्भवल्यास याची जबाबदारी पुर्णपणे  विक्री करून देणार व विक्री करून घेणार यांची राहील. दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी होत असलेल्या भूखंडाचीच खरेदी अथवा विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार तसेच अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली. शहरात जिथेही अनधिकृत ले आऊट आहेत तिथे कारवाई सुरु राहणार असल्याने अनधिकृत ले आऊट वर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांना शहरातील अनधिकृत ले आउट संबंधी माहिती असल्यास ती मनपास देण्याचे आवाहन मनपामार्फत करण्यात येत आहे.

  • हंसराज अहिर यांच्या मध्यस्तीने 18 दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण मागे

    News34 chandrapur

    कोरपना – आरसीसीपीएल परसोडा लाईमस्टोन माईन साठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत कंपनी कडून करण्यात येणाऱ्या मनमानी धोरणा विरुद्ध परसोडा येथील प्रकल्पग्रस्त नेमीचंद काटकर यांनी मागील अठरा दिवसापासून उपोषण सुरू केले होते. हे उपोषण राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या मध्यस्थी नंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मागे घेतले.

    कंपनी संदर्भात बारा मागण्या उपस्थित करून सदर उपोषण सुरू होते.यातच काटकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावली जात होती. त्यांच्या प्रकृतीची काळजी लक्षात घेता तुर्तास मायनिग बंद करून लवकरच समोपचाराने कंपनी व प्रकल्पग्रस्त यांची समन्वय बैठक लावून न्याय मागण्या सोडवण्यात येईल. या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आले.

     

    याप्रसंगी माजी आमदार अड संजय धोटे , माजी आमदार सुदर्शन निमकर , तहसीलदार पी एस व्हटकर , पोलीस निरीक्षक संदीप एकाडे, खुशाल बोंडे , किशोर बावणे , भाजपा तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, शिवाजी सेलोकर , राजू घरोटे , अमोल आसेकर,दिनेश खडसे आदी उपस्थित होते.

  • कांग्रेसचा दणका आणि कंपनी संचालक उपोषण मंडपात

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – MIDC मरेगाव येथील जी. आर.कृष्णा फेरो अलाय कंपनीमध्ये कामगार,ड्रायव्हर,आपरेटर यांचेवर होत असलेल्या अन्यायाबाबत कामगारांना पाठिंबा म्हणून काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका कांग्रेसच्या वतीने तहसीलदार डॉ .रवींद्र होळी यांना निवेदन देण्यात आले.

     

    यामधे जय भवानी कामगार संघटना यांचेही सहकार्य लाभले. निवेदन देताच तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांनी तात्काळ कंपनी प्रशासनाला पत्र देऊन कामगारांच्या मागण्यांवर त्वरित तोडगा काढावा असे आदेश दिल्याने सायंकाळी ५-३० वाजता कंपनीचे डायरेक्टर श्री.मनोज अग्रवाल व उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णराव इंगळे यांचे नेतृत्वात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार ,कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, युवक तालुका अध्यक्ष पवन नीलमवार माजी सभापती,संचालक घनश्याम येनुरकर यांचे उपस्थितीत मागण्या मान्य केल्याचे लेखी लिहून दिले व उपोषण मंडपात येऊन उपोषण करतांना उपविभागीय अधिकारी व कंपनी डायरेक्टर मनोज अग्रवाल यांनी पाणी पाजून उपोषण सोडविले.

     

    मान्य केलेल्या मागण्या. १) १ एप्रिल २०२४ पासून १० ते १८ टक्के पगार वाढ देण्यात येईल. २) पेमेंट स्लीप ४ तारखेपर्यंत दिले जाईल. ३) नियमानुसार देण्यात येईल. ४) वैद्यकीय सुविधेचा कार्ड कागद पत्र कंपनीला दील्याबरोबर देण्यात येईल. ५) फक्त ८ तासाचीच ड्युटी देण्यात येईल. ६) स्थानिकानाच प्राधान्य देण्यात येईल. ७) कामावरून कमी केलेल्यांना आवशकता भासल्यास रोटेशन पद्धतीने काम देण्यात येईल. ८) एका महिन्यात २६ दिवसाच्या वर काम केल्यास त्याचा पगार देण्यात येईल. ९) कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी कंपनी प्रशासनाला शिवीगाळ, दमदाटी करणार नाही. अशा स्वरूपात मागण्या मान्य करण्यात असल्याचे लेखी दिले आहे.

  • चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सफाई कर्मचाऱ्यांची 190 पदे रिक्त

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात अस्वच्छतेने कळस गाठल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून रुग्णांचे हाल होत आहेत. मात्र या संदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली. चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कंत्राटदारामार्फत भरावयाची 190 सफाई कामगारांची पदे रिक्त असून मागील अडीच वर्षांपासून ही रिक्त पदे भरलेली नसल्याने रुग्णालयात स्वच्छतेच्या बाबतीत आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. रुग्णांच्या आरोग्यावर याचा गंभीर दुष्परिणाम होत आहे.

     

    जनविकास असंघटित कामगार कर्मचारी संघाचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी याबाबत न्याय मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांमध्ये जुलै 2021 मध्ये एक रीट याचिका दाखल केली होती. या रीट याचिकेची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधिश पृथ्वीराज के. चव्हाण व उर्मिला जोशी-फाळके यांनी 5 ऑक्टोंबर 2023 रोजी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संचालक तसेच चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर मागितले. 3 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावली आहे. देशमुख यांच्यातर्फे अॅड. स्वप्नजीत संन्याल उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

     

    सविस्तर असे की महाराष्ट्रातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाप्रमाणे चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता शासन निर्णयानुसार सफाई कामगार, कक्षसेवक,सुरक्षा रक्षक,ऑपरेटर,वाहन चालक, स्वच्छता निरीक्षक, स्वयंपाकी लिपिक इत्यादी काल्पनिक पदांवर दरवर्षी 11 महिन्यांकरिता कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात येते.राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर मे 2020 मध्ये चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने अशी 562 कंत्राटी पदे भरण्याकरिता राबविलेल्या निविदा प्रक्रियेत 190 सफाई कामगार व 45 सुरक्षा रक्षकांचा समावेश होता.

     

    या मध्ये निवड झालेल्या कंत्राटदारांना 11 महिन्याचा विलंब करून एप्रिल 2021 मध्ये काम सुरू करण्याचे लेखी आदेश देण्यात आले. लेखी आदेश देताना 190 सफाई कामगार व 45 सुरक्षा रक्षकांच्या पदांची मंजुरी रद्द करण्यात आली. त्यासाठी अर्थ विभागाच्या एका जुन्या शासन निर्णयाचा आधार घेण्यात आला. एक महिन्यानंतर आपल्याच आदेशाला अंशतः केराची टोपली दाखवून सुरक्षा रक्षकांच्या 45 पदांना पुन्हा मंजूर देऊन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली. मात्र कोणतेही कारण लागू नसताना 190 सफाई कामगारांची नियुक्ती करण्याचे टाळण्यात आले.

    कामगारांच्या आंदोलनात फूट पाडण्यासाठी अधिकाऱ्यांची मनमानी ?

    कोविड आपत्तीमध्ये अत्यावश्यक बाब म्हणून प्रसंगी नियम बाजूला ठेवून निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने आरोग्य विभागाला दिले होते. मात्र कोविड सारख्या आपत्तीमध्ये एका शासन निर्णयाचा आपल्या सोयीने अर्थ लावून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी 190 सफाई कामगारांची पदे रिक्त ठेवली. आज सुद्धा ही पदे रिक्त आहेत.

     

    वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे अनेक रुग्णांचे हाल झाले. सात महिन्यांच्या थकीत वेतनाची मागणी करणाऱ्या कामगारांनी संप पुकारल्याने त्यांच्या वचपा काढण्यासाठी सफाई कामगारांची 190 पदे रिक्त ठेवण्यात आली का ? याची चौकशी होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष देशमुख यांनी दिली.