Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • वनाधिकारी व BVG कंपनी विरोधात चंद्रपुरातील कामगार संघटना आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : येथील वनविकास व्यवस्थापनातील ४० ते ५० वनमजूर व कंत्राटी कामगार येथे मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे. परंतु, १० वनकामगार आणि २५ कंत्राटी कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता वनअधिकाऱ्यांनी त्यांना कामावरून कमी केले आहे. तर दुसरीकडे काही नवीन कामगारांना कामावर घेण्यात येत आहे. हा जुन्या कामगारांवर अन्याय असून, कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा इंटक व सिटू संलग्नित वनमजूर व कंत्राटी कामगार निवारण संघर्ष समितीने चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

     

    आठ ते नऊ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना वनरक्षकाने ३१ ऑक्टोबर रोजी बैठक घेत १ नोव्हेंबरपासून कामावर येऊ नका असे आदेश दिले. २५ कामगार कामावरून कमी करण्यात आले असून,पुढील आठवडाभरात आणखी कामगारांना कमी करण्यात येईल, असे यावेळी या कामगारांना सांगण्यात आले. तर दुसरीकडे नवीन कामगार कामावर घेतले जात आहे.

     

    जुन्या कामगारांना कामावरून कमी करून नवीन कामगार घेणे अन्यायकारक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, संघटनेने संचालक रेड्डी व उपसंचालक यांची भेट घेत कामावरून कमी करण्यात येऊ नये अशी मागणी केली. परंतु, अद्याप कामगारांना कामावर पूर्ववत घेण्यात आले नाही. त्यामुळे वनअधिकारी तसेच BVG कंपनीच्या विरोधात कामगारांमध्ये रोष आहे.

     

    कामावरून कमी केेलेल्या कामगारांना ९ नोव्हेंबरच्या आत कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला संघर्ष समितीचे अध्यक्ष कॉम्रेड वामन बुटले, सचिव नेताई घोष, ॲड. सुनीता पाटील यांच्यासह कामगारांची उपस्थिती होती.

  • बल्लारशाह ते मुंबई डायरेक्ट ट्रेन… आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली ही मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यातील आमदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून बल्लारशाह ते मुंबई डायरेक्ट ट्रेन सुरु होईस्तोवर ट्रेन क्र. 51196 लिंक कोचेस पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

     

    या पत्रात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात ही ट्रेन थांबली होती. देशभरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून जनजीवन पुन्हा सुरू झाले आहे. पण ती गाडी असूनपर्यंत बंद आहे. ही गाडी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी अतिशय सोयीची आहे. त्यामुळे बल्लारशाह-चंद्रपूर ते मुंबई ही थेट रेल्वे आठवड्यातून तीन वेळा सुरू होईपर्यंत लोकांच्या सोयीसाठी ही लिंक एक्स्प्रेस अगोदर सुरू करणे आवश्यक आहे.

     

    आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, ही गाडी दोन वर्ग 3 कोच, 3 स्लीपर कोच आणि एक जनरल कोच असलेली होती. ही गाडी वर्धा ते सेवाग्राम एक्सप्रेस ट्रेन क्र. 12140 ने मुंबईसाठी निघायची. आणि परतताना मुंबई-बल्लारपूर लिंकचे डबे गाडी क्रमांक सेवाग्राम 12139 ने यायचे. रेल्वे बोर्डाने लिंक कोचेस बंद जरी केल्या असल्या तरी मुंबईसाठी डायरेक्ट ट्रेन सुरु होईस्तवर हि सोय पूर्ववत देण्याची गरज आहे.

    Ultra tech cement company
    समस्त नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा

    आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वे मंत्री वैष्णव यांना विनंती केली आहे की, ही ट्रेन पूर्ववत सुरू करावी या मागणीवर रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. हि मागणी पूर्ण झाल्यास हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

  • चंद्रपुरात वेकोलीच्या चुकीमुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वेकोली दुर्गापूर क्षेत्रात असलेल्या सिव्हरेज प्लांट मध्ये 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला.

    या घटनेत दुर्गापुरात राहणाऱ्या 12 वर्षीय प्रेम बाळू वाघमारे चा मृत्यू झाला.

    दुर्गापूर वेकोली क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सिव्हरेज प्लांट जवळ 3 मुले खेळायला गेली होती, 2 मुले घरी परतली मात्र प्रेम घरी न आल्याने कुटुंब व मित्रांनी त्याची शोधाशोध सुरू केली.

     

    सिव्हरेज प्लांट जवळ मित्र व कुटुंब पोहचले असता त्याठिकाणी प्रेम चा मृतदेह आढळला, सिव्हरेज प्लांट मध्ये असलेल्या पाण्यात बुडून प्रेम चा मृत्यू झाला.

     

    या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रेम चा मृतदेह वेकोली उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणत ठिय्या आंदोलन सुरू केले.

     

    तणावाची परिस्थिती निर्माण होताचं वेकोलीचे अधिकारी, पोलीस प्रशासन व दंगापथक त्याठिकाणी दाखल झाले.

    इंटक चे केके सिंग यांनी त्याठिकाणी पोहचत घटनेची माहिती घेत पीडित कुटुंबाला 25 लाखांची मदत मिळावी अशी मागणी करीत त्याबाबत सूचना केल्या, वेकोली द्वारे तात्काळ त्याबाबत पत्र व्यवहार करण्याचे आश्वासन मिळाले व अंत्यसंस्कार साठी 25 हजारांची मदत वेकोली तर्फे देण्यात आली.

     

    विशेष म्हणजे मागील अनेक वर्षांपासून तो सिव्हरेज प्लांट बंद अवस्थेत आहे, या प्लान्ट मध्ये आतापर्यंत अश्या 3 घटना घडल्या असून याबाबत वेकोलीने त्या प्लांट ची विल्हेवाट लावली नसल्याने आज 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

    या घटनेमुळे दुर्गापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

  • बल्लारपुरात हत्येचा थरार

    News34 chandrapur

    बल्लारपूर – बल्लारपूरमध्ये, केवळ 1500 रुपयांची एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली तर एक युवक गंभीर जखमी झाला.

     

    6 नोव्हेम्बरला रात्री साडेदहा च्या सुमारास विद्यानगर वार्ड पंचशील चौकात दोन महिलांमध्ये आपापसात उधार घेतलेल्या पैशाच्या व्यवहाराबाबत वाद सुरू होता, त्यानंतर बचावासाठी गेलेल्या 2 युवकांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलांनी युवकांवर हल्ला केला, लाठी काठ्यांनी दोन्ही युवकांवर वार करण्यात आला, या हल्ल्यात 32 वर्षीय ललित उर्फ नागेश रमेश तोडसाम चा जागीच मृत्यू झाला तर 24 वर्षीय अमोल देवगडे हा गंभीर जखमी झाला.

    20 वर्षीय शीतल ऋतिक गवई व आकांक्षा नामक महिलेकडून 1500 रुपये उधार घेतले होते, मात्र शीतल ते पैसे परत करीत नव्हती, सोमवारी रात्री आकांक्षा चा भाऊ चैतन्य पंचशील चौकातून जात असताना त्याला शीतल गवई भेटली त्यावेळी त्याने माझ्या बहिणीचे पैसे तू का देत नाही अशी विचारणा केली असता शीतल चा पती रितिक ने चैतन्य ला शिवीगाळी केली, त्याचवेळी ललित व अमोल त्याठिकाणी आले असता त्यांनी रितीक ला समजावले असता दोघात धक्काबुक्की झाली.

     

    परिसरातील नागरिकांनी सुरू असलेला वाद सोडविला, त्यानंतर रितीक घरी गेला त्याने घडलेला प्रसंग आई आशा गवई यांना सांगितला असता त्यांनी आपल्या सोबत सौराब खान यांना घेत माझ्या मुलाला का मारहाण केली म्हणून अमोल व ललित वर काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आशा गवई यांच्या सोबत असलेले रितीक गवई, शीतल गवई, सौराब खान, बंडू नगराळे यांनी सुद्धा अमोल व ललित वर काठी व दगडाने वार केला, यामध्ये ललित चा जागीच मृत्यू झाला तर अमोल हा गंभीर जखमी झाला, सध्या अमोल वर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.

     

    बल्लारपूर पोलिसांनी तोडसाम हत्या प्रकरणात 5 आरोपीना अटक केली आहे, ज्यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस करीत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदाराने ग्रामपंचायत निवडणुकीत इतिहास रचला

    News34 chandrapur

    चंद्रपूर : समाजातील शेवटच्या वर्गाला न्याय देण्यासाठी लढा देणाऱ्या महिला आमदार म्हणून प्रतिभाताई धानोरकर यांची ओळख निर्माण झाली आहे. मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत कामाची पावती मिळाली आहे. वरोरा तालुक्यातील सालोरी येथे तब्बल २५ वर्षानंतर काँग्रेसचा स्वबळावर झेंडा रोवला आहे.

     

    यात सरपंचपदी प्रतिभाताई भानुदास शेरकुरे तर सदस्यपदी राहुल मारोती शेरकुरे, सिमा तुळशीदास मगरे, संगीता नागोराव नन्नावरे, रामचंद्र रघुनाथ उईके निवडून आले आहे.

     

    वरोरा जनसंपर्क कार्यालयात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर, विद्यार्थी कॉंग्रेस (NSUI) तालुकाध्यक्ष रूपेश तेलंग, माजी सभापती कृ. उ. बा. स. वरोरा राजेंद्र चिकटे, हरीश जाधव संचालक कृ. उ. बा. स.,युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल नन्नावरे,सेवा सहकारी संस्था अध्यक्ष अरुण शेरकुरे,भूषण पाटील, अमोल शेलकर, प्रभुदास पाटील, मधुकर पुसन्नाके, राजेंद्र मडवी, मारोती मिलमिले, किशोर मडावी, मिथुन आत्राम, निलेश गायकवाड, हनुमान घरात,अनिल शेरकुरे,विकास जांभुळे,मारोती चौखे,नामदेव मगरे,मनोहर रंदई,संजय काढमेघे,कैलास तुमसरे,चंपत ढोक,कवडू वाघ,सचिन शेंडे,स्वप्नील दडमल यांनी प्रयत्न केले.

  • बस व दुचाकीच्या अपघातात युवक ठार

    News34 chandrapur

    गडचांदूर – कोरपणा मार्गावरील खिर्डी गावाजवळ बस आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून त्यात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला.

    निखिल कोंडेकर असे मृत युवकांचे नाव असून तो विसापूर ता. बल्लारपूर येथील रहिवासी आहे.

     

    किनवट आगाराची बस क्र MH 30 BL 1650 गडचांदुर मार्गे चंद्रपूरला जात असताना समोरून येणारा दुचाकी स्वार युवकाने बस ला समोरासमोर धडक दिली, या अपघातात निखिल जागीच ठार झाला. घटनास्थळी गडचांदूर पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.

  • द कॉन्शन्स’’ ने जिंकली नाट्य रसिकांची मने

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- हम बहुउद्देशिय संस्था चंद्रपूर द्वारे डॉ. हेडगेवार जन्मशताब्दि सेवा समिती द्वारा संचालित सेवा प्रकल्प व निराधार प्राण्याची सेवा करणारी प्यार फाऊॅंडेशन या दोन संस्थांच्या आर्थिक मदतीकरीता दि 04 नोव्हेबर रोजी अमेय दक्षिणदास लिखित व ऍड चैताली बोरकुटे-कटलावार दिग्दर्शीत दोन अंकी मराठी नाटक ‘‘द कॉन्शस्’’ चा यशस्वी प्रयोग मोठ्या थाटात उत्साहात पार पडला.

    स्थानिक प्रियदर्शीनी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूरचे ज्येष्ठ विधिज्ञ तथा लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष ऍड रविंद्र भागवत व चंद्रपूरचे आ. किशोर जोरगेवार यांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. अशोक जिवतोडे, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष ऍड हिराचंद बोरकुटे, नाट्यशिबीरांच्या माध्यमातून उदयोन्मुख नाट्य कलावंत घडविणारे सुशील सहारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

     

    ‘‘द कॉन्शस्’’हे नाट्य नव्या कल्पनेला अनुरुप असे नाविण्यपूर्ण असल्याने रसिकांचा या नाट्यप्रयोगास उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या नाटकातील कलावंतांनी आपआपल्या भूमिकेला न्याय दिला. मि. शाम यांची भूमिका विशाल ढोक, मिरा चे पात्र ऍड चैताली बोरकुटे-कटलावार तर मनस्वी चे पात्र नामू ऊर्फ नामदेव बदखल यांनी साकारली. त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला. तेजराज चिकटवार यांचे नेपथ्य व हेमंत गुहे यांच्या प्रकाशयोजनेने रसिकांची मने जिंकून घेतली. डिलीव्हरी बॉय म्हणून रोशनसिंह बघेल, पंकज मलिक यांचे संगीत व प्रियंका ढोक यांची रंग व वेशभूषेनेही रसिकांची मने जिंकली.

     

    या कार्यक्रमात नाट्यक्षेत्रात योगदान देणारे सुप्रसिध्द नेपथ्यकार दिगांबर इंगळे, प्रकाशयोजनाकार हेमंत गुहे व रंग व वेशभूषाकार नितीन तोडे यांना आ. किशोर जोरगेवार व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला योगदान व सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने पवन सादमवार, हिरेन शाह, सचिन इंगळे, परवेज धनानी, मुकुंद दुबे, मिथून मेश्राम, प्रेमकुमार उपरे, ऍड आसिफ शेख, संतोश गोविंदवार, ऍड विजय मोगरे, देवराव भोंगळे, डॉ मंगेश गुलवाडे, ऍड सुरेश तालेवार, राम पल्लेवार, निलिमा शिंदे , डॉ सचिन भेदे, संजय कंचर्लावार यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

    नाटकाचे निर्मिती सुत्रधार ऍड अभय पाचपोर, श्रीकृष्ण लाडके, अभिजित कटलावार व राहुल बनकर यांचाही सन्मान उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आला. क्रिएटिव्ह फिंगर(कले साठी कला) चे उद्घाटन आ. किशोर जोरगेवार यांचे हस्ते करण्यात आले.

     

    सदर नाटकाचा प्रयोग यशस्वी करण्यासाठी सौ प्रमिला बोरकुटे, नितिन इंगोले, प्रफुल आस्वले, रविशंकर गावंडे, बबन राखुंडे, शशांक गाढवे, पंकज नवघरे, बाबा खिरेकर, सुरज उमाटे, अंकुश राजुरकर, केविंद्र बारसागडे, वैशाख रामटेके, प्रज्वल निखार, रवींद्र वंडरे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऍड अभय पाचपोर तर आभार अभिजित कटलावार यांनी मानले.

  • ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये ओबीसी आणि मराठ्यांचा कौल देवेंद्र फडणवीसांना!

    News34 chandrapur

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा, त्यातून झालेली टीका हे सगळं पचवून राज्यातल्या सत्ताधारी भाजपने ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये इतर पक्षांना आस्मान दाखवलंय. राज्याच्या ग्रामीण भागातील ओबीसी आणि मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला साथ देत ७०० हून अधिक ग्रामपंचायतींचं दान भाजपच्या पदरात टाकलंय. आतापर्यंत हाती आलेल्या ग्रामपंचायत निकालांपैकी 427 ग्रामपंचायती म्हणजे 33 टक्के यश एकट्या भाजपला मिळालंय.

     

    राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मनोज जरांगे – पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या उपोषणानंतर राज्यात मोठं आंदोलन उभं राहिलं. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मनोज जरांगे – पाटील यांनी भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, या टीकेचे धनी होऊन देखील ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येनं मराठा समाज देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी असल्याचं निवडणूक निकालांमधून स्पष्ट होतंय. त्याचबरोबर राज्यातल्या ओबीसी समाजाने देखील देवेंद्र फडणवीसांना पूर्वीपासून दिलेली साथ अजूनही सोडलेली नाही.

     

    उलट ओबीसी आणि मराठ्यांनीच भाजपचा हा मोठा विजय साकार केल्याचं विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केलंय. यामुळे राज्याचं खरं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच असल्याच्या विचाराला आता पुन्हा बळकटी मिळताना दिसतेय.
    ग्रामपंचायत निवडणूक निकालांच्या दुपारी 3.30 वाजता आलेल्या निकालांनुसार विजयी घोषित झालेल्यांमध्ये भाजप ७१७ राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) ४०७, शिवसेना (शिंदे गट) २६२, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) १८५, कॉंग्रेस २०७, शिवसेना (ठाकरे गट) ११४, आणि इतर 60 आहेत.

    आंदोलनातील टीकेचा परिणाम नाही

    मराठा आरक्षण आंदोलन काळात टीका होऊनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे – पाटील यांचं उपोषण मागे घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जरांगे – पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करणाऱ्यांमध्ये 4 मंत्र्यांसह 2 माजी न्यायमूर्तींना पाठवण्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. या माजी न्यायमूर्तींंनीची जरांगेंना आरक्षण मिळवण्यासाठी लागणारा वेळ व त्यामागची कायदेशीर गुंतागुंत समजवून सांगितली.

     

    हे जाणून घेतल्यावर जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचा संदेश जनतेत गेला. हे सगळं होत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचा पुनरुच्चारही देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. या सगळ्याचा परिपाक म्हणूनच अतिशय भरघोस यश भाजपच्या पारड्यात पडल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय. निवडणूक निकालांमधून हे सिद्ध होत असून निकाल येण्यासाठी शिल्लक राहिलेल्या इतर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्येही भाजपने आघाडी घेतली आहे.

  • त्या शाळेवर होणार कारवाई, प्रशासनाचे संकेत

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 3 नोव्हेम्बरला शहरातील अष्टभुजा प्रभागातील नटराज इंग्रजी शाळेत सॅनिटरी पॅडची विल्हेवाट न लावल्याने मुख्याध्यापिकेने तब्बल 23 विद्यार्थिनींना स्वच्छतागृहात डांबले होते.

    या संतापजनक शिक्षेची तक्रार विद्यार्थिनी व पालकांनी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्याकडे केली, त्यानंतर युवासेनेने शाळेत धडक देत शाळा प्रशासनाला जाब विचारला.

     

    6 नोव्हेम्बरला युवासेना जिल्हाप्रमुख सहारे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेत शाळा व्यवस्थापनावर कारवाई करीत मान्यता रद्द करण्याची मागणी केली.

     

    यावर शिक्षणाधिकारी यांनी याबाबत सविस्तर चौकशी करीत लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन दिले, अप्पर जिल्हाधिकारी यांनी सुद्धा असे प्रकार खपवून घेणार नसल्याचे बोलत या प्रकरणी तात्काळ दखल घेत कारवाईचे संकेत दिले.

     

    विद्यार्थिनींना मानसिक त्रास देणाऱ्या शाळा व्यवस्थापणाविरोधात युवासेना कारवाई होईपर्यंत शांत बसणार नाही अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिली.

     

    यावेळी युवतीसेना जिल्हाप्रमुख रोहिणी पाटील, सुमित अग्रवाल, शहबाज शेख, बाळू भगत, सूरज रॉय, संघदीप रामटेके, पराग कुत्तरमारे, हर्षल येलमुले, अनुष्का खनके, रोशनी गोल्डर, गोविंदा असोपा, नरेश वासनिक यांची उपस्थिती होती.

  • ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपला आघाडी

    News34 chandrapur

    मुंबई – राज्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपने जोरदार मुसंडी मारत निकालांमध्ये आघाडी मिळवली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 2359 ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांना महत्त्व प्राप्त झालंय. विशेष म्हणजे भाजपने जिंकलेल्या ग्रामपंचायतींच्या विजयी उमेदवारांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य दिसून आलंय.

     

    त्यामुळे ग्रामीण भागातील मराठा समाजाने देवेंद्र फडणवीसांना साथ दिल्याचं स्पष्ट होतंय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात फडणवीसांना काहींनी विरोध करूनही हे चित्र पुढे आल्याने भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलंय.

     

    ग्रामपंचायत निवडणूक निकालांच्या सकाळी १२ वाजेपर्यंत आलेल्या निकालांनुसार विजयी घोषित झालेल्यांमध्ये भाजप २०२, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) १२१, शिवसेना (शिंदे गट) ११५, कॉंग्रेस ६३, शिवसेना (ठाकरे गट) ५६, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट)६५, आणि इतर ६९

    इतर ग्रामपंचायतींच्या निकालांमध्येही भाजपने आघाडी कायम राखली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रचाराला ग्रामीण भागात साथ मिळाल्याचं दिसतंय.