Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • अखेर त्या वाघिणीला वनविभागाने केले जेरबंद

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण ब्रह्मपुरी वन परिक्षेत्रातील आवळगाव उपविभागातील कक्ष क्रमांक ११६८ हळदा बिटमध्ये 5 नोव्हेम्बरला सायंकाळी ४ वाजता दोन ते अडीच वर्षे वयाच्या वाघिणीला वनविभागाने पकडले.

    गेल्या आठवड्यात तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागला होता. 29 ऑक्टोबर रोजी पळसगाव वन परिक्षेत्रातील बेलारा येथे एका मेंढपाळाचा वाघाने बळी घेतला, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खडसांगी वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

     

    ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील आवळगाव उपविभागात वाघाचा हल्ला हळदा गावातील सयत्राबाई नामदेव कामडी (७०) या महिलेचा बुधवारी हळदा बिट येथील कम्पार्टमेंट क्रमांक ११६८ मध्ये शेतात भात कापणी करत असताना वाघाने ठार केले. तेव्हापासून ब्रह्मपुरी वनविभागाचे वन कर्मचारी या वाघिणीला पकडण्यासाठी तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

    5 नोव्हेम्बरला दुपारी चार वाजता या वाघिणीच्या स्थळाची माहिती मिळताच डॉ.आर. एस. खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा एन. टायगर पी. चंद्रपूर, आणि आरआरटी ​​प्रमुख ए.सी. मराठे, पोलीस नाईक, (शूटर) ता.ए. वाय. प्र. चंद्रपूर,. राकेश आहुजा जीवशास्त्रज्ञ, वनविभाग, ब्रम्हपुरी, या पथकाने वाघिणीला डार्ट मारत पकडले.  पुढील उपचारासाठी वाघिणीला टीटीसीकडे हस्तांतरित करण्यात आले.

    ही कारवाई श्री. शेंडे सर, वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा.) दक्षिण ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली
    आरआरटी ​​सदस्य दिपेश. डी.टेंभुर्णे योगेश. डी.लकडे, गुरुनानक, व्ही.ढोरे, वसीम.एन.शेख, विकास.एस.ताजणे, प्रफुल्ल.एन.वाटगुरे, ए. डी. कोरपे आर.आर. टी. चालक, ए. एम. दांडेकर, आर.आर.टी.चालक यांनी केली.

  • बल्लारशाह-वर्धा डेमु ट्रेन च्या वेळापत्रकात बदल

    News34 chandrapur

    चंद्रपूर- जिल्ह्यातील प्रवासी, नोकरदार व रेल सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीची दखल घेवून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अखेर ट्रेन क्र. 01316 बल्हारशाह-वर्धा या विशेष डेमू ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करवून घेत जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा दिला आहे.

     

    सदर ट्रेन ही यापूर्वी बल्हारशाह स्थानकातून सायंकाळी 05.00 वा सोडण्यात येत होती. त्यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी विशेषतः शासकीय कर्मचाऱ्यांसाठी  ही ट्रेन असुविधाकारक ठरत असल्याने झेडआरयुसीसी चे सदस्य दामोदर मंत्री व रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हंसराज अहीर यांची भेट घेवून त्यांचेकडे ही अडचण व्यक्त केली होती.

     

    या अडचणीची दखल घेवून अहीर यांनी या डेमू ट्रेनची वेळ बदलण्याकरीता केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड चेअरमन यांचेशी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष चर्चा करुन या ट्रेनची वेळ बदलवून बल्हारशाह-वर्धा प्रवास करणाऱ्या  प्रवाशांना सुविधा उपलब्ध केली आहे. आता ही डेमू ट्रेन बल्हारशाह वरुन सायंकाळी 06.30 वा. सुटून चंद्रपूर येथे 06.53 वा. पोहचेल व ही ट्रेन वर्धेला रात्रो 09.30 वा. पोहचणार आहे. या बदलामुळे नोकरपेशा लोकांना चांगली सुविधा झाली असून त्यांना कार्यालयाची वेळ सांभाळून यामुळे सोयीचा प्रवास करण्याची संधी मिळाली आहे.

     

    डेमू ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करवून घेत जिल्ह्यातील प्रवाशांना सुविधा उपलब्ध केल्याबद्दल रेलसुविधा संघर्ष समितीचे पदाधिकारी सर्वश्री रमणीकभाई चव्हाण, दामोदर मंत्री, नरेंद्र सोनी, शाम सारडा, डॉ भूपेश भलमे, पूनम तिवारी, प्रदिप माहेश्वरी, अनिश दिक्षित, अशोक रोहरा, राजेश सादरानी, नरेश लेखवानी, संजय मंघानी, प्रमोद त्रिवेदी, सुदाम यादव, महावीर मंत्री, रमेश बोथरा, शकरसिंह राजपूरोहीत, प्रभाकर मंत्री, प्रल्हाद शर्मा, विनोद बजाज, मिलिंद दाभेरे, गौतम यादव यांनी हंसराज अहीर यांची भेट घेवून अभिनंदन केले. जिल्ह्यातील अन्य महत्वपूर्ण रेल्वे विषयक समस्या व आवश्यक असलेल्या ट्रेन सुरु करण्यास पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. सदर पदाधिकाऱ्यांशी  चर्चा करतांना हंसराज अहीर यांनी मुंबई करीता थेट गाडी सुरु करण्यास तसेच अन्य रेल्चे विषयक प्रश्नांबाबत आपण प्रयत्न करु असे आश्वासन दिले. यासंदर्भात रेल्वे मंत्री व चेअरमन यांचेसोबत लवकरच बैठक घेत असल्याची माहिती त्यांनी रेल्वे समितीच्या पदधिकाऱ्यांना दिली.

  • चंद्रपूर शहरातील शाळेत प्राचार्यांने विद्यार्थिनींना दिली संतापजनक शिक्षा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर येथील नटराज इंग्लिश स्कूलमध्ये एक भयावह घटना उघडकीस आली, जिथे मुख्याध्यापिका श्रीमती सरकार यांनी 23 शाळकरी विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट न लावल्याने शिक्षा म्हणून पूर्ण तासभर बाथरूममध्ये बंद केले. क्रूरता आणि निष्काळजीपणाच्या या कृत्यामुळे मुलींना तीव्र त्रास सहन करावा लागला, काहींना त्यांची सुटका झाल्यावर अस्वस्थ वाटू लागले काहींना उलट्या देखील झाल्या.

    अष्टभुजा प्रभागात असलेल्या नटराज इंग्रजी शाळेत 3 नोव्हेम्बरला हा प्रकार घडला, वर्ग 7 ते 10 वी च्या तब्बल 23 विद्यार्थिनींना शाळेच्या बाथरूम मध्ये डांबण्यात आले होते.

     

    जेव्हा मुलींनी धैर्याने या कृत्याची तक्रार शिक्षकांसोबत सामायिक केली, तेव्हा त्यांना समर्थन आणि सहानुभूतीऐवजी हास्य आणि उपहासात्मक वागणूक मिळाली. मात्र, न्याय मिळवण्याच्या निर्धाराने मुलींनी त्यांच्या पालकांना घडलेल्या या प्रकाराची हकीकत सांगितली, त्यांनी तातडीने ही घटना युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांना कळवली.

     

    तक्रार मिळताच जिल्हाप्रमुख सहारे व युवती सेना जिल्हाधिकारी रोहिणी पाटील यांनी तातडीने हस्तक्षेप करत शाळेला भेट देऊन या लज्जास्पद कृत्याचा जाब विचारला. प्राचार्य सरकारकडून सुरुवातीला नकार मिळाला आम्ही जे केलं ती त्यांना शिक्षा म्हणून केलं, युवा सेनेच्या अथक प्रयत्नांमुळे अखेरीस प्राचार्य सरकार यांना चूक मान्य करून पश्चात्ताप करण्यास भाग पाडले.

     

    या संतापजनक घटनेची प्रतिक्रिया म्हणून विक्रांत सहारे आणि रोहिणी पाटील यांनी जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करणार आल्याची माहिती दिली. या बेजबाबदार वर्तनामुळे शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे. सोबत या संतापजनक कृत्य केल्याने शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करू अशी मागणी आम्ही प्रशासनाला करणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी युवासेना पदाधिकारी यांनी दिली.

     

    यावेळी युवासेना शहर प्रमुख शहबाज शेख, युवा सेना उपशहर प्रमुख संगदीप रामटेके, युवती सेना उपजिल्हाधिकारी धनश्री हेडाऊ, अनुष्का खनके, रोशनी गोल्डर,सूरज रॉय व गोविंदा असोपा उपस्थित होते.

     

    नटराज इंग्रजी शाळेच्या प्राचार्य सरकार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की बाथरुम मध्ये विद्यार्थिनी सॅनिटरी पॅड ची विल्हेवाट लावत नसल्याने त्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी आम्ही त्यांना शिक्षा दिली, जर विद्यार्थी दुखावले असतील तर मी त्यांची माफी नक्की मागणार.

  • आयुक्तांनी शब्द पाळला नाही, डेड लाईन संपली

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरातील महानगरपालिका मध्ये घंटागाडी स्वच्छता कर्मचारी म्हणुन कार्यरत कंत्राटी कामगारांना सुरू झालेले वाढीव वेतन कंत्राटदार बदलताच वेतन कमी करन्यात आल्याने कामगारांनी याचा तीव्र रोष व्यक्त करत धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या तोंडावर काम बंद आंदोलन सुरू केले होते.

     

    ज्यामध्ये शासनाच्या नियमानुसार किमान वेतन तसेच कामगारांच्या सुरक्षा संदर्भात विविध विषयांना घेऊन आंदोलन केले गेले. सदर आंदोलन वेळीं मनपाचे आयुक्त यांनी कामगार सहायक आयुक्त यांच्या सूचनेवरून कामगारांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या होत्या त्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेत मनपा प्रशासना समोर धम्मपरिनिर्वाण दिनानिमित्त दिक्षा भूमीवर उद्भवणाऱ्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला.

     

    परंतू आयुक्तांनी किमान वेतन संदर्भात दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे कामगारांत रोष व्यक्त होत असून कामगारांनी दिलेली दिनांक 04/11/2023 ची डेड लाईन संपलेली असल्याने आता दिनांक 06/11/2023 पासून परत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचे कामगार युनियन अध्यक्ष रतन गायकवाड यांनी सांगितले आहे.

  • चंद्रपुरातील मोरवा विमानतळ होणार विकसित

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा आहे. येथे अनेक उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगांना पुरक असे नवे उद्योग या जिल्ह्यात उभे राहु शकतात ही बाब लक्षात घेत येथील उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी व्यावसायिक विमाने उतरण्याच्या दृष्टीने विकसीत करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

     

    आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असून या भेटी दरम्यान सदर मागणी केली आहे. या मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील इतरही प्रश्नांबाबत आमदार किशोर जोरगेवार यांची राहूल नार्वेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.

     

    चंद्रपूर हा औद्यागिक जिल्हा असून मोठे वीज निर्मिती प्रकल्पकोळसा खाणीलोहखनिजसिमेंट उद्योगकागदउद्योगआयुध निर्माण प्रकल्पवनसंपत्तीपर्यटन असे अनेक उद्योग चंद्रपूर येथे आहे. यामुळे या क्षेत्रात अजून नवीन उद्योग आणि कारखाने उभारण्याची क्षमता आहे. या सर्व उद्योगांचे संचालन आणि नियमन मुंबईनागपूरदिल्लीबंगलोरअहमदाबादरायपुर या सारख्या शहरांमधून होत असते.

     

    चंद्रपूर व गडचिरोली सारख्या सुदूर व मागास क्षेत्राला जोडण्याकरिता शासनाच्या वतीने १९६७ ला मोरवा या ठिकाणी २२ हेक्टर जागेत विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने विमान धावपट्टी विकसित करण्यात आली. सदर विमानतळाची धावपट्टीची लांबी 900 मीटर व रुंदी 28 मीटर इतकी आहे. त्यामुळे सदर विमानतळ केवळ छोटेखानी विमान उतरण्यासाठी योग्य आहे. तसेच सद्यस्थितीत सदर विमानतळाचा वापर केवळ व्हीआयपीच्या हालचालींसाठी केला जातो.

     

    मात्र आता सदर विमान धावपट्टी व्यावसायिक विमान चलन च्या दृष्टीने विकसित केल्यास या विमानतळाचा वापर अधिक योग्य रीतीने केल्या जाऊ शकतो. तसेच नक्षलप्रभावित चंद्रपूर-गडचिरोली जिल्हायाकरिता सद्यस्थितीत केवळ हे एकच विमानतळ आहे. मोरवा येथील धावपट्टी चा विकास आराखडा नुसार व्यवसायिक विमान चालवण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या  व नक्षलप्रभावित चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला व्यवसायिकदृष्ट्या विमानसेवेने जोडण्यासाठी व  येथे नवीन रोजगार निर्मितीसाठी मोरवाचंद्रपूर विमानतळाची धावपट्टीचा विकास करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

  • भाजप खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा भीषण अपघात

    News34 chandrapur

    गडचिरोली – गडचिरोली लोकसभा मतदार संघाचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाचा आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला, सुदैवाने नेते या अपघातात बचावले.

     

    सकाळी 10 वाजताच्या सुमारास गडचिरोली मतदार संघाचे भाजप खासदार अशोक नेते हे नागपूर वरून गडचिरोली कडे जाण्यासाठी वाहन क्रमांक MH33AA9990 ने निघाले होते, पाचगाव जवळ पोहचल्यावर अचानक त्यांच्या वाहनात बिघाड झाल्याने चालकाचे वाहनवरून नियंत्रण सुटले, आणि वाहन डिव्हायडरला जोरात धडकले.

     

    या धडकेत वाहनांचे एअर बॅग्स खुलल्याने खासदार नेते बचावले, वाहनात त्यांच्यासोबत असलेले इतर 4 जण सुखरूप असल्याची माहिती आहे.

     

  • मराठा आंदोलनात अखेर देवेंद्र फडणवीसच ठरले ‘संकटमोचक’

    News34 chandrapur

    मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचा भडका क्षमवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तारेवरची कसरत सुरू असतानाच त्यांच्या मदतीला धावून आले ते देवेंद्र फडणवीस. मनोज जरांगे – पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी तीन मंत्र्यांसोबत दोन माजी न्यायमूर्ती देखील पोहोचले होते. या न्यायमूर्तींनी योग्य शिष्टाई करून उपोषण थांबवण्यात मोठी भूमिका बजावली. माजी न्यायमूर्ती मारोती गायकवाड आणि दुसरे माजी न्यायमूर्ती सुनिल शुक्रे यांना उपोषणस्थळी जावे ही इच्छा फडणवीस यांनीच व्यक्त केली होती. फलस्वरूप उपोषण मागे घेण्यात त्यांना यश आलं.

     

    मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे – पाटील यांनी ९ दिवस अन्नत्याग केल्याने त्यांची तब्येत खालवली होती. परिणामी राज्यात मराठा आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचंही दिसून आलं. तसेच, ओबीसी समाजाच्या नेत्यांवर हल्ले झाल्याच्या घटनाही या काळात घडल्या. राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही नाजूक परिस्थिती हाताळणं काहीसं कठीण जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. त्यातच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे डेंग्यूच्या आजारामुळे बाजूला पडले होते. त्यांचं आजारपण राजकीय असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सध्या सुरू आहे.

     

    मात्र, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावून आले ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनीच मराठा आरक्षणातील कायदेशीर गुंता आणि तो सोडवण्यासाठी लागणारा वेळ ही महत्त्वाची माहिती जरांगे – पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जरांगे-पाटील यांच्या काही मागण्यांना उत्तर देणे सरकारला शक्य नव्हते.

     

    अशावेळी कायदेशीर बाबींचा गुंता सोडविण्याचे काम कायद्याच्या क्षेत्रातील मंडळींनीच केले तर ते सयुक्तिक ठरेल, असा विचार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडला. न्या. मारोती गायकवाड यांना फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले होते. तर दुसरे माजी न्या. सुनिल शुक्रे हे अलीकडेच उच्च न्यायालयातून निवृत्त झाले होते. या दोघांचीही नावं जरांगे – पाटील यांच्याकडे जाण्यासाठी पुढे आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ही कल्पना लागलीच उचलून धरली. या दोन्ही न्यायमूर्तींनी अतिशय योग्यप्रकारे विषयांची मांडणी जरांगे – पाटील यांच्यासमोर केली. सरकारच्या वतीने जे शिष्टमंडळ तयार करण्यात आले होते, त्यातल्या मंत्र्यांनीही जरांगेंकडे या माजी न्यायमूर्तींंचं म्हणणं ऐकण्याची विनंती केली. अखेर त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.

     

    ‘टार्गेट’ असूनही फडणवीसांची महत्त्वाची भूमिका
    मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी स्वतः जरांगे – पाटील यांनी फडणवीसांवर आरोप करत यथेच्छ टीका केली होती. तसेच, त्यांच्याविरोधात अरे-तुरेची एकेरी भाषा देखील वापरली होती. आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचा आरोपही त्यांच्यावर लावण्यात आला होता. त्यामुळे सरकारमध्ये फडणवीसच थेट टार्गेट झाले होते. मात्र, याचा कोणताही विशाद मनात न ठेवता आणि राज्यात कायदा – सुव्यवस्था राखत त्यांनी आंदोलन हाताळलं. याहीवेळी मराठा समाजाला खऱ्या अर्थाने धीर देण्यात फडणवीस यशस्वी झाले.

     

    ‘संकटमोचक’ ही जुनी ओळख

    देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले होते. त्यावेळीही ते आंदोलन त्यांनी शिताफीने हाताळले होते. मराठा समाजाला विश्वासात घेऊन त्यांनी आरक्षण देण्याचा निर्णयच तेव्हा जाहीर केला. हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयात टिकले होता. मात्र, फडणवीसांनंतरच्या सरकारने सुप्रीम कोर्टात राज्याची बाजू नीट न मांडल्याने हा निर्णय सुप्रीम कोर्टात टिकला नाही. पण त्यावेळी आंदोलन योग्यरितीने हातळत फडणवीसांनी ‘संकटमोचका’ची भूमिका बजावली होती. त्यावेळची कौशल्य त्यांनी यावेळी देखील वापरल्याने राज्यात आंदोलनाचा उडालेला भडका क्षमवण्यात सरकारला यश आलं.

  • महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदी माजी नगरसेविका कल्पना बगुलकर यांची नियुक्ती

    News34 chandrapur

    चंद्रपूर/नागपूर – 28 ऑक्टोबरला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे ची जवाहर विद्यार्थी गृह, सिविल लाईन नागपूर येथे विभागीय बैठक पार पडली या बैठकीला प्रामुख्याने प्रदेशचे अध्यक्ष तथा वर्धा जिल्ह्याचे खासदार मा. रामदासजी तडस साहेब, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डीले, सहसचिव बळवंतराव मोरघडे, अतुल वांदिले,सहसचिव जयेश बागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, माजी आमदार चरण वाघमारे, राज्य प्रसिद्धी प्रमुख गजानन उमाटे, विभागीय पदाधिकारी नंदकिशोर दंडारे, वैभव गोल्लर, विनायकराव तुपकर, महिला आघाडी विदर्भ संघटिका माधुरी तलमले, वंदना वनकर, प्रज्ञा बडवाईक, रमेश पिसे, किष्णाजी बेले, छबू वैरागडे, राजेंद्र झाडे, नयना झाडे, पुष्कर डांगरे व सर्व नागपूर विभागातील, जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष तथा जिल्यातील पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

     

    संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या बैठकी प्रसंगी नुकतेच भारताचे प्रतिनिधित्व करून तीन सुवर्ण पदक प्राप्त करणारे ओजस देवतळे यांच्या परिवाराला सन्मानित करण्यात आले, नागपूर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉ. संजय पाटील साहेब यांचा सत्कार करण्यात आला, नागपूर विभागीय उपसंचालक शिक्षण विभाग उल्हास नरळ साहेब यांचाही सत्कार करण्यात आला व बैठकीची सुरुवात करण्यात आली या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. यावर विचारमंथन करण्यात आले, सोबतच भविष्यात येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेली समाजाचे किमान ४ खासदार व 15 आमदारांना सर्वपक्षीय प्रतिनिधित्व मिळावे याकरिता सर्व तेली बांधवांनी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले तेली माहाराष्ट्र तेल घाना महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.

     

    समाज हा विदर्भात फार मोठ्या संख्येने आहे येणाऱ्या काळात ओबीसीं आरक्षणासह प्रतिनिधित्वाला जर धक्का लागला तर तेली समाज एक ओबीसीच्या घटक म्हणून राज्यभर रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करतील इत्यादी महत्त्वाच्या बाबीवर मंथन करण्यात आले याप्रसंगी नागपूर विभागातील 200 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त करण्यात आल्या या बैठकीला नागपूर विभागातील ५०० पेक्षा जास्त पदाधिकारी मिटींगला उपस्थित होते.

    चंद्रपुरात तेली समाज बांधवांची संख्या मोठया प्रमाणावर असून समाजात संघटनेविषयी जनजागृती व पदाधिकारी विस्तार व्हावा यासाठी चंद्रपूर शहर महिला आघाडी अध्यक्षपदाची धुरा माजी नगरसेविका कल्पना बगुलकर यांच्याकडे देण्यात आली.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य यांनी केले तर संचालक नागपूर जिल्हा अध्यक्ष पुष्कर डांगरे व माधुरी तलमले यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना वनकर यांनी केले.

     

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नागपूर कार्याध्यक्ष राजेश बारुतकर, रुपेश कुबडे, राजेश काळबांडे, विजय पाटील, अरुण तडस, राम जुमळे, गणेश वासुरकर, संकुल शहारे, आकाश लेंडे, दत्तु जीभकाटे, शालिनी तेलरांदे, मंगला महाजन, मंगला मस्के, निशा हटवार, जयश्री गभने, किरण बारई इत्यादी नागपूर विभागातील सर्व जिल्हा अध्यक्ष जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे घुग्घुस येथील 160 कुटुंबाचे होणार पुनर्वसन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वेकोलिच्या खाणींमुळे भूस्खलनाचा धोका असलेल्या घुग्गुस येथील १६० कुटुंबाचे नवीन जागेवर पुनर्वसन होणार आहे. या कुटुंबीयांना निवाऱ्यासह सर्व मूलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नवीन जागेवर या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार हे सुरुवातीपासूनच आग्रही होते. याबाबत त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील आमराई वॉर्डात २६ ऑगस्ट २०२२ रोजी गजानन मडावी यांचे घर भूस्खलनामुळे ६० ते ७० फूट जमिनीत गेले. या घटनेची पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाला भेट दिली. वेकोलिच्या खाणींमुळे परिसरातील इतर १६० घरांनासुध्दा भूस्खलनाचा धोका असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हापासूनच या सर्व कुटुंबांचे इतर जागेवर पुनर्वसन करण्यासाठी पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

     

    त्यानुसार मौजा घुग्गुस येथील शासकीय जमीन स.न. २९/१, आराजी ५९.४७ हे. आर. जागेपैकी २.४० हे. आर. (६ एकर) जागा या १६० कुटुंबांच्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांचे योग्य पुनर्वसनाकरीता भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम २०१३ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३०, ३१ व ४० आणि महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम ४२ (१) (अ) व नियम ४५ अन्वये घुग्गुस नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

     

    दहा दिवसांच्या आत पीडितांच्या हातात मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे चेक

    घुग्गुस येथील आमराई वॉर्डात झालेल्या भूस्खलनाच्या घटनेची तात्काळ नोंद राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेऊन घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ १० हजार रुपये देण्यात येईल, असा शब्द पीडित कुटुंबाना दिला होता. भूस्खलनाच्या दुर्घटनेप्रकरणी बाधित झालेल्या १६० कुटुंबांसाठी पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी केवळ दहा दिवसांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६ लक्ष रुपये मंजूर करून आणले होते. सदर रक्कम जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे वर्ग करण्यात आली व मंजूर अर्थसहाय्यातून प्रत्येक कुटुंब प्रमुखाला १० हजार रुपये याप्रमाणे १६ लक्ष रुपये तातडीने वाटप करण्यात आले होते.

  • चंद्रपूर मनपाची हद्दवाढ, ही गावे होणार समाविष्ट

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दवाढीच्या प्रस्तावावर भूमिपुत्र युवा संघटनेने आक्षेप घेतला आहे. या प्रस्तावात चंद्रपूर शहराभोवतीच्या 13 किलोमीटर अंतरातील सर्व गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही या प्रस्तावावर आक्षेप घेतो, असे संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना 2011 मध्ये झाली. त्यावेळी पूर्वीच्या नगरपालिका हद्दीतील लोकसंख्या आणि वस्ती समाविष्ट करण्यात आली होती. आता स्थापनेच्या 12 वर्षांनी महापालिकेची हद्द वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावात मोरवा, ताडाली, साखरवाही, येरुर, पडोली, आदी गावांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र, मनपा क्षेत्रातील आजूबाजूच्या 13 किलोमीटर अंतर्गत असलेल्या सर्व गावांचा आणि मोठ्या गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रस्तावावर आक्षेप घेण्यात येत आहे.

    पूर्वीपासून समाविष्ट असलेल्या प्रभागाचा सर्व परीने विकास करावा. आताच मनपा क्षेत्रात पाण्याची समस्या जटील आहे. रस्ते बरोबर नाही. मग हद्द वाढवून काय होईल. सध्या पूर्वीपासून समाविष्ट भागातच विकास होऊ द्या. नागरिकांना सर्व सेवा सुविधांचा लाभ मिळू द्या, असे चोखारे यांनी म्हटले आहे.

    चंद्रपूर शहराचा विकास हा सर्वांगीण असावा, यासाठी मनपा क्षेत्रातील आजूबाजूच्या 13 किलोमीटर अंतर्गत असलेल्या सर्व गावांचा समावेश करण्यात यावा. यामुळे शहराचा विकास होईल आणि शहरातील रहिवाशांना अनेक सुविधा उपलब्ध होतील. जवळच्या इतर गावांचा समावेश न करता मोरवा, ताडाली, साखरवाही, येरुर, पडोली, आदी गावांचा समावेश करून ही हद्द वाढ करणे म्हणजे जाणीवपूर्वक दुजाभाव करण्यासारखे आहे. त्यामुळे मनपापासून जवळपास असलेली सर्व गावे यात समाविष्ट करण्यात यावे, अन्यथा समावेश करू नये, अशी विनंती चोखारे यांनी केली आहे.