Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • अखेर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाकडून सरपंच संघटनेच्या मागण्या मान्य

    अखेर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाकडून सरपंच संघटनेच्या मागण्या मान्य

    News34 chandrapur

    कोरपना (चंद्रपूर) : –  कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण केले. अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव तथा ग्रामपंचायत नांदाचे सदस्य रत्नाकर चटप व आवाळपूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी १६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले. तब्बल तीन दिवसानंतर आंदोलनाची धार तीव्र झाली असताना गावातील व्यापारीमंडळ विविध पक्ष, सामाजिक संघटना व गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे अल्ट्राटेक कंपणी प्रशासन नरमले. कंपनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.

     

    शिष्टमंडळात नांदा गावचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, पत्रकार प्रमोद वाघाडे, हिरापूरचे उपसरपंच अरुण काळे, सांगोडाचे माजी सरपंच सचिन बोंडे, चंदू राऊत उपस्थित होते. सरपंच संघटनेच्या मागण्यांची भूमिका स्पष्ट करुन कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र दिले. काल (ता.१८) रात्री १० वाजता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे उपव्यवस्थापक नारायणदत्त तिवारी व सतीश मिश्रा यांनी उपोषणकर्ते रत्नाकर चटप व बाळकृष्ण काकडे यांना लिंबू पाणी पाजून लेखी पत्र देत आमरण उपोषण सोडवले. नांदा, बिबी, आवाळपूर, हिरापूर, सांगोडा, भोयगाव, बाखर्डी, तळोधी, नोकारी, पालगाव या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.

     

    या मागण्या केल्या मान्य

    अल्ट्राटेक सिमेंट कंपणी अंतर्गत दत्तक गावात सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) संबंधित गावातील सरपंच व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून कामे केली जातील. दत्तक गावातील आयटीआय व तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण रोजगारासाठी प्राधान्य दिले जाईल. पोलीस व सैन्य भरती तयारीसाठी कंपणीतील मैदान दत्तक गावातील मुलांना उपलब्ध करण्यात येईल. दरवर्षी गावातील मुख्य रस्त्यांवर होणारा कचरा स्वच्छतेसाठी मशीन उपलब्ध करण्यात येईल. दत्तक गावातील कुठल्याही दुर्घटनेत रुग्णवाहिका व अग्निशमन यंत्र कंपणीकडून उपलब्ध करण्यात येईल.

     

    आंदोलनातील या कृतीने अल्ट्राटेक प्रशासन धास्तावले

    आंदोलनात दहा गावातील सरपंच व लोकप्रतिनिधी एकत्र येत धरणे व उपोषण केले. विविध राजकिय व सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी रक्तांनी पत्र लिहीले. संतप्त गावक-यांनी कंपणीविरोधात मुंडन केले. ‘मी माझ्या गावासाठी’ असे फलक गावक-यांनी लावले. सिमेंट कंपणींच्या अधिका-यांना दत्तक गावांनी गावबंदी केली. आंदोलनाची तिव्रता वाढल्याने अखेर ६ दिवसानंतर अल्ट्राटेक प्रशासन धास्तावले व आंदोलनस्थळी येत मागण्यांची पुर्तता केली.

     

    अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर विरोधात करण्यात आलेल्या आमरण उपोषणानंतर कंपनी प्रशासनांनी मागण्या मान्य केल्या. या मागण्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासोबतच गावकऱ्यांसह कामगार, गावातील तरुणांच्या रोजगाराबाबत दत्तक गाव सरपंच संघटना कंपनी प्रशासनाकडे आग्रही आहे. सदर मागण्यांकडे कंपनी प्रशासनांने दुर्लक्ष केले तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल.

    – रत्नाकर चटप
    जिल्हा सचिव, अ.भा.सरपंच परिषद तथा ग्रा.पं.सदस्य नांदा

  • माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त तालुका कांग्रेस तर्फे अभिवादन

    माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त तालुका कांग्रेस तर्फे अभिवादन

    News34 chandrapur गुरू गुरुनुले

    मुल -भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान,राष्ट्रमाता स्व.इंदिरा गांधी यांची जयंती काॅंग्रेस भवन मूल येथे साजरी करण्यात आली. काॅंग्रेसचे जेष्ठ नेते तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे अध्यक्षतेत जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला.

     

    कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र कन्नमवार, मूल काॅंग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक घनशाॅमभाऊ येनुरकर, महिला काॅंग्रेस अध्यक्षा रुपालीताई संतोषवार,सचिव शाॅमल बेलसरे, बाजार समितीच्या संचालक चंदाताई कामडी, व्यापारी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तूभाऊ समर्थ, मुल शहर काॅंग्रेस उपाध्यक्ष संदिप मोहबे, माजी नगरसेवक विनोद कामडे,सिमा भसारकर, फरजाना शेख उपस्थित होते.

     

    शहर महिला काॅंग्रेस अध्यक्ष सौ.नलिनी आडेपरवार व काॅंग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी श्री बंडूभाऊ गुरणूले यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सुत्रसंचालन शहर काॅंग्रेस अध्यक्ष सुनिल शेरकी सर तर आभार प्रदर्शन शहर काॅंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश फुलझेले यांनी मानले.

  • 13 बछड्यांची माय, माया वाघिणीचा मृत्यू?

    13 बछड्यांची माय, माया वाघिणीचा मृत्यू?

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  ऑगस्ट महिण्यापासून बेपत्ता असलेली ताडोबाची क्विन टि 12 माया वाघिणीचे ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात शनिवारी गस्तीदरम्यान अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील चार महिण्यापासून टि 12 वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होणे बंद झाले होते. तेव्हापासून पर्यटक आणि वन्यप्रेमींमध्ये माया वाघिणीच्या अस्तित्वाविषयी चिंता व्यक्त केली जात होती. ह्या बाबतची ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने ह्या विषयी अधिकृत माहिती दिली आहे.

     

    T-12 ही वाघिणी ही माया नावाने ताडोबात सर्वपरिचीत होती. ती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य पांढरपवणी भागातील प्रबळ वाघिण होती. तिचा जन्म डिसेंबर 2010 मध्ये जन्म झाल्याची नोंद आहे. जून 2014 पासून टि 12 वाघिणीने पाच वेळा शावकांना जन्म दिला आहे. सन 2015, 2017, 2020 आणि 2022 मध्ये एकूण 13 शावकांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधता वाढण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. ह्यातील काही शावकांचा नैसर्गिक दृष्ट्या मृत्यू झाला आहे.

     

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत नियमीत होणा-या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातुन शास्त्रशुध्द पध्दतीने होणा-या संशोधनामध्ये 2014 पासून या वाघांची नियमीत नोंद होत होती. परंतु मार्च 2023 ते मे 2023 या कालावधीत कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने सुरू असलेल्या फेस 4 मध्ये तीची शेवटची नोंद झाली होती. ऑगस्ट 2023 मध्ये ताडोबा तलावाजवळील पंचामध्ये गस्त करीत असलेल्या क्षेत्रीय वन कर्मचा-यांना तिचे शेवटचे दर्शन झाले होते आणि त्यानंतर ती पूर्वीच्या गृह क्षेत्रात दिसत नव्हती. तेव्हापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी तसेच पर्यटकांमध्ये तिच्या मृत्यू बाबत शंका घेतली जात होती. ताडोबातील तिच्या सध्याच्या अस्तित्वाविषयी पर्यटन प्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.

     

    त्यामुळे ताडोबाच्या व्यवस्थापानाने वन विभागामार्फत तिच्या गृहक्षेत्रामध्ये आणि लगतच्या वन परिक्षेत्रामध्ये 7 ऑक्टोबर 2023 पासून मोठ्या प्रमाणात कॅमेरा ट्रॅप आणि नियमित गस्त करून शोध मोहीम सुरु केली होती. तिच्या गृहक्षेत्र म्हणजेच ताडोबा आणि कोलारा वनपरिक्षेत्रातील सर्व वनक्षेत्रात क्षेत्रीय कर्मचा-यानी पिंजून काढले होते. या संसोधन प्रक्रियेत T-07, T-114, T-115, T-158, T-16, T-120, T. 138, T- 164, T- 168, T-181 आणि T-100 असे एकूण 11 विविध वाघ त्यामध्ये 6 माद्या आणि 5 नर निरीक्षणामध्ये आढळून आले.

     

    7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेल्या संशोधन प्रक्रियेमध्ये टि 12 (माया) वाघिणीचे अस्तीत्व आढळून आले नाही. त्यामुळे तिला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 16 ते 18 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कौर क्षेत्रातील कार्यरत सर्व वनाधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी वन्यजीव संशोधक, विशेष व्याघ्र संरक्षण दलातील सर्व कर्मचारी आणि रोजंदारी वनमजुर अशा सुामरे 150 वन कर्मचा-यांना 5 गटांमध्ये विभागून कौर क्षेत्रातील विविध ठिकाणी पायदळ गस्त करण्यात आली.

     

    यासोबतच कॅमेरा ट्रॅप, ड्रोन कॅमेरा यांच्या सहायाने कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशनचे नेतृत्व ताडोबा-अंधारी व्याप प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे यांनी केले. ताडोबा अंधारी व्याध्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनात तसेच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, कोर क्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, जिवशास्त्रज्ञ प्राजक्ता हुशंगाबादकर यांच्या उपस्थितीत सुरु होते.

     

    शनिवारी ताडोबा वनपरिक्षेतील ताडोबा नियतक्षेत्रातील (बीट) कंपार्टमेंट क्रमांक 82 मध्ये शोध पथकांना काही अवशेष निदर्शनास आले अवशेषांमध्ये वाघाच्या सांगाड्याचा समावेश असल्याचे दिसून आले. ते सुमारे 100 चौ.मी. वनक्षेत्रात विखुरलेले होते. सर्व अवशेष एकत्र करण्यात आले. सदर अवशेष संसोधन आणि विश्लेषणासाठी पशुवैद्यकिय अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञांद्वारे डिएन विश्लेषणासाठी गोळा करण्यात आले. वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर अवशेष कुजण्याच्या प्रगत अवस्थेत होते. पुढील शवविच्छेदन तपासणीसाठी अवशेष योग्य नव्हते. या क्षेत्रात आणि परिसरामध्ये कोणतेही मानवी हालचाल व कृती आढळून आली नाही.

     

    टि 12 माया वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाल वर्तविला आहे. गोळा केलेले काही नमुने तात्काळ नॅशनल सेंटर फॉर सायन्स (NCBS) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी बंगलौर येथे विश्लेषणासाठी पाठविले जाणार आहेत. चालू असलेले वैज्ञानिक संशोधन व अभ्यासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या माहितीद्वारे T-12 वाघाच्या डीएनए नमुन्यांशी जुळले जाऊ शकतात आणि या संदर्भातील अहवाल 30 नोव्हेंबर 2023 प्राप्त होणार आहे. टि 12 वाघिणीच्या स्थितीबाबत अंतिम डीएनए विश्लेषण अहवालानंतर माया वाघिणीचे सत्य समोर येणार असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने सांगितले आहे.

  • चंद्रपूर पोलीस दलात हे चाललंय तरी काय?

    चंद्रपूर पोलीस दलात हे चाललंय तरी काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी घरफोडीच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी निघाल्याने पोलीस दलावर नामुष्की ओढावली आहे, आधीच जर त्या कर्मचाऱ्यांवर आवर घातला असता तर आज ही वेळ आली नसती अशी चर्चा पोलीस विभागात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

     

     

    स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यात अटक केली, मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नरेश डाहूले यांना ऑनलाइन गेम, जुगार व शेअर मार्केटचा चांगलाच छंद जडला होता, मात्र या छंदात त्यांनी लाखो रुपये गमावले, 22 लाखांचे कर्ज झाल्यावर आता ते फेडायचं कसं हा विचार त्याच्या मनात आला, आणि त्याने पोलीस वर्दीत राहून गुन्हेगारीचा मार्ग निवडला.

     

    रात्री एकटं निघायचं आणि रेकी करायचं असा प्रकार डाहूले यांनी सुरू केला, त्यानंतर बाहेरगावी गेलेल्या नागरिकांच्या घरात एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखा प्रवेश करीत रोख व सोन्याचे दागिने चोरायचे, असा प्रकार सुरू झाला.

     

    पहिल्या गुन्ह्यात मिळालेले यश डाहूले यांना दुसऱ्या पराक्रमासाठी कामी आलं, त्यानंतर त्यांनी घरफोडीचा सपाटा सुरू केला, मात्र रामनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या नजरेत डाहूले आले आणि त्यांना अटक झाली.

     

    विशेष म्हणजे डाहूले यांचा घरफोडी गुन्ह्यात सहभाग आहे ही बाब आधीच पोलिसांच्या कानात आली होती, मात्र त्यांना वॉर्निंग देऊन सोडण्यात आले, त्याचा फायदा डाहूले यांनी घेतला.

     

    याआधी सुद्धा पोलीस दलात असे प्रकार घडले…

    पोलीस एखाद्या गुन्ह्यात सहभागी आणि त्याला अटक झाली हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही, मात्र अश्या अनेक गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग आढळला, मात्र त्याची तक्रार झाली नाही, याबाबत News34 च्या हाती संपूर्ण माहिती मिळालेली आहे.

     

    यामध्ये चंद्रपुरातील एका भागात जुगार खेळताना काहींवर कारवाई झाली मात्र त्या खेळातील रक्कम परस्पर लाटण्यात आली, दुसऱ्या प्रकारात 26 जानेवारीला शहरातील एका घरात सुरू असलेल्या जुगारावर धाड मारण्यात आली, जुगार खेळणाऱ्यांची नावे नोंदविली, रक्कम जवळ ठेवली मात्र त्या गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली नाही. सदर बाब News34 ने उघडकीस आणली होती हे विशेष.

     

    असे अनेक कर्मकांड आहे ज्यामध्ये पोलिसांचा सहभाग आढळला आहे, मात्र त्याबाबत तक्रार कुठेही करण्यात आली नाही, पोलिसांचा सेनापती मजबूत असेल तर असे प्रकार घडायला नको, मात्र सेनापती कमजोर असेल तर अशे प्रकार जिल्ह्यात अविरत सुरुचं राहतील.

  • राज्यकर्ते हे जनतेचा नव्हे, निवडणुकांचा विचार करतात – मेधा पाटकर

    राज्यकर्ते हे जनतेचा नव्हे, निवडणुकांचा विचार करतात – मेधा पाटकर

    News34 chandrapur

    कोरपना (चंद्रपूर) : देशाला लुटण्याचे, संविधान आणि कायदे बदलण्याचे धोरण सत्ताधारी व उद्योगपती मिळून करत आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींचे विस्थापन होत आहे. ३९ कायदे संपवून ग्रामसभा व लोकशाहीविरोधी ४ नवीन कायदे कंपण्या व पैशाची गुंतवणूक करणा-यांसाठी सरकारने आणले. याविरुद्ध लढा देणा-यांना विकासविरोधी, अर्बन नक्षल ठरवले जात आहेत.

     

    जल-जंगल-जमीन बचावासाठी देशभर जनआंदोलने करणारे आंदोलक हे संसाधन रक्षणाचे खरे अहिंसक सत्याग्रही आहेत. मात्र राज्यकर्ते हे जनतेचा विचार करणारे राहिले नाहीत, ते कमीशनखोरी करुन केवळ निवडणूकींचा विचार करतात. त्याचे परिणाम सर्वसामान्य जनता भोगत आहेत, असे घणाघाती प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. समाजसेवक डॉ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुप बिबी आयोजित दिव्यग्राम २०२३ महोत्सवात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते, माजी आमदार ॲड.वामनराव चटप, स्वागताध्यक्ष ॲड.स्नेहल संतोष उपरे, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.अनिल मुसळे, समाजसेवक डॉ.गिरीधर काळे, सामाजिक कार्यकर्ते ॲड.लालसू नोगोटी, नर्मदानगरचे सरपंच पुण्या वसावे, राहूल आसूटकर, अनंता रासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

     

    समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ गृपतर्फे यंदाचा राज्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर व आश्वासक युवा सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात येणारा नामांकित सेवार्थ पुरस्कार देशात सामाजिक कार्य व पिढीतांच्या सक्षमीकरणासाठी २५० कोटींहून अधिक रक्कम समाजाला थेट मदत करणा-या ‘डोनेटकार्ट’ कंपणीचे संस्थापक, फोर्ब्स यादीतील प्रभावशील तरुण ठरलेला चंद्रपूर येथील सारंग कालीदास बोबडे यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप होते.

     

    मागील १२ वर्षांपासून बिबी येथे दिवाळी ही फटाकेमुक्त, ग्रामस्वच्छता व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरी करण्यात येते. यावेळी ब्रिटीश सरकारचा चेव्हनिंग गोल्ड व्हालंटरिंग पुरस्कार प्राप्त ॲड.दीपक यादवराव चटप व महाराष्ट्र पोलीस सेवेत निवड झालेले विशाल नारायण उपरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष ॲड.स्नेहल संतोष उपरे यांनी केले. संचालन अविनाश पोईनकर, तर आभार सचिन आस्वले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल अहिरकर, संदिप पिंगे, गणपत तुम्हाणे, संतोष बावणे, अनिल हिंगाणे, इराणा तुम्हाणे, सुरज मडावी, प्रमोद विरूटकर, राकेश बोबडे, सुरेंद्र मुसळे यासह युवक मित्रमंडळींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्हा व परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

     

    कृतीशील युवकांच्या पाठीशी उभे रहावे – ॲड.वामनराव चटप

    मेधाताईंचे कार्य सर्वश्रूत आहे. सारंग बोबडे या २६ वर्षीय तरुणाने पिढीतांच्या मदतीसाठी उभे केलेले काम प्रेरणादायी आहे. रम-रमा-रमी या तीन व्यसनांपासून दूर राहता आले तर आपल्याला प्रगतीपासून कुणीही रोखू शकत नाही. या तत्वाने ॲड.दीपक चटपची वाटचाल आश्वासक आहे. चार दशकांपासून डॉ.गिरीधर काळे यांनी यांनी लाखो अस्थिरुग्नांवर मोफत उपचार करुन बरे केले. ही कर्मयोगी माणसे समाजाचे भूषण आहे. बिबी येथील सेवार्थ गृपच्या युवकांनी १२ वर्षांपासून प्रबोधनाचा हा वसा घेतला. अशा कृतीशील युवकांच्या पाठीशी समाजाने भक्कम उभे रहावे, असे मत शेतकरी नेते व माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी केले.

  • चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला घरफोडी प्रकरणी अटक

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला घरफोडी प्रकरणी अटक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता असलेला विभाग म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा मात्र या विभागातील कर्मचारी स्वतः घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपी निघाल्याने जिल्हा पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

     

    शहरातील तुकूम भागात राहणाऱ्या इरफान शेख यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार 15 नोव्हेम्बरला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती.

     

    इरफान शेख हे पत्नीसह 9 नोव्हेम्बरला हज ला गेले होते, या दरम्यान त्यांच्या घरी अज्ञातांने दाराचे कुलूप तोडत आत प्रवेश करीत अलमारीत ठेवलेले 12 हजार रुपये चोरून नेले.

     

    रामनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली, रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, सदर प्रकरणी पोलिसांनी सर्व बाबी तपासत 4 दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी अटक केली. विशेष बाब म्हणजे शेख हे डाहूले यांच्या घराशेजारी राहत होते, ते हज ला गेले ही बाब डाहूले यांना माहिती होती.

     

    नरेश डाहूले यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

     

    मिळालेल्या माहिती नुसार आरोपी पोलीस कर्मचारी नरेश डाहूले यांनी याआधी सुद्धा 2 ते 3 घरफोडी केल्याचा संशय आहे त्याबाबत पोलीस तपास करीत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवाळीनिमित्त पोलिसांच्या मोहिमेची चर्चा..

    दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी अनेक नागरिक आपल्या गावी जातात, मात्र गावी गेल्यावर याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्या अशी जनजागृती चंद्रपूर पोलीस विभागाने केली, मात्र या जनजागृतीचा पोलिसरूपी चोराने स्वतःचा फायदा करवून घेतला, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत डाहूले यांनी घरफोडी करीत पोलिसांच्या मोहिमेचा फज्जा उडविला.

     

    पोलिसांना आधीच डाहूले यांचा सुगावा?

    सूत्रांच्या माहितीनुसार डाहूले यांच्या गुन्हेगारीबाबत पोलिसांना सुगावा लागला होता, हे धंदे बंद करा अशी चेतावणी सुद्धा त्यांना देण्यात आली होती, मात्र दिवसा पोलीस व रात्री चोर अशी भूमिका डाहूले पार पाडत राहिले.

     

    स्थानिक गुन्हे शाखा झाली अनियंत्रित?

    वर्षभरापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, गोळीबार, हत्या, तंबाखू तस्करी, सट्टेबाजी, कोळसा तस्करी, घरफोडी या गुन्ह्यात सतत वाढ होत आहे, विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी पडोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील दरोडा प्रकरणातील स्थानिक आरोपी वगळता मुख्य आरोपीना अजूनही अटक करण्यात आली नाही. अश्यातच आता पोलीस कर्मचारी स्वतः गुन्हे करू लागले असल्याने नागरिक सुरक्षित कसे राहणार हा मोठा प्रश्न आहे.

     

    चंद्रपूर पोलीस विभाग नॉट रिचेबल

    पोलीस दलातील कर्मचारी गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याने पोलीस विभागावर नामुष्की ओढावली आहे, या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अनेकांनी उत्तर देण्याचे टाळले.

     

    आरोपीची पोलीस कोठडी का नाही?

    लहान गुन्ह्यात पोलीस विभाग आरोपीची पोलीस कोठडी मागतात मात्र या गंभीर गुन्ह्यात आरोपी पोलीस कर्मचारी नरेश डाहूले यांची पोलीस कोठडी का मागण्यात आली नाही? डिपार्टमेंट च्या माणसाला वाचविण्याचा तर प्रयत्न नाही ना अशी चर्चा आता जनमानसात रंगली आहे.

  • चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करा – काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांची मागणी

    चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करा – काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर: चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे.

     

    या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी भूमिपुत्र युवा संघटनेने केली आहे. काँग्रेस नेते व भूमिपुत्र युवा संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे.

     

    निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर शहराच्या मध्यभागीून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे.

     

    चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

     

    बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल.

     

    या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

  • बल्लारपूर बायपासवर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत

    बल्लारपूर बायपासवर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि दीड महिन्याच्या कालावधीत चारही मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण 20 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

     

    27 सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) या चार जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर आणि जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत यांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत ना. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला.

     

    प्रस्ताव पाठविल्यानंतर 20 दिवसांच्या आतच मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे चारही कुटुंबांसाठी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले आहे. हा निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतून, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, जटपुरा गेट शाखा, चंद्रपूर येथील बँक खात्यात परस्पर वर्ग करण्यात आले आहे.

  • ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    News34 chandrapur

    नागपूर – आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात 2 समाज एकमेकांसमोर उभे झाले आहे, या तिढ्याचा प्रश्न राज्य सरकार उत्तम प्रकारे हाताळत असून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही संकल्पबद्ध आहोत, सोबतच राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले आहे.

    आरक्षणावर विविध समाज एकमेकांसमोर उभा राहणे ही परिस्थिती योग्य नाही, राज्य सरकार व स्वतः मुख्यमंत्री या महत्वाच्या प्रश्नावर गंभीर असून लवकरचं सर्व समाजाच्या फायद्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदें घेतील, तो पर्यंत राज्यात शांतता कायम ठेवा, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यास संकल्पबद्ध आहोतचं सोबत ओबीसी समाजावर कसलाही अन्याय होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण तर उद्धव ठाकरे राज्याचे रावण – मोहित कंबोज

    मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण तर उद्धव ठाकरे राज्याचे रावण – मोहित कंबोज

    News34 chandrapur

    मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता रामायण वाचली असून ते नवे हिंदू बनले आहे, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विभीषण म्हटले, मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण आहे पण ते सत्यासोबत उभे आहे, उद्धव ठाकरे हे राज्याचे रावण आहे, ते नेहमी अहंकारात असतात.

     

    राऊत यांनी 2019 मध्ये रामायण वाचली असती तर उद्धव ठाकरे यांना त्यांचे खरे पात्र सांगू शकले असते अशी घनघणाती टीका भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. संजय राऊत यांनी वर्ष 2023 मध्ये रामायणाचे पठण केले, आणि आता ते ज्ञान पाजळत फिरत आहे, आता तरी संजय राऊत यांनी आपली फालतूची पोपटगीरी बंद करावी कारण मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण असल्याचा आम्हाला गर्व आहे.