Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • मतदारसंघाच्या विकासासाठी सतत कार्यरत राहीन : आमदार प्रतिभाताई धानोरकर

    मतदारसंघाच्या विकासासाठी सतत कार्यरत राहीन : आमदार प्रतिभाताई धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मी माझ्या 4 वर्षांच्या कार्यकाळात वरोरा – भद्रावती मतदारसंघातील विकासासाठी कटिबद्ध राहिली आहे. या काळात अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत. या कामांमुळे तालुक्यातील नागरिकांना अनेक सुविधा मिळाल्या आहेत. यापुढेही मी तालुक्यातील विकासासाठी सतत कार्यरत राहीन, असे प्रतिपादन वरोरा – भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांनी केले.

     

    भद्रावती तालुक्यातील विविध गावांमध्ये भुमीपूजन व लोकार्पण सोहळा दौरा पार पडला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

     

    याप्रसंगी भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर, भानुदास पा.गायकवाड, भोजराज जी झाडे, सुधीर मुडेवार, अनिल चौधरी, मंगेश मत्ते, ईश्वर पा. धांडे, भगवान काकडे, किशोर पडवे, नयन जांभुळे, चांगदेव रोडे, सलाम शेख, संजय उताणे, संजय काकडे, दिलीप चौधरी, प्रशांत झाडे, आकाश ढवस यांची उपस्थिती होती.

     

    मानोरा ते धानोली रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण, किन्हाळा, आष्टा, घोसरी, टेकाडी, काटवल तु., विलोडा, काटवल न., चोरा, आष्टी का., मासळ व चिंचाळा येथे विविध विकास कामांची पाहणी केली व लोकार्पण केले.
    या दौऱ्यात त्यांनी मानोरा ते धानोली रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरणाचे काम पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहतुकीची सोय सुलभ झाली आहे. त्यांनी किन्हाळा, आष्टा व घोसरी येथे वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याबद्दलही समाधान व्यक्त केले. या योजनेमुळे या भागातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

     

    तेकडी, काटवल तु., विलोडा, काटवल न., चोरा, आष्टी का., मासळ व चिंचाळा येथे सिमेंट कॉकीट रस्त्याचे काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे या भागातील वाहतुकीची सोय सुलभ झाली आहे. त्यांनी या कामांसाठी संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांना धन्यवाद दिले.

    या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

  • चंद्रपूर मनपाची प्रोत्साहन योजना

    चंद्रपूर मनपाची प्रोत्साहन योजना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ टक्के सूट तसेच ऑनलाईन पद्धतीने कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना पुढील वर्षी विशेष सवलत देण्याचे मनपातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

     

    मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. शहरासाठी नियमित सोयी सुविधा पुरविण्यास मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली होणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास ८० हजार मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने करवसुलीस प्राधान्य दिले जाते.

     

    करभरणा हा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अथवा https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे.  ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) यांचाही पर्याय मनपाने उपलब्ध करून दिलेला आहे.तसेच  व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून सुद्धा मालमत्ता कर भरता येणार असुन याकरिता 8530006063 या क्रमांकावर वर “hi” टाईप करून आलेल्या उत्तरात ४ था क्रमांकाचा पर्याय निवडुन कर भरता येईल.

     

    मालमत्ता करात देण्यात येत असलेली सुट ही औद्योगीक मालमत्तेस लागु राहणार नाही.एकुण मालमत्ता करात सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • वरोऱ्यात बनावट दारू तस्करावर कारवाई पण चंद्रपुरात?

    वरोऱ्यात बनावट दारू तस्करावर कारवाई पण चंद्रपुरात?

    News34 chandrapur

    चंद्रपूर : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी केलेल्या कारवाईत वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर आरोपी अनिलसिंग अजबसिंग जुनी उर्फ पिंटू सरदार व आशिष पुरुषोत्तम मडावी यांना जेरबंद करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास यश आले. गुप्त माहितीच्या आधारे दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटेच्या वेळी आनंदवन चौक वरोरा येथे सदर आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले.

     

    आरोपीच्या ताब्यातून 90 मिलीच्या 600 देशी मद्याच्या बनावट बाटल्या असा एकूण 1 लक्ष 16 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे वरोरा तालुक्यातील बनावट देशी मद्य विक्री करणारा मुख्य सूत्रधार पकडला गेला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले. आरोपीस पुढील तपासासाठी तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

     

    सदर कारवाई नागपूर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त अनिल चासकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात वरोराचे निरीक्षक विकास थोरात, सचिन पोलेवार, दुय्यम निरिक्षक भगीरथ कुडमेथे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जगदीश मस्के, जवान-नि-वाहनचालक विलास महाकुलकर यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करीत आहेत असे राज्य उत्पादन शुल्क वरोराचे निरीक्षक विकास थोरात यांनी कळविले आहे.

     

    चंद्रपुरात सुद्धा मागील अनेक दिवसांपासून बनावट मद्य तस्करांचे नेटवर्क मोठ्या प्रमाणात काम करीत आहे, जिल्ह्यातील मध्यभागातून दररोज मोठ्या प्रमाणात खप असणारे मद्य संपूर्णतः बनावट असल्याची तक्रार सुद्धा करण्यात आली होती, त्या तक्रारींवर कारवाई झाली मात्र त्यानंतर बनावट मद्य तस्करी पुन्हा जोमाने सुरू झाली आहे, त्याकडे चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष आहे.

  • जिवती डिफॉरेस्टेशन अहवाल अपूर्ण, वस्तुनिष्ठ अहवाल नव्याने सादर करा – हंसराज अहिर

    जिवती डिफॉरेस्टेशन अहवाल अपूर्ण, वस्तुनिष्ठ अहवाल नव्याने सादर करा – हंसराज अहिर

    News34 chandrapur

    चंद्रपूर / नागपूर – जिवती तालुक्यातील वनक्षेत्रात समाविष्ठ 105 महसुली गांवे व 48 हजार हेक्टर जमिनींच्या डिफॉरेस्टेशन कार्यवाहीकरीता वन व महसुल विभागाद्वारे संयुक्त सर्व्हेक्षण करून 25 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने मुंबई येथे दि. 17 ऑक्टोंबरला घेण्यात आलेल्या सुनावणीत दिल्या होत्या. त्यानुसार आयोगाने चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांना दिल्ली येथील कार्यालयात पाचारण करीत त्यांच्याद्वारे सादर अहवाल व कार्यवाहीचा आढावा घेतला.

     

    सदर अहवाल अपूर्ण असल्याने सविस्तर वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने तयार करून डिफॉरेस्टेशन विषयक कार्यवाही शिघ्रतेने मार्गी लावण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुकाअंतर्गत असलेल्या 105 महसुली गावांच्या व हजारो हेक्टर जमिनीच्या डिफॉरेस्टेशनकरीता तालुक्यातील भाजप व अन्य सामाजिक संघटनांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे लेखी स्वरूपात तकार दाखल केली होती. या तकारीची गांभिर्याने दखल घेत दि. 17 ऑक्टोंबर 2023 रोजी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व वनविभागाचे प्रधान सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीविषयी वस्तुनिष्ठ कार्यवाही अहवाल एक महिण्याच्या आत आयोगाला सादर करण्याचे निर्देश यावेळी अध्यक्षांनी दिले होते.

     

    या सुनावणीचा आढावा घेण्याकरीता दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोगाने फेरसुनावणी घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. चंद्रपूरचे मुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर व अन्य वरीष्ठ अधिकाऱ्यांनी आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहून आयोगाला विषयानुशंगीक अहवाल सादर केला. परंतू सदर अहवाल अपूर्ण असल्याने आयोगाने या अहवालातील त्रुटी दूर करून नव्याने वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून आयोगाला त्वरीत सादर करण्याचे आदेश दिले. सदर प्रश्न 60 हजाराहून अधिक जनतेच्या जिव्हाळ्याचा असल्याने त्याचे गांभिर्य लक्षात घेवून या कामाला प्राधान्यकम देत कार्यवाहीला गती देण्याचे निर्देशही आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी सुनावणीला उपस्थित संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

  • चंद्रपुरात आजपासून राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ

    चंद्रपुरात आजपासून राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मथुरा स्पोर्टिंग क्लब चंद्रपूर तर्फे शहरात 25 वी युथ राज्यस्तरीय अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन 24 ते 26 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आलेले आहे.

     

    चंद्रपूर शहरातील रवींद्रनाथ टागोर शाळेचे मैदान, विठ्ठल मंदिर वार्ड येथे करण्यात आले आहे, आजपासून सुरू होणाऱ्या व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षपद आमदार सुभाष धोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, विजय डांगरे आदि उपस्थित राहणार आहे.

     

    24 नोव्हेम्बरला व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन झाल्यावर रविवार 26 नोव्हेम्बरला आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे.

     

    राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले असून यामध्ये (मुले व मुली) नागपूर विभाग, मुंबई, लातूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, पुणे, कोल्हापूर व नाशिक विभागातील संघाचा समावेश आहे.

     

    आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन मथुरा बहुद्देशीय संस्था व मथुरा स्पोर्टिंग क्लबचे अभय बद्दलवार व प्रकाश मस्के सह सदस्यांनी केले आहे.

  • चंद्रपुरातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह आम आदमी पक्षात प्रवेश

    चंद्रपुरातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह आम आदमी पक्षात प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली शंकर सरदार यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

     

    यावेळी बोलताना महेंद्र ढूमने म्हणाले की, आम आदमी पक्ष हा एकच पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने जनतेच्या हितासाठी काम करतो. दिल्ली, पंजाब आणि गोवा या राज्यांमध्ये आम आदमी पक्षाने केलेल्या कामांमुळे मी प्रभावित झालो आहे. त्यामुळे मी आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

     

    आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, महेंद्र ढूमणे यांचे आम आदमी पक्षात स्वागत आहे. ते एक अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. त्यांचा पक्षात प्रवेश आम आदमी पक्षाला अधिक मजबूत करेल.

     

    त्यांच्या सोबत तेजस तिगुटला,वैभव पेचे,निलेश गायकवाड, गौरव पोहाकार,नेहल चिवडे, साहिल हजारे, सुरज मोरे, पवन म्हस्के,भवानी सिवी,संदीप वर्मा,श्री जोशी, मयूर इंगळे,गोलू कनोजिया,भवानी बैस, शुभम इंगळे,मनीष इंगळे,सोनू चिवडे,साईराम बल्की, आशु केमेकर, सुजित वर्मा,सुरज कानोजिया,बबलू मानकर,  सन्नी गिल,प्रवीण काळे,कृष्णा तीगुटला,सागर काळे, नंदू झाडे, चेतन पत्रकार, उदय तांड्रा,चिंटू पोगला, मंगेश मुंजेवार,नागेश गायकवाड,कैलाश गायकवाड, दिपक बहुरिया,आकाश भगत,अमित पोटे, अंकुश तडेल, अक्षय सोयाम यांनी प्रवेश केला. या वेळेस आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सुरज शाह,सुमित हस्तक,नितीन बावणे, गणेश आडे इत्यादी उपस्थित होते.

     

    महेंद्र ढूमणे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक युवकांचे संगठन उभे केले आहेत. ते अनेक युवकांच्या हक्कांसाठी लढा देत असतात.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातत्व स्थळांचा होणार विकास

    चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातत्व स्थळांचा होणार विकास

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 57 कोटी 96 लक्ष 95 हजार 375 रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील 14 पुरातत्व स्थळांचा विकास होणार आहे. यासंदर्भात ना. श्री. मुनगंटीवार यांनी नुकताच नियोजन सभागृह येथे आढावा घेतला.

     

    बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले,जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सहाय्यक संचालक अमोल गोटे आदी उपस्थित होते. चंद्रपूरला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यांनी तेराव्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिर, प्राचीन गडकिल्ले व वास्तु आहेत. पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आता त्यांचे रूप पालटणार आहे.

     

    बैठकीत बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, पुरातत्व स्थळांचा विकास करताना कामाची गुणवत्ता, दर्जा आणि कामाची गती यावर स्थानिक नागरीकांनी लक्ष ठेवावे. पुरातत्व विभागाने प्रत्येक ठिकाणी पाच ते सहा नागरीकांची टीम तयार करावी. लोकसहभागातूनच या स्थळांचा विकास होईल, याबाबत नियोजन करावे. प्रत्येक ठिकाणी कामांची माहिती देणारा एक फलक तर संबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारा दुसरा फलक लावावा. यात ‘क्यूआर कोड’चा समावेश असावा.

     

    सिध्देश्वर मंदिराचा ‘ब’वर्ग दर्जा करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा. माणिकगड किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार करणे, चंद्रपूर महानगर पालिकेअंतर्गत असणाऱ्या तीन बारवचे काम उत्तम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी पुरातत्व विभागाला दिल्या.

     

    अर्थमंत्री असताना भरीव तरतूद

    राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास करण्याचे काम पुरातत्व विभागाकडे असते. सुरुवातीला या विभागाचे बजेट प्रतिवर्ष केवळ 22 कोटी रुपये होते. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात या विभागासाठी 500 कोटी रुपये मंजूर केले.

     

    गाईड प्रशिक्षण संस्था होणार

    राज्यातील ऐतिहासिक वारसा बघण्यासोबतच त्याची माहितीही नागरीकांना मिळाली पाहिजे. नागरीकांपर्यंत योग्य व अचूक माहिती जावी, यासाठी राज्यात गाईड प्रशिक्षण संस्था उभारण्याचे नियोजन आहे.

    कायापालट होणारी स्थळं

    सोमेश्वर मंदिर (राजुरा), महादेव मंदिर (बाबुपेठ, ता. चंद्रपूर), विष्णु मंदिर (माणिकगड, ता. जिवती), सिद्धेश्वर मंदिर (देव्हाडा, ता. राजुरा), माणिकगड किल्ला टप्पा 1(ता. जिवती), माणिकगड किल्ला टप्पा 2, भवानी मंदिर (भटाळा, ता. वरोरा), ऋषी तलाव (लेणी) (भटाळा, ता. वरोरा), महादेव मंदिर (भटाळा, ता. वरोरा), शंकर मंदिर (भिसी, ता. चिमूर), गरुडस्तंभ (चंद्रपूर), खंडक्या बल्लारशाह समाधी (ता. बल्लारपूर), चंद्रपूर शहर व्यवस्थापन आराखडा (चंद्रपूर) आणि पापामिया टेकडी (ता. चंद्रपूर).

  • चंद्रपुरात अनधिकृत लेआऊट टाकत प्लॉटची विक्री

    चंद्रपुरात अनधिकृत लेआऊट टाकत प्लॉटची विक्री

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत ले आऊट वरील बांधकामावर कारवाई करण्यात आली असुन अनधिकृत रीतीने उभे करण्यात आलेले मार्कींगचे सिमेंट खांब तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.

     

    ठक्कर कॉलनी येथे ईरई नदी पात्राजवळ मौजा गोविंदपुर रीठ सर्वे नंबर ७३/१ तसेच जवळच असलेल्या नाल्याजवळील पुलाच्या बाजुला चांदा रयतवारी सर्वे नंबर ४९ असलेल्या भूखंडावर अनधिकृत ले आउट टाकुन प्लॉट विक्रीचा व्यवसाय सुरू केला असल्याची माहिती मनपा पथकास मिळाली होती. त्यानुसार पाहणी केली असता सदर भूखंड हा पूरग्रस्त भागात असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही. यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५२ अन्वये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यास नोटीस देण्यात आली होती. मात्र नोटीस स्वीकारण्यास सदर बांधकामदाराने नकार दर्शविला होता त्यामुळे सदर कारवाई करण्यात आलेली आहे. सदर ले आऊटवर प्लॉटची विक्री करण्यास मार्कींग सुद्धा करण्यात आली होती.

     

    चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की  केवळ नोटरीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्रीची कारवाई करू नये भविष्यात यासंबंधी कुठल्याही संशय उद्भवल्यास याची जबाबदारी पुर्णपणे  विक्री करून देणार व विक्री करून घेणार यांची राहील. दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी होत असलेल्या भूखंडाचीच खरेदी अथवा विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

     

    सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त सचिन माकोडे,सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते, अतिक्रमण निर्मूलन अधिकारी संतोष गर्गेलवार तसेच अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली. शहरात जिथेही अनधिकृत ले आऊट आहेत तिथे कारवाई सुरु राहणार असल्याने अनधिकृत ले आऊट वर कुठल्याही स्वरूपाचे बांधकाम आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. तसेच नागरिकांना शहरातील अनधिकृत ले आउट संबंधी माहिती असल्यास ती मनपास देण्याचे आवाहन मनपामार्फत करण्यात येत आहे.

  • चंद्रपूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना ‘बाल स्नेही’ पुरस्कार प्रदान

    चंद्रपूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना ‘बाल स्नेही’ पुरस्कार प्रदान

    News34 chandrapur

    चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास विभाग, सी.सी.डी.टी. आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा ‘बालस्नेही’ पुरस्कार – 2023, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदान करण्यात आला.

     

    महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते श्री. जॉन्सन यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (भा.प्र.से) व इतर मान्यवर उपस्थित होते.

     

    महाराष्ट्र राज्यातील बालकांचा सर्वांगीण विकास व बाल हक्क संरक्षण, त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण विषयावर अनेक प्रशासकीय यंत्रणा जसे बालगृह, बालकल्याण समिती, ई-यंत्रणा व स्वयंसेवी संस्था सकारात्मक पध्दतीने मोलाचे कार्य पार पाडत आहेत. हे काम करणारे अधिकारी / कर्मचारी व संस्थांना बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी 22 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई येथील यशंवतराव चव्हाण सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर पुरस्कारासाठी आपल्या जिल्हयातील विवेक जॉन्सन यांची उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

  • वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मनोहर वाणी यांच्या कुटुंबियांची आमदार जोरगेवार यांनी घेतली भेट

    वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मनोहर वाणी यांच्या कुटुंबियांची आमदार जोरगेवार यांनी घेतली भेट

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जूनोनाच्या जंगला लगत असलेल्या शनी मंदिरात गेलेल्या 53 वर्षीय मनोरह वाणी यांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला होता. दरम्यान आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक मनोहर वाणी यांच्या बाबूपेठ येथील राहत्या घरी सांत्वनपर भेट देत परिवाराला आर्थिक मदत केली.

     

    यावेळी मृतकाची पत्नी उज्वला वाणी, वडील विक्रम वाणी व इतर कुटुंबातील सदस्यांसह वन परिक्षेत्र अधिकारी जि. आर. नागमकर, यंग चांदा ब्रिगेडचे अमोल शेंडे, राशिद हुसेन, अब्बास शेख, अशोक अक्केवार, महेश वासलवार यांची उपस्थिती होती.

     

    रविवारी सकाळच्या सुमारास जुनोना रोडच्या कडेला असलेल्या शनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्या बाबुपेठ येथील रहिवासी मनोहर वाणी यांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी दाखल होत. मृतदेह शवविच्छेदना करिता जिल्हा सामान्य रुग्णालायत दाखल केला होता. दरम्यान आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक मनोहर यांच्या घरी सांत्वतपर भेट दिली. यावेळी त्यांनी मृतकच्या पत्नी उज्वला वाणी यांना आर्थिक मदत केली. सोबतच शासनातर्फे मिळणार असलेली मदत लवकर मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

     

    यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मृतक मनोहर यांचा शवविच्छेदन अहवाल व इतर कागदपत्रे वनविभागाला लकवर उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या आहे. सदर कागदपत्रे प्राप्त होताच शासनाची उर्वरित आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नागमकर यांना केल्या आहे. मृतकाच्या पत्नीला वन विभागाने कंत्राटी पद्धतीवर काम देण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.