Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • ब्रह्मपुरीत सुरू झाली महिला कुस्तीपटूची दंगल

    ब्रह्मपुरीत सुरू झाली महिला कुस्तीपटूची दंगल

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – आधुनिक युगामध्ये जुन्या रूढी परंपराना तिलांजली देत सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष समानतेने कार्य करीत असुन आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांनी देखील गगनभरारी घेतली आहे. हाच उदात्त हेतू साधत ग्रामीण महिला कुस्तीपटुंना वाव मिळावा याकरिता शिक्षणाची पंढरी असलेल्या ब्रम्हपुरी नगरीत राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्याचा दर्शनीय उद्घाटन सोहळा आज थाटात पार पडला.

    आयोजित उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, माजी जि.प. अध्यक्ष सतीश वारजूरकर, युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, सौ. किरण विजय वडेट्टीवार, नगराध्यक्षा सौ. रिताताई उराडे,  न.प.उपाध्यक्ष अशोक रामटेके, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य राजेश कांबळे, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक हितेंद्र राऊत, नगरसेवक डॉ नितीन उराडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, तहसीलदार उषा चौधरी, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नंदु नागरकर, प्रवीण पडवेकर, जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शरद टेकुलवार, कुस्तीगीर संघाचे सचिव मुर्लीधर टेकुलवार, विजय नडे, मतीन कुरेशी, राजेश सोलापन, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, गजानन शिरसागर, चंद्रशेखर पडगिलवार, नरेंद्र गाडगिलवार, विनोद दिवटे, चंद्रशेखर पडगिलवार यांची यावेळी उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार म्हणाले की,  आयोजित कुस्ती स्पर्धेसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून 600हुन अधिक महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला आहे. तर देशाच्या पारंपारिक क्रिडांपैकी एक असलेल्या कुस्ती स्पर्धेत कौशल्याची छाप सोडणाऱ्या विजेत्यांना राष्ट्रीय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेतून महिलांचे सक्षमीकरण व्हावे हा यामागील मुळ हेतू असुन जिल्ह्यात शिक्षणाची पंढरी व वैद्यकीय नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हपुरी नगरीला नावलौकिक मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी कटीबध्द आहोत असेही ते यावेळी म्हणाले.
    सुत्रसंचलन सुरज मेश्राम, प्रास्ताविक विनोद दिवटे, आभारप्रदर्शन संजय कुमरे यांनी केले.

    महाराष्ट्र केसरी गदा व मेडलचे पुजन

    ब्रम्हपूरी येथे सुरू होणाऱ्या महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस म्हणून देण्यात येणार असलेल्या महाराष्ट्र केसरी गदा व मेडलचे विधीवत पूजन कार्यक्रम राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले.
    यावेळी त्यांनी शक्तीची देवता बजरंगबली हनुमानजींच्या मुर्तीची सुध्दा पुजा केली.
    याप्रसंगी महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, तहसीलदार उषा चौधरी, न.प. मुख्याधिकारी अर्शिया जुही, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    शहरातुन निघाली कुस्तीपटुंची रॅली

    ब्रम्हपूरी शहरातील मुख्य मार्गावरून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या कुस्तीपटुंना सहभागी करत रॅली काढण्यात आली. रॅलीचे नेतृत्व सलग दोनदा महाराष्ट्र केसरी बहुमान मिळवणारे शिवराज राक्षे यांनी केले.
    यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार ह्या उपस्थित होत्या.
  • चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती येथे भूमिहीन शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण

    चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती येथे भूमिहीन शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण

    News34 chandrapur

    चंद्रपूर :- अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्टयांच्या प्रमुख मागण्या सह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिवती तालुका भूमीहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात ७ डिसेंबर 2023 पासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.

    उपोषण कर्त्या शेतकरी पुत्रांची प्रकृती खालावली जात आहे आज राजुरा विधानसभा आमदार सुभाष धोटे, माजी आमदार संजय धोटे, सुदर्शन निमकर व उपविभागीय अधिकारी राजुरा तसेच जिवतीचे तहसिलदार यांनी उपोषणाला भेट दिली उपस्थित शेतकय्रांना मार्गदर्शन करून उपोषण कर्त्यांसी संवाद साधला, चर्चा केली मात्र मुख्य मागणी जमिनीच्या पट्टयांचा प्रश्नावर तोडगा निघाला नाही जोपर्यंत जिल्ह्याचे पालकमंत्री उपोषण स्थळी भेट देऊन जमिनीच्या पट्टयांचा प्रश्न निकाली काढणार नाही तोपर्यंत अन्नत्याग उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला.

     

    मागील चार दिवसांपासून जिवती येथे सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाला समर्थन देण्यासाठी जिवती शहर व इतर काही कडकडीत बंद करून विविध गावांतील शेकडो शेतकरी, शेतकरी पुत्र,व संपूर्ण व्यापारी बांधवांनी रॅली काढून प्रमुख मागण्या पुर्ण करण्यासाठी नारेबाजी करत उपोषण स्थळी भेट देत शासन प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केले.उपोषण कर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध गावातून आलेल्या शेतकरी बांधवांना उपस्थित तरूण शेतकरी पुत्रांनी आपल्या तिव्र भावना मांडल्या.

     

    पिढ्यांन पिढी पासून वास्तव्यास असलेल्या शेतकरी बांधवांना जमिनीचा मालकी हक्क व त्यांच्या इतर मागण्या तातडीने सोडविण्यासाठी विधानसभेत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करून जिवती तालुक्यातील प्रमुख मागण्या निकाली काढण्यात यावे यासाठी विनंती केली.जर शासन प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर शेतकरी आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरेल.शेतकरी रस्त्यावर उतरल्यावर होणाऱ्या परिणामांस शासन प्रशासनच जबाबदार असेल आणि येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण तालुक्याचं बहिष्कार करण्यात येईल असा इशारा सुध्दा यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांनी दिले.

     

    सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, लक्ष्मण मंगाम, शब्बीर जागीरदार, मुकेश चव्हाण, विनोद पवार, प्रेम चव्हाण, विजय गोतावळे, दयानंद राठोड हे शेतकरी पुत्र अन्नत्याग बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत.आंदोलन कर्त्यांची प्रकृती खालावत आहे मात्र शासन प्रशासनाने जमिनीच्या पट्ट्यांच्या या मुख्य मागणीलाच बघल ठेवत असल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, भीक मांगो आंदोलन

    ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, भीक मांगो आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमुरच्या वतीने अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मंजूर न झाल्याने भीक मांगो आंदोलन करून शासनाचा निषेध केला व आंदोलनात जमा झालेला निधी शासनाकडे जमा करणार आहेत.

     

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबर ला चंद्रपुरात येऊन 20 दिवस चाललेल्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत आश्वासन देऊन आंदोलन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नसल्यामुळे दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून दुसऱ्या टप्प्याचे अन्न त्याग आंदोलन सुरू झाले.

     

    राष्ट्रीय महासंघाचे आंदोलन तीव्र होत चालले असून अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी साखळी उपोषण सोबत भीक मांगो आंदोलन घेण्यात आले. चिमूर येथील तहसील कार्यालय परिसरातील व्यवसाईकाकडून राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम लेंडे. जिल्हा उपाध्यक्ष राजू हीवजे. तालुका अध्यक्ष मारोतराव अतकरे यांचे नेतृत्वात पैसे रुपात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. आर्थिक रुपात जमा झालेला निधी राज्य सरकार कडे जमा करणार असल्याची माहिती आंदोलन दरम्यान देण्यात आली.

     

    यावेळी रामभाऊ खुडसिंगे. प्रभाकर लोथें. प्रभाकर पिसे. श्रीकृष्ण जिल्हारे. श्रीहरी सातपुते. रामदास कामडी. नागेंद्र चट्टे. अविनाश अगडे. सविता चौधरी. भावना बावनकर. दुर्गा सायम. मंगला बोरकर शेवंता बोरकर. मीना चौधरी. रेखा मोहिनकर प्रीती दीडमुठे. प्रमिला ठाकरे व बहुसंख्यांक ओबीसी बांधव उपस्थित होते.

  • बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

    बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काही संचालक, अधिकारी आदींच्या त्रासामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप निराधार असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे.

     

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल शाखेतील संचालक कक्षात स्थानिक पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बालाजी नकटू उरकुडे यांच्या प्राप्त तक्रारीनुसार बँकेच्या अधिकाऱ्यामार्फत बँकेच्या मेंडकी शाखेची सखोल चौकशी करण्यात आली.

     

    चौकशीत 17 लाख 67 हजार 315 रूपये 65 पैश्याची अपरातफर झाल्याचे निष्पन्न झाले, त्या अनुषंगाने बँकेची विनंती व विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर यांचे आदेशानुसार जिल्हा विशेष लेखा परीक्षक साजन साखरे यांनी मेंडकी शाखेचे लेखा परीक्षण केल्यानंतर निदर्शनास आलेल्या अफरातफरी विषयी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे तक्रार नोंदविली.

     

    प्राप्त तक्रारीवरून पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे कलम 420, 465, 466, 467 468, 471, 409, 34 भादविनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासांती रवींद्र भोयर, अमित राऊत, कल्पना मसराम, ए.पी. नागपुरे व एस बी शेंडे या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुरावे सापडल्याने २१ सप्टेंबर २०२० रोजी त्यांना अटक केली.

     

    पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर अमित राऊत यांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी जामीनकरिता न्यायालयाला विनंती केली, परंतु अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश चंद्रपूर यांनी विड्रॉल स्लिप व व्हाँवचर लिस्ट नुसार अमित राऊत यांनी 3 लाख 89 हजार 11 रुपयाची अफरातफर केल्याचे निष्पन्न होत असल्याचे कारण नमुद करून अमित राऊत यांची जमानतीची विनंती फेटाळून लावली.

     

    अमित राऊत यांना पोलिसांनी 21 सप्टेंबर 2020 रोजी अटक केल्यानंतर 12 नोव्हेंबर 2020 रोजी ब्रह्मपुरी न्यायालयाने जमानत दिली तोपर्यंत अमित राऊत पोलीस व न्यायालयीन कोठडीत होते. कोणताही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी 48 तासाचे वर पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत असल्यास त्यांचेविरूध्द नियमानुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश आहेत.

     

    अमीत राऊत यांच्या कोठडीतील कार्यकाळ दीड महिन्याच्या वर होत असल्याने बँक प्रशासनाने नियमानुसार त्यांचे विरुद्ध निलंबनाची कार्यवाही केली, सेवानिवृत्त सहकार अधिकारी शिरभय्ये यांचे मार्फतीने विभागीय चौकशी करण्यात आल्यानंतर अमित राऊत दोषी असल्याचा निवाडा दिला. विभागीय चौकशी अंती दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांसंबंधी 30 जून 2021 रोजी पार पडलेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत ठराव क्रमांक 21 नुसार दोषी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची कार्यवाही करावी असे सर्वानुमाते ठरविण्यात आल्याने बँकेने दोषी कर्माचा-यांविरूध्द बडतर्फीची कारवाई केली.

     

    बडतर्फीच्या कारवाईनंतर अमित राऊत यांनी चंद्रपूर येथील कामगार न्यायालयात धाव घेतली, दरम्यान कामगार न्यायाधीश यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर राऊत यांचे विरुद्ध झालेली चौकशी नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार झाली असून चौकशी अधिकाऱ्याने दिलेला निवाडा कायदेशीर असल्याचा निर्णय 24 एप्रिल 2023 रोजी जाहीर केला. यामध्ये बँक प्रशासनाने कोणतीही गैरकृती केली नसून कोणत्याही कर्मचाऱ्यांविरुद्ध हेतू पुरस्सर कोणातीही कारवाई केली नाही.

     

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकरी व सर्वसामान्यांची बँक असल्याने त्यांच्या ठेवी आणि विश्वास जपण्यासाठी कारवाई केली आहे. असे असताना काही मंडळी अमित राऊत यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नात बँकेच्या काही संचालक व अधिकाऱ्यांना गोवण्याच्या प्रयत्न करीत आहेत, ही बाब अयोग्य व निराधार असल्याचा दावा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केला आहे.

  • नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

    नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

    News34 chandrapur

    प्रशांत गेडाम

    नागभीड- नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावावर मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारला सांयकाळी ४.30 वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद अर्जुन नान्हे वय-३० रा. नवानगर (नवखळा) ता.नागभीड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

    नेहमीप्रमाणे घोडाझरी तलावात चार ते पाच व्यक्ती मासेमारीसाठी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास गेले होते. ट्युबवर बसून तलावात मासेमारीसाठी जाळे लावत होते. ते लावत असताना अचानक प्रमोद नान्हे यांचा
    तोल जाऊन जाळयात पडला. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. या घटनेची माहिती जवळील नागभीड पोलीस स्टेशनला देण्यात आली.

     

    लगेच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचा पुढील तपास नागभीडचे पोलीस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.

  • चंद्रपुरात राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 679 प्रकरणे निकाली

    चंद्रपुरात राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 679 प्रकरणे निकाली

    News34 chandrapur

    चंद्रपूर :  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात ( दि. 9 डिसेंबर) चंद्रपूर जिल्हा न्यायालय तसेच  सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

     

    या लोकन्यायालयाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, जिल्हा न्यायाधीश अभिश्री देव, गिरीश भालचंद्र, पांडुरंग भोसले, भगवान फड, प्रशांत काळे आदी उपस्थित होते.

     

    लोक न्यायालयासाठी चंद्रपूर मुख्यालयात 7 तसेच तालुका न्यायालयात 21 असे एकूण 28 पॅनल तयार करण्यात आले होते. या लोक न्यायालयामध्ये 10 हजार 55 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व 17 हजार 680 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण 27 हजार 735 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 342 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे तर 1 हजार 337 दाखलपूर्व प्रकरणे अशी एकूण 2 हजार 679 प्रकरणी निकाली काढण्यात आली. प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईत 9 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम 70 लक्ष 80 हजार वसूल करण्यात आले. भूसंपादनाची एकूण 14 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्याबाबत 71 लक्ष 65 हजार 857 रुपये नुकसान भरपाई संबंधित पक्षकारास अदा करण्यात आली. कौटुंबिक वाद प्रकरणांपैकी 5 प्रकरणांमध्ये पक्षकारांनी तडजोडीअंती एकत्र राहण्याचा समजुतीने निर्णय घेतला.

    धनादेश अनादरीत प्रकरणांपैकी 61 प्रकरणे ज्याची रक्कम रुपये 53 लाख 58 हजार 819 निकाली काढण्यात आली. लवाद वसुलीची 27 प्रकरणे निकाली काढण्यात आली ज्याची रक्कम रुपये 1 कोटी 38 लक्ष 79 हजार 192 वसूल करण्यात आली. औद्योगिक न्यायालयातील पाच प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.

  • ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

    ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर संघटनेच्या वतीने 10 ते 12 डिसेंबर या कालावधीत केले आहे.

     

    महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 10, 11 व 12 डिसेंबर 2023 रोजी 25 वी वरिष्ठ महिला व 6 वी सब ज्यूनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व 2 री महिला महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतुन जवळपास 600 महिला कुस्तीगीर या स्पर्धेसाठी येणार असुन भव्यदिव्य स्वरुपात ह्या स्पर्धेचे आयोजन ब्रम्हपूरी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रिडांगणात करण्यात येणार आहे.
    सदर स्पर्धेचे प्रायोजक राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार हे असणार आहेत.
    स्पर्धेचे उद्घाटन 10 डिसेंबर रोजी सायंकाळी सायंकाळी 6 वाजता होणार असून सदर महिला केसरी कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून पदवीधर मतदार संघ नागपूर चे आमदार अभिजीतजी वंजारी, शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकरजी अडबाले , शहरातून निघणाऱ्या प्रमुख रॅलीचे आकर्षण सलग दोनदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविणारे शिवराजजी राक्षे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार, नगराध्यक्ष रीताताई उराडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतिश वारजुरकर, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष अशोकजी रामटेके, डॉ बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. देवेशजी कांबळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाशजी फुंड प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
    @कार्यक्रमावली
    10 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 5 या वेळात शहरातील मुख्य रस्त्यावरून रॅली, सायंकाळी 5 वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी 6 वाजता उद्घाटन समारंभ होईल.
    11 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता पासून कुस्तीला सुरुवात
    12 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता कुस्ती स्पर्धेला प्रारंभ, सायंकाळी 7 वाजता बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.

     

  • थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू झाले. अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देत दिनांक 8 डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. साखळी उपोषणाला भरपूर पाठिंबा मिळत असल्याने आज तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी बजाव आंदोलन करण्यात आल्याने आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आहे.

     

    7 डिसेंबर 2023 पासून चिमूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले असून शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलक अजित सूकारे व अक्षय लांजेवार यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी श्रीहरी सातपुते, अविनाश अगडे, पप्पू शेख, अमोल जूनघरे यांनी साखळी उपोषण सुरू केले. अन्न त्याग आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी वाजवुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.

     

    यावेळी यामिनी कामडी, दुर्गा निवटे, विजया तरारे, सुनीता सहारे, कपिला चावरे, सुनीता मुरकुठे, रेखा चाचारकर, मंदा रंधये, पुज्या नन्नावरे व शेकडो ओबीसी महिला पुरुष व विवीध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

  • गुन्हेगारीचा पहिला प्रयत्न चंद्रपूर शहर पोलिसांनी हाणून पाडला

    गुन्हेगारीचा पहिला प्रयत्न चंद्रपूर शहर पोलिसांनी हाणून पाडला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात तीन अल्पवयीन मुलांचा पहिल्या गुन्हा करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांनी हाणून पाडला, या घटनेत तीन अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे.

     

    शहरातील संताजी भवन मार्गे बगड खिडकी कडे सायकल ने जाणारे प्रत्युष मुन यांचा मोबाईल दुचाकी वाहनांवर आलेल्या तिघांनी हिसकावून नेल्याची घटना 6 डिसेंबर ला घडली, फिर्यादी मुन यांनी याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला.

     

    संताजी भवन व पुढील मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ची पोलिसांनी तपासणी करीत दुचाकी व अल्पवयीन मुलांची ओळख पटताच त्यांना ताब्यात घेण्यात आले, या घटनेत तिघांना ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांनी सांगितले की हा आमचा पहिलाच गुन्हा आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH34CC1447 व हिसकावून नेलेला मोबाईल असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाळे, पोलीस उपनिरीक्षक शरीफ शेख, पोलीस कर्मचारी विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, संतोष पंडित, इम्रान खान, भावना रामटेके, सचिन बोरकर, चेतन गज्जलवार, रुपेश रणदिवे यांनी केली.

  • काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन आणि नोट-बुक वाटप

    काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शिलाई मशीन आणि नोट-बुक वाटप

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ​काँग्रेसने नेहमी गरिबांना साथ दिली आहे. विविध योजना त्यांचेसाठी चालू केल्या व त्या आजही सुरु आहे. त्या योजनांचा लाभ सर्वांना होत आहे. कॉग्रेसचा हात गरिबांसोबत तसेच तळागळातील जनतेसोबत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश चोखारे यांनी केले.

     

    काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त इटोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिलाई मशीन आणि नोट-बुक वाटप कार्यक्रमात उद्धघाटक म्हणून ते बोलत होते.

     

    या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूरचे उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी ग्रामीण तालुका अध्यक्ष बल्लारपूरचे गोविदा पाटील उपरे यांचेसह ओबीसी नेते सचिन राजूरकर, इटोलीचे सरपंच तुळशीराम पिपरे, कटवलीचे सरपंच राजू ढुमणे, उपसरपंच नरेश बुरांडे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पलता दरेकर, शाळा समितीचे अध्यक्ष नागेश दुधबडे, माजी सरपंच वासुदेव येरगुडे, धाडुजी दुधबडे, सदस्य दयालवार, आदी मान्यवरांची उपस्स्थिती होती.

     

    पुढे बोलताना चोखारे म्हणाले कि, सदर कार्यक्रमाचे माध्यमातून गरजू पर्यंत पोहचने व गोरगरीबाना वेळोवेळी साथ देणे हाच मुख्य हेतू ठेऊन काँग्रेस समोर जात आहे. आपण काँगेस सोबत उभे राहावे, आम्ही सदैव आपल्या सोबत असून कॉग्रेसचा हात गरिबांसोबत आहे . यासमोर गावातील विकासाला चालना देऊ. शाळेतील सोयीसुविधेसाठी सर्वोतोपरी प्रयन्त करू, येत्या काळात प्रशिक्षण कार्यक्रम राबवू त्यामाध्यमातून इतराना प्रशिक्षण मिळेल. असे ते म्हणाले.
    या कार्यक्रमात शाळेतील विद्याथ्यांना बुक वाटप करण्यात आले.तसेच इटोलीसह बल्लारपूर तालुक्यातील १५ – २० गरजू महिलांना शिलाई मशीन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

     

    यात सुनीता विजय वाळके, संतोषी माता वॉर्ड, बल्लारपूर, अर्चना गजानन रेनकूटवार रा. कळमना बल्लारपूर,चंदा सुधाकर घोंडे रा. पळसगाव बल्लारपूर, मंजू रामचंद्र वासमवार वॉर्ड ना. ०४, नया वस्ती, कोठारी , अर्चना देविदास गडकर रा. काटवली , बल्लारपूर, प्रभा रुंभी उपरे रा. कवडजाई बल्लारपूर , छाया राजू कुनघाडकर, रा. मानोरा बल्लारपूर, सविता सतीश चलाक रा. इटोली बल्लारपूर, वनिता अविनाश पेंदोर रा. मोहाली तुकूम बल्लारपूर, सुवर्णा रामू मरस्कोल्हे रा. किन्ही बल्लारपूर, पूजा प्रशांत (मुन्ना) गेडाम रा. कोर्टीमक्ता बल्लारपूर, ज्योत्सना संजय गोंधळी रा. बामणी बल्लारपूर,पुष्पा मारोती काळे रा. आमडी , बल्लारपूर, मनीषा अतुल सोनटक्के रा. नवी दहेली बल्लारपूर, वर्षा राजू गजभिये रा. जुनी वस्ती, कला मंदिर बल्लारपूर या गरजू महिलांचा सहभाग आहे.

    या कार्यक्रमात बल्लारपूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक चिंद्यालवर यांनी केले.