Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • मुंबई पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऑर्डर कधी देणार – आमदार सुलभा खोडके

    मुंबई पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना ऑर्डर कधी देणार – आमदार सुलभा खोडके

    News34 chandrapur

    नागपूर :- दोन वर्ष उलटून सुद्धा वर्ष २०२१-२०२२ मधील मुंबई पोलीस भरतीमधील प्रतीक्षा यादीतील हजारो उमेदवार नियुक्ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनावर आंदोलन पुकारले असता अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी विधान भवनात प्रश्न उपस्थित करून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांची वैद्यकीय पडताळणी करून त्यांना पोलीस सेवेत भरती करण्याची मागणी सभागृहा समक्ष लावून धरली.

     

    मुंबई पोलीस भरतीमधील निवड यादीतील हजारो उमेदवार हे नागपूर अधिवेशनावर आंदोलनाला बसले असून यात अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांचा सुद्धा समावेश आहे. दरम्यान आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांच्या मागण्या जाणून घेत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला.

     

    गृह विभागात भरपूर प्रमाणात रिक्त पदे असतांना सुद्धा पोलीस भरती होत नसल्याने पोलीस विभागावर कामाचा ताण येत आहे. मुंबई पोलीस दलात तब्बल २६ हजार पर्यंत शिपाई पदे रिक्त आहेत. त्यापैकी पोलीस विभागाने १० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला होता , मात्र ७०७६ पदांची भरती राबविली म्हणजे ७० टक्के पदांची भरती प्रक्रिया राबविली गेली . हि भरती प्रक्रिया १०० टक्के नसून त्यामध्ये अजूनही ३ हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत . तसेच त्यावेळी प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांची कागद पत्रे पडताळणी व पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात आले . परंतु त्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आली नसून त्यांची वयोमर्यादा संपत असल्याने त्यांना नियुक्तीची प्रतीक्षा लागली आहे. याबाबत आमदार महोदयांच्या वतीने सभागृहाला अवगत करून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री -देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले.

     

    तसेच वर्ष २०२२ व २०२३ मधील पोलीस भरतीतील अजूनही पदे रिक्त असल्याने मुंबई पोलीस दलावर खूप ताण निर्माण होत आहे. हा ताण कमी करण्यासाठी मुंबई पोलीस भरती २०२१ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचा निवड यादीत समावेश करून त्यांना संधी देण्यात यावी , जेणेकरून उमेदवारांना न्याय मिळेल व पोलीस दलावरील ताण कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे मुंबई पोलीस भरती २०२१ प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती कधी देणार ? व त्यांची पोलीस भरती कधी करणार ? असा प्रश्न आमदार महोदयांच्या वतीने सभागृहात उपस्थित करण्यात आला.

     

    यावर सभागृहासमक्ष उत्तर देतांना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की , ज्यांची निवड झाली आहे ,त्यांची वयोमर्यादा संपणार नाही , प्रशिक्षणाची क्षमता आपण वाढवत असून एक -एक बॅच आपण तयार करून प्रक्रिया पूर्ण करत आहोत . मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे प्रतीक्षा यादी एका वर्षाच्या वर राहत नसल्याने त्यांना घेता येत नाही . मात्र ज्यांची थेट निवड झाली त्यांना चिंता करण्याची गरज नसून त्यांना शंभर टक्के नोकरी मिळणार असल्याचे गृहमंत्री महोदयांनी सभागृहात स्पष्ट केले.

     

    तसेच मुंबई पोलीस भरती २०२१-२२ मधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे कागदपत्राची तपासणी झाली असल्याने त्यांचे वैद्यकीय पडताळणी करून पोलीस विभागात संधी देण्याच्या मागणीचे पत्र सुद्धा आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केले. यावर सर्व बाबीने पडताळणी व तपासणी करून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन उमुख्यमंत्रीमहोदयांच्या वतीने देण्यात आले .

  • पांदण रस्त्याचे खडीकरण करा – प्रीतम पाटणकर यांची मागणी

    पांदण रस्त्याचे खडीकरण करा – प्रीतम पाटणकर यांची मागणी

    News34 chandrapur

    विसापूर – दिनांक 15/12/2023 रोजी विसापूर गाव-मधील खूब वर्षां-पासून अस्तित्वात असलेल्या शेतकऱ्यांची समस्या म्हणजे शेतीला जाणारे पांदण रस्ते “शेतकरी हा आपले कष्टाचे पाणी करून धान्य पिकवत असतो व शेतात-मध्ये मजूर वर्गाला सर्व जास्त रोजगार सुद्धा देत असतो आणि शेतकऱ्यांचे शेतीवर संपूर्ण विसापूर गाव निर्भर आहे.

     

    गावामधील जर रोजगार मिळत असेल तर ते शेती मधून जास्त प्रमाणात मिळत आहेत परंतु आपल्या विसापूर गाव-मध्ये कित्येक वर्षां-पासून येण्या-जाण्यासाठी पांदन रस्ते झालेले नाही हे सुद्धा सत्य आहेत म्हणून या निवेदन मार्फत विसापूर गाव-मधील सर्व शेतकऱ्यांची व शेतामध्ये काम करणारे मजूर वर्गा कडून मागणी करण्यात येत आहेत की “महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी कायदा (मनरेगा) अंतर्गत सर्व पांदन रस्ते खडीकरण करून शेतकऱ्यांची कित्येक वर्ष पासून असलेले पांदण रस्त्याची समस्या दूर करण्यात यावे.  याबाबत पाटणकर याांनी विसापूर ग्रामपंचायत ला निवेदन दिले.

    सर्व पांदण रस्त्याची दुरुस्ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी कायदा(मनरेगा) अंतर्गत 5 हजार किलोमीटर या योजनेतून करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

    तसेच त्या-वेळ उपस्थित शेतकरी युवा नेता विसापूर आकाश भाऊ गिरडकर आणि बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस चंद्रपूर प्रितम पाटणकर विसापूर ग्रामपंचायत मध्ये होते.

  • केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल

    केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभे राहणार 10 हजार नवीन घरकुल

    News34 chandrapur

    नागपूर /चंद्रपूर : आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय योजनेतून दहा हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असून तसा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर झाला आहे. स्वतः पालकमंत्री श्री. मुनगंटीवार या प्रस्तावाचा पाठपुरावा करीत असून लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेतून चंद्रपुरात 10 हजार नवीन घरकुल उभे राहतील, असा विश्वास त्यांनी नागपुरात व्यक्त केला.

     

    महात्मा फूले नविनीकरण उर्जा व पायाभूत तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रित) आणि चंद्रपूर महानगर पालिका मिळून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरबांधणी प्रस्तावासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील हरिसिंग वनसभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महाप्रितचे संचालक पुरुषोत्तम जाधव, मुख्य लेखाधिकारी डी.सी.पाटील, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्राचे संचालक अशोक जोशी, वैज्ञानिक संजय बालमवार तर दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबईवरून प्रधान सचिव दीपक म्हैसेकर उपस्थित होते.

     

    चंद्रपूर महानगर पालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमधून खाजगी भागीदारीद्वारे घरांची निर्मिती या घटकांतर्गत घरकुल बांधणे प्रस्तावित आहे. यासाठी म्हाडाच्या अखत्यारीत नवीन चंद्रपूर येथे मौजा कोसारा, खुटाळा येथे जागा उपलब्ध आहे. या साईटवर घरकुल बांधण्याकरीता महाप्रित आणि चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्यात 12 एप्रिल 2023 रोजी सामंजस्य करार झालेला आहे.

     

    चंद्रपूर शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याच्या अनुषंगाने महाप्रीत व चंद्रपूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 10 हजार घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात जागा नसलेले भाडेकरू तथा नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सदर योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेता येणार आहे. याकरीता नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लक्ष 50 हजार रुपयांचे अनुदान तसेच बांधकाम कामगार म्हणून 2 लक्ष रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • सावली, सिंदेवाही- लोनवाही नगरांच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी मंजूर

    सावली, सिंदेवाही- लोनवाही नगरांच्या विकासासाठी दहा कोटींचा निधी मंजूर

    News34chandrapur

    ब्रह्मपुरी – ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही- लोनवाही व सावली या नगरांचा विकास साधने हेतू राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हातात परिश्रम घेत मागणी रेटून धरल्याने अखेर नगर विकास विभागाच्या वतीने दोन्ही शहरांना प्रत्येकी पाच कोटी असे दहा कोटी रुपये निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आली असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून सिंदेवाही – लोनवाही व सावली शहरांच्या विकासात भर पडणार आहे.

     

    ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात मोडणाऱ्या सावली व सिंदेवाही – लोनवाही या शहरांमध्ये लोक वस्त्यांचे विस्तारीकरण दिवसांगानिक वाढतच असून अनेक प्रभागात विविध विकास कामे प्रलंबित आहेत. या दोन्ही तालुकास्तरावरील शहरांमध्ये पूर्वी ग्रामपंचायत असल्याने अपुऱ्या निधी अभावी विकास कामे होऊ शकली नाही. मात्र शासनाने तालुकास्तरावरील शहरातील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये केल्याने नगर विकास विभागाचे विविध योजना मार्फत शहरांना निधी देण्यात येतो.

     

    यापैकीच एक असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सदर दोन्ही शहराला विकास कामाकरिता निधी प्राप्त व्हावा याकरिता राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासनास वेळोवेळी पाठपुरावा करून विकास निधी मंजूर करण्यास भाग पाडले. याचे फलित म्हणून सावली व सिंदेवाही – लोनवाही या दोन्ही नगरपंचायतींना प्रत्येकी पाच कोटी असे एकूण दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला असून लवकरच शहरातील विकास कामे सुरू होणार आहेत. मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी समस्या जाणून घेत आपल्या विकासाभिमुख शैलीतून क्षेत्र आमदार तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पर्यंत शासन स्तरावरून कोट्यावधींचा निधी क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिला हेही विशेष.

  • चंद्रपूर शहरात प्रदुषण नियंत्रणासाठी ‘एअर प्युरीफायर टॉवर’ उभारण्याची मागणी

    चंद्रपूर शहरात प्रदुषण नियंत्रणासाठी ‘एअर प्युरीफायर टॉवर’ उभारण्याची मागणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमीत्ताने इको-प्रो तर्फे सुरू असलेल्या एक दिवस एक आंदोलन शृघले अंतर्गत आज सातव्या दिवशी चंद्रपुरच्या प्रदुषणमुक्ती करीता तसेच सिटीपीएसचे कालबाहय प्रदुषीत संच क्रमांक 3 व 4 त्वरीत बंद करण्याची तसेच चंदीगडच्या धर्तीवर ‘एअर प्युरीफायर टॉवर’ शहरात उभारण्याच्या मागणीसह अन्य मागण्या शासनाकडे करीत ‘‘प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालय व अधिकारी यांना (एमपीसीबी) साकडं घाला सत्याग्रह’’ आंदोलन करण्यात आले.

     

    चंद्रपूर शहर राज्यातील सर्वाधिक प्रदुषीत शहराच्या यादीत वरच्या स्थानावर असल्याने, राज्याच्या विजेची गरज सोबतच खनिजांची गरज पुर्ण करून चंद्रपूरकरांच्या वाटयाला कायम प्रदुषण, आजार हेच मिळाले आहे. चंद्रपूरचे प्रदुषण कमी व्हावे म्हणुन वेळोवेळी अनेक आंदोलने, पाठपुरावा तसेच जनहित याचिकाच्या माध्यमाने अनेक संस्था-संघटना लढत असतात मात्र याकडे हवे तसे लक्ष शासनाच्या वतीने करण्यात येत असल्याचे दिसुन येत नाही. प्रदुषण नियंत्रणासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नोटीसा देणे, बॅक गॅरन्टी जप्त करणे या पलिकडे काही होताना दिसत नाही. यासाठी राज्यातील शहरा-शहरातील प्रदुषणाची तीव्रता बघता, बाधीत जनतेच्या हिताचा, आरोग्याचा विचार करता भविष्यात प्रदुषण विरोधात कार्यवाहीचे स्वरूप व अंमलबजावणी बाबत शासनाने वाढत्या प्रदुषणाविरोधात धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

     

    2006 पासुन चंद्रपूरच्या प्रदुषणाबाबत अनेक अॅक्शन प्लान आले मात्र अमलबंजावणी हवी तशी झालेली नाही. अलिकडे जिल्हातील व शहरातील नदयाचे जलप्रदुषणाची समस्या गंभीर आहे. नागरी सांडपाणी पासुन तर उदयोगीक प्रदष्ुाीत पाणी सर्रास नदयात प्रवाहीत केले जात आहे. तसेच जिल्हयातील तलावाची स्थिती सुध्दा गंभीर असुन जलप्रदुषण ठिकठिकाणी होत आहे. यासाठी सुध्दा कृती आराखडे आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थाची जवाबदारी आहे, नगर विकास विभागाची जवाबदारी आहे. मात्र याबाबत कृती होताना दिसत नाही. यापुर्वी इको-प्रो ने शहरातील प्रदुषणाविरोधात ‘अन्नत्याग सत्याग्रह’, धरणे आंदोलन, पदयात्रा तसेच जनहित याचीकाच्या माध्यमाने सिटीपीएस संच क्रमांक 1 व 2 साठी लढा दिलेला आहे. रेलवे मालधक्का प्रदुषण विरोधातही संघर्ष केलेला आहे. भविष्यात प्रदुषणाच्या मागण्यासंदर्भात इको-प्रो सत्याग्रह आंदोलनाच्या भुमीकेत असणार आहे.

     

    महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे चंद्रपूरकरास प्रदुषणाच्या त्रासापासुन मुक्त करण्यास थातुरमाथुर उपाययोजना करण्यापेक्षा आवश्यक व कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीकरीता व प्रदुषणमुक्तीच्या मागण्यासाठी आज इको-प्रो तर्फे प्रतिकात्मक आंदोलन करीत विविध मागण्याकरीता एमपीसीबीला ‘साकडं घाला सत्याग्रह’ करण्यात आले, येत्या काळात या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात न आल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.

     

    आज करण्यात आलेल्या एमपीसीबीला ‘साकडं घाला सत्याग्रहाच्या मागण्या मध्ये सिटीपीएस कालबाहय संच क्रमांक 3 व 4 तात्काळ बंद करण्यात यावे, सिटीपीएस संच क्रमांक 5, 6 व 7 सुध्दा जुने संच होणारे प्रदुषण नियत्रणात आणुन टप्प्या-टप्प्याने बंद करण्याचा कार्यक्रम जाहीर करणे, चंद्रपूर शहरात प्रदुषण नियंत्रणसाठी चंदीगडच्या धर्तीवर महानगरपालिकेकडुन प्रस्तावित ‘एअर प्युरीफायर टॉवर’ ला त्वरीत मंजुरी प्रदान करावी, वायु प्रदुषण व नदी प्रदुषण कृती आराखडयाची संबधीत विभागाकडुन त्वरीत अंमलबजावणी करणे, सिटीपीएस/वेकोली परिसरातील वाढलेली काटेरी झुडपे काढुन त्याठिकाणी सौर उर्जा प्रकल्प दोन्ही उदयोगाने सुरू करणे, चंद्रपूरात प्रदुषणाने बाधीत नागरीकांचे तपासण्या, उपचाराकरीता मोफत व प्रभावी योजना राबविणे, चंद्रपूर शहरात महानगरपालिकेने तसेच इतर प्रदुषीत नगर पालिका क्षेत्रात ‘हवा गुणवत्ता दर्शविणारी यंत्रणा’ उभारावी, महाराष्ट्र महानगरपालीका व नगर परिषद (सुधारित) कायदा 1994 मधिल कलम 67-अ नुसार ‘पर्यावरण सध्यस्थिती अहवाल’ त्वरीत तयार करावे, जिल्हा पर्यावरण समीती घोषीत करून नियमित सभा व कार्यान्वीत करणे आदी मागण्या शासनाकडे करण्यात आलेल्या आहेत.

     

    आज इको-प्रो तर्फे संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे नेतृत्वात करण्यात आलेल्या सत्याग्रह मध्ये नितीन रामटेके, धर्मेद्र लुनावत, ओमजी वर्मा, राजु काहीलकर, अब्दुल जावेद, सचिन धोतरे, प्रकाश निर्वाण, कुणाल देवगीरकर, प्रितेश जीवने, सुधीर देव, भारती शिंदे, चित्राक्ष धोतरे आदी सहभागी होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात नव्या दारु दुकानांना परवाना देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन करा – आमदार किशोर जोरगेवार

    चंद्रपूर जिल्ह्यात नव्या दारु दुकानांना परवाना देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन करा – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर/नागपूर – चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आल्या नंतर मोठ्या प्रमाणात दारु परवाणे वाटप करण्यात आले आहे. मात्र हे परवाणे वाटप करत असतांना काही ठिकाणी शासन नियमांचे उलंघन झाले आहे. या विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली आहे. त्यामुळे नव्या दारु दुकानांना परवाणा देत असताना शासन नियमांचे पालन करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.

     

    चंद्रपूरातील दारु बंदी उठविण्यात आली आहे. याला आता दोन वर्ष पुर्ण होत आले. चंद्रपूरात दारु बंदी असताना सर्रासरित्या अवैध दारु विक्री सुरु होती. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. गुंड प्रवृत्तीचे लोक अवैध दारुविक्रीच्या व्यवसायात गुंतल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे चंद्रपूर जिल्हातील दारुबंदी उठविण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली होती. याची दखल घेत महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्हाची दारु बंदी हटविली होती. त्यानंतर अनेक दारु दुकानांना परवाणा देण्यात आला. मात्र यात नियमांची पायमल्ली करण्यात आली असल्याचा आरोप झाला. या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलने झाली.

    दरम्यान आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, मागच्या सरकाने दारु बंदी उठविण्याचा चांगला निर्णय घेतला होता.

     

    दारुबंदी झाली तेव्हा 350 परवाने चंद्रपूर जिल्हात होते. दारुबंदी उठल्या नंतर अडिच वर्षात 733 परवाण्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी 75 मीटर पर्यंत शाळा नसावी, धार्मीक स्थळ नसावे ही अट असतांना सुध्दा याकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात नवे परवाणे देण्यात आले आहे. त्यामुळे या विरोधात अनेक आंदोलने झाली आहे. यात महिलांच्या भावना तिव्र आहेत. त्यामूळे दारु दुकानांना नव्याने परवाणा देत असतांना शासनाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे अशी मागणी यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

  • चंद्रपूर मनपाच्या नियमांना तिलांजली

    चंद्रपूर मनपाच्या नियमांना तिलांजली

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरातील बालाजी वाॅर्ड गोपालपुरी, आनंदनगरात मागील अनेक वर्षांपासून खुले असलेल्या सुमारे दोन एकर भूखंडांवर बेकायदेशीर लेआउट तयार करण्यात आला. त्यामध्ये नियमानुसार रस्ता व सार्वजनिक कामांसाठी ओपन स्पेस ठेवला नाही. त्यामुळे हा लेआउट रद्द करावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मंगळवारी (दि.१२) महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल यांच्याकडे तक्रारीतून केली आहे.

     

    गोपालपुरी, आनंदनगरातील ही जागा ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याला लागून आहे. त्यामुळे किल्ल्याच्या वैभवाला धोका निर्माण होऊ शकतो. या जागेत दरवर्षी इरई नदीच्या पुराचे पाणी शिरते. या जागेवर राऊत कुटुंबीय, तसेच इतर संबंधितांनी नुकतेच लेआउट तयार केले. १०० रुपयांच्या नोटरीवर प्लॉट विक्री सुरू केल्याने विकत घेणाऱ्या नागरिकांची फसवणूक होत आहे.

     

    या लेआउटमध्ये फक्त १८ फूट रुंद रस्त्यासाठी जागा सोडण्यात आली. नियमानुसार नाली, ओपन स्पेस आणि समाज मंदिरासाठी जागाच ठेवली नाही. बांधकामे उभी झाल्यास येणाऱ्या काळात तेथील नागरिकांची गैरसोय होणार असून, महानगरपालिकेचीही फसवणूक होणार आहे. त्यामुळे हे लेआउट रद्द करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी तक्रारीतून केली आहे.

  • विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध चंद्रपूर मनपाने केली पोलीसात तक्रार

    विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्याविरुद्ध चंद्रपूर मनपाने केली पोलीसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या स्वराज्य वक्ता अकादमीविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. २ कार्यालयाद्वारे चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    शहरातील गांधी चौक,मिलन चौक जयंत टॉकीज तसेच मनपा हद्दीतील शासकीय व खाजगी जागा, शहरातील पोस्ट / टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खांब, रस्त्याच्या कडेची झाडे इत्यादींवर प्रशिक्षण देण्यासंबंधी माहिती असलेली भिंतीपत्रके मनपाकडुन पूर्वपरवानगी न घेता लावली असल्याचे सहायक आयुक्त सचिन माकोडे यांना १२ डिसेंबर रोजी पाहणी दरम्यान आढळुन आले.

     

    संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने स्वराज्य वक्ता अकादमी, प्रशिक्षक समीर लेनगुळे यांच्यावर  महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत कलम ३ नुसार फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शासकीय निधीद्वारे शहर सुशोभीकरणाची कामे करण्यात आली आहेत,गांधी चौक हे शहराचे मुख्य ठिकाण असुन तेथे दीपस्तंभ उभारलेला आहे. त्या जागेवरच संबंधितांनी भिंतीपत्रके लावली त्यामुळे शासकीय निधीचेही नुकसान झाले.

     

    भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे.

  • पोलीस पाटील, संगणक चालकांच्या मागण्या मान्य करा

    पोलीस पाटील, संगणक चालकांच्या मागण्या मान्य करा

    News34 chandrapur

    नागपूर :- नागपूर अधिवेशनात अनेक मोर्चे येतात. सध्या २७ हजार ग्रामपंचायत संगणक चालक आले आहेत. त्यांची लहान मुलं आली आहेत. पोलीस पाटलांचा मोर्चा आहे. परंतु सरकारचे कोणीही प्रतिनिधी गेले नाहीत. या मोर्चातील प्रतिनिधींशी चर्चा करून सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

     

    नागपूर येथे संगणक चालक, पोलीस पाटील यांचा आलेला मोर्चा व मागण्याबद्दल माहिती देताना विधानसभेत श्री. वडेट्टीवार बोलत होते.

     

    श्री. वडेट्टीवार म्हणाले, सरकारने मोर्चाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली पाहिजे. ते सोलापूरहून आले आहेत. इतक्या थंडीत पोरांना घेऊन बसले आहेत. पोलिस पाटलांचा मोर्चा निघाला आहे. त्यांनी भेटायला वेळ मागितली आहे. त्यांच्या मानधनात, निवृत्ती वेतनात वाढ व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.

  • व्हीएमव्ही परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनमंत्र्यांनी दिले आदेश

    व्हीएमव्ही परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनमंत्र्यांनी दिले आदेश

    News34 chandrapur

    नागपूर : – अमरावती शहरी भागातील व्हीएमव्ही कॉलेज परिसरात मागील दोन महिन्यापासून बिबट्याचा संचार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये दहशत व भीती निर्माण झाली आहे. या बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्याचा मुद्दा अमरावतीच्या आमदार सौ . सुलभाताई खोडके यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात नुकताच उपस्थित केला दरम्यान या संदर्भात राज्याचे वन मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले . यांची तत्कळ दखल घेत अमरावती व्हीएमव्ही भागातील बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वन विभागाला निर्देशित केले आहे.

     

     

    अमरावती शहरी भागातील व्हीएमव्ही परिसरात मागील दोन महिन्यापासून बिबट्याचा संचार असून रहिवाशी भागातही बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. या संदर्भात आ.सौ . सुलभाताई खोडके यांनी मागील ८ ऑक्टोबर २०२३ रोजी स्थानिक भागात वन कर्मचाऱ्यां समवेत भेट देऊन बिबट्याला जेरबंद करण्याची सूचना केली . यावेळी बिबट्याचा शोध न लागण्याने नंतर दहा दिवसांनी पुन्हा मणिपूर लेआऊट भागात बिबट्याने उपद्रव घातला असल्याने एकच खळबळ उडाली असता आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी डीएफओ मिश्रा यांच्याशी संपर्क साधून बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू पथक तैनात करून प्रभावी व सुरक्षात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देखील केली.

     

    दोन महिन्यापासून बिबट्या पकडण्याबाबत वन विभागाने प्रभावी कार्यवाही केली नसल्याने तो बिबट्या व्हीएमव्ही परिसरातच तळ ठोकून असल्याने स्थानिक विद्यार्थी , नागरिक व महिला यांचे घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. रात्रीला बिबट्या व्हीएमव्ही परिसरात संचार करत असल्याने यापासून जीवितहानी उद्भभवल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी हिवाळी अधिवेशनात लावून धरत बिबट्याला जेरबंद करण्याबाबत वन विभागाला आदेशित करण्याची मागणी केली.

     

    तसेच राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देऊन अमरावती मधील बिबट्याला तत्काळ जेरबंद करण्यासाठी अमरावती वन विभागाला आदेश देण्यात यावे, सदर भागात ट्रॅप कॅमेरे लावून ट्रँग्युलायझर च्या साहाय्याने बिबट्याला अटकाव घालण्याची विनंतीपूर्वक मागणी केली, यावर नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित आदेश काढण्या संदर्भात निर्देशित केले असता अमरावती वन विभाग उपवनसंरक्षक कार्यालयाने याबाबत कार्यवाहीला घेऊन हालचाली सुरु केल्या आहेत.