महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
चंद्रपूर – युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर व राजूरा विधानसभा क्षेत्रात युवासेनेची मोठी फळी विक्रांत सहारे यांनी अवघ्या काही महिन्यात निर्माण केली, 2 जानेवारी ला सहारे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले, जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला कक्षातील नवजात मुलांना 50 बेबीकीट चे वितरण यावेळी करण्यात आले.
महाकाली मंदिर, वरोरा नाका चौकात रात्री च्या सुमारास कुडकूडणाऱ्या थंडीत रात्र घालविणाऱ्या 100 नागरिकांमध्ये ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख प्रमोद पाटील, पवन नगराळे, वसीम शेख, युवासेनेचे शहर प्रमुख शिवा वझरकर, शाहबाज शेख, विकास विरुटकर, सुस्मित गौरकार, बंटी कमटम, सिनाळा गावातील उपसरपंच सूरज शेंडे, अनिकेत चंदनखेडे, शुभम बेलके, निलेश पराते यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील ऐकार्जुना येथे कापूस उत्पादन संशोधन केंद्र असून येथे 23 प्रकारच्या कपाशीची लागवड केली जाते. असेच एक संशोधन केंद्र भाजीपालाकरीता असावे, असा विचार गत महिन्यात ऐकार्जुना येथील शास्त्रज्ञ शेतकरी संवाद कार्यक्रमात आला. त्यानुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एक महिन्यातच ही मागणी फळाला येऊन आज जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात भाजीपाला संशोधन केंद्र मान्यतेचा कागद हाती आला. ऐकार्जुना येथे 31 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र उभे राहणार असल्याचा आनंद आहे, अशा भावना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
चांदा क्लब ग्राऊंड येथे आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार, म.रा. खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, बांबू बोर्डाचे अध्यक्ष श्रीनिवास राव, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रिती हिरुळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, विनीता व्यास, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, नरेंद्र जिवतोडे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाला हा हैद्राबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा येथून येतो, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कापूस उत्पादन संशोधन केंद्राप्रमाणेच भाजीपाला संशोधन केंद्र जिल्ह्यात असावे, असा विचार गत महिन्यातच आला. त्यानुसार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली आणि एका क्षणात त्यांनी ऐकार्जुना येथे भाजीपाला संशोधन केंद्राला मान्यता दिली. त्यासाठी मी कृषीमंत्री श्री. मुंडे यांचा व्यक्तिश: आभारी आहे.
पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जगामध्ये कितीही तंत्रज्ञान विकसीत झाले तरी शेतमाल हा मातीतच पिकविला जातो. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आता तांत्रिक शेती, बांबु शेती, वनशेती, रानभाजी शेती असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. सरकार शेतक-यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून 1 रुपयांत पीक विमा देणारे महाराष्ट्र हे जगात एकमेव उदाहरण आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे जंगल क्षेत्र असलेल्या गावातील शेतक-यांना राज्य सरकारकडून 90 टक्के अनुदानावर कुंपन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय कृषी महोत्सव पाच दिवस चालणार असून यात पशुप्रदर्शनी, 6750 किग्रॅ खिचडीचा विक्रम, 43 इंचाची पुंगनुर गाय, नोंदणी केलेल्या शेतक-यांना लकी ड्रॉ द्वारे शेवटच्या दिवशी आकर्षक बक्षीसे, सांस्कृतिक कार्यक्रम हे विशेष आकर्षण आहे. राज्याचा वित्तमंत्री असतांना प्रत्येक जिल्ह्यात कृषी प्रदर्शनीसाठी 20 लक्ष रुपये देण्याचा निर्णय सर्वप्रथम आपणच घेतला, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अग्रेसर असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात शेतक-यांना पी.एम. किसान योजनेंतर्गत 6 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला जोड म्हणून राज्य सरकारनेसुध्दा नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतक-यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त 6 हजार रुपये देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील 97 लक्ष शेतक-यांपैकी 85 लक्ष शेतक-यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले. उर्वरीत शेतक-यांच्या खात्यात लवकरच हा हप्ता जमा केला जाणार आहे.
पुढे ते म्हणाले, आज जग बदलले आहे. त्यामुळे शेतक-यांनी पारंपरिक शेतीऐवजी 21 व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून स्वीकारावे. स्मार्ट प्रकल्प, स्टार्टअप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आदींमधून शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतक-यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी एक महिन्याच्या आत राज्य सरकारच्या कृषी विभागाने मोठ्या कंपन्यांसोबत करार केला आहे. सोबतच पेरलेल्या आणि उगविलेल्या मालाला भाव देण्याचा अंदाज कृषी विभाग देणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील 1 कोटी 70 लक्ष शेतक-यांनी सहभाग नोंदविला असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी, बचत गटाच्या महिला, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आमदार किशोर जोरगेवार आदींनी कृषी महोत्सवातील विविध स्टॉलची पाहणी केली.
जिल्ह्यात दोन मधाचे गाव: चंद्रपूर जिल्हा वाघ, साग, चिमूर क्रांती, कोळसा, वन यासाठी प्रसिध्द आहे. आता पिर्ली आणि मामला या दोन गावांची मधाचे गाव म्हणून निवड झाल्यामुळे चंद्रपूर जिल्हा हनी क्रांतीचा महत्वाचा भाग होईल.
नोंदणी करणा-या शेतक-यांनाच धानाचा बोनस : चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. जिल्ह्यात 1 लक्ष 84 हजार हेक्टरवर धानाची शेती केली जाते. राज्य सरकारने धानाला 20 हजार रुपये प्रति हेक्टर बोनस जाहीर केला आहे. मात्र नोंदणी केलेल्या शेतक-यांनाच या बोनसचा लाभ मिळणार आहे.
फर्निचर क्लस्टरकरीता 48 कोटी रुपये मंजूर : एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर आता एफ. आय.डी.सी. ची निर्मिती होणार असून लाकडावर कोरीव काम करणा-यांसाठी 48 कोटी रुपये खर्च करून फर्निचर क्लस्टर तयार करण्यात येत आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ: यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बळीराजा समृध्दी मार्ग शेतपाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ, मधाचे गाव म्हणून पिर्ली (ता. भद्रावती) चे उद्घाटन, मिशन जयकिसान योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
चंद्रपूर – चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी व 2 घरफोडी प्रकरणातील एकूण 13 लाखांचा जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना पोलीस अधीक्षक परदेशी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
जानेवारी 2023 ला महाकाली कॉलरी परिसरातील चंदा वाघाडे व ऑक्टोम्बर 2023 ला जयराज नगर येथील वैभव सिंग यांच्या घरी अज्ञाताने घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण 9 लाख 3 हजार रुपयांचा माल लांबविला होता.
तसेच वर्ष 2023 मध्ये रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोबाईल मिसिंगच्या अनेक घटना घडल्या होत्या, रामनगर पोलिसांच्या पथकाने सदर मोबाईल मिळावे यासाठी अथक प्रयत्न करीत मोबाईलचा शोध घेत झारखंड, छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश व गुजरात येथून 50 मोबाईलचा शोध लावला.
आज 3 जानेवारीला पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांच्या हस्ते घरफोडी गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व मोबाईल फिर्यादी यांना वाटप करण्यात आले.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे, पोलीस निरीक्षक रोशन यादव, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक सामलवार, ठाकरे आदि ची उपस्थिती होती.
चंद्रपूर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आयोजन समिती, चंद्रपूर, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले महिला मंडळ, नगिनाबाग, चंद्रपूर, नगिनाबाग माळी समाज युवा मंच, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीआई फुले जयंती सोहळा व प्रबोधन मेळावा दि. १ ते ३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतीज्योती सावित्रीआई फुले चौक पटांगण, सवारी बंगला, नागिनबाग, चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला.
यानिमित्त चंद्रपूर शहरातून जटपुरा गेट ते गांधी चौक, गांधी चौक ते नगीना बाग इथपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत महिला, पुरुष, विद्यार्थी, शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रेत शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघाली.
शोभायात्रेनंतर सवारी बंगला येथे प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, ओबीसी नेते, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा २०२४ निवडणुकीतील बहुजनांचे प्रतिनिधी राजेश बेले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगीनाबाग सवारी बंगला येथे असलेल्या फुले दांपत्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राजेश बेले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचे स्मरण केले. त्यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले या एक महान क्रांतिकारी आणि समाजसुधारक होत्या. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि समाजात त्यांचे स्थान उंचावण्यासाठी मोलाचे कार्य केले.
बेले म्हणाले की, आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा स्मरण करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प करावा. आपण त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, असेही ते म्हणाले.
या मेळाव्यात बोलतांना शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी संस्थेचे कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर :-भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी श्री संजय जी पवार चंद्रपूर यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यास हरकत नाही परंतु ओबीसी आरक्षणातून देण्यात येऊ नये. असे निवेदन देण्यात आले.
या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष योगिता धनेवार, अभिलाषा मैंदळकर, प्रीती लखदिवे, मीनाक्षी अलोने, कांता दखणे, डॉ. नंदकिशोर मैंदळकर, बबन धानेवार, निकेश पेटकर, प्रदीप गोविंदवार,मोहन जिवतोडे,आदी समाज बांधव उपस्थित होते. इतर मागास वर्गात एकूण 346 जाती आहेत त्यात 37 मुस्लिम जाती पण आहेत. राज्यात एकूण ओबीसींची संख्या 27% आहे मात्र आरक्षण 19% देण्यात येत आहे.
ओबीसींना जाती-गणनेनुसार 27% आरक्षण देण्यात यावे हे अपेक्षित होते. त्यात मराठा समाजाचा १० टक्के लोकसंख्येचा भार का सहन करायचा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास मराठा समाजातील १० टक्के लोकसंख्येचा भार ओबीसी आरक्षणावर पडेल व ओबीसी वर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आपल्या जीवाची परवाना करता आमरण उपोषण सुरू केले ओबीसींना जागविण्याकरीता आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोतच परंतु ओबीसी नेतेच स्वतःच्या स्वार्थाकरिता त्यांना विसरलेले दिसतात.
कुठे पोहोचले मनोज जरांगे पाटील, कुठे आहेत रवींद्र टोंगे पाटील. (त्यांनी आपले प्राण पणाला लावले होते सांगा कोणासाठी लढायचे)हीच ओबीसींची खरी समस्या आहे. न्यायमूर्ती खत्री आयोग व न्यायमूर्ती बापट आयोगाने आरक्षण नाकारले होतेच. तेव्हा सदर आयोगाचाही विचार होणे गरजेचे आहे. आम्ही मराठा समाजास आरक्षण देण्याच्या विरोधात नाही. त्यांना आरक्षण शासनाने खुशाल द्यावे परंतु ओबीसीच्या कोट्याला न हात लावता आरक्षण देण्यात यावे.
चंद्रपूर – जिल्ह्यातील अपघातांच्या घटनेवर नियंत्रण यावे यासाठी वाहतूक शाखा शर्थीचे प्रयत्न करीत आहे, विशेष म्हणजे दररोज विविध मोहीम राबवित वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा वाहतूक नियंत्रक शाखा करीत आहे.
आज 2 जानेवारीला पोलीस स्थापना दिनानिमित्त चंद्रपूर जिल्हा वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परिवहन विभाग व लायन्स क्लब च्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियंत्रक शाखा कार्यालयासमोर वाहन चालकांना वाहतुकीच्या कायद्याबाबत जनजागृती करीत त्यांना पुष्प देण्यात आले.
दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट, चारचाकी वाहन चालकांना सीट बेल्ट, रिफ्लेक्टर बाबतीत माहिती देत त्यांना गुलाब पुष्प देण्यात आले.
ज्या वाहनांवर रिफ्लेक्टर नाही त्या वाहनांवर रिफ्लेक्टर सुद्धा लावण्यात आले, चंद्रपूर वाहतूक नियंत्रक शाखेच्या या अनोख्या उपक्रमाची सध्या सर्वत्र होत आहे.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रोशन यादव, प्रवीण पाटील सह उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी, लायन्स क्लब चे पदाधिकारी व वाहतूक शाखेचे संदीप जाधव हे उपस्थित होते.
चंद्रपूर – मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या संपामुळे अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहे, हिट अँड रन कायदा केंद्र सरकारने परत घ्यावा अशी वाहन चालकांची मागणी आहे, यासाठी संपूर्ण देशात वाहन चालक संघटनेचे आंदोलन सुरू आहे.
संप सुरू झाल्याने पेट्रोल मिळणार नाही या अफवेने चंद्रपुरात नागरिकांनी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली, यामुळे अनेक पेट्रोल पंपावर तुटवडा निर्माण झाला, यासंदर्भात 2 जानेवारीला पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, परिवहन विभाग व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करीत परिस्थिती चा आढावा घेतला, जिल्ह्यात कुठे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होणार नाही याची खात्री आपण करावी असे निर्देश विविध विभागातील अधिकाऱ्यांना दिले.
पोलीस अधीक्षक परदेशी यांनी यावेळी जनतेला आवाहन केले की आपण अफवांवर विश्वास ठेवू नका, जर कुणी कायदा मोडत अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न करणार तर पोलीस विभाग त्यावर कठोर कारवाई करेल.
जड वाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहन चालकासाठी अन्यायकारक ठरणारा सुधारित हिट अँड रन कायद्या तत्काळ मागे घेण्यात यावा. या मागणीसाठी चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
नुकताच संसदेत जुन्या हिट अँड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारित करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून वाहन चालकांसाठी अन्यायकारक आहे. यात करावसाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ववस्त होणार आहे. अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात. मात्र या अपघातात वाहन चालकांनाच जबाबदार धरले जातात. अनेकदा अपघाता नंतर वाहन चालकांना गंभीर मारहाण केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जख्मीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलिस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.
त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दोन जानेवारीला चिमूर क्रांती जिल्हा वाहन चालक संघटनेच्या वतीने चिमूर शहरातून मोर्चा काढून तहसील कार्यालय समोर चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे
चंद्रपूर : जडवाहनचालकांसाठी तसेच मोठ्या वाहनचालकांसाठी अन्याय कारक ठरणारा सुधारित हिट ॲण्ड रन कायदा तत्काळ मागे घेण्यात यावा या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार २ जानेवारी रोजी बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन आले.
नुकताच संसदेत जुन्या हिट ॲण्ड रन कायद्यात बदल करून सुधारित कायदा पारीत करण्यात आला. या कायद्यात कठोर तरतुदी करण्यात आल्या असून, वाहनचालकांसाठी अन्यायकारक आहे. यात कारावासाचा कालावधी आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे.अनेकदा अपघात हे आकस्मिक होतात. मात्र, या अपघातात वाहनचालकांनाच जबाबदार धरले जातात.
अनेकदा अपघातानंतर वाहनचालकांना गंभीर मारहाणही केली जाते. त्यामुळे अपघातानंतर वाहनचालक जखमीला मदत करण्यापेक्षा पळ काढून पोलीस ठाण्यात आश्रय घेतात. परंतु, नवीन कायदा हा वाहनचालकांसाठी अन्यायकारक ठरणार आहे.त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मंगळवार २ जानेवारीला बंगाली कॅम्प चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
सकाळी 11 वाजता बंगाली कॅम्प चौकात असंख्य वाहन चालक संघटनेचे सदस्य व पदाधिकारी एकत्र आले, त्यांनतर मूल मार्गे चंद्रपुरात येणाऱ्या वाहनांची वाहतूक वाहन चालकांनी थांबवित आंदोलन सुरू केले, यावेळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता, जोपर्यंत हा काळा कायदा परत घेणार नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण देशात असेच आंदोलन करणार असा इशारा वाहन चालकांनी यावेळी दिला.
चंद्रपूर – नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला कसलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चंद्रपूर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता, विशेष म्हणजे कुडकूडणाऱ्या थंडीत बंदोबस्तात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक परदेशी यांनी रात्री त्यांची भेट घेतली.
31 डिसेंम्बरला मद्यपी वाहनचालक बेजबाबदार पणे वाहने चालवून इतरांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचे काम करतात, अश्या अनेक घटना जिल्ह्यात घडल्या होत्या, मात्र तशी पुनरावृत्ती 31 डिसेंम्बरला होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज होते.
चंद्रपुरात पहाटे पर्यंत पोलीस कर्तव्यावर होते, चंद्रपुरात तब्बल 195 मद्यपी वर कारवाई करण्यात आली, यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी व अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी विविध ठिकाणी भेट देत पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला.
नवीन वर्षाचे स्वागत नागरिकांनी शांततेत केल्याने पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सर्वांचे आभार मानले.