महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
चंद्रपूर – चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील तब्बल 65 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्याचे आदेश जाहीर केले आहे.
यामध्ये पोलीस निरीक्षक 2, सहायक पोलिस निरीक्षक 28 व पोलीस उपनिरीक्षक 35 दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, रामनगर पोलीस स्टेशन व दुर्गापूर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांनी पोलीस स्टेशनमध्ये अनुभवी महिला पोलीस निरीक्षकाची वर्णी लागली आहे.
दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदाचं महिला पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत राम नगर गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांची स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर मध्ये बदली करण्यात आली आहे.
16 जानेवारीला पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी सदर आदेश जारी केले आहे.
मुंबई – श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमापूर्वी राज्यात विविध ठिकाणी भाजप तर्फे मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवित आहे.
16 जानेवारीला मुंबई येथील प्रसिद्ध मुंबा देवी मंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मंदिरात स्वच्छता अभियान राबविले, यावेळी फडणवीस यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधला असता पंतप्रधान मोदी यांनी जे आवाहन केलं त्यानुसार आपण आपली श्रद्धास्थान स्वच्छ करायला हवे, श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पूर्वी राज्यातील सर्व मंदिरे स्वच्छ असावी.
सध्या राज्यात सर्वच ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहे, ज्यांनी राम मंदिर व्हावं यासाठी आंदोलन केले त्यांच्यासाठी 22 जानेवारी हा दिवस दिवाळी सारखा सण आहे, मात्र ज्यांनी आंदोलनात साधा सहभाग सुद्धा घेतला नाही ते वारंवार टीका करीत आहे, माझं एकचं सांगणे आहे की उबाठा सेने ने हिंदुचा अपमान करणे थांबवावे.
चंद्रपूर – आम आदमी पार्टी महाराष्ट्रच्या वतीने विस्तारित चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. एकूण 96 नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर यांच्या आदेशानुसार आणि जिल्ह्याचे नेते सुनील मुसळे यांच्या मार्गदर्शनात ही निवड जाहीर करण्यात आली आहे.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष, महासचिव, संघटन मंत्री अशा विविध पदांवर निवड करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गडलेवार, सुरज ठाकरे,नावेद खान, मनोहर पवार, सुरज शहा, महासचिव पदी संतोष दोरखंडे व प्रणित साहारे, संघटन मंत्री पदी योगेश मुरहेकर, भीवराज सोनी, शंकर सरदार अरोरा, डॉ. अजय पिसे यांचा समावेश आहे.
या शिवाय अमित बोरकर संघटन सहमंत्री, तर सह-सचिवपदी प्रा. किशोर दहेकर , प्रा. प्रमोद बुचुंडे श्रीकांत मुन, सोनल पाटील, चंदू माडुरवार, डॉ. अनिल वगलवार, सोशल मीडिया संयोजक राजेश चेटगुलवार, सोशल मिडिया सह-संयोजक क्रिश कपूर, मीडिया संयोजकपदी देवनाथ गंडाटे यांचा समावेश आहे.
या शिवाय विविध आघाडीत ऍड. प्रतिक विराणी प्रवक्ता, ज्योती बावरे महिला आघाडी (प्रभारी) , राजू कुडे युवा आघाडी, ऍड. किशोर पुसलवार लिगल सेल, दिपक बेरशेट्टीवार शेतकरी आघाडी, ऋतिक पेंदोर अनुसूचित जमाती आघाडी, नासिर शेख अल्पसंख्यांक आघाडी, शंकर धुमाळे रिक्षा संघटना, मधुकर साखरकर सहकार आघाडी, सुरज ठाकरे कामगार आघाडी, महेंद्र धुमणे वाहतूक आघाडी, प्रा. उदय मोहीतकर शिक्षक आघाडी, ऍड राजेश विराणी व्यापारी आघाडी, डॉ सलीम तुकडी डॉक्टर्स आघाडी यांचा समावेश आहे.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाची विस्तार कामगिरी आणखी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले, “आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्ह्यात मजबूत होत आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही पक्षाची कामगिरी आणखी वाढवू. आम आदमी पार्टीची विचारसरणी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
चंद्रपूर- शहरात सकाळी 8 वाजता 29 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली, पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ जमनजट्टी परिसरात जात पंचनामा केला.
शहरातील पठाणपुरा गेटबाहेरील जमनजट्टी परिसरात महाकाली मंदिर जवळ राहणारा 29 वर्षीय दानिश इंतेजार लवंगर याचा मृतदेह असल्याची पोलिसांना ओळख पटली.
सुनसान ठिकाणी मृतदेह आढळल्याने त्याची कुणी हत्या तर केली नाही याबाबत अनेक तर्कवितर्क पुढे आले, दानिश च्या कुटुंबानी आमच्या मुलाची हत्या करण्यात आली असा आरोप लावला अशी माहिती पुढे येत आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविला आहे, त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण पुढे येणार.
याबाबत शहर पोलिसांनी अधिक माहिती दिली की सदर युवकाचा मृत्यू हा अति दारू सेवनाने झाला असावा असा अंदाज आहे, त्याच्या शरीरावर कसल्याही खुणा आढळून आल्या नाही, शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
चंद्रपूर : चंद्रपुरात पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. आनंद विठ्ठल वासाडे (४३) रा. भानापेठ वॉर्ड चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.
मकरसंक्रांतीला पतंगबाजीचा उत्साह सर्वत्र दिसून येतो. अनेकजण पंतग उडविताना दिसतात. पतंग तोडण्यासाठी पेच लावण्याची स्पर्धा बच्चेकंपनी आणि युवकांमध्ये दिसते. पतंग कटल्यानंतर ती पतंग लुटण्यासाठी बच्चेकंपनी पतंगीच्या मागे धावताना दिसतात. तर पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजानेही अनेकांचा गळा कापल्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे. पोलिसांकडूनही विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे यावर्षी नायलॉन मांजा बाजारात दिसत नसला तरी, पतंग उडविण्याचा जोश कायम आहे. मात्र, हाच जोश अनेकदा अंगलट येत असल्याची चित्र आहे.
रविवारी भानापेठ येथील आनंद विठ्ठल वासाडे हे घराच्या स्लॅबवर गेले. याचवेळी एक पतंग कटलेली त्यांना दिसली. ही पतंग पकडण्यासाठी आनंद वासाडे गेले. मात्र, स्लॅबवरून तोल गेल्याने ते खाली पडले. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. बेशुद्ध झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ऋषीदेव आत्माराम वासाडे यांनी या प्रकरणाची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली.
तक्रारीवरून मर्ग दाखल करण्यात आला आहे. शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत आणि पोलीस उपनिरीक्षक मानकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
चंद्रपूर – मागिल काही दिवसांपासून मिडिया मध्ये रामदेव बाबा यांची एक क्लिप व्हायरल होत आहे, ज्या मध्ये ते स्वतः ला अग्निहोत्री ब्राह्मण म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेतांना, ओबीसी समाजाची ऐसी तैसी उच्चारुण ओबीसी समाजाचा अपमान करीत असल्याचे दिसत आहे. या त्यांच्या कृत्याला अनुसरून राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालया समोर रामदेवबाबा यांच्या विरोधात 15 जानेवारीला निदर्शने तसे निषेधाचे आंदोलन करण्यात आले.
ओबीसी समाजाचा अपमान केल्याने रामदेवबाबा यांना अटक करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली आहे, बाबाची दुकानदारी या देशातील ६५% ओबीसी समाजाच्या खरेदी विक्री करून चालत आहे, याचे भान या भांडवलदारी बाबाने राखावयास पाहिजे, समाजामध्ये जाणुनबुजून सामाजिक गतिरोध निर्माण करुन ओबीसी समाजाविषयी अपशब्द बोलणे टाळले पाहिजे, अन्यथा यांच्या दुकानासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आंदोलन करेल असे सुध्दा आंदोलन दरम्यान सांगण्यात आले. १५ दिवसाचे आत माफी न मागितल्यास आंदोलन उग्र करण्यात येईल.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, ओबीसी योध्दा विजय बलकी, प्रेमानंद जोगी, गणेश आवारी, डॉ संजय घाटे, कर्मचारी संघटनेचे देवराव दिवसे, प्रदीप पावडे, रजनी मोरे, अजय बलकी, रोशन पचारे, गोविंदा उपरे, विलास भगत, रंगराव पवार, पवन अगदारी, नागेश बोडे, अतुल मोहितकर,नंदू टोंगे, सुरेश विधाते,रणजित पिंपलशेडे, तुळशीराम देरकर, संतोष बांदूरकर ,दिनेश भोंगडे, भास्कर सोनेकर लखन हिकरे इ. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सनफ्लेग आयर्न अँड स्टील कंपनीच्या बेलगांव अंडरग्राऊंड कोळसा खाणीमुळे घातक रासायनिक जल प्रदूषण आणि वायु प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला असून, कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी आणि कोळसा खाण तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बेलगांव अंडरग्राऊंड कोळसा खाणी प्रकल्पामुळे घातक रासायनिक जल प्रदूषण आणि वायु प्रदूषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील मानवी, जलीय, वन्य आणि पाळीव प्राण्यांवर धोका निर्माण झाला आहे.
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वा. बेले यांनी या प्रकरणी विभागीय आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात बेले यांनी म्हटले आहे की, या प्रकल्पामुळे खाणीतील घातक रासायनिक द्रव्य नदी, नाले आणि शेतजमिनीत सोडले जात आहे. यामुळे परिसरातील पाणी प्रदूषित झाले आहे. या प्रदूषित पाण्यामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच, या प्रकल्पामुळे होणाऱ्या ब्लास्टींगमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे.
या खाणीतून निघणारा कोळसा देखील वायु प्रदूषण करत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना दमा, हृदयविकार, स्कीन विकार, डोळयांचे आजार, टी.बी., मेंदुचे आजार, नवजात शिशु व गर्भवती महिला यांना प्रदुषणाचा आजार होत आहे.
कोळसा खाणीतुन निघणा-या रासायनिक द्रव्यामुळे संपूर्ण नदी नाले प्रदुषीत झाले आहे. कोळसा खाणीतुन निघणारा रासायनिक द्रव्यामुळे कोळसा खाणीला लागून असलेल्या संपूर्ण शेत जमीन प्रदुषीत झाली आहे. कोळसा खाणीतुन निघणा-या कोळसामुळे घातक वायु प्रदुषण होत आहे. कोळसा खाणीतुन निघणा-या कोळसा रेल्वे साईडींगमुळे घातक वायु प्रदुषण होत आहे. कोळसा खाणीतुन होणा-या कोळसा वाहतुकीमुळे घातक वायु प्रदुषण व रस्त्याचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
बेले यांनी या निवेदनात मागणी केली आहे की, या प्रकल्पामुळे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करून या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी. तसेच, या प्रकल्पाला तात्काळ बंद करण्यात यावे.
या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर – वर्ष 2023 या सरत्या वर्षात तब्बल 11 वाघाचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला होता, मात्र या नव्या वर्षात वाघाचा पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प चंद्रपूर बफर क्षेत्रात बोर्डा येथे T-51 हा नर वाघ वन कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान मृत अवस्थेत आढळला, सदर वाघांचे सर्व अवयव शाबूत आहे.
याबाबत वन कर्मचाऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली असता वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, परिसर व वाघाच्या मृतदेहाची पाहणी केली असता वाघाच्या चेहऱ्यावर इतर वाघाने हल्ला केल्या असल्याच्या खुणा व घटनास्थळावरील परिस्थिती नुसार अंदाज वर्तविण्यात आला.
सदर वाघांचे वय हे 12 वर्षे आहे, यावेळी सहायक वनसंरक्षक संकेत वाठोरे, NTCA प्रतिनिधी बंडू धोत्रे, PCCF प्रतिनिधी मुकेश भांदकंकर यांच्या समक्ष पाहणी करीत पंचनामा करण्यात आला.
पुढील कार्यवाही साठी TTC चंद्रपूर येथे शवविच्छेदन करीत आवश्यक ते नमुने घेऊन वाघाला दहन करण्यात आले.
चंद्रपूर : श्रीरामजन्मभूमी स्थळी उभारलेल्या भव्य दिव्य मंदिरात श्री रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी पवित्र अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. संपूर्ण विश्व या ऐतिहासिक क्षणाची वाट बघत असताना चंद्रपूर शहर आणि जिल्हादेखील तयारीला लागला असून 20 ते 22 जानेवारी 2024 या तीन दिवसांत भरगच्च आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांद्वारे चंद्रपूरकर रामभक्त नागरिक प्रभू श्रीरामाची आराधना करणार आहेत; विशेष म्हणजे यानिमित्त 20 जानेवारी रोजी एक मोठा विश्वविक्रम चंद्रपुरात नोंदविला जाणार असून “गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये याची नोंद होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्याचे वन सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री व पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
घनदाट आणि वैभवशाली वनसंपदा, सर्वाधिक वाघ आणि विपुल खनिज संपत्ती असलेला चंद्रपूर जिल्हा सतत स्वतःचे वेगळेपण जोपासून आहे; श्रीराम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या कोट्यवधी कारसेवकांच्या व रामभक्तांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिराशी चंद्रपूरचे भावनिक नाते जोडले गेले आहे. या मंदिराच्या गर्भगृहाकरीता लागलेले काष्ठ (सागवान) चंद्रपूर-गडचिरोली च्या वन क्षेत्रातून गेले आहे. 29 मार्च 2023 रोजी सुमारे 3000 क्यूबिक फूट काष्ठ भव्य शोभायात्रेसह अयोध्येकडे रवाना झाले; यासाठी चंद्रपूरची जनता खरंच भाग्यवान आहे, याच पार्श्वभूमीवर राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी आम्ही काही तरी आगळी वेगळी व विक्रमी सेवा देण्याचा संकल्प केला असून चांदा क्लब ग्राउंड यासाठी सज्ज करण्यात येत असल्याची माहीती पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, २२ जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्री राम जन्मभूमीवर साकार झालेल्या भव्य राममंदिरात श्री रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होताना प्रभू श्रीरामाची ही महापूजा संपूर्ण जग बघणार आहे ; याच निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्याला सुद्धा जगाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे.
दिवाळी उत्सवात आपण ज्या मातीच्या पणत्यांनी घरदारं उजळून टाकतो, त्याचं हजारो पणत्यांनी, चंद्रपूरमध्ये चांदा क्लब ग्राउंडवर हजारो रामभक्त नागरिक एकत्र येऊन जगातले सर्वात मोठे “वाक्य” तयार करणार आहेत.
रामभक्तांच्या साक्षीने रामरायाची अयोध्येत प्रतिष्ठापना होणार आहे; तो सुवर्णक्षण अगोदरपासूनच वाजतगाजत साजरा करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो रामभक्त 20 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता चांदा मैदानावर शिस्तबद्ध रीतीने अंथरलेल्या हजारो पणत्यांच्या सहाय्याने “सियावर रामचंद्र की जय “हा अकरा अक्षरी मंत्र लिहिणार आहेत; हजारो पणत्यांनी सजवलेले हे भव्यदिव्य रामनाम आकाशातून अविस्मरणीय दिसणार आहे.
चंद्रपूर येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाने या आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या अतिविशाल उपक्रमाची गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्सने नोंद घ्यावी अशी तयारी सुरू आहे.
गिनिसने हा “ऑफिशियल अटेम्प्ट” करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे परीक्षण करण्यास २० जानेवारी रोजी सायंकाळी चंद्रपूर येथे गिनिस रेकॉर्ड ची टीम प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
20 जानेवारीला, गिनीसच्या जवळपास दोनशे अवघड नियमांची पूर्तता करण्यात जर हा उपक्रम यशस्वी ठरला तर या भव्यदिव्य उपक्रमाची नोंद १८० हुन अधिक देशांत कार्यरत असणाऱ्या गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये होईल, भारताच्या नावावर अजून एक जागतिक विश्वविक्रम नोंदवला जाईल आणि रामपणत्यांचा हा प्रकाश आणि रामनामाचा जयघोष जगभरात मानाने आणि अभिमानाने दुमदुमेल असा विश्वास ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाकडून 21 आणि 22 ला आकर्षक कार्यक्रम
सुप्रसिद्द अभिनेता पुनित इस्सर (महाभारतातील दुर्योधन) यांच्या रामायण या नाटकाचा प्रयोग दिनांक 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. हे नाटक अति भव्य स्वरूपाचे असून यामध्ये 50 पेक्षा जास्त कलाकार काम करत आहेत. रामायणातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित हे नाटक आहे. मुख्यतः राम आणि रावण यांच्यामधील संवाद व संघर्ष यामध्ये ठळकपणे दिसून येतो.
दिनांक 22 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणात येणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सुभाष नकाशे हे दीडशे ते 200 कलाकारांना घेऊन रामायण संबंधित सादरीकरणे करणार आहेत. यामध्ये नृत्य, नाट्य, गीत गायन, वादन यांचा समावेशt असणार आहे. गदिमा व बाबूजी यांच्या अविष्कारातून साकार झालेल्या गीत रामायण मधील काही गाणी व त्यावर आधारित सादरीकरणे ही यावेळेस अनुभवता येणार आहे. प्रभू रामाशी संदर्भातील गाणी आणि गीत रामायणातील काही महत्त्वाची गीते घेवून व रामायणातील काही प्रसंगावर आधारित प्रसंग सादरीकरण होणार आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात राम जन्म अर्थात पाळणा गीताने होईल तर शेवट राम अयोध्यात परतल्यानंतर झालेला जल्लोष आणि राज्याभिषेक दाखवण्यात येईल.
याच कार्यक्रमांमध्ये अनुराधा पॉल या विख्यात महिला तबलावादक व त्यांचा चमू रामायणातील काही प्रसंगावर गीत सादरीकरण करणार आहेत.
कार्यक्रमाची सांगता *जिल्हा व महानगर भाजपाच्या वतीने* २२ जानेवारी रोजी *”फायर शो”* ने होणार असून या सर्व कार्यक्रमात चंद्रपूरच्या नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
7 जटायू ताडोबात मुक्त करणार !
श्रीराम जन्मभूमी येथे अयोध्येत रामरायांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे या पार्श्वभूमीवर रामायणात उल्लेख असलेल्या जटायू अर्थात गिधाड संवर्धनाच्या दृष्टीने ताडोबा जंगलातील झरी परिसरात जटायु मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. 21 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता झरी येथे हा कार्यक्रम होईल.
चंद्रपूर : चंद्रपूर हे एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होणार होती. हा प्रश्न निकाली काढण्यात यावा. या मागणीसाठी भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी १ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिले होते परंतु त्यावर काही तोडगा न निघाल्याने आज दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे. जडवाहतूक शहरातून होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे अनेकांचा जीव सुद्धा गमावला गेला आहे. अनेकांना दुखापत सुद्धा झाली आहे. ही रहदारी बायपास मार्गे झाल्यास शहरातून वाहतूक करताना इतरांना अडचण जाणार नाही. चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.
बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल. चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजय बल्की, बाजार समितीचे संचालक अजय बलकी, पंचायत समिती चे माजी सभापती रोशन पाचारे, ओबिसी नेते सचिन राजुरकर, बल्लारपूर तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, हासिम कासिम खान, साखरवाहीचे सरपच नागेश बोंडे, प्रेमानंद जोगी, आदिवासी नेते कृष्णाजी मासराम, पंचायत समिती माजी उपसभापती मनोज आत्राम, बाजार समितीचे संचालक गणेश आवारी, पवन अगदारी, किशोर वरारकर, मुन्ना साव, भटालीचे सरपंच किसन उपरे, रंगराव पवार, धंनजय राजुरकर, राहुल शेंडे, ईश्वर आखरे, हितेश लोंढे, साचीन शेरकी, रोशन रामटेके, विवेक खुटेमाटे, नंदू टोंगे, जगन्नाथ चटप, जावेद कुरेशी, राजू कांबळे, निळकंठराव बल्की, सिद्धार्थ कवाडे, लक्ष्मण मांढरे, अझहर खान, वैभव शेंडे, अतुल मोहित्कर, आकाश जुंघरे, पवन चकंनापुरे, ईश्वर आखारे, राहुल शेंडे, प्रशांत सरोकार, सुधाकर वरारकर, रंगराव पवार, संतोष बंदुरकर, अकुंश कौरासे, पराग राजुरकर, संजय टिपले, सुमित भगत, शकर देशमुख, विनोद नाळे, राजू टेकाम, धनंजय शेंडे, दिनेश घागरगुंडे, प्रवीण मांढरे, संजय टिपले, सिद्धार्थ कवाडे, आदिसह शेकडो भूमिपुत्र उपस्थीत होते.
आंदोलनात बोलताना दिनेश दादापाटील चोखारे म्हणाले, “चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी हा एक गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाचे तातडीने निराकरण करणे आवश्यक आहे. बायपास रस्ता झाल्यास हा प्रश्न निकाली लागेल. त्यामुळे बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करावी. अशी मागणी यावेळी केली आहे.
बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना करण्यात आली.