महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
Shiv Sena leaders switching to Congress : चंद्रपूर ३० ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा): वरोरा येथील खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीत शिवसेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेसच्या ‘हात’ हाती घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यामुळे वरोरा शहर आणि माजरी परिसरातील काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.
निहाल सिद्दीकी, रवी रॉय, रवी भोगे, मुन्ना वर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला आहे. प्रवेशानंतर निहाल सिद्दीकी यांची तत्काळ माजरी शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, हे विशेष.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अहेतशाम अली, माजी नगरसेवक राजू महाजन, राकेश दोंतावार यांच्यासह वरोरा व माजरी परिसरातील काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांग्रेस पक्षाला ऊर्जा
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “या सर्व अनुभवी आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला मोठी ऊर्जा मिळाली आहे. त्यांचे जनसंपर्काचे बळ काँग्रेसला निश्चितच उपयोगी पडेल. सध्या देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लोकशाहीविरोधी कारभाराला कंटाळून हे सर्वजण काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून सामान्य जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सोडवता येतील.”
प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने काम करू, अशी ग्वाही दिली.
Chandrapur mosquito control and prevention tips : चंद्रपूर 30 ऑक्टोबर – मागील काही दिवसात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेतर्फे आरोग्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
अवकाळी पावसात कीटकजन्य,साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता असते,कारण पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते, जे डासांच्या प्रजननासाठी आदर्श वातावरण तयार करते. साचलेल्या पाण्यात डासांची अंडी उबतात आणि त्यांची वाढ होते, ज्यामुळे डेंग्यूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक योजना सुरु असल्यातरी नागरिकांना स्वतःच्या संरक्षणासाठी पुढील उपाय योजना करणे आवश्यक आहे.
पाणी साचू देऊ नका
घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी साचू देऊ नये, ज्या भांड्यात तुम्ही पाळीव प्राण्यांना पाणी देता ते भांडे स्वच्छ ठेवने, पाण्याची टाकी चांगल्या प्रकारे झाकून ठेवने, रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला पाण्याचा ट्रे दररोज रिकामे करणे आवश्यक आहे. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात.
हवामान बदलामुळे विविध आजारांची शक्यता वाढली आहे. ताप, अंगदुखी, डोळे दुखणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. नागरिकांनी स्वच्छतेची सवय जोपासून डासांची उत्पत्ती थांबवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
Chandrapur crop damage relief fund : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – यंदाच्या पावसाळ्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 94098 शेतकऱ्यांना 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपयांचे वाटप झाल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक वुईके यांनी वरोरा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली. तसेच ज्या शेतक-यांच्या खात्यात तांत्रिक कारणांमुळे निधी पोहचला नाही, अशा शेतक-यांची अडचण दूर करून त्यांच्या खात्यात तात्काळ निधी जमा करावा, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1 लक्ष 10 हजार 665 हेक्टर जमीन बाधित झाली. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 1 लक्ष 26 हजार 286 आहे. यासाठी राज्य शासनाकडून 94 कोटी 86 लक्ष 27 हजार रुपये प्राप्त झाले. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 94 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यात 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपये जमा केले आहे. Agricultural disaster fund distribution Maharashtra
यात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 12 हजार 882 शेतकऱ्यांच्या खात्यात 6 कोटी 84 लक्ष 75 हजार रुपये, ऑगस्ट महिन्यातील बाधित 12 हजार 297 शेतकऱ्यांना 9 कोटी 42 लक्ष 46 हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्यातील बाधित 68 हजार 919 शेतकऱ्यांच्या खात्यात 51 कोटी 16 लक्ष 6 हजार रुपये वाटप करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले. Chandrapur flood and drought relief for farmers
पत्रकार परिषदेला आमदार करण देवतळे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, सहायक जिल्हाधिकारी बालाजी कदम, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर आदी उपस्थित होते.
रब्बी हंगामासाठी अतिरिक्त अनुदानाची मागणी
अतिवृष्टी आणि पुरामुळे विविध शेती पिकांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रती हेक्टरी 10 हजार रुपये याप्रमाणे शासनाकडे निधी मागणी करण्यात आली आहे. यात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 13 हजार 742 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी 62 लक्ष 10 हजार रुपये, ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीबाधित 15 हजार 384 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी 4 लक्ष 67 हजार रुपये तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीबाधित 96 हजार 477 शेतकऱ्यांसाठी 87 कोटी 64 लक्ष 14 हजार रुपयांची अतिरिक्त मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.
जिल्ह्यात दुष्काळी सवलती जाहीर
अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात राज्य शासनाने दुष्काळी सवलती जाहीर केल्या आहेत. यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत एक वर्षाकरीता वसुलीस स्थगिती, तिमाही वीजबिलात माफी आणि 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये माफी यांचा समावेश आहे
शासनाकडून प्राप्त झालेला अतिवृष्टीग्रस्त मदतनिधी त्वरित वाटप करण्याचे काम अविरत सुरू आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली नाही. यात प्रामुख्याने सामुहिक खाते असलेल्या खातेदारांचे संमती पत्र न मिळणे, ई -केवायसी प्रलंबित असणे, आधार अपडेट व बँक खाते संलग्न नसणे याचा समावेश आहे. तरी सामुहिक खातेदारांनी संबंधित तलाठ्याकडे त्वरित संमतीपत्र सादर करावे. मदतनिधी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, सेतू केंद्र तसेच तलाठ्यांशी संपर्क करून ई -केवायसी करून घ्यावी. तसेच आपले आधार कार्ड बँक खात्याला संलग्न करावे. जेणेकरून शेतक-यांच्या खात्यात मदत निधी जमा करता येईल.
Ghugus water supply project Amrit 2.0 : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – घुग्घुस शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवा जीवदान मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने केंद्र पुरस्कृत ‘अमृत 2.0 अभियान’ अंतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकूण 93.98 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाचा निर्णय नगर विकास विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे घुग्घुस शहराला शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या भेटीदरम्यान घुग्घुस शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प, मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामे आणि शहराच्या सर्वांगीण विकास संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
१८ महिन्याच्या आत काम होणार पूर्ण
या प्रकल्पासाठी केंद्र शासनाचा हिस्सा 45 टक्के, राज्य शासनाचा हिस्सा 45 टक्के आणि नगरपरिषदेचा (स्वतःच्या संस्थेचा) हिस्सा 5 टक्के इतका असणार आहे. प्रकल्पाचे काम कार्यादेश मिळाल्यानंतर 18 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहणार असून, त्याचे कार्यान्वयन घुग्घुस नगरपरिषद अधिकारी यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून घुग्घुस शहराला पाण्याच्या टंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता. अनेक प्रभागांमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या प्रकल्पामुळे घुग्घुस शहरात अखंड, शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होणार आहे.
भेटीनंतर बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले घुग्घुससाठी अमृत 2.0 योजनेतून मिळालेला निधी हा ऐतिहासिक निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. या निर्णयामुळे घुग्घुस शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि शहराच्या विकासाला गती मिळेल. मुख्यमंत्री यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना प्राधान्याने गती देण्याचे आश्वासनही दिले आहे. आगामी काही महिन्यांत प्रकल्पाच्या कामांना सुरुवात होऊन नागरिकांना याचा थेट लाभ मिळणार असे ते म्हणाले.
Chandrapur Road Divider : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालया पर्यंत दुभाजकाच्या प्रकरणाला आज एक वेगळेच वळण लागले. या वादग्रस्त दुभाजकाच्या विरोधात पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात आज बुधवार दि.29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान आंदोलन करण्यात आले.आंदोलकांनी बांधकाम साहित्याची तोडफोड केली, काम बंद पाडले.
आंदोलन सुरू असताना अचानक काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर आंदोलनस्थळी आले. माझ्या प्रभागातील काम बंद करता, दादागिरी करता,मला पत्र का दिले नाही ? आंदोलन कशाला करत आहात ? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. यावर देशमुख यांनी कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणत नागरकर यांना सुनावले. Pappu Deshmukh
काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या भुमिकेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.नागरकर महाकाली प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक होते तर रस्ता दुभाजक पठाणपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहे. त्यामुळे नागरकर यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल चर्चेला उधान आले आहे. दरम्यान देशमुख यांनी दुभाजकाची एक सळाख सहजपणे हाताने तोडून दाखवली. यावरून कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दुभाजकाचे काम रद्द करून रस्त्याचे काम करा.. आंदोलकांची मागणी
दुभाजकाचे काम रद्द करण्यात यावे, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे व दुभाजकाच्या कामाची चौकशी करून भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे.
या आंदोलनामध्ये मनसेचे पदाधिकारी मनोज तांबेकर, वर्षाताई भोमले, मंदाताई कराडे, प्रकाश चंदनखेडे,प्रगती भोसले, नेहा डुडलकर, कैलास पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रतिक चिकाटे, राजु पांडे जनविकास सेनेचे मनिषा बोबडे, इमदाद शेख,गोलू दखणे, प्रफुल बैरम,अमुल रामटेके,घनश्याम येरगुडे, अनिता पिसे,सचिन भिलकर,किशोर महाजन,देवराव हटवार,अरूणा मांदाळे,ललिता उपरे,माला गुरनुले,सुशिला चौधरी यांनी सहभाग घेतला.
Bachchu Kadu farmers agitation update : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी व दिव्यांग बांधवाना न्याय मिळावा अश्या विविध मागणीसाठीप्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी नागपूर जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे, जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीतर रेल्वे रोको आंदोलन करणार असा इशारा कडून यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा नागरिकांना फटका बसू नये याकरिता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना नागपूर जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी दुसरा मार्ग सुचविला आहे. या दुसऱ्या मार्गाने नागरिक नागपुरात दाखल होऊ शकतात.
या पर्यायी मार्गाचा करा वापर
जामठा या ठिकाणी आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी बसले असल्यामुळे बुटीबोरी जिल्हा नागपूर येथे खूप मोठा ट्राफिक जाम झाला आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणे शक्य नाही, फक्त वर्धा पर्यंत जाऊ शकतात. नागपूर जाणाऱ्या नागरिकांनी वरोरा आनंदवन चौक मार्गे चिमूर -भिसी उमरेड मार्गाने नागपूर जाता येईल. करिता नागरिकांनी त्या मार्गाचा वापर करावा. असे पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर तर्फे नागरिकांना कळविण्यात आले आहे.
मागील १८ तासापासून सुरु असलेल्या शेतकरी, भूमिपुत्रांच्या आंदोलनाला राज्यातुन समर्थन प्राप्त होत आहे, सध्या नागपुरातील महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून ठेवले आहे, सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीवर तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आंदोलन अधिक मोठे होणार असा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra municipal corporation reservation : चंद्रपूर २८ ऑक्टोबर –राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २८ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पार पाडण्यात येणार आहे. Maharashtra Municipal Reservation
यानंतर आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रांमधून ८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी काढण्यात येणार असून, त्याचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.
हरकती व सूचना १७ नोव्हेम्बरपासून
त्यानंतर प्रारुप आरक्षण प्रसिद्ध करून, नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होईल. हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महानगरपालिका आयुक्त निर्णय घेतील. आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात २ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार वेळेत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता व काटेकोरता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Chandrapur road divider controversy : चंद्रपूर २८ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान बांधण्यात येणाऱ्या वादग्रस्त रस्ता दुभाजकाविरोधात जनविकास सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. जीवघेणे खड्डे असलेल्या या रस्त्यावर दुभाजक नव्हे तर तात्काळ रस्त्याचे बांधकाम करण्याची नागरिकांची मागणी आहे.
केवळ कंत्राटदाराच्या हितासाठी 3.56 कोटी रूपयांचे दुभाजक करण्याचा घाट मनपा प्रशासनाने घातला. त्यामुळे नागरिकांची मागणी व गरजेनुसार या ठिकाणी सुरू असलेले रस्ता दुभाजकाचे काम तातडीने रद्द करावे, या कामाची चौकशी करून निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करणारे तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल,मनपाचे इतर अधिकारी तसेच कंत्राटदार मे. सुर्यवंशी इंटरप्राईजेस व मे. काहाळे इन्फ्राॅकाॅन प्रा.लि. यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी मनपाचे आयुक्त यांना दिले. Dangerous potholes road accident Chandrapur
यावेळी जनविकास सेनेचे इमदाद शेख,महिला आघाडीच्या मनिषा बोबडे तसेच अक्षय येरगुडे,प्रफुल बैरम व नकुल मुसळे उपस्थित होते.
दुभाजकाचे काम रद्द करा
रस्ता दुभाजकाचे काम रद्द करून 3.56 कोटी रुपये निधीतून या ठिकाणी नागरिकांची मागणी व गरजेनुसार नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी जनविकास सेनेने केली आहे.या मागणीसाठी जनविकास सेनेतर्फे बुधवार दि.29 ऑक्टोबर रोजी दुभाजकाचे काम बंद पाडण्यात येणार आहे. तसेच पुढील काळात या ठिकाणी जीवघेणा अपघात झाल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येईल असा इशारा जनविकास सेनेने दिला आहे.
Police appreciation Bahujan Hitkarini Sabha : चंद्रपूर 25 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – दिनांक 15, 16 ऑक्टोबर च्या दीक्षाभूमी, चंद्रपूर येथील महोत्सवात उत्कृष्ट व्यवस्था ठेवल्या बदल बहुजन हितकारिणी सभेने चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक मान. मुम्मका सुदर्शन यांचे अभिनंदन केले आहे.
यासंबंधाने नागवंश नगराळे, एड. पूनमचंद वाकडे, एड. रवींद्र मोटघरे, जितेंद्र डोहणे, बंडू ठमके, विद्याधर लाडे, रवींद्र भैसारे इ. च्या शिष्टमंडळाने दिनांक 24 ऑक्टो. ला मम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन धन्यवाद प्रकट केले . मागील दोन वर्षांपासून दीक्षाभूमी परिसर व संबंधित रोडवर आवश्यक तिथे बॅरिकेट्स लावून, पादचाऱ्यांना टू- वे मार्गाची व्यवस्था केल्याने गर्दीचे योग्य नियोजन झाले.
बॅड एलिमेंट्सना वचक
अनेक ठिकाणी वाहन तळे उपलब्ध केल्याने वाहणांची योग्य व्यवस्था झाली. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी पोलीस जवान उपस्थित ठेवल्याने ‘ बॅड एलीमेन्टसना ‘ वचक बसला. यास्तव जरी हे पोलीस विभागाचे कर्तव्य असले तरी मागील वर्षी या बाबी बहुजन हितकारिणी सभेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन चोख बंदोबस्ताची मागणी केली होती, त्यावर मागील वर्षीपासून योग्य प्रतिसाद मिळाल्याने पोलीस प्रशासन अभिनंदनास पात्र असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
Your Money Your Right Campaign : चंद्रपूर, दि. 24 (News34 वृत्तसेवा) – भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागांतर्गत सुरू असलेल्या “आपला पैसा – आपला अधिकार” या विशेष मोहिमेचा शुभारंभ चंद्रपूर जिल्ह्यात प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात करण्यात आला. या मोहिमेचा उद्देश आर्थिक क्षेत्रातील दावा न केलेल्या ठेवी व मालमत्तेचे कार्यक्षम व जलद वितरण सुनिश्चित करणे हा असून, 1 ऑक्टोबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
या प्रसंगी भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक व्यवस्थापक महेश थुल, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष पोरकुटे, बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक गौरव विश्वकर्मा, स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक शेखर बारापात्रे, बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत सांगवी, तसेच जिल्ह्यातील सर्व बँका, वित्तीय संस्थांचे जिल्हास्तरीय समन्वयक, अधिकारी व दावेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. Chandrapur unclaimed bank deposits campaign 2025
प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले की, ही मोहिम केंद्र सरकारची अतिशय लोकहिताची व जनसहभागातून राबविण्यात येणारी संकल्पना आहे. नागरिकांचे कोट्यवधी रुपये निष्क्रीय खात्यांत पडून आहेत. अनेक शासकीय संस्थांची खाती देखील या स्वरूपात आहेत. सर्व नागरिकांनी, संस्थांनी व वारसांनी आपल्या बँकांशी संपर्क साधून आपली दावा न केलेली रक्कम परत मिळवावी, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. claim your unclaimed money
ते पुढे म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून व्यवहार नसलेली बँक खाती निष्क्रीय होतात व अशा खात्यांतील रक्कम भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार गोठविली जाते. या रक्कमा दावा न केल्यास बँकांकडे जमा राहतात. अशा परिस्थितीत “आपला पैसा – आपला अधिकार” मोहिमेअंतर्गत नागरिकांना त्यांचे हक्काचे पैसे मिळविण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
डॉ. व्यवहारे यांनी यावेळी सर्व बँकांना ग्राहकांशी थेट संपर्क साधण्याचे व माहिती देण्याचे निर्देश दिले. तसेच, ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत ठेवावेत, जेणेकरून भविष्यात बँकांकडून संपर्क सुलभ होईल व निष्क्रीय खात्यांची संख्या कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.
जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक आशिष पोरकुटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “ग्राहकाने दोन वर्षांपर्यंत कोणतेही व्यवहार न केल्यास खाते निष्क्रीय होते, आणि दहा वर्षांपर्यंत व्यवहार न झाल्यास ते खाते ‘दावा न केलेले’ म्हणून वर्गीकृत केले जाते. त्यामुळे प्रत्येक खातेदाराने आपल्या सर्व खात्यांमध्ये वेळोवेळी व्यवहार करून ते सक्रिय ठेवणे आवश्यक आहे.”
चंद्रपूर जिल्ह्यात 88 कोटी रकमेवर दावा नाही
चंद्रपूर जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, एकूण 3 लाख 76 हजार 242 निष्क्रीय खात्यांमध्ये सुमारे 88 कोटी रुपयांची रक्कम दावा न केलेल्या स्वरूपात पडून आहे. यात वैयक्तिक, संस्थात्मक तसेच शासकीय संस्थांची खाती समाविष्ट आहेत.
सदर मोहिमेअंतर्गत प्रत्येक बँक शाखेत विशेष बूथची स्थापना करण्यात आली असून, संबंधित दावेदारांनी अथवा त्यांच्या वारसांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेशी संपर्क साधून आपली रक्कम परत मिळवावी, असे आवाहन सर्व बँक व्यवस्थापकांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या हस्ते काही पात्र दावेदारांना दावा मंजुरी पत्रांचे वाटप करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तर कार्यक्रमांचे संचालन जिल्हा अग्रणी बॅंकेचे अधिकारी प्रतीक गोंडणे केले असून कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक गौरव विश्वकर्मा यांनी केले.