Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • मुल नगर परिषदेने केला आजी माजी सैनिकांचा सन्मान

    News34

    गुरू गुरनुले

    मुल -:भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्याने वीरो का सन्मान अंतर्गत २५ आजी व माजी सैनिकांचा शाल व श्रीफळ तथा वृक्ष रोपटे देऊन न.प. मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

    सदर कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी अजय पाटणकर, यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आला असून याप्रसंगी न.प.अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    न प कार्यक्रमाचे प्रास्तविक तथा संचालन विनोद येनुरकर यांनी केले, तसेच स्वातंत्र्य सैनिकांना वंदन म्हणून शिला फलकाचे अनावरण माजी सैनिक, श्री.मारोती कुळमेथे यांचे हस्ते करण्यात आले. सन्मान प्राप्त सैनिक म्हणून मारोती कुळमेथे, बबलू शेख, एकनाथ गडेकर, मारोती कोकाटे, सहदेव रामटेके, मदन अडेट्टीवार, महादेव बोंडे, लक्ष्मण नीकुरे, पुरुषोत्तम चलाख,प्रकाश महादोरे, सुनील नगराळे, सुरेंद्र नामपल्लीवर, कविता मोहूरले, पुष्पलता जम्बुलवार, नलिनी मेश्राम, शुभद्राबाई खोब्रागडे,राजेंद्र खोब्रागडे, मुंनादास रंगारी,चंद्रकांत आक्केवार, विनोद मंथंनवार, बाबा सुर, यांचा आदर सन्मान करण्यात आला.

    मुल नगर परिषदेने स्वातंत्र्य अमृत महोत्सवी दिनानिमीत्य केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केल्या जात आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मवीर महाविद्यालयाला नॅक मुल्यांकन मध्ये बी+ प्लस दर्जा प्राप्त

    News34

    गुरू गुरनुले

    मुल – शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित,व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालयात मूल येथे नॅक मुल्यांकन कमिटीने दिनांक २८व २९ जुलै २०२३ ला भेट दिली होती.

    हे महाविद्यालयाचे दुसरे सायकल होते. प्राचार्य डॉ.अनिता दयाळ वाळके यांचे मार्गदर्शन व नेतॄत्वात महाविद्यालयाच्या प्राध्यापकानी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे महाविद्यालयाने 2.63 गुण मिळवून बी.+ प्लस हा दर्जा प्राप्त केलेला आहे. आदिवासी दुर्गम भागात तालुका स्तरावरील महाविद्यालयाने चांगले गुण प्राप्त करून एक आदर्श ठेवल्यामुळे महाविद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

    संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.वी.तू.नागपुरे यांनी स्थापन केलेल्या शिक्षण प्रसारक मंडळाचा कारभार अध्यक्ष अॅड .बाबासाहेब वासाडे, यांचे कुशल नेतृत्वात कार्याध्यक्ष मा.संजयबाबु वासाडे,सचिव मा.अॅड.अनिल वैरागडे व सर्व संस्थासंचालक पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य डॉ.अनिता वाळके व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी मॅनेजमेंट चे योग्य सहकार्य, सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे परिश्रम,आजी व माजी विद्यार्थीचा महाविद्यालयावरील असलेला जिव्हाळा,प्रेम,पालक वर्गांचा विश्वास या नॅक मुल्यांकन दर्जाचे फलित असल्याचे सांगून सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करून आभार मानले.

    तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी व महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम करु अशी ग्वाही याप्रसंगी दिली. कर्मवीर महाविद्यालयाने नॅक मूल्यांकन मद्ये बि+ दर्जा प्राप्त केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

  • शॉर्ट सर्किट मुळे घराला लागली आग

    News34

    तळोधी –  दिनांक 13 ऑगस्टला दुपारी 2 ते 3 वाजताच्या दरम्यान खडकी( तू .) येथील निवासी रामदास मनिराम शेंडे यांच्या घराला आग लागल्याने आगीत अनेक साहित्ये जाळून खाक झाली यामध्ये शेंडे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले असल्याची माहिती आहे. सदर आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागली.

    या आगीत घरातील 3 फॅन, 2 कुलर, led टीव्ही, पलंग, असे लाखो रुपये किंमतीचे सामान जाळून खाक झाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

    रविवार असल्याने काही पर्यटक घोडाझरी कडे जात होते, मात्र चौकात त्यांच्या वाहनाला वळण घेतेवेळी समस्या उदभवली असता काही पर्यटक वाहनातून खाली उतरले त्यावेळी समोरच्या घरात आग लागली असे दिसून आले असता त्यांनी घरातील दार उघडले व आगीवर नियंत्रण मिळविले.

    वेळेवर आगीवर नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा शेजारी घरापर्यंत सदर आग पसरली असती.

  • चंद्रपूर जिल्ह्यात भीषण अपघात, कुटुंब संपलं

    News34

    चंद्रपूर/राजुरा – राजुरा ते सास्ती मार्गावरील धोपटाळा गावाजवळ एका भरधाव वेगाने जाणा-या ट्रक चालकाने तिघांना चिरडले. यात दुचाकीस्वार आई-वडील व मुलगी अशा तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात आज 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास घडला. ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती कळते.

    धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे निलेश वैद्य वास्तव्याने राहत होते. सकाळी आपल्या पत्नी व मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. सायंकाळी ते काम आटपून घरी येत असताना घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंप जवळ राजुरा कडून सास्तीकडे जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकला धडक दिली धडक एवढी जोरदार होती की त्यात वैद्य परिवाराचा चकानाचुर झाला. तर समोर याच ट्रकने दोन मोटार सायकलस्वारांना धडक दिली यात रामपुर येथील दोघेही जखमी असून जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

    या भीषण अपघातात 35 वर्षीय निलेश मंगेश वैद्य, 30 वर्षीय रुपाली निलेश वैद्य व 3 वर्षीय राही यांचा जागीच मृत्यू झाला, याच ट्रकने समोर जाऊन प्रज्ञा प्रशाद टगराफ (33 वर्ष) व प्रसाद राजाबाई टगराफ (40 वर्ष) दोन्ही रामपुर येथील यांना धडक दिल्याने दोघेही जखमी आहे. जखमींना चंद्रपूर येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.

    नागरिकांनी ट्रकचालक यांना पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहे.

    अपघात झाल्यावर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी करीत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली होती, मात्र वेळीच दंगा पथक पोहचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

  • राज्याची दैनावस्था हे सरकारचे अपयश – विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार

    News34

    चंद्रपूर – राज्यात फोडाफोडीच्या राजकारणातून सत्ता स्थापन करून जनतेचा विश्वासघात करणारे सत्ता काबीज करताच जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. राज्यात आज महागाई, बेरोजगारी, महापुरुषांचा अवमान, शेतकरी आत्महत्या अशा ज्वलंत समस्या उभ्या ठाकल्या असताना सरकार मात्र सत्तेच्या मदमस्तीत गुरफटून आहे.

    सरकारच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळेच राज्याची दैनावस्था झालेली असून हे सरकारचे स्पेशल अपयश आहे .पक्षश्रेष्ठींनी मला विरोधी पक्षनेते पदी नेमून जी संधी दिली यातून जनसेवेकरिता सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करणार असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते सावली तालुक्यातील व्याहाड (खुर्द) येथे आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.

    विरोधी पक्ष नेते पदी नियुक्ती झाल्यानंतर माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचा स्थानिक मतदार संघातील व्याहाड (खुर्द) येथे प्रथम आगमना प्रित्यर्थ भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रामुख्याने नागपूर शिक्षक मतदार संघ आमदार सुधाकर अडबाले, माजी आ. डॉ .नामदेवराव उसेंडी, डॉ. नामदेव कीरसान, धनराज मुंगले,माजी जि प. उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, माजी जि प. सभापती दिनेश चीटनूरवार, रोहित बोम्मावार, नरेशजी सुरमवार, राजेश सिद्धम, नितीन गोहने, रमाकांत लोधे ,स्वप्निल कावळे, सौ लता लाकडे, संदीप पुण्यपवार, उषाताई भोयर, सीमा सहारे, कवडूजी कुंदावार, विजय कोरेवार, राजू रेड्डी, निखिल सुरमवार, व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महिला आघाडीच्या पदाधिकारी ,युवक काँग्रेसचे पदाधिकारी, तसेच अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
    यावेळी व्याहाड (खुर्द) येथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आगमन होताच जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांनी विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कर्तुत्वान व दमदार नेतृत्वाची गाथा उपस्थितांसमोर मांडली. आपल्या मनोगतात बोलताना विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार म्हणाले की, जनतेने मला सदैव प्रेम दिले. तसेच आशीर्वादाच्या रूपातून एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याचा विरोधी पक्ष नेता पदापर्यंत पोहोचविले.
    आज करण्यात आलेला हा बहुमान सत्कार जीवनातील एक अविस्मरणीय क्षण राहील असेही ते यावेळी म्हणाले. सध्या राज्याच्या राजकीय स्थितीत संपूर्ण कलुशीतता आलेली असून कालपर्यंत विरोध करणारे आज सत्तेत मिसळून गुणगान गात आहे. महाराष्ट्रातील थोर महात्म्यांचा तसेच राष्ट्रपितांचा अवमान करणाऱ्यांना सरकारकडून मुभा मिळत असून राज्यात अनेक ज्वलंत समस्या उभ्या ठाकल्या  आहेत. राज्यातील जनता ही त्रस्त झाली असताना घटलेला विकासदर, वाढलेली महागाई शेतकऱ्यांची हाल अपेष्टा यावर तोडगा काढण्यात सरकार स्पेशल अपयशी ठरत आहे.
    देश वाचवायचा असेल तर काँग्रेस एकमेव पर्याय असून महाविकास आघाडीच्या समर्थनात मैदानात उतरा असे आवाहन करत जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देखील दिली. व्याहाड (खुर्द) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार व सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची स्तुती करत हा जीवनातील अविस्मरणीय सत्कार असल्याचेही विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले. आयोजित कार्यक्रमास सावली  तालुक्यातील हजारोंच्या कार्यकर्ते उपस्थित होते.
  • स्वातंत्र्यानंतर ही चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात अंधार

    News34

     

    चंद्रपूर :- गडचांदूर शहरालगत असलेल्या बंगाली कॅम्प वार्ड क्रमांक 4 परिसरात राहणाऱ्या नागरिकांना मागील 40 – 50 वर्षांपासून वीज, नळ अश्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसून या वस्तीत 54 घरे असून साधारण 450 ते 500 नागरिक मोठ्या हाल अपेष्ठांचे जीवन ज्ञापन करीत आहेत.

    या गंभीर बाबीची माहिती बीआरएस नेते भूषण फुसे यांना कळताच त्यांनी या पीडित वार्डात भेट देत स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी नागरिकांनी आपली समस्या सांगताना म्हटले की सदर जमीनिवर आमचे वाडवडील आले माणिकगड सिमेंट कंपनी ची पायाभरणी पासून काम केलं कंपनी उभी केली आणि येथे स्थायी झाले, तेव्हापासूनच अंधारात आणि सर्व सुविधांपासून अलिप्त जीवन जगत आहोत.

    वस्तीत आतापर्यंत साप चावल्याने 10 ते 15 बालकांना आपला जीव गमवावा लागला, वाघ, जंगली डुक्कर आदी जंगली जनावरांची भीती आजही सतावते आहे, आणि माणिकगड कंपनी आम्हाला सर्व सुविधांपासून अलिप्त ठेवत आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.

    भारत राष्ट्र समिती चे नेते भूषण फुसे यांनी सर्वांच्या समस्या जाणून घेतल्यावर या गंभीर विषयावर तोडगा निघावा म्हणून प्रशासनाने लक्ष द्यावे आणि स्थानिकांच्या समस्या तात्काळ सोडवाव्या अन्यथा बीआरएस पक्षा तर्फे तिव्र आंदोलन करू असा इशारा व आश्वासन फुसे यांनी स्थानिकांना दिला आणि या भारत देशाच्या नागरिकांना स्वातंत्र्य नंतरही मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्या अशी भूमिका त्यांनी मांडली.

    बीआर एस तर्फे लवकरच या पीडित नागरिकांची समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा भूषण फुसे यांनी दिला.

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील या भागात विजेची बिकट समस्या

    News34

    पोंभुर्णा / पाणी पाऊस असो वा नसो, तालुक्यात विजेची समस्या नित्याचीच झाली आहे. रोजच्या रोज दिवसभरात कितीवेळा पुरवठा खंडीत होतो, हे सांगणेसुध्दा कठीण होऊन बसले आहे. तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या विद्युत पुरवठा विभागाविषयी समस्या जाणून घेऊन शनिवारी ( दि.१२ ऑगस्ट) पोंभुर्णा शिवसेनेनेच्या वतीने येथील विद्युत वितरण कंपनी ला निवेदन देण्यात आले.

     

    महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बल्लारशाह विभागाअंतर्गत उपविभाग पोंभुर्णा येथील ३३ केव्ही सबस्टेशन मधील आष्टा,घोसरी, देवाडा खुर्द, उमरी पोतदार,या क्षेत्रासाठी विद्युत तंत्रज्ञ (लाईनमेन) नसून त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार देण्यात आलेला आहे.त्यामुळे ते कर्मचारी त्यांचा विभाग सांभाळून अतिरिक्त दिलेल्या विभाकडे दुर्लक्ष करीत असल्याने याचा नाहक त्रास शेतकरी व अनेक गावातील नागरिकांना होत आहे.नेमका कोणत्या वायरमनकडे भार सोपविण्यात आला आहे, हेच माहित नसल्याने संपर्क कोणाशी करायचा हाच मोठा प्रश्न आहे.

    देवाडा क्षेत्रात देवाडा खुर्द,जामतुकुम, जामखुर्द, जाम रयतवारी,रामपूर दीक्षित,चेक पोंभुर्णा असे सहा गावांचा तर आष्टा क्षेत्रात आष्टा, वेळवा माल, सेल्लुर नागरेड्डी,चेक आष्टा, सोनापूर,चेक नवेगाव,असा सहा गावांचा तर उमरी क्षेत्रात उमरी पोतदार,घनोटी नं.१,घनोटी नं.२, विहिरगाव, आंबेधानोरा,सातारा तुकुम,सातारा भोसले,सातारा कोमटी, आंबईतुकूम असा नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

    मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.धान व मिरचीची रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना रोपे जगवण्यासाठी मजुराकरवी डोक्यावर घागर घेऊन दिवसभर पाणी घालावे लागत आहे. शेतातील मोटारपंप कुचकामी ठरत आहेत. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणे, डीओ जाणे,फेज जाणे,अश्या अनेक समस्या निर्माण होत असल्याचे शेतकरी व सामान्य नागरिक मेताकुटीस आला आहे.

    म्हणून या सर्व समस्यांचे निराकरण करता यावे म्हणून शनिवारी ( दि.१२ ऑगस्ट) रोजी पोंभूर्णा शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार,बल्लारपुर विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर,युवासेनेचे रजत ढोंगे, सुमित मानकर,राहुल गगपल्लीवार,सुनील कावटवार, समीर बुरांडे, वासुदेव गोरंतवार,विनोद जाधव, वेदांत आगरकर,विश्वास मडावी,सचिन मडावी,एकनाथ कुळमेथे, अरविंद कोडापे,इत्यादी शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील महिला सरपंचाचा पंतप्रधान मोदी करणार सत्कार

    News34

    15 August 2023

    चंद्रपूर :  केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जिल्हयातील “हर घर जल” योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या व्यक्तींना लाल किल्ला, दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगष्ट रोजीच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा यात समावेश असून स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीमती मेश्राम यांचा सत्कार होणार आहे.

     

    चंद्रपुर जिल्हयात जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली असून त्या गावात प्रत्येक घरी नळाव्दारे पाणी पोहचले आहे. जिल्हयातील अनेक गावे हर घर जल घोषित झालेली आहेत. अनेक ठिकाणी त्या गावातील सरपंच किंवा तेथील ग्रामपंचायत सदस्य समिती, स्वयं सहायता बचत गट यांनी चांगले काम केले आहे.

    लाखापुर येथील 140 कुटुंबापैकी 101 नागरिकांच्या घरी जल जीवन मिशन अंतर्गत नळ कनेक्शन मिळाले आहे, विशेष म्हणजे यासाठी सरपंच मेश्राम यांनी गावातील पाण्याचा स्त्रोत म्हणून विहिरीच्या आत बोअर मारली आहे, कारण गावात जवळपास नदी नसल्याने त्यांनी विहिरीतून पाण्याचा उपसा करण्याचे काम करीत सदर योजना पूर्णत्वास आणली.

    महाराष्ट्र राज्यात फक्त कोल्हापूर व चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे ही योजना पूर्णत्वास आली आहे.

    केंद्र शासनाने चंद्रपुर जिल्हयातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांनी, जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. 15 ऑगष्ट रोजी दिल्ली येथे होणा-या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सरपंच चंद्रकला मेश्राम आणी त्यांचे पती यांना उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण केंद्र शासनाकडून देण्यात आले आहे.

    या कार्यक्रमाला चंद्रपुर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत यांना महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे.
    चंद्रकला मेश्राम यांच्या निवडीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

    चंद्रपुर जिल्हयातील महिला सरपंच यांचा देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर सन्मान होणे, ही चंद्रपुर जिल्हयासाठी अभिमानाची बाब आहे. याच पावलावर पाऊल ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी व गावाचा विकास साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी
    विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झाले एकनाथ शिंदे बस स्थानक

    News34

    चंद्रपूर – गडचांदूर बसस्थानकाचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रस्तावित असतांना आज भारत राष्ट्र समिती Brs च्या वतीने मंजुरी न मिळालेल्या गडचांदूर बसस्थानकाला प्रतिकात्मक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसस्थानक नाव देत भूषण फुसे यांच्या नेतृत्वात अनोखे आंदोलन करण्यात आले.

     

    औद्योगिक शहर असलेल्या व चार चार सिमेंट उद्योग सभोवती असलेल्या शहरात तसेच जिवती व कोरपना तालुक्याची मूख्य बाजारपेठ असलेल्या शहरात बसस्थानक नाही.

    मागील कित्येक वर्षांपासून गडचांदूर येथे बसस्थानक निर्माण करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी असतांना शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

    याकरिता आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी गडचांदूर बस स्थानक परिसरात भारत राष्ट्र समिती च्या वतीने गडचांदूर बस स्थानक तात्काळ निर्माण करावे या मागणीसाठी प्रतिकात्मक गडचांदूर बसस्थानकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव मा. एकनाथ शिंदे गडचांदूर बसस्थानक असे नाव देत अनोखे आंदोलन करण्यात आले आणि या एकनाथ शिंदे गडचांदूर बसस्थानकाचे उद्घाटन जिवती ते गडचांदूर नेहमी प्रवास करणारे जिवती तालुक्यातील नागरिक रामराव शेळके व नंद आप्पा यांच्या हस्ते गडचांदूर बस स्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाने गडचांदूर करांचे लक्ष वेधले.

    आता तरी राज्यसरकाने या गंभीर विषयाची दखल घेऊन गडचांदूर बस स्थानक उभारणीला परवानगी घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

    गडचांदूर बस स्थानक आंदोलन भारत राष्ट्र समितीचे नेते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते राकेश चिल्कुलवार अजय साकीनाला, सनी रेड्डी, धनंजय बोर्डे, महेंद्र ठाकूर, संघर्ष गडपिल्ली, प्रदीप इरकला. अश्विन वाघमारे व्यंकटेश जंजरला. सामाजिक कार्यकर्ते सुरज उपरे, कैलास चीतलवार. दिलीप कांबळे आदींची मोठया संख्येने उपस्थिती होती.

    महत्वाचे म्हणजे राज्यात नव्यानेच उदयास आलेल्या भारत राष्ट्र समिती पक्षा चे हे जिल्ह्यातील पहिलेच आंदोलन असून, हे आंदोलन भारत राष्ट्र समिती या पक्षकरिता लक्षवेधी ठरले.

  • दालमिया सिमेंट कंपनीमधील कन्व्हेअर बेल्ट ला भीषण आग

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नारंडा येथील डालमीया सिमेंट उद्योगात कनवेयर बेल्टला आग लागली. आग वेगाने पसरत असल्यामुळे कंपनीत गोंधळाचे वातावरण पसरले. या कन्व्हेअर बेल्टने सिमेंटसाठी लागणाऱ्या दगडाची आवक केली जाते. मात्र तो बेल्ट अधिक गरम झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच लागलीच अग्निशमन दलाच्या वाहनाने पाचारण केल्याने आग आटोक्यात आली. यात मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

    [web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]

    11 ऑगस्ट ला सकाळी पहाटे 5 वाजताच्या सुमारास दालमिया सिमेंट कंपनीमधील कनव्हेर बेल्ट जळायला लागल्याने कंपनी मध्ये येणारे सर्व वाहन थांबविण्यात आले होते.

     

    कंपनीचे मानव संसाधन विभाग प्रमुख अभिषेक मिश्रा यांनी सांगितले की आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यास आम्हाला यश आले, कंपनी व्यवस्थापनाने समय सुचकता दाखवीत कर्मचाऱ्यांना आधीच कन्व्हेर बेल्ट पासून दूर करण्यात आले होते.
    या आगीत मोठे नुकसान झाले नाही.