Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर: राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग नवी दिल्लीचे सदस्य मा.डॉ.पी.पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली २१ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर महानगरपालिका राणी हिराई सभागृह येथे सफाई कर्मचारी यांच्या विविध विषयांवर आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन डॉ.वावा यांनी दिले.

    या बैठकीस डॉ.वावा यांच्यासह मनपा आयुक्त श्री. विपीन पालीवाल, जिल्हा प्रशासन अधिकारी श्री. अजितकुमार डोके, सर्व नगर परिषद यांचे मुख्याधिकारी, उपायुक्त श्री.अशोक गराटे, उपायुक्त श्री. मंगेश खवले, शहर अभियंता श्री.अनिल घुमडे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थीत होते.

    दरम्यान, मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी डॉ. वावा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
    बैठकीत डॉ.वावा यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे कामाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, सफाई कर्मचारी हे शहराचे रक्षक आहेत. त्यांचे काम अतिशय महत्वाचे आहे. त्यांना सन्मानाने वागवले पाहिजे.

    यावेळी डॉ. वावा यांनी सांगितले की, समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. विविध योजना राबवून मुख्य प्रवाहात आणले जाईल.
    बैठकीमुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

  • कामगारांनो संप मागे घ्या – आयुक्त पालिवाल यांचे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कचरा संकलन आणि वाहतुक या कामांवर काम करणारे कामगार 6 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा संकलनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबाचे भविष्य बघता कामगारांनी हे संप मागे घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले.

    कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्याबाबत चे पत्र दिले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करणे, 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेणे आणि वेतन चिट्ण्या नियमित देणे यांचा समावेश आहे.
    १०/१०/२०२३ रोजी उपायुक्त यांचे कक्षात सकारात्मक चर्चा झाली आहे.

     

    झालेल्या चर्चेनुसार संदर्भ पत्राच्या अनुषंगाने खालील मागण्या मान्य करण्यात येत आहे. १) जुने कंत्राटदार सेंटर फॉर डेव्हलपमेन्ट कम्युनिकेशन, जयपुर ब्रान्च नागपूर याप्रमाणे वेतन तात्काळ प्रभावाने लागू करून पुढील काळाकरीता देण्यात येईल. जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करून कामगारांना नवीन वेतन देण्यात येईल. 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेण्यात येईल आणि वेतन चिट्ण्या नियमित देण्यात येतील, असे देखील मान्य करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.
    कामगारांनी संप मागे घेऊन 12 ऑक्टोबरपासून नियमित कचरा संकलन सुरू करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले आहे.

     

    मागील 6 दिवसापासून सुरू असलेल्या कामगारांच्या कामबंद आंदोलनातील महत्वाची मागणी म्हणजे कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, मनपा दालनात अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सदर मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

     

    सुरू असलेला संप कामगार परत घेणार या याविषयी श्री संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

  • चंद्रपुरात घंटागाडी कामगारांचे आंदोलन पेटले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – केंद्र शासनातर्फे चंद्रपूर मनपाला स्वच्छता वर्गात पुरस्कार दिल्या गेला होता मात्र यामागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या घंटागाडी कामगारांना हक्काच्या किमान वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे.

     

    शहर स्वच्छ रहावे यासाठी संपूर्ण दिवस शहरातील कचरा संकलन करण्याचे मोलाचे कार्य घंटागाडी कामगार करतात मात्र या कामाचा मोबदला म्हणून त्यांना किमान वेतन दिल्या जात नाही, कंत्राटदार बदलला व नव्या कंत्राटदाराने कामगारांच्या किमान वेतनावर डल्ला मारण्याचे काम केले.

     

    आम्हाला किमान वेतन द्या या मागणीसाठी संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेने अनेकदा पाठपुरावा केला मात्र त्यांच्या मागणीकडे मनपा व संबंधित कंत्राटदाराने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने 6 ऑक्टोबर पासून घंटागाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले.

    मागील 5 दिवसापासून सुरू असलेले कामबंद आंदोलन मनपाद्वारे दडपण्याचा प्रयत्न केला गेला, कामगार कामावर येत नसल्याने शहरातील कचरा संकलन ढासळले, कंत्राटदाराने यावर शक्कल लढवीत कामगारांची पर्यायी व्यवस्था केली.

     

    ही बाब कामबंद आंदोलकांना कळताच त्यांनी सरळ कचरा संकलन वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे 10 ऑक्टोबर ला सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले, आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

     

    मनपा द्वारे आता या ठिकाणी बैठक घ्या आम्ही आता हटणार नाही, हा आमच्या हक्काचा लढा आहे, अशी निर्णायक भूमिका घंटागाडी कामगारांनी घेतल्याने मनपा आता काय भूमिका घेणार याकडे कामगार संघटनांचे लक्ष लागले आहे.

  • चंद्रपुरात वाहतुकीस अडथळा, मनपाने 10 जणांविरुद्ध केले गुन्हे दाखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील विविध भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व प्रसंगी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध चंद्रपूर महानगरपालिकेने तक्रार करून गुन्हे दाखल केले आहेत.

     

    शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे तासन्‌तास ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघातीही घडतात. महापालिकेकडून अनेकदा कारवाईही केली जाते. परंतु तरीही सदर समस्या वाहतुकीला डोकेदुखी ठरत असल्याने मोकाट जनावरांविषयीचा प्रश्न आयुक्त विपीन पालीवाल यांनी गांभीर्याने घेतला असुन सध्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

     

    शहर व लगत परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे आहेत. जनावरांचे काही मालक हे जनावरे सकाळी मोकाट सोडून देतात. सोडून दिलेली ही मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. बहुतांशी मुख्य रस्ते,चौक येथे मोकाट जनावरांनी रस्ता अडविलेला असतो. यातून अनेकदा गंभीर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवते.

     

    याबाबत प्राप्त तक्रारीनुसार मनपाकडून कारवाईही केली जाते. मात्र, अलीकडे जनावरांचे कोंडवाडा राहिलेले नाहीत. गोशाळांमध्ये ही जनावरे जमा केल्यानंतर मालक तेथून ती सोडवून आणतात आणि पुन्हा ती जनावरे रस्त्यावर मोकाट फिरतात. त्यामुळे मनपाने आता या पशुपालकांनाच चाप लावण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु केली आहे.

     

    मोकाट जनावरे पकडुन पोलीस तक्रार करण्याची  मोहीम यापुढेही सुरु राहणार असुन ती अधिक तीव्र करण्यात येणार असुन पशुपालन करणाऱ्या संबंधितांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकळे न सोडण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपुरात किमान वेतनासाठी घंटागाडी कामगारांची लढाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेत घंटागाडी कामगार किमान वेतनासाठी रस्त्यावर उतरले आहे, मागील 2 दिवसापासून पालिकेसमोर घंटागाडी कामगार आंदोलन करीत आहे, त्यांच्या आंदोलनाची दखल मंत्री, आमदार व स्वतः मनपाने घेतलेली नाही.

     

    संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेतर्फे सदर कामबंद आंदोलन करण्यात येत आहे, वर्ष 2021 पासून कामगारांना किमान वेतन नुसार पगार देण्यात येत होता, त्यानंतर सफाई चे कंत्राट दुसऱ्या कंत्राटदारा कडे गेल्याने किमान वेतनात मोठी तफावत निर्माण झाली.

     

    एका कामगारांच्या मागे तब्बल 200 ते 300 रुपये म्हणजेच महिन्याला 6 हजार रुपये कमी मिळायला लागले, याबाबत काही महिन्यांपूर्वी कामगार संघटनेतर्फे आंदोलन पुकारत कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यावेळी आश्वासन देत आंदोलन मिटले.

     

    मात्र कामगारांच्या किमान वेतनावर कंत्राटदार काहीही बोलायला तयार नाही, जितका पगार मिळत आहे घ्या अन्यथा कामावरून कमी व्हा अशी धमकी त्यांना देत आहे, कंत्राटदारांच्या अन्यायाला कंटाळून संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन गायकवाड यांनी सर्व बाबी समजून घेत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

     

    6 ऑक्टोम्बर पासून कामगार संघटनेमार्फत कामबंद आंदोलन सुरू आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. या आंदोलनात 300 कामगार सामील झाले आहे.

  • चंद्रपूर महानगरपालिकेने या मशीनवर घातली बंदी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरात सार्वजनिक कार्यक्रम,रॅली अथवा उत्सवात पेपर ब्लोवर मशीनद्वारे कागद अथवा प्लास्टीक पेपरचे तुकडे उडविण्यावर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बंदी जाहीर करण्यात आली असुन यापुढे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सदर मशीनचा उपयोग झाल्यास संबंधितांवर दंड तसेच फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

     

    शहरात विविध उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरे केले जातात. अश्या प्रसंगी पेपर ब्लोवर मशीनचाही वापर केला जातो ज्याला सीओटू पेपर ब्लोवर मशीन म्हणतात. ज्याद्वारे मोठ्या प्रमाणात कागदांचे अथवा प्लास्टीक कागदांचे तुकडे एका वेळेस हवेत उधळल्या जातात. हे दृश्य पाहण्यास मोहक वाटत असले तरी त्या एका ब्लास्टने मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर जमा होतो, मग रॅली अथवा कार्यक्रमात उपस्थीत लोकांच्या चालण्याने ते कागद रस्त्यावर असे घट्ट चिपकतात कि, ते काढतांना स्वच्छता कर्मचाऱ्यांना फार त्रास होतो.

     

    आज आपल्या शहरात कुठलीही रॅली निघाली तरी ती रॅली संपताच रस्ते स्वच्छ आढळुन येतात कारण मनपा स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेप्रती जागरूक असतात. नागरीक म्हणुन स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना साथ देण्याचे आपलेही कर्तव्य आहे तेव्हा मनपातर्फे आवाहन करण्यात येत आहे कि,सार्वजनिक कार्यक्रम अथवा रॅलीमध्ये पेपर ब्लोवर मशीनचा वापर करून कागद अथवा प्लास्टीक तुकडे हवेत उडवु नये अन्यथा सदर मशीन,सदर वाहन जप्त करण्यात येऊन संबंधितांवर घनकचरा अधिनियमानुसार दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

  • चंद्रपुर मनपात अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र, मनपाने केली पोलिसात तक्रार

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  मनपा आरोग्य विभागात झालेल्या कंत्राटी भरतीदरम्यान अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून दिशाभूल व फसवणुक केल्याबद्दल दोन उमेदवारांविरुद्ध महानगरपालिकेद्वारे सिटी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    जुन महिन्यात मनपा आरोग्य विभागातर्फे एएनएम या पदासाठी कंत्राटी तत्वावर १८ पदे भरण्यासंबंधी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यात अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.पात्र होण्यास इतर कागदपत्रांसोबतच अनुभव प्रमाणपत्र सुद्धा मागविण्यात आले होते. यात शितल सिद्धार्थ मेश्राम यांनी सीएचएल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर यांचे तर प्रगती शंकर ढोले यांनी सिम्स हॉस्पिटल,बजाज नगर नागपुर येथे काम केले असल्याबाबत अनुभव प्रमाणपत्र सादर केले.

     

    मात्र मनपाद्वारे सदर कागदपत्रांची वैधता तपासण्यास या हॉस्पिटल्सला संपर्क केले असता सदर नावाच्या उमेदवाराने येथे काम केले नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. नौकरी मिळविण्यास अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून चंद्रपूर महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणुक केल्याने आरोग्य विभागामार्फत सिटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    रिक्त पदांची अथवा कंत्राटी पदांची भरती दरम्यान कुठल्याही प्रकारचे खोटे कागदपत्रे सादर करून उमेदवारांनी आपल्या भविष्याचे नुकसान न करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपूर शहर विद्रुप करण्याचा प्रयत्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर  –  शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या संबंधिताविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. १ कार्यालयाद्वारे रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    शहरातील आंबेडकर कॉलेज,वरोरा नाका,जनता कॉलेज चौक,मनपा हद्दीतील शासकीय व खाजगी जागा, शहरातील पोस्ट / टेलीफोन पेटी, इलेक्ट्रिक खांब, रस्त्याच्या कडेची झाडे इत्यादींवर मुद्रा लोन योजना,आधार कार्ड लोन, ( ७२१७३१५८७९ ) हा मजकुर असलेले भिंतीपत्रके २५ सप्टेंबर मध्यरात्री शहरात जागोजागी लावले असल्याचे सहायक आयुक्त सचिन माकोडे यांना पाहणीदरम्यान आढळुन आले. संबंधितास भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून पत्रके काढण्यास सांगितले असता अद्याप पावेतो भिंतीपत्रके न काढल्याने संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा १९९५ अंतर्गत फौजदारी गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

     

    चंद्रपूर महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धांद्वारे शहर सुशोभीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे,विशेषतः उड्डाणपुल,शासकीय इमारती येथे माझी वसुंधरा अंतर्गत वॉल पेंटिंगची कामे करण्यात आली आहेत. रंगरंगोटीद्वारे संपूर्ण शहर सुशोभित झाले असताना भिंतीपत्रके लावून शहर विद्रुप करण्याचा प्रयत्नांविरुद्ध मनपाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

     

    भिंतीपत्रके,पोस्टर्स,बॅनरबाजीमुळे शहराच्या विद्रुपीकरणासह शहराच्या सौंदर्यात बाधा येते किंबहुना वाहतुकीसही अडथळा निर्माण होत असल्याने याबाबत उच्च न्यायालय आणि राज्य शासनाने आखुन दिलेल्या सुचनांनुसार कारवाई करण्यात येते. त्यानुसार, परवानगीशिवाय पॅम्प्लेट्स, बॅनर्स, होर्डिंग्ज,कापडी फलक लावणा-यांवर आर्थिक दंडासह कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या धोरणामध्ये करण्यात आली आहे

  • चंद्रपुरात सकाळी ८ वाजता अखेरच्या मुर्तीचे विसर्जन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – गेल्या १० दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात आला.

     

    मोठ्या १२२ मोठ्या मूर्तींसह विसर्जनाच्या दिवसापर्यंत एकूण ६७५६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन यांच्या योग्य नियोजनाद्वारे सोहळा पार पडला. यादरम्यान मनपातर्फे पहाट होण्यापूर्वीच शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात येऊन शहर स्वच्छ करण्यात आले.

     

    विसर्जन सोहळ्यास सहभागी होणारी अनेक मंडळे, लाखोंच्या संख्येने सहभागी होणारी गर्दी, खाद्यान्न पदार्थांचे स्टॉल्स यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो विशेषतः रस्त्यावर पडलेल्या कागदी प्लेटस ज्या गर्दीच्या चालण्याने रस्त्याशी इतक्या मिसळतात की त्यांना अक्षरशः खरडुन काढावे लागते. मनपा स्वच्छता कर्मचारी इतक्या वक्तशीर स्वच्छतेचे काम करतात की सकाळी निघालेल्या नागरीकांना कळणार सुद्धा नाही की रात्री इतका कचरा या रस्त्यावर होता.
    यंदाही सकाळी ६ पूर्वीच सर्व रहदारीचे मार्ग स्वच्छ करण्यात आले होते.

     

    विसर्जन स्थळावर १२२ मोठ्या सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले यातील अखेरच्या मुर्तीचे विसर्जन करण्यास सकाळी ८ वाजले होते. यादरम्यान क्रेनद्वारे उचलुन रीतसर विसर्जन करण्यात आले.आपत्ती व्यवस्थापन चमुने पुर्ण वेळ तैनात राहुन मोठे सर्च लाईट, फायर अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज इत्यादी व्यवस्था सज्ज ठेवल्याने कुठेही अनुचित घटना घडली नाही. ईरई नदी काठावर विसर्जनासाठी ६ घाट उभारण्यात आल्याने कुठेही गर्दी झाली नाही.

    ईरई धरणातून पाणी सोडण्याची व्यवस्था प्रशासनाच्या मार्फत केली गेली असल्याने नदीपात्रात मोठ्या मुर्तीच्या विसर्जनास अडचण गेली नाही. मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी पुर्ण उपस्थीत राहुन विसर्जन सोहळा व्यवस्थीत पार पडेल याची खात्री केली. सार्वजनिक गणेश मंडळ,पोलीस प्रशासन,जिल्हा प्रशासन व नागरीकांनी विसर्जन सोहळा यशस्वी पार पाडण्यास सहकार्य केले याबद्दल मनपा प्रशासनाने आभार व्यक्त केले.

  • चंद्रपूर नागपूर मार्गावर वाढतंय अतिक्रमनाचे जाळं

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दिवसेंदिवस चंद्रपूर शहराचा विस्तार वाढत असून नागरिकांच्या मूलभूत सोयी काही प्रमाणात अपुऱ्या पडत आहे. सोबतच शहरात अतिक्रमण सुद्धा झपाट्याने वाढत आहे.

     

    चंद्रपूर शहरातील गोल बाजार ते जटपुरा गेट परिसर असो की वरोरा नाका चौक ते बापट नगर याठिकाणी आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे.

     

    काही दिवसांपूर्वी चंद्रपूर ते नागपूर महामार्गावर शिक्षिकेचा रस्ते अपघातात बळी गेला होता, कारण रस्त्यावर चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ व काही दुकान चालकांनी रस्त्यावर केलेलं अतिक्रमण त्या अपघाताला कारणीभूत होते.

     

    त्या अपघातानंतर सुद्धा चंद्रपूर मनपा प्रशासनाने रस्त्यावर असलेल्या अतिक्रमनावर काही ठोस कारवाई केली नाही, विशेषतः चंद्रपूर नागपूर मार्ग हा अनेक दुकान चालकांनी आपल्या दुकानाच्या हद्दीत घेतला आहे.

    या मार्गावरील अतिक्रमण मनपा प्रशासनाने तात्काळ हटवून चंद्रपूर नागपूर महामार्ग मोकळा करून भविष्यात होणाऱ्या अपघाताला टाळण्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.