Tag: चंद्रपूर महानगरपालिका

  • गोलबाजारातील तो संघर्ष अखेर आमदार धानोरकरांनी सोडविला

    News34 chandrapur

    चंद्रपूर : गोल बाजारातील महानगर पालिकेच्या मालकीच्या गाळेधारकांवर लादलेल्या अन्यायकारक कराच्या विरोधात ११६ गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती. हि अन्यायकारक भाडेवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी केली होती.

     

    सदर याचिकेचा निकाल अद्यापही न आल्याने मनपाने लादलेल्या गाळेधारकाराच्या करात व करावरील व्याजात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन गाळेधारकांवर लाखो रुपयाचा कर थकीत झाला. या विषयात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पुढाकार घेऊन मनपा व गाळेधारक यांच्यात समन्वय घडवून आणून सदर विषयाचा तिढा सोडविला.

     

    वारसान साठी असलेले हस्तांतरण शुल्क सुद्धा कमी करण्यात यावे. दुकान गाळेधारकांसाठी भाडे व इतर शुल्काचा भरणा नियमित व्हावा या दृष्टीने मनपातर्फे NASH प्रणाली सुरु करण्यात आली असुन नियमित कर भरणा करणाऱ्या गाळेधारकांना रेंटमध्ये ५ टक्के सुट मिळणार आहे.सदर योजना चांगली असुन गाळेधारकांनी याचा फायदा घ्यावा व भाडे व इतर शुल्काचा भरणा नियमित करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच मनपाच्या उत्पन्नाचे स्रोत मर्यादीत असल्याने नागरीकांनीही कर नियमित भरावा. असे आवाहनही त्यांनी केले.

     

    मागील अनेक वर्षांपासून मनपाच्या अंतर्गत येणारे गोलबाजार येथील गाळे गाळेधारकांना देण्यात आले आहे. त्यावर नगरपरिषद अस्तित्वात असतांना कर आकारणी करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये चंद्रपूर मनपा अस्तित्वात आली. मनपा अस्तित्वात आल्यानंतर गोलबाजारातील गाळेधारकांवर २०० पटीपेक्षा अधिक करवाढ केली.

     

    या करवाढीविरोधात ११६ गाळेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. परंतु सदर प्रकरणाच्या निकाल न लागल्याने गाळेधारकांचा कर वाढत गेला. मनपाने व्याजाच्या बोजा वाढविला. याप्रकरणी दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात बैठक घेऊन सदर प्रकरणी तिढा सोडविण्याचा प्रयत्न फ़ेब्रुवारी २०२३ मध्ये केला होता. परंतु त्यावेळी काही तांत्रिक अडचणीमुळे सदर प्रकरण मार्गी लागले नाही.

     

    या प्रकरणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधानसभेत देखील गाळेधारकांनी बाजू मांडली होती. त्यानंतर प्रधानसचिवाच्या दालनात आयुक्त व गाळेधारक प्रतिनिधी यांच्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पुढाकाराने बैठक संपन्न झाली. त्यानंतर गाळेधारकांनी मनपा विरोधात दाखल केलेली याचिका मागे घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे आज मनपा आयुक्तांच्या दालनात बैठकीचे आयोजन करून आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात गाळेधारकांच्या प्रतिनिधींनी न्यायालयात दाखल असलेली याचिका मागे घेण्यासंदर्भातील पत्र आयुक्तांना दिले.

     

    आयुक्तांनीं विशेष बाब म्हणून सदर प्रकरणी ११६ गाळेधारकांवरील गाळ्यांच्या करावरील संपूर्ण १०० व्याज माफ करण्याचे पत्र गाळेधारकांना दिले. व उर्वरित गाळेधारकांच्या संदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून १५ दिवसात गाळेधारकांना न्याय देण्याचे आश्वासन आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले.

    याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त मंगेश खवले, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, कर विभाग प्रमुख अनिल घुले, उपायुक्त बोबाटे, कर विभागाचे आत्राम, कुचनकर, राहुल चौधरी तसेच गाळेधारकांचे प्रतिनिधी सुरेश खनके, प्रशांत येनूरकर, अब्दुल इजाज, मोंटू मानकर यांची उपस्थिती होती.

  • मालमत्ता व पाणी कराचा भरणा करायचा? पण सुट्टी आली आता काय?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ३० सप्टेंबरपर्यंत शासकीय सुटीच्या दिवशीही मनपाची कर संबंधित कार्यालये सुरु राहणार असुन एकमुस्त कराचा भरणा करणाऱ्यांना १० टक्के सुट देण्यात येत असल्याने त्वरीत कराचा भरणा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

     

    नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन म्हणुन ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात १०% सुट तर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ टक्के सूट योजना मनपातर्फे जाहीर करण्यात आली आहे.

     

    या महिन्यात १६,१७,२३,२४ व ३० सप्टेंबर अश्या ५ शासकीय सुट्ट्या असुन सुटीच्या दिवशी अनेकांना विशेषतः नौकरदार वर्गाला कर भरणे सोयीचे जाते.अधिकाधिक कराचा भरणा व्हावा यादृष्टीने कर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला असुन सुटीच्या दिवशीही काम करण्याचे निश्चित केले आहे.

     

    करभरणा हा प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन अथवा www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर  https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे तसेच ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) यांचाही पर्याय मनपाने उपलब्ध करून दिलेला आहे. एकुण मालमत्ता करात सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर व पाणी कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपुरात 925 किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त

    News34 chandrapur

    चंद्रपूर  – चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे बिनबा गेट परिसरातील शांती ट्रेडर्स या गोदामावर धाड टाकुन ९२५ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन प्लास्टीकचा साठा करणाऱ्या सरवन सिंग राठोड यांच्याकडुन ५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

    सदर कारवाई आयुक्त यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अमोल शेळके,प्रदीप मडावी,संतोष गर्गेलवार,शुभम खोटे      यांच्या उपस्थितीत अतिक्रमण पथक व स्वच्छता विभागातर्फे करण्यात आली असुन सदर गोदाम मालकास पुन्हा प्लास्टीकचा साठा व वापर न करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.

     

    प्लास्टीक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठाने, दुकानांवर कारवाई सुरु आहे.दरम्यान प्लास्टीक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जाणार आहे.

     

    एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

     

    चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिलेले असुन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत मनपाच्या तीनही झोननिहाय कारवाईत संयुक्तपणे मोहीम राबवून शहरातील व्यवसाय प्रतिष्ठाने, दुकाने यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

  • 100 रुपयात महिनाभर चालवा सायकल

    News34 chandrapur

    चंद्रपूर  – राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर शहरात इंधनविरहित पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महानगरपालिकेने महत्वाचे पाउल उचलले आहे. शहरात सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे व नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, यासाठी शहरात राजीव गांधी उद्यान येथे ‘ शेअरिंग बायसिकल ‘ (सार्वजनिक सायकल सुविधा) हा उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार ७ सप्टेंबर रोजी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आला.  Chandrapur municipality news

    100 रुपयात सायकल चालवा

    या उपक्रमाअंतर्गत २० सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या असुन राजीव गांधी उद्यान पठाणपुरा येथे नोंदणी व मासिक शुल्क भरून नागरिकांना भाडेतत्त्वावर सायकलींचा वापर करता येणार आहे. यासाठी अगदी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असुन केवळ १०० रुपयात महिनाभर सायकल चालविता येणार आहे.

    सायकल प्रेम जागविण्याचा नवा मार्ग

    आज शहरात वाहनांची गर्दी होत असतांना अनेक गरजुंना वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत किंबहुना ते घेऊ शकत नाही. अश्यावेळेस इतर सार्वजनिक वाहतुकींच्या साधनांचा वापर करण्याऐवजी सायकल हा कुठल्याही प्रकारचे वायु प्रदूषण न करणारा सोपा पर्याय आहे. तसेच माफक शुल्कात उपलब्ध असल्याने सहज वापरण्याजोगा आहे.बाईक प्रेमी तरुणाईत सायकलप्रेम जागविण्याचा दृष्टीने मनपातर्फे सायकल शेअरिंग प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे.

     

    पैश्याची होणार बचत

    शहरात मोठ्या प्रमाणात कामगार, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी येत असतात. रिक्षा किंवा इतर साधनांसाठी मोजाव्या लागणाऱ्या पैशांपेक्षा हा उपक्रम अधिक किफायतशीर ठरणार असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

     

    याप्रसंगी माजी नगरसेवक नंदू नागरकर,अश्विनी अलगमवार,नीता आढोणे,वैशाली आढोणे,अनुराधा काळमेघ,वर्षा सोनटक्के रेखा रामटेके,रोहिणी काळमेघ,वर्षा खनके,पवन पुथोडे,प्रगती गुळकरी,पुष्पा नागरकर,प्रकाश चहारे,अनिता दुरटकर,रवींद्र नेरकर, अंजली साठोणे,प्राप्ती दहीवडे,माधुरी मेश्राम व परिसरातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.