Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील दीक्षाभूमी मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे दि. 15 व 16 ऑक्टोबर 2023 रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यास जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. यादरम्यान, वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यादृष्टीने चंद्रपूर शहरातून दीक्षाभूमी परिसराकडे जाणाऱ्या रहदारीचा मार्ग दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दि. 17 ऑक्टोबर 2023 च्या सकाळी 8 वाजेपर्यतच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्याचा तसेच सर्व प्रकारच्या वाहनाची रहदारी वळविण्याचे आदेश पोलीस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांनी निर्गमित केले आहे.

     

    अवजड वाहनाकरीता रहदारीचा मार्ग:

    या कालावधीदरम्यान गरजेनुसार नागपूरकडून, चंद्रपूरकडे येणारी सर्व प्रकारची जड वाहने हॉटेल कुंदन प्लाझा येथुन सि.टी.पि.एस मार्गे नेहरू नगरवरून मुल रोडला जातील. मुलकडून, नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प-सावरकर चौक-वरोरा नाका उड्डाणपुल या मार्गाने जातील तसेच गरजेनुसार एम.ई.एल. नाका चौक येथे थांबविण्यात येतील. बल्लारशाकडून, नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प पलीकडे डि.आर.सी.बंकर, बायपास रोड येथे दिक्षाभूमी मार्गावरील गर्दी पाहुन थांबविण्यात येतील.

     

    शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरिता रहदारी व्यवस्था:

     

       जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक- टि.बी. दवाखानापर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी-विश्रामगृह-जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. त्यामुळे नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळुन) वरोरा नाका- उड्डानपुल-सिध्दार्थ हॉटेल-बस स्टँड-प्रियदर्शनी चौकमार्गे शहराकडे जातील. रामनगर, मित्रनगर, आकाशवाणी, स्नेहनगर आणि वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी-दवा बाजार-संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने (जड वाहने वगळुन) घेवुन जावीत. त्याचप्रमाणे जटपूरा गेट कडून, रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी-प्रियदर्शनी चौक-बस स्टॅंड-सिद्धार्थ हॉटेल-उड्डानपुल मार्गे नागपूर कडे जातील.

     

    दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक-जुना वरोरा नाका ते आय.टी.आय. कॉलेज तसेच वरोरा नाका चौक-मित्रनगर चौक ते संत केवलराम चौक आणि मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर “नो पार्कींग व नो हॉकर्स झोन” म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतेही वाहने, हॉकर्स लावण्यात येवू नये.

     

    दीक्षाभूमी ते संत केवलराम चौक तसेच दीक्षाभूमी ते जिल्हा स्टेडीयम दरम्यान राहण्याऱ्या रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजुला उभी न करता घोषित करण्यात आलेल्या पार्किंगमध्येच ठेवावी. आयटीआय कॉलेज ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत तसेच वरोरा नाका दर्ग्याच्या उजव्या बाजुने जाणारा रस्ता-पुट्ठेवार हॉस्पीटल- बुक्कावार हॉस्पीटल-वरोरा नाका ते पिंक प्लॅनेटपर्यंत “नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन” म्हणुन घोषीत करण्यात येत आहे.

     

    दीक्षाभूमी सोहळ्यास येणाऱ्या नागरिकांकरिता वाहन पार्कींग स्थळ:

    नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरिता:-

    शकुंतला लॉन, जनता कॉलेज पटांगणजनता कॉलेज समोरील ईदगाह मैदानवरोरा नाका पिंक प्लनेटच्या उजव्या बाजूला श्री. भटीया यांची जागा या ठिकाणी वाहने पार्क करावीत.

     

    शहरातुन दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरिता:-

    सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन, न्यु इंग्लिश ग्राउंड या ठिकाणी वाहने पार्क करावीत.

     

    वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातुन दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनांकरीता:-

     

    लोकमान्य टिळक हायस्कुल(जिल्हा स्टेडीयमच्या मागे), जिवन साफल्य गृहनिर्माण सहकारी संस्था (मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे) याठिकाणी वाहने पार्क करावीत.

     

    मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकूम परिसरातून येणाऱ्या वाहनाकरिता:-

     

                कृषी भवन जवळील मैदान/ ट्रॅव्हल्स स्टॅन्ड याठिकाणी वाहने पार्क करावीत.

    तरी, धम्मचक अनुप्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी सर्व बौध्द बांधवांनी व अनुयायांनी वाहतुक व्यवस्थेचा वापर करून घोषीत पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवून वाहतुक व्यवस्थेचे पालन करावे, तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

  • राजुरा हत्याकांडातील आरोपीला 2 तासात अटक

    News34 chandrapur

    राजुरा – 9 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या 28 वर्षीय संदीप निमकर या युवकाचा मृतदेह 10 ऑक्टोबरला माथरा रोड जवळील झुडपी जंगलात आढळला, त्याच्या डोक्यावर दगडाने वार केल्याच्या खुणा होत्या, घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार घटनास्थळी दाखल झाले होते.

     

    राजूरा शहरालगतच्या रामपुर येथे संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. काल सोमवारी रात्री आठ वाजता घरून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने राजूरा पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी दाखल केली होती. तो घरी परत न आल्याने रात्रीपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी शोधाशेध केली, परंतु रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. तो मित्रांसोबत नेहमी जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोध घेत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ झुडपी जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.

     

    राजुरा पोलिसांनी हत्या प्रकरणी तिघांना ताब्यात घेत विचारपूस सुरू केली होती, मात्र स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर करीत हत्या प्रकरणातील सर्व बाबीचा तपास करीत आरोपीला अवघ्या 2 तासात अटक केली.

     

    हत्या कशी झाली?

    9 ऑक्टोबर ला संदीप व आरोपी हे दोघे माथरा रोडवरील जंगलात दारू पिण्यासाठी गेले होते, दारू पीत असताना दोघांचा वाद झाला आणि आरोपीने जवळील दगड हातात घेत संदीपच्या डोक्यावर जोरात मारले, या प्रहारात संदीप चा जागीच मृत्यू झाला, आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

    विशेष म्हणजे आरोपी व मृतक हे दोघे घनिष्ठ मित्र होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात 28 वर्षीय युवकाची हत्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीतील वॉर्ड क्रमांक दोन मधील साई मंदिर जवळ राहत असलेला एका युवकाचा रामपूर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना मंगळवारी 10 ऑक्टोबर ला सायंकाळी उघडकीस आली आहे. संदीप देवराव निमकर (वय २८) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

     

    राजूरा शहरालगतच्या रामपुर येथे संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. सोमवारी रात्री आठ वाजता घरून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने राजूरा पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी दाखल केली होती. तो घरी परत न आल्याने रात्रीपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली, परंतु रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही.

     

    तो मित्रांसोबत नेहमी जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोध घेत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ झुडपी जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. लगेच सदर घटनेची माहिती राजुरा पोलिस ठाण्यात देण्यात आली. ठाणेदार योगेश पारधी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

     

    राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीत काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी राजुरा शहरातील नाका नंबर तीन येथे झालेल्या खुनात रामपुर येथीलच आरोपी निघाले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल, कोळसा व भंगार चोरीचे प्रकरण समोर येत आहेत. तसेच या ठिकाणी जुगार व सट्टा चालतो. या परिसरातील युवक अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत. याच प्रकरणातून ही घटना घडल्याचे सांगितल्या जात आहे. मृतक संदीप निमकर यांच्या घराशेजारी असलेल्या साई मंदिर समोर मोठ्या प्रमाणत अवैद्य धंदे सुरू आहेत. जुगार, सट्टा चालतो. माथरारोडवरील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात कोळसा, डिझेल चोरीसह जुगार खेळल्या जात आहे.

     

    राजुरा शहर हे गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून अस्तित्वात येत आहे, गोळीबार प्रकरण असो की गांजा तस्करी, कमी वयाची मुले आता बंदूक खेळण्यासारखे जवळ ठेवतात, विशेष म्हणजे राजुऱ्यात कोळसा तस्करांचे मोठे नेटवर्क आहे, दिवसाढवळ्या या ठिकाणी कोळशाची तस्करी केल्या जाते, पण कायद्याचे रक्षक सुद्धा यावर कारवाई करणे टाळतात.

     

  • बनावट कागदपत्रे वैध ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – आमदार सुधाकर अडबाले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात प्रकल्‍पग्रस्‍त म्‍हणून नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या ३२ प्रपत्र धारकांवर मूळ प्रकल्‍पग्रस्‍त उमेदवारांनी दाखल केलेल्‍या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, सदर प्रपत्र वैध ठरविणाऱ्या पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच सिटीपीएस मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्‍यांच्यावर तात्‍काळ चौकशी करून कारवाई करा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले.

     

    चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. यात प्रकल्पग्रस्त म्हणून काही लोकांनी खोटी कागदपत्रे बनवून नोकऱ्या मिळवल्या. यावर सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे व प्रकल्पग्रस्तांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुनर्वसन विभागाने चौकशी केली असता १२८ पैकी ७२ प्रपत्र धारकांना अपात्र ठरविण्यात आले. त्यातील ३२ बनावट प्रपत्र धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रत्यक्षात ज्या विभागाने प्रपत्र वैध ठरवले त्याच विभागाने ३२ प्रपत्र धारकांना अपात्र ठरविले. याचा अर्थ बनावट कागदपत्रे बनवितांना मोठा अर्थ व्यवहार झाला असण्याची दाट शक्‍यता आहे. यात दलालांची मोठी टोळीही सक्रीय असल्‍याची माहिती आहे.

     

    या प्रकरणात बनावट कागदपत्रे वैध ठरवणाऱ्या चंद्रपूर पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच सिटीपीएस मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्‍न दाखल केला होता. आमदार अडबाले यांनी दाखल केलेल्‍या प्रश्‍नावर सीटीपीएस मधील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्‍याचे ऊर्जामंत्री यांनी निवेदन सादर केले. पण पुनर्वसन कार्यालयातील कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे आमदार अडबाले यांनी १० ऑक्‍टोबर २०२३ रोजी पुनर्वसन व सीटीपीएस अधिकाऱ्यांसह जिल्‍हाधिकारी यांच्या उपस्‍थितीत बैठक लावली.

     

    चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात गेलेल्‍या मूळ जमिनधारकास डावलून दलालांमार्फत बनावट कागदपत्रे बनविणारे मोठे रॅकेट सक्रीय आहे. या रॅकेटच्या माध्यमातून अनेकांनी बनावट कागदपत्रे बनवून नोकरी लाटली. प्रत्‍यक्षात जमीन गेलेल्‍या अनेकांना अजूनही नोकरी मिळाली नाही.

     

    आज पार पडलेल्‍या बैठकीत तत्‍कालिन पुनर्वसन अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी लावण्यासंदर्भात विभागीय आयुक्‍तांकडे प्रस्‍ताव सादर केल्‍याचे सांगण्यात आले. मूळ प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष असल्‍याने बनावट कागदपत्रे वैध ठरविणाऱ्या चंद्रपूर पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच सिएसटीपीएस मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांवर तात्‍काळ चौकशी करून कारवाई करावी तसेच या प्रकरणातील रॅकेटवर सुद्धा कारवाई करावी, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी जिल्‍हाधिकारी यांना दिले.

     

    या बैठकीला अपर जिल्‍हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्‍हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जटाळे, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे, भास्‍कर सपाट, पप्‍पू देशमुख, रवी झाडे, आत्‍माराम देवतळे व सिटीपीएस व पुनर्वसन विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची उपस्‍थिती होती.

  • चंद्रपूर शहरातील कचरा संकलन 2 दिवसापासून ठप्प

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 5 दिवसापासून चंद्रपूर मनपा अंतर्गत काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलनाने आज आक्रमक पवित्रा घेतला, कचरा संकलन करणाऱ्या वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

     

    हक्काच्या किमान वेतनासाठी कामगार आपली लढाई लढत आहे, विशेष म्हणजे मागील 5 दिवसापासून स्थानिक आमदार व मंत्री यांनी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही, हे विशेष.

     

    कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन मागील 2 दिवसापासून बंद आहे, शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरत आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कामगारांच्या आंदोलनाचा लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडच्या सदस्यांनी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेतली.

     

    भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेतर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मनपाला निवेदन सादर केले, ज्यामध्ये संपावर बसलेले कामगार यांच्या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा जेणेकरून शहरात कचरा संकलनाला सुरुवात होईल, आंदोलनामुळे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     

    घंटागाडी कामगारांचे आंदोलन सुरू राहिले तर शहरातील नागरिक आपल्या घरातील कचरा चंद्रपूर मनपा कार्यालयात टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा डॉ.गावतुरे यांनी यावेळी दिला आहे.

    मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी छाया सोनूले, संगीता पेटकुले, काळूबाई चौधरी, आदींची उपस्थिती होती.

     

    कामगारांच्या हक्काच्या मागणीवर मनपा प्रशासन डोळेझाक करीत आहे ही गंभीर बाब असून त्यांची मागणी रास्त आहे, कामगारांना न्याय मिळायला हवा अशी प्रतिक्रिया डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी दिली.

  • वर्षभरात चंद्रपूर महावितरणचे 43 हजार 833 नवे वीज ग्राहक

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात एप्रील २२ ते २० ऑक्टोबर २०२३ या वर्षभराच्या कालावधीत विविध वर्गवारीतील नविन ४३ हजार ८३३ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या. चंद्रपूर मंडळात २४ हजार २७५ तर गडचिरोली मंडळातील १९ हजार ५५८ ग्राहकांना वीजजोडण्या देत महावितरणच्या माध्यमातून प्रकाश पोहोचला.

    देण्यात आलेल्या या लघूदाब वीजजोडण्या
    चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर मंडळात घरगुती २६ हजार ८४२, वाणिज्यिक ६ हजार २५३, औदयोगिक ५४१, सरकारी कार्यालये ९४०, पाणिपुरवठा १५१, पथदिवे ९६, कृषिपंप ७ हजार ६३१, कुक्कूटपालन ६१, इतर लघूदाब २०८ व तात्पुरत्या १ हजार १०७ अशा एकंदरीत ४३ हजार ८३३ वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या
    चंद्रपूर मंडळात घरगुती १४ हजार ८४०, वाणिज्यिक ४ हजार ४५६, औदयोगिक ३३५, सरकारी कार्यालये ५९१, पाणिपुरवठा ७७, पथदिवे ४०, कृषिपंप ३ हजार ५९१, कुक्कूटपालन ३१, इतर लघूदाब १४७, व तात्पुरत्या १६४ अशा एकंदरीत २४ हजार २७५ वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या.

     

    गडचिरोली मंडळात घरगुती १२ हजार २, वाणिज्यिक १ हजार ७९७, औदयोगिक २०६, सरकारी कार्यालये ३४९, पाणिपुरवठा ७४, पथदिवे ५६, कृषिपंप ४ हजार ४० , कुक्कूटपालन ३०, इतर लघूदाब ६१, व तात्पुरत्या ९४३ अशा एकंदरीत १९ हजार ५५८ वीजजोडण्या गडचिरोली मंडळात देण्यात आल्या.

    तसेचं उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत ४ हजार २८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ७४ वीजजोडण्या देण्यात आल्या आहे.

    केंद्र शासनाच्या अतिमहत्वाकांक्षी अशा उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत या योजणेच्या सुरुवतीच्या वर्षापासून म्हणजे २०१८ पासून ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरुन प्रलंबित असलेल्या वीजजोडण्या देण्याचे निर्धारीत लक्ष पूर्ण करीत चंद्रपूर मंडळात २ हजार ५५१ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून २ हजार ५८४ वीजजोडण्या देण्यात आल्या. तर गडचिरोली मंडळात, १ हजार ४५८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून १ हजार ४७२ वीजजोडण्या देण्यात आल्या.
    उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत ४ हजार २८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ७४ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

     

    ग्राहकांप्रति कर्तव्य पार पाडित आपली जबाबदारी ओळखून महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना सुरळीत सेवा प्रदान करण्यास नेहमी तत्पर असतात. देण्यात आलेल्या वीजजोडण्यामुळे ग्राहकांच्या जीवनात प्रकाश पडला आहे. परंतु थकबाकीमुळे महावितरणला ग्राहकांच्या दारात वसुलीसाठी जावे लागत आहे. तेव्हा ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणा करुन महावितरण्ला सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीने घेतला दारूबंदीचा ठराव

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही – सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरवाही येथे अवैध दारू तसेच अवैध धंदे सुरु आहे. यामुळे येथील नागरिकांसह महिला, मुले झाले आहे आले. दारामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेत ग्रामसभा बोलावली या सभेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले यामध्ये गावातील अवैध धंदे तसेच दारुबंदीचा ठराव पारित करण्यात आला.

     

    तसेच गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी व गावात तंटे होणार नाही याची काळजी घेण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले.

    विशेष ग्रामसभेला सरपंच नीता बोरकर, पोलिस पाटील रागिनी मुंगमोडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष परमानंद बोरकर, ग्रामपंचायत सचिव अतुल मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य अशोक मसराम, राजीव मसराम, माजी सरपंच सदाशिव बोरकर, अंगणवाडी शिक्षिका, युवक महिला व नागरिक उपस्थित होते. तसेच विशेष उपस्थित म्हणून नवरगाव बिटचे बीट अंमलदार तसेच पोलिस उपस्थित होते.

  • चंद्रपुरात घंटागाडी कामगारांचे आंदोलन पेटले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – केंद्र शासनातर्फे चंद्रपूर मनपाला स्वच्छता वर्गात पुरस्कार दिल्या गेला होता मात्र यामागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या घंटागाडी कामगारांना हक्काच्या किमान वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे.

     

    शहर स्वच्छ रहावे यासाठी संपूर्ण दिवस शहरातील कचरा संकलन करण्याचे मोलाचे कार्य घंटागाडी कामगार करतात मात्र या कामाचा मोबदला म्हणून त्यांना किमान वेतन दिल्या जात नाही, कंत्राटदार बदलला व नव्या कंत्राटदाराने कामगारांच्या किमान वेतनावर डल्ला मारण्याचे काम केले.

     

    आम्हाला किमान वेतन द्या या मागणीसाठी संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेने अनेकदा पाठपुरावा केला मात्र त्यांच्या मागणीकडे मनपा व संबंधित कंत्राटदाराने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने 6 ऑक्टोबर पासून घंटागाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले.

    मागील 5 दिवसापासून सुरू असलेले कामबंद आंदोलन मनपाद्वारे दडपण्याचा प्रयत्न केला गेला, कामगार कामावर येत नसल्याने शहरातील कचरा संकलन ढासळले, कंत्राटदाराने यावर शक्कल लढवीत कामगारांची पर्यायी व्यवस्था केली.

     

    ही बाब कामबंद आंदोलकांना कळताच त्यांनी सरळ कचरा संकलन वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे 10 ऑक्टोबर ला सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले, आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

     

    मनपा द्वारे आता या ठिकाणी बैठक घ्या आम्ही आता हटणार नाही, हा आमच्या हक्काचा लढा आहे, अशी निर्णायक भूमिका घंटागाडी कामगारांनी घेतल्याने मनपा आता काय भूमिका घेणार याकडे कामगार संघटनांचे लक्ष लागले आहे.

  • जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला जिवंत जाळले

    News34 chandrapur

    मालेगाव/वाशीम – शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे 54 वर्षीय जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता शाळेत जाण्यासाठी निघाले, मात्र वाटेत अज्ञातांनी शिक्षकांवर पेट्रोल टाकत जिवंत जाळले, या घटनेत शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे.

     

    बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक 54 वर्षीय दिलीप धोंडूजी सोनुने हे नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी सकाळी 10 वाजता निघाले होते, ते आपल्या दुचाकी वाहन क्रमांक Mh37 y 1438 शाळेत जाण्यासाठी निघाले मात्र वाटेत त्यांचा मृत्यू उभा होता हे त्यांनाही माहीत नव्हते.

     

    4 किलोमीटर अंतर गाठल्यावर कोलही गावाजवळ अज्ञात हल्लेखोर मास्तरांची वाट बघत होते, सोनुने त्या ठिकाणी पोहचताच त्यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला, अचानक झालेल्या या हल्ल्याने सोनुने दुचाकी वाहनवरून खाली कोसळले, गंभीर अवस्थेत ते जीव वाचविण्याचा आक्रोश करू लागले मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकत जिवंत जाळले.

     

    नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली, पोलीस व तहसीलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, गंभीर अवस्थेत असलेल्या सोनुने यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शिक्षक सोनुने यांचा मृत्यू झाला.

     

    पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे, मात्र सोनुने यांच्यावर हल्ला का करण्यात आला यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • संस्कृतीचा समृध्द मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याची गरज – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार त्यांनी केलेली सेवा समाज कधीही विसरणार नाही. डॉक्टरी पेशात असणाऱ्या डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी ख-या अर्थाने रुग्णसेवा केली. आज त्यांच्या जयंती निमित्त आपण आयोजित केलेले भजन संमेलन त्यांना आपण वाहिलेली सर्वोत्तम आदरांजली आहेच सोबतच संस्कृतीचा समृद्ध मार्ग जोपासण्यासाठी भजन मंडळांना सक्षम करण्याचा संकल्प त्यांच्या जयंती दिनी आज आपण करुया असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

     

    अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम श्री गुरुदेव सेवा शहर शाखा चंद्रपूर च्या वतीने लोकसेवक डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंती निमित्त भव्य भजन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सर्वाधीकारी गुरुकुंज आश्रम मोझरी चे लक्ष्मणराव गमे दादा, भागवताचार्य मनिषजी महाराज, गुरुकुंज आश्रम मोझरी चे उपसर्वाधीकारी दामोधर पाटील दादा, गुरुकुंज आश्रम मोझरी चे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ, प्रांताधिकारी विठ्ठलराव सावरकर, जिल्हा सेवाधिकारी अॅड. दत्ता हजारे, अशोक चरडे, जिल्हा प्रचार प्रमूख रुपलाल कावळे, जिल्हा प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार, राम राउत, अंकुश आगलावे, डॉ. गोपाल मुंधडा, प्रेमलाल पारधी, अॅड. किरण पाल, वासुदेव सादमवार बबनराव धर्मपूरीवार आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

     

    यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, अध्यात्माकडुन दुरावत चाललेल्या समाजाला भजन किर्तनातून आध्यात्माचे महत्व आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृतीचे काम गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने केल्या जात आहे. चांगल्या समाजाच्या निमिर्तीसाठी गुरुदेव सेवा मंडळाचे सेवक काम करत आहे. आपल्या वतीने समाजाच्या शेवटच्या भागापर्यंत भजन किर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश पोहचविण्याचे काम केल्या जात असल्याचे यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले.

     

    आपण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भजन महोत्सवाला सुरवात केली आहे. या महोत्सवात विविध भाषीय भजन मंडळे मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत. विशेषत: लहान मुलांचे भजन मंडळेसुध्दा यात सहभागी होत आहे ही विशेष बाब असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अनेक भजन मंडळांकडे भजनासाठी लागणारे साहित्य नाही. त्यामुळे काही मंडळांना आपण ते उपलब्ध करुन दिले आहे.

     

    भजनातून मानवातील नकारात्मकता नष्ट होऊन त्याच्यात सकारात्मकता निर्माण होते. इच्छाशक्ती प्रबळ होते. मनातील वाईट वृत्तीचा नाश होतो. त्यामूळे भजन – किर्तनाची आजही समाजाला गरज असल्याचे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला अनेक भजन मंडळांची व नागरिकांची उपस्थिती होती.