Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार

    चंद्रपूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्याघ्र सफारी प्रकल्प करणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विदर्भ ही वाघांची भूमी आहे; जैवविविधतेने संपन्न असलेल्या या भूमीत देश विदेशातील पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येने येतात; याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे जागतिक दर्जाची व्याघ्र सफारी प्रकल्प करण्याचा संकल्प असून यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सल्लागारांची मदत देखील घेता येईल; यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि परिसरात रोजगार निर्मिती व अर्थकारण मजबूत होण्यास निश्चित मदत होईल यासाठी वन अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करावे अश्या सूचना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. नागपूर येथे यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

     

    या बैठकीला प्रधान सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी, वनबलप्रमुख श्री शैलेंद्र  टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री महिप गुप्ता, वनविकास महामंडळाचे सिजिएम श्री संजीवकुमार, श्री प्रशांत झुरमुरे, श्री कल्याणकुमार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी एक सादरीकरण ना. सुधीर मुनगंटीवार यांना दाखविण्यात आले.

    चंद्रपूर-मूल मार्गावर वनप्रबोधिनी जवळील प्रशस्त वनक्षेत्रात व्याघ्र सफारी प्रकल्प व्हावा असा संकल्प असून केवळ व्याघ्र सफारीपुरता हा मर्यादित न ठेवता इतर वन्यजीवांचाही या सफारीत समावेश व्हावा यासाठी प्रयत्न व्हावा; अश्या प्रकल्पातून संशोधन व्हावे अशीदेखील अपेक्षा यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ना. मुनगंटीवार म्हणाले कि, सर्व वयोगटातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवीनतम, अत्याधुनिक दर्जाचे विरंगुळा केंद्र या ठिकाणी व्हावे यादृष्टीने नियोजन करणे आवश्यक असून तेथे असलेल्या वन्यजीवांची माहीती, त्यावर एखादा माहितीपूर्ण शो पर्यटकांसाठी करता येईल का, याचाही विचार करावा अशा सूचना यावेळी दिल्या.

  • पंचनामा – शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असलेला चंद्रपुरातील आनंद मेळा

    पंचनामा – शासनाच्या परवानगी शिवाय सुरू असलेला चंद्रपुरातील आनंद मेळा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शहरात आनंद मेळा उघडण्यासाठी विविध विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतरच ती सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र या विभागांची परवानगी न घेताच चांदा क्लब ग्राउंड येथे आनंद मेळा सुरू असून यातून दररोज लाखोंची कमाई केली जात आहे. प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आनंद मेळाच्या मालकाशी हातमिळवणी केल्याने शासनाचा महसूल तर बुडतच आहे मात्र लहान मुले आणि सामान्य लोकांची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे.

     

    40 ते 50 लाखांची उलाढाल

    चंद्रपूर शहरात वर्षातुन दोन ते तीनदा आनंद मेळा लागतो. जयंत टॉकीज जवळ, चांदा क्लब ग्राउंड आणि विद्या निकेतन शाळेजवळ हा आनंद मेळा लागतो. यामध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणा, झुले, टॉय ट्रेन आणि अनेक साहसी खेळ असतात. इथे पार्किंगचे पैसे वेगळे, तिकीट वेगळी आणि ज्या साहसी खेळाचा आनंद लुटायचा आहे त्याचे वेगळे पैसे. एकूण ह्याचा खर्च बघता सामान्य माणसाच्या खिशाला हे परवडण्यासारखे नाही इतकी याची तिकीट आहे. तरी सामान्य माणूस काटकसर करून एक दिवस तरी आपल्या मुलांना येथे घेऊन जातो. एका आनंद मेळ्याचा एका सत्राचा गल्ला हा 40 ते 50 लाखांचा आहे. इतकी बक्कळ कमाई यातून केली जाते.

     

    परवानगी मिळण्याआधीच मेळा सुरू

    चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंड येथे 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान एक महिन्याच्या कालावधीत आनंद मेळा होणार होता. तो सुरू करण्यासाठी महानगरपालिका, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि जिल्हा सामान्य प्रशासन विभागाकडून याची परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय हा मेळा सुरू करता येत नाही. त्यातही जिल्हा सामान्य प्रशासन विभागाची परवानगी अतिमहत्त्वाची आहे. सर्वांची परवानगी घेतल्यानंतरच आणि त्याची पडताळणी केल्यानंतरच जिल्हा सामान्य प्रशासन विभाग याची परवानगी देते. मात्र याची पडताळणी करण्यात आली नाही. असे असताना आनंद मेळा सर्रासपणे सुरू आहे. मेळा संपण्यासाठी केवळ दहा दिवस उरले आहेत तरी परवानगी मिळण्याची प्रकिया पूर्ण झालेली नाही.

     

    मेळ्याच्या मालकाकडून खोटे कागदपत्रे सादर

    आनंद मेळा हा सामान्य नागरिकांसाठी सुरक्षित असावा यासाठी अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. ते मिळण्यासाठी लायसन्स एजन्सीचे फॉर्म A प्रमाणपत्र, त्रयस्थ एजन्सीकडून फायर ऑडिट रिपोर्ट, ज्या ठिकाणी हा आनंदमेळा होणार आहे त्याचा संपूर्ण नकाशा जोडावा लागतो. नागपुरातील आकाश अम्यूजमेंट कंपनीकडून चंद्रपूर महोत्सव मेलाचे मुख्य कार्यवाह रामपाल सेवाराम सिंह यांनी 30 ऑक्टोबरला परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र यापैकी आवश्यक कुठल्याही कागदपत्रांची पूर्तता त्यांनी केली नाही. फायर ऑडिट रिपोर्ट त्यांनी जोडली नाही, जो जागेचा नकाशा दिला तो खोटा दिला. नकाशावर जलील बाबा दर्गा दाखवण्यात आला जो चंद्रपूर शहरात नाही. कागदपत्रे पूर्ण नसताना त्याचा अर्ज नामंजूर करण्यात आला नाही. उलट हा मेळा सुरू झाला असताना त्याकडे डोळेझाक करण्यात आली.

     

    जिल्हा सामान्य प्रशासन विभागातही तेच

    हीच कागदपत्रे जिल्हा सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली. त्याची पडताळणी देखील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली नाही. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाही यांत्रिकी विभागाची परवानगी मिळाली नसताना देखील हा मेळा सुरू करण्यात आला.

     

    प्रशासनाचे झोपेचे सोंग

    आनंद मेळा सुरू करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यात अर्ज सादर करण्यात आला होता. 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर यादरम्यान हा मेळा सुरू असण्याचे स्पष्ट असताना आणि त्यापूर्वी परवानगी घेण्याची पूर्तता झाली नसताना हा आनंद मेळा सुरू कसा झाला याची शहानिशा करण्याची तसदी प्रशासनातील एकही अधिकारी कर्मचाऱ्याने घेतली नाही.

     

    भ्रष्ट यंत्रणा आणि दलालांची टोळी

    केवळ या आनंद मेळ्याची ही गोष्ट नाही तर यापूर्वी झालेल्या अनेक आनंद मेळ्यात ही भ्रष्ट शासकीय यंत्रणा या मागे होती. त्यासाठी चंद्रपूर शहरात काही दलाल लोक सक्रिय असून ते जिल्हा प्रशासनाकडून सर्व परवान्यांचे आपण बघून घेतो याची हमी देतात. प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी देखील यासाठी चांगलीच मागणी करतात. याची पूर्तता झाली की परवानगी नसताना देखील मेळा सुरू करण्याची मुकसंमती देतात. मात्र हे धोकादायक असून भविष्यात कुठलीही मोठी दुर्घटना झाल्यास याला जबाबदार संपूर्णता प्रशासनाची भ्रष्ट यंत्रणा असणार आहे.

  • चंद्रपुरातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना

    चंद्रपुरातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – 26 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचे उत्कृष्ठ आयोजन, व्यवस्थापन व कामकाज उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली. सदर समित्यांना दिलेली जबाबदारी ओळखून कामे पार पाडण्याच्या सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

     

    जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सदर समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतांना ते बोलत होते.

     

    बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपिन पालीवाल, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अजय चरडे, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी स्नेहल रहाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, कार्यक्रम व्यवस्थापक सिद्धार्थ मेहता आदी उपस्थित होते.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू, संघ व्यवस्थापक, खेळाडूंचे पालक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. सदर स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक समितीने आपल्या कार्याची जबाबदारी ओळखून स्पर्धा कालावधीत अनुषंगिक कामे पार पाडावीत.

     

    आयोजन समितीने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट होण्याकरीता संपूर्ण नियोजन करावे. खेळाडूंची नोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन डेक्सची उपलब्धता ठेवावी. स्पर्धेकरीता येणाऱ्या खेळाडूंसाठी निवास व्यवस्था करणे, आवश्यकतेनुसार मनुष्यबळांची उपलब्धता ठेवावी. मदत कक्षाद्वारे खेळाडूंना सर्व माहिती उपलब्ध होईल याअनुषंगाने माहिती द्यावी तथा कॉलसेंटर उभारावे. स्वच्छता समितीने परिसर स्वच्छता, भोजनाचा परीसर तसेच निवासव्यवस्थेसह, क्रीडांगणाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी. याकरीता बल्लारपूर नगरपालिका व चंद्रपूर महानगरपालिकेने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे.

     

    जिल्हाधिकारी श्री. गौडा पुढे म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी डॉक्टरांच्या चमूसह ॲम्बुलन्स उपलब्ध ठेवाव्यात. भोजन समितीने खेळाडूंच्या तसेच मान्यवरांच्या भोजनासाठी कुपनची व्यवस्था ठेवावी. येणाऱ्या खेळाडूंकरीता वाहतूक व्यवस्था तसेच वाहनासाठी पार्किंग व्यवस्था ठेवावी. सुरक्षा समितीने सुरक्षा यंत्रणा अद्यावत ठेवाव्या. वनअकादमी, सैनिक शाळा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या निवास व्यवस्थेच्या तसेच क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोलीसांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सुचना दिल्या तसेच प्रत्येक समितीने आपल्या कार्याची जबाबदारी ओळखून स्पर्धा कालावधीत अनुषंगिक कामे पार पाडावीत, असेही ते म्हणाले.

     

    या आहेत समित्या:

    आयोजन समिती, उद्घाटन समिती, स्वागत समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष, भोजन समिती, क्रीडा कार्यक्रम व तक्रार निवारण समिती, स्थानिक पर्यटन समिती, प्रसिद्धी आणि पायाभूत सुविधा समिती, वाहतूक व्यवस्था समिती, सांस्कृतिक कार्य समिती, सुरक्षा समिती स्वच्छता समिती आदी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

  • 6 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

    6 डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी

    News34 chandrapur

    चंद्रपूर :  नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 6 डिसेंबर 2023 रोजी चंद्रपूर  जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, दि. 06 डिसेंबर रोजी जिल्‍ह्यात बहुदा सर्वत्र हल्‍का ते मध्‍यम पाऊस पडण्‍याची संभावना असून एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्‍या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळ वेग (30ते40 किमी प्रतितास) होण्‍याची शक्‍यता वर्तविली आहे.

     

    खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी घ्यावी काळजी :

    संरक्षणात्‍मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्‍या. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्‍या आणि दरवाज्‍यापासून दुर रहावे. रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साचते अशा भागातुन जाणे टाळावे. खराब दृश्‍यमानतेमुळे मुसळधार पाऊसात वाहने चालवणे टाळा. पूर आलेला रस्‍ता ओलांडून गाडी चालवण्‍याचा प्रयत्‍न करू नका. पाणी दिसते त्‍यापेक्षा खोल आणि मजबुत असु शकते आणि त्‍यात मोडतोड तीक्ष्‍ण किंवा धोकादायक वस्‍तू, भांडे, छिद्र किंवा विजेच्‍या तारा असु शकतात.  पॉवर लाईन्‍स किंवा विजेच्‍या तारांपासून दुर रहा. फ्लॅश पुर चेतावणी किंवा विजेच्‍या तारांपासून दुर रहा.

     

    वादळ, मेघ गर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करु नये:

     

    विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असल्यास त्या वस्तू त्वरीत बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका.  शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.  विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहु नका.  जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. तरी, जिल्‍ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्‍यात आले आहे.

  • आमदाराची पुस्तक तुला

    आमदाराची पुस्तक तुला

    News34 chandrapur

    अहमदनगर – विविध व्यासपीठांवरून तरुणाईला शिक्षणाचं आणि वाचनाचं महत्त्व पटवून देणाऱ्या आमदार सत्यजीत तांबे यांच्या कारकि‍र्दीत एक अनोखा सन्मान त्यांना मंगळवारी प्राप्त झाला. आ. सत्यजीत तांबे शेवगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी राजीव राजळे मित्रमंडळ आयोजित ‘राजीव बुक फेस्ट २०२३’ या भव्य पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली.

     

    या वेळी शेवगावचे नगरसेवक रिंकु कलके आणि ग्रामस्थांनी आमदार सत्यजीत तांबे यांची ‘पुस्तक तुला’ केली. या वेळी स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शक प्रा. विठ्ठल कांगणे उपस्थित होते. एखाद्या नेत्याचा पुस्तक तुला करून केलेला सन्मान आपण पहिल्यांदाच पाहिला आणि आपल्या डोळ्यांचे पारणे फिटले, अशी प्रतिक्रिया कांगणे यांनी व्यक्त केली.

    सत्यजीत तांबे म्हणाले की, मी नेहमी तरुणाईला सांगत असतो की, पुस्तकी ज्ञान वाढवा. कारण, पुस्तक हे माणूस घडवण्याचे काम करते. पुस्तक माणसाला ज्ञानी बनवतात. पुस्तक म्हणजे केवळ कागदांचा संग्रह नव्हे. तर पुस्तक माणसाच्या आयुष्याला वेगळी दिशा देत असतात. म्हणून आपण पुस्तकांच्या सहवासात सातत्याने राहिले पाहिजे. या पुस्तक तुलेसाठी वापरलेली पुस्तकं आता विविध संस्थांना आणि गरजू विद्यार्थ्यांना दान करण्यात येतील.

    पुस्तक हे माणसाचे आयुष्य घडवते. त्यामुळे वाचनसंस्कृती जपली पाहिजे. वाचन संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचं काम आ. सत्यजीत तांबे करत आहेत, अशी भावना या वेळी कलके यांनी व्यक्त केली. दरम्यान, आमदार तांबे यांना ‘ज्ञान उपासना सन्मान’ प्रदान करण्यात आला.

  • चिमूर क्रांती भूमीत ७ डिसेंबर पासून ओबीसी चे अन्नत्याग आंदोलन

    चिमूर क्रांती भूमीत ७ डिसेंबर पासून ओबीसी चे अन्नत्याग आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आक्रमक पवित्रा घेत चिमूर क्रांती भुमितून ७ डिसेंबर पासून पुन्हा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येत आहे त्या संदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर व आमदार भांगडिया याना निवेदन देण्यात आले आहे.

     

    ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे यांनी चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्यांग आंदोलन सुरू केले होते. त्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मुंबई येथे २९ ऑक्टोमबर २०२३ ला सह्याद्री अतिथीगृहावर बैटक आयोजित केली होती. परंतु अजूनही समस्या सुटल्या नसल्यामुळे ७ डिसेंबर २०२३ पासून ओबीसीच्या विविध मागण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूरच्या वतीने तहसील कार्यालयाच्या बाजूला अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

     

    या बाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघच्या वतीने चिमूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे व आमदार कीर्तीकुमार भांगडिया याना निवेदन देण्यात आले आहे

  • चंद्रपूर फ्लाईंग क्लब 26 जानेवारी 2024 पासून सुरू करण्याचा संकल्प – पालकमंत्री मुनगंटीवार

    चंद्रपूर फ्लाईंग क्लब 26 जानेवारी 2024 पासून सुरू करण्याचा संकल्प – पालकमंत्री मुनगंटीवार

    News34 chandrapur

    मुंबई/चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाईंग क्लब येत्या २६ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू करण्याचा संकल्प असून, या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावर वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य मंत्री व पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

     

    नागपूर फ्लाईंग क्लबच्या सेस्ना – १७२ आर. या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे. फ्लाईंग क्लब संदर्भातील कामांची रीतसर परवानगी घेऊन धावपट्टीचे कार्पेटिंग,धावपट्टीच्या दुरुस्ती आणि संरक्षण भिंती ही कामे वेगाने पूर्ण करावीत, सूचना देखील यावेळी ना. मुनगंटीवार यांनी दिल्या.

     

    ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब संदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथी येथे घेण्यात आली. नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात १० प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

     

    विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय, सीएसआर फंडातून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही संबंधितांना मंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या. या फ्लाईंग क्लबबाबत नागपूर अधिवेशन कालावधीत बैठक घेण्यात येईल असेही ना मुनगंटीवार यांनी सांगितले.

    या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी चंद्रपूर विनय गौडा, एमएडीसी चे मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.

  • चंद्रपुरातील पोलीस ठाण्यात शिंदे-ठाकरे गट भिडले

    चंद्रपुरातील पोलीस ठाण्यात शिंदे-ठाकरे गट भिडले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूरात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये रविवारी मोठा राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये ही धक्काबुक्की झाली.

    महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर दोन्ही गट काल रात्री परस्परांविरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी गोळा झाले होते. या वेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक व नंतर धक्काबुक्की झाली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मिलिंद दोडके या पोलीस कर्मचाऱ्याला देखील झटापटीत धक्काबुक्की झाली.

     

    पोलिसांनी प्रतिमा ठाकूर आणि स्वप्नील काशीकर यांच्यासह दोन्ही गटाच्या ८ लोकांवर ३५३ (शासकीय कामात अडथळा आणणे) चा गुन्हा दाखल केलाय. सोबतच दोन्ही गटांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी २९४, ५०६ आणि ३२३ (शिवीगाळ, धमकी देणे आणि धक्काबुक्की करणे) चा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

     

    विशेष म्हणजे तक्रार देण्यासाठी उभे असलेले काशीकर यांच्यावर पोलीस ठाण्यात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, अचानक झालेला हा हल्ला सोडविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता पोलिसांवर सुद्धा हात उगारण्याचा प्रयत्न झाला.

     

    चंद्रपुरात दिवसेंदिवस राजकीय गुंड प्रवृत्ती फोफावत चालली असून पोलिसांनी आतातरी या वृत्तीवर लगाम घालावा अन्यथाया भविष्यात मोठी घटना घडल्याशिवाय राहणार नाही, जेव्हा पोलीस ठाण्यात हल्ला होतो तेव्हा कुठेतरी कायद्याची वचक तर कमी झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होतो.

     

    सध्यातरी पोलिसांनी प्रकरण शांत केले मात्र ही वृत्ती एकदिवस मोठ्या प्रमाणात वाढणार हे नक्कीच.

  • चंद्रपुरात शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड

    चंद्रपुरात शिवसैनिकांनी पीकविमा कार्यालयाची केली तोडफोड

    News34 chandrapur

    चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करीत असलेले उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या आंदोलनाची प्रशासन व शासनाकडून कोणतेही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आंदोलक शिवसैनिकांचा संयम सुटला असून, सोमवारी दुपारी शिवसैनिकांनी चंद्रपूर जिल्हा पीक विमा कंपनीच्या कार्यालयात धाव घेत कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.

    विशेष म्हणजे, प्रशासनाने व शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे ऑफिस फोडू, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्याकडून देण्यात आला होता.अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर आंदोलन केले आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळांकडून अतिवृष्टीत बाधितचा अहवाल देऊन ही. अन्य मंडळांमध्येही अतिवृष्टी आणि पुराच्या जबर तडाख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक जमीनदोस्त झाल्याने खरीप हंगामाच्या प्रारंभीच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला.२ लाखच्या वरील हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले हाेते.

     

     

    अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक व शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने मंजूर करावे. रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतरही शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानाचा मदत मिळालेली नाही. या नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आला.यावेळी युवासेनेचे जिल्हाधिकारी विक्रांतभाऊ सहारे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सिक्कीभैय्या यादव , उपजिल्हा प्रमुख शालिक फाले , शहर प्रमुख बल्लारपूर प्रकाश पाठक माजी महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील , तालुका प्रमुख संतोषभाऊ नरुले ,तालुका प्रमुख मुलं प्रशांत गट्टूवार ,तालुका प्रमुख गोंडपिपरी सूरज माडूरवार, जिल्हा संघटिका उज्वलाताई नलगे, युवतीसेना जिल्हाधिकारी सौ रोहिणीताई पाटील, विनयभाऊ धोबे, सुमितभाऊ अग्रवाल, हेमराज बावणे, बाळूभाऊ भगत, बाबा साहू, राहुलभाऊ वीरूटकर, विकासभाऊ वीरूटकर, सिक्किभाई खान ,महेशभाऊ खंगार, रिझवानभाई पाठव, शहाबाज शेख, शिवा वझरकर , वैभव काळे गिरीशभाऊ कटारे पदाधिकारी व युवासेनेचे पदाधिकारी व महिला आघाडी व युवती सेना असंख्य प्रमाणात उपस्थित होते

  • माजी नगरसेवकाच्या मृत्यूवर कांग्रेस आक्रमक

    माजी नगरसेवकाच्या मृत्यूवर कांग्रेस आक्रमक

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – उपजिल्हा रुग्णालय मूल येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचार्याच्या दुर्लक्षपणामुळे लोक प्रतिनिधी माजी नगर सेवक विनोद कामडे यांचा मृत्यू झाला. जर विनोद कामडे यांना रेफर केले नसते तर वाटेतच जीव गेला नसता. याप्रकरणात सर्वस्वी डॉक्टर व कर्मचारी आहेत. असा आरोप तालुका काँग्रेसने काँग्रेस नेते सी.डी सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे नेतृत्वात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांना लेखी निवेदनाद्वारे केले असून संबधितांवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी अन्यथा रुग्णालयां समोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी मागणी वाजा इशारा काँग्रेसने दिला आहे.

     

    निवेदन देताना कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, सरचिटणीस संदीप मोहबे उपस्थित होते. गेल्या नऊ महिन्यात विनोद कांमडेसह चार जणांचा जीव रुग्णालयातील असुविधेमुळे व कर्मचारी यांच्या दुर्लक्षित पणामुळे गेला याला जबाबदार कोण ? असा प्रश्न डॉ.चिंचोळे समोर उपस्थित केला. आजही रुग्णालयात अनेक असुविधा आहेत.यामधे डॉकटर,कर्मचारी स्टॉप कमी, हार्ट इसिजी तपासणी सोय नाही, सोनोग्राफी आप्रेटर नाही,एक्सरे टेक्निशियन नाही, अत्यावश्यक पुरेसा औषधीसाठा उपलब्ध नाही, रक्तसाठा वेळेनुसार उपलब्ध होत नाही, इथेच रुग्णांवर पूर्ण उपचार होत असताना देखील आपल्यावरची जबाबदारी टाळासाठी रेफर टू चंद्रपूर केले जाते.

     

    तसेच आलेल्या रुग्णांसोबत व त्यांचे नातेवाईकांन सोबत अरेराविने बोलले जाते. तरी देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि शासनाचे आरोग्य सेवेकडे लक्ष नाही. याबाबत त्वरित सुधारणा घडऊन आणावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.