Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • महावितरणचे आवाहन उत्सव साजरा करा, पण जरा सांभाळून

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नवरात्रोत्सवाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. उत्सव साजरा करा, पण जरा सांभाळून! विजेपुढे चूकीला माफी नाही. आत्मविश्वास किंवा नजर अंदाजाने झालेली एखादी छोटीसी चुकही आपल्या उत्सवावर वीरजन घालू शकते. सजगता हिच सुरक्षा आहे. त्यामुळे सुरक्षेला प्राधान्य देत अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

    मंडप आणि संच मांडणी

    सुरक्षेला प्राधान्य देत मंडपाची रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे.

     

    दुर्गोत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात तसेच स्वीचबोर्डच्यामागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.

    सुरक्षित अंतर राखावे

    महावितरणच्या यंत्रणेकडून उत्सव काळात ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होण्यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. दुर्गोत्सव मंडळांनी मंडप टाकतांना वितरण रोहित्रे ( ट्रान्सफॉर्मर), विद्युत खांबास ताण दिलेली तार भूमिगत वाहिनीचे फिडर पिलर यापासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.

     

    भक्तांनी व मंडळ कार्यकर्त्यांनी विद्युत खांब, रोहित्रे, फिटर पिलर इत्यादी वर चढू नये, मिरवणूकीत लोखंडी / धातूच्या रॉडच्या झेंड्याचा वाहनात किंवा वाहनाच्या टपावरील कार्यकर्त्यांचा विद्युत वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.

    घरगुती दराने वीज पुरवठा

    ■ उत्सवासाठी घरगुती दरानेच वीज पुरवठा होणार असल्याने अधीकृत जोडणी घ्यावी. दुर्गोत्सव मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
    स्वतंत्र न्युट्रल घेणे गरजेचे

    ■ उत्सवादरम्यान वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते.

    झेंडे फिरवताना काळजी घ्या…

    ■ मूर्ती स्थापनेच्या दिवशी तसेच विसर्जनाच्या दिवशी मिरवणूकीत झेंडे फिरवताना काळजी घ्यायला हवी. उत्साहाच्या भरात झेंड्याचा स्पर्श विद्युत तारांना होणार नाही याची काळजी घ्यावी. बऱ्याचदा लोखंडी किंवा मेटल रॉड लावलेला असतो. या रॉडमधून विजेचा धक्का बसण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे लाकडी काठी बसवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

  • चंद्रपूर जिल्हा महिला कांग्रेसचा विस्तार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस च्या विस्तारित कार्यकारीणी ची आढावा बैठक ११ ऑक्टोबर ला स्थानीक श्रमिक पत्रकार भवनात आयोजित करण्यात आली होती. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने महिला संघटन मजबूत करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या अध्यक्षांकडून यावेळी महिला काँग्रेस कडून सुरू असलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. या बैठकिला चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष धोटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

     

    यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी, महिला शक्ती मोठी असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिला निर्णायक भूमिका पार पडणार आहे.असे प्रतिपादन केले. त्याच सोबत महिला शक्ती मोठी आहे.त्याचाच उपयोग भाजप सरकार घेत असून महिलांची दिशाभूल करत आहे. महिलांच्या साठी 33% आरक्षण विधेयक मोदी सरकारने पारित केले पण ते कधीपासून लागू होईल या बाबत अनिश्चितता आहे. महागाई, महिलांच्या वरील अत्याचार खूप वाढले आहे. त्यामुळे महिलांनी संघटन करून सामान्य महिलांमध्ये याबाबत जागरूकता केली पाहिजे असे आवाहन देखील सुभाष धोटे यांनी यावेळी केले.

     

    जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी उपस्थित सर्व महिलांना नव्याने कमिटया स्थापन करा. प्रत्येक तालुक्यात जितक्या ग्रामपंचायती असतील तितक्या गाव कमिटया स्थापन करून “गाव तिथे काँग्रेस” हे अभियान सुरू करा असे आवाहन केले. तालुक्यातील सर्व बूथ वर महिलांच्या बूथ कमीटया स्थापन करून “मेरा बूथ सबसे अच्छा” ही स्पर्धा पदाधिकाऱ्यांनी आपसात निर्माण केली पाहिजे, तेव्हाच महिला संघटन मजबूत होईल असे प्रतिपादन केले.

     

    या आढावा बैठकीत नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान करण्यात आले. या आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

  • कामगारांनो संप मागे घ्या – आयुक्त पालिवाल यांचे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कचरा संकलन आणि वाहतुक या कामांवर काम करणारे कामगार 6 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा संकलनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबाचे भविष्य बघता कामगारांनी हे संप मागे घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले.

    कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्याबाबत चे पत्र दिले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करणे, 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेणे आणि वेतन चिट्ण्या नियमित देणे यांचा समावेश आहे.
    १०/१०/२०२३ रोजी उपायुक्त यांचे कक्षात सकारात्मक चर्चा झाली आहे.

     

    झालेल्या चर्चेनुसार संदर्भ पत्राच्या अनुषंगाने खालील मागण्या मान्य करण्यात येत आहे. १) जुने कंत्राटदार सेंटर फॉर डेव्हलपमेन्ट कम्युनिकेशन, जयपुर ब्रान्च नागपूर याप्रमाणे वेतन तात्काळ प्रभावाने लागू करून पुढील काळाकरीता देण्यात येईल. जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करून कामगारांना नवीन वेतन देण्यात येईल. 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेण्यात येईल आणि वेतन चिट्ण्या नियमित देण्यात येतील, असे देखील मान्य करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.
    कामगारांनी संप मागे घेऊन 12 ऑक्टोबरपासून नियमित कचरा संकलन सुरू करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले आहे.

     

    मागील 6 दिवसापासून सुरू असलेल्या कामगारांच्या कामबंद आंदोलनातील महत्वाची मागणी म्हणजे कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, मनपा दालनात अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सदर मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

     

    सुरू असलेला संप कामगार परत घेणार या याविषयी श्री संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

  • राज्यात सुरू झालेली लेक लाडकी योजना काय आहे?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती, आता ती योजना प्रत्यक्षात लागू करण्यात आली आहे, सदर योजना लागू केल्याबद्दल भाजप महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहे.

    काय आहे लेक लाडकी योजना?

    राज्यात मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे या सर्वसमावेशक महिला सशक्तीकरणाच्या हेतूने सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार १ एप्रिल २०२३ पासून पुढे जन्मलेल्या मुलींना सरकार लखपती करणार आहे.

     

    एका कुटुंबात एक मुलगी असो किंवा दोन मुली जन्माला येवो.. त्या दोघींनाही हा लाभ मिळणार आहे. मुलगी जन्मल्यानंतर ५ हजार रु., पहिलीला गेली की ६ हजार रु., सहावीला गेली की ७ हजार रु. अकरावीला गेली की ८ हजार रु. आणि १८ वर्षांची झाली की ७५ हजार रु. असा लाभ मिळत या पद्धतीने एकूण १ लाख १ हजार रु. मिळवत आपल्या राज्यातल्या या लाडक्या लेकी लखपती होणार आहेत.

     

    मार्च २०२३ अर्थसंकल्पिय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री आमचे नेते-राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या ‘लेक लाडकी योजनेची’ घोषणा केली होती.. आणि आता ही योजना अंमलात येतेय.

    यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचे चित्रा वाघ यांनी अभिनंदन केले आहे.

  • चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील दीक्षाभूमी मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे दि. 15 व 16 ऑक्टोबर 2023 रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यास जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. यादरम्यान, वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यादृष्टीने चंद्रपूर शहरातून दीक्षाभूमी परिसराकडे जाणाऱ्या रहदारीचा मार्ग दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दि. 17 ऑक्टोबर 2023 च्या सकाळी 8 वाजेपर्यतच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्याचा तसेच सर्व प्रकारच्या वाहनाची रहदारी वळविण्याचे आदेश पोलीस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांनी निर्गमित केले आहे.

     

    अवजड वाहनाकरीता रहदारीचा मार्ग:

    या कालावधीदरम्यान गरजेनुसार नागपूरकडून, चंद्रपूरकडे येणारी सर्व प्रकारची जड वाहने हॉटेल कुंदन प्लाझा येथुन सि.टी.पि.एस मार्गे नेहरू नगरवरून मुल रोडला जातील. मुलकडून, नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प-सावरकर चौक-वरोरा नाका उड्डाणपुल या मार्गाने जातील तसेच गरजेनुसार एम.ई.एल. नाका चौक येथे थांबविण्यात येतील. बल्लारशाकडून, नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प पलीकडे डि.आर.सी.बंकर, बायपास रोड येथे दिक्षाभूमी मार्गावरील गर्दी पाहुन थांबविण्यात येतील.

     

    शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरिता रहदारी व्यवस्था:

     

       जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक- टि.बी. दवाखानापर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी-विश्रामगृह-जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. त्यामुळे नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळुन) वरोरा नाका- उड्डानपुल-सिध्दार्थ हॉटेल-बस स्टँड-प्रियदर्शनी चौकमार्गे शहराकडे जातील. रामनगर, मित्रनगर, आकाशवाणी, स्नेहनगर आणि वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी-दवा बाजार-संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने (जड वाहने वगळुन) घेवुन जावीत. त्याचप्रमाणे जटपूरा गेट कडून, रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी-प्रियदर्शनी चौक-बस स्टॅंड-सिद्धार्थ हॉटेल-उड्डानपुल मार्गे नागपूर कडे जातील.

     

    दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक-जुना वरोरा नाका ते आय.टी.आय. कॉलेज तसेच वरोरा नाका चौक-मित्रनगर चौक ते संत केवलराम चौक आणि मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर “नो पार्कींग व नो हॉकर्स झोन” म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतेही वाहने, हॉकर्स लावण्यात येवू नये.

     

    दीक्षाभूमी ते संत केवलराम चौक तसेच दीक्षाभूमी ते जिल्हा स्टेडीयम दरम्यान राहण्याऱ्या रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजुला उभी न करता घोषित करण्यात आलेल्या पार्किंगमध्येच ठेवावी. आयटीआय कॉलेज ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत तसेच वरोरा नाका दर्ग्याच्या उजव्या बाजुने जाणारा रस्ता-पुट्ठेवार हॉस्पीटल- बुक्कावार हॉस्पीटल-वरोरा नाका ते पिंक प्लॅनेटपर्यंत “नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन” म्हणुन घोषीत करण्यात येत आहे.

     

    दीक्षाभूमी सोहळ्यास येणाऱ्या नागरिकांकरिता वाहन पार्कींग स्थळ:

    नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरिता:-

    शकुंतला लॉन, जनता कॉलेज पटांगणजनता कॉलेज समोरील ईदगाह मैदानवरोरा नाका पिंक प्लनेटच्या उजव्या बाजूला श्री. भटीया यांची जागा या ठिकाणी वाहने पार्क करावीत.

     

    शहरातुन दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरिता:-

    सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन, न्यु इंग्लिश ग्राउंड या ठिकाणी वाहने पार्क करावीत.

     

    वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातुन दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनांकरीता:-

     

    लोकमान्य टिळक हायस्कुल(जिल्हा स्टेडीयमच्या मागे), जिवन साफल्य गृहनिर्माण सहकारी संस्था (मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे) याठिकाणी वाहने पार्क करावीत.

     

    मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकूम परिसरातून येणाऱ्या वाहनाकरिता:-

     

                कृषी भवन जवळील मैदान/ ट्रॅव्हल्स स्टॅन्ड याठिकाणी वाहने पार्क करावीत.

    तरी, धम्मचक अनुप्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी सर्व बौध्द बांधवांनी व अनुयायांनी वाहतुक व्यवस्थेचा वापर करून घोषीत पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवून वाहतुक व्यवस्थेचे पालन करावे, तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

  • बनावट कागदपत्रे वैध ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – आमदार सुधाकर अडबाले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात प्रकल्‍पग्रस्‍त म्‍हणून नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे बनविणाऱ्या ३२ प्रपत्र धारकांवर मूळ प्रकल्‍पग्रस्‍त उमेदवारांनी दाखल केलेल्‍या तक्रारीनंतर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, सदर प्रपत्र वैध ठरविणाऱ्या पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच सिटीपीएस मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्‍यांच्यावर तात्‍काळ चौकशी करून कारवाई करा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी दिले.

     

    चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. यात प्रकल्पग्रस्त म्हणून काही लोकांनी खोटी कागदपत्रे बनवून नोकऱ्या मिळवल्या. यावर सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे व प्रकल्पग्रस्तांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुनर्वसन विभागाने चौकशी केली असता १२८ पैकी ७२ प्रपत्र धारकांना अपात्र ठरविण्यात आले. त्यातील ३२ बनावट प्रपत्र धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रत्यक्षात ज्या विभागाने प्रपत्र वैध ठरवले त्याच विभागाने ३२ प्रपत्र धारकांना अपात्र ठरविले. याचा अर्थ बनावट कागदपत्रे बनवितांना मोठा अर्थ व्यवहार झाला असण्याची दाट शक्‍यता आहे. यात दलालांची मोठी टोळीही सक्रीय असल्‍याची माहिती आहे.

     

    या प्रकरणात बनावट कागदपत्रे वैध ठरवणाऱ्या चंद्रपूर पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच सिटीपीएस मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्‍न दाखल केला होता. आमदार अडबाले यांनी दाखल केलेल्‍या प्रश्‍नावर सीटीपीएस मधील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्‍याचे ऊर्जामंत्री यांनी निवेदन सादर केले. पण पुनर्वसन कार्यालयातील कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे आमदार अडबाले यांनी १० ऑक्‍टोबर २०२३ रोजी पुनर्वसन व सीटीपीएस अधिकाऱ्यांसह जिल्‍हाधिकारी यांच्या उपस्‍थितीत बैठक लावली.

     

    चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात गेलेल्‍या मूळ जमिनधारकास डावलून दलालांमार्फत बनावट कागदपत्रे बनविणारे मोठे रॅकेट सक्रीय आहे. या रॅकेटच्या माध्यमातून अनेकांनी बनावट कागदपत्रे बनवून नोकरी लाटली. प्रत्‍यक्षात जमीन गेलेल्‍या अनेकांना अजूनही नोकरी मिळाली नाही.

     

    आज पार पडलेल्‍या बैठकीत तत्‍कालिन पुनर्वसन अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी लावण्यासंदर्भात विभागीय आयुक्‍तांकडे प्रस्‍ताव सादर केल्‍याचे सांगण्यात आले. मूळ प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र असंतोष असल्‍याने बनावट कागदपत्रे वैध ठरविणाऱ्या चंद्रपूर पुनर्वसन कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी तसेच सिएसटीपीएस मधील अधिकारी/कर्मचाऱ्यांवर तात्‍काळ चौकशी करून कारवाई करावी तसेच या प्रकरणातील रॅकेटवर सुद्धा कारवाई करावी, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी जिल्‍हाधिकारी यांना दिले.

     

    या बैठकीला अपर जिल्‍हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्‍हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जटाळे, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे मुख्य संघटक बळीराज धोटे, भास्‍कर सपाट, पप्‍पू देशमुख, रवी झाडे, आत्‍माराम देवतळे व सिटीपीएस व पुनर्वसन विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची उपस्‍थिती होती.

  • चंद्रपूर शहरातील कचरा संकलन 2 दिवसापासून ठप्प

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 5 दिवसापासून चंद्रपूर मनपा अंतर्गत काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलनाने आज आक्रमक पवित्रा घेतला, कचरा संकलन करणाऱ्या वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

     

    हक्काच्या किमान वेतनासाठी कामगार आपली लढाई लढत आहे, विशेष म्हणजे मागील 5 दिवसापासून स्थानिक आमदार व मंत्री यांनी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही, हे विशेष.

     

    कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन मागील 2 दिवसापासून बंद आहे, शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरत आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कामगारांच्या आंदोलनाचा लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडच्या सदस्यांनी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेतली.

     

    भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेतर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मनपाला निवेदन सादर केले, ज्यामध्ये संपावर बसलेले कामगार यांच्या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा जेणेकरून शहरात कचरा संकलनाला सुरुवात होईल, आंदोलनामुळे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     

    घंटागाडी कामगारांचे आंदोलन सुरू राहिले तर शहरातील नागरिक आपल्या घरातील कचरा चंद्रपूर मनपा कार्यालयात टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा डॉ.गावतुरे यांनी यावेळी दिला आहे.

    मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी छाया सोनूले, संगीता पेटकुले, काळूबाई चौधरी, आदींची उपस्थिती होती.

     

    कामगारांच्या हक्काच्या मागणीवर मनपा प्रशासन डोळेझाक करीत आहे ही गंभीर बाब असून त्यांची मागणी रास्त आहे, कामगारांना न्याय मिळायला हवा अशी प्रतिक्रिया डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी दिली.

  • वर्षभरात चंद्रपूर महावितरणचे 43 हजार 833 नवे वीज ग्राहक

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात एप्रील २२ ते २० ऑक्टोबर २०२३ या वर्षभराच्या कालावधीत विविध वर्गवारीतील नविन ४३ हजार ८३३ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आल्या. चंद्रपूर मंडळात २४ हजार २७५ तर गडचिरोली मंडळातील १९ हजार ५५८ ग्राहकांना वीजजोडण्या देत महावितरणच्या माध्यमातून प्रकाश पोहोचला.

    देण्यात आलेल्या या लघूदाब वीजजोडण्या
    चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर मंडळात घरगुती २६ हजार ८४२, वाणिज्यिक ६ हजार २५३, औदयोगिक ५४१, सरकारी कार्यालये ९४०, पाणिपुरवठा १५१, पथदिवे ९६, कृषिपंप ७ हजार ६३१, कुक्कूटपालन ६१, इतर लघूदाब २०८ व तात्पुरत्या १ हजार १०७ अशा एकंदरीत ४३ हजार ८३३ वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या
    चंद्रपूर मंडळात घरगुती १४ हजार ८४०, वाणिज्यिक ४ हजार ४५६, औदयोगिक ३३५, सरकारी कार्यालये ५९१, पाणिपुरवठा ७७, पथदिवे ४०, कृषिपंप ३ हजार ५९१, कुक्कूटपालन ३१, इतर लघूदाब १४७, व तात्पुरत्या १६४ अशा एकंदरीत २४ हजार २७५ वीजजोडण्या चंद्रपूर मंडळात देण्यात आल्या.

     

    गडचिरोली मंडळात घरगुती १२ हजार २, वाणिज्यिक १ हजार ७९७, औदयोगिक २०६, सरकारी कार्यालये ३४९, पाणिपुरवठा ७४, पथदिवे ५६, कृषिपंप ४ हजार ४० , कुक्कूटपालन ३०, इतर लघूदाब ६१, व तात्पुरत्या ९४३ अशा एकंदरीत १९ हजार ५५८ वीजजोडण्या गडचिरोली मंडळात देण्यात आल्या.

    तसेचं उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत ४ हजार २८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ७४ वीजजोडण्या देण्यात आल्या आहे.

    केंद्र शासनाच्या अतिमहत्वाकांक्षी अशा उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत या योजणेच्या सुरुवतीच्या वर्षापासून म्हणजे २०१८ पासून ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरुन प्रलंबित असलेल्या वीजजोडण्या देण्याचे निर्धारीत लक्ष पूर्ण करीत चंद्रपूर मंडळात २ हजार ५५१ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून २ हजार ५८४ वीजजोडण्या देण्यात आल्या. तर गडचिरोली मंडळात, १ हजार ४५८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून १ हजार ४७२ वीजजोडण्या देण्यात आल्या.
    उच्चदाब वीज वितरण प्रणाली (HVDS) योजअंतर्गत चंद्रपूर परिमंडळात एकंदरीत ४ हजार २८ रोहित्रे बसविण्यात आली तसेच या रोहित्रांच्या माध्यमातून एकंदरीत ४ हजार ७४ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

     

    ग्राहकांप्रति कर्तव्य पार पाडित आपली जबाबदारी ओळखून महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना सुरळीत सेवा प्रदान करण्यास नेहमी तत्पर असतात. देण्यात आलेल्या वीजजोडण्यामुळे ग्राहकांच्या जीवनात प्रकाश पडला आहे. परंतु थकबाकीमुळे महावितरणला ग्राहकांच्या दारात वसुलीसाठी जावे लागत आहे. तेव्हा ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणा करुन महावितरण्ला सहकार्य करावे असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

  • चंद्रपुरात घंटागाडी कामगारांचे आंदोलन पेटले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – केंद्र शासनातर्फे चंद्रपूर मनपाला स्वच्छता वर्गात पुरस्कार दिल्या गेला होता मात्र यामागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या घंटागाडी कामगारांना हक्काच्या किमान वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे.

     

    शहर स्वच्छ रहावे यासाठी संपूर्ण दिवस शहरातील कचरा संकलन करण्याचे मोलाचे कार्य घंटागाडी कामगार करतात मात्र या कामाचा मोबदला म्हणून त्यांना किमान वेतन दिल्या जात नाही, कंत्राटदार बदलला व नव्या कंत्राटदाराने कामगारांच्या किमान वेतनावर डल्ला मारण्याचे काम केले.

     

    आम्हाला किमान वेतन द्या या मागणीसाठी संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेने अनेकदा पाठपुरावा केला मात्र त्यांच्या मागणीकडे मनपा व संबंधित कंत्राटदाराने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने 6 ऑक्टोबर पासून घंटागाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले.

    मागील 5 दिवसापासून सुरू असलेले कामबंद आंदोलन मनपाद्वारे दडपण्याचा प्रयत्न केला गेला, कामगार कामावर येत नसल्याने शहरातील कचरा संकलन ढासळले, कंत्राटदाराने यावर शक्कल लढवीत कामगारांची पर्यायी व्यवस्था केली.

     

    ही बाब कामबंद आंदोलकांना कळताच त्यांनी सरळ कचरा संकलन वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे 10 ऑक्टोबर ला सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले, आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

     

    मनपा द्वारे आता या ठिकाणी बैठक घ्या आम्ही आता हटणार नाही, हा आमच्या हक्काचा लढा आहे, अशी निर्णायक भूमिका घंटागाडी कामगारांनी घेतल्याने मनपा आता काय भूमिका घेणार याकडे कामगार संघटनांचे लक्ष लागले आहे.

  • 98 प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत 15 दिवसांत माहिती द्या – जिल्हाधिकारी गौडा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या 6 प्रकल्पग्रस्तांनी टॉवरवर चढून 16 तास केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने आज 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन येथे एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अतुल जटाले, राजुरा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, कोरपन्याचे तहसीलदार प्रकाश व्हटकर तसेच जमीन शाखेचे नायब तहसीलदार सचिन पाटील, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, अंबुजा सिमेंट कंपनीच्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख अनिल वर्मा,जानवे व जनविकास सेनेचे इमदाद शेख, अक्षय येरगुडे व महिला आघाडीच्या प्रमुख मनिषा बोबडे उपस्थित होते.
    यावेळी आकाश लोडे , प्रवीण मटाले , सचिन पिंपळशेंडे , निखिल भोजेकर , चंदू झाडे , सुनील बुटले , कमलेश मेश्राम, विष्णू कुमरे, संजय मोरे , संदीप वरारकर, अविनाश विधाते , तुषार निखाडे , नागू मेश्राम , भिकू मेश्राम, सत्यपाल किनाके, रवी पंढरे इत्यादी प्रकल्पग्रस्त सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    प्रकल्पग्रस्तांना तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकरीत प्राधान्य देणे गरजेचे होते.मात्र अंबुजा सिमेंट कंपनीने रोजगाराची मागणी करणाऱ्या 98 प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले नसल्याचे जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत सिद्ध झाले. त्यामुळे कंपनीविरुद्ध ‘कारवाई का करण्यात येऊ नये’ अशा प्रकारचा कारणे दाखवा नोटीस शासनाने कंपनीला बजावला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिले.

     

    अदानी समूहाने नुकतीच कंपनी अधिग्रहित केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत पुरेशी माहिती नसल्याची बाजू अंबुजाच्या मानव संसाधन विभागाचे अधिकारी अनिल वर्मा यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. यावर ‘व्यवस्थापन बदलले तरी कार्यालय बदलत नसते’ असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यवस्थापनाला खडसावले.पंधरा दिवसाच्या आत 98 प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत सविस्तर माहिती देण्याचे निर्देश त्यांनी कंपनीला दिले. ही माहिती मिळाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबद्दल पुढील दिशा ठरणार आहे.

    अंबुजा सिमेंट कंपनी मधील 98 प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत आज बोलावलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सकारात्मक भूमिका घेतली.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा नव्याने पल्लवीत झालेल्या आहेत. अंबुजा सिमेंट कंपनीचे व्यवस्थापन सतत जिल्हा प्रशासनाची दिशाभूल करत असल्याची बाब लक्षात आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने कंपनीविरुद्ध नेमकी भूमिका घेतली.प्रकल्पग्रस्तांच्या रोजगाराबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा अंबुजा सिमेंट कंपनीचा भूसंपादन करार रद्द करण्याची शासन स्तरावर प्रलंबित असलेली कारवाई पूर्ण करावी ही प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.
    -पप्पू देशमुख-
    संस्थापक अध्यक्ष-जनविकास सेना