ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.
Chandrapur local news accident : पोंभूर्णा २९ नोव्हेम्बर २०२५ (News३४): तालुक्यातील खरमत येथे स्वतःच्या शेतातील विहिरीत तोल गेल्याने एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी, दिनांक २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. प्रदीप शामराव हेपटे (वय ४०), रा. खरमत, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृत शेतकरी प्रदीप हेपटे हे आपल्या शेतात धान बांधणीचे काम करत होते. काम सुरू असताना पिण्याचे पाणी घेण्यासाठी ते विहिरीवर गेले. मात्र, याच वेळी त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत कोसळले.
काही वेळाने ते घरी परतले नाहीत म्हणून कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. परंतु, खूप उशीर झाला होता; विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. Chandrapur local news accident
या घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खरमत गावात शोककळा पसरली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि वडील असा आप्त परिवार आहे.
Rajura electronic meter protest news : राजुरा 27 नोव्हेम्बर (News34) :– राजुरा शहरातील विविध भागांत लावण्यात येत असलेल्या अन्यायकारक इलेक्ट्रॉनिक मीटरविरोधात अखेर काँग्रेसने कडक भूमिका घेतली असून नागरिकांच्या दबावानंतर विद्युत विभागाने जबरदस्तीने मीटर बसविणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.
स्थानिक नागरिकांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्याकडे धाव घेत अन्यायाची माहिती दिली. नागरिकांच्या योग्य हक्कासाठी अरुण धोटे यांनी स्वतः पुढाकार घेत उपकार्यकारी अभियंता, विद्युत उप विभाग, राजुरा कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी विभागीय अधिकाऱ्यांना जाब विचारत अन्यायकारक मीटर तत्काळ मागे घेण्याची मागणी करणारे निवेदनही देण्यात आले. नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर हे आधीच्या मीटर पेक्षा दोन ते तीन पट्टीने अधिक वाढीव बील देत असतात यामुळे गोरगरीब जनतेची पिळवणूक होणार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
काँग्रेसच्या या ठाम भूमिकेनंतर अखेर विद्युत विभागाने नागरिकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येणार नसल्याचे आश्वासन दिले. या निर्णयाचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून लोकशाही मार्गाने लढलेल्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. Rajura electronic meter protest news
आंदोलनाच्या वेळी माजी उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ देशपांडे, किशोर बानकर, सय्यद जाहीर, रफीक अन्सारी, अजहर सिद्धिकी यांच्यासह स्थानिक नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Chandrapur local news fatal accident : मूल: चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात मंगळवारी (दि. २५) सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रेल्वे गेटजवळील गतिरोधक लक्षात न आल्याने स्कूटी उसळली आणि मागे बसलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला.
प्रवासाची दिशा: हे दाम्पत्य एमएच सीजी १२८० क्रमांकाच्या स्कूटीने सिंदेवाहीकडे जात होते.
अपघाताचे ठिकाण: मूल शहरातील रेल्वे गेटजवळ.
नेमकं काय घडलं?: चालकाला रस्त्यावरील गतिरोधक दिसला नाही. स्कूटी त्यावर वेगात आदळल्याने लता वांगलवार या उसळून थेट दहा फूट फरफटत गेल्या.
दुखापत: त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
💔 उपचारादरम्यान मृत्यू
अपघातानंतर त्यांना तातडीने मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचाराचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वांगलवार कुटुंबियांवर आणि चंद्रपूर परिसरात शोककळा पसरली आहे.
Hamara Shauchalay Hamara Bhavishya awareness : चंद्रपूर (News३४), २१ नोव्हेम्बर :केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तथा जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम मानवी हक्क दिन (10 डिसेंबर 2025) पर्यंत राबविण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.ते म्हणाले, “शौचालय ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज आहे.”
मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये वैयक्तिक व सामुदायिक शौचालयांची तपासणी,दुरुस्ती व देखभाल,स्वच्छता आणि सुशोभीकरण या गोष्टींवर विशेष भर दिला जाणार आहे. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेल्या सार्वजनिक शौचालयांची नोंद घेऊन तात्काळ दुरुस्तीचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याच्या सहभागातून स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण आणि हवामान अनुकूल स्वच्छता या बाबत व्यापक जनजागृती केली जाणार आहे. Hamara Shauchalay Hamara Bhavishya awareness
ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान गावागावांत मोहिमेचे विविध उपक्रम राबविले जातील. उत्कृष्ट देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक तसेच सामुदायिक शौचालयांना अंतिम टप्प्यात विशेष गौरव करण्यात येईल. 10 डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून “उत्कृष्ट शौचालय पुरस्कार” प्रदान करण्यात येतील. या मोहिमेत सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पूलकित सिंह तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.
Brahmapuri ethanol factory fire incident details : ब्रह्मपुरी, ता. १९ (News34) : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात स्थित बोरगाव मध्ये रामदेव बाबा सॉल्व्हन्ट कंपनीमध्ये १९ नोव्हेम्बर रोजी भीषण स्फोट होऊन आग लागली, सदर कंपनी हि इथेनॉल ची असून या ठिकाणी जवळपास १ लाख २५ हजार लिटर इथेनॉल चा साठा होता. सुदैवाने याठिकाणी कसलीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी घटना टळली.
शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील बोरगाव रस्त्यावरील रामदेव बाबा सॉलवेंट या इथेनॉल कंपनीमधील प्लांटमध्ये अचानक मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ही घटना बुधवार (ता. १९) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील बोरगाव, उदापूर, झिलबोडी, पेठवॉर्ड परिसर हादरला. मात्र, या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, इथेनॉल कंपनीतील प्लांटमध्ये आज नेहमीप्रमाणे काम सुरू होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास इथेनॉल टँकला अचानक आग लागली. टॅंकमध्ये सुमारे १.२५ लाख लिटर इथेनॉल असल्याने आगीच्या ज्वाळांनी क्षणातच रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात येत नसल्याने आग विझवण्यासाठी ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, आरमोरी, देसाईगंज आणि चंद्रपूर येथील अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले. Brahmapuri ethanol factory fire incident details
या जवानांनी आग विझविणे सुरू केले. मात्र, आग आटोक्यात न आल्याने मोठ्या प्रमाणावर वाळूचा वापर करण्यात आला. तसेच नायट्रोजन वायूचा पर्यायी वापर करून आग विझविण्याचे प्रयत्न झाले. घटनेची माहिती मिळताच शेकडो नागरिक आग बघण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. लोकांना पांगवण्यासाठी ब्रह्मपुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद बानबले हे आपल्या सुमारे ५० कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मिलर्स असोसिएशन, धान्य व्यापारी तसेच ब्रह्मपुरीचे तहसीलदार सतीश मासाळ यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वृत्त लिहिस्तोवर आग पूर्णपणे आटोक्यात आली नव्हती. अधिकारी व अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असून नुकसानाचे प्रमाण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
wild bear rescue from home in sindewahi : सिंदेवाही १८ नोव्हेम्बर (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वन्यप्राण्यांचा हैदोस सुरु आहे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतपर्यंत एकूण ३९ नागरिकांचा बळी गेला आहे, वन्यप्राण्यांना जंगल कमी पडत असल्याने आता गाव व शहराची वाट हे प्राणी धरू लागले आहे, जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागाच्या सिंदेवाही वन परिक्षेत्रातील डोंगरगाव मध्ये १७ नोव्हेम्बर ला रात्रीच्या सुमारास अस्वल सुंदर जुमनाके यांच्या घरात शिरले, अनेक अथक परिश्रमानंतर वनविभागाने अस्वलाला सुखरूप बाहेर काढले.
सदर अस्वल नर जातीचे असून ते रात्रीच्या सुमारास डोंगरगावातील आंब्याच्या झाडावर असलेले मधमाशांचे पोळ्यातील मध खाण्यासाठी गावात आला होता, पहाटे च्या सुमारास अस्वल गावात आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली, गावकर्यांनी अस्वलाचा शोध घेणे सुरु केले, त्यावेळी सुंदर जुमनाके यांनीही घराबाहेर पडत शोध घेतला असता सदर अस्वल त्यांच्या घरापुढे उभा होता, अस्वल थेट जुमनाके यांच्या घरात शिरला, घराचे दार बंद करीत जुमनाके यांनी याबाबत बिटगार्ड सचिन चौधरी यांना संपर्क करीत माहिती दिली. wild bear rescue from home in sindewahi
घरातील सदस्य बाहेर असल्याने कसलीही अनुचित घटना घडली नाही, माहिती मिळाल्यावर सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायकर सह डॉ रविकांत खोब्रागडे, शुटर अजय खोब्रागडे व बचाव पथक डोंगरगावात दाखल झाले. १८ नोव्हेम्बर रोजी सकाळी ११ वाजता अस्वलाला डार्ट मारत बेशुद्ध करीत त्याला घराबाहेर काढण्यात आले. अस्वलाला चंद्रपूर टीटीसी उपचार केंद्रात नेण्यात आले.
सदरची यशस्वी कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायकर, क्षेत्रीय सहायक नितीन गडपायले, यांच्या नेतृत्वात वनविभागातील पथक व गावातील नागरिकांनी बचाव कार्यात सहकार्य केले.
Gondpipri development projects inspection : चंद्रपूर, दि. 13 (News३४) : जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बुधवारी गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकासकामांना क्षेत्रीय भेट देत आढावा घेतला. या दौऱ्यात जिल्हाधिका-यांनी गोंडपिपरी येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीला भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. इमारतीचे बांधकाम पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिल्या.
यानंतर मौजा भंगाराम तळोधी येथील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या वेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून रुग्णालयातील वॉर्ड, यंत्रसामग्री, औषधसाठा तसेच इतर आवश्यक सुविधांची माहिती घेतली आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मौजा वढोली येथे स्थापन करण्यात आलेल्या 40 केडब्ल्यूपी सोलरायझेशनसह पाणीपुरवठा योजना स्थळाची पाहणी करताना त्यांनी कामाची गुणवत्ता सुनिश्चित करण्याचे आदेश दिले.
या दरम्यान गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, तहसीलदार शुभम बाहेकर, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कार्यकारी अभियंता (जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग), गटविकास अधिकारी श्री. पुप्पलवार तसेच नायब तहसीलदार चंद्रशेखर वेटे आदी अधिकारी उपस्थित होते.
Ballarpur PHC smart health center : बल्लारपूर ११ नोव्हेम्बर (News३४) -राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आणि विशेष पुढाकारातून बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत ₹२ कोटी ६८ लाख २९ हजार ८५० रुपये किंमतीचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी गोरगरीब जनतेला सर्वोत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Ballarpur PHC smart health center
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कार्यकारी अभियंता दिनदयाल मटाले, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा साळवे, डॉ. शिवम बाहेती, जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, तालुकाध्यक्ष डॉ. चंद्रकांत देऊळकर, उपसरपंच रुपेश पोडे, राजू बुद्धलवार, वैशाली बुद्धलवार, सुनिल फरकडे, किशोर पंदीलवार, रमेश पिपरे, हरीश गेडाम, स्नेहाताई टिंबडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, जनतेची उत्तम आरोग्यसेवा व्हावी, यासाठी या प्रकल्पाचे काम मी हाती घेतले. या देशाच्या प्रगतीचा खरा आधार कष्टकरी आहे. दुर्दैवाने कष्ट करणाऱ्यासाठी उत्तम आरोग्यसेवांचा अभाव होता. गरिबांच्या सेवेचे खरे केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पहिल्या टप्प्यात १४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम केले. दुसऱ्या टप्प्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्मार्ट प्राथमिक केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले. आरोग्याच्या संदर्भात पाहिजे तशी जागरुकता अद्याप नाही. ती निर्माण होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. smart primary health center inauguration Ballarpur
२८० कोटींच्या १४० खाटांचे टाटा कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. २२ डिसेंबरला त्याचे उद्घाटन होणार आहे. देशातील पहिले हेलियमविरहित मशीन चंद्रपूरच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये असणार आहे. जानेवारीमध्ये चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री श्री. अमितजी शहा यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या जिल्ह्यातील आरोग्यसेवा इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळी असावी, यासाठी प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये खासगी दवाखान्यांपेक्षा उत्तम सोयीसुविधा आहेत. जनतेच्या आशीर्वादामुळेच नवनवीन कल्पना मांडणे शक्य होत असते. पण त्यासाठी चांगले अधिकारी देखील आवश्यक असतात. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जीव ओतून काम करण्यासाठी लक्ष दिले, त्यांचे विशेष कौतुक आ. मुनगंटीवार यांनी केले. त्यामुळे अव्वल दर्जाची इमारत आणि सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. या विभागाची सेवा करण्याची संधी मिळाली, यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो, अश्या भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या. best healthcare services for rural areas Chandrapur
मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र विशेषबाब म्हणून मंजूर..
मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या आकृतीबंधात नव्हते. या केंद्राच्या कामासाठी अडचणी येत होत्या पण २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी लोकांनी आग्रह केला. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याचा आग्रह केला, त्याला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली याचा विशेषत्वाने आ.मुनगंटीवार यांनी याचा उल्लेख केला.
उमरी पोतदार येथील सुसज्ज आरोग्य केंद्र
पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संकुलासाठी ८ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये आणि स्मार्ट आरोग्य केंद्रासाठी १ कोटी ३२ लाख ७७ हजार ४९० इतका रुपयांचा निधी मंजूर करून आरोग्य मंदिर उभारलेले आहे. नुकतेच उमरी पोतदार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले, अतिशय उत्तम सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र झाले आहे, असे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
महिलांच्या आरोग्याची काळजी
आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात योग्यवेळी निदान न झाल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. सर्वायकल कॅन्सरच्या संदर्भात लसीकरण करण्याची गरज आहे, हा मुद्दा मी विधानसभेत मांडला. त्यावर चर्चा झाली. आरोग्यमंत्र्यांनी १४ वर्षांच्या मुलींपासून सुरुवात करण्याचा शब्द दिला. योग्य क्षणी निदान झाले तर महिलांचे प्राण वाचू शकतात. महिला कुटुंबाची काळजी करण्यात स्वतःची काळजी घेणे विसरते. पण महिलांचे आरोग्य उत्तम राहिले तर कुटुंबाचे राहील आणि कुटुंबाचे राहिले तर समाजाचे आणि पर्यायाने देशाचे आरोग्य उत्तम राहील.’ Sudhir Mungantiwar health infrastructure development
लाडक्या बहिणींसाठी ‘पिंक ओपीडी’
पिंक ओपीडी ही व्यवस्था आपण निर्माण करतोय. यामध्ये महिलांच्या आरोग्याची सर्वांत पहिले काळजी घेतली जाईल. लाडक्या बहिणीच्या तब्येतीची काळजी घ्यावीच लागेल. याचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाली तर ही सेवा असलेला कोल्हापूरनंतर चंद्रपूर हा एकमेव जिल्हा असेल, अशी माहिती आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. Ballarpur PHC smart health center
कोठारी येथील पीएचसी आदर्श ठरावे
कोठारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम करा. येथील केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्था उत्तम करा. डॉक्टर सहज उपलब्ध होईल, याचा विचार करा. हे एक मॉडेल पीएचसी करा, अशा सूचना आ. श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पुण्य कमावण्यासाठी दानच द्यावे लागते असे नाही. सोने, चांदी दिल्यावर जेवढे पुण्य लागत नाही, त्यापेक्षा जास्त गरिबांची सेवा केल्याने लागत असते. त्यामुळे गरिबांच्या आरोग्यसेवेसाठी डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी तत्पर राहावे, असा माझा आग्रह आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. Ballarpur PHC smart health center
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हेलिपॅडची सुविधा
महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलिकॉप्टर ॲम्बुलन्ससाठी हेलिपॅडची व्यवस्था नाही. मात्र, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यातील एकमेव महाविद्यालय आहे, जिथे हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, 140 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हेलियम न वापरणारी देशातील पहिली एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. १.५ कोटी रुपयांची कॅन्सर निदान वॅन लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच जिल्ह्यात कॅन्सर तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात येत आहेत.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपा महिला मेळावा उत्साहात
Ballarpur city BJP women conference : बल्लारपूर १० नोव्हेम्बर (News ३४) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीतर्फे बल्लारपूर येथे भव्य महिला मेळावा उत्साहात पार पडला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेला बल्लारपूर शहरातील सर्व धर्मीय भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने महिला मेळावा ‘हाऊसफुल’ झाला. यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी मेळाव्याला संबोधित करताना एकात्मतेच्या शक्तीने समृद्ध बल्लारपूर घडणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
भाजपा बल्लारपूर आयोजित महिला मेळाव्यात शहरातील विविध समाजघटकांतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, रणंजय सिंग, रेणुकाताई दुधे, वैशालीताई जोशी, कांताबाई धोटे, आरतीताई आकेवार, वर्षाताई सुंचूवार, पुनमताई मोडक, जयश्रीताई मोहुर्ले, सारिकाताई कनकम, सुरेखाताई श्रीवास्तव आदिंची उपस्थिती होती. Sudhir Mungantiwar Ballarpur News
आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘समृद्ध बल्लारपूर’ हे फक्त घोषवाक्य नसून प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून पूर्ण होणारा संकल्प आहे. या शहराचा सर्वांगीण विकास, प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं घर, स्वच्छ रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी, या दिशेने मी सातत्याने प्रयत्नशील आहे. आतापर्यंत ६०० निवासी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले असून पुढील काळात हे प्रमाण आणखी वाढवले जाईल. पंतप्रधान आवास योजनेद्वारे सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
आ.मुनगंटीवार म्हणाले, “बल्लारपूर देशातील आदर्श शहर व्हावे, आत्मनिर्भर व्हावे आणि सर्वांसाठी समान संधीचे केंद्र बनावे, हेच आमचे ध्येय आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवावा, कारण द्वेष आणि विभागणीचा मार्ग कधीच प्रगतीकडे नेत नाही.’
हा देश सबका साथ, सबका विकास या मंत्रावरच पुढे जात आहे.”
या मेळाव्यात महिलांची प्रचंड उपस्थिती पाहून आ.सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. “सर्वधर्मीय बहिणींच्या उपस्थितीत आज मला छोटा भारत अनुभवायला मिळाला. प्रेम, सौहार्द आणि एकोपा यांचा सुरेख संगम इथे बघायला मिळाला,’ अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमात मुस्लिम भगिनींनी भाजपा कार्यकर्त्यांकडे पक्षाचा दुपट्टा मागितला, याचा उल्लेख करत आ. मुनगंटीवार म्हणाले की, “हा विश्वास विकासाचं प्रतीक आहे. हा देश सबका साथ, सबका विकास या मंत्रावरच पुढे जात आहे.” Ballarpur News Today BJP Rally
कार्यक्रमात महिलांच्या हक्क, सक्षमीकरण आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. आ.मुनगंटीवार म्हणाले की, बल्लारपूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि पुढील काही महिन्यांत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणखी मोठे प्रकल्प राबविण्यात येतील. शहरात लवकरच शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी नव्या योजना सुरू होणार आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट संदेश दिला की, “प्रत्येक मतदाराशी संपर्क साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणे हेच खरे राजकारण आहे.”त्यांनी पुढे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यात आ.मुनगंटीवार यांनी भाजपा महिला अध्यक्षा वैशालीताई जोशी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कुशल संघटनक्षमतेचं कौतुक केलं. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित सर्व भगिनींना वंदे मातरमच्या घोषासह देशभक्तीचा संदेश दिला. त्याचबरोबर टेलिफोनवर ‘हॅलो’ ऐवजी वंदे मातरम्’ म्हणण्यासाठी आवाहन केले.
Chandrapur farmer killed tiger attack : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News34) – ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी लगतच्या जवराबोडी मेंढा जंगलात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून क्रुरपणे ठार केल्याची थरारक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. शेतकरी सिंधी तोडण्यासाठी जंगलात गेला होता. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोध घेतला असता जंगात त्याचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले. भास्कर गोविंदा गजभिये (वय 62) रा. मेंडकी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर गोविंदा गजभिये हा काल रविवारी मेंडकीपासून जवळ असलेल्या जवराबोडी-मेंढा जंगलात सिंदी तोडण्यासाठी एकटाच गेला होता. शेतीत धानाची लागवड करण्यात आल्याने स्वत:च शेतातील धानाचे भारे बांधण्यासाठी सिंदीची गरज होती त्यामुळे तो गेला होता. रविवारची सायंकाळ होऊनही गजभिये घरी परत आला नाही. कुटुंबीयांनी वाट पाहत राहिले, पण तो येईना. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. forest department negligence Tiger attack
आज सोमवारी सकाळी कुटुंबीय व गावकरी मिळून जवराबोडी मेंढा परिसरातील जंगलात शोधासाठी गेले. शोध घेत असताना एका ठिकाणी त्याची सायकल व बाजूला सिंदी पडलेली आढळून आली. थोडे पुढे गेल्यावर कुटूंबिय व गावकऱ्यांना अत्यंत भीषण दृश्य दिसले. काही अंतरावर शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत आढळले. काहींनी तत्काळ ही माहिती मेंडकी ग्रामस्थांना दिली. वनविभाग व पोलिसांनाही कळविण्यात आले. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी (मेंडकी) तसेच पोलिसही घटनास्थळी पोहचले. शरीराचे अवयव एका ठिकाणी गोळा करण्यात आले त्या नंतर पंचनामा करून पार्थीक ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
आतापर्यंत ३९ नागरिकांचा बळी
चंद्रपूर जिल्ह्यात वर्ष २०२५ मध्ये तब्बल ३९ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये ३५ नागरिकांची शिकार हे वाघाच्या केली आहे, यासह बिबट्याने २, अस्वल १ तर हत्तीच्या हल्ल्यात एक नागरिकाचा बळी गेला आहे. वाघाच्या दहशतीखाली शेतकरी शेतात जात आहे. आम्ही शेती करायची कशी असा प्रश्न शेकटकरी वर्गापुढे निर्माण झाला आहे. Chandrapur farmer killed tiger attack
गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन होत असून काही जनावरे ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. तरीदेखील वनविभागाने बंदोबस्ताची कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, अखेर आज सदर शेतकररी त्याच परिसरात सिंदी आणण्याकरीता गेला असता तो वाघाच्या हल्यात बळी ठरला. वाघाने क्रुरपणे त्याचा जिव घेतल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. भास्कर गजभिये यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीचा अपघातात मृत्यू झाला होता तर वर्षभरापूर्वी एका मुलाचे निधन झाले होते. घरातील प्रमुख कमावता हात गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. human-tiger conflict Brahmpuri taluka
नागरिकांचा संताप
या घटनेमुळे मेंडकी व जवराबोडी मेंढा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, मृतकाच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, जंगलात नियमित गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. वारंवार वाघाची दहशत निर्माण झाली असतानाही वनविभाग ठोस पाऊले उचलत नाही त्यामुळे त्याच्यावर निष्क्रियतेचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.