Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • राज्यकर्ते हे जनतेचा नव्हे, निवडणुकांचा विचार करतात – मेधा पाटकर

    राज्यकर्ते हे जनतेचा नव्हे, निवडणुकांचा विचार करतात – मेधा पाटकर

    News34 chandrapur

    कोरपना (चंद्रपूर) : देशाला लुटण्याचे, संविधान आणि कायदे बदलण्याचे धोरण सत्ताधारी व उद्योगपती मिळून करत आहेत. विकासाच्या नावावर आदिवासींचे विस्थापन होत आहे. ३९ कायदे संपवून ग्रामसभा व लोकशाहीविरोधी ४ नवीन कायदे कंपण्या व पैशाची गुंतवणूक करणा-यांसाठी सरकारने आणले. याविरुद्ध लढा देणा-यांना विकासविरोधी, अर्बन नक्षल ठरवले जात आहेत.

     

    जल-जंगल-जमीन बचावासाठी देशभर जनआंदोलने करणारे आंदोलक हे संसाधन रक्षणाचे खरे अहिंसक सत्याग्रही आहेत. मात्र राज्यकर्ते हे जनतेचा विचार करणारे राहिले नाहीत, ते कमीशनखोरी करुन केवळ निवडणूकींचा विचार करतात. त्याचे परिणाम सर्वसामान्य जनता भोगत आहेत, असे घणाघाती प्रतिपादन नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले. समाजसेवक डॉ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ ग्रुप बिबी आयोजित दिव्यग्राम २०२३ महोत्सवात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते, माजी आमदार ॲड.वामनराव चटप, स्वागताध्यक्ष ॲड.स्नेहल संतोष उपरे, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ.अनिल मुसळे, समाजसेवक डॉ.गिरीधर काळे, सामाजिक कार्यकर्ते ॲड.लालसू नोगोटी, नर्मदानगरचे सरपंच पुण्या वसावे, राहूल आसूटकर, अनंता रासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

     

    समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ गृपतर्फे यंदाचा राज्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर व आश्वासक युवा सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात येणारा नामांकित सेवार्थ पुरस्कार देशात सामाजिक कार्य व पिढीतांच्या सक्षमीकरणासाठी २५० कोटींहून अधिक रक्कम समाजाला थेट मदत करणा-या ‘डोनेटकार्ट’ कंपणीचे संस्थापक, फोर्ब्स यादीतील प्रभावशील तरुण ठरलेला चंद्रपूर येथील सारंग कालीदास बोबडे यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला. दहा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप होते.

     

    मागील १२ वर्षांपासून बिबी येथे दिवाळी ही फटाकेमुक्त, ग्रामस्वच्छता व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरी करण्यात येते. यावेळी ब्रिटीश सरकारचा चेव्हनिंग गोल्ड व्हालंटरिंग पुरस्कार प्राप्त ॲड.दीपक यादवराव चटप व महाराष्ट्र पोलीस सेवेत निवड झालेले विशाल नारायण उपरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष ॲड.स्नेहल संतोष उपरे यांनी केले. संचालन अविनाश पोईनकर, तर आभार सचिन आस्वले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल अहिरकर, संदिप पिंगे, गणपत तुम्हाणे, संतोष बावणे, अनिल हिंगाणे, इराणा तुम्हाणे, सुरज मडावी, प्रमोद विरूटकर, राकेश बोबडे, सुरेंद्र मुसळे यासह युवक मित्रमंडळींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जिल्हा व परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

     

    कृतीशील युवकांच्या पाठीशी उभे रहावे – ॲड.वामनराव चटप

    मेधाताईंचे कार्य सर्वश्रूत आहे. सारंग बोबडे या २६ वर्षीय तरुणाने पिढीतांच्या मदतीसाठी उभे केलेले काम प्रेरणादायी आहे. रम-रमा-रमी या तीन व्यसनांपासून दूर राहता आले तर आपल्याला प्रगतीपासून कुणीही रोखू शकत नाही. या तत्वाने ॲड.दीपक चटपची वाटचाल आश्वासक आहे. चार दशकांपासून डॉ.गिरीधर काळे यांनी यांनी लाखो अस्थिरुग्नांवर मोफत उपचार करुन बरे केले. ही कर्मयोगी माणसे समाजाचे भूषण आहे. बिबी येथील सेवार्थ गृपच्या युवकांनी १२ वर्षांपासून प्रबोधनाचा हा वसा घेतला. अशा कृतीशील युवकांच्या पाठीशी समाजाने भक्कम उभे रहावे, असे मत शेतकरी नेते व माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी केले.

  • चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला घरफोडी प्रकरणी अटक

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याला घरफोडी प्रकरणी अटक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता असलेला विभाग म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा मात्र या विभागातील कर्मचारी स्वतः घरफोडी प्रकरणातील मुख्य आरोपी निघाल्याने जिल्हा पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

     

    शहरातील तुकूम भागात राहणाऱ्या इरफान शेख यांच्या घरी चोरी झाल्याची तक्रार 15 नोव्हेम्बरला रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली होती.

     

    इरफान शेख हे पत्नीसह 9 नोव्हेम्बरला हज ला गेले होते, या दरम्यान त्यांच्या घरी अज्ञातांने दाराचे कुलूप तोडत आत प्रवेश करीत अलमारीत ठेवलेले 12 हजार रुपये चोरून नेले.

     

    रामनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली, रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, सदर प्रकरणी पोलिसांनी सर्व बाबी तपासत 4 दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी नरेश डाहूले यांना रामनगर पोलिसांनी अटक केली. विशेष बाब म्हणजे शेख हे डाहूले यांच्या घराशेजारी राहत होते, ते हज ला गेले ही बाब डाहूले यांना माहिती होती.

     

    नरेश डाहूले यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

     

    मिळालेल्या माहिती नुसार आरोपी पोलीस कर्मचारी नरेश डाहूले यांनी याआधी सुद्धा 2 ते 3 घरफोडी केल्याचा संशय आहे त्याबाबत पोलीस तपास करीत आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात दिवाळीनिमित्त पोलिसांच्या मोहिमेची चर्चा..

    दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी अनेक नागरिक आपल्या गावी जातात, मात्र गावी गेल्यावर याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये माहिती द्या अशी जनजागृती चंद्रपूर पोलीस विभागाने केली, मात्र या जनजागृतीचा पोलिसरूपी चोराने स्वतःचा फायदा करवून घेतला, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत डाहूले यांनी घरफोडी करीत पोलिसांच्या मोहिमेचा फज्जा उडविला.

     

    पोलिसांना आधीच डाहूले यांचा सुगावा?

    सूत्रांच्या माहितीनुसार डाहूले यांच्या गुन्हेगारीबाबत पोलिसांना सुगावा लागला होता, हे धंदे बंद करा अशी चेतावणी सुद्धा त्यांना देण्यात आली होती, मात्र दिवसा पोलीस व रात्री चोर अशी भूमिका डाहूले पार पाडत राहिले.

     

    स्थानिक गुन्हे शाखा झाली अनियंत्रित?

    वर्षभरापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, गोळीबार, हत्या, तंबाखू तस्करी, सट्टेबाजी, कोळसा तस्करी, घरफोडी या गुन्ह्यात सतत वाढ होत आहे, विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी पडोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील दरोडा प्रकरणातील स्थानिक आरोपी वगळता मुख्य आरोपीना अजूनही अटक करण्यात आली नाही. अश्यातच आता पोलीस कर्मचारी स्वतः गुन्हे करू लागले असल्याने नागरिक सुरक्षित कसे राहणार हा मोठा प्रश्न आहे.

     

    चंद्रपूर पोलीस विभाग नॉट रिचेबल

    पोलीस दलातील कर्मचारी गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याने पोलीस विभागावर नामुष्की ओढावली आहे, या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अनेकांनी उत्तर देण्याचे टाळले.

     

    आरोपीची पोलीस कोठडी का नाही?

    लहान गुन्ह्यात पोलीस विभाग आरोपीची पोलीस कोठडी मागतात मात्र या गंभीर गुन्ह्यात आरोपी पोलीस कर्मचारी नरेश डाहूले यांची पोलीस कोठडी का मागण्यात आली नाही? डिपार्टमेंट च्या माणसाला वाचविण्याचा तर प्रयत्न नाही ना अशी चर्चा आता जनमानसात रंगली आहे.

  • बल्लारपूर बायपासवर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत

    बल्लारपूर बायपासवर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सप्टेंबर महिन्यात बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षाच्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना वने व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत जाहीर झाली आहे. ना. श्री. मुनगंटीवार यांनी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि दीड महिन्याच्या कालावधीत चारही मृतांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे एकूण 20 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

     

    27 सप्टेंबर 2023 रोजी बल्लारपूर बायपासवर ट्रक आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. यात राजकला मोहुर्ले, इरफान खान (रा. बाबुपेठ, चंद्रपूर), अनुष्का खेरकर (रा. बल्लारपूर) आणि संगिता अनिल चहांदे (रा. साईनगर, गडचिरोली) या चार जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर आणि जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत यांनी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत ना. मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने 25 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाकडे अर्थ सहाय्याकरिता प्रस्ताव पाठविला. प्रस्ताव पाठविल्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले आणि सातत्याने पाठपुरावा केला.

     

    प्रस्ताव पाठविल्यानंतर 20 दिवसांच्या आतच मुख्यमंत्री सचिवालयाने मृतांच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी पाच लक्ष रुपये याप्रमाणे चारही कुटुंबांसाठी 20 लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर केले आहे. हा निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतून, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे खाते असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया, जटपुरा गेट शाखा, चंद्रपूर येथील बँक खात्यात परस्पर वर्ग करण्यात आले आहे.

  • ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    News34 chandrapur

    नागपूर – आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात 2 समाज एकमेकांसमोर उभे झाले आहे, या तिढ्याचा प्रश्न राज्य सरकार उत्तम प्रकारे हाताळत असून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही संकल्पबद्ध आहोत, सोबतच राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले आहे.

    आरक्षणावर विविध समाज एकमेकांसमोर उभा राहणे ही परिस्थिती योग्य नाही, राज्य सरकार व स्वतः मुख्यमंत्री या महत्वाच्या प्रश्नावर गंभीर असून लवकरचं सर्व समाजाच्या फायद्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदें घेतील, तो पर्यंत राज्यात शांतता कायम ठेवा, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यास संकल्पबद्ध आहोतचं सोबत ओबीसी समाजावर कसलाही अन्याय होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण तर उद्धव ठाकरे राज्याचे रावण – मोहित कंबोज

    मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण तर उद्धव ठाकरे राज्याचे रावण – मोहित कंबोज

    News34 chandrapur

    मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता रामायण वाचली असून ते नवे हिंदू बनले आहे, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विभीषण म्हटले, मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण आहे पण ते सत्यासोबत उभे आहे, उद्धव ठाकरे हे राज्याचे रावण आहे, ते नेहमी अहंकारात असतात.

     

    राऊत यांनी 2019 मध्ये रामायण वाचली असती तर उद्धव ठाकरे यांना त्यांचे खरे पात्र सांगू शकले असते अशी घनघणाती टीका भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. संजय राऊत यांनी वर्ष 2023 मध्ये रामायणाचे पठण केले, आणि आता ते ज्ञान पाजळत फिरत आहे, आता तरी संजय राऊत यांनी आपली फालतूची पोपटगीरी बंद करावी कारण मुख्यमंत्री शिंदे हे विभीषण असल्याचा आम्हाला गर्व आहे.

  • महावितरण कंपनीतील लाईनमॅन सह इतर रिक्त पदे भरा – आमदार किशोर जोरगेवार

    महावितरण कंपनीतील लाईनमॅन सह इतर रिक्त पदे भरा – आमदार किशोर जोरगेवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विज ही मानवी गरज बनली आहे. त्यामुळे विज पुरवाठा करणा-या यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. अशात आपण उत्तम सेवा देण्यासाठी तत्पर असल पाहिजे. महावितरणमध्ये लाईनमॅनसह इतर अनेक पदे रिक्त आहे. त्यामुळे ही पदे तात्काळ भरल्या गेली पाहिजे अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. महावितरण कार्यालय येथे एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांच्या प्रमूख उपस्थितीत महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व महाऊर्जा या सरकारी कंपन्यांच्या जिल्हा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

     

    सदर बैठकीला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, महानिर्मितीचे संचालक संजय मारूडकर, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, महानिर्मितीचे मुख्य अभियंता गिरिश कुमारवार, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे उपस्थित होते.

     

    चंद्रपूर हा विज उत्पादक जिल्हा आहे. त्यामुळे येथील वीज सेवा उत्तमच असली पाहिजे. विज ग्राहकांशी आपली वागणूक सौजन्यपूर्ण असली पाहिजे. त्यांच्या अडचणींचे निराकरण तात्काळ करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल पाहिजे. कमी मनुष्यबळ असूनही चांगली सेवा देण्यासाठी महावितरण ओळखली जाते. आपण निर्माण केलेली ही ओळख कायम ठेवण्यासाठी परिश्रम घ्या. येथे अनेक पदे रिक्त आहेत. यात विद्युत सेवेचा मुख्य भाग असलेल्या लाइनमॅनचे जवळपास 50 हुन अधिक पदे रिक्त आहेत. ती भरण्याच्या दिशेने तातडीने प्रयत्न व्हावेत अशा सुचनाही या बैठकीत बोलाताना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

     

    वडगाव प्रभागात विद्युत पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता वडगाव येथे सब स्टेशन सुरु करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.
    सध्या विद्युत पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार कमी झाले आहे. हे नक्कीच महावितरणचे यश आहे. मात्र विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारा कालावधी आणखी कमी करता येईल या दिशेने आपले प्रयत्न असले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.

     

    विद्युत शॉक लागण्याच्या घटनांवर अद्यापतरी आपण पुर्णत: अंकुश मिळवू शकलेलो नाही त्यामुळे आता विद्युत शॉकवर अंकुश लावण्यासाठी प्रत्येक विद्युत ग्राहकांकडे सुरक्षा यंत्र महावितरणने स्वखर्चातून लावण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

  • २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालकाचे १७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन

    २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालकाचे १७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल – ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून ११ वर्ष काम केलेल्या संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेने केली आहे.

     

    या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने १७ नोव्हेंबर पासून राज्यभरात कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून मागणी मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.

     

     

    संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणकपरिचालक काम करत आहेत.परंतु शासनाकडून संगणकपरिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी च्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदर असलेल्या तुटपुंज्या ६ हजार रूपये मानधनात एक हजार रुपये वाढ केली.

     

    आज महागाईच्या काळात ७ हजार रूपयाच्या मासिक मानधनात संगणक परिचालकानी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना वारंवार आश्वासन देऊन सुद्धा निर्णय होताना दिसत नाही. गतवर्षी नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संघटनेच्या वतीने २७ व २८ डिसेंबर रोजी मोर्चा काडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

     

    त्याची दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री यांनी मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र काहीच निर्णय घेण्यात न आल्याने रज्यासंघटनेच्या वतीने १७ नोव्हेंबर २०२३ पासून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालकांना असलेली सर्व कामे बंद ठेऊन बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

     

    अशा आहेत मागण्या: ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात संगणक परिचालकाना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे,संगणक परिचालकाना तत्काळ २० हजार मासिक मानधन देणे,नव्याने सुरू केलेली टार्गेट सिस्टीम रद्द करणे अशा मागण्या घेऊन काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.

     

    संगणक परिचालकांचा जास्त अंत न बघता महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याबाबत निर्णय घ्यावा.: धनराज रामटेके तालुकाध्यक्ष म.रा.स.परिचालक संघटना मुल

  • त्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    त्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पूर्ववत थांबा द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा-भद्रावतीचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून वरोरा रेल्वे स्थानकावर जुन्या गाड्यांना पूर्ववत थांबा देण्याची मागणी केली आहे.

     

    पत्रात धानोरकर यांनी म्हटले आहे की, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात GMR, वर्धा पॉवर, वेकोली, एम्टा, अरविंदो कोल माईन्स यांसारखे मोठे उद्योग आणि भव्य जैन मंदिर व प्राचीन वास्तू शिल्पे आहेत. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या ट्रेनांचा स्टॉपेज वरोरा रेल्वे स्थानकावर अजूनही सुरु झालेला नाही. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

     

    या पत्रात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वरोरा रेल्वे स्थानकावर खालील रेल्वेगाड्यांचा स्टॉपेज सुरु करण्याची मागणी केली आहे:

     

    सिंकदराबाद – दानापूर ट्रेन नं. १२७९१ / ९२, ग्रांड ट्रंक एक्सप्रेस ट्रेन नं. १२६१५ / १६, अहिल्यानगरी एक्सप्रेस ट्रेन नं. २२६४५ / ४६, जयपूर एक्सप्रेस ट्रेन नं. १२९७५/७६, राप्ती सागर एक्सप्रेस ट्रेन नं. १२५११ / १२, संघमित्रा एक्सप्रेस ट्रेन नं. १२२९५ / ९६, धनबाद कोल्हापूर दिक्षाभुमी एक्सप्रेस ट्रेन नं. ११०४५/४६, संतरागाछी एक्सप्रेस ट्रे १२७६७/६८ या रेल्वे गाड्यांच्या समावेश आहे.

     

    या व्यतिरिक्त, नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस (११४०१-०२) नागपूरपर्यंत, जयंती जनता एक्सप्रेस, आनंदवन एक्सप्रेस, बल्लारपूर – वर्धा पॅसेंजर, बल्लारशाह – मुंबई सेवाग्राम लिंक एक्सप्रेस (मुंबईसाठी सीधी ट्रेन सुरू होईपर्यंत) या ट्रेनांचा स्टॉपेज पूर्ववत सुरु करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली आहे.

     

  • न्यायमूर्ती शिंदे (निवृत्त) समिती बरखास्त करा – सचिन राजुरकर महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

    न्यायमूर्ती शिंदे (निवृत्त) समिती बरखास्त करा – सचिन राजुरकर महासचिव, राष्ट्रीय ओबीसी महासंघ

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यातील समाजात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अडचणी येत असल्याने मुख्यमंत्री यांनी सन २०२३ च्या पहिल्या अर्थसंकल्प अधिवेशनात मराठा समाजास कुणबी- मराठा, मराठा- कुणबी प्रमाणात देण्यासाठी अप्पर सचिव (महसुल) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २९ मे २०१३ ला समिती स्थापन केली होती.

     

    मनोज जरांगे पाटील यानी उपोषण सुरु झाल्यानंतर ७ सप्ते. २०२३ ला फ़क्त मराठवाडा जिल्ह्यातील ७ सप्टेंबर २०२३ – कुणबी -मराठा, मराठा- कुणबी प्रमाणपत्र देणासाठी समिती स्थापन करण्यात आली. नंतर पुन्हा ३ नोव्हेंबर २०२३ ला संपूर्ण मराठा ज्यांचे कडे निजाम कालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे ,निजामकालीन झालेला करार, निजाम संस्थानिकांनी दिलेल्या सदनी, राष्ट्रीय दस्तावे, वैयक्तिक व प्रशासकिय तपासणी करून पात्र लोकांना कुणबी-मराठा व मराठा- कुणबी प्रमाण पत्र देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला,परंतु महाराष्ट्र राज्यात घटनात्मक राज्य मागावर्गीय आयोग असतांना मा.न्या.संदीप शिंदे समिती का नेमण्यात आली, आणि ही समिती फक्त ओबीसी असलेल्या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा- कुणबी असलेल्या दस्तऐवजाची तपासणी का करत आहे ? मंडल आयोगातील एकूण २७२ जाती मंडल आयोगात होत्या नंतर ४०० जाती राज्य आयोगाच्या शिफारशीनुसार मागाससवर्गीय ठरल्या नंतर ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आल्या ,मग असे असताना सरकारने वेगळी न्या. शिंदे समिती का नेमण्यात आली.

     

    याकरिता न्या. शिंदे समिती बरखास्त करावी व मराठा समाजाचा मागासलेपणा राज्य मागासवर्गीय आयोगा कडून करावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केली आहे.

  • NRHM कर्मचा-यांच्या आंदोलनस्थळी महिला कर्मचा-यांनी आमदार जोरगेवार यांना केले औक्षवंत

    NRHM कर्मचा-यांच्या आंदोलनस्थळी महिला कर्मचा-यांनी आमदार जोरगेवार यांना केले औक्षवंत

    News34 chandrapur

    चंद्रपूर – विविध मागण्यांना घेऊन एन. आर. एच. एम. च्या कर्मचा-यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समीतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन सुरु केले आहे. आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलन स्थळी भेट देत आपल्या मागण्या रास्त असून त्या सोडविण्यासाठी पुर्ण शक्तीनिशी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

     

    यावेळी एन.आर. एच. एम. च्या महिला कर्मचा-यांनी भाऊबीज करत आमदार किशोर जोरगेवार यांचे औक्षवंत केले. कर्मचा-र्यांच्या मागण्यांसदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी एक बैठक आयोजित करण्याच्या दिशेने प्रयत्न करेल हीच भाऊ म्हणून ओवळणी राहील असे यावेळी ते म्हणाले. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व आंदोलनकर्त्या कर्मचा-यांसह दिवाळीचा फराळ केला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी रविंद्र उमाटे, डाॅ. तिरथ उराडे, अतुल शेंद्रे, डाॅ. अक्षय बुर्लावार, डाॅ. दीपक भट्टाचार्य, वनिता मेश्राम, डाॅ. विनोद फुलझेले, ललिता मुत्तेलवार, डाॅ. तुषार आगडे, जया मेंदळकर, अश्विनी येंबरवार, प्रफुल रासपल्ले, रुपेश हिरमठ, मित्रंजय निरंजने यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, कार्तिक बुरेवार आदींची उपस्थिती होती.

     

    राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत शहरी, ग्रामीण व एन यु एच एम अंतर्गत कार्यरत तसेच एन एच एम कंत्राटी कर्मचा-यांना वयाची अट शिथिल करुन नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरनात्मक निर्णय घेण्यात यावा, विशेष भरती मोहिम दर सहा महिण्यांनी राबविण्यात यावी, एनएचएम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एच. आर पाॅलिसी त्वरित लागु करण्यात यावी, एम एच एम अतंर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ईपीएफ योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा यासह ईतर मागण्यांना घेऊन एन.आर.एच.एम. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

    NRHm worker protest
    महिला कर्मचाऱ्यांनी आमदार जोरगेवार यांचं केलं औक्षवंत

    चंद्रपूरातही जिल्हाधिकारी कार्यालया समोर त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनर्त्यांची भेट घेतली. एैन दिवाळीत तुमचे आंदोलन सुरु आहे. तुम्ही दिवाळी साजरी केली नाही. त्यामुळे मी स्वतः दिवाळीचा फराळ करण्यासाठी आपल्याकडे आलो असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. आपल्या मागण्या रास्त आहे. सरकारकडेही याचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यावर तोडगा निघावा यासाठी मी सुध्दा प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. शिक्षण आणि आरोग्य सेवा बळकट झाली पाहिजे. हे करत असतांना हि सेवा देणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांच्याही समस्या सुटाव्यात ही भावना आपली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुरक्षा आणि सन्मान मिळावा ही आमची जबाबदारी आहे. अधिवेशनात आपला विषय नक्कीच मांडणार आहे. पण त्यापुर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आपली भेट घडवून आणण्यासाठीही माझे प्रयत्न राहणार असल्याचे ते यावेळी प्रसंगी म्हणाले.

     

    आज आपण महिला भगीणींनी भाऊबीज साजरी करत मला औक्षवंत केले. त्यामुळे भाऊ म्हणून माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. माझ्या बहिणींना रस्त्यावर दिवाळी साजरी करावी लागत असेल हे दुर्भाग्य आहे. मात्र आपण चिंता करु नका हा भाऊ प्रत्येक कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील अशी ग्वाही या प्रसंगी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. यावेळी आंदोलनकर्ते अधिकारी आणि कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.