Category: गुन्हेगारी

गुन्हेगारी (Crime) क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाची बातमी वाचा news34.in वर. चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील खून, चोरी, फसवणूक, सायबर गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळ्यांच्या ताज्या बातम्या येथे उपलब्ध आहेत. पोलीस दलाची कारवाई, न्यायप्रक्रियेतील घडामोडी आणि तपास कार्याचे सविस्तर अपडेट्स आम्ही देतो. गुन्हेगारी जगतातील सत्य आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्याशी जोडलेले रहा.

  • चंद्रपुरातील 2 लाख रुपयांची मॉर्निंग वॉक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – आजच्या धावपळीच्या युगात आरोग्य ठीक रहावे यासाठी नागरिक योगा व सकाळी बाहेर फिरायला जातात मात्र सकाळी बाहेर फिरायला जाणे किती महागात पडू शकते याचे जिवंत उदाहरण चंद्रपुर शहरातील जटपुरा गेट येथे घडले आहे.

     

    6 ऑक्टोबर ला जटपुरा गेट परिसरातील विश्व भारती हॉटेलच्या मागे राहणारे संजय गोडे हे पहाटे नेहमी फिरायला बाहेर जातात, 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास संजय गोडे हे घरातील दाराची कडी बाहेरून लावत फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांची पत्नी वर्षा गोडे ह्या आत झोपून होत्या, या संधीचा फायदा घेत अज्ञाताने गोडे यांच्या घरी प्रवेश करीत हॉल मध्ये असलेली सोन्याच्या दागिन्यांची बॅग पळविली, त्या बॅग मध्ये तब्बल 2 लाख 14 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने होते.

     

    संजय गोडे जेव्हा घरी परतले त्यावेळी त्यांना ती बॅग कुठेही आढळून आली नाही, या प्रकरणी फिर्यादी वर्षा गोडे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.

     

    चंद्रपूर शहरात घरफोडीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सदर प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक नेमत प्रकरणाचा तपास सुरू केला.

     

    घरफोडी प्रकरणाचा कौशल्यपूर्ण तपास करीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार 23 वर्षीय उमाकांत उर्फ गोलू सुनील उदासी याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गोडे यांच्या घरातील बॅग पळविली असल्याचे कबूल केले.

     

    चोरी केलेल्या मालाबद्दल विचारणा केली असता सदर मुद्देमाल आरोपी उमाकांत उदासी यांच्या घरून जप्त करण्यात आला, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 1 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, गोपाल आतकुलवार, नितीन रायपुरे, अपर्णा मानकर यांनी केली, प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

  • चंद्रपुरात पंतप्रधान किसान योजनेच्या नावाखाली महिलेची फसवणूक

    News34 chandrapur

    चंद्रपूर/वरोरा – जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील येनसा गावातील महिलेची स्वतःला बँकेचे अधिकारी सांगत पंतप्रधान किसान योजनेमार्फत पैसे मंजूर झाले असल्याची बाब सांगत तब्बल 38 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत महिलेने फिर्याद देताच स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली.

     

    65 वर्षीय फिर्यादी मंजुळाबाई नथुजी झाडे या महिलेला अज्ञात 2 इसमानी स्वतःला बँकेचे अधिकारी सांगत मंजुळाबाई यांना पंतप्रधान किसान योजनेमार्फत 1 लाख 40 हजार व बैलबंडी साठी 3 लाख रुपये मंजूर झाले आहे, मात्र त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधी 22 हजार रुपये रोख भरावे लागतील, असे सांगत महिलेकडून सोन्याच्या पोत व कानातील बिऱ्या असा एकूण 38 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेत पळ काढला.

    त्याच दिवशी दुपारच्या सुमारास आरोपीनी वरोरा तालुक्यातील भटाळी येथील असाच एक गुन्हा केला.

     

    फिर्यादी मंजुळाबाई यांनी 9 ऑक्टोबर ला वरोरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली, गुन्हा दाखल होताच जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर गुन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले.
    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करीत गुन्ह्याचा तपास सुरू केला.
    सदर प्रकरणात गोपनीय माहिती मिळवीत आरोपी 51 वर्षीय रामराव भीमराव ढोबळे तालुका तिवसा जिल्हा अमरावती याला ताब्यात घेतले.

     

    आरोपी रामराव याने आपल्या साथीदारांसह 2 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन सुद्धा जप्त करण्यात आले, आरोपी रामराव ढोबळे याचे क्राईम रेकॉर्ड चेक केले असता त्याच्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अश्याच प्रकारचे गुन्हे दाखल आहे.
    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी विनोद भुरले, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, चंदू नागरे, प्रशांत नागोसे, दिनेश आरोळे यांनी केली असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.

  • राजुरा हत्याकांडातील आरोपीला 2 तासात अटक

    News34 chandrapur

    राजुरा – 9 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या 28 वर्षीय संदीप निमकर या युवकाचा मृतदेह 10 ऑक्टोबरला माथरा रोड जवळील झुडपी जंगलात आढळला, त्याच्या डोक्यावर दगडाने वार केल्याच्या खुणा होत्या, घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार घटनास्थळी दाखल झाले होते.

     

    राजूरा शहरालगतच्या रामपुर येथे संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. काल सोमवारी रात्री आठ वाजता घरून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने राजूरा पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी दाखल केली होती. तो घरी परत न आल्याने रात्रीपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी शोधाशेध केली, परंतु रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही. तो मित्रांसोबत नेहमी जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोध घेत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ झुडपी जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.

     

    राजुरा पोलिसांनी हत्या प्रकरणी तिघांना ताब्यात घेत विचारपूस सुरू केली होती, मात्र स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर करीत हत्या प्रकरणातील सर्व बाबीचा तपास करीत आरोपीला अवघ्या 2 तासात अटक केली.

     

    हत्या कशी झाली?

    9 ऑक्टोबर ला संदीप व आरोपी हे दोघे माथरा रोडवरील जंगलात दारू पिण्यासाठी गेले होते, दारू पीत असताना दोघांचा वाद झाला आणि आरोपीने जवळील दगड हातात घेत संदीपच्या डोक्यावर जोरात मारले, या प्रहारात संदीप चा जागीच मृत्यू झाला, आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

    विशेष म्हणजे आरोपी व मृतक हे दोघे घनिष्ठ मित्र होते.

  • चंद्रपूर जिल्ह्यात 28 वर्षीय युवकाची हत्या

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीतील वॉर्ड क्रमांक दोन मधील साई मंदिर जवळ राहत असलेला एका युवकाचा रामपूर जंगलात अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून निर्घूण खून केल्याची घटना मंगळवारी 10 ऑक्टोबर ला सायंकाळी उघडकीस आली आहे. संदीप देवराव निमकर (वय २८) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

     

    राजूरा शहरालगतच्या रामपुर येथे संदीप निमकर हा आपल्या आई वडिलांसह राहत होता. सोमवारी रात्री आठ वाजता घरून निघून गेला होता. तो घरी परत न आल्याने राजूरा पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी दाखल केली होती. तो घरी परत न आल्याने रात्रीपर्यंत त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली, परंतु रात्रीपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही.

     

    तो मित्रांसोबत नेहमी जात असलेल्या ठिकाणी नातेवाईक शोध घेत असताना रामपुर लगत असलेल्या जंगलात माथरा रोड जवळ झुडपी जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. लगेच सदर घटनेची माहिती राजुरा पोलिस ठाण्यात देण्यात आली. ठाणेदार योगेश पारधी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश साखरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

     

    राजुरा शहरालगत असलेल्या रामपुर वस्तीत काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी राजुरा शहरातील नाका नंबर तीन येथे झालेल्या खुनात रामपुर येथीलच आरोपी निघाले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डिझेल, कोळसा व भंगार चोरीचे प्रकरण समोर येत आहेत. तसेच या ठिकाणी जुगार व सट्टा चालतो. या परिसरातील युवक अवैद्य व्यवसायात गुंतले आहेत. याच प्रकरणातून ही घटना घडल्याचे सांगितल्या जात आहे. मृतक संदीप निमकर यांच्या घराशेजारी असलेल्या साई मंदिर समोर मोठ्या प्रमाणत अवैद्य धंदे सुरू आहेत. जुगार, सट्टा चालतो. माथरारोडवरील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात कोळसा, डिझेल चोरीसह जुगार खेळल्या जात आहे.

     

    राजुरा शहर हे गुन्हेगारांचे माहेरघर म्हणून अस्तित्वात येत आहे, गोळीबार प्रकरण असो की गांजा तस्करी, कमी वयाची मुले आता बंदूक खेळण्यासारखे जवळ ठेवतात, विशेष म्हणजे राजुऱ्यात कोळसा तस्करांचे मोठे नेटवर्क आहे, दिवसाढवळ्या या ठिकाणी कोळशाची तस्करी केल्या जाते, पण कायद्याचे रक्षक सुद्धा यावर कारवाई करणे टाळतात.

     

  • जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला जिवंत जाळले

    News34 chandrapur

    मालेगाव/वाशीम – शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे 54 वर्षीय जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता शाळेत जाण्यासाठी निघाले, मात्र वाटेत अज्ञातांनी शिक्षकांवर पेट्रोल टाकत जिवंत जाळले, या घटनेत शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे.

     

    बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक 54 वर्षीय दिलीप धोंडूजी सोनुने हे नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी सकाळी 10 वाजता निघाले होते, ते आपल्या दुचाकी वाहन क्रमांक Mh37 y 1438 शाळेत जाण्यासाठी निघाले मात्र वाटेत त्यांचा मृत्यू उभा होता हे त्यांनाही माहीत नव्हते.

     

    4 किलोमीटर अंतर गाठल्यावर कोलही गावाजवळ अज्ञात हल्लेखोर मास्तरांची वाट बघत होते, सोनुने त्या ठिकाणी पोहचताच त्यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला, अचानक झालेल्या या हल्ल्याने सोनुने दुचाकी वाहनवरून खाली कोसळले, गंभीर अवस्थेत ते जीव वाचविण्याचा आक्रोश करू लागले मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकत जिवंत जाळले.

     

    नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली, पोलीस व तहसीलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, गंभीर अवस्थेत असलेल्या सोनुने यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शिक्षक सोनुने यांचा मृत्यू झाला.

     

    पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे, मात्र सोनुने यांच्यावर हल्ला का करण्यात आला यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • रात्री 10 वाजता चंद्रपूरचे तहसीलदार पवार यांची घाटावर धडक

    News34 chandrapur

    घुग्घुस – चंद्रपूर तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून वाळू माफिया सक्रियपणे काम करीत आहे, अविरत चालणारी वाळू तस्करी प्रशासनाच्या नाकावर टिच्चू देऊन सुरू आहे.

     

    6 ऑक्टोम्बर ला घुग्घुस येथील चिंचोली घाटावर तहसीलदार विजय पवार हे रात्रीच्या सुमारास पोहचले असता त्याठिकाणी वाळू तस्करी करीत असताना 3 ट्रॅक्टर तहसीलदार यांनी जप्त केले.

     

    सदर ट्रॅक्टर जप्त करीत नायब तहसीलदार यांच्या कार्यालयात जमा करण्यात आले, यावेळी मंडळ अधिकारी गनफाडे, तलाठी दूवावार, झिटे, चुरे कोतवाल व शिपाई उपस्थित होते.

    तहसीलदार पवार यांच्या कारवाईने वाळू तस्करांचे काही कालावधीसाठी धाबे दणाणले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या भागात अवैध दारू पकडण्यास गेलेल्या महिलांना धक्काबुक्की

    News34 chandrapur

    राजुरा :– तालुक्यातील मौजा पांढरपौणी येथे सर्रासपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याने, दारूच्या विळख्यात गावातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी सापडल्यामुळे गावातील तरूण पिढी, नागरिक बरबाद होत आहेत, मोठ्या कष्टाने मोलमजुरी करून कमावलेले पैसे दारूत मातीमोल झाल्याने अनेकांचे संसार उघडय़ावर पडत आहेत.

     

    ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील ग्रामपंचायत, ग्रामस्थांना सोबत घेऊन स्थानिक महिलांनी या विरोधात यलगार पुकारला. काल पांढरपौनी गावातून भव्य मोर्चा काढत, अवैध दारू बंद झालीच पाहिजे अशा घोषणा देत राजुरा शहर गाठून पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाला घेराव घातला. येथील अधिकाऱ्यांना गावातील अवैध दारू बंद करण्याचे निवेदन देत पूर्णपणे अवैध दारू बंद करण्यात यावी अन्यथा या विरोधात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याचा परिणाम होऊन पांढरपौनी गावांमध्ये सुरू असलेले जवळपास सर्वच अवैध दारू विक्री केंद्रे तातडीने बंद झालित मात्र ही अवैध दारू बंदी केवळ फार्स ठरते की काय असे वाटायला लागले आहे. कारण गावापासून थोड्याच अंतरावर असलेले बसस्थानक आणि पांढरपौनी साईडिंग येथे मात्र अवैध दारू विक्रेत्यांनी आपला मोर्चा वळवला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरूच आहे.

     

    आश्चर्याची बाब म्हणजे आज गावात सुरू असलेल्या या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी स्वतः महिलांनीच पुढाकार घेऊन गस्त वाढवली. या दरम्यान सकाळी १० : ३० च्या सुमारास गावातील एका अवैध दारू विक्रेत्याच्या घरून दारूच्या बाटला पोत्यात भरून बुलेट गाडीवर घेऊन जाणाऱ्या काही तरुणांना पकडण्याचा प्रयत्न स्थानिक महिलांनी केला. मात्र या तरुणांनी महिलांच धक्काबुक्की करून पळ काढला. यात एक महिला जखमी झाली आहे. या घटने नंतर गावकर्‍यांनी राजुरा पोलीस ठाण्यात सुचना केली असता संबंधितांनी आपण फक्त कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करू शकतो असे सांगितले मात्र पोलिसांकडून तातडीने मदत होत नसल्याने स्थानिक जनतेत कमालीचा असंतोष पहायला मिळत आहे.

     

    यानंतर कुठे माशी शिंकली की काय तासाभरात पोलिसांची जिप्सी गावात आली. दरम्यान पोलीस यायच्या आधी महिलांना एका अवैध दारू विकणाऱ्या महिलेला ग्रामपंचायत मध्ये पकडून ठेवले होते आणि पोलिस आल्यावर अवैध दारू विक्रेत्या महिलेच्या घरात देशी विदेशी दारूच्या रिकाम्या बाटलांचा ढिगच आढळून आला तर काही दारूच्या बाटल्या सापडल्याचेही महिलांनी सांगितले.

     

    पोलीस विभाग आता त्या महिलेसह इतर चार ते पाच अवैध दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन चौकशी केली मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार महिलांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि पोलीस कारवाई होण्याच्या शक्यतेने सर्व अवैध दारू विक्रेत्यांनी जवळील स्टाक अन्यत्र हलविला तसेच घराशेजारी असलेल्या रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावली असल्याने पोलिसांच्या हाती फारसे काही सापडले नाही. त्या महिलेच्या घरून बुलेटवर दारू घेऊन जाणारे ते तरूण गडचांदूर येथील असून त्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीशी संबध आहे का याचाही शोध घेऊन कठोर कारवाई होण्याची आवश्यकता असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले. त्या बुलेटचा नंबरही गावकर्‍यांनी पोलीसांना सांगितल्याचे कळते.

     

    एकंदरीत अवैध दारू विक्रीला लगाम घालण्यासाठी गावातील महिलांनी चंग बांधला असून महिलांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. मात्र अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने ठोस कारवाई न झाल्यास त्यांचे मनोबल वाढून येणाऱ्या काळात विरोध करणाऱ्यांपैकी काही निवडक नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची असेल असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

  • सिंदेवाही पोलिसांनी चंद्रपुरातील वाहनचालकाला केली अटक

    News34 chandrapur

    (प्रशांत गेडाम)
    सिंदेवाही : सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या नवीन विरव्हा येथील अपघातात राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

     

    सिंदेवाही पोलिसांनी अखेर 12 तासात अज्ञात वाहनाचा शोध लावून त्या दोघांचा जीव घेणारे चंद्रपूर येथील अज्ञात वाहन सेंट्रो कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा केली आहे.

     

    सिंदेवाही तालुक्यातील अपघातात नवीन विरव्हा येथील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दादाजी शिवराम सावसाकडे वय 65 वर्ष, उदालक केशव हजारे वय 50 वर्ष रा.सरडपार चक यांचा अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तात्काळ मदतीस वाहनाने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले.

     

    अपघातातील धडक दिलेल्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांनी तात्काळ घेणे सुरू केले. अखेर 12 तासात पोलिसांनी त्या अपघातातील वाहनाचा कसून शोध घेतला असता MH 34 AA 7437 या क्रमांकाची हुंडाई सेंट्रो कंपनीची कार चंद्रपूर येथे मिळाली आहे. हुंडाई सेंट्रो कंपनीची कार सिंदेवाही पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहे. वाहनाचे चालक आरोपी गजेंद्र गोमकर वय 35 रा. चंद्रपूर यांना ताब्यात घेतले आहे.

     

    अपघातानंतर पोलिसांनी तपास करीत असताना विविध ठिकाणी लावून असलेले कॅमेरे व नियोजन करून कार चा शोध लावण्यात यशस्वी कामगिरी केली असून सिंदेवाही पोलीस स्टेशन चे चव्हाण पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनात, सागर महल्ले उप निरीक्षक, पोलीस देवानंद सोनुले, अरविंद मेश्राम, दादाजी रामटेके, मातेरे, जांभुळे, होमगार्ड कोकुलवार पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहे.

  • चंद्रपुरात पांढऱ्या वर्दीची धडाकेबाज कारवाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सुगंधित तंबाखू तस्करांचा बोलबाला आहे, मात्र आजही या तस्करांवर ठोस नियंत्रण मिळविण्यात जिल्हा प्रशासन सपेशल अयशस्वी ठरले आहे. नोकिया चा नवा स्मार्टफोन, 3 दिवसांच्या बॅटरी लाईफ सह, आजच खरेदी करा

     

    30 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातील खाकी नाही पण पांढऱ्या वर्दीने सुगंधित तंबाखूच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडले.

    चंद्रपूर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव हे 30 सप्टेंबरला शहरातील तुकुम भागातील आझाद चौकात वाहन तपासणी मोहीम राबवित होते, तितक्यात चारचाकी वाहन क्रमांक Mh36 AA2443 या वाहनाला वाहतूक पोलिसांनी थाम्बविले, वाहनांच्या कागदपत्रांची तपासणीसाठी वाहनचालकला विचारणा करण्यात आली त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

     

    पोलिसांना वाहनचालकावर संशय आला त्यांनी तात्काळ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखूचा साठा ईगल, मजा व विमल गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला.

    पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव यांनी वाहन वाहतूक नियंत्रक शाखेत नेत याबाबत रामनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.

     

    या कारवाईत एकूण 8 लाख 96 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, वाहतूक पोलीस निरीक्षक रोशन यादव, प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर जाधव व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केली, प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार करीत आहे.

  • चंद्रपुरातील हा जुगार कायमस्वरूपी बंद करा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्यात जोमात सुरू असलेल्या नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लर बाबत News34 ने बातमी प्रसारित केल्यावर प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला मात्र ठोस कारवाई अजूनही झाली नाही.

     

    विशेष बाब म्हणजे वर्ष 2022 पासून व्हिडीओ गेम पार्लर चे परवाने नूतनीकरण करण्यात आले नसल्याने आजही हे पार्लर सुरू आहे.

     

    आता या नियमबाह्य जुगाराची तक्रार थेट राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करण्यात आली आहे, राष्ट्रवादी कांग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे यांनी व्हिडीओ गेम पार्लर च्या नावाखाली सुरू असलेला जुगार कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे, इंगळे यांनी तक्रारीची प्रत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाला पाठवली आहे.

     

    इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे की पूर्णतः सेट केलेल्या मशिनद्वारे पैसे लावण्यात येतात मात्र खेळणारा पैसे कधी जिंकत नाही, उलट तो पैसे हरतो, यामुळे अनेकांचे घरे उध्वस्त झाली आहे, काही युवकांनी या व्हिडीओ गेम पार्लर मुळे आत्महत्या केल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहे.

     

    प्रत्येक वेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी मार्फत पार्लर च्या परवाना नुसार काही नियमांचा भंग तर होत नाही याबाबत तपासणी करण्याचा अधिकार आहे मात्र आजपर्यंत अशी तपासणी मोहीम राबविण्यात आली नाही.

     

    पोलीस प्रशासनाने कारवाई केल्यावर जिल्हाधिकारी यांनी तपासणी मोहीम राबवा असे आदेश दिले, त्यानंतर पार्लर धारकांची बैठक घेत नियमबाह्य व्हिडीओ गेम पार्लरवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले, मात्र ज्यांनी नियमांचा भंग केला ते सुद्धा त्या बैठकीत उपस्थित होते तर मग जिल्हाधिकारी कारवाईचा इशारा कुणाला देत होते? यामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

     

    प्रियदर्शन इंगळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना चंद्रपुरातील व्हिडीओ गेम पार्लर कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी केल्याने पार्लर संचालकांचे धाबे दणाणले आहे.

     

    हरणाऱ्या व्यक्ती कडून पार्लर चालकांनी अनेकांचे दागिने व मालमत्ता गहाण ठेवल्याची सुद्धा माहिती इंगळे यांनी निवेदनामार्फत दिली आहे.

    अश्या जुगारावर कायमस्वरूपी बंदी घालावी अन्यथा भविष्यात अनेकांचे घरे उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी मागणी इंगळे यांनी केली आहे.