Recent Tiger Attack : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे सोबतच मानव वन्यजीव संघर्ष सुद्धा जिल्ह्यात वाढलेला दिसून येत आहे. या वन्यजीव संघर्षाच्या मालिकेत १४ जानेवारीला वाघाने एकावर हल्ला करीत ठार केले मात्र वाघ इतक्यावरच थांबला नाही तर त्याने मृतदेहावर ५ ते ६ तास ठाण मांडून बसला होता. वनविभागाने वाघाला डार्ट मारत त्याला बेशुद्ध केले.
१४ जानेवारीला सकाळी १० वाजताच्या सुमारास बल्लारपूर वनपरिक्षेत्रात बांबू कंत्राटदार यांना वाटप करण्यात आलेल्या बांबू युनिट क्रमांक ५ राखीव वनखंड क्रमांक ४९३ मध्ये कामगार ५७ वर्षीय लालसिंग बरेलाल मडावी राहणार जिल्हा मंडला राज्य मध्यप्रदेश हा बांबू निष्कासनाचे काम करीत होता. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने लालसिंग वर हल्ला करीत त्याला ठार केले.
घटनेची माहिती वनविभागाला मिळताच अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र हल्लेखोर वाघ हा लालसिंग यांच्या मृतदेहाजवळ बसून होता. वन कर्मचाऱ्यांनी वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र वाघ उलट वन कर्मचाऱ्यांवर धावण्याचा प्रयत्न करीत होता. वाघ मृतदेहाजवळ बराच वेळ बसून होता, बराच वेळ निघून गेल्याने वनविभागाने अतिशीघ्र दलाला पाचारण केले.
अतिशीघ्र दलाचे शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला डार्ट मारीत बेशुद्ध केले,पशुवैधकीय अधिकारी कुंदन पोडचलवार यांनी वाघाची तपासणी करीत त्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सदर वाघ हा नर असून तो ४ वर्षाचा आहे, वाघाला पुढील तपासणी साठी वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे नेण्यात आले. मृत लालसिंग यांचा मृतदेह शवविच्छेदन करिता रुग्णालयात नेण्यात आला.
मानव वन्यजीव संघर्षातील वर्षातील हि दुसरी घटना आहे, मागील वर्षी मानव वन्यजीव संघर्षात एकूण २९ नागरिकांचा बळी गेला होता ज्यामध्ये २७ वाघाने, २ बिबट व १ रान डुक्कराच्या हल्ल्यात बळी गेला.
Government Hospital : जिल्हा सामान्य रूग्णालयाविषयी नागरिकांच्या तक्रारी, विविध सोयीसुविधांचा अभाव, रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होत असलेली हेळसांड व रूग्णालयाशी निगडीत विविध समस्यांची दखल घेत दि. १४ जानेवारी २०२५ रोजी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी रूग्णालयास भेट देवून तेथील समस्यांबाबत डीन व सी एस. डॉ. महादेव चिंचोळे यांचेशी चर्चा करून समस्यांच्या निराकरणाविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा रूग्णालयातील भेटीप्रसंगी येथील पेयजल, स्वच्छता व अन्य समस्यांबाबत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी माहिती दिली. हंसराज अहीर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांसोबत काही कक्षांना भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी करून शल्यचिकित्सकांना आवश्यक सुचना केल्या. यावेळी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस राहुल सुर्यवंशी, गौतम यादव, अमित क्षिरसागर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. hansraj ahir
जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांना योग्य सोयीसुविधा व प्रभावी रूग्णसेवा उपलब्ध करण्याची तसेच रूग्णालयातील सीटी स्कॅन व अन्य नादुरूस्त उपकरणे सुरू करून त्याचा लाभ गोरगरीब रूग्णांना उपलब्ध करण्याची सुचना केली. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधत येथील समस्या निराकरणार्थ तातडीने कार्यवाहीची सुचना केली. जिल्हा रूग्णालयाशी निगडीत असलेल्या विविध समस्याविषयी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेण्याचे सुतोवाचही हंसराज अहीर यांनी यावेळी केले.
Climate Change Conference : चंद्रपूर येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील ३० वर्षांच्या पर्यावरणाची बिजे रोवली गेली पाहिजे. तसेच ‘क्लायमॅट चेंज’ ही चंद्रपुरातून सुरू होणारी चळवळ देशव्यापी व्हायला हवी, अशी अपेक्षा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
पर्यावरण जागृतीसाठी जागतिक स्तरावरील ही परिषद चंद्रपूर येथे होत असल्याचा नक्कीच अभिमान असल्याचेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांनी सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, अमेरिका यांच्या शैक्षणिक सहकार्याने आणि सोबतच महाराष्ट्र शासनाच्या मँग्रोव्ह फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, इकोलॉजिकल सोसायटी, पुणे आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्या एकत्रित सहकार्याने चंद्रपूर येथे तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५’ चे आयोजन दिनांक १६ जानेवारी ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत वन अकादमी येथे करण्यात येणारं आहे.
या कॉन्फरन्सचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे.तर विशेष पाहुणे म्हणून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक राहतील. यावेळी जलपुरुष राजेंद्रसिंह, चाणक्य मंडळ प्रमुख अविनाश धर्माधिकारी, सलील कादेर,अमेरिकेतील हवामान तज्ञ डॉ. नील फिलिप, डॉ. परिमिता सेन, डॉ. दुराई स्वामी, डॉ अमित होरडे, डॉ सुधाकर परदेशी, आयआयटी मुंबईच्या हरिप्रिया यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. प्रोफेसर रुबी ओझा, अतिरिक्त मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्यासह इतर आदी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आ. श्री. मुनगंटीवार यांची मंगळवार, दि. १४ जानेवारीला पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला यावेळी एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्रभारी जिल्हाधिकारी श्री. विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले,डॉ. मंगेश गुलवाडे, नम्रता ठेमस्कर उपस्थित होते. Climate Change Conference
आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘२०५० पर्यंत शेतीचे उत्पादन ३० टक्क्यांनी कमी होणार आहे. तेव्हा परिस्थिती भीषण होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. त्यामुळे या कॉन्फरन्सच्या बिजारोपणातून हजारो लोकांना जोडावे लागणार आहे. त्यासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. ते लवकरच वापरासाठी उपलब्ध होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी व स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित राहावे.’
पर्यावरणासाठी जेवढ्या संघटना, संस्था काम करतात, त्यांना देशस्तरावर एकत्र आणता येईल का, याचाही विचार या तीन दिवसांत होणार आहे. दिल्लीत मार्च-एप्रिलमध्ये परिषद घेण्याचाही विचार आहे. चंद्रपुरातील क्लायमेट चेंजची ही चळवळ आधी राज्यव्यापी आणि नंतर देशव्यापी करायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.
प्रभातफेरीने होणार सुरुवात या परिषदेच्या पहिल्या दिवशी महापालिकेने सकाळी ८.३० ते ९ या वेळात पर्यावरण रॅलीचे आयोजन केले आहे. गांधी चौकातून ही रॅली निघेल आणि प्रियदर्शनी सभागृहापर्यंत जाऊन तेथे रॅलीचा समारोप होईल. या प्रभात फेरीमध्ये चंद्रपूरकरांनी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले.
चळवळ मोठी होणार या कॉन्फरन्सचं महत्त्व समाज आणि सृष्टीशी संबंधित आहे. मकरसंक्रांती नंतरचं हे पर्व आहे. २१ जूनपर्यंत दिवस मोठा होत जाणार आहे. आता दिवस मोठा मोठा होत जातो. अगदी त्याचप्रमाणे ही चळवळही मोठी होत जाणार, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
शेती आणि उद्योगावर फोकस क्लायमेट चेंजनंतर आरोग्य आणि शेतीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. जैविक शेती, सेंद्रीय शेती यामध्ये कार्य केल्यास प्रदूषणाला तोंड देता येईल. चंद्रपूरमध्ये प्रदूषणाची धोक्याची पातळी अध्येमध्ये वाढलेली असते. येथील उद्योगांमुळे हे होत आहे. उद्योग आवश्यकच आहेत. पण हे उद्योग प्रदूषण वाढविणारे नकोत. उद्योग बंद करू शकत नाही. कारण त्यावर लोकांची उपजिविका आहे. त्यामुळे उद्योग आणि प्रदूषण याचे संतूलन साधावे लागेल, असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगितले
chandrapur cancer hospital : चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भातील रुग्णांसाठी वरदान ठरणारे चंद्रपूर मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येथील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत मेडिकल कॉलेजची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रलंबित कामांसाठी लागणारा असलेल्या १८० कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे, कॅन्सर रुग्णालयाचे प्रमूख डॉ. कपुरिया, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.निवृत्ती जिवणे, भारतीय जनता पक्षाचे नेते दशरत सिंग ठाकुर, तुषार सोम, मनोज पाल, अनिल फुलझेले मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, माजी नगर सेविका चंद्रकला सोयाम, वंदना जांभुळकर, जुमडे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, आशा देशमुख, डॉ. गिरिधर येडे, धनराज कोवे, महेंद्र जुमडे, सलिम शेख आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे काम अंतिम टप्प्यात येवून निधी अभावी रखडले आहे. त्यामुळे सदर निधी तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. नागपूर येथील अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी हा विषय मांडत उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबई मंत्रालयात संबंधित विभागाची बैठक घेत येथील फर्निचर खरेदी प्रक्रिया गतीशील करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मेडिकल कॉलेजची पाहणी करत सध्यास्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेजच्या परिसरात फिरून उर्वरित कामांची प्रगती आणि अडचणी जाणून घेतल्या. हे पूर्ण होण्यासाठी निधीची कमतरता असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी निधीचा प्रस्ताव पुन्हा तातडीने शासनाकडे पाठवावा त्याला मंजुरी मिळविण्यासाठी आपण पाठपूरावा करु असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर मेडिकल कॉलेज जिल्ह्यासाठीच नव्हे, तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकतील. तसेच बाहेर उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांचा त्रास कमी होईल. प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून कार्य करावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उर्वरित कामांमध्ये अंतर्गत उपकरणे, डॉक्टरांसाठी सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक प्रयोगशाळेकरीता लागणारे उपकरणे लवकर उपलब्ध होणार आहे. चंद्रपूर मेडिकल कॉलेज हा जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात एक नवा अध्याय उघडणार असून, यामुळे लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आपण शासन दरबारी निधीसाठी पाठपूरवा करणार असल्याचे ही आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Chandrapur Medical College Work Stalled Due to Lack of Funds; MLA Kishor Jorgewar Pursues Completion
Charity show : चित्रपट क्षेत्रात कार्य करणारे ज्युनियर कलाकार व अंध, अपंग आणि आर्थिकदृष्ट्या असक्षम कलाकारांच्या मदतीसाठी बॉलीवूड मधील तीन खान एकत्र आले आहे. अंध, अपंग कलाकार यांच्यासाठी बल्लारपूर शहरातील गोंडवाना नाट्यगृहात १६ ते २२ जानेवारी या कालावधीत शाहरुख, आमिर व सलमान या चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे. अशी माहिती १ ४ जानेवारीला बल्लारपुरातील निवासी गणेश राहिकवार (ज्युनियर शाहरुख खान) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली.
दिग्दर्शक इकबाल सुलेमान यांच्याद्वारे निर्मित आमिर सलमान शाहरुख हा चित्रपट बल्लारपुरातील गोंडवाना नाट्यगृहात प्रदर्शित होणार आहे, या चित्रपटाचे रोज ३ शो आयोजित केले असून फक्त ९ ९ रुपयात नागरिक हा चित्रपट बघू शकतात.
चित्रपट बल्लारपूर येथे प्रदर्शित करण्याचे कारण स्पष्ट करताना गणेश राहिकवार म्हणाले कि चित्रपट क्षेत्रातील अंध, अपंग व आर्थिक दृष्ट्या असक्षम असलेले कलाकार ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना या चित्रपटाच्या प्रदर्शनातून जमा झालेली रक्कम त्यांच्या मदतीकरिता देण्यात येणार आहे.
१६ ते २२ जानेवारी दरम्यान दुपारी १२ ते रात्री ९ वाजता नियमित ३ शो प्रदर्शित होणार आहे नागरिकांनी या चित्रपटाचा लाभ घ्यावा असे आवाहन गणेश राहिकवार यांनी केले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ज्युनिअर सलमान खान उपस्थित होते.
Ongc jobs 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू मंडळात १०८ जागांची पदभरती निघाली आहे. यामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. आपण जाणून घेऊया पदनिहाय संपूर्ण तपशील. latest jobs
Review meeting : खासदार प्रतिभा धानोरकर हया सध्या अॅक्शन मोड मध्ये आल्या असून लोकसभेतील दौऱ्या सोबतच त्यांनी शासनाच्या विविध विभागात आढावा बैठकीचे सत्र सुरु केले आहे.
काल दि. 13 जानेवारी रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संसदीय रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत विविध विभागासह आढावा घेऊन सबंधीत अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्यानंतर सीएसटीपीएस येथे हिराई विश्राम गृहामध्ये मुख्य अभियंता श्री. रोठड यांच्या प्रमुख उपस्थितीत पुनर्वसीत गावकऱ्यांच्या समस्या त्यासोबतच प्रकल्प बाधीत व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.
सीएसटीपीएस मुळे आजुबाजूच्या गावाला होणाऱ्या नुकसानीबाबत चर्चा करुन तात्काळ समस्या दुर करण्याच्या सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्या. तसेच, दुर्गापूर वेकोली येथे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. दातार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंटक संघटनेच्या विविध मागण्यांच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेकोली मुळे होणाऱ्या परिसरातील नुकसानीवर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावर खासदार धानोरकर यांनी वेकोली मुळे होणाऱ्या नुकसानीचा पंचनामा करुन तात्काळ उपाययोजना करण्याच्या सुचना वेकोलीतील संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांनी जाणीपुर्वक पक्षपात करु नये, सर्व संघटनांना समान न्याय द्यावा, अशा सुचना देखील वेकोलीतील अधिकाऱ्यांना दिल्या.
सदर बैठक वेकोली दुर्गापूर येथील विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी या प्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, काँग्रेस च्या महिला ग्रामीण च्या जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे, इंटक चे के.के. सिंह, सोहेल रजा, प्रशांत भारती, यांसह अनेक पदाधिकारी व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
Important appeal : केंद्रपुरस्कृत विशेष दत्तक संस्था राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असून या योजनेचा उद्देश समाजातील अनाथ, निराश्रित किवा अनैतिक संबंधातून जन्मलेली बेवारस व टाकून दिलेल्या किवा शरण आलेल्या किवा आत्मसमर्पित कुटुंबातील बालकांच्या शैक्षणिक, शारीरिक व आरोग्य विषयक समस्यांच्या निराकरणा करीता तसेच मानसिक शारीरीक विकलांग बालकांच्या विशेष गरजाची पूर्तता करण्यासाठी गडचिरोली येथे विशेष दत्तक संस्था सुरू करण्यात आलेली आहे.
गडचिरोलीत विशेष दत्तक संस्था सुरू – समाजातील अनाथ व निराश्रित बालकांसाठी मदतीचे आवाहन
विशेष दत्तक संस्था (Special Adoption Agency) महिला व बालविकास विभागाच्या वतीने गडचिरोली येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश समाजातील अनाथ, निराश्रित, अनैतिक संबंधातून जन्मलेली बेवारस बालके, तसेच शरण आलेली किंवा आत्मसमर्पित कुटुंबातील बालकांच्या शैक्षणिक, शारीरिक, आणि आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासोबतच मानसिक व शारीरिकदृष्ट्या विकलांग बालकांच्या विशेष गरजांची पूर्तता करणे आहे.
संस्थेची उद्दिष्टे आणि कार्यप्रणाली या संस्थेच्या स्थापनेमागे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांना दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसेवा मिळवून देणे हा हेतू आहे. याशिवाय, समाजात मुलांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी त्यांची शैक्षणिक व सामाजिक जडणघडण करणे हेही संस्थेचे महत्त्वाचे ध्येय आहे. (Important appeal)
दानशूरांचे योगदान आवश्यक सद्यस्थितीत या संस्थेला पुरेसा आर्थिक पाठिंबा उपलब्ध नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटना आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी संस्थेसाठी आर्थिक योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवजात बालकांना लागणाऱ्या वस्तू, शैक्षणिक साहित्य, आरोग्य उपकरणे इत्यादी स्वरूपातही मदत केली जाऊ शकते.
संथापकांचे आवाहन संस्थेचे संस्थापक पुरुषोत्तम चौधरी यांनी समाजातील दानशूर व्यक्तींना या कार्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “या बालकांच्या उत्थानासाठी समाजाच्या आर्थिक योगदानाची नितांत गरज आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या पवित्र कार्याला पाठिंबा द्यावा.”
मदत करण्याचा मार्ग दानशूर इच्छुकांनी संस्थेच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा किंवा खालील बँक खात्यावर आपले आर्थिक योगदान पाठवावे. याशिवाय, बालकांच्या गरजांसाठी वस्तूंची मदत देखील संस्थेला दिली जाऊ शकते.
संस्थेचा पत्ता आणि बँक खाते तपशील: पत्ता:अधीक्षक – नशिब के. जांभुळकर – ८ ८ ७ ९ ६ ९ ९ १ ३ ८ विशेष दत्तक संस्था (SAA) गडचिरोली, बजरंग नगर, हनुमान मंदिराच्या मागे, गडचिरोली 442605
बँक खाते तपशील: खाते नाव: विशेष दत्तक संस्था (SAA) गडचिरोली बँक नाव: [बँक ऑफ महाराष्ट्र, गडचिरोली] खाते क्रमांक: [60508880015] IFSC कोड: [MAHB0000940]
समाजाला आवाहन या कार्याला चालना देण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि अन्य क्षेत्रातील प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवावा. एकत्रित प्रयत्नांनी या बालकांचे भविष्य उज्ज्वल होईल आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देता येईल.
गडचिरोलीतील या अनोख्या उपक्रमाला समाजाचा सकारात्मक प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे.
chandrapur bribery case : खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत लाकूड व्यापाऱ्याला ५ ० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ जानेवारीला गुन्हा दाखल केला.मात्र कारवाई पूर्वीच पोलीस उपनिरीक्षकाने घटनास्थळावरून पळ काढला. तक्रारदार हे चंद्रपुरातील रहिवासी असून ते कमिशन वर लाकूड बांबू व तेंदूपत्ता एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोहचविण्याचे काम करतात.
ऑगस्ट महिन्यात तक्रारदार यांनी १९ लाख २ हजार रुपयांचा तेंदूपत्त्याचा माल गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथे पोचता केला त्या मालाचे १९ लाख २ हजार हि रक्कम व्यापाऱ्याकडून येणे बाकी होते, मागील ३ ते ४ महिन्यापासून तक्रारदार यांना त्या मालाचे पैसे मिळत नसल्याने त्यांनी आपले पैसे मिळावे यासाठी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार अर्ज दाखल केला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी तक्रारदाराला सदर रक्कम वसूल करण्याच्या कामासाठी वीस टक्के रक्कम ३ लाख ८ ० हजार रुपयांची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदार व व्यापारी या दोघांनी आपसात समन्वय साधत सेटलमेंट केले व गुंतवलेली मुद्दल १६ लाख १५ हजार रुपये व्यापाऱ्याने तक्रारदाराला परत केले. पैसे मिळाल्यावर त्या व्यापारी विरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये केलेला तक्रारअर्ज परत घ्यायचा आहे असे पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांना सांगितले, दोघांची तडजोड झाल्याने पोलीस उपनिरीक्षक शाह याना पैसे मिळणार नसल्याचे समजताच त्यांनी तक्रारदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याने ८ जानेवारीला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणी दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शहा यांनी तक्रारदार यांना तडजोड करीत ५० हजार रुपयांच्या लाचेची (bribe) मागणी केली. त्यामुळे १३ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला, तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन पोलीस उपनिरीक्षक शहा यांच्याकडे गेले असता शहा यांना कारवाईचा संशय आल्याने ते पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, हिवराज नेवारे, अरुण हटवार, नरेशकुमार नन्नावरे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदीप तोडाम , राकेश जांभुळकर, मेघा मोहुर्ले , पुष्पा काचोळे, सतीश सिडाम, संदीप कौरासे यांनी केली.
Nylon Manja Sellers : न तुटणारा जीवघेणा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल ३ ४ जणांना ३ दिवसांकरिता चंद्रपूर तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाची बंदी असताना सुद्धा जिल्ह्यात छुप्या पद्धतीने या मांजाची विक्री सुरु होती.
मकरसंक्रांत आली कि नायलॉन मांजा विक्रेते सक्रिय होत प्रतिबंधित मांजाची छुप्या पद्धतीने विक्री करतात, या मांजामुळे मानवी जीवितास व पक्ष्यांना धोका निर्माण होतो, असे असताना सुद्धा विक्रेते आपल्या फायद्यासाठी मांजा विक्री करीत कायद्याचे उल्लंघन करतात.
पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना मकरसंक्रांत ला पर्यावरण पूरक धाग्याचा वापर करावा अशी अधिसूचना निर्गमित केली होती. याबाबत जनजागृती सुद्धा पोलीस विभागाने सुरु केली होती. या दरम्यान विविध ठिकाणी पोलिसांच्या पथकाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धाडी टाकत कारवाई सुद्धा केली. deportes
१ ३ जानेवारीला अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी चंद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीतील १ ९ , रामनगर पोलीस स्टेशन ८ , घुग्गुस पोलीस स्टेशन २ , पोलीस स्टेशन दुर्गापूर ४ , पोलीस स्टेशन मूल १ अश्या एकूण ३ ४ नायलॉन मांजा विक्रेत्यांना १ ३ जानेवारी ते १ ५ जानेवारी या ३ दिवसांच्या कालावधीसाठी तालुक्यातून हद्दपार करण्यात आले असा आदेश निर्गमित केला.
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर हद्दपारीची हि राज्यातील पहिलीच कारवाई आहे, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, प्रभावती एकुरके, असिफरजा शेख, श्याम सोनटक्के, लता वाढीवे, सुमित परतेकी यांनी केली.