Chandrapur mosquito control and prevention tips : चंद्रपूर 30 ऑक्टोबर – मागील काही दिवसात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने महानगरपालिकेतर्फे आरोग्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
अवकाळी पावसात कीटकजन्य,साथीचे रोग उद्भवण्याची शक्यता असते,कारण पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते, जे डासांच्या प्रजननासाठी आदर्श वातावरण तयार करते. साचलेल्या पाण्यात डासांची अंडी उबतात आणि त्यांची वाढ होते, ज्यामुळे डेंग्यूसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. महानगरपालिकेतर्फे प्रतिबंधात्मक योजना सुरु असल्यातरी नागरिकांना स्वतःच्या संरक्षणासाठी पुढील उपाय योजना करणे आवश्यक आहे.
पाणी साचू देऊ नका
घराच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी पाणी साचू देऊ नये, ज्या भांड्यात तुम्ही पाळीव प्राण्यांना पाणी देता ते भांडे स्वच्छ ठेवने, पाण्याची टाकी चांगल्या प्रकारे झाकून ठेवने, रेफ्रिजरेटरच्या तळाशी असलेला पाण्याचा ट्रे दररोज रिकामे करणे आवश्यक आहे. पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात.
हवामान बदलामुळे विविध आजारांची शक्यता वाढली आहे. ताप, अंगदुखी, डोळे दुखणे, पुरळ येणे इत्यादी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. नागरिकांनी स्वच्छतेची सवय जोपासून डासांची उत्पत्ती थांबवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
Women Commission initiatives at your doorstep : चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हयात मंगळवार 4 नोव्हेंबर 2025 रोजी जनसुनावणी होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर येथे सकाळी 11 वाजता होणा-या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.
महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर 4 नोव्हेंबर, 2025 रोजी चंद्रपुर जिल्हयात येणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलिस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येईल.
या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोप-यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर जात आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.
Chandrapur crop damage relief fund : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – यंदाच्या पावसाळ्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 94098 शेतकऱ्यांना 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपयांचे वाटप झाल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक वुईके यांनी वरोरा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिली. तसेच ज्या शेतक-यांच्या खात्यात तांत्रिक कारणांमुळे निधी पोहचला नाही, अशा शेतक-यांची अडचण दूर करून त्यांच्या खात्यात तात्काळ निधी जमा करावा, असे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1 लक्ष 10 हजार 665 हेक्टर जमीन बाधित झाली. जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या 1 लक्ष 26 हजार 286 आहे. यासाठी राज्य शासनाकडून 94 कोटी 86 लक्ष 27 हजार रुपये प्राप्त झाले. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 94 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यात 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपये जमा केले आहे. Agricultural disaster fund distribution Maharashtra
यात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 12 हजार 882 शेतकऱ्यांच्या खात्यात 6 कोटी 84 लक्ष 75 हजार रुपये, ऑगस्ट महिन्यातील बाधित 12 हजार 297 शेतकऱ्यांना 9 कोटी 42 लक्ष 46 हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्यातील बाधित 68 हजार 919 शेतकऱ्यांच्या खात्यात 51 कोटी 16 लक्ष 6 हजार रुपये वाटप करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले. Chandrapur flood and drought relief for farmers
पत्रकार परिषदेला आमदार करण देवतळे, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, सहायक जिल्हाधिकारी बालाजी कदम, उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, तहसीलदार योगेश कौटकर आदी उपस्थित होते.
रब्बी हंगामासाठी अतिरिक्त अनुदानाची मागणी
अतिवृष्टी आणि पुरामुळे विविध शेती पिकांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रती हेक्टरी 10 हजार रुपये याप्रमाणे शासनाकडे निधी मागणी करण्यात आली आहे. यात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 13 हजार 742 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी 62 लक्ष 10 हजार रुपये, ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीबाधित 15 हजार 384 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी 4 लक्ष 67 हजार रुपये तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीबाधित 96 हजार 477 शेतकऱ्यांसाठी 87 कोटी 64 लक्ष 14 हजार रुपयांची अतिरिक्त मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.
जिल्ह्यात दुष्काळी सवलती जाहीर
अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात राज्य शासनाने दुष्काळी सवलती जाहीर केल्या आहेत. यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत एक वर्षाकरीता वसुलीस स्थगिती, तिमाही वीजबिलात माफी आणि 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये माफी यांचा समावेश आहे
शासनाकडून प्राप्त झालेला अतिवृष्टीग्रस्त मदतनिधी त्वरित वाटप करण्याचे काम अविरत सुरू आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली नाही. यात प्रामुख्याने सामुहिक खाते असलेल्या खातेदारांचे संमती पत्र न मिळणे, ई -केवायसी प्रलंबित असणे, आधार अपडेट व बँक खाते संलग्न नसणे याचा समावेश आहे. तरी सामुहिक खातेदारांनी संबंधित तलाठ्याकडे त्वरित संमतीपत्र सादर करावे. मदतनिधी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, सेतू केंद्र तसेच तलाठ्यांशी संपर्क करून ई -केवायसी करून घ्यावी. तसेच आपले आधार कार्ड बँक खात्याला संलग्न करावे. जेणेकरून शेतक-यांच्या खात्यात मदत निधी जमा करता येईल.
Ghugus water supply project Amrit 2.0 : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – घुग्घुस शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवा जीवदान मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने केंद्र पुरस्कृत ‘अमृत 2.0 अभियान’ अंतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकूण 93.98 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाचा निर्णय नगर विकास विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे घुग्घुस शहराला शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या भेटीदरम्यान घुग्घुस शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प, मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामे आणि शहराच्या सर्वांगीण विकास संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
१८ महिन्याच्या आत काम होणार पूर्ण
या प्रकल्पासाठी केंद्र शासनाचा हिस्सा 45 टक्के, राज्य शासनाचा हिस्सा 45 टक्के आणि नगरपरिषदेचा (स्वतःच्या संस्थेचा) हिस्सा 5 टक्के इतका असणार आहे. प्रकल्पाचे काम कार्यादेश मिळाल्यानंतर 18 महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहणार असून, त्याचे कार्यान्वयन घुग्घुस नगरपरिषद अधिकारी यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून घुग्घुस शहराला पाण्याच्या टंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता. अनेक प्रभागांमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या प्रकल्पामुळे घुग्घुस शहरात अखंड, शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होणार आहे.
भेटीनंतर बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले घुग्घुससाठी अमृत 2.0 योजनेतून मिळालेला निधी हा ऐतिहासिक निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. या निर्णयामुळे घुग्घुस शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि शहराच्या विकासाला गती मिळेल. मुख्यमंत्री यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना प्राधान्याने गती देण्याचे आश्वासनही दिले आहे. आगामी काही महिन्यांत प्रकल्पाच्या कामांना सुरुवात होऊन नागरिकांना याचा थेट लाभ मिळणार असे ते म्हणाले.
Chandrapur Road Divider : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालया पर्यंत दुभाजकाच्या प्रकरणाला आज एक वेगळेच वळण लागले. या वादग्रस्त दुभाजकाच्या विरोधात पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात आज बुधवार दि.29 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान आंदोलन करण्यात आले.आंदोलकांनी बांधकाम साहित्याची तोडफोड केली, काम बंद पाडले.
आंदोलन सुरू असताना अचानक काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू नागरकर आंदोलनस्थळी आले. माझ्या प्रभागातील काम बंद करता, दादागिरी करता,मला पत्र का दिले नाही ? आंदोलन कशाला करत आहात ? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. यावर देशमुख यांनी कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणत नागरकर यांना सुनावले. Pappu Deshmukh
काँग्रेसच्या माजी नगरसेवकांच्या भुमिकेमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.नागरकर महाकाली प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक होते तर रस्ता दुभाजक पठाणपुरा प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहे. त्यामुळे नागरकर यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल चर्चेला उधान आले आहे. दरम्यान देशमुख यांनी दुभाजकाची एक सळाख सहजपणे हाताने तोडून दाखवली. यावरून कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
दुभाजकाचे काम रद्द करून रस्त्याचे काम करा.. आंदोलकांची मागणी
दुभाजकाचे काम रद्द करण्यात यावे, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे व दुभाजकाच्या कामाची चौकशी करून भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे.
या आंदोलनामध्ये मनसेचे पदाधिकारी मनोज तांबेकर, वर्षाताई भोमले, मंदाताई कराडे, प्रकाश चंदनखेडे,प्रगती भोसले, नेहा डुडलकर, कैलास पाटील सामाजिक कार्यकर्ते प्रतिक चिकाटे, राजु पांडे जनविकास सेनेचे मनिषा बोबडे, इमदाद शेख,गोलू दखणे, प्रफुल बैरम,अमुल रामटेके,घनश्याम येरगुडे, अनिता पिसे,सचिन भिलकर,किशोर महाजन,देवराव हटवार,अरूणा मांदाळे,ललिता उपरे,माला गुरनुले,सुशिला चौधरी यांनी सहभाग घेतला.
Bachchu Kadu farmers agitation update : चंद्रपूर २९ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफी व दिव्यांग बांधवाना न्याय मिळावा अश्या विविध मागणीसाठीप्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी नागपूर जिल्ह्यात रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे, जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीतर रेल्वे रोको आंदोलन करणार असा इशारा कडून यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा नागरिकांना फटका बसू नये याकरिता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना नागपूर जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी दुसरा मार्ग सुचविला आहे. या दुसऱ्या मार्गाने नागरिक नागपुरात दाखल होऊ शकतात.
या पर्यायी मार्गाचा करा वापर
जामठा या ठिकाणी आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणावर आंदोलनासाठी बसले असल्यामुळे बुटीबोरी जिल्हा नागपूर येथे खूप मोठा ट्राफिक जाम झाला आहे. त्यामुळे नागपूरकडे जाणे शक्य नाही, फक्त वर्धा पर्यंत जाऊ शकतात. नागपूर जाणाऱ्या नागरिकांनी वरोरा आनंदवन चौक मार्गे चिमूर -भिसी उमरेड मार्गाने नागपूर जाता येईल. करिता नागरिकांनी त्या मार्गाचा वापर करावा. असे पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर तर्फे नागरिकांना कळविण्यात आले आहे.
मागील १८ तासापासून सुरु असलेल्या शेतकरी, भूमिपुत्रांच्या आंदोलनाला राज्यातुन समर्थन प्राप्त होत आहे, सध्या नागपुरातील महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून ठेवले आहे, सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीवर तात्काळ दखल घ्यावी अन्यथा आंदोलन अधिक मोठे होणार असा इशारा देण्यात आला आहे.
BJP entry local coal labor union leaders : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४ वृत्तसेवा) – भारतीय कोळसा मजदूर संघ वणी क्षेत्राचे क्षेत्रीय अध्यक्ष तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लखन मारोती हिकरे आणि सूरज हिकरे यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. आमदार किशोर जोरगेवार यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विधानसभा अध्यक्ष दशरथ सिंह ठाकूर, बलराम डोडाणी, महामंत्री रवी गुरनुले, घुग्घूस शहर उपाध्यक्ष अनिल बाम, घुग्घूस युवा मोर्चा अध्यक्ष संतोष नुने, घुग्घूस महामंत्री साजन गोने, युवा मोर्चा महामंत्री स्वप्निल वाढई, हेमंत उरकुडे, गणेश पिंपळकर आदींची उपस्थिती होती. BJP party expansion Chandrapur
जनहिताचे कार्य होणार
प्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की,भारतीय कोळसा मजदूर संघाचे क्षेत्रीय अध्यक्ष आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लखन हिकरे तसेच सूरज हिकरे यांनी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाच्या जनविकास आणि राष्ट्रहिताच्या विचारधारेवर चालत ते जनहितासाठी कार्य करतील,असे ते म्हणाले.
भाजपमध्ये प्रवेशानंतर लखन हिकरे म्हणाले की,भारतीय जनता पक्ष ही विकास आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी पक्ष संस्था आहे. या विचारधारेत सहभागी होत मी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा संकल्प घेतला आहे. त्यांच्या सोबत सूरज हिकरे यांच्या प्रवेशामुळे स्थानिक युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, घुग्घूस परिसरातील पक्षसंघटन अधिक मजबूत होण्यास हातभार लागणार आहे.
Maharashtra municipal corporation reservation : चंद्रपूर २८ ऑक्टोबर –राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २८ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, आरक्षित जागांची संख्या निश्चित करून त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून ४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पार पाडण्यात येणार आहे. Maharashtra Municipal Reservation
यानंतर आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रांमधून ८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी काढण्यात येणार असून, त्याचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल.
हरकती व सूचना १७ नोव्हेम्बरपासून
त्यानंतर प्रारुप आरक्षण प्रसिद्ध करून, नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर २०२५ रोजी सुरू होईल. हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला आहे. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून संबंधित महानगरपालिका आयुक्त निर्णय घेतील. आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात २ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
राज्य निवडणूक आयोगाने संबंधित सर्व महानगरपालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार वेळेत आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता व काटेकोरता राखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Chandrapur Crime Control : चंद्रपूर २८ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) – चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासून मोकळा श्वास घ्यावा यासाठी चंद्रपूर पोलीस सराईत गुन्हेगाराला स्थानबद्ध करण्याची कारवाई करीत आहे. २८ ऑक्टोबर रोजी ४३ वर्षीय महेंद्र आनंदराव ढुमणे विरोधात एमपीडीए अधिनियम अंतर्गत १ वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
महेंद्र ढुमणे यांच्याविरोधात एकूण ६ गुन्ह्यांची नोंद होती, यामध्ये अवैध दारूविक्री, खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणे, गंभीर दुखापत व मारहाण करणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, स्वतःकडे अवैध अग्निशस्त्र बाळगून धाक दाखविणे इत्यादी चढत्या क्रमाने गुन्हे नोंद आहे. Chandrapur Police Action
कारवाई नंतरही सुधारणा नाही
रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत कुणीही ढुमणे विरुद्ध तक्रार करण्याची हिम्मत दाखवीत नाही, आपल्या साथीदारांसह परिसरात दहशत पसरविण्याचे काम ढुमणे करीत होता, त्याचेवर तडीपारीची व प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती मात्र त्यानंतर सुद्धा ढुमणे यांच्या वृत्तीत कसलीही सुधारणा झाली नसल्याने चंद्रपूर पोलिसांनी वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले, रामनगर पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि योगेश खरसाण, पोउपनि सुरेंद्र उपरे, पोलीस कर्मचारी संजू देशवाले, अरुण खारकर, परवेज शेख, अनिल जमकातण, राजू चिताडे, मनीषा मोरे, ब्लूटी साखरे यांनी केली.
Mephedrone trafficking cases Chandrapur : चंद्रपूर – २८ ऑक्टोबर (News 34 वृत्तसेवा) – चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने वर्ष २०२५ मध्ये एमडी तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली, या मालिकेत ५०० ग्राम च्या वर एमडी पावडर जप्त केले होते. तरुणाई अंमली पदार्थाच्या जाळ्यात अडकत चालली असून या जाळ्यातून पोलीस प्रशासन तरुणाईला वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
चंद्रपुरात २७ ऑक्टोबरला स्थानिक गुन्हे शाखेने माहितीच्या आधारावर कारवाई करीत तब्बल १६० ग्राम एमडी पावडर जप्त केले, या प्रकरणी दोन आरोपीना अटक करीत तब्बल १६ लक्ष १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन इसम चंद्रपुरात एमडी पावडर घेऊन येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने वन अकादमी मूल रोडवर नाकाबंदी केली, यावेळी चारचाकी वाहन क्रमांक एमएच ४९ एएस २७०४ हे संशयित वाहन पोलिसांना दिसताच त्यांनी वाहन थांबवित झडती घेतली असता त्यामध्ये १६० ग्राम मेफेड्रोन पावडर आढळून आले. Police crackdown on drug peddlers Chandrapur
पोलिसांनी या प्रकरणात चालक २८ वर्षीय दीपक कृष्णा वर्मा राहणार संजयनगर चंद्रपूर व ३० वर्षीय आशिष प्रकाश वाळके राहणार मित्रनगर चंद्रपूर यांना ताब्यात घेत त्यांचेवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपस स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.
तस्करी व तस्करांची संख्या वाढणार
चंद्रपुरात झटपट पैसे कमविण्याच्या नादात युवक हे एमडी पावडर ची तस्करी करण्यात गुंतले आहे, १० हजार रुपयांचे काही दिवसात १ लाख रुपये नफा होत असल्याने युवक अंमली पदार्थाचा अवैध व्यवसाय करू लागले आहे. या प्रकरणातील आरोपी वर्मा यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे तर वाळके नामक आरोपीवर कसलाही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आहे. रेकॉर्डवरील आरोपी सोडून ज्यांच्यावर गुन्हे नाही ते युवक एमडी पावडरची तस्करी करू लागले आहे. येणाऱ्या काळात तस्करी व तस्करांची संख्या वाढणार हे निश्चित. Mephedrone trafficking cases Chandrapur
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, पोउपनि सर्व्हेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता व अजित शेंडे यांनी केली.