Tag: मराठी बातम्या

  • शेतात काम करताना हृदयविकाराचा झटका; ४० वर्षीय युवा शेतकऱ्याचा मृत्यू

    Young Farmer Death : पोंभूर्णा/चेक कोसंबी १४ डिसेंबर २०२५ (News३४): शेतात कापूस वेचण्याचे काम करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ४० वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली आहे. वैभव ऊराडे (वय ४०) रा. चेक कोसंबी नं. १ असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या आकस्मिक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, युवा शेतकरी वैभव ऊराडे हे आपल्या शेतात कापूस वेचण्याच्या कामात मग्न होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि ते शेतातच कोसळले. हे पाहताच सोबत काम करणारे कापूस वेचणारे मजूर आणि कुटुंबातील लोकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

    कुटुंबीय व मजुरांनी त्यांना तात्काळ पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती वैभव ऊराडे यांना मृत घोषित केले. प्राथमिक तपासणीत मृत्यूचे कारण ‘हृदयविकाराचा तीव्र झटका’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. Young Farmer Death

    या घटनेमुळे ऊराडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केवळ चाळीस वर्षांच्या तरुण वयात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने चेक कोसंबी नं. १ आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मृतक वैभव ऊराडे यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन लहान मुली, आई-वडील, भाऊ असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबाची मोठी हानी झाली आहे.

  • शनिवारी चंद्रपूर हादरला; शेतात काम करणारी महिला व गुराख्याची वाघाने केली शिकार

    breaking Tiger Attack : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून शनिवारी १३ डिसेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी शेतात काम करणारी महिला व गुराख्याची वाघाने शिकार केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण ४४ नागरिक ठार झाले असून यामध्ये वाघाच्या हल्ल्यात ४०, बिबटच्या हल्ल्यात २ आणि अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. (हे हि वाचा – अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा हल्ला)

    शेतात काम करताना झाला हल्ला

    सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही गावात राहणाऱ्या ४९ वर्षीय अरुणा उर्फ छाया अरुण राऊत हि महिला शेतात कामाला गेली होती, सायंकाळ झाल्यावर अरुणा घरी परतली नाही, महिलेचे पती अरुण घरी आले असता त्यांनी पत्नीची गावात इतरत्र चौकशी केली मात्र त्याबाबत काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर गावातील नागरिकांना एकत्र करीत शेतात गेले असता त्याठिकाणी सुद्धा अरुणा मिळाली नाही. लगतच्या जंगल परिसरात गावकर्यांनी शोधाशोध केली असता काही अंतरावरील नाल्याजवळ अरुणा चा मृतदेह आढळून आला.

    मृतक अरुणाच्या गळ्याला व दोन्ही पायांना आणि पाठीला गंभीर जखमा होत्या. तसेच त्यांचे दोन्ही हात पूर्णतः तुटलेले होते. यावरून वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची खात्री झाली. या घटनेची माहिती वनविभाग, पोलिसांना देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. breaking Tiger Attack

    दुसऱ्या घटनेत १३ डिसेंबर ला मूल तालुक्यातील वन संरक्षित क्षेत्रात गुरे चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करीत ठार केले. हि घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. राख्याचे नाव पीतांबर गुलाबराव सोयाम,वय 36,रा.बेलघाटा असे आहे. पीतांबर हा नेहमी प्रमाणे शनिवारी गावातील गुरे चराईसाठी जंगलाच्या दिशेने गेलेेला होता.संरक्षित वन क्षेत्रात कम्पार्टमंेट नंबर 1765 मध्ये गुर चरत असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने पीतांबर वर हल्ला करून त्यास जागीच ठार केले.जंगलात फरफटत नेल्याने त्याचा मृतदेह इतरांच्या निदर्शनास आला नाही.मात्र, सांयकाळी गावात गुरे परत आली.पीतांबर न दिसल्याने कुटुंबीयाना शंका आली.याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली.रविवारी सकाळी वनविभागाच्या चमूंनी शोधाशोध घेतली असता जंगलालगतच्या शेतात पीतांबरचा मृतदेह आढळून आला.

    चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात कामावर जायचं कि नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.

  • आयटीआयमध्ये उद्योगाभिमुख नवे अभ्यासक्रम सुरू करावेत: मंत्री मंगल प्रभात लोढा

    Short Term Courses : चंद्रपूर, दि. 14 : स्थानिक उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) नवे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांनी केले.

    ल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन भवनात अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. (हे हि वाचा – ताडोब्यातील गाईड शहनाज शेख यांना सर्वोत्तम गाईड पुरस्कार)

    अल्पकालीन अभ्यासक्रमांमुळे युवकांना तात्काळ रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे स्थानिक कारखाने व उद्योगांना आवश्यक असलेले प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हे आयटीआयचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये सातत्यपूर्ण व सकारात्मक संवाद आवश्यक असल्याचे ना. लोढा यांनी नमूद केले.

    या बैठकीस व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, राज्य नवोपक्रम सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, सहसंचालक पी.टी. देवतळे, उपायुक्त प्रकाश देशमाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी आदी उपस्थित होते. Short Term Courses

    बैठकीत गोंडवाना विद्यापीठातर्फे प्रा. मनीष उत्तरवार यांनी कौशल्य विकास उपक्रमांचे सादरीकरण केले. डॉ. श्रीकांत पाटील यांनी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेची माहिती दिली. चंद्रपूर जिल्ह्याचा कौशल्य विकास आढावा वैभव बोनगीरवार यांनी तर गडचिरोली जिल्ह्याचा आढावा प्राचार्य चौधरी यांनी सादर केला. संचालक माधवी सरदेशमुख यांनी दोन्ही जिल्ह्यांतील शॉर्ट टर्म कोर्सच्या कार्यपद्धतीवर मार्गदर्शन करून आयएमसी सदस्यांशी चर्चा केली आणि औद्योगिक आस्थापना व आयएमसी सदस्यांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडोपंत बोढेकर यांनी तर आभार सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी मानले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, जिल्हा कौशल्य विकास केंद्र तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बैठकीस जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आयटीआयचे अधिकारी, प्रतिनिधी तसेच आयएमसी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • चंद्रपूर शहर विकासावर लक्ष; आमदार जोरगेवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक

    Municipal Corporation Meeting : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांशी संबंधित विविध महत्त्वाच्या विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज रविवारी महानगरपालिकेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनात्मक बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या. (हे वाचा – अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा हल्ला)

    या बैठकीला नव्याने रुजू झालेले मनपा आयुक्त नरेश अकनुरी यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबू वैरागडे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, महामंत्री मनोज पाल, रवी गुरुनुले, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, बलराम डोडाणी, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, कल्पना बबुलकर, ॲड. राहुल घोटेकर, राजेंद्र अडपेवार आदींची उपस्थिती होती.

    या बैठकीदरम्यान शहराच्या विकासाशी निगडित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा सखोल आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीचा विषय, महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी मालकी हक्काचे पट्टे देण्याचा प्रश्न तसेच भिवापूर हनुमान खिडकी परिसरातील झरपट नदीवरील प्रस्तावित पुलाच्या बांधकामाबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या कामांमुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होण्यासोबतच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर होण्यास मदत होणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

    आगामी काळात चंद्रपूर शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि विकासकामे अधिक गतिमान करण्यासाठी प्रशासनाने सर्व विभागांशी समन्वय साधून काम करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.

  • श्रीमती शाहनाज बेग यांना पश्चिम भारतातील सर्वोत्तम वाइल्डलाईफ गाईड पुरस्कार

    Best Wildlife Guide : नवी दिल्ली / चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – नवी दिल्ली येथील बिकानेर हाऊसमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या प्रतिष्ठित ‘८ व्या टॉफ्ट (TOFT) टायगर वाइल्डलाईफ टुरिझम अवॉर्ड्स २०२५’ सोहळ्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (TATR) राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे.

    ताडोबातील मोहरली (कोअर) गेट येथे कार्यरत असलेल्या निसर्ग मार्गदर्शक (Nature Guide) श्रीमती शाहनाज सुलेमान बेग यांना ‘बिली अर्जन सिंग मेमोरियल अवॉर्ड फॉर बेस्ट वाइल्डलाईफ गाईड ऑफ द इयर (पश्चिम भारत)’ या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (हे हि वाचा – राज्य आरोग्य उपक्रमात चंद्रपूर प्रथम)

    पश्चिम भारतातील एकूण आठ नामांकनांमधून श्रीमती शाहनाज बेग यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘पहिली महिला निसर्ग मार्गदर्शक’ (First Female Tourist Guide) म्हणून त्या ओळखल्या जातात. मोहरली कोअर गेटवरील त्यांची उत्कृष्ट सेवा ही संवर्धन-आधारित पर्यटनाच्या क्षेत्रातील महिला सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा (Milestone) ठरली आहे. वन्यजीवांचा सखोल अभ्यास, मार्गदर्शनातील नैतिक मूल्ये आणि सफारी दरम्यानची व्यावसायिक वागणूक या गुणांची दखल घेत त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. Best Wildlife Guide

    हा पुरस्कार सोहळा ‘टॉफ्ट टायगर्स’चे संस्थापक आणि ॲम्बेसेडर श्री. ज्युलियन मॅथ्यूज, तसेच ज्युरी सदस्य व ‘टॉफ्ट टायगर्स’चे संचालक श्री. विशाल सिंग आणि ‘सॅंक्च्युरी एशिया’चे संस्थापक श्री. बिट्टू सहगल यांच्या हस्ते संपन्न झाला.
    ‘टॉफ्ट टायगर्स अवॉर्ड्स’ हे भारत आणि नेपाळमधील जबाबदार पर्यटन, नैतिक वन्यजीव पद्धती आणि जनसहभागासाठी (Community Engagement) एक मापदंड मानले जातात.

    श्रीमती शाहनाज यांची निवड ही ताडोबा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास, उच्च दर्जाचे मार्गदर्शन आणि व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील स्थानिक समुदायासाठी शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या कटिबद्धतेला अधोरेखित करते. श्रीमती शाहनाज यांच्या यशासोबतच, ताडोबा परिसरातील जबाबदार पर्यटनात योगदान देणाऱ्या इतर घटकांचाही या सोहळ्यात गौरव करण्यात आला:

    पगदडी रिसॉर्टचे श्री. शाहीन शेख यांना ‘बेस्ट नॅच्युरलिस्ट’ (Best Naturalist) पुरस्काराने गौरविण्यात आले.
    तसेच, आदरातिथ्य क्षेत्रातील (Hospitality Sector) उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘स्वसारा रिसॉर्ट’ आणि ‘वृक्ष रिसॉर्ट’ यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.
    राष्ट्रीय स्तरावरील या सामुदायिक यशामुळे भारतातील शाश्वत आणि जबाबदार वन्यजीव पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे स्थान अधिक बळकट झाले आहे.

  • चंद्रपुरात अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रानडुकराचा हल्ला

    Chandrapur Wild boar Attack : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून आतापर्यंत ४२ नागरिकांचा या संघर्षात बळी गेला आहे. १४ डिसेंबर रोजी चंद्रपूर शहरातील बाबुपेठ आंबेडकर नगर भागात अंगणात काम करणाऱ्या महिलेवर रान डुकराने हल्ला करीत जखमी केले. (हे हि वाचा – नायलॉन मांजा विक्रेते चंद्रपूर पोलिसांच्या रडारवर)

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभाग १७ मधील दुर्गा नगर मध्ये सकाळी ६ वाजता भारती विश्वनाथ शेंडे हि महिला अंगणात काम करीत होती, त्यावेळी रान डुक्कराने भारती शेंडे वर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भारती शेंडे यांनी आरडाओरडा केल्याने शेजारी नागरिक जमा झाले व रानडुकरांना तिथून हुसकावून लावले.

    विशेष म्हणजे या भागात काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले होते, याची माहिती वनविभागाला सुद्धा दिली मात्र वनविभागाने यावर काही पाऊल न उचलल्याने आज हि घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आप युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी दुर्गा नगर भागात धाव घेतली. Chandrapur Wild boar Attack

    वनविभागाला या हल्ल्याची माहिती देत, जखमी भारती शेंडे या महिलेला तात्काळ उपचाराकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले. राजू कुडे यांनी यावेळी वनविभागावर ताशेरे ओढत, या घटनेला जबाबदार वनविभाग असून त्यांनी तात्काळ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ जंगल परिसरात तारांची सुरक्षा जाळी लावावी. यावेळी राजू कुडे सह वाहतूक अध्यक्ष जय देवगडे उपस्थित होते.

  • आ.मुनगंटीवार यांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा इशारा

    Sudhir Mungantiwar Assembly Speech : नागपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) : विधिमंडळाच्या कामकाजातील शिस्त, पारदर्शकता आणि लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी सातत्याने आवाज उठवणारे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठामपणे मांडला. अधिवेशन अंतिम टप्प्यात असतानाही अनेक स्वीकृत लक्ष्यवेधी सूचनांची उत्तरे प्रलंबित ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या या मुद्द्याची तात्काळ दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत, उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत उत्तरे सादर न झाल्यास मुख्य सचिवांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचे निर्देश दिले. (हे हि वाचा – आरोग्य उपक्रमात चंद्रपूर जिल्हा राज्यात प्रथम)

    आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, लक्ष्यवेधी सूचना या विधिमंडळाच्या कामकाजाचा कणा आहेत. शासनाच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे हे प्रभावी साधन आहे. काही लक्ष्यवेधींची उत्तरे तोंडी दिली जातात, तर काहींची उत्तरे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही अधिवेशनांपासून ही संसदीय परंपरा सातत्याने डावलली जात असल्याचे त्यांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले. Sudhir Mungantiwar Assembly Speech

    आ.मुनगंटीवार यांनी आकडेवारी मांडताना सांगितले की, विधानसभा अध्यक्षांनी ३० सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांना पत्र लिहून प्रलंबित लक्ष्यवेधींबाबत माहिती मागवली होती. त्यानुसार अनेक लक्षवेधी सूचनेची निवेदन अप्राप्त आहे. लक्ष्यवेधींची उत्तरे अद्यापही प्रलंबित आहेत. ही बाब केवळ प्रशासकीय दुर्लक्षाची नसून, विधिमंडळाच्या अधिकारांनाच आव्हान देणारी असल्याचे त्यांनी ठामपणे सभागृहात मांडले. Assembly Session Maharashtra

    या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा मुद्दा पूर्णतः रास्त आणि योग्य असल्याचे ते म्हणाले. विधिमंडळाच्या पीठासन अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करणे प्रशासनावर बंधनकारक आहे . अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढे म्हणाले की, उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर प्रलंबित लक्ष्यवेधींची उत्तरे सभागृहाच्या पटलावर सादर झाली नाहीत, तर मुख्य सचिवांविरोधात हक्कभंगाची कारवाई केली जाईल असे स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अभ्यासपूर्ण, आकडेवारीनिशी आणि संसदीय मूल्यांना अधोरेखित करणाऱ्या भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण सभागृहाचे लक्ष लागले आहे.

  • चंद्रपूर-यवतमाळ शेतकऱ्यांना कापूस खरेदी मर्यादेत दिलासा

    Sudhir Mungantiwar Farmer Relief : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (news34)- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर व यवतमाळसह एकूणच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कापूस खरेदीची मर्यादा गेल्यावर्षीप्रमाणेच कायम ठेवण्याची आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानुसार शासनाने ही मर्यादा प्रति हेक्टर २३६८ किलो ठेवण्याच्या संदर्भातील आदेश निर्गमीत केले आहेत. आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनंतर हे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आ. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. (हे हि वाचा – चंद्रपुरात ८०० मेगावॉट चा वीज प्रकल्प प्रस्तावित)

    माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनंतर शासनाने काढले आदेश

    शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे, या ठाम भूमिकेतूनच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रत्येक कृतीला दिशा मिळते. त्यामुळे कापूस, धान, विमा आणि बोनस यांसह शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने शासनदरबारी ठाम पाठपुरावा केला आहे. शेतकऱ्यांच्या घामाला न्याय मिळावा, हीच आ.सुधीर मुनगंटीवार यांची खरी तळमळ आहे.

    सीसीआयने ठरविलेली मर्यादा अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान रोखण्यासाठी ‘मागील वर्षाप्रमाणेच कापूस खरेदीची मर्यादा कायम ठेवावी’ अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी दि. ३ डिसेंबरला मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. या गंभीर विषयावर माननीय मुख्यमंत्री यांनी तत्काळ प्रतिसाद देत कृषी आणि सहकार विभागाच्या प्रधान सचिवांना त्वरीत कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार दि. ११ डिसेंबरला यासंदर्भातील आदेश निर्गमीत करण्यात आले आहे. Sudhir Mungantiwar Farmer Relief

    कापूस खरेदीसाठी प्रती हेक्टरी १३.५७ क्विंटलची अत्यल्प मर्यादा जाहीर करण्यात आली असून प्रत्यक्षात चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी २५ ते ४० क्विंटल प्रतिहेक्टर उत्पादन घेणारे आहेत. त्यामुळे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे गंभीर आर्थिक नुकसान होणार आहे. सन २०२४-२५ मध्ये या दोन्ही जिल्ह्यांसाठी ३० क्विंटलची मर्यादा लागू होती आणि शेतकऱ्यांनी त्यानुसार खरेदी-विक्री प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यामुळे चालू हंगामातही ३०–४० क्विंटलचीच मर्यादा ठेवण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

    दि. ११ डिसेंबरला शासनाने काढलेल्या परिपत्रकात मर्यादा वाढविण्याची घोषणा केली आहे. ‘राज्यातील उच्चत्तम उत्पादकता असलेल्या तीन जिल्ह्यांची सरासरी विचारात घेऊन राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी खरीप २०२५ मध्ये उत्पादीत झालेल्या कापूस खरेदीसाठी २३६८ किलो प्रति हेक्टर ही उच्चतम मर्यादा ठेवण्यात येत आहे,’ असे या आदेशात म्हटले आहे.

    शेतकरी सध्या त्यांचे कापूस उत्पादन शासनाच्या खरेदी केंद्रावर किमान आधारभूत किंमतीनुसार विक्रीकरीता घेऊन जात आहेत. शेतकरी अद्यावत तंत्रज्ञान, सिंचन इत्यादीचा वापर करुन जादाचे उत्पादन घेण्याचा कायम प्रयत्न करत असतात. तथापि, काही शेतकऱ्यांचे सरासरी उत्पादनापेक्षा जादाचे उत्पादन खरेदी केंद्रावर विक्रीसाठी जातात. मात्र प्रत्यक्षात जादा उत्पादन असूनही खरेदी केंद्रावर कापूस विक्री करताना त्या शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून सातत्याने शासनास विचारणा होत होती. त्यानंतर ही मर्यादा प्रति हेक्टर २३६८ किलोपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

    आ. मुनगंटीवार यांनी या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन सीसीआयचे संचालक श्री. ललितकुमार गुप्ता यांच्याशी देखील दूरध्वनीवर चर्चा केली होती. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.

  • राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांत चंद्रपूर जिल्ह्याने दाखवला गुणवत्तेचा ठसा

    Chandrapur Health Ranking : चंद्रपूर, दि. 13 डिसेंबर २०२५ (News३४) : राज्य आरोग्य विभागामार्फत दरमहा विविध आरोग्य कार्यक्रमांच्या निर्देशांक उद्दिष्टांच्या पूर्ततेनुसार करण्यात येणाऱ्या डी.एच.ओ. (District Health Officer) मानांकनात ऑक्टोबर महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यात तिसरा तर विभागाच्या परिमंडळात प्रथम क्रमांक पटकावत चंद्रपूरने आरोग्य सेवेतील गुणवत्तेची छाप पाडली आहे. (हे वाचा – खासदार धानोरकरांच्या मागणीला यश, उमेदवारांना दिलासा)

    राज्यात राबविण्यात येणाऱ्या माता–बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, लसीकरण, आरसीएच ऑनलाईन नोंदणी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रांतर्गत मोफत तपासण्या आदी नियमित व राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे चंद्रपूर जिल्ह्याची कामगिरी लक्षणीय ठरल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले. Chandrapur Health Ranking 

    चंद्रपूर 59.15 गुणांसह तिसऱ्या

    मानांकनातील गुणांनुसार धाराशिव जिल्हा 63.30 गुणांसह पहिल्या, अकोला 62.27 गुणांसह दुसऱ्या, चंद्रपूर 59.15 गुणांसह तिसऱ्या, गोंदिया 56.91 गुणांसह चौथ्या तर बुलढाणा 56.25 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. विविध आरोग्य उपक्रमांच्या अंमलबजावणीत मिळालेले हे स्थान आरोग्य विभागातील प्रत्येक घटकाच्या योगदानाचे फलित असल्याचे डॉ. कटारे यांनी नमूद केले. Chandrapur Health Department

    सांघिक कामगिरीला यश हे मानांकन जिल्ह्यातील सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामगिरीमुळेच मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी, तसेच गावपातळीवर कार्यरत आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक–सेविका, आशा सेविका व आशा गटप्रवर्तक यांनी गुणवत्तापूर्ण सेवा दिली.            

    यासोबतच डाटा एन्ट्री ऑपरेटर, तालुका व जिल्हास्तरीय कर्मचारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रम समन्वयक व पर्यवेक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तम प्राथमिक उपचारांसह सर्व राष्ट्रीय आरोग्य उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून पुढेही कायम राहणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी कळविले आहे.

  • स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांच्या छापेमारीत ७७ हजारांचा प्रतिबंधित मांजा जप्त

    Banned Nylon manja :चंद्रपूर १३ डिसेंबर २०२५ (News३४) – मानवी जीवितास धोकादायक असणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर चंद्रपूर पोलिसांचे कारवाई सत्र सुरु आहे. १२ डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ७७ हजारांचा नायलॉन मांजा जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हे वाचा – स्थानिक गुन्हे शाखेच्या रडारवर नायलॉन मांजा, ५० हजारांचा मांजा जप्त)

    स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत वरोरा शहरातील आझाद वॉर्ड मध्ये नायलॉन मांजाची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने मानवी जीवितास व पर्यावरणास धोकादायक असलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा ४५ मग चक्री किंमत ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    सदर नायलॉन मांजा विक्री करीता साठवून ठेवला होता, पोलिसांनी ४० वर्षीय गीता तुळशीराम पानघाटे यांच्यावर कलम २२३, २९२, ४९ व पर्यावरण संरक्षण अधिनियम ५, १५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

    दुसऱ्या कारवाईत चंद्रपूर शहरातील रामनगर मध्ये गुन्हे शोध पथकाने छापेमारी करीत एका जनरल स्टोर्स मध्ये विक्री करिता साठवून ठेवलेला मोनोकाईट फायटर, मोनोफिल गोल्ड व हिरो प्लस प्रतिबंधित नायलॉन मांजा किंमत २३ हजार ४०० जप्त करण्यात आला. Banned Nylon manja

    या कारवाईत जनरल स्टोर्स चालक २५ वर्षीय गौरव हेमराज गोटेफोडे यांच्यावर विविध कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या दोन्ही कारवाईत एकूण ७७ हजारांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, रामनगर पोलीस निरीक्षक आसिफरजा शेख, सपोनि नरोटे, वाघमारे, उगले, पोउपनि सर्वेश बेलसरे यांनी केली.