पोंभूर्णा :- तालुक्यातील देवाडा खुर्द येथे धान मळणी करीत असतांना अचानक थ्रेशर मशीनमध्ये दोन्ही पाय व कमरेखालचा भाग ओढल्या गेल्याने नितेश पिपरे या मजूराचा रविवारला मृत्यू झाला. आर्थिक स्थिती बेताची व कर्ता पुरुषाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नितेश पिपरे (वय ३४) यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी आर्थिक मदत करुन कुटुंबाचे सांत्वन केले.
नितेश पिपरे हा गरिब कुटुंबातील पण कर्तबगार मुलगा होता. तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन चिमुकल्या मुली असा सुखी संसार सुरू होता.रविवारला मृतक नितेश हा मजुरीसाठी थ्रेशर मशीनवर गेला आणि त्याचा जीव गेला.घरची आर्थिक स्थिती बेताची.नितेशच्या पश्चात पत्नी,दोन चिमुकल्या मुली व वृद्ध आई- वडील असा परिवार आहे.
कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला.आर्थिक कोंडी सुरू झाली. अशावेळी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी मृतक नितेशच्या कुटुंबीयांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली व कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी मृतकाची पत्नी सुषमा पिपरे,वडिल बाबुराव पिपरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,सामाजिक कार्यकर्ते शैलेश जुमडे,सोनल धोपटे, कालिदास गव्हारे उपस्थित होती.
चंद्रपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी इको-प्रो ने वरोरा-चिमूर मार्गावरील वहानगाव शेतशिवारात जाऊन “वाघ अधिवास सत्याग्रह” आंदोलन केले. ही सत्याग्रह करण्यात आलेली जागा म्हणजे ताडोबा मधील प्रसिद्ध वाघ असलेले बंजरंग आणि छोटा मटका यांच्या झुंज झालेली होय, या झुंजीत बंजरंग वाघ मृत झालेला होता. ही झुंज कोर, बफर च्या बाहेर वनक्षेत्र बाहेर शेतशिवारात झालेली होती. हा अधिवास या वाघांनी स्वीकारला असून तिथे जाऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा दृष्टीने तसेच वाघाचा वावर आज जंगलाच्या बाहेर असून, वन्यप्राणी संघर्ष तीव्र आहे. वनविभागाने योजना राबविताना फक्त बफर आणि कॉरिडॉर वनक्षेत्रचा विचार न करता “वाघ अधिवास जिथे, वनविभागाच्या योजना तिथे” अशी मागणी करीत ‘वाघ अधिवास सत्याग्रह’ करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचला आहे, यात मागील पाच वर्षात शेकडो मनुष्यहानी वाघसह अन्य वन्यप्राणीच्या हल्ल्यात झालेली आहे. मनुष्यहानी म्हणजेच संघर्ष नसून शेतकरीचे शेतपिक नुकसान, पाळीव जनावरे मारली जाणे, वाघाच्या भीतीच्या वातावरणात राहणे आदी अनेक समस्या संघर्षास कारणीभूत आहेत. वाढती वाघाची संख्यामुळे एकीकडे पर्यटन विकास तर दुसरीकडे मानव वन्यप्राणी संघर्ष अशी परस्पर विरोधी परिस्थिती आहे.
वाढते वन्यप्राणी सर्वत्र वाघ वावर यामुळे स्थानिक गावकरी-शेतकरी कायम संकटात राहणे, आणि त्रासाला सामोरे जाणे अशी परिस्थिती असताना मात्र विविध योजनेचा लाभ मात्र बफर आणि कॉरिडॉर मधील क्षेत्रातील गावाचा विचार करणे कितपत योग्य आहे? आज वाघाला कुठलीही सीमा नाही, तो जंगलाच्या बाहेर शेतशिवारात असतो, गावालगत असतो, शहरात सुद्धा असतो, विविध उद्योगाच्या क्षेत्रात असतो तेव्हा त्याचा वावर जिथे असतो तिथे संघर्ष आणि समस्या निर्माण होतात. मात्र ठराविक भागातील गावात वनविभागाच्या योजनेचा लाभ दिला जातो, यात धोरणात्मक बदल होणे आवश्यक आहे.
चंद्रपूर शहरालगत असलेली गावात चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र मधील वाघ लगतच्या सात-आठ गावात महिना-दोन महिने वावर असल्याने तिथे बफर, कॉरिडॉर नसताना श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा लाभ देत त्या गावाचा समावेश करण्यात आला. मात्र जिल्ह्यात तीनही वनविभाग अंतर्गत शेकडो गावे आहेत जे वाघाच्या दहशतीखाली आहेत, या भागात वाघ-मानव संघर्ष निर्माण झाल्यास लोकडाऊन सारखी परिस्थिती असते. त्यामुळे या सर्व गावांना “वाघ तिथे योजना” संकल्पना राबवून सर्वाना समान लाभ देण्याची मागणी करण्यात आली.
वाघ-अधिवास सत्याग्रह आंदोलनाच्या मागण्या
सोबतच या सत्याग्रह आंदोलनातून शेतपिक नुकसान भरपाई देण्याची वनविभाग, कृषी विभाग व महसूल विभाग असा तिघाडा न ठेवता सरळपणे एकाच विभागाकडे जवाबदारी सोपवावी. प्रत्येक क्षेत्रातील पाळीव जनावरे वन्यप्राणी हल्ल्यात मृत झाल्यास बफर च्या धर्तीवर लवकरात लवकर देण्यात यावे, परिसरातील सिंचन व्यवस्था व शेतीची वीज यांची वेळ दिवसा असावी, वाघ-मानव संघर्ष बाबत राज्यशासनाने गठीत केलेली समितीचा अहवाल नुसार कार्यवाही त्वरित करावी, वाघ अधिवास क्षेत्र असलेल्या लगतच्या सर्व गावात पिआरटी गठण आणि त्यांचे मानधन नियमित देणे, या सर्व गावातील शेतकरी करिता सौरऊर्जा कुंपण त्वरित देणे, कॉरिडॉर नसलेल्या भागात वनक्षेत्रालालगतच्या शेतीला कायम स्वरूपी कुंपण घालणे आदी मागण्या वाहणगाव येथे करण्यात आलेल्या “वाघ-अधिवास सत्याग्रह” आंदोलनातून शाशनाकडे करण्यात आलेली असून या मागण्याकरिता येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंडू धोतरे यांनी दिला आहे.
आज करण्यात आलेल्या आंदोलनात इको-प्रो चे अध्यक्ष तथा माजी मानद वन्यजीव रक्षक, माजी सदस्य राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ चे माजी सदस्य बंडू धोतरे यांचे नेतृत्वात कुणाल देवगिरकर, धमेंद्र लुनावत, राजू काहिलकर, सुधीर देव, सचिन धोतरे, राहुल कुचनकर, हरीश मेश्राम, रॉजर रंगारी, प्रकाश निर्वाण, अमोल दौलतकर, प्रितेश जीवने, चित्राक्ष धोतरे सहभागी होते, यावेळी वहाणगाव येथे स्थानिक गावकरी यांना या सत्याग्रह विषयी, “वाघ तिथे वनविभागाच्या योजना” या विषयी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी माहिती देत येत्या काळात करण्यात येणाऱ्या आंदोलन विषयी माहिती दिली, यावेळी स्थानिक गावकरी मध्ये सरपंच प्रशांत कोल्हे, उपसरपंच हरिभाऊ दडमल, शंकर नन्नावरे, गजानन गायकवाड, शेतकरी सुधाकर दडमल, तानाजी सावसाकडे, सुभाष दोडके, राजू कुळमेथे, पांडू दोडके यावेळी उपस्थित होते.
चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरातील अनेक युवकांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे उपस्थित होते. त्यांनी या युवकांना पक्षात स्वागत केले.
यावेळी बोलताना जावेद सय्यद, माजी अध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी म्हणाले, “देशात राजकारण हे मुख्यतः धर्म, जात-पातवर आधारित असते. दोन समाजात तेड निर्माण करून राजकारणी सत्तेसाठी कुठल्याही थराला जातात. परंतु आम आदमी पार्टीने कधीही सत्तेसाठी धर्माचा वापर केलेला नाही. आम आदमी पार्टी फक्त आणि फक्त विकासावर मत मागते आणि दिलेले शब्द पूर्ण करते.
दिल्ली आणि पंजाब सरकारने आपल्या राज्यात मोहल्ला क्लिनिक, आरोग्य, शिक्षण, सामान्य जनतेला वीज बिलात सवलत इत्यादी विकासाची कामे करून सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. अर्थात सत्तेत येऊन जे करायचे आहे तेच आम आदमी पार्टीने केले. यामुळे आप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी राजिक शेख, कोषाध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी, फहीम शेख, आबिद सय्यद, मोहसीन सय्यद, जाकिर सय्यद (सर्व सदस्य, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी) तसेच रोहित मेश्राम, अमित बारबूनडे, राकेश दुर्योधन, केवल सिंह भोयर इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.
यावेळी राजु कुडे म्हणाले, “येणाऱ्या काळात चंद्रपूरमध्ये आम आदमी पक्षाचे मोठे संघटन आपल्याला पाहायला मिळेल.
चंद्रपूर — जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानात घट झाली असून वातावरणात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. सकाळी पारा 9 अंशावर घसरला असून त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यासोबत शेकोटीचा आधार घेतला.
जिल्ह्यात उन्हाळा, हिवाळा असो की पावसाळा हे तिन्ही ऋतू आपला रंग जोमात दाखवितात, पावसाळा संपल्यावर हिवाळ्याची सुरुवात झाली मात्र त्यानंतर थंडी ची चाहूल लागली नव्हती.
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात थंडी ने कहर करायला सुरुवात केली असून ग्रामीण असो की शहरी भाग नागरिकांना आता थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोटी हा महत्वपूर्ण आधार मिळाला आहे.
चंद्रपूर – आई ओबीसी समाजाची असल्यास तसे जात प्रमाणपत्र मुलांना दिले जावे, अशी नवी मागणी आता मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी नाही तर त्यांनी केलेला जोक आहे. असले जोक आता ते अधिकच करायला लागले आहेत, असा टोला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूकर यांनी केला आहे.
जरांगे पाटील यांच्या नव्या मागणीच्या अनुषंगाने राजूरकर म्हणाले, जात प्रमाणपत्रासाठी आई हा निकष मान्य केल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या प्रवर्गासाठी कुठला नियम लावला जाईल. या प्रवर्गातील आई असल्यास त्यांच्या मुलांनाही हे आरक्षण मिळणार काय, असा सवालही त्यांनी केला आहे.
जरांगे हे मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षणाची मागणी करीत आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सुरुवातीपासून या मागणीला विरोध केला. चंद्रपुरात कार्यकर्त्यांनी २१ दिवस अन्नत्याग आंदोलन केले. याची दखल घेत सरकारने २९ सप्टेंबरला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ओबीसी कल्याण मंत्री, मुख्य सचिव व ओबीसी संघटनांची बैठक घेतली. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देणार नाही, असे सांगितले. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपुरात येऊन रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडविले होते.
मागण्यापूर्तीच्या अनुषंगाने लेखी पत्रही दिले होते. हे सारे घडत असतानाही जरांगे पाटील आता नवी मागणी करू लागले आहेत. त्यांच्या मागण्यांचा खेळ संपण्याची चिन्हे नाहीत. त्यांनी सरकारकडे आरक्षणाची मागणी खुशाल करावी. तसे आरक्षणही लढा देऊन मिळवावे. आमचा विरोध ओबीसींमधून आरक्षणाला आहे. तो अजूनही कायम आहेत. हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार काय भूमिका मांडते याकडे लक्ष लागून आहे. समितीने आपला अहवाल दिला आहे. या अहवालातील तथ्यही लवकरच बाहेर येईल. ओबीसी समाज या अहवालातील बाबींकडे लक्ष ठेवून आहे, असेही सचिन राजुरकर यांनी मटले आहे.
चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२३ दरम्यान ४ दिवसीय भिंतीचित्र महोत्सव साजरा केला जात असुन याचे रीतसर उदघाटन आज सकाळी ९ वाजता जिल्हा स्टेडियम येथे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर महोत्सवात भिंतीचित्र पेंटींग,वृक्ष पेंटींग, क्रीएटीव्ह पेंटींग या ३ स्पर्धा घेण्यात येत असुन शहरातील जिल्हा स्टेडियम,चांदा पब्लीक स्कूल परिसर, सेंट मायकल स्कूल,प्रियदर्शिनी चौक ते वरोरा नाका इत्यादी परिसराचे सौंदर्यीकरण त्यांच्याद्वारे केले जाणार आहे. लवकरच विसापूर (ता. बल्लारपूर) येथील तालुका क्रीडा संकुलात २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भिंतीचित्र महोत्सवातील स्पर्धकांना देशभरातील लोकांना आपल्या कलेचा परिचय देण्याची संधी प्राप्त होत आहे.
स्पर्धेत मुंबई,नागपूर,सांगली,सोलापूर,अहमदनगर,पांढरकवडा,हिंगोली,वर्धा, आरमोरी, जळगाव,यवतमाळ,गोंदीया,चिमुर, गोंडपिंपरी, चिचपल्ली, बल्लारशाह, वरोरा, हिंगणघाट, चंद्रपूर इत्यादी शहरातील एकुण २७४ स्पर्धक सहभागी झाले असुन वयाचे बंधन नसल्याने व्यावसायिक तसेच हौशी चित्रकार सुद्धा सहभागी झाले आहेत. उत्कृष्ट चित्रनिर्मिती करणाऱ्या कलाकारांना धनादेशाद्वारे रोख रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे. मनपातर्फे सर्व स्पर्धकांच्या निवास व जेवणाची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली असुन सौंदर्यीकरण स्थळी नेण्यास वाहने,पेंट,ब्रश,बसण्यास बेंचेस इत्यादी तसेच वैद्यकीय सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उदघाटन प्रसंगी स्पर्धकांना स्पर्धा साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपअभियंता विजय बोरीकर,डॉ.अमोल शेळके, सहायक आयुक्त सचिन माकोडे,नरेंद्र बोभाटे,संतोष गर्गेलवार,चैतन्य चोरे,विकास दानव, साक्षी कार्लेकर, मनपाचे अधिकारी कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने स्पर्धक व नागरिक उपस्थीत होते.
मागील वर्षी झालेल्या स्पर्धेत सहभाग घेऊन चित्रांद्वारे संवाद साधणाऱ्या भिंती आपण तयार करून दाखविल्या आहेत. शहरात थंडीचा कडाका वाढत आहे अश्या वेळेस राज्यातल्या एका टोकावरच्या शहरात येऊन आपण स्पर्धेत भाग घेत आहेत ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. संपुर्ण राज्यातील कलावंतांच्या कलांनी चंद्रपूर शहराच्या सौंदर्यीकरणात निश्चितच वाढ होईल अशी आशा करतो – आयुक्त विपीन पालीवाल
गुरू गुरनुले
मुल – नागपूर मध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशन वरिष्ठ सभागृहातील सदस्य माजी मंत्री अनुभवी ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी विदर्भाचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांच्या स्मृती जपण्याचा मुद्दा हाताशी धरून विधानपरिष सभागृहात मांडला.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. सां. कन्नमवार यांनी अत्यंत गरिबीतून समाज सेवा करीत चंद्रपूर सारख्या मागास जिल्ह्यातील जनतेचे नेतृत्व करीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी योजना राबऊन सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आष्टी येथील वैनगंगा नदीवर मोठा पूल बांधून आदिवासी व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला वाहतुकीने जोडण्याचे काम त्यांनी पूर्ण केले. म्हणून ही त्यांची कर्मभूमी म्हणू ओळखली जाते.
परंतु अशा महान आणि दुसरे मुख्यमंत्री राहिलेल्या महान व्यक्तिमत्वाचा पाहिजे तसा गौरव अजून पर्यंत महाराष्ट्र शासनाने केल्याचे दिसत नाही ही एक फार मोठी शोकांतिका आहे. याची जाणीव ठेऊन राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्र शासनाने स्व. मा सा.कन्नमवार यांची शासकीय जयंती साजरी करावी. गौरव ग्रंथ चलचित्र तयार करण्यात यावे एखाद्या शासकीय उपक्रमाला कन्नमवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आमदार खडसे यांनी केली. यांच्या मागणीला सरकार तर्फेही सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे उपमुख्यमंत्री,गृहमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे यथोचित सन्मान राखला जाईल सांस्कृतिक विभागामार्फत त्यांचे स्मारक उभारण्यात येईल असा शब्द दिला आहे.
खान्देश या भागातील नेते मध्ये असतानाही विदर्भाच्या मुद्दाद्वारे सुपुत्राचा विदर्भात अधिवेशन मा. सा. होत असतांनाही सन्मान शासकीय होत नाही म्हणत विधानपरिषद मध्ये आवाज उठविल्याबाबत मुलं कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती राजेंद्र उर्फ बालू कन्नमवार यांनी आमदार एकनाथ खडसे यांची भेट घेत त्याचे जाहीर आभार मानले आहे.
चंद्रपूर – निवडून आल्यानंतर गांधी चौकात विजय सेभेला संबोधित करत असतांना गोर गरिब, गरजु विद्यार्थी, दिव्यांग यांची सेवा करण्याचा संकल्प केला होता. तेव्हा पासून आपण विविध उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी, गोर गरिब नागरिक, दिव्यांग बांधव सामाजात काम करणा-या संघटनांना शक्य ती मदत पोहचवण्याचे काम करत आहोत. आज गांधी चौकात आपण गरजु मुलींना सायकल, दिव्यांग बांधवांना सायकल देत आहोत. त्यामुळे या गांधी चौकातून या वर्गाची सेवा करण्याचा दिलेला शब्द याच चौकात पुर्ण करता आल्याचा अधिक आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसा निमित्त किशोर जोरगेवार मित्र परिवारच्या वतीने महानगरपालिका पटांगणात सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी, तहसीलदार विजय पवार, अजय जयस्वाल, सुर्यकांत खनके, मिलींद गंपावार, श्याम धोपटे, गोपाल मुंधडा, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला प्रमुख सविता दंढारे, सायली येरणे आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, आमदार म्हणून मोठा निधी आपण मतदार संघाच्या विकास कामावर खर्च केला आहे. मात्र रस्ते, नाली, सभागृह म्हणजे सर्वसमावेशक विकास नाही. माझ्या मतदारसंघातील गरिब – गरजु, दिव्यांग बांधव यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करणे हे सुध्दा लोकप्रतिनी म्हणून आमचे काम आहे. काही मित्र मंडळींनी वाढदिवसा निमित्त मदत करण्याची भावना व्यक्त केली. यावेळी आपण त्यांना मदत करायची ईच्छा असेल तर या माध्यमातून मदत करण्याची विनंती केली होती. व त्यांनी हा भव्य कार्यक्रम आयोजित केला.
आज आपण विविध शाळेतील 100 गरजु विद्याथीनींना सायकल वितिरित केली आहे. तर जवळपास 30 दिव्यांग बांधवांना तिन चाकी सायकल आपण देत आहोत. ही मदत शेवटची बिलकुल नाही. पूढे ही समाजातील या घटकांना त्यांना आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करुन देण्याचा आपला मानस असल्याचे ते यावेळी म्हणाले. आज विद्याथीनींना सायकल मिळाली त्यांच्या चेह-यावरचा आनंद हेच आमचे समाधान आहे. आपण शिक्षण क्षेत्रात उल्लेखीय काम करत देशाचे नावलौकीक करावे, आपल्याला शिक्षण क्षेत्रात कोणतीही अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवासा निमित्त दिवसभरच विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाकाली मंदिर येथे श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गणपती मंदिर येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने लाडू तुला कार्यक्रम घेण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मुल – कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय अंतर्गत संपुर्ण राज्यभरात जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनी आयोजीत करण्यात येत असून चंदपूर जिल्यात तंत्र प्रदर्शनी चे आयोजन भव्य स्तरावर २० डिसेंबर रोजी शासकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.
संपुर्ण चंदपूर जिल्यातील शाशकिय, अशाशकिय औदयोगिक प्रशिक्षण संस्था, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था यात सहभागी होणार असून यात जिल्हाभरातून शेकडो मॉडेलस व मोठ्या संख्येने विदयार्थी उपस्थित होणार असल्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रवींद्र मेहंदळे यांनी कळविले आहे.
सदर तंत्र प्रदर्शनीचे उदघाटन नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकरराव अडवाले यांचे हस्ते होणार असून एम.आय.डि.सी. चंदपूरचे चेअरमन मधुसुदन रूंगठा, शिक्षणमहषीं पांडुरंग आंबटकर हे प्रमुख अतिथी असणार आहेत.
या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीतून १० मॉडेलसची राज्य स्तरीय प्रदर्शनी करिता निवड करण्यात येणार असून
राज्य स्तरीय प्रदर्शनीत् राज्यातून निवडक ३६० मॉडेल्स सहभागी होणार असल्याचे रवींद्र मेहंदळे यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनीचे नियोजनाकरिता विविध समित्या तयार करण्यात आल्या असून जय्यत
तयारी सुरु असल्याचे नवभारत कनिष्ठ महाविद्यालय व्होकेशनल विभागाचे प्रमुख प्रा.महेश पानसे प्रा.गुणवंत दर्वे, शालिक फाले, प्रभाकर धोटे, अमोल धात्रक, व इतर
नियोजन समिती सदस्यानी कळविले
आहे.
चंद्रपूर – 17 डिसेंम्बर ला चंद्रपुरातील मातोश्री विद्यालयात शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, या मेळाव्यासाठी पूर्व विदर्भ सम्पर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
मात्र या मेळाव्यापुर्वी एक दुःखद घटना घडली, मेळाव्याला येताना संजय नगर येथे राहणारा युवासेनेचा कार्यकर्ता 29 वर्षीय रवि निषाद चा अपघात झाला, या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली, त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
18 डिसेंम्बरला ही बाब आमदार भास्कर जाधव यांना कळली असता त्यांनी तात्काळ रुग्णालय गाठत रवि निषाद च्या तब्येतीची विचारपूस केली, त्यावेळी डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, रवि च्या उपचारात हलगर्जीपणा नको असे सांगत स्वतः रवि ला 25 हजार रुपयांची रोख रक्कम देत मदत केली, पुन्हा काही मदत लागल्यास सांगा व आपली काळजी घ्या असे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व युवासेना विभागीय सचिव निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती. रवीला सध्या नागपुरातील रुग्णालयात नेण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना आमदार जाधव यांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचा कार्यकर्त्यांप्रति असलेला संवेदनशीलपणा पुढे आलेला आहे.
भाषणात आक्रमक असलेल्या या नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांसाठी दाखविलेला संवेदणशिलपणाची शिवसैनिकात जोरदार चर्चा रंगली होती.