Tag: चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी सरसावले सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातची पिके निसटलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्यासाठी व त्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार सरसावले आहेत. यासंदर्भात त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर चंद्रपुरात प्रथमच हा रोग आढळून आल्याने एक विशेष पॅकेज चंद्रपूर जिल्ह्यासाठी जाहीर करावा अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना केलेली आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील ६७.७६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड होते. वरोरा, भद्रावती, चिमुर, राजुरा, कोरपना, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमध्ये हे पीक घेतले जाते. या पिकावर ऑगस्टच्या सुमारास पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला. कृषी विभागाने प्रयत्न करून या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोहिमही हाती घेतली. परंतु १५ ते १८ सप्टेंबरच्या आसपास अचानक सोयाबीनचे पिक काळवंडले. पावसाचा खंड, वाढलेले उष्णतामान आणि रोगाचा प्रादुर्भाव यामुळे हे घडल्याचे कृषी तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील ही परिस्थिती कळताच ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राजुरा तालुक्यातील खामोना,पांढरपौनी,हरदोणा ( खु.) येथील शेतशिवरात सोयाबीन पिकावरील रोगामुळे नुकसानग्रस्त भागांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनाही पिकांवर मळकुज, खोडकुज व रायझोक्टोनिया एरीयल ब्लॉईट या रोगांचा प्रादुर्भाव आढळला. या रोगामुळे दोनच दिवसात सोयाबीनचे पीक पिवळे पडले होते. या पाहणीच्या वेळी जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार सुदर्शन निमकर, सुनिल उरकुडे, अजय राठोड, अरुण मस्की, हरीदास झाडे, वामन तुरानकर, दिलीप गिरसावळे, कृषी सहाय्यक डांगे हे उपस्थित होते.

     

    एकूण हवामान व रोगांच्या प्रादुर्भावामुळे ना. श्री. मुनगंटीवार यांना अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव व डोळ्याच्या कडा पाणावलेल्या दिसल्या. त्यामुळे त्यांनी तातडीने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्राद्वारे नुकसाभरपाईची मिळण्यासाठी साद घातली. कृषिमंत्री धनंजयजी मुंडे यांनाही पत्र पाठविले . मृदा संतुलनात मोठा बिघाड निर्माण झाला आहे. हे संतुलन पुन्हा निर्माण करण्याचे मोठे आव्हान यंत्रणेपुढे आहे. सोयाबीनवर तीन प्रकारचे रोग सध्या आहेत. यासंदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना बोलावून या रोगांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. पीक नुकसानीसंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना केल्या आहेत. नुकसान भरपाईचा प्रस्ताव तयार करताना तो पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजुने असला पाहिजे, शेतकऱ्यांच्या फायद्याचा असला पाहिजे अशा सूचना प्रशासनाला दिल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

     

    याबाबत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चंद्रपूर जिल्ह्यातील परिस्थिती दयनीय झाल्याचे त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनास आणुन दिले. नैसर्गिक आपत्ती व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटाच्या मालिकेत सापडला आहे. त्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढणे नितांत गरजेचे असल्याचे नमूद करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आग्रही मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागील हरभरा पिकाचेही गारपिटीमुळे नुकसान झाले होते याशिवाय ५० हजार रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांपैकी काहींच्या खात्यात तांत्रीक कारणाने रक्कम जमा झाली नव्हती, ती रक्कम जमा करण्याबाबतही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांचे लक्ष वेधले.

  • चंद्रपुरातील ओबीसी आमरण उपोषण आंदोलनाला पालकमंत्री मुनगंटीवार यांची भेट आणि घडलं असं..

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सुरू असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षांने आता कळस गाठला असून एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडे टोंगे असे आंदोलन रंगले आहे.

    ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने केली तर दुसरीकडे मराठा समाजाच्या या मागणीला ओबीसी समाजाने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

     

    मराठा समाजाच्या मागणीविरोधात राज्यभरात व चंद्रपुरात ओबीसी महासंघाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रविंद्र टोंगे हे 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसले आहे, आज आठवडा लोटल्यावर राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

     

    मुनगंटीवार यांनी आंदोलकांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्या मागण्यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करीत बैठक लावू असे आश्वासन आंदोलकांना दिले.

     

    ओबीसी समाजाच्या मागणीनुसार राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाबाबत जी घोषणा झाली त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, जातनिहाय जनगणना करावी, स्वाधार योजना लागू करावी अश्या विविध मागण्या घेऊन टोंगे यांनी आमरण उपोषणाला बसले आहे.

     

    सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, वस्तीगृहाबाबत चंद्रपुरात वसतिगृह सूरु करू व स्वाधार योजनेचा लाभ इतर ओबीसी विद्यार्थ्यांना देणार असे आश्वस्त केले मात्र आंदोलकांनी मुनगंटीवार यांना हा प्रश्न जिल्ह्याचा नसून राज्याचा आहे, वस्तीगृह चंद्रपूर सहित राज्यात सुरू करावे असे आंदोलकांनी म्हटले.

     

    सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी आंदोलकांसोबत बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याशी दूरध्वनी द्वारे संवाद साधून दिला.

    चंद्रपुरात वस्तीगृह सुरू करावे याबाबत तात्काळ काम सुरू करण्यात येतील असे सावे यांनी आश्वाशीत केले.

    मात्र आंदोलकांनी सरळ सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी ओबीसी नेत्यांसोबत बैठक लावून आमच्या मागणीवर चर्चा करावी, चर्चेतून काही निष्पन्न झाले तर ठीक अन्यथा आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.

     

    जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अर्धे मंत्रिमंडळ गेले, उपोषण सोडविण्याआधी त्यांना सरकारने काय आश्वासन दिले हे अजूनही बाहेर आले नाही, मात्र आमच्या आंदोलनाकडे सरकारने पाठ फिरवली असे चित्र सध्या दिसत आहे, आमच्या मागणीवर सकारात्मक चर्चा करीत ओबीसी शिष्टमंडळाला शासनाने आश्वाशीत करावे अन्यथा आमचे आंदोलन सुरू राहणार असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी सांगितले.

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

     

    या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

     

    वैनगंगा नदीच्या पुरामुळे धान,कापूस व सोयाबीन ही पिके गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली आहे. ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील काही गावात पाणी शिरल्याने घरांचेही नुकसान झालेली आहे.

     

    त्यामुळे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनाम्याच्या आधारे संपूर्ण अहवाल सादर करावा असे निर्देशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

  • चंद्रपुरातील दुर्गापुरात सुरू असलेला हा सट्टा बाजार कुणाचा?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दुर्गापूर हा भाग वन व सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील मतदार संघ, मात्र या मतदार संघात अवैध धंद्याचा सध्या बोलबाला सुरू आहे.

    जुगार असो की सट्टा हे कार्य या भागात खुलेआम सुरू आहे, मात्र पोलीस यावर कारवाई करणे टाळत आहे, पण का? हे उत्तर तर खुद्द पोलीस विभाग देऊ शकतो.

     

    2 वर्षांपूर्वी दुर्गापूर भागात जाकीर नावाच्या इसमाने सट्टा व जुगार खुलेआम सुरू केला होता, ते सुद्धा पोलीस स्टेशनच्या अवघ्या 200 मीटर अंतरावर, पण त्यावेळी News34 ने जाकीर च्या अवैध धंद्याचा पर्दाफाश केला.

     

    तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तात्काळ जाकीर व कैलास चा जुगार व सट्टा बंद पाडला, मात्र 2 वर्षे गेल्यावर आज जाकीर पुन्हा या धंद्यात सज्ज झाला.

    त्याने त्याच ठिकाणी सट्टा बाजार सुरू केला आहे, ते सुद्धा दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या 200 मीटर अंतरावर, ही बाब पोलिसांना माहीत नसेल काय?

    जाकीर हा सट्टा धंद्यातील मास्टर आहे, त्याने यापूर्वी असे अनेक उद्योग केले आहे, त्याने पुन्हा सुरू केलेला हा सट्टा कुणाच्या संमतीने सुरू आहे.

    ही बाब काही दिवसात समोर येईलच, News34 ने याआधी दुर्गापुरातील सट्टा व्यवसायी महाराज च्या धंद्याचं बिंग फोडलं होते.

    सध्या दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये नवे पोलीस निरीक्षक जीत्तावार रुजू झाले आहे, त्यांनी नागपुरातील स्थानिक गुन्हे शाखेत कामगिरी बजावली आहे, पण त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या अवैध धंद्याचं काय?

    मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा सट्टा बाजार पोलिसांच्या नजरेस पडला नाही काय? कुणाच्या संमतीने हे अवैध धंदे दुर्गापुरात सुरू आहे.

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात सुरू असलेल्या या अवैध धंद्याना जबाबदार कोण आहे? हा थेट प्रश्न पालकमंत्री मुनगंटीवार यांना लवकरचं विचारण्यात येईल.

    या बातमीमध्ये दुर्गापुरातील जाकीर च्या सट्टा बाजाराची कहाणी आहे, दुसऱ्या भागात दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा अवैध धंद्याची पोलखोल आम्ही करणार आहोत, ते बघून तुम्ही सुद्धा कपाळावर हात ठेवणार…पुढील दिवसात दुसरा भाग…क्रमशः

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : पुढील आठवड्यापासून गणरायाच्या आगमनाने सणासुदीला सुरुवात होत आहे. हे दिवस आनंद आणि उत्सवाचे असून या उत्सवात गरीब कुटुंब देखील सहभागी व्हावे, या उद्देशाने राज्यातील १ कोटी ६२ लक्ष कुटुंबांना (५ कोटी लोकसंख्या) आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील प्रत्येक सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच सरकारचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    शहरातील जटपुरा गेट येथील स्वस्त धान्य दुकानात गणेशोत्सवनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, चंद्रपूरचे तहसिलदार विजय पवार, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडुरंग माचेवाड, डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंह, अंजली घोटेकर, छबु वैरागडे, रवी आसवानी, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, शितल आत्राम, रवि गुरनुले, राहुल घोटेकर, रवि लोणकर, स्वस्त धान्य दुकानदार विजय बेले, अनिल बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

     

    बाजारभावापेक्षा कमी दराने केवळ १०० रुपयांमध्ये हा आनंदाचा शिधा मिळणार आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘राज्य सरकारने गेल्यावर्षी दिवाळीमध्ये आणि यावर्षी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव व इतर सणांमध्ये आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत, उत्सवाच्या दिवसात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा हा एक प्रयत्न आहे. राज्य सरकार पूर्ण शक्तीने सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे असून नागरिकांनी सुद्धा विविध योजनांचा लाभ घ्यावा. तसेच पदाधिकाऱ्यांनी या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्या.’ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना सणानिमित्त राज्य शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ किट वाटप करण्यात येणार आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे १ लक्ष ३९ हजार ७५० लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील २ लक्ष ७७ हजार २५० लाभार्थी असे एकूण ४ लक्ष १७ हजार लाभार्थी आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याकरीता ४ लक्ष ४ हजार ४९० आनंदाचा शिधा संच उपलब्ध झाला आहे. या कार्यक्रमाला चांद सय्यद, शीतल गुरुनुले, सविता कांबळे, सचिन कोतपल्लीवार, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, अरूण तिखे, शिला चव्‍हाण, यांच्यासह वॉर्डातील नागरीक उपस्थित होते.

    ८९० कुटुंबांना मोफत आनंदाचा शिधा

    जटपुरा वॉर्ड क्रमांक १, रामनगर रोड, चंद्रपूर येथील वॉर्डात जवळपास ८९० कुटुंब आहेत. या सर्व कुटुंबांना मोफत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. ८९० कुटुंबांचे प्रत्येकी १०० रुपये याप्रमाणे एकूण ८९ हजार रुपये यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आले. दुकानदारांनी संबंधित कुटुंबांना आनंदाचा शिधा देताना त्यांच्याकडून एकही रुपया घ्यायचा नाही, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

    असा आहे आनंदाचा शिधा

    चनाडाळ १ किलो, रवा १ किलो, साखर १ किलो आणि पामतेल १ लीटर अशा चार पॅकेटचा हा आनंदाचा शिधा आहे. मशीनवर अंगठा लावताना आपल्या पिशवीत चार पॅकेट असल्याची लाभार्थ्यांनी खात्री करावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

    पालकमंत्री यांच्या हस्ते वाटप

    गणेशोत्सवानिमित्त पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वॉर्ड क्रमांक १ मधील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. यात लता सिडाम, शहनाज हुसैन, प्रभुदास तेलमासरे, मरीयम शेख, मोहसीन शेख, लता बेले, मिरा तिवारी, संगिता लोखंडे, वासुदेव इटनकर, संजय रामटेके, अशोक शेंडे यांचा समावेश होता.

    गरिबांसाठी विविध योजना

    केंद्र व राज्य सरकारने गरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना ना. श्री. मुनगंटीवार यांनी केली. संजय गांधी निराधार योजनेमध्ये सुरुवातीला मानधन ६०० रुपये होते. अर्थमंत्री झाल्यानंतर यात वाढ करून १२०० रुपये करण्यात आले. तर आता राज्य शासनाने हे अनुदान १५०० रुपये केले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखांवरून आता ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आली असून नागरिकांना ५ लक्षपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे.

     

  • पालकमंत्री मुनगंटीवार यांना पप्पू देशमुखांचा सवाल

    News34

    चंद्रपूर – दिनांक 4 सप्टेंबर रोजी शहरांमध्ये एकाच दिवशी तीन अपघात होऊन तिघांना जीव गमवावा लागला. यानंतर जनविकास सेनेने आक्रमक भूमिका घेऊन 8 दिवसांत अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. या घटनेची शाई वाळण्या पूर्वीच नागपूर मार्गावर पुन्हा एक अपघात झाला. या अपघातात अमोल गोविंदा भडके या इसमास जीव गमवावा लागला.

     

    सविस्तर असे की शनिवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजे दरम्यान वडगाव प्रभागातील मित्र नगरचे रहिवासी 47 वर्षीय अमोल भडके व त्यांच्या दोन मित्रांना अंजीर-टिव्हीएस शोरूम कडे जायचे होते. नागपूर मार्गावरील दुभाजक ओलांडण्याकरिता हे तिघे दुभाजकाजवळ उभे असताना जनता कॉलेज चौकाकडून येणाऱ्या दुचाकीने अमोल भडकेला जोरात धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. रोजमजुरी करणाऱ्या अमोल भडके यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असून कर्ता पुरुष गमावल्यामुळे या अपघाताने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले.

     

    शहरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जड वाहतुकीमुळे नागपूर मार्ग, बंगाली कॅम्प-मूलमार्ग व बायपास मार्ग धोकादायक झालेला आहे. या मार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये आजपावतो अनेक नागरिकांचा नाहक बळी गेला.

     

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रस्तावित रिंगरोडबाबत वादग्रस्त निर्णय झाला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प रद्द केल्याने शहर अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले. या निर्णयामुळे रहिवाशांमध्ये चिंता वाढली आहे, कारण चंद्रपूर हे असंख्य मोठे उद्योगांचे घर आहे आणि त्याच्या वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी योग्य पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे.

     

    रिंग रोड प्रकल्प रद्द केल्याने शहराला मोठा धक्का बसला, विशेषत: जेव्हा त्याला सुनियोजित आणि कार्यक्षम रस्त्यांच्या नेटवर्कची नितांत गरज होती. सध्याच्या रस्त्यांवर आधीच अवजड वाहतुकीचा भार आहे, त्यामुळे अनेकदा अपघात आणि वाहतूक कोंडी होते. योग्य पर्याय न मिळाल्यास भविष्यात शहराला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

     

    प्रस्तावित रिंगरोडमुळे वाहतूक कोंडी तर कमी होईलच शिवाय वाहतुकीसाठी अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम मार्गही उपलब्ध होईल. सुधारित कनेक्टिव्हिटीचा उद्योगांना फायदा होईल, ज्यामुळे जिल्ह्यात आर्थिक वाढ आणि विकास होईल.

     

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करून शहराच्या हिताला प्राधान्य देणे गरजेचे आहे. चंद्रपूरच्या रहिवाशांना त्यांची सुरक्षितता आणि शहराचा विकास सुनिश्चित करण्यासाठी सुनियोजित आणि चांगल्या प्रकारे अंमलात आणलेल्या पर्यायी रिंगरोडची गरज आहे.

    पर्यायी रिंगरोडबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जनविकास सेना या जनहितासाठी काम करणाऱ्या प्रमुख संघटनेने केली आहे. जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे रहिवाशांच्या समस्यांकडे लक्ष वेधून व्यवहार्य तोडगा काढण्याची विनंती मंत्र्यांना केली आहे.

    पर्यायी रिंगरोड नसल्यामुळे शहराच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. योग्य पायाभूत सुविधा नसल्यामुळे अपघात होणे नित्याचेच झाले आहे. सरकारने तातडीने पावले उचलून पर्यायी रिंगरोड उभारणीला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.

    जड वाहतूक, वाहनांची वाढलेली संख्या ,वाहतूक नियंत्रण शाखेत पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ व विविध विभागातील हप्तेखोरी यामुळे चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे.

    मोठ्या ट्रान्सपोर्टर्स सोबत लोकप्रतिनिधींचे आर्थिक हितसंबंध जुडले असल्याने त्यांना अभय दिले जाते.
    या आर्थिक हितसंबंधामुळेच स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी वाहतूक व्यवस्था व अपघाताच्या विषयावर बोलण्याचे टाळत असल्याचा आरोप सुद्धा जनविकास सेनेने केला.