Blog

  • Chandrapur Municipal Corporation corruption | चंद्रपूर मनपाच्या भ्रष्ट कारभाराची ईडी कडे तक्रार

    Chandrapur Municipal Corporation corruption

    Chandrapur Municipal Corporation corruption : चंद्रपूर महानगरपालिकेतील आर्थिक गैरव्यवहारांवर तीव्र प्रकाश टाकत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवर्तन संचालनालय (ईडी) मुख्यालय, दिल्ली येथे तक्रार अर्ज सादर करण्यात आला.

    खड्ड्यात बसून चंद्रपुरात सत्याग्रह आंदोलन

    या तक्रारीत महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्या कार्यकाळात 1,000 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या विविध योजनांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    प्रमुख आरोप:

    • अमृतपाणी योजना फेस 1: टेंडर प्रक्रियेत अपारदर्शकता व अपूर्ण कामांसाठी पूर्ण पेमेंट.
    • अमृत कलश योजना 2: अपूर्ण कामे असूनही निधीचा दुरुपयोग.
    • कचरा संकलन व दलित वस्ती सुधारित योजना: फसव्या निविदा प्रक्रियेमुळे सरकारी निधीची हानी.
    • फाउंटन घोटाळा : निविदा प्रक्रियेत अपारदर्शकता.
    • शहर सौंदर्यीकरणासाठी काढण्यात आलेल्या छोट्या निविदा: निधीचा अपव्यय.
    • ड्रेनेज सिवर घोटाळा

    जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “विपिन पालीवाल यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या प्रत्येक मोठ्या योजनेत भ्रष्टाचाराचे स्पष्ट पुरावे समोर आले आहेत. टेंडर प्रक्रिया पारदर्शकतेने न होणे, अपूर्ण कामांसाठी संपूर्ण निधी देणे आणि जनतेच्या पैशांचा अपव्यय करणे हे त्यांच्या कार्यकाळातील प्रमुख गैरव्यवहार आहेत. हा केवळ आर्थिक भ्रष्टाचार नसून, चंद्रपूरच्या नागरिकांच्या विश्वासाला फसवणूक आहे.” (Chandrapur Municipal Commissioner scam)

    ईडीकडून मिळाले आश्वासन:
    तक्रारीच्या सादरीकरणानंतर ईडी अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर तातडीने लक्ष घालून चौकशी सुरू करण्याचे आश्वासन दिले.

    प्रमुख मागण्या:

    1. चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी.
    2. महानगरपालिकेच्या सर्व योजनांचे लेखापरीक्षण (Audit) करण्यात यावे.
    3. दोषी अधिकारी विपिन पालीवाल आणि इतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

    तक्रार सादर करताना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्यासोबत युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, आदित्य नंदनवार, आणि रोहन गुर्जेवार उपस्थित होते. परंतु, नेतृत्वाच्या आघाडीवर मयूर राईकवार यांनी अत्यंत प्रभावीपणे या मुद्द्याला वाचा फोडली.

    जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी सांगितले की, “चंद्रपूरच्या जनतेच्या पैशांची ही लूट थांबवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. हा केवळ एक राजकीय लढा नाही, तर चंद्रपूरच्या सामान्य जनतेच्या हक्कांचा लढा आहे.”

    आम आदमी पक्षाच्या वतीने हा लढा पुढेही सुरू राहील आणि चंद्रपूरच्या जनतेच्या प्रत्येक पैशाचा हिशोब मागितला जाईल.

  • Chandrapur Satyagraha | चंद्रपुरात खड्ड्यात बसून सत्याग्रह आंदोलन

    Chandrapur Satyagraha

    Chandrapur Satyagraha : 30 जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मनपा प्रशासनविरोधात अनोखं सत्याग्रह आंदोलन पुकारले.

    मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गांधीगिरी, दुकानदार आला वाहनाखाली

    सध्या शहरात सुरू असलेल्या अमृत पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील अंतर्गत रस्ते मनपा ने खोदून काढले आहे, आधीच प्रदूषणाच्या विळख्यात चंद्रपुरातील नागरिक मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र त्यामध्ये अमृत च्या कामाने सर्वत्र धूळ पसरली आहे. (Chandrapur Road Digging Issues)


    मनपाच्या या कामविरोधात माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सत्याग्रह आंदोलन करीत मनपा द्वारे खोदलेल्या खड्ड्यात महात्मा गांधी यांची प्रतिमा घेत सत्याग्रह (Chandrapur Satyagraha Protest) आंदोलन सुरू केले.

    सिडीसीसी बँकेच्या पदभरती बाबत मोठी अपडेट, पदभरती रद्द होणार?


    देशमुख यावेळी म्हणाले की 16 वर्षांपूर्वी प्रशासनाने 100 कोटी रुपये खर्च करीत भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले होते, कंत्राटदाराला पैसे मिळाले मात्र योजना पूर्णतः फसली, आज 16 वर्षांनी पुन्हा 500 कोटींच्या भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होणार आहे, सोबतच अमृत योजनेचे 234 कोटी रुपयांचे काम सुरू झाले असून या कामामुळे नागरिकांना धुळीचा मोठा त्रास होत आहे.


    मनपाने आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला काम दिले असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करीत मनपाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी असे लिखित आश्वासन प्रशासनाने आम्हाला 48 तासाच्या आत द्यावे अन्यथा आम्ही आक्रमक आंदोलन करू असा इशारा देशमुख यांनी यावेळी दिला.

  • Vidarbha Madhyamik Shikshak Sangh | 1 फेब्रुवारीला विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन

    Vidarbha Madhyamik Shikshak Sangh

    Vidarbha Madhyamik Shikshak Sangh : दहावी, बारावी परीक्षा केंद्रासाठी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती आस्थापनेतील केंद्राव्यतिरिक्त इतर अन्य माध्यमिक – उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याबाबतचा निर्णय तात्काळ रद्द करण्याबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयासमोर १ फेब्रुवारी २०२५ रोजी धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

    चंद्रपूर विधानसभेच्या विकासकामांवर उपमुख्यमंत्री पवार सोबत चर्चा

    राज्यमंडळ, पुणेचे अध्यक्ष यांच्या दि. १७/०१/२०२५ रोजीच्या पत्रातील मुद्दा क्र. २ नुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना (आस्थापनाव्यतिरिक्त) अन्य शाळांमध्ये केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करावे यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु, सदर निर्णय या ऐन परीक्षांच्या तोंडावर घेतल्याने शाळा, शिक्षकांची तारांबळ उडेल. सोबतच बाहेरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्राच्या भौगोलिक परिस्थितीची, स्थानिक अडचणींची व आवश्यकतेची पूर्ण माहिती नसल्यामुळे परीक्षा व्यवस्थापनात अडथळा निर्माण होईल.

    एकीकडे शिक्षण विभाग ५ सप्टेंबर रोजी शिक्षकांचा सन्मान करतो तर दुसरीकडे सदर निर्णयावरून राज्यमंडळाचा राज्यातील शिक्षकांवर अविश्वास दिसतो आहे, याचा विचार होणे आवश्यक आहे.

    हा निर्णय अनेक अडचणी निर्माण करणारा ठरतो आहे. त्यामुळे सदर निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे यांच्या मार्गदर्शनात व विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयासमोर १ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

    या धरणे आंदोलनात विदर्भ ज्‍युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन, राज्‍य शिक्षक मंडळ, विभागीय अनु. आ. आश्रमशाळा कर्म. संस्‍कृती संघटना व इतर समविचारी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.

    १ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या धरणे / निदर्शने आंदोलनात नागपूर विभागातील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय / जिल्‍हा / महानगर / तालुका पदाधिकारी, सदस्‍यांनी केले आहे. 

  • Chandrapur Constituency Development | चंद्रपुरातील विकासकामांवर उपमुख्यमंत्री पवार समवेत चर्चा

    Chandrapur Constituency Development

    Chandrapur Constituency Development : चंद्रपूर विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

    या भेटीमध्ये मतदार संघातील विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. आमदार जोरगेवार यांनी मतदार संघातील प्रलंबित विकासकामे, नवीन प्रकल्प आणि आवश्यक निधी यासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांसमोर मागण्या मांडल्या.

    चंद्रपुरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव पूर्ण कारवाईचा आरोप

    या चर्चेदरम्यान, चंद्रपूर मतदार संघातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्याची गरज असल्याचे अजित पवार  यांनी मान्य केले. त्यांनी या विकासकामांना प्राधान्याने मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. विशेषतः रस्ते, पूल, जलसंधारण प्रकल्प, आणि सार्वजनिक आरोग्य सेवांसाठी आवश्यक सुविधा या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील कृषी क्षेत्राच्या सुधारणांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी नवीन योजनांच्या अंमलबजावणीबाबतही सविस्तर चर्चा केली. यामध्ये सिंचन प्रकल्प, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शेतकरी उत्पादने बाजारपेठेत सहज विक्रीसाठी आवश्यक धोरणे राबविण्याची मागणी करण्यात आली.

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पदभरती रद्द होणार?

    औद्योगिक विकासाच्या अनुषंगाने, स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणीही आमदार जोरगेवार यांनी केली. या चर्चेत चंद्रपूर मतदारसंघातील रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला.

    स्थानिक युवकांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी नवीन औद्योगिक संकुले, प्रशिक्षण केंद्रे आणि स्टार्टअप्ससाठी विशेष प्रोत्साहन देण्याबाबत ही चर्चा करण्यात आली. यासोबतच, नागरी सुविधा सुधारण्यासाठी पाणीपुरवठा,  स्वच्छता मोहिमा, कचरा व्यवस्थापन आणि स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रस्तावित प्रकल्पांची माहिती आमदार जोरगेवार यांनी मांडली.

    यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर, मतदार संघातील विकास योजनांना लवकरच गती मिळेल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

  • Chandrapur encroachment | अतिक्रमण हटाव मोहिमेत सुरू झाली गांधीगिरी

    Chandrapur encroachment

    Chandrapur encroachment : चंद्रपूर महानगरपालिका तर्फे आज शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी म्हणजेच गोल बाजारात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र मोठ्या दुकानदारांना सोडून लहान दुकानदारांवर कारवाई करण्यात आल्याने एकाने थेट अतिक्रमण हटाव पथकाच्या वाहनाखाली येत गांधीगिरी आंदोलन सुरू केले, माझे साहित्य मला परत करा अशी मागणी त्या दुकानदाराने केली. मनपाने यावेळी पोलिसांना पाचारण केले होते.

    सिडीसीसी बँकेची नोकरभरती रद्द होणार? मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले कारवाईचे संकेत

    अत्यंत वर्दळ व गर्दीचे ठिकाण असलेले गोल बाजारात यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली मात्र काही काळ लोटल्यावर परिस्थिती जैसे थे झाली.

    29 जानेवारी रोजी चंद्रपूर मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली, रस्त्याच्या कडेला असलेल्या लहान दुकानदार यांच्यावर आधी कारवाई करण्यात आली, मात्र एका लहान व्यापाऱ्याने आमच्यावरचं कारवाई का करता? ज्यांनी अतिक्रमण केलं त्यांच्यावर कारवाई का करीत नाही म्हणून संताप व्यक्त करीत माझे साहित्य मला परत करा असे म्हणत तो व्यापारी अतिक्रमण हटाव पथकाच्या चारचाकी वाहनाखाली येत गांधीगिरी आंदोलन करू लागला.


    गोल बाजारात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, सर्व अतिक्रमण हटले पाहिजे, मात्र कारवाई ही अतिक्रमणाचे नियम न पाळण्यावर झाली पाहिजे, वारंवार लहान व्यापाऱ्यांवर कारवाई केल्या जाते.
    मनपा पथकाने यावेळी पोलिसांना पाचारण केले, 4 ते 5 तास सदर आंदोलन चाललं.

    यावेळी काही काळ गोल बाजार परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यात आली होती.

  • cdcc bank controversial recruitment । सीडीसीसी बँकेची पदभरती रद्द होणार?

    cdcc bank controversial recruitment

    cdcc bank controversial recruitment : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती प्रक्रियेत आरक्षण डावलल्याने आरक्षण बचाव कृती संघर्ष समितीने मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन सुरु केले. १६ जानेवारी पासून समितीचे सदस्य मनोज पोतराजे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. आंदोलन मंडपाला अनेक आमदारांनी भेट दिली मात्र ठोस कारवाई झाली नाही. अखेर माजी मंत्री मुनगंटीवार यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करीत बँकेने आरक्षण डावलत संविधानाचा अपमान केला आहे आम्ही ते खपवून घेणार नाही म्हणत उपोषण कर्त्यांच्या मी पाठीशी आहे अशी ग्वाही दिली.

    सीडीसीसी बँकेविरोधात आपची ईडी कडे तक्रार

    सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत समिती सदस्यांसोबत मुंबई गाठत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांना बँकेतर्फे भरती प्रक्रियेत केलेल्या घोळाची माहिती दिली, आरक्षण संपविण्याची कृती राज्यात चालणार नाही यावर कारवाई करू असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.

    २९ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, बँकेच्या भरती प्रक्रियेवर आपण कारवाई करू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यावर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनोज पोतराजे व रमेश काळबांधे यांना निंबू पाणी पाजत उपोषण मागे घेतले.

  • Complaint against cdcc bank | CDCC बँकेविरोधात आप ची ED कडे तक्रार

    Complaint against cdcc bank

    Complaint against cdcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 360 पदांच्या अवैध भरती प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असून, या संदर्भात आज आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजीव कूडे, युवा सचिव आदित्य नंदनवार आणि रोहन गुजेवार यांनी नवी दिल्ली येथील प्रवर्तन निदेशालयाच्या (ED) मुख्यालयात भेट घेतली.

    या भरती प्रक्रियेत मागासवर्गीयांचे (SC, ST, OBC) आरक्षण काढून टाकण्यात आले असून, 31,000 पेक्षा जास्त उमेदवारांपैकी केवळ तीन जिल्ह्यांतील (चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ) उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, निवड झालेले उमेदवार बँकेशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे. या प्रक्रियेत 25 ते 40 लाख रुपयांची लाच देऊन उमेदवारांची निवड केल्याचे गंभीर आरोप आहेत.

    चंद्रपूर पोलीस दलाचा तक्रार निवारण दिन

    यासंदर्भात आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने प्रवर्तन निदेशालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन दिले. त्यांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

    आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी म्हटले की, “ही भरती प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आणि अपारदर्शक असून, चंद्रपूरच्या सामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य उध्वस्त करण्याचा डाव आहे. आम्ही ही भरती प्रक्रिया ची चोकशी आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच ठेवू.”

    आम आदमी पक्षाने हा प्रश्न सार्वजनिक पातळीवर नेण्याचा निर्धार केला आहे आणि या भरती प्रक्रियेतील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

  • Pushpa 2 on Netflix । ३० जानेवारीला पुष्पाराज येणार ओटीटी वर

    Pushpa 2 on Netflix

    Pushpa 2 on Netflix : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu arjun) चित्रपट पुष्पा 2 च्या ओटीटी रिलीजबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. मात्र, यात एक मोठा ट्विस्ट आहे – पुष्पा: द रूल हा चित्रपट हिंदी भाषेत ऑनलाइन रिलीज केला जाणार नाही. त्यामुळे पुष्पा 2 च्या हिंदी ओटीटी रिलीजबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. चला, जाणून घेऊया की हा चित्रपट हिंदीत कधी आणि कुठे स्ट्रीम केला जाईल.

    ग्रामीण भागातील कलाकारांचा मराठी चित्रपट काजू

    अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर हा ऍक्शन-थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच धमाकेदार यश मिळवत आहे. भारतासह संपूर्ण जगभरात पुष्पा 2 ने ऐतिहासिक कमाई केली आहे. मेकर्सनी अलीकडेच पुष्पा 2 च्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा केली आहे. रीलोडेड व्हर्जन मध्ये हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम केला जाईल, पण हिंदी भाषिक प्रेक्षकांना अजून थोडी वाट बघावी लागणार आहे.

    5 डिसेंबर 2024 रोजी पुष्पा 2 सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि 55 दिवसांनंतरही हा चित्रपट थिएटरमध्ये जबरदस्त कमाई करत आहे. मैत्री फिल्म्स ने 2 दिवसांपूर्वी पुष्पा 2 च्या ओटीटी रिलीजची घोषणा केली.

    ➡️ 30 जानेवारी 2025 पासून हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत नेटफ्लिक्स (netflix) वर स्ट्रीम केला जाईल.
    ➡️ हिंदी प्रेक्षकांना मात्र फेब्रुवारीच्या मध्यावर हा चित्रपट पाहता येईल. कोईमोई च्या रिपोर्टनुसार, पुष्पा 2 (हिंदी) नेटफ्लिक्सवर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

    17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये सर्व भाषांमध्ये पुष्पा 2 च्या रीलोडेड व्हर्जन रिलीज करण्यात आले, ज्यामध्ये 23 मिनिटांचे एक्स्ट्रा फूटेज समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ओटीटीवर हा चित्रपट 3 तास 44 मिनिटांचा असेल.

    2021 मध्ये जेव्हा पुष्पा: द राइज (पार्ट 1) रिलीज झाला होता, तेव्हा अमेझॉन प्राइम व्हिडिओ (amazon prime video) कडे त्याचे डिजिटल राइट्स होते. पण, तेव्हा हिंदी वगळता इतर भाषांमध्येच चित्रपट प्राइम व्हिडिओवर आधी स्ट्रीम करण्यात आला होता आणि हिंदी रिलीज नंतर झाली होती.

    आता पुष्पा 2 चे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सकडे आहेत. त्यामुळे हिंदीमध्येही हा चित्रपट नेटफ्लिक्सवरच येणार आहे, पण थिएटरमधील यश पाहता मेकर्सनी हिंदी ओटीटी रिलीज लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Grievance Redressal Day | तक्रार निवारण दिनी पोलीस अधिक्षकापुढे आल्या 8 तक्रारी आणि…

    Grievance Redressal Day

    Grievance Redressal Day : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे, त्याचप्रमाणे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक विभागाने 100 दिवसांचा आराखडा तयार करून ठोस कामगिरी करावी याकरिता चंद्रपूर पोलीस दलाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये जनसामान्य नागरिकांच्या समस्येचे निराकरण व्हावे यासाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले.

    तक्रार निवारण दिनाला स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी हजेरी लावत शांतता कमिटी ची बैठक घेतली, बल्लारपूर शहरात शांतता व सुव्यवस्था कश्या पध्दतीने राखल्या जाईल याबाबत मार्गदर्शन व सुचना करण्यात आल्या.

    चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यात वाघाने घेतला तिघांचा बळी

    शांतता कमिटी च्या बैठकीनंतर पोलीस पाटलांसोबत पोलीस अधिक्षकांनी संवाद साधला, यावेळी नवीन कायदे, रस्ता सुरक्षा, महिला व बालकांविरुद्ध सुरक्षा तसेच गुन्ह्याबाबत, सायबर जागृती बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

    यावेळी पोलीस अधिक्षकांसमोर 8 वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या, सर्व तक्रारदाराचे म्हणने ऐकत पोलीस अधिक्षकांनी त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले, तक्रारदारांनी यावेळी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे आभार मानले, तक्रारींचे निवारण झाल्याबाबत समाधान व्यक्त करीत स्वतः पोलीस अधिक्षकांनी आमच्या तक्रारी ऐकत त्याचं निराकरण केलं ही एक चांगली बाब असल्याचं तक्रारदारांनी म्हटलं.

  • chandrapur district tiger attack | वाघाने गुराख्याला केले फस्त, महिन्यातील तिसरा बळी

    chandrapur district tiger attack

    chandrapur district tiger attack : गायी, म्हशी आणि शेळ्या चराईसाठी जंगलात घेऊन गेलेल्या एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. त्याच्या पार्थिवाचे अवशेष बफर झोनच्या कक्ष क्रमांक 756 मधिल नियत क्षेत्र काटवन मध्ये मंगळवारी सकाळी सापडले. मॄत गुराख्याचे नाव बंडू चिंधुजी कोल्हे असे आहे. 55 वर्षीय गुराखी मूल जवळील रामपुर या गावातील रहिवासी होता.

    या घटनेने गावात खळबळ उडाली. मानव वन्यजीव संघर्षात आणखी एक गुराखी बळी पडल्याने जनावरांच्या चराईचा प्रश्न ऐरणीवर सापडला आहे. नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा हा तिसरा बळी आहे.

    चंद्रपुरात सट्टा मटक्याची अलिखित परवानगी


    नेहमी प्रमाणे बंडू कोल्हे हे रामपूर आणि मूल येथील जनावरे व शेळ्या घेऊन जंगलात चराईसाठी सोमवारी सकाळी गेले होते. त्याच्यातील काही शेळ्या भटकल्याने ते शोधात होते. दरम्यान त्यांनी आपल्या पत्नीशी संवाद साधून शेळ्या घरी आल्या काय याबाबत विचारपूस केली होती.

    रामपूर ते करून काटवन हा बफर झोनचा परिसर घनदाट जंगलाचा आहे. या परिसरात वाघाचे मोठे वास्तव्य आहे. शेळ्या च्या शोधात गुराखी जंगलात असताना त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. संध्याकाळी गायी, म्हशी आणि शेळ्या न चुकता घरी परतल्या. मात्र, बंडू कोल्हे घरी परत आलेला नव्हता. त्यामुळे पत्नीने गावात ही माहिती दिली.

    वनविभागाला सूचना देण्यात आली. मूल येथील बफर झोनचे अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांनी जंगलात शोध मोहीम राबवली. संध्याकाळ पर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नाही. घनदाट जंगल आणि अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. मंगळवारी सकाळी शोध मोहीम राबवली असता कक्ष क्रमांक 756 मध्ये त्याचे अवशेष सापडले. वाघाने ठार मारून बंडू चे शरीर पूर्ण फस्त केले होते. फक्त शरीराचे हाडे तेवढी शिल्लक होती.

    घटना स्थळी त्याची काठी आढळून आली. सापडलेली हाडे मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आली. ती हाडे डीएनए साठी पाठविण्यात येणार असल्याचे बोलले जाते. रामपूर आणि घटना स्थळी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गांनी भेट देऊन पाहणी केली. मॄतकाच्या कुंटुबियांना वनविभागाच्या वतीने तात्काळ वीस हजार रुपयांची मदत करण्यात आली.


    मानव वन्यजीव संघर्षाचा रामपूर गावाला मोठा हादरा बसला आहे. याआधी सुद्धा रामपूर, चिचोली या गावातील गुराखी वाघाच्या हल्ल्यात बळी पडलेली आहेत. मूल तालुक्यातील वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराखी बांधवामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

    वाघाच्या हल्ल्यात तिसरा बळी

    14 जानेवारीला बल्लारपूर येथे बांबू कामगाराला वाघाने ठार केले होते, त्यानंतर चिमूर येथे 25 जानेवारीला गुराख्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले, आणि 27 जानेवारीला मूल येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाला. जानेवारी महिन्यात वाघाने तिघांचा बळी घेतल्याने जिल्ह्यात दहशतीचे वातावरण आहे.