MNS protest against potholes
MNS protest against potholes : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस नागपूर महामार्गावरील खड्डेमय रस्त्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पडोली येथे अनोखे आंदोलन केले. पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि अनेकांना जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे अखेर मनसेने स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
“आमची मागणी आहे स्पष्ट, खड्डे करा नष्ट” अशा घोषणा देत, मनसेच्या कार्यकर्त्यांनी “स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली, तरीही खड्ड्यांसाठी अजूनही सुरू आहे आमचा संघर्ष” अशा आशयाचे टी-शर्ट परिधान करून आपला निषेध नोंदवला.
फक्त मलमपट्टी
मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी सांगितले की, अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. केवळ डागडुजी करून नागरिकांच्या त्रासावर मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त करावेत, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगूलवार, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Leave a Reply