Tag: News34 chandrapur

  • GMC मधील परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू

    News34

     

    चंद्रपूर – चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात परिचारिकेच्या मृत्यूनंतर परिचारिका संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सीमा मेश्राम नावाची ही परिचारिका प्रसूती कक्षात सेवा देत होती. मात्र कामाच्या अतिताणामुळे या परिचारिकेला 16 ऑगस्ट रोजी भोवळ आली. तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र आपल्याच सहकारी परिचारिकेवर योग्य उपचार करण्यात इथले स्थानिक डॉक्टर अपयशी ठरले.

    परिणामी उपचारातील हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला. ही वार्ता परिचारिका वर्गात पसरताच त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने देखील या आंदोलनात त्यांना सहभाग देत पाठिंबा दिला. सीमा मेश्राम या परिचारिकेच्या मृत्यूसंबंधी जबाबदार डॉक्टर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिचारिका संघटनेने केली आहे.

    16 ऑगस्टला परिचारिका कामाच्या तणावात असताना तिला भोवळ आली, रात्री पासून ते सकाळ पर्यंत तिच्यावर कसलाही उपचार करण्यात आला नाही, त्यामुळे मेश्राम यांचा मृत्यू झाला.

    याबाबत सविस्तर माहिती घेतली असता अधिष्ठाता यांनी दोषी डॉक्टर वर कारवाई करणेकरिता चौकशी समिती नेमली आहे, चौकशी पूर्ण झाल्यावर कारवाई करण्यात येईल, सध्या परिचारिका यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून त्यांच्या जागी शिकाऊ परिचारिका यांना पाचारण करण्यात आले आहे.

    चंद्रपुरात वाजागाजा करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती, मात्र उपचाराच्या नावावर रुग्णांची हेळसांड ही रोजची बाब झाली आहे, अनेक रुग्ण विविध आजाराने ग्रस्त होऊन चांगला उपचार मिळावा यासाठी वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल होतात मात्र शासकीय काम ज्या पध्दतीने केल्या जाते त्याच पद्धतीने याठिकाणी उपचार होतो, चंद्रपुर जिल्ह्यात अनेक नेते, मंत्री होऊन गेले मात्र आरोग्याच्या दृष्टीने सर्वांच काम हे शून्य आहे.

  • रविवारी मूल येथे भव्य आरोग्य व रक्तगट तपासणी मोफत औषध वितरण शिबीर

    News34

    गुरू गुरनुले

    मूल : श्री माॅ दुर्गा मंदिर सेवा समिती मूल आणि संतोषसिंह रावत मित्र परिवार मूलच्या वतीने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था सावंगी मेघे, जनरल मेडीकल प्रॅक्टीशनर असोसिएशन मूल आणि सावली, केमीस्ट अँण्ड ड्रगीस्ट असोसिएशन मूल आणि चंद्रपूर जिल्हा मेडीकल लॅबोरेटरी टेक्नाॅलाॅजीस्ट असोसिएशन आणि मुल तालुका काँग्रेसच्या सहकार्याने कार्ये जनकल्याणकारी, सामान्य जनतेच्या दारी हे ब्रिद डोळयासमोर ठेवून रविवार दिनांक 20 आँगस्ट 2023 रविवारला नवभारत विद्यालय मूल येथे आरोग्य तपासणी, मोफत औषध वितरण व रक्तगट तपासणी शिबीर आयोजीत करण्यांत आला आहे.

    आयोजीत शिबीरात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालय सावंगी मेघे येथील ५६ तज्ञ डॉक्टर्सची टीम यात जनरल फिजीशियन, बालरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, दंत रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्र रोग ,मानसोपचार तज्ञ आणि त्वचारोग तज्ञ रूग्णांवर विनामूल्य उपचार करणार असून शिबिरात ब्लड प्रेशर, ई.सी.जी. मेमोग्राफी, ब्लड शुगर, सर्व प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या, गर्भवती माता व स्तनदा मातांची तपासणी, सिकलसेल चाचणी, बाहय रूग्ण सेवा आणि त्वचा आजावर वैद्यकिय सुविधा आणि विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी तयार केलेले फिरते कॅन्सर रूग्णालय बाहय रूग्णांच्या सेवेकरीता उपलब्ध राहणार आहेत.

    शिबीरात आरोग्य तपासणी सोबतचं पात्र लाभाथ्र्यांचे आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, ई गोल्डन कार्ड, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड सुध्दा काढण्यांत येणार असून शिबिरा मध्यें डेंग्यु, क्षयरोग, मधुमेह, कॅन्सर आदि विविध आजारांची माहिती पत्रक तसेच आजाराबाबतची जनजागृती तसेच समुपदेशन करण्यांत येणार आहे. आयोजीत शिबिरात दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत मेडीकल लेबाॅरेटरी टेक्नालाॅजीस्ट असोसिएशनच्या सहकार्याने विनामूल्य रक्तगट व सिकलसेल तपासणी करून मिळणार आहे. परिसरातील गरजु नागरीकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्या. या उद्देशाने आयोजीत करण्यांत आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वितरण करण्यात येणार आहे. तसेच गरीब व गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात येईल तरी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिराचे मुख्य संयोजक दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी डाॅ. अभ्युदय मेघे आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माॅ दुर्गा मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केले आहे.

    कार्ये जनकल्याणकारी, सामान्य जनतेच्या दारी हे ब्रिद डोळयासमोर ठेवून 20 आँँगस्ट रोजी आयोजीत करण्यांत आलेल्या आरोग्य व रक्तगट तपासणी आणि मोफत औषध वितरण शिबिरात तालुक्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी. यासाठी संतोषसिंह रावत मित्र परीवारातील सर्व सदस्य काँग्रेस व कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी उत्साहाने कामाला लागले असून युवक आणि महिला कार्यकर्ते घरोघरी भेट देऊन शिबिराचा प्रचार करीत आहेत.

  • चंद्रपूर शहरातील हा भाग पुन्हा पाण्याखाली जाणार

    News34

    चंद्रपूर- दि.18 जुलै रोजी संपूर्ण शहर जलमय झाले असतांना सर्वात जास्त फटका बसला तो चांभारकुंडी नाला वाहत जात असलेल्या तुकूम,वडगाव,नगीनाबाग प्रभागाला हा मोठा नाला वाहत जात रहमत नगर सिवरेज ट्रीटमेन्ट प्लांट मागे इरई नदीत मिळतो.

    चंद्रपूर महापालिकेच्या थातूर-मातुर पद्धतीने नाल्याचे खोलीकरण-सफाई,अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहाराने नाल्यावर व रस्त्यावर झालेल्या अतिक्रमनाने या प्रभागांना सर्वात जास्त फटका 18 व 28 जुलै रोजी बसला. दि.18 ऑगस्ट पासून विदर्भात ऑरेंज अलर्ट घोषित झाल्या नंतर पुन्हा शहरातील काही भाग बुडण्यास कारणीभूत ठरणार आहे.

    ट्रेंटमेन्ट प्लांट जवळील चांभारकुंडी नाल्यावर पुन्हा माती टाकून तयार करीत असलेला हा 20 फूट रुंद व 40 फूट लांब रपटा. जो नाल्या पलीकडील ट्रीटमेन्ट प्लांट मध्ये अवजड यंत्र सामुग्री,जड वाहतूक करणारे आयवा-ट्रक,पोकलन व jcb मशीन व कामगार-कर्मचारी यांचे वाहन यांना जाने सुलभ करण्यासाठी ठेकेदार बनवीत आहे. परंतु पावसाळा अजून बाकी असतांना व अलर्ट असतांना हे कृत्य म्हणजे अगोदरच पुराचा फटका सोसलेल्या तुकूम,वडगाव,नगीनाबाग प्रभागातील जनतेला पुन्हा पुराचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

    प्रशासनाने पुरास पुन्हा कारणीभूत ठरणारा चांभारकुंडी नाल्यात माती टाकून बनविलेला रपटा त्वरित हटवावा अशी मागणी इरई बचाव जनआंदोलनाचे संयोजक व वृक्षाई चे संस्थापक कुशाब कायरकर यांनी केली आहे.अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • माजी सैनिक व स्वच्छता मित्राचा सन्मान

    News34

    गुरू गुरनुले

    मुल – स्वातंत्र्यासाठी ज्या विरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नेफडो परिवार मुलच्या वतीने आपली सेवा पुर्ण करुन आलेल्या वरिष्ठ माजी सैनिक सहदेवजी रामटेके, मदनजी येडट्टीवार, मारोतीजी कोकाटे, लक्ष्मणजी निकुरे, बाबा सुर यांचा सपत्नीक, माजी सैनिक पत्नी श्रीमती सुगंधाबाई खोब्रागडे, श्रीमती नलिनी मेश्राम आणि २०१७ पासून प्रत्यक्ष कृतीतुन स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे स्वच्छता मित्र गौरव शामकुळे यांचा नवभारत कन्या विद्यालय मुल येथे शाल, सन्मान चिन्ह आणि रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.

    स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या विरांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ७५ दिवे लावुन कार्यक्रमाची सुरुवात केली.
    त्यानंतर वृक्ष पुजा, वृक्ष प्रतिज्ञा, आणि देशभक्तीपर गीत घेण्यात आले.

    कार्यक्रमाचे अध्यक्षा सन्मा.तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा तसेच प्रमुख पाहुणे श्रीकांत समर्थ पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता नगर परिषद मुल, अशोक झाडे मुख्याध्यापक नवभारत मुल, रत्नमाला भोयर नागपूर विभाग सल्लागार तथा माजी नगराध्यक्षा, गुरुदास चौधरी सहसचिव नागपूर विभाग आणि अल्का राजमलवार मुख्याध्यापिका नवभारत कन्या विद्यालय मुल तथा चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

    मनोगतात सत्कारमूर्ती आणि त्यांच्या पत्नींनी सेवेत असतानाचे आलेले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिरा शेंडे मुल तालुका अध्यक्षा आणि कल्पना मेश्राम मुल तालुका संघटिका यांनी तर आभार प्रदर्शन किसन खोब्रागडे मुल तालुका संघटक यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेफडो परिवाराने परिश्रम घेतले.

    याप्रसंगी तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, नागपूर विभाग सल्लागार रत्नमाला भोयर, रत्ना चौधरी नागपूर विभाग अध्यक्षा, ललिता मुस्कावार नागपूर विभाग उपाध्यक्षा, श्रीरंग नागोसे नागपूर विभाग उपाध्यक्ष, कविता मोहुर्ले नागपूर विभाग सचिव, गुरुदास चौधरी नागपूर विभाग सहसचिव, अल्का राजमलवार चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा, राकेश ठाकरे चंद्रपूर जिल्हा युवा उपाध्यक्ष, बबिता गेडेकर चंद्रपूर जिल्हा संघटिका, स्मिता बांडगे चंद्रपूर जिल्हा संघटिका, मिरा शेंडे मुल तालुका अध्यक्षा, कुमुदिनी भोयर मुल तालुका युवती अध्यक्षा,राखिता नागोसे मुल तालुका युवती सचिव, मुल तालुका संघटिका नंदा शेंडे , माधुरी गुरनुले, वंदना गुरनुले,इंदु मांदाडे, कल्पना मेश्राम, शशिकला गावतुरे, सुनिता खोब्रागडे, यशवंत देवगडे,किसन खोब्रागडे सुजाता बरडे,मुल शहर सचिव नितु कटकुरवार, मुल शहर संघटीका सपना निमगडे, पर्यावरण प्रेमी शेंडे सर,मांदाडे सर,गेडेकर सर,साधना चिताडे मॅडम उपस्थित होते.

  • पुराचं पाणी घरात आलं पण मदत…

    News34

    चंद्रपूर – वडगाव प्रभाग तसेच चंद्रपूर शहरातील अनेक पूरपीडित नागरिक मदतीपासून वंचित आहेत.पूरग्रस्त भागातील काही नागरिकांचा सर्व्हे झाला पण मदत मिळाली नाही व काही भागांमध्ये सर्व्हेच झालेला नसल्याने अनेक पूरपीडितांना अजूनपावेतो शासनाची मदत मिळालेली नाही.

    सर्व पूरपिडित नागरिकांना तातडीने मदत देण्यात यावी व ज्या पूरग्रस्त नागरिकांचा सर्वे झालेला नाही त्यांचा तातडीने सर्वे करण्यात यावा अशी मागणी जनविकास सेने तर्फे करण्यात आलेली आहे.

    जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिनांक 17 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन मदतीपासून वंचित असलेल्या पूरपिडित नागरिकांची व्यथा मांडली. यावेळी जनविकास सेना महिला आघाडी प्रमुख मनिषा बोबडे, युवा आघाडीचे अध्यक्ष अक्षय येरगुडे,इमदाद शेख, प्रफुल बैरम,आकाश लोडे, कांचन चिंचेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

    वडगाव प्रभागातील दत्तनगर नगर, नानाजी नगर,ओम भवन, चांद टेकडी,मित्र नगर, अपेक्षा नगर, साई मंदिर,आंबेडकर भवन,स्नेह नगर,बापट नगर ,विकास केंद्र, गजानन मंदिर,हवेली गार्डन,लक्ष्मी नगर,वडगाव जुनी वस्ती इत्यादी परिसरातील शेकडो घरांमध्ये 19 जुलै व 28 जुलै असे दोन दिवस अचानक आलेल्या पावसाने पुराचे पाणी शिरले.

    चंद्रपूर शहरातील नगीनाबाग प्रभाग, पठाणपुरा,जलनगर, अष्टभुजा अशा अनेक परिसरामध्ये 19 जुलै रोजी पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे हजारो नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. वडगाव प्रभाग तसेच चंद्रपूर शहरातील अशा सर्व पूरपीडित नागरिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी जनविकास सेनेने केलेली आहे.

    पालकमंत्र्यांनी पुन्हा एकदा क्विक अॅक्शन घ्यावी..

    जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क्विक अॅक्शन घेऊन पूरपीडित नागरिकांना
    शासनाची आर्थिक मदत मिळवून दिल्याचा दावा भाजपच्या स्थानिक शाखेने केला होता.पालकमंत्र्यांनी क्विक अॅक्शन घेऊनही हजारो पुरग्रस्त मदतीपासून वंचित आहेत. त्यांच्या क्विक अॅक्शनचा प्रशासनावर परिणाम झालेला नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा क्विक ॲक्शन घेऊन मदतीपासून वंचित शहरातील हजारो पुरग्रस्तांना मदत मिळून द्यावी असे आवाहन पप्पू देशमुख यांनी केलेले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यात पट्टेदार वाघाने केली गाईची शिकार

    News34

    गुरू गुरनुले

    मूल- मुल येथील अंतरगाव पारडवाही शेत शिवारात अरुण श्रावण चौखुंडे यांचे स्वतःचे शेतात दि. १४ ऑगस्ट ला पट्टेदार वाघीण दोन पिल्लासह मूल हेटी येथील रहिवासी लक्ष्मण पाटील चौखुंडे यांची गायीवर हल्ला करून ठार केले.

    या ठिकाणावरून अगदी किलोमीटर च्या आत शहर लागून असून संपूर्ण परिसर परिसर धान शेत असल्याने जंगल झाडे नाहीत पूर्ण खाली आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रात्रंदिवस फिरत असतात, त्यामुळे वाघ रात्रीच्या वेळेस गावात येणेही टाळता येत नाही.

    सदर घटनेमुळे शहराच्या शेवट वास्तव्यास असलेल्या घरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात धान शेत असल्याने रात्रौ पर्यंत शेतकरी शेतात ये जा करत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    अशा घटनाकडे वनविभागाने विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा अनुचित प्रकार टाळता येणार नाही.

  • वन नेशन वन प्रॉडक्ट अंतर्गत चंद्रपूर रेल्वे स्टेशनवर सोवनियर शॉपचे उदघाटन

    News34

    चंद्रपूर :  स्थानिक उत्पादित मालाला देशपातळीवर व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना साकारण्यात आली. या अंतर्गत बांबू कारागीर आणि स्वयंसहायता गटामधील महिलांच्या बांबू हस्तकलेला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि रेल्वे स्टेशन, चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे सोवनियर शॉपचे (बांबुच्या शोभिवंत वस्तुचे दुकान) उद्घाटन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे संचालक एम. एस. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले.

     

    चंद्रपूर आणि गडचिरोली येथे बांबू आणि त्यावर आधारीत हस्तकलेला विशेष महत्त्व असून या क्षेत्राशी असंख्य बांबू कारागीर आणि स्वयंसहायता गटामधील महिला जुळून आहेत.  या सोवनियर शॉपच्या माध्यमातून त्यांच्या हस्तकलेस व्यासपीठ मिळाले आहे. याबाबत कार्यक्रमस्थळी उपस्थित महिलांनी आनंद व्यक्त करून तिनही विभागाचे आभार मानले.

     

    यावेळी बांबू केंद्राचे संचालक अविनाश कुमार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. काठोळे, रेल्वे स्टेशन मॅनेजर श्री. देवगडे, कमर्शियल निरीक्षक श्री. मिश्रा, श्री. चंदेलकर, खुशिया लोकसंचालित समूह महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनिता गनफाडे तसेच तिनही विभागाचे अधिकारी, कर्मचारी,  बचत गटाच्या महिला, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • चंद्रपूर मनपाने नागरिकांसाठी सुरू केली ही सेवा

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेने व्हॉट्सॲपवर एक चॅटबॉट सेवा सुरू केली असुन यामुळे नागरिकांना एनओसी प्रमाणपत्रे, विविध परवानग्या, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी अर्ज करणे, तक्रारी नोंदवणे यासारख्या विविध सेवा आणि माहिती आता व्हॉट्सॲपवर मिळू शकेल. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन मा. पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी सदर चॅटबॉट सेवेचे उदघाटन करण्यात आले.

    व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर लोकप्रिय व्हॉट्सॲप मेसेजिंग ॲपद्वारे नागरीकांशी संवाद साधण्यासाठी करण्यात येतो. ही सेवा नागरिकांपर्यंत शासनाच्या तसेच मनपाच्या विविध योजनांचा आणि सेवांचा लाभ पोहचविण्याच्या उद्देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या सेवेअंतर्गत नागरिकांनी मनपाच्या व्हॉट्सॲप नंबर (8530006063) वर “hi” टाईप करून पाठविले तर , पुढील माहिती आपोआप येणे सुरु होते. नागरिकांना केवळ व्हॉट्सॲपवर मिळालेल्या सूचनांना प्रतिसाद द्यावयाचा असतो.

    चंद्रपूर महापालिकेने सुरु केलेल्या व्हॉट्सॲप चॅटबॉट या सेवेत आता नागरिकांशी निगडीत १३ सेवा उपलब्ध केल्या आहेत. महापालिकेच्या विभागांमार्फत अनेक सेवासुविधा दिल्या जातात. यामध्ये नागरी सेवा सुविधा, परवाना काढणे, परवानगी घेणे, विविध दाखले, ना हरकत प्रमाणपत्र, तक्रार अशी अनेक प्रकारची माहिती नागरिकांना सहजपणे या व्हॉट्सअप चॅट बॉट सेवेच्या माध्यमातून २४ तास मिळू शकेल. नागरिकांना या सुविधा चंद्रपूर पालिकेच्या 8530006063 या व्हॉट्सॲप नंबरवर उपलब्ध आहेत.

    1.  तक्रार नोंदविता येणे शक्य
    2.  मनपा तक्रार निवारण मोबाइल ॲप डाउनलोड करता येईल
    3.  संपर्क साधणे शक्य
    4.  मालमत्ता कर भरणे
    5.  पाणी कर भरणे
    6.  व्यापार/व्यवसाय परवाना नोंदणी
    7.  जन्म प्रमाणपत्र विनंती
    8.  मृत्यू प्रमाणपत्र विनंती
    9.  विवाह नोंदणी विनंती
    1०. पाळीव प्राणी परवानगी
    12. होर्डिंग /जाहिरात परवानगी
    13. बेकायदेशीर होर्डिंगची तक्रार

    Chat Boat ( चॅटबॉट ) चे फायदे –

    1. सेवा २४×७ सेवा उपलब्ध असते.
    2. त्वरित प्रतिसाद मिळतो.
    3. उत्तरांमध्ये सातत्य.
    4. वैयक्तिकरण.
    5. मानवी मदतीशिवाय आदेश देता येतो.
    6. वेळेची बचत.
    7. एकाच वेळेस अनेकांशी संवाद करणे शक्य.

  • दादमहल वार्डात मनपाच्या आरोग्य वर्धिनी केंद्राचे उदघाटन

    News34

    चंद्रपूर –  भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पुर्ण केली असतांना शासनाद्वारे विविध आरोग्यदायी योजना यशस्वीपणे राबविल्या जात असुन आरोग्य या मुलभुत सेवेसाठी दर्जेदार व्यवस्था उभारण्यास नेहमीच कटीबद्ध राहणार असल्याचे मा.पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगीतले.

    चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दादमहल येथील डॉ. जाकीर हुसेन उर्दु प्राथमिक शाळा येथील मनपा आरोग्यवर्धिनी केंद्राचे उदघाटन मा.पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, आज शासनाद्वारे ग्रामीण तसेच शहरी भागातील आरोग्य सेवा सक्षम केल्या जात आहेत. उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात ७०० ठिकाणी सुरु केले जात आहेत.

    केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्मान भारत योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत महात्मा फुले आरोग्य सेवेचे विमा संरक्षण हे दीड लाखांपासून ५ लक्ष पर्यंत वाढविण्यात आले आहे. घराजवळ आरोग्य वर्धिनी केंद्र उपलब्ध होत असल्याने आता कुणालाही आर्थीक परिस्थितीमुळे आजार अंगावर काढण्याची गरज नाही. या आरोग्य विम्याच्या माध्यमातून खाजगी व सरकारी रुग्णालयांच्या सहाय्याने एकूण १२०९ उपचार व शस्त्रक्रियांवर मोफत सेवा रुग्णास देण्यात येत असुन गरीब व गरजुंना आरोग्य सेवेचा लाभ योग्य प्रकारे दिला जात आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे दादमहल येथील नवीन आरोग्यवर्धिनी केंद्र मिळुन एकूण १२ केंद्रे सुरु करण्यात आली आहे. या केंद्रांवर बाह्यरुग्ण सेवा,मोफत औषधोपचार,मोफत तपासणी,गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण,फोनद्वारे आरोग्य सल्ला देणे इत्यादी आरोग्य सेवा देण्यात येतात.

    या प्रसंगी मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल,उपायुक्त अशोक गराटे ,उपायुक्त मंगेश खवले, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता अनिल घुमडे, विजय बोरीकर, रविंद्र हजारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार,माजी उपमहापौर राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे,माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे, डॉ. आविष्कार खंडारे उपस्थीत होते.

  • देशात व राज्यात कांग्रेसला अच्छे दिन – नितीन राऊत

    News34

    चंद्रपूर – राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणावर विश्वासहर्ता नाही, प्रत्येक वेळी पवारांच्या भूमिकेवर संभ्रमाची स्थिती असते अशी प्रतिक्रिया आमदार नितीन राऊत यांनी चंद्रपुरात दिली.

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा निरीक्षक कांग्रेसचे वरिष्ठ नेता आमदार नितीन राऊत व लोकसभा समनव्यक मोजीब पठाण हे चंद्रपूर जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी आले होते.

    राज्यातील कांग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे चंद्रपूर लोकसभेची जागा रिकामी झाली, लोकसभा पोट निवडणुक लागण्याआधी कांग्रेसने निवडणुकीची पूर्व तयारी सुरू केली आहे.

    लोकसभा क्षेत्राचा आढावा घेतल्यावर नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्दे मांडले.

    सध्या देशात व राज्यात कांग्रेसला अच्छे दिन आले आहे, 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण म्हणजे निरोपीय भाषण होते, देश व राज्यातील कांग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याची इच्छा असून यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहे.

    शरद पवार यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला असता राऊत यांनी राजकारणात पवार यांच्या विश्वासहर्ता नसल्याचे म्हटले आहे, दरवेळेस त्यांच्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होतो, सध्या त्यांनी अजित पवार सोबत गुप्त बैठक घेतल्याने कांग्रेस सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे, पण शरद पवार शेवटपर्यंत महाविकास आघाडी मध्येच राहतील असा आम्हाला विश्वास असल्याचे म्हटले.
    राज्याला चंद्रपूर जिल्ह्यातून विरोधी पक्षनेता मिळाल्याने त्याचा लाभ राज्याला नक्कीच मिळेल अशी भावना राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

    चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आम्ही समजून घेतल्या असून लोकसभा नंतर विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतल्या जाणार त्यानंतर हा सर्व अहवाल पक्ष श्रेठीकडे सादर केल्या जाणार आहे.

    पत्रकार परिषदेत कांग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, वरिष्ठ नेते विनोद दत्तात्रय, कांग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, महिला शहर अध्यक्ष चंदा वैरागडे यांची उपस्थिती होती.