Tag: Inspiring Stories of Unexpected Winners

  • Inspiring stories of unexpected winners । संघर्षातून यशाकडे, अडचणींवर मात करून चमकलेले विजेते

    Inspiring stories of unexpected winners

    Inspiring stories of unexpected winners : चंद्रपूर (२६ ऑगस्ट २०२५) – कोणत्याही खेळाला पैशाची श्रीमंती लागत नाही, प्रतिष्ठेचा दिमाख लागत नाही. लागतं ते फक्त जिद्दीचं आभाळ आणि मेहनतीचं क्षितिज. चंद्रपूरच्या जय शीतला माता गोविंदा पथकाने हेच दाखवून दिलंय. त्यांची गोष्ट ऐकल्यावर वाटतं, खरंच, स्वप्नं पाहण्यासाठी डोळ्यांत फक्त आत्मविश्वास असावा लागतो, बाकी सगळं आपोआप जुळून येतं.

    बाबुपेठ येथील सोनझारी मोहल्ल्यात राहणारे हे तरुण. कोणी स्मशानभूमीची साफसफाई करतो, तर कोणी भंगार गोळा करतो. समाजाने त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच वेगळा राहिला. पण या उपेक्षित जगातही त्यांची स्वप्नं मोठी होती. साधारण सात-आठ वर्षांपूर्वी नागपूरला नातेवाईकांकडे दहीहंडी पाहिली आणि त्यांच्या डोळ्यांत एकच स्वप्न तरळलं – आपणही हा थरार अनुभवायचा. पैसे नव्हते, ना कोणती मोठी ओळख. होतं फक्त एक वेड आणि अफाट मेहनत करण्याची तयारी. Inspirational story

    घुग्गुस वासियांचे स्वप्न होणार पूर्ण

    त्यांच्या या वेडाला हळूहळू आकार मिळत गेला. छोट्या-मोठ्या दहीहंडी स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली. पडले, ठेच लागली, पण थांबले नाहीत. माणसांच्या थरावर थर रचत त्यांनी माणुसकीचा आणि एकजुटीचा एक वेगळाच कळस उभा केला. या वर्षी तर त्यांनी कमालच केली. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मानाची मानली जाणारी ‘भाऊंची दहीहंडी’ फोडली आणि दीड लाख रुपयांचं मोठं बक्षीस जिंकलं. त्यासोबतच, जिल्ह्यातील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांनी सुमारे ४ लाख रुपयांची बक्षिसांची रक्कम जमा केली. त्या एका क्षणासाठी, त्या गोविंदांच्या डोळ्यांतील चमक पाहण्यासारखी होती. ती फक्त विजयाची चमक नव्हती, तर त्यांच्या जिद्दीला मिळालेल्या यशाची ती एक ज्योत होती. Dahi Handi Winner

    पैश्याचा सदुपयोग

    पण खरी गोष्ट तर यापुढे आहे. जिंकलेल्या पैशाचं त्यांनी काय केलं, हे ऐकून मन भरून येतं. एकही पैसा त्यांनी स्वतःच्या चैनीसाठी खर्च केला नाही. यातील काही रक्कम पथकातील कुणा सदस्याच्या कुटुंबात दुर्दैवाने जीवितहानी झाली असेल, तर त्यांना मदत केली जाते. कुणाला उपचारासाठी पैशांची गरज असेल, तर तेही याच निधीतून दिले जातात.

    आज त्यांच्याकडे समाज एका वेगळ्या नजरेने पाहतोय. ती नजर आता तुच्छतेची नाही, तर आदराची आहे. त्यांची ही गाथा सांगते की, माणसातले गुण त्याच्या कामावरून आणि निस्वार्थीपणावरून ठरतात. या गोविंदा पथकाने दहीहंडीच्या उंचीलाच नव्हे, तर माणुसकीच्या उंचीलाही गवसणी घातली आहे. त्यांच्या या प्रवासाने सिद्ध केलंय की, जिद्द असेल तर प्रत्येक काम, प्रत्येक खेळ, आणि प्रत्येक स्वप्न जिंकता येतं.

    गोविल मेहरकुरे ९६८९९८८२८२