Bear Entered House Chandrapur
Bear Entered House Chandrapur : सावली २७ सप्टेंबर २०२५- चंद्रपूर वनविभाग अंतर्गत सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र गायडोंगरी येथील मौजा विरखल चक च्या शेतशिवार आणि गाव शिवारात मागील चार-पाच दिवसांपासून वन्यप्राणी अस्वलाचे अस्तित्व गावकऱ्यांच्या निदर्शनास येत होते. याची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली होती.
ताडोब्यातील पर्यटन सेवेत वाढ करा – आमदार सुधीर मुनगंटीवार
अस्वलावर वनविभागाची करडी नजर
गेल्या चार ते पाच दिवसांपासून नियत क्षेत्र वनरक्षक गायडोंगरी आणि PRT टीम निफंद्रा या अस्वलावर लक्ष ठेवून होत्या.
भीतीने अस्वल झाडावर, नंतर थेट घरात!
- दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वाजताच्या सुमारास अस्वल गावाजवळ आली. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यामुळे घाबरून ती गावालगतच्या चिंचेच्या झाडावर चढून बसली.
- अस्वल रात्रभर झाडावरच होती. मात्र, पहाटे ५ वाजताच्या सुमारास ती झाडावरून खाली उतरली आणि विरखल येथील श्री भास्कर लक्ष्मण मारभते यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरात शिरली.
- यावेळी गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यांनी हे दृश्य पाहिले आणि तात्काळ घराचे दरवाजे बंद करून अस्वलाला घरातच बंद केले. Chandrapur Animal Rescue News
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन
या घटनेची माहिती तातडीने वरिष्ठ वनाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. विकास तरसे, सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर वन विभाग, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली; विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांच्या नेतृत्वाखाली; श्री घनश्याम नायगावकर, वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रपूर; कु. इंगळे, परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी; डॉ. कुंदन पोडचेलवार, पशुधन विकास अधिकारी टीटीसी चंद्रपूर; आणि RRU टीम चंद्रपूर यांनी मिळून हे बचाव कार्य हाती घेतले.
अखेरीस, वनविभागाच्या या टीमने सदरच्या अस्वलास पिंजऱ्यात सुरक्षितपणे जेरबंद केले.
मोलाचे सहकार्य
या यशस्वी ऑपरेशनमध्ये राखुंडे (क्षेत्र सहाय्यक व्याहाड), पाटील (क्षेत्र सहाय्यक पाथरी), एकनाथ खुडे (वनरक्षक गायडोंगरी), वनरक्षक भोला सोनेकर, अविनाश नाने, महादेव मुंडे, डांगे, कराड, सुषमा मेश्राम तसेच PRT निफंद्रा, गवरला, शिरसी आणि ईश्वर गंडाटे आणि इतर वन कर्मचारी व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
उपचारासाठी TTC चंद्रपूर येथे हलवले
जेरबंद केलेल्या या अस्वलास पुढील उपचाराकरिता TTC चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. अस्वलाला पकडल्यामुळे विरखल चक च्या गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला असून परिसरातील भीतीचे वातावरण दूर झाले आहे.