Chandrapur Election Live Update : चंद्रपूर २ डिसेंबर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील ९ नगरपालिका व एक नगरपंचायतीची सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली, सकाळपासूनच मतदार आपल्या केंद्रावर पोहोचत लोकशाही साठी मतदान करीत होते, यादरम्यान मतदारांना पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले आहे. जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये ब्रह्मपुरी, भद्रावती, नागभीड, चिमूर, राजुरा, बल्लारपूर, गडचांदूर, वरोरा मूल व भिसी नगरपंचायतीकरिता मतदान होत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी एकूण जिल्ह्यात ६५ उमेदवार तर सदस्य पदासाठी १ हजार ८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. घुग्गुस नगरपरिषदेची निवडणूक सह गडचांदूर, मूल, बल्लारपूर व वरोरा मधील काही प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यासोबतच ३ डिसेंबर रोजी मतदानाचा निकाल सुद्धा हायकोर्टाच्या निकालाने पुढे ढकलण्यात आला असून आता जिल्ह्यातील सर्वत्र नगरपरिषद व नगरपंचायत चा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. Chandrapur Election Live Update
१० नगराध्यक्ष व २२६ सदस्य निवडून द्यायचे आहे
सकाळी मतदान सुरु झाल्यावर खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे यांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात एकूण ३८९ मतदान केंद्रावर ३ लक्ष ३९ हजार ४९ नागरिक लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणार असून १२२ प्रभागातील २२६ सदस्य व १० नगराध्यक्ष निवडून देणार आहे.
सकाळ पासून सुरु झालेल्या मतदानाची सुरुवात संथ गतीने सुरु झाली होती, दुपारी १.३० वाजता जिल्ह्यात २५.५७ टक्के मतदान झाले होते तर सर्वात कमी मतदान 16.43 टक्के गडचांदूर शहरात झाले.
Warora city Congress leaders resign : वरोरा/चंद्रपूर २९ नोव्हेम्बर (News३४):चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच, वरोरा शहरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसच्या महिला आघाडी शहर अध्यक्ष दीपाली माटे यांनी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी आपल्या पदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर शहर महिला अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने वरोरा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच वरोरा काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. दीपाली माटे यांच्या राजीनाम्यापूर्वी देखील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. Warora city Congress leaders resign
जिल्हा महासचिव शिरोमणी स्वामी आणि तहसील महासचिव मनोहर स्वामी यांनी यापूर्वीच आपल्या पदांचे राजीनामे दिले होते.
त्याचप्रमाणे, तीन वेळा नगर परिषद स्वीकृत सदस्य राहिलेले राजू महाजन आणि दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या त्यांच्या पत्नीनेही काँग्रेस सोडली आहे.
आता शहर महिला अध्यक्षा दीपाली माटे यांनीही राजीनामा दिल्यानंतर, काँग्रेसने त्यांच्यासोबत लावलेल्या उमेदवारांचे फलक आणि बॅनर तातडीने उतरवण्यास सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महत्त्वाच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झाल्याने, वरोरा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
Bhadrawati municipal council Election : चंद्रपूर/भद्रावती २१ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व एक नगरपंचायतीकरिता उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे, २५ नोव्हेम्बर नंतर उमेदवार प्रचारकार्याला सुरुवात करणार आहे. या रणधुमाळीत रंजक निवडणूक हि भद्रावती नगर परिषदेची होणार आहे, भद्रावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मात्र पक्ष विखुरल्यावर चित्र पालटले. आता नगराध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने आले आहे.
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी भद्रावती नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता अबाधित राखण्यास ताकद पणाला लावली होती. राज्यात सत्तांतर झाले, शिवसेना पक्षात बंड झाल्याने पक्षाची दोन भागात फाळणी झाली. भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, कांग्रेस व भाजप पक्षातून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिवसैनिकाला मिळाली. आता आजी-माजी शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात या निवडणुकीत सामोरा जाणार आहे. निवडणुकीत जिंकणार तो शिवसैनिकचं. Bhadrawati municipal council Election
अनेक वर्षे भद्रावती नगर पालिकेच्या अध्यक्षपदी विराजमान असलेले अनिल धानोरकर यांनी शिवसेना पक्षातून सत्ता मिळवली. दिवंगत खासदार धानोरकर कांग्रेस पक्षात सामील झाले, त्यांच्या निधनानंतर भद्रावती-वरोरा विधानसभेच्या उमेदवारीसाठी अनिल धानोरकर यांनी प्रयत्न केले मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या भावाला विधानसभेचे तिकीट दिले. प्रवीण काकडे यांचा पराभव झाला. आता नगरपालिकेच्या निवडणुकीत कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र त्या आशेवर पाणी फेरण्यात आले. अखेर अनिल धानोरकर भाजप पक्षात सामील झाले आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळवली. त्यांचा राजकीय कार्यकाळ शिवसेना व्हाया वंचित आघाडी व्हाया भाजप.
अनिल धानोरकर भाजपात गेले आणि त्यांच्यामुळे भाजपात बंड झाले, भाजप शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश करीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली. २ महिन्यापूर्वी भाजपात येत पक्षाने अनिल धानोरकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. पक्षाने कार्यकर्त्यांच्या मेहनतीला मान दिला नाही. त्यामुळे नामोजवार कांग्रेस पक्षात सामील झाले. विशेष बाब म्हणजे सुनील नामोजवार हे शिवसैनिक, शिवसेनेत असताना ते भद्रावती नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यांचा कार्यकाळ हा शिवसेना व्हाया भाजप व्हाया कांग्रेस असा आहे. Bhadrawati municipal council Election
नगराध्यक्षपदाचे तिसरे दावेदार हे प्रफुल चटकी, तीनदा नगरसेवक, उपाध्यक्ष पद, प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असलेले प्रफुल चटकी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवीत आहे. शिवसेना शिवसेनेतून वेगळी झाल्यावर त्यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याचे ठरविले. लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे, नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात चटकी माजी नगराध्यक्षाना कडवे आव्हान देत आहे. Bhadrawati municipal council Election
सुनील नामोजवार, अनिल धानोरकर व प्रफुल चटकी तिघेही शिवसैनिक एकमेकांविरुद्ध नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवीत आहे, तिघांनी आम्ही निवडून आल्यावर शहराचा चांगल्या विकासाचा दावा केला आहे. भद्रावती नगरपरिषदेला देशात स्वच्छतेत नंबर एक करणार अशी प्रतिक्रिया तिघांनी News३४ सोबत बोलताना दिली आहे. याशिवाय सुनील नामोजवार यांच्या पाठीशी खासदार प्रतिभा धानोरकर, अनिल धानोरकर यांच्या पाठीशी माजी खासदार हंसराजी, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे व प्रफुल चटकी यांच्यापाठीशी शिंदेसनेचे लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते आहे. कुणाच्या नेतृत्वाला जनता कौल देणार हे २ डिसेम्बर रोजी कळेल. तूर्तास इतकेचं.
Mahavikas Aghadi prominent leaders meeting : चंद्रपूर १४ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा): चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारीला गती दिली आहे. याच अनुषंगाने आज चंद्रपूर येथील विश्रामगृह येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची प्राथमिक बैठक पार पडली. ही बैठक खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.
या बैठकीत आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक स्थानिक पातळीवर मित्र पक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, महानगरपालिकेवर विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व नेत्यांनी केला. या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या महानगर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिलीप चौधरी, काँग्रेसचे विधानसभा उमेदवार प्रवीण पडवेकर, उबाठा शहर अध्यक्ष सुरेश पचारे, उबाठा गटाचे नेते सतीश भिवगडे, उबाठा उपाध्यक्ष शालिक फाले, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, मनपा माजी स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, मनपा माजी स्थायी समिती सभापती नंदू नगरकर, माजी नगरसेवक राजेश अडूर, काँग्रेस नेते शिव राव, उबाठा नेते अजय वैरागडे, माजी शहर प्रमुख उबाठा प्रमोद पाटील, संभाजी ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, संभाजी ब्रिगेड मार्गदर्शक दीपक जेऊरकर, नवशाद शेख, पप्पू सिद्धीकी आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
Chandrapur Zilla Parishad Reserved Seats :चंद्रपूर, दि. 13 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आरक्षण सोडत काढून आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेतील आरक्षित निवडणूक विभागांची जाहीर सोडत 13 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात आली. सदर सोडतीनंतर निश्चित झालेले निवडणूक विभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. District Council Reserved Seats Maharashtra
प्रारुप आरक्षणाची अधिसुचना जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या माहितीसाठी 14 ऑक्टो 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर प्रारुप आरक्षण अधिसुचनेस ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी जिल्हाधिकारी / तहसील कार्यालयात 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. Chandrapur District Council Election 2025
चंद्रपूर जिल्हा परिषदेतील एकूण जागांचा तपशील
: जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागा असून महिलांकरीता आरक्षित जागांची संख्या 28 आहे. यात 1. अनुसुचित जाती (एकूण जागा – 8, महिलांसाठी राखीव – 4), 2. अनुसुचित जमाती (एकूण जागा – 13, महिलांसाठी राखीव – 7), 3. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (एकूण जागा – 15, महिलांसाठी राखीव – 8), 4. सर्वसाधारण (एकूण जागा – 20, महिलांसाठी राखीव – 9) Chandrapur Zilla Parishad Reserved Seats
जिल्हा परिषद चंद्रपूर मधील अध्यक्ष पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेत महिला राज येणार हे निश्चित. Chandrapur Zilla Parishad Reserved Seats
MP Pratibha Dhanorkar ultimatum : चंद्रपूर : शहरातील रस्त्यांच्या दयनीय आणि जीवघेण्या अवस्थेवरून चंद्रपूर शहर महानगरपालिका (मनपा) प्रशासनाला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मनपा आयुक्तांना थेट ५ (पाच) दिवसांचे ‘अल्टिमेटम’ दिले असून , या निर्धारित वेळेत काम न झाल्यास, मनपाच्या निष्क्रियतेविरोधात महानगरपालिकेच्या प्रांगणातच “गिट्टी फेक” आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये मध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकला आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जीवघेणी बाब
रस्त्यांवरून ये-जा करणे आता नागरिकांसाठी मोठी अडचण आणि ‘जीवघेणी बाब’ बनली आहे. विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवर अपघात झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मनपा आयुक्तांना स्पष्टपणे कळवले आहे की, चंद्रपूर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती ५ दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निष्क्रियेतेचा तीव्र निषेध करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रांगणात ‘गिट्टी फेक’ आंदोलन सुरू करण्यात येईल.असा इशारा त्यांनी दिला आहे.
Rajura Voter Fraud Case : मुंबई – ९ सप्टेंबर २०२५ – भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. Rajura voter fraud exposed
गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती.
तक्रार दाखल मात्र कारवाई नाही
यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही. bogus voter registration Rajura
अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मतचोरीप्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
Maharashtra Congress District In-charge : चंद्रपूर ९ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांची चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र प्रदेश काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी प्रभारी नेमण्यात आले असून ब्रह्मपुरी व वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून आ. वंजारी यांच्यावरच जबाबदारी देण्यात आली आहे. राजुरा विधानसभेसाठी हैदर अली दोसानी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी श्री. मुजीब पठाण (नागपूर), बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी उमाकांत अग्निहोत्री, तर चिमूर विधानसभा क्षेत्रासाठी श्री. विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी या नियुक्तीचे पत्र जारी केले असून, जिल्हा प्रभारी व विधानसभा प्रभारी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी तातडीने संपर्क साधून संघटनात्मक बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाला नवे बळ मिळेल, तसेच आगामी राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
MNS expansion in Chandrapur slum area : चंद्रपूर २ सप्टेंबर २०२५ :- जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी विखूरली असली तरी काही मनसे पदाधिकारी पक्षाच्या संघटन बांधणीला महत्व देऊन पक्षात विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश करून घेण्याचा सपाटा चालवीत आहे, दरम्यान चंद्रपूर शहरातील झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाश नगर येथे विकास कामे झाली नसल्याने दुर्लक्षित या परिसरात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे हा एकमेव राजकीय पक्ष कामं करू शकतो व मनसेचे पदाधिकारी हे आमचे सगळे कामं करतील हा विश्वास ठेऊन काही तरुणांनी मनसेत प्रवेश केला.
कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचं नेतृत्व
या वार्डातील कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात शेकडो युवक व महिलांचा मनसेत पक्ष प्रवेश घेण्यात आला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळाबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, महिला सेना अध्यक्षा वर्षा बोंभले व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते. MNS Expansion Chandrapur
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे करण्यासाठी शहरातील वार्डावार्डात मनसे पदाधिकारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राबवित असून शहरातील मागास व कामगार वर्ग असलेल्या प्रकाश नगर येथे मनसेची शाखा धुमधडाक्यात उदघाटन करण्यात आली, यावेळी मनसे जिल्हा कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित वार्डवासी यांना दुपट्टे टाकून मनसेत प्रवेश घेतला,
यावेळी मनसे कार्यकारणी जाहीर करण्यात आली, यामध्ये शाखाध्यक्ष साहिल खान, शाखा संघटक ज्ञानेश्वर बांसोड़, सचिव सिद्धार्थ नायक, उपाध्यक्ष भीमराव वनकर, कोषाध्यक्ष सुरेश सिंहठाकुर, सदस्य अंकित मालाकार कन्हैया, आकाश मालाकार, छाया ठाकुर, राजश्री सिद्धार्थ नायक, तृप्ति भीमराव, सरोज यादव, देव कुमार, सोहेल शेख, आसिफ शेख, फैजान शेख, ईरफान शेख, अशफाक खान इत्यादीनी महाराष्ट्र सैनिक म्हणून पदभार स्वीकारला.
Nazul holders permanent patta order : चंद्रपूर – (२६ ऑगस्ट २०२५) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई मंत्रालयात बैठक घेऊन चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची प्रक्रिया गतीशील करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठीच्या सर्वेक्षणाकरिता पाच एजन्सी नियुक्त करून त्याचा खर्च खनिज विकास निधीतून करण्याचे निर्देशही ना. बावनकुळे यांनी दिले असून सहा महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावेत, तसेच विविध विषयांवर बैठक घेण्यात यावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, महसूल विभागाचे सहसचिव संजय बनकर, अवर सचिव आश्विनी यमगर, चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा उपस्थित होते. तर महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डी. एस. कुंभार, तहसीलदार विजय पवार, मनपाचे अप्पर आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त चीद्रावार, संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदार सीमा गजभिये, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी गायकवाड आदी अधिकारी व्हिसीच्या माध्यमातून उपस्थिती होती. Nazul land permanent pattas process
नागरिकांची सतत मागणी
चंद्रपूर शहरात नझूल जागेवर मोठी लोकवस्ती असून या नागरिकांकडे कायमस्वरूपी पट्टे नसल्याने त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील ५० ते ७० वर्षांपासून वास्तव्यास असूनही पट्टे न मिळाल्याने येथील नागरिक सतत मागणी करत होते. याच मागणीसंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाशी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचे फलित स्वरूप महसूल मंत्री यांनी सदर विषयावर बैठक घेतली. या बैठकीत सर्वेक्षण पूर्ण झालेल्या ७०० नागरिकांना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे आदेश देण्यात आले.
सर्व्हेसाठी पाच एजन्सींची नियुक्ती करण्याचे आदेश
चंद्रपूर शहरात 39 झोपडपट्टी नझुलच्या जागेवर असल्याची नोंद मनपाकडे आहे. यातील 14 झोडपट्टांचे सर्वेक्षण झाले आहे. तर उर्वरित झोडपट्टींचे सर्वेक्षण सुरु आहे. मात्र सध्या एकाच एजन्सीमार्फत सर्वेक्षण सुरू असल्याने काम संथ गतीने सुरू असल्याचे आमदार जोरगेवार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी पाच एजन्सींची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणाचा खर्च खनिज विकास निधीतून करण्याचेही निर्देशही यावेळी देण्यात आले. त्यामुळे आता शहरातील जवळपास १८ हजार घरांना पट्टे मिळणार आहेत. त्यासोबतच घुग्घुस येथील नझूल धारक नागरिकांनाही पट्टे देण्यात येणार आहेत.
याशिवाय संजय गांधी योजनेंतर्गत तहसीलदारांची रिक्त पदे तातडीने भरून लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले. तसेच नझूल प्रकरणांसाठी स्वतंत्र तलाठी नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. घुग्घुससाठी स्वतंत्र क्रीडांगणाची जुनी मागणी आमदार जोरगेवार यांनी बैठकीत मांडली. त्यानुसार जागेची अडचण दूर करून प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश देण्यात आले. याशिवाय घुग्घुस परिसरात अप्पर तहसील कार्यालयासही मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी चंद्रपूरला जाण्याची गरज भासणार नाही. nazul land survey agencies
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारामुळेच या बैठकीत मतदार संघातील प्रश्न प्राधान्याने चर्चेत आले. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांना गती मिळणार असून चंद्रपूर-घुग्घुस परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या बैठकीला चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ देवतळे, नामदेवभाऊ डाहुले, भाजपा महामंत्री रवींद्र गुरनुले, शाम कणकम, सविताताई दंडारे, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, माजी नगरसेविका कल्पनाताई बगुलकर, आदी मान्यवर उपस्थित होते. Nazul holders permanent patta order