Tag: Chandrapur news

  • परिचारिका मृत्यू प्रकरणानंतर जिल्हाधिकारी पोहचले जिल्हा रुग्णालयात

    News34

    चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे परिचारिकेच्या झालेल्या मृत्युप्रकरणाची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच सामान्य रुग्णालयातील उणिवा, त्रृटी आदी बाबींमध्ये जिल्हाधिका-यांनी विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी (दि.30) जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, रुग्णालयात मिळणा-या आरोग्य सेवेबद्दल नागरिकांच्या तक्रारीसाठी लावण्यात आलेली तक्रारपेटी सुस्थितीत असणे आवश्यक आहे व त्याची नागरिकांना माहिती असावी. जिल्हा रुग्णालयातील औषध पुरवठा, साहित्य, उपकरणे, रिक्त जागा आदी बाबीं प्रत्येक महिन्याला शासनाला कळवाव्यात. तसेच त्याची एक प्रत जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. अतिदक्षता कक्ष चांगल्या स्थितीत असावा. देखभाल व दुरुस्ती करीता देण्यात आलेल्या निधीमध्ये अतिदक्षता कक्ष, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार, पाण्याची टाकी याव्यतिरिक्त इतर बाबींचा समावेश करायचा असल्यास त्वरीत कळवावे.

    रुग्णालयात कोणत्या डॉक्टर्सची ड्यूटी आहे, ते कधी येतात, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा कोणत्या आहेत, याबाबत रुग्णालय प्रशासनाने अतिशय गांभिर्याने लक्ष द्यावे. यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रुग्णाशी निगडीत असलेल्या व अत्यावश्यक बाबी जसे औषध पुरवठा, उपकरणे यांची मागणी त्वरीत करा. रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्या-त्या विभागात कशाची आवश्यकता आहे, प्रथम प्राधान्य कोणते, त्याचे बजेट किती याबाबत अहवाल मागवून घ्या. रुग्णालयातील स्टाफ किती वाजता येतो, वेळेवर उपस्थित नसलेल्यांची नोंद घेणे, स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविणे, बायोमेट्रीक मशीन असल्यास उपस्थितांची नोंद घेणे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

    जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रुग्णालयात औषधी पुरवठा व मागणी, उपकरणे, सर्जिकल साहित्य याचा गत तीन वर्षाचा रेकॉर्ड, त्यासाठी आलेला निधी याबाबत अहवाल सादर करावा. येथे उपलब्ध असलेले सीसीटीव्ही सर्व चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. आणखी सीसीटीव्ही लागत असल्यास तसा प्रस्ताव सादर करा. डॉक्टरांची येण्या-जाण्याची वेळ नोंद होण्यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही त्वरित लावा. त्याचा ॲक्सेस उपविभागीय अधिकारी यांना आय.पी.द्वारे द्यावा. इतर विभागापेक्षा नवजात बालक कक्ष, बालरोग विभाग, तेथील आयसीयू हे चांगल्या प्रकारे सुरू असले तरी बालकांची अदलाबदल, बाळ चोरीचे प्रकार घडणार नाही, यासाठी दक्ष रहा. रुग्णालयात रुग्णासोबत कमीतकमी नातेवाईक आत येण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून नियोजन करा, असेही निर्देश त्यांनी दिले.

    यावेळी जिल्हाधिका-यांनी टेलिमेडीसीन विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी असलेला अतिदक्षता विभाग, ड्रेसिंग रूम, डिलिव्हरी रुम, डायलिसिस युनीट, थॅलेसमिया रुम व बाहृयरुग्ण विभाग आदींची पाहणी केली. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, बालरोग्य तज्ञ डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. प्रशांत उईके, डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए चंद्रपूरच्या सचिव डॉ. कल्पना गुलवाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवणे आदी उपस्थित होते.

  • पितृछत्र हरपलं आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने दिला मदतीचा हात

    News34

    Shivsena thackeray group

     

    भद्रावती : शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) वरोरा -भद्रावती विधानसभाप्रमुख तथा स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत तालुक्यातील चंदनखेडा येथील कोरोना संक्रमण कालावधीत पितृछत्र हरपलेल्या तीन भावंडाना मदतीचा हात देत शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेतले. या तीघांनाही ट्रस्टद्वारे शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वितरीण करण्यात आले.

    या प्रसंगी ट्रस्टचे संस्थापक  अध्यक्ष रविंद्र शिंदे, ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष  प्रा .धनराज  आस्वले आणि ट्रस्टच्या  विश्वस्त तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे उपस्थित होत्या.
    चंदनखेडा येथील माणिक बागेसर यांचे कोरोना संक्रमण कालावधीत निधन झाले. घरचा कर्ता पुरुष अचानक निघुन गेल्याने माणिक बागेसर यांची पत्नी सुजाता, दोन मुल प्रशिक आणि आरोहण आणि मुलगी आकांशा यांच्या समोर दुःखाचा डोंगर उभा झाला.

    सुजाता बागेसर यांच्या पुढे मुला – मुलींच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली. चंदनखेडा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते यांच्या मार्फत स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे  चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचा सोबत संपर्क साधण्यात आला. विठ्ठल हनवते यांनी सुजाता बागेसर आणि त्यांच्या तीन मुला – मुलींची शैक्षणिक अडचण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या कानावर टाकली.

    रविंद्र शिंदे यांनी तीनही भावंडाना ट्रस्टच्या स्व. सिंधूताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेअंतर्गत दत्तक घेवून त्यांचा शैक्षणिक कार्याचे दायित्व स्विकारले. या दायित्वानुसार तीघांनाही शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

    प्रशिक हा आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी  आहे, आरोहण हा दहाव्या तर आकांशा ही सातव्या इयत्तेत चंदनखेडा नेहरु विद्यालयात  शिक्षण घेत आहेत.

  • सोनार समाजातील विखुरलेल्या बांधवांना एका छत्राखाली आणून समाजाचा उत्कर्ष साधावा – रवि चावरे

    News34

    चंद्रपूर – सोनार समाजाचा उत्कर्ष साधायचा असेल तर सर्वप्रथम समाज बांधवांना वेगवेगळया पोटजातीमध्ये विखुरलेल्या समाजबांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजातील बुध्दीजीवी, नोकरी पेशातील बांधवांनी समाज ऋणाची परतफेड करण्याकरिता संपूर्ण समाजाला एका छत्राखाली आणून त्यांच्या सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक विकासाला कशी चालना मिळेल याकरिता विचारमंथन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन समाजाचे युवा नेतृत्व तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहीर यांचे स्वीय सहायक रवि चावरे यांनी केले.

    चंद्रपूर सोनार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतिने आयोजित संत श्री नरहरी महाराज यांच्या 828 व्या जयंती महोत्सवानिमित्त उद्घाटक म्हणून ते बोलत होते. स्थानिक संत तुकडोजी भवन, नागपूर रोड येथे आयोजित या कार्यक्रमास मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल चावरे, कार्यक्रमाचे अतिथी भुषण गजपूरे, अॅड प्रशिक ताठे, सुबोध कासुलकर, विनोद पांढरे, श्री रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते.

    समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना रवि चावरे यांनी सांगीतले की,समाजात पोटजातींना घेवून दुजाभाव न करता त्यांना सामाजिक प्रवाहात येण्याकरिता संस्थेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे, समाजामध्ये अनेक कुटूंबात प्रज्ञावंत मुले असतांनाही आर्थिकदृष्टया ते शैक्षणिक प्रगती करण्यास असमर्थ असल्याने अशा मुलांचा शोध घेवून सामाजिक स्तरावर त्या कुटूंबांना सहाय्य करण्याची भुमिका स्विकारल्या गेली किंवा अशा गुणवंत विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती सारखी मदत मिळाली तर आपला समाज कुठेही मागे राहणार नाही.

    ज्या संत नरहरी महाराजांचे पाईक म्हणून आपण त्यांचेवर श्रध्दा ठेवतो. परंतु, महाराजांचे सामाजिक उत्थानासाठीचे विचार त्यांचे संदेश किंवा त्यांच्या कर्तृत्वाबाबत आपण अनभिज्ञ आहोत. त्यामुळे समाजातील युवकांनी, समाज बांधवांनी या विचाराचा प्रचार व प्रसार करण्याचे कर्तव्य पार पाडावे असेही आपल्या संबोधनातून रवि चावरे यांनी सांगीतले.

    तत्पूर्वी मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व अन्य मान्यवरांनी समाज बांधवांना मौलीक मार्गदर्शन केले. याप्रसंगी रक्तदान शिबीर, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील सेवानिवृत्त बांधवांना याप्रसंगी शाल व श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास माता भगिणींसह समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते

  • चंद्रपूर जिल्ह्यात 31 ऑगस्टपर्यंत जमावबंदी

    News34

     

    चंद्रपूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1) (3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे.

    या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर किंवा चावडीवर जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाहीत.

    जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा कोणत्याही व्यक्तीस, शस्त्रे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, रिव्हॉल्व्हर, सुरे, काट्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करता येईल, अशी इतर कोणतीही वस्तू, कोणताही क्षार, द्रव्ये पदार्थ, दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगता येणार नाही. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीच्या आकृत्या, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, तसेच यामुळे सभ्यता आणि नीतिमत्ता यास धोका पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल असे किंवा आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे, त्याचा जनतेत प्रसार करणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे.

    सदर आदेश 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राकरीता लागू राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद आहे.