Tag: पालकमंत्री मुनगंटीवार यांचा पुढाकार

  • सर्वांगीण विकासात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

    सर्वांगीण विकासात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्याच्या सर्वंकष विकासामध्ये जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण सुविधा, पर्यावरण, अंगणवाडी, रस्ते आणि स्मशानभूमी यासह विविध बाबींचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रांमध्ये विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात मॉडेल ठरावा, यासाठी उत्कृष्ट आराखडा तयार करता येईल, अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (दि.21) दिले.

     

    जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना नियामक परिषदेची सभा नियोजन भवन सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते.  बैठकीला विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सर्वश्री कीर्तीकुमार भांगडीया, सुभाष धोटे, रामदास आंबटकर, श्री. शिंदे, किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर, डॉ. मनीषा कायंदे, सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

     

    जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण सुविधा, अंगणवाडी, रस्ते, पाणीपुरवठा  व पायाभुत सुविधा या बाबींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘नियमानुसार वार्षिक आराखडा तयार करून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पाणी पुरवठा आणि रोजगार या विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे.

     

    पिण्याच्या पाण्याच्या 1302 योजना कार्यान्वित केल्या आहेत. पण आता जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधा उदा. वॉल कंपाऊंड, वर्गखोली, सोलर सुविधा, खेळासाठी मैदाने, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह यासाठी दोन वर्षाचा वार्षिक आराखडा तयार करावा. मनपा व 17 नगरपरिषदेच्या शाळा व अंगणवाड्या उत्तम कराव्यात. गावातील स्मशानभूमी पूर्णत्वास नेता येईल. प्रदूषण व वैद्यकीय सोयी सुविधांमध्ये भेदभाव होता कामा नये. सूक्ष्म नियोजन करून दोन वर्षाचा  आराखडा तयार करण्यात येईल. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, रुग्णालय, रस्ते स्मशानभूमी आदी कामे करता येतील. तसेच “मिशन जय किसान” अंतर्गत शेतीशी निगडित कामे देखील करण्यात येणार आहेत.

     

    पालकमंत्री श्री .मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आपला जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे जावा यासाठी जिल्ह्यामध्ये 5001 किलोमीटरचे पाणंद रस्ते करण्यात येत असून देशात जिल्हा पाणंद रस्त्याच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर राहील, असेही ते म्हणाले. पर्यावरणासाठी योजना आखण्यात येत असून तेलंगणा राज्याने ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्येनुसार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यात देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून अमृत वृक्ष योजना राबविण्यात येईल. यासाठी जिल्हा परिषदेने जागा तपासाव्यात.

     

    जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघाच्या विकासासाठी नियमाच्या चौकटीत व शास्त्रशुद्ध पद्धतीने निधी वितरित केला जाईल. यासाठी विधानसभा सदस्यांना प्रत्येकी  15 कोटी तर विधानपरिषद सदस्यांना प्रत्येकी 5 कोटी असे एकूण 130 कोटी निधीचे वितरण करण्यात येईल. त्यासोबतच, 80 कोटी रुपये कॅन्सर हॉस्पिटल व  प्रादेशिक पाणीपुरवठयाच्या सोलरकरिता 20 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल असेही ते म्हणाले.

  • चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गुड गव्हर्नन्स पुरस्काराने होणार सन्मान

    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गुड गव्हर्नन्स पुरस्काराने होणार सन्मान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – दि सीएसआर जर्नलच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. ना. सुधीर मुनगंटीवार यांना ‘दि सीएसआर जर्नल चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स’ हा पुरस्कार सुशासन (सर्वोत्तम प्रशासन) राखण्यात यशस्वी ठरत असल्याबद्दल दिला जात आहे.

     

    मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे येत्या शनिवार, दि. 9 डिसेंबरला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री. मुनगंटीवार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रत्येक शासकीय योजना, अभियान आणि उपक्रमांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यात श्री. मुनगंटीवार यांचा विशेष हातखंडा आहे. राज्य सरकारची कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यापासून ते गरजूंना शासनाकडून न्याय मिळवून देईपर्यंत प्रत्येक बाबतीत ते सातत्याने पाठपुरावा करीत असतात. त्यामुळेच दि सीएसआर जर्नलच्या वतीने उत्तम प्रशासनासाठी दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्कारासाठी श्री. मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास, क्रिकेटपटू युवराज सिंह आणि मिथाली राज, अभिनेत्री भूमी पेडणेकर आदींना या विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

     

    महाराष्ट्राच्या वन,सांस्कृतिक आणि मत्स्यव्यवसाय या तीनही खात्यांचा माध्यमातून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी ऐतिहासिक अन् धडाडीचे निर्णय घेतले आहे . मग अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविणे असो वाघनखे आणण्याचा केलेला लंडन येथील सामंजस्य करार,रायगडावर भव्यदिव्य केलेला शिवराज्यभिषेक सोहळा तसेच‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’, आपल्या देशातील संसदेला आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराला चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातून काष्ठ पाठविण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार,’जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगिताचा दर्जा आणि आता घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरावर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अश्या निर्णयामुळे ना. सुधीर मुनगंटीवार हे चॅम्पीयन ऑफ गुड गव्हर्नन्स या पुढाकाराचे खरे मानकरी ठरतात अशी भावना व्यक्त होत आहे.

     

    चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

    चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता आणखी एका प्रतिष्ठेच्या पुरस्काराची भर पडल्यामुळे चंद्रपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी ऊत्स्फूर्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

    कर्तृत्वाचा गौरव

    ना. श्री. मुनगंटीवार यांना 1999 मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सर्वश्रेष्ठ वक्ता म्हणून गौरविण्यात आले होते. यासोबतच दि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंडचा मेमोरियल अवॉर्ड आफ्टरनून व्हॉईसच्या वतीने बेस्ट परफॉर्मिंग पॉलिटिशियन, लोकमत आणि ज्युनियर चेंबर इंटरनॅशनलच्या वतीने ‘मॅन अॉफ द इयर’,महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील प्रगतीसाठी इंडिया टूडे सारख्या प्रतिष्ठीत समूहाने दोन वेळा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. मॅग्ना प्रकाशन संस्था व होथूर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘सोसायटी एक्सलेन्स’ दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेफ्टनंट जी. एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षलागवडीच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छाया दीक्षित फाउंडेशन चा विशेष पुरस्कार ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील दीर्घ सेवेसाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार स्मृती पुरस्कार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज द्वारा व्यापार मित्र पुरस्कार अशा विशेष पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

  • चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा होणार विस्तार

    चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा होणार विस्तार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे आणि यंदा विधी क्षेत्रच त्याचे साक्षीदार ठरले आहे. श्री. मुनगंटीवार यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत सात मजली इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामासाठी राज्य शासनाने 60 कोटी 76 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच 2017 पासून प्रलंबित असलेला विषय आता मार्गी लागला आहे.

     

     

    जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारीत इमारतीचा प्रस्ताव चंद्रपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी शासनाला पाठवला होता. त्याआधारे महाराष्ट्र आणि गोवा बार काऊंन्सिलचे अध्यक्ष ॲड. पारिजात पांडे, चंद्रपूर जिल्हा बार असोसीएशनचे अध्यक्ष ॲड. अभय पाचपोर, सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार, उपाध्यक्ष ॲड. राजेश ठाकूर यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांना या विषयात लक्ष घालण्याची मागणी केली होती. चंद्रपूरच्या विधि क्षेत्रातील गरज लक्षात घेऊन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शासनस्तरावर या विषयाचा पाठपुरावा केला. जिल्ह्यातील न्यायदान प्रक्रिया अधिक गतीमान होण्यात इमारतीचा अडसर ठरू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे शासनाने 29 नोव्हेंबर 2023 रोजी चंद्रपूर येथील नवीन विस्तारीत न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी 60 कोटी 76 लक्ष रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्दा आता निकाली निघाला आहे. पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्राधान्याने या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल चंद्रपुरातील विधी वर्तुळातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

     

    12 कोर्ट हॉल आणि अद्ययावत यंत्रणा :

    चंद्रपूर जिल्हा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीमध्ये एकूण 12 कोर्ट हॉल असणार आहेत. याठिकाणी अद्ययावत यंत्रणा आणि अत्याधुनिक सुविधांचा मेळ बघायला मिळणार आहे. अंतर्गत आणि बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा व मलनिःसारण, अग्नीशमन यंत्रणा, सुसज्ज वाहनतळ, वातानुकुलित यंत्रणा, वाढीव क्षमता असलेले उद्वाहन (लिफ्ट), सीसीटीव्ही, पॉवर बॅकअप आदींची तरतूद कामांतर्गत करण्यात आली आहे. न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, सोबतच नवोदीत अभिवक्त्यासाठी आसनाच्या व्यवस्थेची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाणार आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातत्व स्थळांचा होणार विकास

    चंद्रपूर जिल्ह्यातील 14 पुरातत्व स्थळांचा होणार विकास

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 57 कोटी 96 लक्ष 95 हजार 375 रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील 14 पुरातत्व स्थळांचा विकास होणार आहे. यासंदर्भात ना. श्री. मुनगंटीवार यांनी नुकताच नियोजन सभागृह येथे आढावा घेतला.

     

    बैठकीला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले,जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, सहाय्यक संचालक अमोल गोटे आदी उपस्थित होते. चंद्रपूरला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. गोंड राजा खांडक्या बल्लारशाह यांनी तेराव्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. जिल्ह्यात अनेक पुरातन मंदिर, प्राचीन गडकिल्ले व वास्तु आहेत. पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आता त्यांचे रूप पालटणार आहे.

     

    बैठकीत बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, पुरातत्व स्थळांचा विकास करताना कामाची गुणवत्ता, दर्जा आणि कामाची गती यावर स्थानिक नागरीकांनी लक्ष ठेवावे. पुरातत्व विभागाने प्रत्येक ठिकाणी पाच ते सहा नागरीकांची टीम तयार करावी. लोकसहभागातूनच या स्थळांचा विकास होईल, याबाबत नियोजन करावे. प्रत्येक ठिकाणी कामांची माहिती देणारा एक फलक तर संबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती देणारा दुसरा फलक लावावा. यात ‘क्यूआर कोड’चा समावेश असावा.

     

    सिध्देश्वर मंदिराचा ‘ब’वर्ग दर्जा करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा. माणिकगड किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार करणे, चंद्रपूर महानगर पालिकेअंतर्गत असणाऱ्या तीन बारवचे काम उत्तम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी पुरातत्व विभागाला दिल्या.

     

    अर्थमंत्री असताना भरीव तरतूद

    राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास करण्याचे काम पुरातत्व विभागाकडे असते. सुरुवातीला या विभागाचे बजेट प्रतिवर्ष केवळ 22 कोटी रुपये होते. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात या विभागासाठी 500 कोटी रुपये मंजूर केले.

     

    गाईड प्रशिक्षण संस्था होणार

    राज्यातील ऐतिहासिक वारसा बघण्यासोबतच त्याची माहितीही नागरीकांना मिळाली पाहिजे. नागरीकांपर्यंत योग्य व अचूक माहिती जावी, यासाठी राज्यात गाईड प्रशिक्षण संस्था उभारण्याचे नियोजन आहे.

    कायापालट होणारी स्थळं

    सोमेश्वर मंदिर (राजुरा), महादेव मंदिर (बाबुपेठ, ता. चंद्रपूर), विष्णु मंदिर (माणिकगड, ता. जिवती), सिद्धेश्वर मंदिर (देव्हाडा, ता. राजुरा), माणिकगड किल्ला टप्पा 1(ता. जिवती), माणिकगड किल्ला टप्पा 2, भवानी मंदिर (भटाळा, ता. वरोरा), ऋषी तलाव (लेणी) (भटाळा, ता. वरोरा), महादेव मंदिर (भटाळा, ता. वरोरा), शंकर मंदिर (भिसी, ता. चिमूर), गरुडस्तंभ (चंद्रपूर), खंडक्या बल्लारशाह समाधी (ता. बल्लारपूर), चंद्रपूर शहर व्यवस्थापन आराखडा (चंद्रपूर) आणि पापामिया टेकडी (ता. चंद्रपूर).

  • चंद्रपूर जिल्ह्यात उभे राहणार 52 नवीन तलाठी कार्यालय

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ग्रामीण भागात नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच गावपातळीवरील प्रशासकीय कारभार उत्तम रितीने चालावा, यासाठी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष पुढाकारामुळे 52 नवीन तलाठी कार्यालयाची निर्मिती होणार आहे. त्यासाठी विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबत महसूल व वनविभागाने 17 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.

     

    चंद्रपूर हा नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असल्याने तेथील गावांमध्ये प्रशासकीय कामकाम उत्तमरित्या चालावे, गावातील नागरिकांना आवश्यक असलेले महत्वाचे दाखले, कृषीविषयक नोंदी / कागदपत्रे वेळेत मिळावेत, यासाठी नवीन तलाठी कार्यालयांची आवश्यकता होती. याबाबत प्रशासनाकडून सुरवातीला 7 कोटी 80 लक्ष रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र कर्मचा-यांच्या निवासस्थानासह तलाठी कार्यालयाची निर्मिती करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला सुचना केल्या. त्यानुसार विशेष बाब म्हणून 18 कोटी 19 लक्ष 24 हजार रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला. राज्य शासनाने या प्रस्तावाला नुकतीच मंजूरी दिली असून नवीन तलाठी कार्यालय व कर्मचा-यांच्या निवासस्थानाचा मार्ग मोकळा झाला आहे. यात पोंभुर्णा तालुक्यात 11, चंद्रपूर तालुक्यात 6, बल्लारपूर तालुक्यात 7 आणि मुल तालुक्यात 28 असे एकूण 52 नवीन तलाठी कार्यालये उभारण्यात येणार आहे.

     

    गावपातळीवरील राज्य शासनाचा महत्वाचा घटक म्हणून तलाठ्यांकडे अनेक प्रशासकीय कामे सोपविण्यात आली आहेत. यात गावपातळीवरील 21 गाव नमुने तयार करणे, ते अद्ययावत करणे, वारसान नोंदी घेणे, खरेदी-विक्री व्यवहारानुसार सातबारावर फेरफार नोंदी घेणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानीचे पंचनामे करणे, नागरिकांना नुकसान भरपाईबाबत प्रक्रिया राबविणे, त्याचा अहवाल शासनाकडे सादर करणे, रहिवासी व उत्पनाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र नागरिकांना उपलब्ध करून देणे, गावाची पैसेवारी निश्चित करणे, पीक कापणी प्रयोग, ई-पीक पाहणी आदी महत्वाच्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे, कृषी गणना करणे, सातबारा वाटप करणे, ऑनलाईन सातबारा नागरिकांना उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या कामामुळेच तलाठी हा गावपातळीवरील प्रशासनाचा मुख्य कणा मानला जातो.

     

    या ठिकाणी होणार नवीन तलाठी कार्यालये

    पोंभुर्णा तालुक्यातील वेळवामाल, चेकबल्लारपूर, डोंगरहळदी, उमरी पोतदार, घोसरी, देवाडा (बुर्ज), देवाडा (खुर्द), नवेगाव मोरे, जाम तुकुम, फुटाना मोकासा आणि चेक ठाणेवासना. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर, पिंपळखुट, जुनोना, पद्मापूर, बोर्डा, दुर्गापूर चांदा रयतवारी. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, मानोरा, कवडजाई, कळमना, विसापूर, कोठारी, बामणी, मूल तालुक्यातील मरेगाव, भादुर्णी, उश्राळाचक, केळझर, राजगड, पिपिरी दीक्षित, भेजगाव, चिंचाळा, सुशी दाबगाव, ताडाळा, नांदगाव, मूल, राजोली, नवेगाव, कोसंबी, कांतापेठ (रै), चिरोली, गडीसुर्ला, बोंडाळा (भुज), मारोडा, चिखली माल, चिमढा, हळदी गावगन्ना, बोरचांदली, सिंताळा, जुनासुर्ला, बेलघाटा माल आणि डोंगरगाव येथे नवीन तलाठी कार्यालय निर्माण होणार आहे.