Tag: चंद्रपूर दीक्षाभूमी

  • Chandrapur Deekshabhoomi development plan । चंद्रपूर दीक्षाभूमी होणार जागतिक दर्जाची, जोरगेवारांच्या पुढाकाराने दीक्षाभूमीचा कायापालट

    Chandrapur Deekshabhoomi development plan

    Chandrapur Deekshabhoomi development plan : चंद्रपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभूमीचा जागतिक पातळीवर विकास करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. त्यांच्या प्रयत्नातून या पवित्र स्थळाच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील जवळपास १४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.

    आमदार देवराव भोंगळे यांनी कांग्रेसला दिला मोठा धक्का

    दिक्षाभूमीच्या विकास कामाचा आढावा (Chandrapur Deekshabhoomi development plan) घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात बैठक बोलावली होती. सदर बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, समाजकल्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद माहुतुरे, समाज कल्यान विभागाच्या स्मिता बैहीरमवार, सार्वजनिक विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, दिक्षाभुमी ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, कुणाल घोटेकर, राहुल घोटेकर, प्राचार्य दहेगावकर, निवृत्त प्रा संजय बेले, भारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, मनोज पाल, रवी गुरुनुले, रंजन ठाकूर, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिक्षाभूमीच्या विकासकामाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि सर्व प्रक्रिया जलद पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

    पवित्र स्थळाचा विकास नेटका व भव्य व्हावा, यासाठी सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा. निधीचा योग्य वापर होईल याची काळजी घ्या, असे ते यावेळी म्हणाले. दिक्षाभूमीच्या विकासासाठी मागील अनेक वर्षांपासून आपण प्रयत्नशील होतो. आता निधी मंजूर झाल्यामुळे जागतिक पातळीवर या पवित्र स्थळाचा विकास होईल. दिक्षाभूमी हे जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणाचा विकास अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून आपण या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. Kishor Jorgewar Deekshabhoomi funding

    दीक्षाभूमीचा विकास भव्य स्वरूपात होणार

    या निधीतून सभागृह, पथदिवे, उद्यान, पाणीपुरवठा, शौचालय सुविधा, सुरक्षा यंत्रणा, स्थापत्यशास्त्रीय सौंदर्यवृद्धी आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे दिक्षाभूमीचा विकास भव्य स्वरूपात होणार आहे. सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा.निधीचा प्रत्येक रुपया योग्य कामासाठीच वापरला गेला पाहिजे. कोणत्याही अडथळ्यामुळे विकासकामांना विलंब होऊ देऊ नका, काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. या पवित्र भूमीचा जागतिक दर्जाचा विकास व्हावा, हा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आणि एकजुटीने काम करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. Deekshabhoomi global heritage site development

    या बैठकीत विकासकामांची रूपरेषा, निधी वितरण प्रक्रिया, निविदा प्रक्रिया आणि वेळापत्रक याबद्दल सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाने कामांना गती देण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे दिक्षाभूमीच्या विकासकामांना नवा वेग मिळणार आहे. लवकरच हे पवित्र स्थान जागतिक स्तरावर नव्या स्वरूपात ओळखले जाईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ‘नागपूर आणि चंद्रपूर हा परिसर जगात ‘टायगर कॅपीटल’ म्हणून ओळखला जात असला तरी या दोन्ही जिल्ह्यांत बाबासाहेबांनी 1956 सालीच वाघाची डरकाळी दिली आणि संपूर्ण देशाने ही डरकाळी ऐकली आहे. या महामानवाने दिलेल्या संविधानात स्वातंत्र्य, अधिकार, जबाबदारी आणि कर्तव्याचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने संविधान वाचून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालण्याचा संकल्प करावा व त्यातून जगण्याची प्रेरणा घ्यावी,’ असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल ट्रस्टच्यावतीने दीक्षाभूमी चंद्रपूर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी महामानवाला अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष अरुण घोटेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री आमदार सुधाकर अडबाले, किशोर जोरगेवार, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे आदी उपस्थित होते.

     

    देशात आज 750 पेक्षा जास्त जिल्हे आहेत, मात्र नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांचे विशेष महत्त्व आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘14 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तर दोन दिवसांनी म्हणजे 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. हे दोन्ही जिल्हे आज वाघांसाठी प्रसिद्ध आहेत. पण 1956 मध्येच बाबासाहेबांची डरकाळी संपूर्ण देशाने ऐकली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसारच देशाची आणि राज्याची वाटचाल सुरू आहे. संविधानात प्रत्येक गोष्टीचा उल्लेख त्यांनी केला आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, अधिकार यासोबतच प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची आणि कर्तव्याचीसुध्दा जाणीव करून देण्यात आली आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे केवळ स्मरण करून थांबू नये तर, त्यांच्या विचारांवर अंमल करावे लागेल. आणि त्यासाठी प्रत्येकाला संविधानाचे वाचनही करावे लागेल.

     

    महापुरुषांना भारतापुरता मर्यादित समजू नये

    ‘भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतापुरतेच मर्यादीत नाही तर संपूर्ण जगाला वैचारीक प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा जीवन जगण्याचा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला आहे. गौतम बुद्धांचा शांततेचा आणि समतेचा संदेश संपूर्ण जगात पोहचला आहे. केंद्र शासन आज बुद्धगया, नालंदा, विक्रमशिला, सारनाथ, कपिलवस्तू, राजगीर, वैशाली, श्रावस्ती या ठिकाणांना जोडणारे बुद्ध सर्किट तयार करीत आहे,’ असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    एस.एन.डी.टी. विद्यापीठ आणि चंद्रपूर फ्लाईंग क्लब ठरणार विद्यार्थ्यांसाठी गेमचेंजर

    कौशल्य विकासावर आधारीत प्रशिक्षण आणि रोजगारासाठी चंद्रपूरमध्ये एस.एन.डी.टी विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येत आहे. तसेच आगामी काही महिन्यातच चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आदी विद्यार्थी–विद्यार्थीनींसाठी या बाबी गेमचेंजर ठरणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनीचे उदघाटन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत अत्यंत उत्कृष्ठ असे मल्टिमिडीया छायाचित्र  प्रदर्शन असून नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन महामानवाचा जीवन प्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी रविवारी केले.

     

    धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, वर्धा क्षेत्रीय कार्यालयातर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर यांच्या सहयोगाने चंद्रपूर येथील दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे तीन दिवसीय “डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाचा जीवनप्रवास” या विषयावर आधारित मल्टिमिडीया छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

     

    कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलिस अधिक्षक रीना जनबंधू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, दीक्षाभूमी चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण घोटेकर, माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. नंदनवार, आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, राहूल घोटेकर उपस्थित होते.

     

    यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे म्हणाले की, केंद्रीय संचार ब्यूरोने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील माहितीची प्रदर्शनाच्या रुपात उत्तम मांडणी केली आहे. प्रत्येक छायाचित्राच्या खाली प्रत्येक घटनेचे वर्णन लिखीत स्वरूपात मांडण्यात आले आहे. जेणेकरून प्रदर्शन पाहणाऱ्यांना माहिती जाणून घेणे सोपे होईल. नागरीकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महामानवाचा जीवनप्रवास जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

     

    अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू म्हणाल्या की, केंद्रीय संचार ब्यूरोने माहितीपूर्ण असे प्रदर्शन लावले आहे. या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल संस्थेने कायमस्वरुपी अशाप्रकारचे प्रदर्शन दीक्षाभूमी येथे स्थापन करण्याबाबत विचार करावा, जेणेकरून चंद्रपूरच्या नवीन पिढीला डॉ. बाबासाहेबांची माहिती पोहचविणे शक्य होईल, अशी सूचना त्यांनी केली.

     

    अरुण घोटेकर म्हणाले, केंद्रीय संचार ब्यूरोने या प्रदर्शनाच्या माध्यमातून चंद्रपूराला उत्कृष्ठ अशी भेट दिली आहे. या प्रदर्शनातील माहिती अवलोकन करण्यासारखी आहे. बाबासाहेब आंबेडकरांवरील हे प्रदर्शन दुर्मिळ आहे. नागरीकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी तर संचालन उमेश महतो यांनी मानले.

    17 आक्टोबरपर्यंत प्रदर्शन नागरिकांसाठी खुले

    हे प्रदर्शन 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत नागरीकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत विविध दुर्मिळ छायाचित्र लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन हंसराज राऊत यांनी केले आहे.

  • चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील दीक्षाभूमी मैदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे दि. 15 व 16 ऑक्टोबर 2023 रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्यास जिल्हयातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. यादरम्यान, वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी, यादृष्टीने चंद्रपूर शहरातून दीक्षाभूमी परिसराकडे जाणाऱ्या रहदारीचा मार्ग दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दि. 17 ऑक्टोबर 2023 च्या सकाळी 8 वाजेपर्यतच्या कालावधीसाठी सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्याचा तसेच सर्व प्रकारच्या वाहनाची रहदारी वळविण्याचे आदेश पोलीस अधिक्षक रविंद्रसिह परदेशी यांनी निर्गमित केले आहे.

     

    अवजड वाहनाकरीता रहदारीचा मार्ग:

    या कालावधीदरम्यान गरजेनुसार नागपूरकडून, चंद्रपूरकडे येणारी सर्व प्रकारची जड वाहने हॉटेल कुंदन प्लाझा येथुन सि.टी.पि.एस मार्गे नेहरू नगरवरून मुल रोडला जातील. मुलकडून, नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प-सावरकर चौक-वरोरा नाका उड्डाणपुल या मार्गाने जातील तसेच गरजेनुसार एम.ई.एल. नाका चौक येथे थांबविण्यात येतील. बल्लारशाकडून, नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प पलीकडे डि.आर.सी.बंकर, बायपास रोड येथे दिक्षाभूमी मार्गावरील गर्दी पाहुन थांबविण्यात येतील.

     

    शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरिता रहदारी व्यवस्था:

     

       जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय-मित्र नगर चौक- टि.बी. दवाखानापर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत) बंद करण्यात येत आहे. पाण्याची टाकी-विश्रामगृह-जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. त्यामुळे नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळुन) वरोरा नाका- उड्डानपुल-सिध्दार्थ हॉटेल-बस स्टँड-प्रियदर्शनी चौकमार्गे शहराकडे जातील. रामनगर, मित्रनगर, आकाशवाणी, स्नेहनगर आणि वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी-दवा बाजार-संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने (जड वाहने वगळुन) घेवुन जावीत. त्याचप्रमाणे जटपूरा गेट कडून, रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी-प्रियदर्शनी चौक-बस स्टॅंड-सिद्धार्थ हॉटेल-उड्डानपुल मार्गे नागपूर कडे जातील.

     

    दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक-जुना वरोरा नाका ते आय.टी.आय. कॉलेज तसेच वरोरा नाका चौक-मित्रनगर चौक ते संत केवलराम चौक आणि मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर “नो पार्कींग व नो हॉकर्स झोन” म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतेही वाहने, हॉकर्स लावण्यात येवू नये.

     

    दीक्षाभूमी ते संत केवलराम चौक तसेच दीक्षाभूमी ते जिल्हा स्टेडीयम दरम्यान राहण्याऱ्या रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजुला उभी न करता घोषित करण्यात आलेल्या पार्किंगमध्येच ठेवावी. आयटीआय कॉलेज ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत तसेच वरोरा नाका दर्ग्याच्या उजव्या बाजुने जाणारा रस्ता-पुट्ठेवार हॉस्पीटल- बुक्कावार हॉस्पीटल-वरोरा नाका ते पिंक प्लॅनेटपर्यंत “नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन” म्हणुन घोषीत करण्यात येत आहे.

     

    दीक्षाभूमी सोहळ्यास येणाऱ्या नागरिकांकरिता वाहन पार्कींग स्थळ:

    नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरिता:-

    शकुंतला लॉन, जनता कॉलेज पटांगणजनता कॉलेज समोरील ईदगाह मैदानवरोरा नाका पिंक प्लनेटच्या उजव्या बाजूला श्री. भटीया यांची जागा या ठिकाणी वाहने पार्क करावीत.

     

    शहरातुन दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनाकरिता:-

    सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन, न्यु इंग्लिश ग्राउंड या ठिकाणी वाहने पार्क करावीत.

     

    वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातुन दीक्षाभूमीकडे येणाऱ्या वाहनांकरीता:-

     

    लोकमान्य टिळक हायस्कुल(जिल्हा स्टेडीयमच्या मागे), जिवन साफल्य गृहनिर्माण सहकारी संस्था (मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे) याठिकाणी वाहने पार्क करावीत.

     

    मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकूम परिसरातून येणाऱ्या वाहनाकरिता:-

     

                कृषी भवन जवळील मैदान/ ट्रॅव्हल्स स्टॅन्ड याठिकाणी वाहने पार्क करावीत.

    तरी, धम्मचक अनुप्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी सर्व बौध्द बांधवांनी व अनुयायांनी वाहतुक व्यवस्थेचा वापर करून घोषीत पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवून वाहतुक व्यवस्थेचे पालन करावे, तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.