Tag: केंद्र सरकार

  • Implementation of the Disha Committee । सरकारच्या योजना हवेत की जमिनीवर? दिशा समितीचा खासदार धानोरकरांनी घेतला आढावा

    Implementation of the Disha Committee

    Implementation of the Disha Committee : चंद्रपूर : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेले विषय तसेच केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) कार्यरत आहे. या समितीच्या कामाच्या प्रगतीचा आढावा खासदार धानोरकर यांनी आज (दि. 16) घेतला. Disha Committee

    नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या या बैठकीला दिशा समितीचे सहअध्यक्ष खा. डॉ. नामदेव किरसान, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायकुटे व विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

    दालमिया सिमेंट कंपनीने ३० कामगारांना केले बेरोजगार, दोष काय तर…

    पीक विम्याची रक्कम तात्काळ द्या

    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अनेक लाभार्थी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत. पात्र लाभार्थ्यांना पीक विम्याची रक्कम (crop insurance payment) लवकर देण्यात यावी. तसेच वाढीव किमतीने बी- बियाणे, खतांची विक्री होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करून परवाने रद्द करावे. जलजीवन मिशन मध्ये कंत्राटदारांनी सिमेंट काँक्रेटचे रस्ते फोडून टाकले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांनी रस्त्याची डागडुजी करावी, तसे आदेश संबंधित विभागाने कंत्राटदारांना द्यावे. कुपोषण मुक्त जिल्ह्यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने प्रभावी योजना राबवाव्यात. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम त्वरीत पूर्ण करावे.

    घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध होत असली तरी रेतीघाटापासून वाहतुकीचा खर्च खुप जास्त येत आहे, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. मोबाईलची रेंज राहण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडने टॉवरचे काम गतीने करावे. वरोरा ते माजरी रेल्वे स्टेशन दरम्यान टाकण्यात येणा-या तिस-या रेल्वे लाईनचे काम भुसंपादनासाठी दिलेल्या जमिनीवरच करावे, अतिरिक्त जागेवर काम करू नये. राष्ट्रीय महामार्गाचे काम करतांना कंत्राटदारांकडून रस्त्यावरील प्रवासी निवा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सदर प्रवासी निवारा कंत्राटदारांनी बांधून द्यावे.

    वरोरा –चिमूर महामार्ग अतिशय उंच असल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. शिवाय महामार्गावरील सर्व पाणी लगतच्या शेतात जात असल्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यावर राष्ट्रीय महामार्ग आणि प्रशासनाने उपाययोजना करावी, अशा सुचना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्या.

    यावेळी त्यांनी इतरही विषयांचा आढावा घेतला. बैठकीत खा. डॉ. नामदेव किरसान यांनी आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीसुध्दा संबंधित विभागाला सुचना केल्या. संचालन आणि सादरीकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायकुडे यांनी केले.

    या विषयांचा आढावा

    दिशा समितीच्या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, खनीज विकास, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण, दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महानेट, विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्य आणि केंद्र पुरस्कृत योजनांचे अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, एकात्मिक बालविकास योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री पीक विमा योजना, शिक्षण व इतर विषयांचा आढावा घेण्यात आला.

  • चंद्रपुरात केंद्र सरकारविरोधात कांग्रेसचे निषेध आंदोलन

    चंद्रपुरात केंद्र सरकारविरोधात कांग्रेसचे निषेध आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित करणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. तर, लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सत्ताधारी पक्षाचे काम आहे. यासर्व बाबी संविधानात नमूद आहेत. मात्र, अधिवेशन काळात संसदेत घडलेल्या स्मोक हल्ल्याच्या घटनेवर निवेदनाची मागणी करणाऱ्या तब्बल १४२ खासदारांचे केंद्र सरकारने निलंबन केले आहे. यातून केंद्र सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (ता. २२) दुपारी ३.३०  वाजता गांधी चौकात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

    यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, कामगार नेते प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांची उपस्थिती होती.

     

    भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाच्या भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावे, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून करण्यात आली. या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नींची उत्तरे देण्याऐवजी केंद्र सरकारने १४२ खासदारांचे निलंबन केले आहे. हा लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला असल्याचे मत आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी व्यक्त केले.

     

    केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढते, ही एक प्रकारे लोकशाही तत्वांची हत्या आहे. लोकशाहीला स्मशान बनविण्याचे काम भाजपकडून सातत्याने होत असल्याचा आरोप आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केला. केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारने संविधानातील नियमांना पायदळी तुडविण्याचे काम सुरू केले आहे. खासदारांचे निलंबन करून हुकुमशाही वृत्तीची प्रचिती देशाला दाखवून दिली आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या अपमानाच्या विरोधात आपण आता पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने एकत्रितपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले.

     

    प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनीसुद्धा केंद्र सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. आंदोलनात कामगार नेते के. के. सिंग, विनोद दत्तात्रेय, गोपाल अमृतकर, अरुण भेलके, नंदू नागरकर, संतोष लहामगे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, रमिज शेख, कुणाल चहारे, प्रशांत भारती, सुनीता अग्रवाल, विना खनके, सकिना अन्सारी, उमाकांत धांडे, भालचंद्र दानव, राहुल चौधरी, हर्षित रामटेके, युसूफ भाई, पप्पू सिद्दीकी, दुर्गेश कोडाम, गोस खान, प्रमोद बोरीकर, मुन्ना तावाडे, नरेंद्र डोंगरे, प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रशांत दानव, नौशाद शेख, पितांबर कश्यप, दुर्गेश कोडाम यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

  • योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

    योजनांपासून वंचित राहिलेल्यांना संकल्प यात्रेसोबत जोडा – केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विकसीत भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून जवळपास 22 योजनांची माहिती नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्यात येत आहे. शासकीय यंत्रणेतील अधिकारी – कर्मचारी लोकांमध्ये जावून याबाबत जनजागृती करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना या यात्रेसोबत जोडा व त्यांना लाभ मिळवून द्या, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले. तर दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला.

     

    वरोरा तालुक्यातील खेमजई येथे विकसीत भारत संकल्प यात्रेदरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी आदी उपस्थित होते.

     

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे, असे सांगून केंद्रीय मंत्री श्री. पुरी म्हणाले, गत 9 वर्षात जे काम झाले आहे, आणि भविष्यात केंद्र सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी जे काम करणार आहे, अशा बाबींची माहिती या संकल्प यात्रेतून जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. सोबतच महत्वाच्या विविध शासकीय योजनांचा लाभसुध्दा या माध्यमातून नागरिकांना घरपोच मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे या यात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. योजनांपासून वंचित असलेल्यांना यात सहभागी करावे. विकसीत भारत संकल्प यात्रेअंतर्गत देशभरात 3200 एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत सदर व्हॅन 65 हजार गावांमध्ये आणि 5 हजार शहरात गेली असून ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ अंतर्गत 1 कोटी 80 लक्ष लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले आहे.

     

    पुढे श्री. पुरी म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात सुरवातीला 102 पेट्रोलपंप होते, आज 131 पेट्रोलपंप आहेत. 2014 मध्ये जिल्ह्यात 3 लक्ष 34 हजार एल.पी.जी गॅस कनेक्शन होते. ती संख्या आज चंद्रपूर जिल्ह्यात 6 लक्ष 32 हजार झाली असून जिल्ह्यातील 34495 कुटुंबांना उज्वला गॅस योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 2014 मध्ये देशात 14 कोटी नागरिकांकडे गॅस कनेक्शन होते. आता 2023 मध्ये हा आकडा 32 कोटींवर पोहचला आहे. सन 2014 पर्यंत केवळ 1 लक्ष 5 हजार नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला होता, तर 2014 पासून 2023 पर्यंत ग्रामीण आणि शहरी मिळून 4 कोटी नागरिकांना आवास योजनेंतर्गत घरकूल देण्यात आले आहे. गत सरकारमध्ये देशातील 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती तर आज 2023 पर्यंत 6 लक्ष 50 हजार गावांमध्ये विद्युतीकरण झाले आहे. तसेच देशात आजच्या घडीला 50 कोटींपेक्षा जास्त लोकांचे बँकखाते काढण्यात आले आहे. तसेच आज जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे, भविष्यात ती तिस-या क्रमांकावर पोहचणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

     

    विकसीत भारत या संकल्पात चंद्रपूरचे मोठे योगदान राहील : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

     

    केंद्र सरकारने नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. शेतक-यांच्या खात्यात 6 हजार रुपयांचा थेट लाभ, आयुष्मान भारत अंतर्गत मोफत आरोग्य सेवा आदी योजनांचा यात समावेश आहे. या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून चित्ररथ आल्या दारी येत आहे. गावातील लोकांनी या योजनांचा फायदा घ्यावा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसीत भारत हा संकल्प आहे. जग बदलविण्यासाठी आपणही संकल्प करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मिशन शौर्य, मिशन जयकिसान, मिशन ऑलंपिक, अयोध्येच्या राममंदिरासाठी काष्ट, नवीन संसद भवनासाठी चंद्रपूरचे लाकूड अशा अनेक बाबी करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा असल्यामुळे विकसीत भारत या संकल्पात चंद्रपूरचे मोठे योगदान राहील, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

     

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतींपैकी आतापर्यंत 273 ग्रामपंचायतींमध्ये विकसीत भारत संकल्प यात्रा गेली आहे. यात एकूण 1 लक्ष 42 हजार 595 नागरिक सहभागी झाले आहेत. यात्रेदरम्यान 17558 कुटुंबाची आरोग्य तपासणी, 2557 जणांची उज्वला गॅस कनेक्शनकरीता नोंदणी, 6300 जणांना आयुष्मान भारतचा लाभ देण्यात आल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

     

    सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.