Tag: ओबीसी आंदोलन

  • मनोज जरांगे यांना वाघाच्या जिल्ह्यातून ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांचं आव्हान

    मनोज जरांगे यांना वाघाच्या जिल्ह्यातून ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांचं आव्हान

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यभर मराठा आरक्षणाला घेवून जो असंवैधानिक मागणीचा उन्माद मांडलेला आहे, त्यास पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्हा क्रांतीभूमीतून उत्तर देण्याचे कार्य विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनातून ओबीसीतील सर्व जातसमुहांच्या प्रतिनिधींनी ओबीसी बचाव परिषदेतून आज (दि.१७) ला येथे केले आहे.

     

    ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर महाराष्ट्र पेटवू, ओबीसींच्या संयमाची व शांततेची परीक्षा घेवू नका, ओबीसी खडा तो सरकारसे बडा हे लक्षात ठेवा, व जरांगेला जशास तसे उत्तर देवू, जरांगेला अटक करा, असे ओबीसी बचाव परिषदेने ठणकावून सांगितले आहे.

     

    राज्यस्तरीय ओबीसी बचाव परीषद आज (दि.१७) ला स्थानिक जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्रातील ओबीसीतील सर्व जातसमुहांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. या परिषदेत ओबीसीतील सर्व जातसमुहांच्या प्रतिनिधींची वज्रमूठ बांधण्यात आली.

     

    जरांगे हे त्यांच्या सभांमधून बेताल वक्तव्य करीत आहेत. मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका वारंवार बदलत आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागत आहे. हे सर्व प्रकार असंवैधानिक आहेत. त्यामुळे ओबीसी बचाव परिषदेत मनोज जरांगे यांच्या बेताल, द्वेशपूर्ण व ओबीसी नेत्यांच्या तथा राज्य सरकारच्या विरोधातील वक्तव्याचा जाहीर निषेध करून ठराव घेण्यात आला. राज्य सरकारच्या ओबीसीबद्दलच्या काही निर्णयाचे व भूमिकेचे अभिनंदन करून ठराव घेण्यात आले तर राज्य व केंद्र सरकार संबंधित मागण्यांचे ठराव घेण्यात आले, सोबतच ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या पाठीशी ओबीसी समाज एकमताने उभा राहील, असेही ठरले.

     

    ओबीसी बचाव परिषदेत प्रामुख्याने प्रधानमंत्री घरकुल योजनेत महाराष्ट्र ओबीसींना दहा लाख घरे बांधून देण्याचा निर्धार, बार्टी, सारथी, व महाज्योती यांना देण्यात येणाऱ्या निधीत एकसारखेपणा आणल्याबद्दल, ओबीसींच्या विविध योजनांसाठी ३३७७ कोटी रुपयांची भरीव तरतूद, ७२ पैकी ५२ वसतिगृह तात्काळ सुरू केली, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्वाधार योजना, यासाठी राज्य सरकारचे अभिनंदन तर ओबीसी योद्धे रविंद्र टोंगे, प्रेमानंद जोगी, विजय बल्की, अक्षय लांजेवार, अजित सुकारे यांचे अभिनंदन आदी अभिनंदनाचे ठराव घेण्यात आले आहे.

     

    सोबतच राज्य व केंद्र शासनाशी संबंधित मागण्यांचे ठराव देखील घेण्यात आले आहे. ज्यात, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून त्यांचे ओबीसीकरण करू नये, बिहारच्या धरतीवर ओबीसी जातनिहाय जनगणना सर्व्हे करावी व ओबीसींना २७% आरक्षण द्यावे, ओबीसी शेतकऱ्यांना वनहक्क पट्ट्यासाठी लागणारी तीन पिढ्यांची अट रद्द करा, महात्मा ज्योतिबा फुले यांचे समग्र वांग्मय दहा रुपये मध्ये उपलब्ध करून द्या, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी राज्य सरकार सोबत पार पडलेल्या बैठकीतील इतिवृत्त मधील सर्व मागण्यांची पूर्तता होण्यासाठी सरकारने तात्काळ पाऊल उचलावे, महाराष्ट्र शासनाने ओबीसींचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी मेगा नोकर भरती त्वरित सुरू करावी, एससी,एसटी प्रमाणे शासकीय सर्व योजना ओबीसी शेतकऱ्यांना देखील १००% सवलतीवर राज्यात सुरू करा, खाजगी उद्योगधंद्यात व उपक्रमात ओबीसी समाजासाठी आरक्षण लागू करा, प्रत्येक तहसील व जिल्हास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची व्यवस्था करण्यात यावी, शेतमाल खरेदी करण्याकरिता उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव निश्चित करून एकाधिकार पद्धतीने खरेदी करण्यात यावी, शामराव पेचे आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर ओबीसीतील कमकुवत जातींसाठी विदर्भ मराठवाडा व इतर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, दिनांक ४ मार्च २०१९ च्या सुप्रीम कोर्टाचे आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत सुरू करण्याकरिता संविधानाच्या कलम 243 डी (६) व कलम 243 सी (६) मध्ये सुधारणा करून देशातील ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे, ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमिलियरची अट त्वरित रद्द करण्यात यावी, तोपर्यंत नॉन क्रिमिलियर मर्यादा वीस लाख रुपये करण्यात यावी, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोपरान्त भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, केंद्रात व राज्यात एससी, एसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना शंभर टक्के सबसिडी योजना लागू करण्यात यावी, ओबीसी व सर्वच शेतकरी तथा शेतमजुरांना साठ वर्षे वयानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, आदी मागण्यांचे ठराव घेण्यात आले. हे सर्व ठराव राज्य व केंद्र सरकारला पाठविण्याबाबत ठरले आहे.

     

    यावेळी ओबीसी समाजातील बहुतांश जातसमुदायातील प्रतिनिधी उपस्थित होते. ओबीसीतील तेली, माळी, धनोजे कुणबी, तिरळे कुणबी, खेडूले कुणबी, खैरे कुणबी, मुस्लिम, धोबी, लोहार, मेरू शिंपी, पद्मशाली, कुंभार, गानली, भावसार, कोळी, भोई, नाभिक, सोनार, मयात्मज सुतार, गवळी, बेलदार, कापेवार, बारई, कलार, वंजारी, लिंगायत, धनगर, कुरमार, गोलकर आदी अनेक जातसमूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  • ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, भीक मांगो आंदोलन

    ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, भीक मांगो आंदोलन

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमुरच्या वतीने अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मंजूर न झाल्याने भीक मांगो आंदोलन करून शासनाचा निषेध केला व आंदोलनात जमा झालेला निधी शासनाकडे जमा करणार आहेत.

     

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबर ला चंद्रपुरात येऊन 20 दिवस चाललेल्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत आश्वासन देऊन आंदोलन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नसल्यामुळे दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून दुसऱ्या टप्प्याचे अन्न त्याग आंदोलन सुरू झाले.

     

    राष्ट्रीय महासंघाचे आंदोलन तीव्र होत चालले असून अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी साखळी उपोषण सोबत भीक मांगो आंदोलन घेण्यात आले. चिमूर येथील तहसील कार्यालय परिसरातील व्यवसाईकाकडून राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम लेंडे. जिल्हा उपाध्यक्ष राजू हीवजे. तालुका अध्यक्ष मारोतराव अतकरे यांचे नेतृत्वात पैसे रुपात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. आर्थिक रुपात जमा झालेला निधी राज्य सरकार कडे जमा करणार असल्याची माहिती आंदोलन दरम्यान देण्यात आली.

     

    यावेळी रामभाऊ खुडसिंगे. प्रभाकर लोथें. प्रभाकर पिसे. श्रीकृष्ण जिल्हारे. श्रीहरी सातपुते. रामदास कामडी. नागेंद्र चट्टे. अविनाश अगडे. सविता चौधरी. भावना बावनकर. दुर्गा सायम. मंगला बोरकर शेवंता बोरकर. मीना चौधरी. रेखा मोहिनकर प्रीती दीडमुठे. प्रमिला ठाकरे व बहुसंख्यांक ओबीसी बांधव उपस्थित होते.

  • थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

    News34 chandrapur

    चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू झाले. अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देत दिनांक 8 डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. साखळी उपोषणाला भरपूर पाठिंबा मिळत असल्याने आज तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी बजाव आंदोलन करण्यात आल्याने आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर आहे.

     

    7 डिसेंबर 2023 पासून चिमूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले असून शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलक अजित सूकारे व अक्षय लांजेवार यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी श्रीहरी सातपुते, अविनाश अगडे, पप्पू शेख, अमोल जूनघरे यांनी साखळी उपोषण सुरू केले. अन्न त्याग आंदोलनाचा तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी वाजवुन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले.

     

    यावेळी यामिनी कामडी, दुर्गा निवटे, विजया तरारे, सुनीता सहारे, कपिला चावरे, सुनीता मुरकुठे, रेखा चाचारकर, मंदा रंधये, पुज्या नन्नावरे व शेकडो ओबीसी महिला पुरुष व विवीध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

  • ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी दोघांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

    ओबीसी समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी दोघांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

    News34 chandrapur

    चिमूर – ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य न झाल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 दिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे.

     

    चंद्रपूर येथे ओबीसींच्या मागन्यासाठी रविंद्र टोंगे. विजय बल्की आणि प्रेमानंद जोगी यांनी 11 सप्टेंबर पासून आंदोलन सुरू केले होते. दरम्यान ओबीसींच्या शिष्टमंडलासोबत शासनाच्या झालेल्या चर्चेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबरला चंद्रपुरात येऊन अन्नत्याग आंदोलन आश्वासन देऊन सोडविले होते. परंतु ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मान्य झाल्या नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने चिमूर क्रांतीभूमीतून 7 डिसेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांचे आंदोलन सुरू झाले आहे.

     

    चिमूर नगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रलीच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलक अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांना तहसील कार्यालयच्या बाजूला उपोषण मंडपात उपोषणाला बसविण्यात आले.

     

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, राज्य उपाध्यक्ष डॉ सतीश वारजूकर, ओबीसी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम लेडे, राष्ट्रिय ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे, दिनेश कष्टी. माधव डूकरे, अशोक सोनटकके, मारोती अतकरें, चिमूर चे तालुकाध्यक्ष उपस्थित होते

  • ओबीसी आंदोलनातील नायकाचे जंगी स्वागत

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात ओबीसी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.दरम्यान तब्बल 20 दिवस रवींद्र टोंगे यांनी ओबीसींच्या मागण्यांकरिता केलेला अन्नत्याग, ओबीसींच्या भावी पिढी करता सातत्याने लढत राहण्याची तयारी अन्नत्याग आंदोलनाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला लढण्याची एक नवी जिद्द देत होती.

     

    रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन लिंबू पाणी देऊन सोडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोंगे यांना ‘आता तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. सलग 20 दिवस उपोषण केल्यामुळे तुमच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. तुम्ही समाजासाठी महत्त्वाचे आहात. तुमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आता प्रकृतीकडे लक्ष द्या. तुम्ही रुग्णालयात उपचार करा’ असा सल्ला दिलानंतर ते चंद्रपूरातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सौरभ राजूरकर यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याने आज 2ऑक्टोबर ला त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आल्यानंतर चंद्रपूर लगतच असलेल्या त्यांच्या मूळ गावी वेंडली येथे रवाना केले.

     

    वेंडली या ओबीसी बहुल गावातील एका तरुणाने ओबीसींच्या न्यायिक मागण्यांकरिता तब्बल वीस दिवस अन्नत्याग उपोषण केल्यामुळे गावातील प्रत्येक नागरिक हा गर्वाणवीत झाला होता झाला होता. आज 22 दिवसानंतर रवींद्र गावात आल्याने कुटुंबीय व नागरिकांनीं त्याचे जल्लोषात स्वागत करत त्याचे कौतुक केले.

     

    11 सप्टेंबर 2023 पासून रवींद्र टोंगे यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यानंतर 17 सप्टेंबर ला चंद्रपुरात निघाला ओबीसींनीं महामोर्चा काढून शासनाचे आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले होते.18 सप्टेंबर आंदोलनस्थळी भेट देत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलन मागे घेण्याची केली विनंती केली मात्र सरकार सोबत चर्चेचे कोणतेही कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने टोंगे यांनी आंदोलन सूरू ठेवण्याचा निर्धार पालकमंमंत्र्यांना सांगितला. त्यानंतर 19 सप्टेंबर ला टोंगे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाने केली शासन निर्णयाची होळी केली.

     

    20 सप्टेंबर ला ओबीसी विद्याथ्यांच्या न्याय मागण्यासाठी ‘भीक मांगो’सत्याग्रह करण्यात आला.मात्र 22 सप्टेंबर ला रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविन्यात आल्यावरही त्यांनी रुग्णालयात सुद्धा अन्नत्याग करत उपोषण सुरूच ठेवले.

     

    पुढे 23 सप्टेंबर ला चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम, उपोषणस्थळी विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यावर 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने राज्य सरकारची प्रेतयात्रा काढत तीव्र निषेध व्यक्त केला. याची परिनीती पुढे जिल्हाभर 25 सप्टेंबर ला ओबीसी समाजातर्फे जिल्ह्यातील सर्व तालुकास्थळी साखळी उपोषण करण्यात आले. 26सप्टेंबर रोजी विरोधी पक्ष नेते विजय वाडेट्टीवर यांनी उपोषण स्थळाला भेट देत ओबीसी मागण्या जाणून घेतल्या.

     

    28 सप्टेंबर ला राज्य ओबीसी शिष्टमंडळाची सरकारशी सकारात्मक झाल्यावर चर्चा आंदोलन मागे घेण्याचे महासंघाने दिले स्पष्ट संकेत, चंद्रपूर जिल्हा बंद स्थगित करण्यात येऊन 30 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता झाल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी जाहीर केले.

    कोण आहेत रवींद्र टोंगे?

    रवींद्र यांचा आधार नोंदणी ऑपरेटर ते आंदोलक असा प्रवास झाला आहे. रवींद्र हे चंद्रपूर तालुक्यातील वेंडली या गावातील आहे. रवींद्रकडे सहा एकर शेतजमीन आहे. त्यांच्या घरी पत्नी, सहा महिन्यांचा मुलगा, आई-वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांनी गोंडवाना विद्यापीठाची एम.कॉमची पदवी घेतली. ‘टॅली’ चा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आधार नोंदणी चालक म्हणून दोन वर्षे काम केले. खासगी कंपनीच्या माध्यमातून लेखापाल विभागात काम केले.

     

    ग्रामपंचायतीत माहिती प्रवेश चालक म्हणूनही काम केले. 35 वर्षीय या युवकाला पुढे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून व्यवसायात जायचे आहे. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मागे हटणार नाही अशी भावना त्यांच्या अंगी होती. त्यातूनच ते ओबीसी महासंघाशी जुळले. त्या कार्याने वरिष्ठ प्रभावित होऊन मागील आठ वर्षांपासून ते ओबीसी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत.

  • चंद्रपुरातील ओबीसी आंदोलनावर तोडगा

    News34 chandrapur

    चंद्रपुर – मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे या मागण्यांसाठी मागील 22 दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनावर आज अखेर 29 सप्टेंबर रोजी तोडगा निघाला.

     

    मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहावर आज दुपारी 2 वाजता राज्यातील ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये ओबीसींच्या सर्व मागण्या तत्वतः मान्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच या मागण्यांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सुद्धा राज्य सरकारने दिल्यामुळे ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 22 दिवसापासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले.

     

    या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ,अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे ,महासचिव सचिन राजूरकर तसेच अशोक जीवतोडे, दिनेश चोखारे एडवोकेट पुरुषोत्तम सातपुते, डॉ.संजय घाटे, सूर्यकांत खनके, मनीषा बोबडे ,अनिल शिंदे, अनिल डहाके इत्यादी ओबीसी नेते उपस्थित होते.

     

    शनिवार दिनांक सकाळी नऊ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मंडपाला भेट देऊन उपोषणकर्ते रवींद्र टोंगे, विजय बल्की व प्रेमानंद जोगी यांचे उपोषण सोडवतील. त्यानंतर अधिकृतपणे आंदोलन स्थगित केल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे जाहीर करण्यात येईल.

    चंद्रपूर जिल्हा बंद स्थगित

    राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी पुकारण्यात आलेल्या चंद्रपूर जिल्हा बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. राज्य शासनाने या संदर्भात सकारात्मक ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात शासनाने दिलेल्या भूमिकेचे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे स्वागत करतो.शासनाने मागण्या मंजूर केल्या असून त्याची तातडीने अमलबजावणी करण्यात यावी.

  • ओबीसी संघटनांची राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सोबत आज महत्वाची बैठक

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी चंद्रपुरात मागील 19 दिवसांपासून रविंद्र टोंगे, विजय बलकी व आजपासून प्रेमानंद जोगी हे आमरण उपोषणाला बसले आहे, तब्बल 19 दिवसांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात ओबीसी शिष्टमंडळाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

     

    ओबीसी समाजाच्या विविध मागणीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार असून सदर बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव महाराष्ट्र, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी सचिन राजूरकर, दिनेश चोखारे, डॉ. संजय घाटे, पुरुषोत्तम सातपुते, अनिल डहाके, मनीषा बोबडे, बबलू कटरे, सूर्यकांत खनके, अनिल शिंदे हे उपस्थित राहणार आहे.

     

    मलबार हिल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात 29 सप्टेंबर ला दुपारी 2 वाजता आयोजित या बैठकीत ओबीसी संघटनांच्या विविध मागण्यांवर काय चर्चा व तोडगा निघणार यावर सर्व ओबीसी संघटनांचे लक्ष लागले आहे.

  • चंद्रपुरात राज्य सरकारची प्रेतयात्रा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, व इतर मागण्या घेऊन रवींद्र टोंगे या युवकाने 11 सप्टेंबर पासून उपोषण सुरू केले. टोंगेची हृदयगती, रक्तदाब आणि साखरेची पातळी खालावल्याने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.दिनांक 22 सप्टेंबर उपोषण स्थळी विजयराव बलकी व प्रेमानंद जोगी यांनी अन्नत्याग करत उपोषण सूरू केले.असे असताना राज्य शासनाने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय जाहीर केला नाही किंवा आश्वासन दिले नाही. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र करण्याकरिता आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिला आहे.

     

    चौदा दिवसांनंतरही राज्य शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ओबीसी समाजातर्फे सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा ऍड. दत्ता हजारे, ऍड. पुरुषोत्तम सातपुते,नंदू नागरकर, राजू बनकर यांनी तिरडी काढून केंद्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवर यांच्या निवासस्थानावर राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली.

     

    पोलिसांनी शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले सहीत, दिनेश चोखारे,बबनराव फंड ,अनिल धानोरकर,रवींद्र शिंदे, सतीश भिवगडे, राजेश नायडू,पप्पू देशमुख,कुणाल चहारे, महेश खंगार,प्राअनिल शिंदे, निलेश बेलखेडे, अनिल डहाके, राहूल चौधरी,गणेश आवारी ,पांडुरंग टोंगे,राजेश बेले,सचिन निंबाळकर, रंजित डवरे ,गोपाल अमृतकर, डॉ. किशोर जेणेकर, धनराज आस्वले, विलास माथणकर, सुनील वाढई, भालचंद्र दानव,पारस पिंपळकर, मनीष बोबडे,गोमती पाचभाई,मायताई ठावरी, कुसुम उदार,विद्याताई वडस्कार, मंजुषा मालेकर, देवा पाचभाई,गणेश झाडे,योगेश बोबडे, अक्षय येरगुडे, विनोद निब्रड,बाळा पिंपळशेंडे,अशोक उपरे, भाऊराव झाडे, भाविक येरगुडे,राहुल भोयर सहीत अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

     

    या प्रतिकान्मक तिरडी नंतर प्रा सूर्यकांत खनके व सतीश मालेकर यांनी मुंडण करवून घेत राज्य सरकार चा जाहीर निषेध व्यक्त केला. कोड -२५ सप्टेंबरला सर्व तालुकास्थळी साखळी उपोषण आंदोलन व ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद करण्याचा निर्णय राष्ट्रिय ओबीसी महासंघ , ओबीसी संघटनांनी व सर्व जातीय संघटना यांनी घेतला आहे.

  • चंद्रपुरात ओबीसी संघटना झाल्या आक्रमक

    News34 chandrapur

    चंद्रपूर : ओबीसी प्रवर्गातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी रवींद्र टोंगे हा युवक मागील बारा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसला असताना याची राज्य शासनाने अद्याप ठोस अशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे या आंदोलनाचे पुढचे पाऊल म्हणून ओबीसी समाजाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी काही वेळासाठी नागपूर-चंद्रपूर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांच्यासह अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना अटक केली. Fight for obc reservation

     

    मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देवू नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले.

     

    मात्र काल बाराव्या दिवशी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. त्यांची हृदयगती, रक्तदाब आणि शुगर पातळी खालावल्याने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. असे असताना राज्य शासनाने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय जाहीर केला नाही किंवा आश्वासन दिले नाही. त्यामुळे हे आंदोलन आणखी तीव्र करण्याकरिता आज ओबीसी समाजाने चंद्रपूर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले.

     

    आंदोलनात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिव सचिन राजुरकर, बबनराव फंड होते. बैठकीला दिनेश चोखारे, नंदू नागरकर, प्रा. अनिल डहाके, निलेश बेलखेडे यांची उपस्थिती होती. जनता महाविद्यालय चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू केले. काही वेळ वाहतूक
    खोळंबली होती. मात्र यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेणे सुरू केले.

    24 सप्टेंबरला शासन, लोकप्रतिनिधींची प्रेतयात्रा

    २४ सप्टेंबरला आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून प्रेतयात्रा काढण्यात येईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यंमत्री, बहुजन कल्याणमंत्री यांच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली जाईल. त्यानंतर केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरावर ओबीसी कार्यकर्ते ठिय्या देतील. २५ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यातीस सर्व तालुकास्तरावर लाक्षणिक आंदोलन केले जाईल. ३० सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे.

  • अन्नत्याग आंदोलनकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती ढासळली

    News34 obc vs maratha

    चंद्रपूर – 11 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आमरण उपोषणाचा 12 वा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

     

    जातनिहाय जनगणना, ओबीसी वसतिगृह, स्वाधार योजना अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.

     

    त्यानंतर 17 सप्टेंबर ला ओबीसी संघटनांचा महामोर्चा काढण्यात आला होता, मात्र टोंगे यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधी दखलही घेतली नसल्याने आता आंदोलनाचे काय होणार? हा मोठा प्रश्न ओबीसी संघटनांना पडला आहे.

     

    टोंगे यांच्या आंदोलनाला विविध संघटना व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे,  21 सप्टेंबरला भारत राष्ट्र समितीने टोंगे यांच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले.

     

    भारत राष्ट्र समितीने दिला टोंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा

    मागील 11 दिवसांपासून ओबीसी शेतकरी पुत्र रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भारत राष्ट्र समिती जिल्हा चंद्रपूर तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

    Bharat rashtra samiti chandrapur
    टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भारत राष्ट्र समितीने दिला पाठिंबा

    मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये.महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी. OBC विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी या सर्व रास्त व प्रमुख मागण्यासाठी मागील 11 दिवसापासून रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे.

     

    भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आंदोलन स्थळी भेट देत रवींद्र टोंगे यांच्या तब्येतीची विचारपूस करीत चर्चा केली याप्रसंगी सचिन भाऊ राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपस्थित होते. ओबीसी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभाचे नेते भूषण फुसे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र शासन हे OBC समुदायाबद्दल उदासीन आहे.

     

    भूषण फुसे असेही म्हणाले की शांतता प्रिय OBC समुदायाला महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नाही आणि म्हणूनच 11 दिवस लोटूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. OBC समुदाय संघर्ष करायला तयार आहे आणि पुढे परिस्थिती चिघळल्यास महाराष्ट्र शासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा फुसे यांनी यावेळी दिला.

     

    याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक वंमशी श्रीकृष्ण अरकिल्ला, अशोक पोरेड्डीवार राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, प्रदीप येरकल्ला, मनोहर डोरलीकर सुनील ठाकूर, गणेश चौधरी, प्रवीण आरापल्ली सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.