science exhibition chandrapur : चंद्रपूर ९ डिसेंबर (News३४) : आदिवासी विकास विभाग, नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने नागपूर विभागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विभागीय क्रीडा स्पर्धा व विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 13 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे ही स्पर्धा उत्साहात पार पडणार आहे. अपर आयुक्त (आदिवासी विकास) आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. (हे हि वाचा – सुगंधित तंबाखू माफियांवर आता थेट मकोका, मुख्यमंत्री फडणवीस)
३५०० विद्यार्थी सहभागी होणार
या स्पर्धेत नागपूर विभागातील एकूण ९ प्रकल्पांतील सुमारे ३५०० विद्यार्थी सहभागी होणार असून कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल या सांघिक स्पर्धांसोबतच 100 मी., 200 मी., 400 मी., 1000 मी., 5000 मीटर धावण्याच्या शर्यती, रिलेसह गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, उंच उडी अशा विविध ॲथलेटिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसोबत प्रकल्पातील खेल समन्वयक, शिक्षक व संघ व्यवस्थापकांसह सुमारे 300 कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
शिस्तबद्ध व्यवस्था सुनिश्चित
तिन्ही दिवसांच्या या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था केली असून विविध ठिकाणी प्रकल्पनिहाय निवास केंद्रांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक स्थळी आवश्यक कर्मचारी नियुक्त करून शिस्तबद्ध व्यवस्था सुनिश्चित करण्यात आली आहे. science exhibition chandrapur
पहिल्यांदाच विभागीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन
प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या विभागीय प्रदर्शनीत आपापल्या प्रतिकृती सादर कराव्यात, यासाठी विशेष मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन व नवकल्पनाशीलता वाढावी या उद्देशाने पहिल्यांदाच विभागीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे.
संपूर्ण क्रीडा स्पर्धेचे नियोजन विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी, चंद्रपूर यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून त्यांच्या उपक्रमशील कार्यपद्धतीमुळे प्रकल्पात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांना नेहमीच गती मिळत आली आहे.
सहभागी प्रकल्प
नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भामरागड, अहेरी, देवरी, भंडारा व चिमूर — असे एकूण ९ प्रकल्प या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही उत्कृष्ट संधी
“एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर येथे विभागीय क्रीडा स्पर्धा व प्रथमच विभागीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन होत असून नागपूर विभागातील ३५०० विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. क्रीडा, ॲथलेटिक्स आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रांत विद्यार्थ्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही उत्कृष्ट संधी आहे. विज्ञान प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित होईल तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे त्यांच्या सर्वांगीण विकासास प्रोत्साहन मिळेल.
चंद्रपूर येथील नागरिकांनी जिल्हा क्रीडा संकुल येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असा मनापासून आग्रह आहे.” — विकास राचेलवार, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर.
Leave a Reply