Tag: कामबंद आंदोलन

  • Electrical Contract Workers : कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

    Electrical Contract Workers : कंत्राटी कामगारांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील सर्व कंत्राटी वीज कामगार हे अनुभवी व कुशल असून मात्र त्यांना स्थायी कामगार पेक्षा वेतन मिळत नाही. वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी आंदोलने झाली मात्र शासन दरबारी त्याचा निकाल लागला नाही. Mahavitran

     

     

    त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या 30 संघटना एकत्र येत कृती संघटना स्थापन केली. प्रलंबित मागणीविरोधात टप्प्या टप्प्याने आंदोलने झाली आता 28 व 29 फेब्रुवारीला 48 तासाचे कामबंद आंदोलन सुरु केले आहे. Contract worker

     

    यावेळी चंद्रपूर महावितरण बाबुपेठ येथे 28 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता वीज कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु केले यावेळी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने मिलींद गवई यांनी कामगारांच्या मागण्याबाबत माहिती दिली.

  • Shivani Wadettiwar : कामगार क्षेत्रात शिवानी वडेट्टीवार यांच्या “विजयी क्रांतीला” सुरुवात

    Shivani Wadettiwar : कामगार क्षेत्रात शिवानी वडेट्टीवार यांच्या “विजयी क्रांतीला” सुरुवात

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  औद्योगिक जिल्हा म्हणून सर्व दूर परिचित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. मात्र स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांचा भरणा तसेच स्थानिकांना अल्प वेतनात तसेच अनियमित काम देत कामगारांची थट्टा करणाऱ्या सिमेंट कंपनी व्यवस्थापना विरोधात विजय क्रांती संघटनेने मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तथा विजय क्रांती संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार यांनी केले. विजय क्रांती संघटनेने हाती घेतलेल्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला मोठे यश आले असून कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतल्याने कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या. यामुळे कंत्राटी कामगारांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात वाढते औद्योगीकरण हे जिल्ह्याच्या विकासात भर टाकणारे असले तरी मात्र येथे कार्यान्वित झालेल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात कामगारांची अवहेलना होत आहे. स्थानिक भूमिपुत्रांना डावलून तसेच प्रकल्पग्रस्त व इतर कंत्राटी कामगार यांना नियमित कामावर न घेता तसेच कामावर घेत असल्यास त्यांना अल्प वेतन देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील कंपनी व्यवस्थापनाकडून होत आहे. अशातच कामगारांच्या प्रश्नांना घेऊन वेळोवेळी आंदोलने करणारी जिल्ह्यातील नामवंत विजय क्रांती कामगार संघटना यांनी कटाक्षाने कंपनी व्यवस्थापनाच्या पिळवनुकी विरोधात गेल्या दोन दिवसापासून आंदोलन छेडले. यात विजय क्रांती कामगार संघटनेचे नांदा फाटा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनी, व घुगुस येथील एसीसी सिमेंट कंपनी या कंपन्यांच्या विरोधात संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलनाद्वारे निदर्शने करण्यात आली.

     

    तर विजय क्रांती संघटनेच्या सर्वेसर्वा तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. याची गंभीर दखल घेत चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज तीनही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांना बोलवून तसेच विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार व त्यांचे सहकारी यांना निमंत्रित करून यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

     

    पार पडलेली चर्चा ही कामगाराच्या हिताची ठरली असून यात कंत्राटी कामगारांच्या वेतनाबाबतचा प्रश्न तसेच त्यांना नियमित काम देण्यात यावे व स्थानिक भूमिपुत्रांच्या मागण्या याबाबत करण्यात आलेली सकारात्मक चर्चा यावर कंपन्या व्यवस्थापनांनी नरमाई घेत येत्या 1 एप्रिल 2024 पासून सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे लेखी स्वरूपात दोन दिवसाचे आत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येईल अशी भूमिका घेतल्याने कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.हे विजय क्रांती कामगार संघटनेचे मोठे यश असून कामगारांच्या यशस्वी लढा सार्थक ठरल्याचे मत विजय क्रांती संघटना अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी कळविले आहे.

     

    जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस प्रामुख्याने विजय क्रांती संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार, कार्याध्यक्ष प्रवीण लांडगे, विजय क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष विजय ठाकरे,युवक काँग्रेसचे शिवा राव, बल्लारपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल करीम शेख, युवक काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, उपाध्यक्ष रमेश शेख, युवक काँग्रेसचे कुणाल चाहारे,सचिन कत्याल, भानेश जंगम, प्रफुल जाधव, शालिनी भगत ,कुणाल गाडगे, राजेश नक्कनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

     

    हा विजय म्हणजे कामगारांच्या संघटित लढ्याची यश – शिवानी वडेट्टीवार
    चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक व अंबुजा या सिमेंट कंपन्यातील कामगार तसेच घुगुस येथील एसीसी सिमेंट कंपनी मधील कामगार यांनी विजय क्रांती कामगार संघटनेवर विश्वास ठेवून आमचे नेतृत्वात कंपनी व्यवस्थापना विरुद्ध संघटित होऊन जो लढा दिला हे त्या लढ्याचे फलित असून आता कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांची आर्थिक पिळवणूक होणार नाही. अन्याय विरुद्ध लढा असे विजय क्रांती कामगार संघटनेचे ब्रीद असून कामगारांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्राधान्य क्रमाने प्रयत्नशील राहू व लवकरच कामगारांना अपेक्षित वेतन व काम मिळेल. असे प्रतिपादन प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस तथा विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर प्रतिक्रिया देताना मत व्यक्त केले.

  • घुग्घुस येथे हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे आंदोलन

    घुग्घुस येथे हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालकांचे आंदोलन

    News34 chandrapur

    घुग्घुस – केंद्र सरकारने आणलेल्या सुधारित हिट अँड रन कायद्याविरोधात पुन्हा घुग्घुस येथे HRG कंपणीमधील ट्रक चालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

    सदर ट्रक चालक वेकोली कोळसा खाणीत माती व कोळश्याची वाहतूक करणारे ट्रक चालवितात.

     

    2 दिवसापासून देशात पुन्हा आंदोलन होणार अशी कुजबुज सुरू झाली होती, नागरिकांनी पुन्हा पेट्रोल पंपावर गर्दी सुद्धा केली मात्र ती अफवा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते, सध्या समाज माध्यन्मावर अशा अफवा पसरत असून त्यावर विश्वास करू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

     

    त्यानंतर सुद्धा आज घुग्घुस येथील ट्रक चालकांनी संप पुकारला यावेळी बैरम बाबा मंदिर परिसरात घुग्घुस पोलिसांनी अनुचित घटना घडणार नाही याकरिता बंदोबस्त लावण्यात आला आहे.

  • आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापन हादरले

    आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या दणक्याने कर्नाटक एम्टा व्यवस्थापन हादरले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या कोळसा खाणीमुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त, कामगार व ग्रामस्थांच्या विविध समस्यां व मागण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक एम्टा खाणीतील माल वाहतूक बंद करण्यात आली. याची दखल घेत व्यवस्थापकाने महत्वाच्या मागण्या तात्काळ मान्य करीत उर्वरित मागण्या दोन महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा शब्द दिला. उर्वरीत मागण्या दोन महिन्यात मान्य न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला.

     

    याप्रसंगी भद्रावती नगर परिषद नगराध्यक्ष अनील धानोरकर, कंपनी व्यवस्थांक गौरव उपाध्याय, भद्रावती काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, वरोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा काँग्रेस शहर अध्यक्ष विलास टिपले, वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजेंद्र चिकटे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, ओबीसी शहर अध्यक्ष राहुल चौधरी, माजी नगरसेवक राजेश महाजन, युवा नेते राजू डोंगे, प्रवीण बांदुरकर, अजित फाळके, विजय खंगार, मंगेश मंगाम, शशिकला इंगोले, गीता आडे, ललिता आत्राम, सरिता सुर, कविता सुफी, प्रमोद नगोसे, संदीप कुमरे, महेश मोरे, प्रशांत झाडे, लता इंदुरकर,गोरू थैम, तन्वीर शेख, छोटू धकाते, सचिन पचारे, शिवा कोंबे व परिसरातील ग्रामपंचायत मा.सरपंच, उपसरपंच,सदस्य व प्रकल्प बाधित ग्रामस्थ हजारोच्या संख्येने सहभागी होते.

     

    यावेळी कंपनीकडून मिळणारे पुनर्वसन अनुदानात वाढ करावे, चेकबरांज व बरांज (मोकासा) या दोन्ही बाधीत गावांचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे, चेकबरांज व बरांज (मोकासा) गावातील पात्र प्रकल्पग्रस्तांना ऑप्शन फार्म भरतेवेळी घराच्या मिळणाऱ्या मोबदल्याचे विवरण देण्यात यावे व घराचे दर फलक लावण्यात यावे, गावातील पुनर्वसन होणाऱ्या शेतमजुरांना शेतकऱ्यासारखी 750 दिवसाची कृषीमजुरी देण्यात यावी, शेतमजुरांना नौकरी किंवा नौकरी ऐवजी एकमुस्त 15 लाख रुपये अनुदान देण्यात यावे, कंपनी मधील कार्यरत कामगारांना HPC वेतन लागू करण्यात यावे. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना कंपनीमध्ये रोजगार देण्यात यावा, कर्नाटका एम्टा माईन्स ते कोंढा गावालगत असणाऱ्या कोल साईडींगमध्ये होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे लगतच्या गावांतील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, तसेच कोळशाच्या दिवसरात्र होणाऱ्या वाहतुकीमुळे लगतच्या शेतातील शेतपिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

     

    ज्याप्रमाणे जिएमआर व वर्धा पॉवर कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतपिकांची कृषी विभागामार्फत केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जी नुकसान भरपाई झाली ती दिली. त्याच धर्तीवर कर्नाटका पॉवर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीने सुध्दा शेतकऱ्यांच्या शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई दयावी व भविष्यात होणारी जिवीतहानी टाळण्याकरिता योग्य त्या उपाययोजना कराव्या, या कंपनीने प्रकल्पबाधीत गावांच्या विकासाकरिता आजपावेतो कुठलाही सिएसआर निधी खर्च केला नाही.या सीएसआर निधीच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना स्कूल बस देण्यात यावी या मागण्यांवर आज चर्चा करण्यात आली.

     

    तसेच पीकनुकसान भरपाई, डांबरीकरण व काँक्रिटीकरणाने रोडचे मजबुतीकरण, धुळीवर नियंत्रण, ट्रक वाहतूक ओव्हरलोड न करणे व सुरक्षित करणे, परिसरातील ग्रामपंचायतींना सुमारे १ कोटींचा सामाजिक दायित्व निधी देणे, कोंढा कढोली व चोराळा येथील स्मशानभूमी निर्माण करणे, एम्टा मधील कार्यरत कंपन्यांच्या कामगारांची सविस्तर लिस्ट संपूर्ण माहितीसह देणे, त्यात स्थानिकांना प्राधान्य देणे, सायडिंग जवळच्या १२ व्यक्तींना सेवेत सामावून घेणे, ९ आश्रित विधवा पत्नी किंवा त्यांच्या वारसांना रोजगार देणे, शेतकऱ्यांसाठी ओव्हर बर्डन चा वापर करून अप्रोच रोड निर्माण करणे, २००५ ते २०१४ पर्यंत प्रलंबित देयकांसाठी भुगतान करणे, तसेच प्रकल्पबाधित गावांचे सरपंचांसोबत मासिक बैठक घेणे त्यात स्वतः गौरव उपाध्याय किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी हजर राहतील या सर्व बाबी स्वीकृत केल्यावरच आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.

  • २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालकाचे १७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन

    २९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालकाचे १७ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मूल – ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार” प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालक कार्यरत असून ११ वर्ष काम केलेल्या संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेने केली आहे.

     

    या मागणीसाठी राज्य संघटनेच्या वतीने १७ नोव्हेंबर पासून राज्यभरात कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून मागणी मान्य होईपर्यंत कामबंद आंदोलन करणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे.

     

     

    संग्राम व आपले सरकार या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणकपरिचालक काम करत आहेत.परंतु शासनाकडून संगणकपरिचालकाना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ रोजी च्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदर असलेल्या तुटपुंज्या ६ हजार रूपये मानधनात एक हजार रुपये वाढ केली.

     

    आज महागाईच्या काळात ७ हजार रूपयाच्या मासिक मानधनात संगणक परिचालकानी स्वतःचा व कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न असताना वारंवार आश्वासन देऊन सुद्धा निर्णय होताना दिसत नाही. गतवर्षी नागपुर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान संघटनेच्या वतीने २७ व २८ डिसेंबर रोजी मोर्चा काडून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

     

    त्याची दखल घेत राज्याचे ग्रामविकासमंत्री यांनी मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र काहीच निर्णय घेण्यात न आल्याने रज्यासंघटनेच्या वतीने १७ नोव्हेंबर २०२३ पासून ग्रामपंचायत स्तरावर संगणकपरिचालकांना असलेली सर्व कामे बंद ठेऊन बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

     

    अशा आहेत मागण्या: ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात संगणक परिचालकाना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे,संगणक परिचालकाना तत्काळ २० हजार मासिक मानधन देणे,नव्याने सुरू केलेली टार्गेट सिस्टीम रद्द करणे अशा मागण्या घेऊन काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.

     

    संगणक परिचालकांचा जास्त अंत न बघता महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याबाबत निर्णय घ्यावा.: धनराज रामटेके तालुकाध्यक्ष म.रा.स.परिचालक संघटना मुल

  • कामगारांनो संप मागे घ्या – आयुक्त पालिवाल यांचे आवाहन

    News34 chandrapur

    चंद्रपूर : कचरा संकलन आणि वाहतुक या कामांवर काम करणारे कामगार 6 ऑक्टोबरपासून संपावर गेले आहेत. यामुळे सणासुदीच्या काळात चंद्रपूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. कचरा संकलनाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबाचे भविष्य बघता कामगारांनी हे संप मागे घ्यावे, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले.

    कचरा संकलन करणाऱ्या कामगारांनी पुकारलेला संप मागे घेण्यात यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्याबाबत चे पत्र दिले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करणे, 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेणे आणि वेतन चिट्ण्या नियमित देणे यांचा समावेश आहे.
    १०/१०/२०२३ रोजी उपायुक्त यांचे कक्षात सकारात्मक चर्चा झाली आहे.

     

    झालेल्या चर्चेनुसार संदर्भ पत्राच्या अनुषंगाने खालील मागण्या मान्य करण्यात येत आहे. १) जुने कंत्राटदार सेंटर फॉर डेव्हलपमेन्ट कम्युनिकेशन, जयपुर ब्रान्च नागपूर याप्रमाणे वेतन तात्काळ प्रभावाने लागू करून पुढील काळाकरीता देण्यात येईल. जुन्या वेतन आश्वासनांचे पालन करून कामगारांना नवीन वेतन देण्यात येईल. 30 मजुरांना पुन्हा नोकरीवर घेण्यात येईल आणि वेतन चिट्ण्या नियमित देण्यात येतील, असे देखील मान्य करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे.
    कामगारांनी संप मागे घेऊन 12 ऑक्टोबरपासून नियमित कचरा संकलन सुरू करावे, असे आवाहन मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी केले आहे.

     

    मागील 6 दिवसापासून सुरू असलेल्या कामगारांच्या कामबंद आंदोलनातील महत्वाची मागणी म्हणजे कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, मनपा दालनात अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत सदर मागणी पूर्ण करण्यात आली आहे.

     

    सुरू असलेला संप कामगार परत घेणार या याविषयी श्री संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन गायकवाड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

  • चंद्रपूर शहरातील कचरा संकलन 2 दिवसापासून ठप्प

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील 5 दिवसापासून चंद्रपूर मनपा अंतर्गत काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांचे कामबंद आंदोलनाने आज आक्रमक पवित्रा घेतला, कचरा संकलन करणाऱ्या वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे घंटागाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.

     

    हक्काच्या किमान वेतनासाठी कामगार आपली लढाई लढत आहे, विशेष म्हणजे मागील 5 दिवसापासून स्थानिक आमदार व मंत्री यांनी कामगारांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही, हे विशेष.

     

    कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन मागील 2 दिवसापासून बंद आहे, शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरत आहे, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कामगारांच्या आंदोलनाचा लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडच्या सदस्यांनी मनपा अधिकाऱ्यांची भेट घेतली.

     

    भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेतर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी मनपाला निवेदन सादर केले, ज्यामध्ये संपावर बसलेले कामगार यांच्या आंदोलनावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा जेणेकरून शहरात कचरा संकलनाला सुरुवात होईल, आंदोलनामुळे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     

    घंटागाडी कामगारांचे आंदोलन सुरू राहिले तर शहरातील नागरिक आपल्या घरातील कचरा चंद्रपूर मनपा कार्यालयात टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा डॉ.गावतुरे यांनी यावेळी दिला आहे.

    मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी छाया सोनूले, संगीता पेटकुले, काळूबाई चौधरी, आदींची उपस्थिती होती.

     

    कामगारांच्या हक्काच्या मागणीवर मनपा प्रशासन डोळेझाक करीत आहे ही गंभीर बाब असून त्यांची मागणी रास्त आहे, कामगारांना न्याय मिळायला हवा अशी प्रतिक्रिया डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी दिली.

  • चंद्रपुरात घंटागाडी कामगारांचे आंदोलन पेटले

    News34 chandrapur

    चंद्रपूर – केंद्र शासनातर्फे चंद्रपूर मनपाला स्वच्छता वर्गात पुरस्कार दिल्या गेला होता मात्र यामागे महत्वाची भूमिका बजावणाऱ्या घंटागाडी कामगारांना हक्काच्या किमान वेतनासाठी आंदोलन करावे लागत आहे.

     

    शहर स्वच्छ रहावे यासाठी संपूर्ण दिवस शहरातील कचरा संकलन करण्याचे मोलाचे कार्य घंटागाडी कामगार करतात मात्र या कामाचा मोबदला म्हणून त्यांना किमान वेतन दिल्या जात नाही, कंत्राटदार बदलला व नव्या कंत्राटदाराने कामगारांच्या किमान वेतनावर डल्ला मारण्याचे काम केले.

     

    आम्हाला किमान वेतन द्या या मागणीसाठी संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेने अनेकदा पाठपुरावा केला मात्र त्यांच्या मागणीकडे मनपा व संबंधित कंत्राटदाराने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने 6 ऑक्टोबर पासून घंटागाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले.

    मागील 5 दिवसापासून सुरू असलेले कामबंद आंदोलन मनपाद्वारे दडपण्याचा प्रयत्न केला गेला, कामगार कामावर येत नसल्याने शहरातील कचरा संकलन ढासळले, कंत्राटदाराने यावर शक्कल लढवीत कामगारांची पर्यायी व्यवस्था केली.

     

    ही बाब कामबंद आंदोलकांना कळताच त्यांनी सरळ कचरा संकलन वाहन मेंटनन्स कार्यालयापुढे 10 ऑक्टोबर ला सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले, आमच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.

     

    मनपा द्वारे आता या ठिकाणी बैठक घ्या आम्ही आता हटणार नाही, हा आमच्या हक्काचा लढा आहे, अशी निर्णायक भूमिका घंटागाडी कामगारांनी घेतल्याने मनपा आता काय भूमिका घेणार याकडे कामगार संघटनांचे लक्ष लागले आहे.

  • शिक्षक सेनेची मध्यस्ती आणि डॉक्टरांच्या मानधनाचा प्रश्न सुटला

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. वैद्यकीय व्यवस्थेबाबत शिंदे सरकारची कोंडी झाली आहे. एकीकडे नांदेड आणि नागपूरच्या शासकीय रुग्णालयांमध्ये शेकडो मृत्यू आणि महाराष्ट्रभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा यामुळे सरकार तोंडघशी पडली आहे, तर दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सुमारे शंभर प्रशिक्षणार्थी डॉक्टर डॉ. चंद्रपुरात गेल्या ४ महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे ते संपावर गेले आहेत.

     

    चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व इतर अधिकारी गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना केवळ आश्वासने देत होते आणि त्यांच्या देयकाचा निधी इतरत्र वापरत होते. त्यामुळे या डॉक्टरांना संपावर जावे लागले मात्र गेल्या 10 दिवसांपासून तेच आश्वासन दिले जात होते. अखेर या प्रकरणाचे गांभीर्य पाहून शिक्षक सेनेने या प्रकरणात हस्तक्षेप करत अवघ्या एका दिवसात प्रकरण पूर्णपणे मिटवले.

     

    उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित शिक्षक सेनचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष व गडचिरोली संपर्क प्रमुख राजेश नायडू हे 6 ऑक्टोम्बर ला सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांची भेट घेण्यासाठी दाखल झाले. त्यांनी या डॉक्टरांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेले जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन प्रशिक्षणार्थी डॉक्टर व आरोग्य विभाग यांच्यात मध्यस्थी करून ही समस्या तात्काळ जागेवरच सोडवण्यात आली.

     

    राजेश नायडू यांच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी संपावर असलेल्या डॉक्टरांच्या गटाशी तात्काळ चर्चा करून कोषागाराशी बोलून उद्यापर्यंत पगार देण्यास सांगितले आणि डॉक्टरांना तातडीने कामाला येण्याचा सल्ला दिला.

    संपावर असलेल्या डॉक्टरांनी आपसात चर्चा करून व राजेश नायडू यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देत संप तातडीने संपवून कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. मात्र उद्यापर्यंत आमची देणी न दिल्यास किंवा संपाबाबत आमच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यास आम्हाला आमच्या हक्कासाठी पुन्हा संघर्ष करावा लागेल, असेही ते म्हणाले.

    यानंतर शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनीही जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आभार मानले मात्र दिलेले आश्वासन पाळले नाही तर आता या डॉक्टरांसह शिक्षक सेनेच्या वतीने पूर्ण ताकदीने आंदोलन करण्याचा इशारा दिला. हा प्रश्न सोडवल्याबद्दल डॉक्टरांनी शिक्षक सेनेचेही आभार व्यक्त केले.

  • शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात डाॅक्टरांना मिळणार पोलिस सुरक्षा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – रुग्णालयात रुग्णाच्या नातलगांनी डॉक्टराला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शिकाऊ डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आंदोलन सुरु केले होते. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनकर्त्या डॉक्टरांची भेट घेत त्यांना रुग्णालयात अधिक पोलिस सुरक्षा देण्यात येणार असल्याचे सांगीतले आहे.

     

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्ती नंतर डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. तर वेतन अदा न झाल्याने डॉक्टरांच्या दुस-या संघटनेने सुरु केलेले आंदोलन सुरुच आहे. याबाबतही वरिष्ट पातळीवर चर्चा करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

     

    काल बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन आंदोलनकरत असलेल्या डॉक्टरांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. नंतर लगेच त्यांनी रुग्णालय आणि पोलिस प्रशासन यांच्या अधिका-यांची बैठक घेत डॉक्टरांना सुरक्षा देण्याच्या सूचना केल्यात. या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवने, उप वैद्यकीय अधिक्षक भुषण नैताम, प्रा. डॉ मिलींद कांबळे, प्रा. डॉ प्रशांत उईक, शहर पोलिस ठाण्याचे पालिस निरिक्षक राजपूत आदींची उपस्थिती होती.

     

    जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टराला रुग्णांच्या नातलगांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

     

    पोलिसांनीही या प्रकरणी कार्यवाही केली आहे. मात्र या घटणेच्या विरोधात जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णालय परिसरात आंदोलन सुरु केले होते. याचा परिणाम आरोग्य सेवेवर दिसुन आला होता. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाउन डॉक्टरांशी चर्चा केली. येथे पुर्ण वेळ सहाय्य पोलिस दर्जाचा अधिकारी तैणात ठेवण्यात यावा, ओपीडी मध्ये दोन पोलिसांची तैनाती ठेवण्यात यावी डॉक्टरांना सुरक्षा देण्यात यावी अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस प्रशासनाला केल्या आहे.

     

    तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा करत त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांनतर डाॅक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे.