Tag: Vinay gauda collector

  • चंद्रपूर जिल्ह्यातील गणेश उत्सवात डिजेचा आवाज किती?

    News34

    चंद्रपूर : आगामी काळात जिल्ह्यात गोकूळाष्टमी, पोळा, गणपती, ईद असे विविध धर्मीय सण साजरे केले जाणार आहे. त्यातच गणपती विसर्जन आणि ईद हे एकाच दिवशी येण्याची शक्यता आहे. या दोन्ही सणांमध्ये मिरवणुकीचे आयोजन केले जाते. चंद्रपूर जिल्हा आणि शहर हे सुरवातीपासूनच शांतताप्रिय म्हणून ओळखले जाते.

     

    सर्वधर्मीय सण/ उत्सव येथे गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. त्यामुळे हीच ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले. तर जिल्हास्तरीय शांतता समितीच्या सदस्यांनी चंद्रपूरचा सामाजिक सलोखा आणि ऐक्य अबाधित राहील, याची ग्वाही दिली.

     

    नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

     

    चंद्रपूरची प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी प्रत्येक जण आपापली जबाबदारी योग्य रितीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, एकाच दिवशी गणपती विसर्जन आणि ईद असल्यामुळे सर्वांनी मिरवणुकीच्या वेळा पाळाव्यात तसेच नियमांचे पालन करावे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिरवणुकीचे रस्ते व्यवस्थित करून घ्यावे. डीजे / लाऊडस्पीकरचा आवाज 55 डेसीबलपेक्षा जास्त नसावा.

     

    ‘एक खिडकी’ योजनेंतर्गत गणपती मंडळांना सर्व परवानग्या देण्यात येणार आहे. तसेच मिरवणुकीच्या रस्त्यावर बॅनर, फटाके, कमानी लावण्यात येऊ नये. वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी संबंधित विभागाने योग्य नियोजन करावे. दाताळा रोडवरील इरई नदीत गणपती विसर्जनाची व्यवस्था मनपाने योग्य प्रकारे करावी.

     

    सर्वांनी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने करणे आवश्यक आहे. विशेष करून तरुणांनी. कोणत्याही परिस्थितीत आपल्या एखाद्या मॅसेजमुळे समाजभावना भडकणार नाही, यासाठी दक्ष असावे. जेष्ठ नागरिकांनी आपापल्या कुटुंबातील तरुणांना सोशल मिडीया वापराबाबत मार्गदर्शन करावे. सण / उत्सव हे आनंदाने आणि शांततेत पार पाडायचे असतात, याची सर्वांनी जाणीव ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, सामाजिक सलोखा आणि ऐक्य ही चंद्रपुरची परंपरा आहे. सण / उत्सव आनंदाने साजरे करून जिल्ह्याचा लौकिक कायम ठेवावा. गणेश मंडळाने सामाजिक विषयांवर देखावे करावेत. तसेच शासकीय परवानग्या देतांना लोकांना चकरा माराव्या लागू नये, याबाबत प्रशासनाने नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.

    शांतता समितीचे सदस्य हेच प्रशासनाचे कान-नाक-डोळे : पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी

    गणपती विसर्जन आणि ईद एकाच दिवशी येत असल्यामुळे पोलिस विभागाकडून प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय मंडळाच्या बैठका घेणे सुरू आहे. यात नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सर्व सण आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य हेच प्रशासनाने खरे कान-नाक-डोळे आहेत, असे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.

    पुढे ते म्हणाले, ईद ची मिरवणूक ही सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत तर गणपती विसर्जनाची मिरवणूक ही दुपारी 3 नंतर काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन स्तरावर याबाबत मंडळनिहाय चर्चा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूरचा सामाजिक एकोपा अतिशय घट्ट आहे. तरीसुध्दा बाहेरच्या जिल्ह्यात/राज्यात किंवा इतर ठिकाणी काही अघटीत घडल्यास त्याची प्रतिक्रिया चंद्रपुरात उमटू देऊ नका, याबाबत सर्वांनी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

    मनपातर्फे फिरते कुंड व निर्माल्य रथाचे आयोजन : आयुक्त विपीन पालीवाल

    घरगुती गणपतीचे विसर्जन करण्याकरीता चंद्रपूर शहरामध्ये 20 ते 30 कृत्रीम विसर्जन कुंडाचे नियोजन करण्यात येणार आहे. सोबतच फिरते कुंड आणि निर्माल्य गोळा करण्यासाठी रथाचेसुध्दा नियोजन आहे. नागरिकांनी ईद मिरवणूक व गणपती विसर्जनावेळी रस्त्यावर बॅनर, स्वागत गेट, पताका लावू नये. आपापल्या मिरवणुकीच्या वाहनांवरच बॅनर लावावे. गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात पीओपीच्या मुर्तींना बंदी आहे. त्यामुळे पीओपीची मूर्ती बनवितांना किंवा विक्री करतांना आढळल्यास त्वरीत तक्रार करावी. गणेश मंडळांना एक खिडकी योजनेंतर्गत परवानग्या देण्यात येत आहे. याबाबत काही अडचण आल्यास मनपा सभागृहात मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.

    शांतता समितीच्या सदस्यांनी केलेल्या सुचना :

    पीओपी मुर्तीच्या संदर्भात मनपाने मुर्तीकारांची बैठक घ्यावी. गणेश मंडळांनी परवानग्या कशा घ्याव्यात, याबाबत जनजागृती करावी. सोशल मिडीयावर अफवा पसरणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी. निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावावी. मनपाने कृत्रीम विसर्जन कुंड तयार करावे. मुर्तीचे नुकसान / मोडतोड होऊ नये म्हणून रस्त्यावरचे खड्डे बुजवावे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंडळांनी गणेश मुर्तीसाठीची वाहने सुव्यवस्थित ठेवावी तसेच चालक मद्यप्राशन करणारा नसावा. डीजेबद्दलच्या नियमांची माहिती पोलिस विभागाने आपापल्या क्षेत्रातील मंडळांना द्यावी. मनपाने मंडळांना पेंडालचा आकार निश्चित करून द्यावा. एक खिडकी योजनेंतर्गत सर्व परवानग्या एकाच वेळी देण्यात याव्या. विद्युत विभागाने पेंडॉलमधील इलेक्ट्रिक व्यवस्थेची पाहणी करावी. दाताळा रोडवरील इरई नदी येथे विसर्जनासाठी प्लॅटफॉर्म तयार करावा. सण / उत्सवाच्या दोन-तीन दिवसांपासून दारूविक्री बंद ठेवावी.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी केले. संचालन उत्तम आवळे यांनी तर आभार पोलिस निरीक्षक विजय राठोड यांनी मानले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, शांतता समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

     

  • परिचारिका मृत्यू प्रकरणानंतर जिल्हाधिकारी पोहचले जिल्हा रुग्णालयात

    News34

    चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे परिचारिकेच्या झालेल्या मृत्युप्रकरणाची जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहे. तसेच सामान्य रुग्णालयातील उणिवा, त्रृटी आदी बाबींमध्ये जिल्हाधिका-यांनी विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी (दि.30) जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली.

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, रुग्णालयात मिळणा-या आरोग्य सेवेबद्दल नागरिकांच्या तक्रारीसाठी लावण्यात आलेली तक्रारपेटी सुस्थितीत असणे आवश्यक आहे व त्याची नागरिकांना माहिती असावी. जिल्हा रुग्णालयातील औषध पुरवठा, साहित्य, उपकरणे, रिक्त जागा आदी बाबीं प्रत्येक महिन्याला शासनाला कळवाव्यात. तसेच त्याची एक प्रत जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावी. अतिदक्षता कक्ष चांगल्या स्थितीत असावा. देखभाल व दुरुस्ती करीता देण्यात आलेल्या निधीमध्ये अतिदक्षता कक्ष, संरक्षण भिंत, प्रवेशद्वार, पाण्याची टाकी याव्यतिरिक्त इतर बाबींचा समावेश करायचा असल्यास त्वरीत कळवावे.

    रुग्णालयात कोणत्या डॉक्टर्सची ड्यूटी आहे, ते कधी येतात, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा कोणत्या आहेत, याबाबत रुग्णालय प्रशासनाने अतिशय गांभिर्याने लक्ष द्यावे. यात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. रुग्णाशी निगडीत असलेल्या व अत्यावश्यक बाबी जसे औषध पुरवठा, उपकरणे यांची मागणी त्वरीत करा. रुग्णालयातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्या-त्या विभागात कशाची आवश्यकता आहे, प्रथम प्राधान्य कोणते, त्याचे बजेट किती याबाबत अहवाल मागवून घ्या. रुग्णालयातील स्टाफ किती वाजता येतो, वेळेवर उपस्थित नसलेल्यांची नोंद घेणे, स्वाक्षरीची पडताळणी करण्यासाठी हस्ताक्षर तज्ञांकडे पाठविणे, बायोमेट्रीक मशीन असल्यास उपस्थितांची नोंद घेणे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.

    जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, रुग्णालयात औषधी पुरवठा व मागणी, उपकरणे, सर्जिकल साहित्य याचा गत तीन वर्षाचा रेकॉर्ड, त्यासाठी आलेला निधी याबाबत अहवाल सादर करावा. येथे उपलब्ध असलेले सीसीटीव्ही सर्व चालू स्थितीत असणे आवश्यक आहे. आणखी सीसीटीव्ही लागत असल्यास तसा प्रस्ताव सादर करा. डॉक्टरांची येण्या-जाण्याची वेळ नोंद होण्यासाठी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही त्वरित लावा. त्याचा ॲक्सेस उपविभागीय अधिकारी यांना आय.पी.द्वारे द्यावा. इतर विभागापेक्षा नवजात बालक कक्ष, बालरोग विभाग, तेथील आयसीयू हे चांगल्या प्रकारे सुरू असले तरी बालकांची अदलाबदल, बाळ चोरीचे प्रकार घडणार नाही, यासाठी दक्ष रहा. रुग्णालयात रुग्णासोबत कमीतकमी नातेवाईक आत येण्यासाठी सुरक्षा रक्षकांकडून नियोजन करा, असेही निर्देश त्यांनी दिले.

    यावेळी जिल्हाधिका-यांनी टेलिमेडीसीन विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी असलेला अतिदक्षता विभाग, ड्रेसिंग रूम, डिलिव्हरी रुम, डायलिसिस युनीट, थॅलेसमिया रुम व बाहृयरुग्ण विभाग आदींची पाहणी केली. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद फुलपाटील, बालरोग्य तज्ञ डॉ. मिलींद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. प्रशांत उईके, डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए चंद्रपूरच्या सचिव डॉ. कल्पना गुलवाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. निवृत्ती जिवणे आदी उपस्थित होते.