Tag: Nurse seema meshram

  • परिचारिका सीमा मेश्राम मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट

    News34

     

    चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील कार्यरत परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी समिती स्थापन करावी व इन कॅमेरा चौकशीची प्रणाली वापरावी, तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, इतर कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची साक्ष नोंदवून घ्यावी, अशाही सूचना पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

    ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन सभागृहात आयोजित बैठकीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोयीसुविधा व इतर विषयांचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. सोनारकर, डॉ. प्रशांत उईके, महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशन चंद्रपूर शाखेच्या अध्यक्षा किरण वैरागडे आदींची उपस्थिती होती.

    त्यावेळी त्यांनी परिचारिकेच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले. आपल्याच रुग्णालयात कार्यरत सीमा मेश्राम या परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यु होतो, ही रुग्णालय व्यवस्थापनासाठी अतिशय गंभीर बाब असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने या प्रकरणी कोणती चौकशी केली, चौकशी समितीचा निष्कर्ष काय काढला, असे सवालही त्यांनी प्रशासनाला विचारले. रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपस्थित राहणे गरजेचे असताना बहुतांश डॉक्टर ऑनकॉल असतात. ऑनकॉल असणारे डॉक्टर मुख्यालयी राहतात की बाहेरगावी. त्यांना रुग्णालयात राहणे आवश्यक वाटत नाही का, डॉक्टर्स आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात का, याचीही उत्तरे ना. मुनगंटीवार यांनी रुग्णालय प्रशासनाला मागितले.

    रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता, सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता आदींना सोबत घेऊन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे निरीक्षण करावे. प्रत्येक बाबीची नोंद घेतली तर व्यवस्थेतील अभाव दूर करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

    कसून तपास करा :रुग्णालयात डॉक्टरांची येण्याची आणि जाण्याची वेळ, त्यांची उपस्थिती आदी रेकॉर्ड सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासावा. तसेच डॉक्टरांच्या दैनंदिन स्वाक्षरी वहीची तपासणी करून हस्ताक्षर तज्ज्ञांकडून स्वाक्षरीबाबत खात्री करून घ्यावी. रुग्णालय प्रशासनाबद्दल तक्रार असल्यास नागरिकांसाठी तेथे तक्रार बॉक्स लावावा व त्याच्या चाव्या जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द कराव्यात. जेणेकरून तक्रारी गहाळ होणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले.

    तक्रारींबाबत तात्काळ निर्देश : सायंकाळी पाचनंतर रुग्णालयात शवविच्छेदन केले जात नाही, सोनोग्राफीचे २० रुग्ण झाल्यानंतर इतर रुग्णांना परत पाठविण्यात येते, रुग्णांना छोट्या छोट्या बाबींकरीता डॉक्टर नागपूरला रेफर करतात, रुग्णालयात औषधी व इंजेक्शन न देता डॉक्टर बाहेरून लिहून देतात, सीटीस्कॅन रिपोर्ट मिळत नाही, डायलिसीस मशीन खराब आहे, स्टाफ नर्सची ३७५ पदे रिक्त आहेत, आदी बाबी नागरिकांनी ना. मुनगंटीवार यांच्या ध्यानात आणून दिल्या. ज्या डॉक्टरांची ड्यूटी आहे, ते उपस्थित न राहता दुसऱ्याच डॉक्टरांना पाठविण्यात येते, अशा तक्रारी काही नागरिकांनी केल्या. याबाबत अधिष्ठाता यांनी रोज कोणत्या डॉक्टरची ड्यूटी आहे, त्याचे नाव, मोबाईल क्रमांक, वेळ बोर्डवर लिहावे, असे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले.

    थेट वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना फोन :चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निष्काळजीपणामुळे परिचारिकेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन केला. तसेच चंद्रपूर येथे येऊन जिल्हा सामान्य रुग्णालय भेट, नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी आणि रुग्णालय व्यवस्थापनाचा आढावा घेण्याची सूचना केली. ना. मुश्रीफ यांनी चंद्रपूर येथे येऊन आढावा घेणार असल्याचे सांगितले.

  • चंद्रपूर जिल्हा मनसेचा चौकशी समितीला घेराव

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेचा कर्तव्य बजावत असताना झालेल्या मृत्यूने शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अतिशय महत्वपूर्ण असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेत डॉक्टर उपलब्ध नसल्याने व उपचाराअभावी मृत्यू झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रोष व्यक्त करीत, सदर प्रकरणाची चौकशी सुरु असलेल्या समितीच्या बैठीकित प्रवेश करीत उपस्थित समितीला पदावर बसण्याचा नैतिक अधिकार नसून पदाचे राजीनामे देण्याची मागणी यावेळी केली. व बाहेरील स्वतंत्र उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करण्याची मागणी यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली.

    या घटनेमुळे सामान्य नागरिकांनि या सरकारवर व व्यवस्थेवर विश्वास ठेवावा तरी कसा, असा प्रश्न आता सामान्याना पडला आहे. या मृत्यूस सर्वस्वी जवाबदार डॉक्टर आहेत असा आरोप तेथील सर्व परिचरिकेंनी करत काम बंद आंदोलन केले. यावरून तेथे काम करणाऱ्यांकडे डॉक्टर दुर्लक्ष करत आहेत तर सामान्य नागरिकांचा उपचार वाऱ्यावर असल्याचे सिद्ध होते.

    यावेळी मनसे तर्फे वर्षभरा आधी दिलेल्या निवेदनात औषध बाहेरून विकत घ्यावे लागते, घाणीचे साम्राज्य, रुग्णालयात सोनोग्राफी सारख्या अतिशय महत्वाच्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध राहत नाही त्यामुळे रुग्णांना एक दोन महिन्याची सोनोग्राफीची तारीख देण्यात येते यावर तक्रार केली होती परंतु तेही परिस्थिती जैसे थे असल्याचे यावेळी चौकशी समितीच्या निदर्शनात आणून देण्यात आले. तसेच सीआर्म ऑर्थो मशीन बंद आहे, येथील कार्यरत डॉक्टर्स स्वतः रुग्णालयात उपस्थित न राहता मेडिकल इंटर्न कडून रुग्णांची तपासणी करत असल्याने एखादी अनुचित घटना घडू शकते ह्या सर्व विषयांना घेऊन मनसे तर्फे प्रभारी अधिष्ठाता डॉ. उईके यांना घेराव करीत वरील प्रश्न उपस्थित करण्यात आले.

    सदर बैठकीत यंत्रणा पुरविण्यात सरकारचा हलगर्जी पणा, डॉक्टर, परिचारिकाचा अभाव व त्यांची रखडलेली भरती यामुळे हे सर्व प्रकार घडत असल्याचा समितीचा एकंदरीत सुर असल्याने शासनाची आरोग्य विभागा बद्दलची उदासीनता या साठी कारणीभूत असल्याचे चित्र स्पष्ट होते, औषधांचा पुरवठा शासनाकडून होत नाही ही शरमेची बाब आहे असा आरोप यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केला.

    यावेळी विधी विभागाच्या जिल्हाध्यक्ष मंजुषा लेडांगे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासालवार, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, जिल्हासचिव किशोर मडगुलवार तालुकाअध्यक्ष प्रकाश नागरकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, शहरसंघटक मनोज तांबेकर, मनविसे शहर उपाध्यक्ष सुयोग धणवलकर, राकेश पराडकर, मयूर मदणकर, तुषार येरमे, कार्तिक खंगार, बाळु शेवते व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.