Tag: News34 chandrapur

  • विद्यार्थ्यांच्या समस्येवर मनसे ने दिला 8 दिवसाचा अल्टीमेटम

    News34

     

    चंद्रपूर :- पोंभूर्णा हे तालुक्याचे ठिकाण असून येथे महाविद्यालय तथा विद्यालय जास्त प्रमाणात आहेत याठिकाणी इयत्ता पहिली ते पदवी पर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत शिक्षणासाठी आजु बाजूच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोंभूर्णा येथेच यावे लागते, अनेक विद्यार्थी दहा बारा किलोमीटर अंतरावरील गावातून येत असतात मात्र या विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध नाहि, त्यासाठी या विद्यार्थ्यांना मानसीक तथा शारीरीक त्रास सहन करावा लागतो बऱ्याच महाविद्यालयाची सुट्टी साधारणता एक वाजता होते मात्र या वेळेत कोणतीही बस उपलब्ध नाही.

    तसेच बसन्यासाठी बसस्थानकाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांना इतरत्र भटकत राहावे लागते मूलींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे कोणतीही गंभीर घटणा किंवा अनूचीत प्रकार घडु नये विद्यार्थी तासनतास बसची वाट पाहत असतात तेव्हा आपण सदर विद्यार्थ्यांनसाठी वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी, आठ दिवसाचे आत या समस्येचे निराकरण नाहि झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संबधीत विद्यार्थ्यांना घेउन आक्रमक आंदोलन करणार असा इशाराही यावेळेस देन्यात आला.

    सदर निवेदन देतांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष कुलदिप चंदणखेडे, मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार,महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आशिष नैताम, मनविसे पोंभूर्णा तालुका उपाध्यक्ष राजेश गेडाम, चंद्रपूर तालूका उपाध्यक्ष प्रविण शेवते, मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, बल्लारपूर तालूका मनसे महिला सेना तालूका अध्यक्षा कल्पना पोर्तलावार तथा मनसैनीक प्रामुख्याने उपस्थित होते.

  • अंतराळात इस्रो ने रचला नवा इतिहास

    News34

    चंद्रपूर – चांद्रयान 3 चे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरले आहे, या भागावर चांद्रयान उतरविणारा भारत देश पहिला ठरला आहे. तर चंद्राच्या कोणत्याही भागावर हे वाहन उतरविणारा भारत चौथा देश ठरला आहे.

    यानंतर सर्वजण विक्रम लँडर मधून प्रज्ञान रोव्हर बाहेर येण्याची वाट सध्या देशवासी बघत आहे, धूळ स्थिरावल्यावर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर एकमेकांचे फोटो काढून पाठवतील.

    चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंग या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्चुअली सामील झाले होते, लँडिंग नंतर पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले.

     

  • जनविकास सेनेने केली रुग्णालय मुक्ती आंदोलनाला सुरुवात

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 3 वर्षासाठी हस्तांतरण केले होते मात्र मागील 8 वर्षे लोटल्यावर सुद्धा शासकीय महाविद्यालयाची नवीन इमारत आजही तयार झाली नाही.

    त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहे, अनेकांचे नाहक जीव जात आहे, अश्यातच परिचारिका सीमा मेश्राम यांचा उपचारअभावी मृत्यू झाला.

    त्यामुळे या रुग्णालयाच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. रुग्णालयातील दुरावस्थेच्या विरोधात जन विकास सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात ‘जिल्हा रुग्णालय मुक्ती आंदोलन करण्यात आले.

    बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सामान्य रुग्णालयाच्या समोर जनविकास सेनेने एक तासाचे निदर्शने करून या आंदोलनाला केली.

    रूग्णालयात रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. अनेक डॉक्टर्स हजेरी लावून पगार घेतात. परंतु रुग्णसेवेचे काम करत नाही. सोनोग्राफीसारख्या तपासणीसाठी रुग्णांना अनेक महिने वाट पाहावी लागते. औषधीचा पुरेसा साठा नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधी घ्यावी लागते. अशा अनेक समस्यांनी या रुग्णालयाला ग्रासलेले आहे. या सर्व समस्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची भूमिका जनविकास सेनेने घेतली आहे.

    वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने तात्पुरत्या स्वरूपात 3 वर्षांकरिता सामान्य रुग्णालय अधिष्ठाता यांना हस्तांतरित केले होते. मात्र मागील 8 वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाने स्वतःचे रुग्णालय तयार केले नाही. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.काही रुग्णांचे उपचाराअभावी जिव जात आहे. सामान्य रुग्णालय व शंभर खाटांच्या प्रस्तावित महिला रुग्णालयाची इमारत जिल्हा शल्य चिकित्सक यांना परत करावी ही जनविकास सेनेची मागणी आहे. सामान्य रुग्णालय व प्रस्तावित महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयाच्या तावडीतून मुक्त होईपर्यंत जनविकास सेनेचे आंदोलन सुरू राहील अशी प्रतिक्रिया आंदोलन दरम्यान देशमुख यांनी दिली.

    जोपर्यंत सामान्य रुग्णालय व प्रस्तावित महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयाच्या तावडीतून मुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाला वेगळी दिशा देऊ, आज आमच्या आंदोलनाचा आम्ही नारळ फोडला आहे.

  • स्वातंत्र्य दिनाला महिलांनी पकडली दारू पण…

    News34

    चंद्रपूर : शासकीय सेवेत असलेला कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून गावात सर्रास दारुविक्री करीत आहे. यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाच्या अधीन जात असल्याचे चित्र बघून गावातील संतप्त महिलांनी स्वतः या व्यक्तीच्या घरी जाऊन पोलिसांना दारू पकडून दिली. मात्र पोलिसांनी उलट याच महिलांविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

    गोंडपीपरी तालुक्यात गोजोली हे गाव आहे. येथील पोस्टमन म्हणून कार्यरत रघुनाथ कोटनाके हा शासकीय कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सर्रासपणे दारुविक्री करीत आहे. यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाकडे वळत असून यामुळे सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी संतप्त झालेल्या महिलांनी ढाबा पोलीस स्टेशन गाठत ठाणेदार गोरक्षनाथ नागलोट यांना आरोपी कोटनाके याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी आपण दारू पकडा आम्ही कारवाई करतो असे सांगितले.

    त्यामुळे महिलांनी कोटनाके याच्या घराकडे मोर्चा वळवला. यावेळी कोटनाके याने रोजंदारी करणारा व्यक्ती संतोष तुमराम याला राहण्यासाठी जे खोली आहे तिथे दारूच्या पेट्या आढळल्या. याची माहिती पोलिसांना दिली. दारूच्या 100 बाटल्या तिथे सापडल्या मात्र पोलीस पंचनामा न करता आरोपी संतोष तुमराम आणि रघुनाथ कोटनाके यांना घेऊन जात होते, यावेळी महिलांनी आक्षेप घेतल्यावर अखेर पंचनामा करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) आणि 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

    महिलांनी जबाबदार नागरिकाची भूमिका बजावली असताना आरोपीने खोटे आरोप करीत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी याच सामान्य महिलांविरोधात भादवी कलम 143, 147, 149, 323, 504, 506, 427 अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली.

    यामध्ये माया आत्राम, रेखा चौधरी, सुदर्शन मोहूर्ले, मंगला कोकोडे, अर्चना मोहूर्ले, नलिनी कोटरंगे, शारदा ठाकरे, वंदूशा सोनूले, रेखा वाढई, प्रेमीला शेडमाके, कांताबाई निकोडे, लक्ष्मी चौधरी, वर्षा मोहूर्ले, सारिका शेडमाके, शालू वसाके, कांता निवलकर, सारुबाई निकोडे, सपना चौधरी यांच्यासह गावातील होतकरू तरुणांचा समावेश आहे. जागरूक नागरिकांना असा त्रास दिला जात असेल तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? पोलीस अधीक्षक साहेबांनी याकडे त्वरित लक्ष घालून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

    पोलिसांनी केलं नाही अखेर महिलांनी केलं

    गावातील कुठलीही गोष्ट लपत नाही. गोजोली गावात रघुनाथ कोटनाके अनेक वर्षांपासून सर्रासपणे अवैध दारुविक्री करत आहे, त्याच्या अवैध व्यवसायापायी
    गावातील पुरुष मंडळी तर दारूच्या आहारी गेलेलीच आहे, मात्र बारा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुले सुद्धा आता दारूच्या आहारी जाऊन आपले शैक्षणिक आणि संपूर्ण आयुष्य उध्वस्त करण्याच्या मार्गावर लागले आहेत
    यामध्ये गावातील महिलांची फार मोठी कौटुंबिक हानी आर्थिक हानी आणि सारे कुटुंब देशोधडीला लागण्याच्या मार्गावर लागले आहेत.
    मात्र पोलिसांनी अद्याप त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. शेवटी गावातील महिलांना पुढाकार घ्यावा लागला.

    जातीय रंग देण्याचा डाव
    गावातील महिला ह्या मागासवर्गीय आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय महिलांचा समावेश आहे असे असताना आरोपीकडून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    निवेदन देताना डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच महिलांची व ग्रामस्थांची दिशाभूल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, यावेळी गावातील माया आत्राम ग्रामपंचायत
    सदस्य सरस्वती आत्राम, माजी सरपंच उज्वला दुर्गे,
    मंगला कोकोडे, नलिनी कोटरंगे, सारिका कोटनाके,
    शालीनी डोंगरे, वांदुशा सोनुले, कांता निवळकर, सुरेंद्र मांदाडे, रामदास ठाकरे, रामदास चौधरी, संजय चौधरी,
    राकेश प्रधाने, राजेश डोंगरे इ. ग्रामस्थ उपस्थित होते.

    याबाबत धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की महिलांनी दारू पकडली यात काही दुमत नाही त्यांनी चांगलं काम केलं, मात्र त्यांनी दारू पकडते वेळी कायदा हातात घ्यायला नको होता, ज्यावेळी महिलांनी दारू पकडली तेव्हा आम्हाला माहिती मिळाली, आम्ही तात्काळ गोजोली मध्ये जाऊन परिस्थिती हाताळली व दारूविक्री करणाऱ्याला अटक केली.

    कायद्यानुसार आम्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

  • फिरायला निघाले मात्र घरी परतलेचं नाही

    News34

    चंद्रपूर – तेलंगणा राज्यातून नातेवाईकांकडे आलेल्या 85 वर्षीय नाथरी कोमराईया हे सकाळी फिरायला निघाले मात्र घरी परत आले नाही.

    नाथरी हे चंद्रपुरातील नरेंद्र नगर येथे नातेवाईकांकडे आले होते, 23 ऑगस्टला सकाळी नाथरी हे सवयीनुसार सकाळी फिरायला पागलबाबा नगर बायपास मार्गावर निघाले होते, मात्र ते परत आले नाही.

    घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली, मात्र ते कुठेही आढळून आले नाही, जर वरील वर्णनाचे व्यक्ती कुणाला आढळून आले तर मोबाईल क्रमांक – 9970893903 वर सम्पर्क करावे.

     

  • रेल्वे पूल कोसळला 17 मजुरांचा मृत्यू

    Mizoram incident

    मिझोरम – मिझोरम मध्ये बुधवारी बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळल्याने 17 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी 35 ते 40 मजूर पुलावर काम करीत होते.

    मिझोरम ची राजधानी आयझोल पासून तब्बल 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या सैरांग मध्ये सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

    बैराबी ते सैरांग ला जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा रेल्वे पूल बांधण्याचे काम सुरू होते, त्यावेळी 35 ते 40 मजूर त्या पुलावर काम करीत होते, सध्या प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

     

  • चंद्रपुरात आज मराठी सिने कलावंतांची उपस्थिती

    News34

    Meri Mati Mera Desh

    चंद्रपूर  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय ‘मेरी माटी मेरा देश’ व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकाळी 11 वाजता डॉ. बल्लारपूर मार्गावरील ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यान येथे जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायती, 17 नगरपरिषद/ नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थाकडून मातीचे कलश आणण्यात येणार असून उद्यानात अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे. शीलाफलकम, पंचप्राण शपथ, वसुधा वंदन अंतर्गत वृक्षलागवड, व विरो का वंदन अंतर्गत देशासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा व जे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक हयात आहे, त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

    सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चांदा क्लब ग्राउंड येथे सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक तसेच स्वातंत्र्य लढ्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रसिध्द अभिनेते सोनाली कुलकर्णी, श्रेयस तळपदे, पूजा सावंत व गायक नंदेश उमप या मराठी कलाकारांची उपस्थिती असणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात जवळपास 300 लोकांचा ग्रुप सहभागी असून नाट्य, नृत्य व गायन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार पंचप्रण शपथ नागरिकांना देण्यात येणार आहे.

    त्यासोबतच सकाळी 9 वाजता महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीमार्फत हुतात्मा स्मारकापासून अमृत कलश रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

     

  • परिचारिका सीमा मेश्राम मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट

    News34

     

    चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील कार्यरत परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पालकमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी समिती स्थापन करावी व इन कॅमेरा चौकशीची प्रणाली वापरावी, तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, इतर कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची साक्ष नोंदवून घ्यावी, अशाही सूचना पालकमंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

    ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नियोजन सभागृहात आयोजित बैठकीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोयीसुविधा व इतर विषयांचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, हरीश शर्मा, राहुल पावडे, देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे यांच्यासह अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, डॉ. सोनारकर, डॉ. प्रशांत उईके, महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशन चंद्रपूर शाखेच्या अध्यक्षा किरण वैरागडे आदींची उपस्थिती होती.

    त्यावेळी त्यांनी परिचारिकेच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले. आपल्याच रुग्णालयात कार्यरत सीमा मेश्राम या परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यु होतो, ही रुग्णालय व्यवस्थापनासाठी अतिशय गंभीर बाब असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने या प्रकरणी कोणती चौकशी केली, चौकशी समितीचा निष्कर्ष काय काढला, असे सवालही त्यांनी प्रशासनाला विचारले. रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपस्थित राहणे गरजेचे असताना बहुतांश डॉक्टर ऑनकॉल असतात. ऑनकॉल असणारे डॉक्टर मुख्यालयी राहतात की बाहेरगावी. त्यांना रुग्णालयात राहणे आवश्यक वाटत नाही का, डॉक्टर्स आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात का, याचीही उत्तरे ना. मुनगंटीवार यांनी रुग्णालय प्रशासनाला मागितले.

    रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता, सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता आदींना सोबत घेऊन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे निरीक्षण करावे. प्रत्येक बाबीची नोंद घेतली तर व्यवस्थेतील अभाव दूर करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

    कसून तपास करा :रुग्णालयात डॉक्टरांची येण्याची आणि जाण्याची वेळ, त्यांची उपस्थिती आदी रेकॉर्ड सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासावा. तसेच डॉक्टरांच्या दैनंदिन स्वाक्षरी वहीची तपासणी करून हस्ताक्षर तज्ज्ञांकडून स्वाक्षरीबाबत खात्री करून घ्यावी. रुग्णालय प्रशासनाबद्दल तक्रार असल्यास नागरिकांसाठी तेथे तक्रार बॉक्स लावावा व त्याच्या चाव्या जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द कराव्यात. जेणेकरून तक्रारी गहाळ होणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले.

    तक्रारींबाबत तात्काळ निर्देश : सायंकाळी पाचनंतर रुग्णालयात शवविच्छेदन केले जात नाही, सोनोग्राफीचे २० रुग्ण झाल्यानंतर इतर रुग्णांना परत पाठविण्यात येते, रुग्णांना छोट्या छोट्या बाबींकरीता डॉक्टर नागपूरला रेफर करतात, रुग्णालयात औषधी व इंजेक्शन न देता डॉक्टर बाहेरून लिहून देतात, सीटीस्कॅन रिपोर्ट मिळत नाही, डायलिसीस मशीन खराब आहे, स्टाफ नर्सची ३७५ पदे रिक्त आहेत, आदी बाबी नागरिकांनी ना. मुनगंटीवार यांच्या ध्यानात आणून दिल्या. ज्या डॉक्टरांची ड्यूटी आहे, ते उपस्थित न राहता दुसऱ्याच डॉक्टरांना पाठविण्यात येते, अशा तक्रारी काही नागरिकांनी केल्या. याबाबत अधिष्ठाता यांनी रोज कोणत्या डॉक्टरची ड्यूटी आहे, त्याचे नाव, मोबाईल क्रमांक, वेळ बोर्डवर लिहावे, असे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले.

    थेट वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना फोन :चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निष्काळजीपणामुळे परिचारिकेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन केला. तसेच चंद्रपूर येथे येऊन जिल्हा सामान्य रुग्णालय भेट, नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी आणि रुग्णालय व्यवस्थापनाचा आढावा घेण्याची सूचना केली. ना. मुश्रीफ यांनी चंद्रपूर येथे येऊन आढावा घेणार असल्याचे सांगितले.

  • विश्वजीत देशपांडेवर गुन्हा दाखल करा ; महात्मा फुले समता परीषदेची मागणी

    News34

    गुरू गुरनुले
    मुल – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा करणाऱ्या विश्वजीत देशपांडेवर कठोर कारवाई करत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा अशी मागणी महात्मा फुले समता परीषद वर्धा यांचे वतीने पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधिक्षक यांना निवेदन दिले.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते ,महात्मा फुले समता परीषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देऊ, अशी घोषणा परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केली आहे.

    भुजबळ साहेब हे अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून पुरोगामी विचारसरणीची चळवळ घेऊन महाराष्ट्रात काम करीत आहे. आदरणीय भुजबळ साहेब राज्याचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून मा.मंत्री महोदय आहेत. त्यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

    मुल पोलिस निरीक्षक सुमित परतेकी यांना निवेदन देताना अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, माजी जी.प.सदस्य बहुजनांचे मार्गदर्शक सल्लागार प्रा.रामभाऊ महाडोरे, महिला कार्याध्यक्ष शशिकला गावतुरे, माळी महासंघाचे विभागीय महासचिव तथा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, माळी महासंघाचे प्रा.सुधीर नागोशे शहर अध्यक्ष राकेश मोहुर्ल, सरपंच कालिदास खोब्रागडे, उपसरपंच योगेश लेनगुरे, माजी सरपंच अनिल शेंडे, जिल्हा सचिव ईश्वर लोनबले, कैलास चलाख,युवा आघाडीचे रोहित निकुरे, परशुराम शेंडे, प्रा.प्रभू धोटे, प्रा.नीरज चन्ने, पुरुषोत्तम कुंनघाडकर,विनोद आंबटकर, विजय काटकर,चक्रधर घोंगडे,दुशंत महाडोरे,श्रीकृष्ण शेंडे,मनीष मोहरले,दिलीप वार्जुकर,भाऊजी लेंनगूरे, महिला पदाधिकारी सीमा लोनबले,उषा चुदरी,दर्शना नीकुरे, देवराव ढवस्, दलीत जंनबंधू, आदी समता परिषदेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

  • राष्ट्रवादी कांग्रेसच्या मागणीची केंद्रीय मंत्री गडकरी यांनी घेतली दखल

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुर शहरातून जात असलेल्या नवीन “हैद्राबाद-आदिलाबाद-कोरपना-गडचांदुर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.हा महामार्ग गडचांदुर शहरातून जात असल्यामुळे गडचांदुर शहर दोन भागात विभागले जाणार आहे,त्याचा परिणाम शहराच्या विकासावर,व्यापारावर,आणि अपघात वाढण्यावर होणार आहे.

    त्यामुळे गडचांदुर शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या भागावर पिल्लर असलेल्या उड्डाणपुलाची निर्मिती झाल्यास,पुलाखालून शहराच्या दोन्ही भागातून वाहतूक सुरळीत सुरू राहील,व्यापारावर परिणाम होणार नाही,अपघात देखील टळतील,याबरोबरच माणिकगड सिमेंटकडे वळणाऱ्या मार्गाचा आणि रेल्वे मार्गावरील फाटकाचाही प्रश्न सुटेल,सोबतच राळेगाव-देवाडा या राज्य मार्गाला सुद्धा या उड्डाणपुलाचा फायदा होईल.

    यासर्व मागण्यांवर सोमवार दि.२१ ऑस्ट.ला नागपुरात राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या पुढाकारातून त्यांच्या निवासस्थानी एका बैठकीत सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी वरील मागण्यांचे निवेदन देशाचे रस्ते-भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना राजुरा विधानसभेचे अध्यक्ष माजी जि.प.सभापती आणि गडचांदुर निवासी नेते अरुणभाऊ निमजे,चंद्रपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिले. याप्रसंगी माजी मंत्री रमेशचंद्र बंग, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ ताकसांडे देखील उपस्थित होते.

    नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ या मागणीनुसार उड्डाणपुलाची निर्मिती करण्याचे निर्देश दिले,सोबतच संपूर्ण देशात बंदिस्त भिंती असलेल्या उड्डाणपुलाच्या निर्मितीमुळे शहराचे दोन भागात तुकडे पडतात अश्या असंख्य तक्रारी येत असल्याची कबुलीही दिली,आणि यापुढे पिल्लर असलेल्या उड्डाणपुलांचेच बांधकाम करण्याचे निर्देश दिले.