चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हयाची दारूबंदी हटल्यावर जिल्ह्यात नियमबाह्य दारू दुकानांना परवानगी देण्यात आली होती, आधीच्या तुलनेत सध्या दुप्पट दारू दुकानांना परवानगी देण्यात आली आहे, मात्र आजही दारू दुकान मालक प्रशासनाने दिलेल्या वेळेचे पालन करीत नाही.
त्यामुळे शासनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या दारू दुकानासमोर मी भजन आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे चंद्रपूर शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी दिला आहे.
सध्या शहरात दारू दुकानात राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन बार सुरू करण्याची वेळ सकाळी साडे अकरा ते रात्री साडे अकरा मात्र ही वेळ दारू दुकान मालक पाळत नाही, त्यामुळे हे तात्काळ कुठेतरी थांबायला हवं यासाठी राहुल देवतळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग सहित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्यमंत्री याना निवेदन दिले जर त्यानंतर दारू दुकान मालकांनी वेळेचे नियम पाळले नाही तर आम्ही राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे दारू दुकानासमोर भजन आंदोलन करू असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या निवेदनात देवतळे यांनी दिला आहे.
वरोरा – वरोरा जवळील नंदोरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काळ्या गिट्टीच्या खदानी आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात शेकडो खोल खड्डे खोदून गौणखनिजाचे उत्खनन केल्या जात आहे.
खड्डे खोदल्यानंतर शासनाचा महसूल वाचवण्यासाठी या गड्ड्यां मध्ये वरोरा येथील औष्णिक विद्युत केंद्रातून निघालेल्या राखीतून हे गड्डे बुजवण्याचे काम गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
असाच प्रकार नंदोरी येथील पंकज जैन खदानीच्या परिसरात घडला असुन नंदोरी येथील स्थानिक मजुरांचे मुले या ठिकाणी मासे पकडण्यासाठी मंगळवारी गेले होते. यानंतर पाण्याजवळ दोघे जात असताना राखे चे ढिगारे खचून पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
यामध्ये मुलांचा व वडिलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सोबत असलेल्या दोन मुलांनी गावात जाऊन सांगताच परिसरातील लोकांनी आरडाओरडा करत या खदानी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हे ठिकाण निर्जन स्थळी असून मदत न मिळाल्याने रामचंद्र जंगेल वय 60, व मुलगा योगेश जंगेल वय 27 यांचा दुर्दैवी अंत झाला. सदर मृतक बाहेरील राज्यातील असून यापूर्वी सुद्धा अशीच घटना झाली असल्याचे समजते.
चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूरच्या संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी गतिमान पद्धतीनं पूर्ण केली जाईल आणि आवश्यकता असल्यास या बँकेचे टेस्ट ऑडिट सुद्धा केलं जाईल. त्याचा निर्णय साधारणतः एक महिन्याच्या आत मध्ये येईल आणि तो निर्णय आल्यानंतर पुढील कारवाई करू, असे आश्वासन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या विधिमंडळ सभागृहात आमदार प्रतिभाताई धानोकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना सहकार मंत्री बोलत होते.
आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, जिल्हा बँक ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना कर्ज देणारी आणि शेतकऱ्यांना अडी अडचणीच्या काळात सांभाळून घेणारी बँक आहे. मात्र, याला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक अपवाद आहे. सदर बँकेला 111 वर्षाचा इतिहास आहे .आजपर्यंत बँकेच्या नियमित निवडणुका होत होत्या. परंतु 2012 नंतर 2017 रोजी शासनाने निवडणूक घेणे अपेक्षित असताना, देखील आज 2023 पर्यंत निवडणुका झाल्या नाहीत. याचा फायदा घेऊन 2017 व 2023 या सहा वर्षाच्या काळातील बँकेतील काही संचालकांनी जो गैरवव्यवहाराचा कळस गाठला आहे. 2023 ला झालेल्या नोकर भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले. बँकेच्या सहा संचालकावर आणि पाच कर्मचाऱ्यावर गुन्हे देखील दाखल केलेले आहे, आणि सदर बँकेची प्रतिमा या प्रकरणामुळे मलिन झाली.
2020 मध्ये देखील बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनी आरोग्याचे कारण दाखवून पाल्यांना अनुकंपतत्वावर नोकरी दिली. तसेच खरेदी घोळ झाल्याने दोन संचालकांना म्हणजे एकूण सात संचालकावर गुन्हे दाखल झाले. या बँकेत गैरव्यवहार झाल्याचे महाराष्ट्र सरकारच्या सहकार विभागाला देखील माहित आहे. 3.97 कोटीची वसुली करता संचालकांना सहकार कायद्यांनुसर नोटीस देखील बजावल्या गेल्या. बँकेतील सीईओ कल्याणकर यांच्यावर दोन गुन्हे दाखल असताना संचालक मंडळाने परस्पर ठराव घेऊन अजूनही बँकेचा पदभार त्यांच्याकडे आहे. रिझर्व बँक व नाबार्ड यांच्या नियमानुसार गुन्हे दाखल असणाऱ्यांना नेमणूक दाखल करता येत नाही. परंतु रिझर्व बँक व नाबार्ड यांनी दिलेल्या फॉर्मेटमध्ये सीओवर असणाऱ्या दोन गुन्ह्याची माहिती ही सदर बँकेच्या संचालक मंडळांनी लपवली आणि रिझर्व बँक व नाबार्डची यांनी देखील फसवणूक केली. या संदर्भात देखील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल आहे. परंतु त्यावर कुठलीही कारवाई त्या ठिकाणी झाली नाही.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या लक्षवेधी नोटमध्ये या बँकेत गेल्या सहा वर्षांत झालेल्या गैरव्यवहारांचा उल्लेख केला आहे. त्यात नोकर भरतीचा भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे, सीईओवर गुन्हे दाखल असतानाही त्यांची नेमणूक, बँकेचा एनपीए वाढणे, बँकेच्या किरायाच्या जागेवर शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे खर्च करणे, संगणक खरेदीसाठी जास्त पैसे खर्च करणे, शेतकरी भवनसाठी जास्त वेळ घेणे, शेतकऱ्यांच्या सहकार संस्थांना मतदानाचा अधिकार नाकारणे, शेतकरी कल्याण निधीचा वापर सर्रास करणे, यासारख्या बाबींचा समावेश आहे.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “या बँकेच्या संदर्भात हायकोर्टाने दिलेला स्टे उठवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर निवडणुका घेऊन नवीन संचालक मंडळ नेमले जाईल. त्यावेळी या सर्व बाबींची चौकशी करून कारवाई केली जाईल.”असे मंत्री म्हणाले.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वळसे पाटील यांना या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे.
चंद्रपूर : महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विधिमंडळात गंभीर चिंता व्यक्त केली. चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या की, “मणिपूरमध्ये महिलांची काढलेली विवस्त्र धिंड शरमेने मान खाली घालावी लागणारी अशी आहे. मात्र, अनेक दिवसाचा कालावधी लोटून अजूनही त्याच्यावरती कुठली कारवाई झाली नाही.”
चंद्रपूर सारख्या छोट्या जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या काळात शंभरहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र राज्यात 3500 अधिक 16 ते 25 वयोगटातील तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती आपल्याला समोर आली आहे. शासन या बेपत्ता महिलांचा शोध घेणार का?” असा सवाल करीत आमदार धानोरकर यांनी महिलांवरील अत्याचारांवर कठोर कायदा करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “फेसबुक व्हाट्सअप सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून महिलांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. एकतर्फी प्रेमाची अनेक प्रकरण समोर येत आहेत. अशा प्रकरणातून महिलांच्या असहायतेचा फायदा घेतला जातो. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
“अलीकडे महाराष्ट्रात महिलांवर घडलेल्या काही घटनांमुळे महाराष्ट्र नक्कीच हादरलेला आहे. मुंबईतील वसतिगृहात विद्यार्थिनीची झालेली हत्या असो किंवा सरस्वती वैद्य या महिलेची केलेली क्रूरपणे हत्या असो त्यामुळे खरच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था जिवंत आहे का असा प्रश्न त्यांनी केला.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी लवकरच शक्ति कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक प्रकारचा सुरक्षा कवच आम्हा महिलांना मिळाल्याशिवाय राहणार नाही.”
चंद्रपूर येथील कोळसा उद्योगातून एका निष्पाप महिलेची हत्या राजुरा येथे घडली. देखील अशी प्रकरणे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
चंद्रपूर – 50 ते 60 हजार लोकवस्ती असलेल्या घुग्घूस नगर परिषदेचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या साँफ्टवेअरमध्ये नसल्याने येथील नागरिकांना सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने घूग्घूस नगर परिषदेचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज अधिवेशनात बोलतांना केली आहे.
घुग्घूस शहराच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरु आहे. या भागाच्या प्रलंबीत विकासकामांसाठी विविध विभागाअंतर्गत मोठा निधी त्यांनी उपलब्ध करुन दिला आहे. यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे प्रस्तावीत आहे. चंद्रपूर जिल्ह्याअंतर्गत घुग्घूस गावातील वाढती लोकसंख्या व जलद गतीने नागरीकरण यामुळे ग्रामपंचायतचे रूपांतर करून दिनांक ३१-१२-२०२० रोजी नवनिर्मीत घुग्घूस नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली आहे. घुग्घूस शहर हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक औद्योगिक नगर असून येथे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, लोह शुद्धीकरण प्रकल्प, सिमेंट कारखाने आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग व कमी उत्पन्न गटातील नागरिक वास्तव्यास आहे. बहुतांश नागरिकांकडे पक्के घरे नाहीत. त्यातच प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेमध्ये घुग्घूस नगरपरिषदेचे नाव अद्यापही समाविष्ट करण्यात आले नाही.
त्यामुळे घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्काच्या पक्या घरापांसून वंचित राहावे लागत आहे. सद्यास्थितीत नगर परिषद घुग्घूस येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४५० पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली आहे. मात्र सदर योजनेच्या सॉफ्टवेअरमध्ये घुग्घूस नगर परिषदेचे नाव नसल्याने लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल मिळण्यासाठी घुग्घूस नगर परिषदचे नाव प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज अधिवेशनात बोलतांना केली आहे.
यावेळी बोलतांना त्यांनी राज्य सरकार मोदी आवास योजना राबवित आहे. याबदल सरकारचे अभिनंदन केले. यावर बोलताना ते म्हणाले कि सदर योजने अंतर्गत 3 ते 10 लाख घरे बांधण्याचा संकल्प सरकारने केला आहे. मात्र प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांची घरे मोदी आवाज योजनेत जात आहे. मात्र या योजनेत जात प्रमाणपत्राची अट आहे.
त्यामुळे 60 ते 80 वर्षांच्या वयोवृध्दांना सदर जात प्रमाणपत्र काढण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे या योजनेतून 60 ते 80 या वयातील वयोवृध्दांसाठी सदर अट रद्द करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील खाली भूखंड परत घेणार असून, नवीन लोकांना भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्य देणार असे आश्वासन उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी दिली.
चंद्रपूर बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेसचे नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना भेटून याबाबत निवेदन दिले. यावेळी पवन अगदारी उपस्थित होते.
चोखारे यांनी निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र अलिकडच्या काळात जिल्ह्याची ओळख पुसली जात आहे. जिल्ह्यातील उद्योग कमी होत आहेत. त्या तुलनेत बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चंद्रपूरसह वरोरा, भद्रावती, मूल, पोंभुर्णा, राजुरा, तालुक्यात उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीची निर्मिती करण्यात आली आहे. एमआयडीसींचे सर्व जमिनी उद्योजकांनी अधिग्रहितही केल्या आहेत. मात्र कित्येक वर्षांपासून या जमिनीवर उद्योग उभे राहिलेले नाहीत. बहुतांश एमआयडीसी परिसर ओसपडल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर शहर उद्योगांचे शहर आहे. कोळसा खाणी, वीज केंद्र, एमईएल, असे कारखाने शहराच्या सभोवताल आहेत. तरीही जिल्ह्याचे स्थान आणि वाढती बेरोजगारी टाळण्यासाठी शहरासाठी दाताळा मार्गावर एमआयडीसीची उभारणी करण्यात आली आहे. या एमआयडीसीतही काही उद्योग उभे झाले आहेत. मल्टीऑर्गनिक हा उद्योग सोडला तर डोळ्यात भरण्याएवढा मोठा उद्योग या परिसरामध्ये नाही. काही उद्योग एमआयडीसीत दिसत असले तरी अनेक जमिनी अद्यापही रिकाम्या आहेत.
उद्योगाच्या नावावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर स्वस्तात भूखंड मिळतात म्हणून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील शेकडो लोकांनी विविध एमआयडीसीत भूखंड घेतले. आश्चर्याची गोष्ट अशी की या भूखंडधारकांचा उद्योग भूखंड बुक करण्यापलिकडे पुढे सरकलाच नाही. आज जर कोणीही अशा एमआयडीसीचा फेरफटका मारला तर उजाड माळरानापलिकडे या एमआयडीसीत काहीच दिसून येत नाही.
शासनाला विविध शहरातील एमआयडीसीची खरोखरच प्रगती बघायची असेल तर ज्यांनी ज्यांनी येथील भूखंड बुक केले आहेत, त्यांच्याकडून अगोदर हे भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरू करावी. भूखंड परत घेतल्यानंतर नवीन लोकांना भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्यक्रम द्यावा अशी विनंती चोखारे यांनी केली.
या विनंतीवर बोलताना उद्योग मंत्री उदयजी सामंत म्हणाले की, योग्य ती चौकशी करून स्थानिकांना प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले. यावेळी सविस्तर चर्चा झाली.
पोंभूर्णा :- तालुक्यातील देवाडा खुर्द येथे धान मळणी करीत असतांना अचानक थ्रेशर मशीनमध्ये दोन्ही पाय व कमरेखालचा भाग ओढल्या गेल्याने नितेश पिपरे या मजूराचा रविवारला मृत्यू झाला. आर्थिक स्थिती बेताची व कर्ता पुरुषाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नितेश पिपरे (वय ३४) यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी आर्थिक मदत करुन कुटुंबाचे सांत्वन केले.
नितेश पिपरे हा गरिब कुटुंबातील पण कर्तबगार मुलगा होता. तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन चिमुकल्या मुली असा सुखी संसार सुरू होता.रविवारला मृतक नितेश हा मजुरीसाठी थ्रेशर मशीनवर गेला आणि त्याचा जीव गेला.घरची आर्थिक स्थिती बेताची.नितेशच्या पश्चात पत्नी,दोन चिमुकल्या मुली व वृद्ध आई- वडील असा परिवार आहे.
कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला.आर्थिक कोंडी सुरू झाली. अशावेळी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी मृतक नितेशच्या कुटुंबीयांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली व कुटुंबाचे सांत्वन केले.
यावेळी मृतकाची पत्नी सुषमा पिपरे,वडिल बाबुराव पिपरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,सामाजिक कार्यकर्ते शैलेश जुमडे,सोनल धोपटे, कालिदास गव्हारे उपस्थित होती.
चंद्रपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी इको-प्रो ने वरोरा-चिमूर मार्गावरील वहानगाव शेतशिवारात जाऊन “वाघ अधिवास सत्याग्रह” आंदोलन केले. ही सत्याग्रह करण्यात आलेली जागा म्हणजे ताडोबा मधील प्रसिद्ध वाघ असलेले बंजरंग आणि छोटा मटका यांच्या झुंज झालेली होय, या झुंजीत बंजरंग वाघ मृत झालेला होता. ही झुंज कोर, बफर च्या बाहेर वनक्षेत्र बाहेर शेतशिवारात झालेली होती. हा अधिवास या वाघांनी स्वीकारला असून तिथे जाऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा दृष्टीने तसेच वाघाचा वावर आज जंगलाच्या बाहेर असून, वन्यप्राणी संघर्ष तीव्र आहे. वनविभागाने योजना राबविताना फक्त बफर आणि कॉरिडॉर वनक्षेत्रचा विचार न करता “वाघ अधिवास जिथे, वनविभागाच्या योजना तिथे” अशी मागणी करीत ‘वाघ अधिवास सत्याग्रह’ करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचला आहे, यात मागील पाच वर्षात शेकडो मनुष्यहानी वाघसह अन्य वन्यप्राणीच्या हल्ल्यात झालेली आहे. मनुष्यहानी म्हणजेच संघर्ष नसून शेतकरीचे शेतपिक नुकसान, पाळीव जनावरे मारली जाणे, वाघाच्या भीतीच्या वातावरणात राहणे आदी अनेक समस्या संघर्षास कारणीभूत आहेत. वाढती वाघाची संख्यामुळे एकीकडे पर्यटन विकास तर दुसरीकडे मानव वन्यप्राणी संघर्ष अशी परस्पर विरोधी परिस्थिती आहे.
वाढते वन्यप्राणी सर्वत्र वाघ वावर यामुळे स्थानिक गावकरी-शेतकरी कायम संकटात राहणे, आणि त्रासाला सामोरे जाणे अशी परिस्थिती असताना मात्र विविध योजनेचा लाभ मात्र बफर आणि कॉरिडॉर मधील क्षेत्रातील गावाचा विचार करणे कितपत योग्य आहे? आज वाघाला कुठलीही सीमा नाही, तो जंगलाच्या बाहेर शेतशिवारात असतो, गावालगत असतो, शहरात सुद्धा असतो, विविध उद्योगाच्या क्षेत्रात असतो तेव्हा त्याचा वावर जिथे असतो तिथे संघर्ष आणि समस्या निर्माण होतात. मात्र ठराविक भागातील गावात वनविभागाच्या योजनेचा लाभ दिला जातो, यात धोरणात्मक बदल होणे आवश्यक आहे.
चंद्रपूर शहरालगत असलेली गावात चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र मधील वाघ लगतच्या सात-आठ गावात महिना-दोन महिने वावर असल्याने तिथे बफर, कॉरिडॉर नसताना श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेचा लाभ देत त्या गावाचा समावेश करण्यात आला. मात्र जिल्ह्यात तीनही वनविभाग अंतर्गत शेकडो गावे आहेत जे वाघाच्या दहशतीखाली आहेत, या भागात वाघ-मानव संघर्ष निर्माण झाल्यास लोकडाऊन सारखी परिस्थिती असते. त्यामुळे या सर्व गावांना “वाघ तिथे योजना” संकल्पना राबवून सर्वाना समान लाभ देण्याची मागणी करण्यात आली.
वाघ-अधिवास सत्याग्रह आंदोलनाच्या मागण्या
सोबतच या सत्याग्रह आंदोलनातून शेतपिक नुकसान भरपाई देण्याची वनविभाग, कृषी विभाग व महसूल विभाग असा तिघाडा न ठेवता सरळपणे एकाच विभागाकडे जवाबदारी सोपवावी. प्रत्येक क्षेत्रातील पाळीव जनावरे वन्यप्राणी हल्ल्यात मृत झाल्यास बफर च्या धर्तीवर लवकरात लवकर देण्यात यावे, परिसरातील सिंचन व्यवस्था व शेतीची वीज यांची वेळ दिवसा असावी, वाघ-मानव संघर्ष बाबत राज्यशासनाने गठीत केलेली समितीचा अहवाल नुसार कार्यवाही त्वरित करावी, वाघ अधिवास क्षेत्र असलेल्या लगतच्या सर्व गावात पिआरटी गठण आणि त्यांचे मानधन नियमित देणे, या सर्व गावातील शेतकरी करिता सौरऊर्जा कुंपण त्वरित देणे, कॉरिडॉर नसलेल्या भागात वनक्षेत्रालालगतच्या शेतीला कायम स्वरूपी कुंपण घालणे आदी मागण्या वाहणगाव येथे करण्यात आलेल्या “वाघ-अधिवास सत्याग्रह” आंदोलनातून शाशनाकडे करण्यात आलेली असून या मागण्याकरिता येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंडू धोतरे यांनी दिला आहे.
आज करण्यात आलेल्या आंदोलनात इको-प्रो चे अध्यक्ष तथा माजी मानद वन्यजीव रक्षक, माजी सदस्य राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ चे माजी सदस्य बंडू धोतरे यांचे नेतृत्वात कुणाल देवगिरकर, धमेंद्र लुनावत, राजू काहिलकर, सुधीर देव, सचिन धोतरे, राहुल कुचनकर, हरीश मेश्राम, रॉजर रंगारी, प्रकाश निर्वाण, अमोल दौलतकर, प्रितेश जीवने, चित्राक्ष धोतरे सहभागी होते, यावेळी वहाणगाव येथे स्थानिक गावकरी यांना या सत्याग्रह विषयी, “वाघ तिथे वनविभागाच्या योजना” या विषयी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी माहिती देत येत्या काळात करण्यात येणाऱ्या आंदोलन विषयी माहिती दिली, यावेळी स्थानिक गावकरी मध्ये सरपंच प्रशांत कोल्हे, उपसरपंच हरिभाऊ दडमल, शंकर नन्नावरे, गजानन गायकवाड, शेतकरी सुधाकर दडमल, तानाजी सावसाकडे, सुभाष दोडके, राजू कुळमेथे, पांडू दोडके यावेळी उपस्थित होते.
चंद्रपूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून चंद्रपूरमधील बाबुपेठ परिसरातील अनेक युवकांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे उपस्थित होते. त्यांनी या युवकांना पक्षात स्वागत केले.
यावेळी बोलताना जावेद सय्यद, माजी अध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी म्हणाले, “देशात राजकारण हे मुख्यतः धर्म, जात-पातवर आधारित असते. दोन समाजात तेड निर्माण करून राजकारणी सत्तेसाठी कुठल्याही थराला जातात. परंतु आम आदमी पार्टीने कधीही सत्तेसाठी धर्माचा वापर केलेला नाही. आम आदमी पार्टी फक्त आणि फक्त विकासावर मत मागते आणि दिलेले शब्द पूर्ण करते.
दिल्ली आणि पंजाब सरकारने आपल्या राज्यात मोहल्ला क्लिनिक, आरोग्य, शिक्षण, सामान्य जनतेला वीज बिलात सवलत इत्यादी विकासाची कामे करून सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. अर्थात सत्तेत येऊन जे करायचे आहे तेच आम आदमी पार्टीने केले. यामुळे आप सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी राजिक शेख, कोषाध्यक्ष, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी, फहीम शेख, आबिद सय्यद, मोहसीन सय्यद, जाकिर सय्यद (सर्व सदस्य, बाबूपेठ मुस्लिम ईदगाह कब्रस्तान कमेटी) तसेच रोहित मेश्राम, अमित बारबूनडे, राकेश दुर्योधन, केवल सिंह भोयर इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.
यावेळी राजु कुडे म्हणाले, “येणाऱ्या काळात चंद्रपूरमध्ये आम आदमी पक्षाचे मोठे संघटन आपल्याला पाहायला मिळेल.
चंद्रपूर — जिल्ह्यात मागील काही दिवसापासून तापमानात घट झाली असून वातावरणात मोठ्या प्रमाणात थंडी जाणवू लागली आहे. सकाळी पारा 9 अंशावर घसरला असून त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यासोबत शेकोटीचा आधार घेतला.
जिल्ह्यात उन्हाळा, हिवाळा असो की पावसाळा हे तिन्ही ऋतू आपला रंग जोमात दाखवितात, पावसाळा संपल्यावर हिवाळ्याची सुरुवात झाली मात्र त्यानंतर थंडी ची चाहूल लागली नव्हती.
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात थंडी ने कहर करायला सुरुवात केली असून ग्रामीण असो की शहरी भाग नागरिकांना आता थंडी पासून बचाव करण्यासाठी शेकोटी हा महत्वपूर्ण आधार मिळाला आहे.