Tag: Mlc sudhakar adbale

  • निधनानंतर संपूर्ण कर्ज माफ करणारी चंद्रपुरातील एकमेव शिक्षक पतसंस्था

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूर ही पतसंस्था मोठी करण्यात सर्व सभासदांचे योगदान महत्वपूर्ण आहे. पतसंस्थेतील कर्जदार सभासदांचे कोणत्याही कारणाने निधन झाल्यास पूर्ण कर्ज माफ केले जाते, असा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असल्याचे गौरवोद्गार आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केले.

    नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था चंद्रपूरच्‍या वतीने शिक्षक दिनी जिजाऊ लॉन येथे सेवानिवृत्त सभासद, सभासदांचे १० वी, १२ वी व पदवीतील गुणवंत पाल्य, विशेष प्राविण्य एमपीएससी सिलेक्ट, आचार्य पदवी प्राप्त सभासद यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्‍हणून पतसंस्‍थेचे संस्‍थापक अध्यक्ष तथा आमदार  सुधाकर अडबाले तर अध्यक्षस्थानी उपाध्यक्षा संध्याताई चंद्रकांत गोहोकार, प्रमुख अतिथि प्रकाश कुंभारे, जगदीश जुनघरी, सीमा अडबाले, मानद सचिव सुरेंद्र अडबाले, दिलीप मोरे, अशोक बोढे, प्राचार्य संजय ठावरी, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, सुनील शेरकी, शरद डांगे, डॉ. विजय हेलवटे यांची मंचावर उपस्थिती होती.

    पतसंस्थेत आजमितीस ६६६७ सभासद असून नागपूर विभागात मुख्य शाखेसह १५ शाखा आहे. कार्यक्षेत्र विस्तार करण्याचा मानस असून लवकरच संपूर्ण विदर्भ कार्यक्षेत्र असणार आहे. आपल्या विश्वासास तडा जाऊ न देता प्रामाणिक कार्य करणार आहे. सभासद, सेवानिवृत्त सभासद ठेवीदार आहेत. हा संपूर्ण संचालक मंडळावर विश्वास आहे. कर्मचारी चांगली सेवा देत असल्याने ते शक्य होत आहे. पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना सर्व शासकीय निर्णयानुसार पगार व भत्ते दिल्‍या जात असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

    पतसंस्थेचा विकास व कार्यावर प्रकाश कुंभारे, सीमा अडबाले, संजय ठावरी, सुनील शेरकी यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमात आचार्य पदवी प्राप्त व सेवानिवृत शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य शिक्षकेत्तर कर्मचारी, गुणवंत पाल्य यांचा आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आमदार सुधाकर अडबाले यांचा पतसंस्‍थेच्या वतीने संचालकांच्या हस्‍ते सत्‍कार करण्यात आला. प्रास्ताविक सुरेंद्र अडबाले यांनी केले. संचालन विखार सर, तर आभार व्यवस्थापक प्रदीप वासेकर यांनी मानले.

    दुसऱ्या सत्रात सहकार प्रशिक्षण केंद्राचे मोरे साहेब व ॲड. खासरे यांनी पतसंस्‍थेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

  • आश्रमशाळेतील शिक्षक 3 महिन्यापासून वेतनाविना

    News34

     

    चंद्रपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून झालेले नाही. शासनाकडून माहे जून महिन्याची वेतन तरतूद अपूरी प्राप्त झाल्यामुळे सर्वच जिल्ह्यातील निम्या आश्रमशाळांचे वेतन थकीत आहे. तीन महिन्यापासून वेतन न झाल्यामुळे विजाभज आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांना पत्र लिहून तात्काळ तरतूद उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

    नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी विजाभज आश्रमशाळांच्या वेतनाकरिता होणाऱ्या दिरंगाईबाबत नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न लावून शासनाचे लक्ष वेधले. विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी यापुढे वेतन नियमित करू व वेतनास विलंब झाल्यास कारणीभूत घटकावर शासननिर्णयानुसार कारवाई करू, अशी ग्वाही दिल्यानंतरही वेतनाबाबत जैसे-थे परिस्थिती असल्यामुळे आमदार अडबाले यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व विभागाचे मंत्री अतुल सावे यांना पत्र लिहून तात्काळ तरतूद उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

    इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळांचे वेतन तीन-तीन महीने विलंबाने होणे हे नेहमीचेच झाले आहे. शासन हे आश्रमशाळांच्या वेतनाबाबत सजग नाही असे दिसून येते. अनियमित वेतनाचा शिक्षकांच्या अध्यापणावर परिणाम होत असल्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बहुजन वर्गातील भटक्या/विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

    वेतन तरतूद तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी व यानंतर तरतूद उपलब्ध नसल्यास उणे प्राधिकारातून वेतन काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी. तीनही महिन्याची तरतूद तात्काळ उपलब्ध न झाल्यास विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ इतर आश्रमशाळा संघटनांना सोबत घेऊन राज्यव्यापी आंदोलन करेल, असा इशारा आमदार सुधाकर अडबाले यांनी पत्रातून दिला आहे.