Tag: शिवाजी महाराजांची वाघनखे

  • वाघनखे कधी येणार? वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली महत्वाची माहिती

    वाघनखे कधी येणार? वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली महत्वाची माहिती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वाघनखे कधी येणार याबाबत विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की लोकसभा निवडणुकी ची आचार संहिता संपल्यावर ते वाघनखे राज्यात आणणार अशी माहिती आज दिली.

    सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे वाघनखे लंडन येथे आहे, याबाबत वनमंत्री मुनगंटीवार यांनी पाठपुरावा केला होता, आता लवकरात लवकर ती वाघनखे राज्यात येणार अश्या हालचाली सुरू झाल्या आहे.

     

    13 जानेवारी पासून राज्यात जाणता राजा चे प्रयोग होणार आहे, त्यांनतर जून महिन्यात शिवराज्याभिषेक ची तारीख आहे, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली की आपण वाघनखे आणणार, कारण आचारसंहितेच्या मध्ये आयोजित कार्यक्रमावर बंदी येणार त्यामुळे आचारसंहिता संपल्यावरचं आपण कार्यक्रम घेऊ शकणार अशी माहिती राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 6 जानेवारीला दिली.

  • ढोल ताशांच्या गजरात नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत

    News34 chandrapur

    नागपूर : अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची वापरलेली वाघनखं लंडनहून भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करून राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-वर्धा पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानीत ढोल-ताशांच्या गजरात भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. चंद्रपूर, वर्धा, नागपुरातील भाजप कार्यकर्ते व शिवभक्तांच्या गर्दीने यावेळी नागपूर विमानतळाचा परिसर फुलुन गेला होता.

     

    विमानतळावर जमलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी ना. श्री. मुनगंटीवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पेशवेकालीन टोपी, शाल-श्रीफळ आदी वस्तू भेट देत त्यांचा सत्कार केला. आनंदी कार्यकर्त्यांनी व शिवभक्तांनी ना. श्री. मुनगंटीवार यांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार पंकज भोयर ,आश्विनी जिचकार, भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने,वर्धा भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, बंटी (जीतेंद्र) कुकुडे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर, विष्णू चांदे महानगर संघटन मंत्री नागपूर,बादल राऊत भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष नागपूर,चंद्रपूरच्या माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी भाजपा महानगर अध्यक्ष चंद्रपूर डॉ.मंगेश गुलवाडे,निलेश किटे, सुभाष कासनगोटूवार,ब्रीजभूषण पाझारे, जयंत कावळे, राजू मुक्कावार,सचिन बोगावार, स्वप्नील कलुरवार आदींनी स्वागत केले.

     

    यावेळी बोलताना ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सामंजस्य करार करण्यासाठी व येत्या काळात भारतात आणण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाले. त्यामुळे आपण स्वत:ला अत्यंत भाग्यवान मानतो. वाघनखांसह महाराजांची जगदंबा तलवार आणि लंडनच्या संग्रहालयातील महाराष्ट्राच्या वारसाची साक्ष देणाऱ्या इतर वस्तुही लवकरच भारतात येण्याकरीता आपण पूर्ण प्रयत्न करू असा विश्वासही ना. श्री. मुनगंटीवार यांनी ठामपणे व्यक्त केला.

     

    लंडन आणि जपानचा दौरा आटोपल्यानंतर आपण भारतात परतलो त्यावेळी आपले भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या या प्रेम आणि आपुलकीने आपण भारावलो आहोत. हा क्षण आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही, असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.

     

    भारत-पाक सिमेवर महाराजांचा पुतळा उभारणार

    आम्ही पुणेकर या संस्थेने श्रीनगरातील कुपवारा जिल्ह्यात भारत-पाकिस्तान सिमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र शासन त्यांना यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. सिमेवर हा पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाकिस्तानला हा पुतळा पाहुनच धडकी भरेल, असे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.

  • वाघनख भारतात आणण्याबाबत सामंजस्य करारावर झाली स्वाक्षरी

    News34 chandrapur

    लंडन : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आणि महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत महत्त्वाची भूमिका असलेल्या गनिमी काव्याचं उत्तम उदाहरण असलेली वाघनखं ब्रिटनमधून भारतात आणण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाल्याचा अतिशय आनंद होत असून तमाम शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आज केले.

     

    शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याच्या संकल्प राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता; त्यानुसार वाघनखे आणण्याचा सामंजस्य करार मंगळवारी संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून बोलत होते. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री ना उदय सामंत, मुख्यमंत्री यांचे व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, पुरातत्व विभागाचे संचालक श्री. तेजस गर्गे, मंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.अमोल जाधव, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाचे संचालक ट्रायस्टम हंट, भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, त्यांचे सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

    शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे प्रतीक असणारी ही वाघ नखं शिवभूमीत आणत आहोत, हा दुग्धशर्करा योग असून शिवस्पर्श झालेली ही वाघनखं आपल्यासाठी अनमोल आहेत. असेही ना. एकनाथ शिंदे म्हणाले. शिवराज्याभिषेकाच्या निमित्त सांस्कृतिक कार्य विभागानं हा संकल्प केला आणि तो पूर्णत्वासही नेला, त्याबद्दल मुख्यमंत्री यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले.

     

    यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आयुष्यातील महत्वाच्या आणि संस्मरणीय प्रसंगापैकी एक असा आजचा हा प्रसंग आहे. रयतेच्या रक्षणासाठी मृत्यूच्या दाढेत स्वतःला झोकून ज्या क्रूर अफझलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढला ती वाघनखं माझ्या शिवबाच्या मातृभूमीत, महाराष्ट्रात शिवप्रेमींच्या दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय हा अभिमानाचा क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देव जरी नव्हते तरी आमच्यासाठी देवापेक्षा कमी नक्कीच नाहीत; ते आमचा स्वाभिमान आहेत, ती आमची प्रेरणा आहे, ती आमची ऊर्जा आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्ष्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केलेला संकल्प मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात पूर्णत्वाकडे जातोय याचा अतिशय आनंद होतोय असे ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

     

    सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ना. मुनगंटीवार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र शासन आणि लंडनच्या व्हिक्टोरिया अँण्ड अल्बर्ट म्यूझियम यांच्या दरम्यान जो MOU झाला, त्यानुसार ही वाघनखं नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीकरिता भारतात राहतील. ही वाघनखं महाराष्ट्रातील विविध संग्रहालयात शिवप्रेमी, इतिहासप्रेमी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात सातारा, नागपूर, कोल्हापूर येथील राज्य पुरातत्व विभागाच्या संग्रहालयांसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा समावेश राहणार आहे.

    ना. श्री सुधीर मुनगंटीवार करारासाठी संग्रहालयात जाण्यापूर्वी त्यांचे लंडन येथील मराठी बांधवांनी मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत केले; त्यानंतर संग्रहालयातील इतर सर्व वस्तू बघत असताना शिवकालीन तसेच भारतातील इतर वस्तूंची त्यांनी कुतूहलाने माहीती जाणून घेतली. त्यानंतर स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.