Tag: ब्रह्मपुरी अपघात

  • विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांकडुन अपघातस्थळाची पाहणी

    विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांकडुन अपघातस्थळाची पाहणी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – ट्रकने दिलेल्या धडकेत महाविद्यालयात जाणारी विद्यार्थीनी कू.समीक्षा संतोष चहांदे वय 17 वर्ष ही ट्रकच्या मागच्या चाकाखाली दबुन तिचा जागेतच मृत्यू झाल्याची घटना ब्रम्हपूरी शहरातील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सदर घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली.

     

    यावेळी त्यांनी नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील मार्गावर असलेले वीज वितरण कंपनीचे विद्युत पोल त्वरित हटविण्याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच सदर मार्गावर अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आवश्यक ठिकाणी गतिरोधक तयार करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच महाविद्यालयीन सुट्टीच्या वेळेस वाहतूक पोलीस तैनात करण्याचे निर्देश पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

    त्यानंतर शहरातील शिवाजी महाराज चौकात जावून रहदारीस होणारा अडथळा व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

     

    याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अजय चहांदे, न.प. मुख्याधिकारी अर्शिया जुही, पोलिस निरीक्षक अनिल जिट्टावार, महावितरणचे अभियंता सिध्दांत रामटेके, अभियंता दिनेश हनवते, न.प. विद्युत अभियंता मंगेश बोंद्रे, अभियंता हटवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक हितेंद्र राऊत, माजी न.प. उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, माजी सभापती नेताजी मेश्राम, माजी सरपंच राजेश पारधी, मुन्ना रामटेके, सुरज मेश्राम यांची यावेळी उपस्थिती होती.

  • ब्रह्मपुरीत भीषण अपघात, विद्यार्थिनींचा मृत्यू

    ब्रह्मपुरीत भीषण अपघात, विद्यार्थिनींचा मृत्यू

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – येथील डॉ,बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या अंगावरून ट्रक गेल्याने ट्रक खाली दबून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १२जानेवारी२०२४ रोजी दुपारी ११:४५ वाजेच्या दरम्यान नेवजा बाई हितकारणी कन्या विद्यालय गेट समोर ते बाजार समितीच्या गाळे बांधकाम केलेल्या कॉर्नरवर जवळ घडली.

    समीक्षा संतोष चहांदे वय (१७)वर्ष असे मृतक विद्यार्थिनीचे नाव असून ती मालडोंगरी येथील रहिवासी होती.

    समीक्षा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे ती आज शाळेत जात होती.

     

    ट्रक येत असल्याचे पाहून ती बाजूला होण्याचा प्रयत्न केला असता अरुंद रस्ता व रस्त्यावर खड्डे असल्यामुळे रस्त्यावरून बाजूला होण्याच्या नादात तिची सायकल स्लिप होऊन ती ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली. त्यातच हा अपघात घडला असल्याचे अंदाज वर्तविला जात आहे.प्रतीक्षाच्या अंगावरून ट्रक गेल्याने ती चिरडली गेली. व घटनास्थळी तिचा मृत्यू झाला. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. व काही क्षणातच पोलिसांना प्राचारण करण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर ट्रक व ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले.

     

    मृतदेह सेवाविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.