Tag: ताडोबा राष्ट्रीय उद्यान

  • ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प झाले हाऊसफुल्ल

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प झाले हाऊसफुल्ल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघ, आणि वाघाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथे सध्या देशी-विदेशी पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी होत आहे.

     

    ख्रिसमस आणि न्यू इयर निमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे पर्यटकांना त्यांची सर्व बुकिंगस घरी बसल्या ऑन-लाईन करता येतात आणि त्यामुळे ताडोबाला पोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.

     

    जवळपास २ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी प्रसिध्द असलं तरी शेकडो प्रकारचे पशु-पक्षी, फुलपाखरं, झाडं-वेली पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. हिवाळ्यात तर ताडोबाच्या या सौंदर्याला आणखीनच साज चढलाय. त्यामुळे अनेक पर्यटक इथला निवांत पणा अनुभवण्यासाठी ताडोबाला भेट देतात.

  • ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    News34 chandrapur

    चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एक महत्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पाची जैवविविधता संपन्न व समृद्ध आहे. यामध्ये 80 प्रजातीचे सस्तन प्राणी, 280 पेक्षा पक्ष्यांच्या प्रजाती, 54 प्रजातीचे सरपटणारे प्राणी, 125 प्रजातींची फुलपाखरे, 670 पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजातीने या वनाची समृद्धता वाढवली आहे. तर 79 टक्के वन हे बांबू वनाचे असून वाघाकरीता हा उत्तम असा अधिवास आहे. सन 2021-22 मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेनुसार या व्याघ्र प्रकल्पामध्ये 87 वाघाची नोंद झाली आहे.

     

    सन 1955 रोजी या वनाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त झाला. सन 1986 मध्ये अंधारी अभयारण्य घोषित करण्यात आले आणि सन 1995 ला वाघांचा अधिवास अधिक सुरक्षित व अबाधित राखण्यासाठी या वनाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देऊन गौरविण्यात आले आहे. या वनाच्या गाभा क्षेत्राचे काटेकोरपणे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने, सन 2010-11 मध्ये बफर क्षेत्र घोषित करण्यात आले. या बफर क्षेत्रात 90 पेक्षा अधिक गावे असून या ठिकाणच्या वन क्षेत्रातसुद्धा वाघाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. म्हणून ही गावे व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात्मक उपक्रमामध्ये जोडण्यात आली. साधारणत: 1 लाख लोकसंख्या असलेल्या या क्षेत्रात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजनेअंतर्गत विविध, सर्व स्तरावर विकासात्मक कामे करण्यात येऊ लागली आणि यातील स्थानिक विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणासंदर्भात जनजागृती व्हावी या करीता “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवायला सुरवात झाली.

     

    याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील इतर वन क्षेत्रातसुद्धा वाघाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात 2022-23 च्या व्याघ्र गणनेनुसार 414 वाघांची नोंद झाली. यापैकी 200 पेक्षा अधिक वाघ केवळ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. म्हणून चंद्रपूरची ओळख वाघाचा जिल्हा अशी आहे.

     

    अशा या जैवविविधतेने संपन्न असलेल्या व्याघ्रभूमीचे संरक्षण व संवर्धन लोकसहभागातून व्हावे, स्थानिकांना वनाचे महत्व कळावे आणि विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात एक जबाबदार नागरीक म्हणून वनसंवर्धन व संरक्षणासाठी योगदान द्यावे, या हेतूने, निसर्ग संवर्धनातून वनसंवर्धन हा उपक्रम नियमित राबविण्यात येत आहे. याकरीता सन 2015-16 पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बफर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी “चला माझ्या ताडोबाला” हा महत्वपूर्ण जन-जागृतीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश शालेय विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी आवड निर्माण करणे आणि वने व वन्यजीव संवर्धनात त्यांचा सहभाग वाढविणे हा होय.

     

    सन 2022-23 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 135 शाळेतील 5 हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये उत्साहपूर्वक सहभागी झाले होते. तसेच जिल्ह्यातील 27 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता हे विशेष. यावर्षी सन 2023-24 मध्ये सुद्धा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार, दि. 29 नोव्हेंबर 2023 पासून या उपक्रमाची सुरवात मुल वनपरिक्षेत्रातील भगवानपूर, फुलझरी, करवण, काटवन व डोणी येथील शाळेपासून होत आहे. यातील भगवानपूर हे गाव सन 2007 मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून स्वयंइच्छेने पुनर्वसित झालेले गाव आहे. हे गाव कोळसा व बोटेझरी या दोन गावांना एकत्रित करून या गावाचे नाव भगवानपूर ठेवण्यात आले आहे. म्हणून या वर्षी प्रथम प्राधान्य या गावाला देण्यात आले आहे.

     

    चालू वर्षात प्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील व या व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या अशा सर्व गावातील एकूण 121 शाळेतील 5 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ताडोबा वनभ्रमंती सोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येईल आणि वने व व्याघ्र संवर्धनाची चळवळ अधिक प्रबळ या माध्यमातून करण्यात येईल, असे ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने कळविले आहे.

  • 13 बछड्यांची माय, माया वाघिणीचा मृत्यू?

    13 बछड्यांची माय, माया वाघिणीचा मृत्यू?

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  ऑगस्ट महिण्यापासून बेपत्ता असलेली ताडोबाची क्विन टि 12 माया वाघिणीचे ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात शनिवारी गस्तीदरम्यान अवशेष आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील चार महिण्यापासून टि 12 वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होणे बंद झाले होते. तेव्हापासून पर्यटक आणि वन्यप्रेमींमध्ये माया वाघिणीच्या अस्तित्वाविषयी चिंता व्यक्त केली जात होती. ह्या बाबतची ताडोबा अंधारी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने ह्या विषयी अधिकृत माहिती दिली आहे.

     

    T-12 ही वाघिणी ही माया नावाने ताडोबात सर्वपरिचीत होती. ती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य पांढरपवणी भागातील प्रबळ वाघिण होती. तिचा जन्म डिसेंबर 2010 मध्ये जन्म झाल्याची नोंद आहे. जून 2014 पासून टि 12 वाघिणीने पाच वेळा शावकांना जन्म दिला आहे. सन 2015, 2017, 2020 आणि 2022 मध्ये एकूण 13 शावकांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जैवविविधता वाढण्यामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. ह्यातील काही शावकांचा नैसर्गिक दृष्ट्या मृत्यू झाला आहे.

     

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत नियमीत होणा-या कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातुन शास्त्रशुध्द पध्दतीने होणा-या संशोधनामध्ये 2014 पासून या वाघांची नियमीत नोंद होत होती. परंतु मार्च 2023 ते मे 2023 या कालावधीत कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने सुरू असलेल्या फेस 4 मध्ये तीची शेवटची नोंद झाली होती. ऑगस्ट 2023 मध्ये ताडोबा तलावाजवळील पंचामध्ये गस्त करीत असलेल्या क्षेत्रीय वन कर्मचा-यांना तिचे शेवटचे दर्शन झाले होते आणि त्यानंतर ती पूर्वीच्या गृह क्षेत्रात दिसत नव्हती. तेव्हापासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी तसेच पर्यटकांमध्ये तिच्या मृत्यू बाबत शंका घेतली जात होती. ताडोबातील तिच्या सध्याच्या अस्तित्वाविषयी पर्यटन प्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात होती.

     

    त्यामुळे ताडोबाच्या व्यवस्थापानाने वन विभागामार्फत तिच्या गृहक्षेत्रामध्ये आणि लगतच्या वन परिक्षेत्रामध्ये 7 ऑक्टोबर 2023 पासून मोठ्या प्रमाणात कॅमेरा ट्रॅप आणि नियमित गस्त करून शोध मोहीम सुरु केली होती. तिच्या गृहक्षेत्र म्हणजेच ताडोबा आणि कोलारा वनपरिक्षेत्रातील सर्व वनक्षेत्रात क्षेत्रीय कर्मचा-यानी पिंजून काढले होते. या संसोधन प्रक्रियेत T-07, T-114, T-115, T-158, T-16, T-120, T. 138, T- 164, T- 168, T-181 आणि T-100 असे एकूण 11 विविध वाघ त्यामध्ये 6 माद्या आणि 5 नर निरीक्षणामध्ये आढळून आले.

     

    7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेल्या संशोधन प्रक्रियेमध्ये टि 12 (माया) वाघिणीचे अस्तीत्व आढळून आले नाही. त्यामुळे तिला शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. 16 ते 18 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कौर क्षेत्रातील कार्यरत सर्व वनाधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी वन्यजीव संशोधक, विशेष व्याघ्र संरक्षण दलातील सर्व कर्मचारी आणि रोजंदारी वनमजुर अशा सुामरे 150 वन कर्मचा-यांना 5 गटांमध्ये विभागून कौर क्षेत्रातील विविध ठिकाणी पायदळ गस्त करण्यात आली.

     

    यासोबतच कॅमेरा ट्रॅप, ड्रोन कॅमेरा यांच्या सहायाने कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. या ऑपरेशनचे नेतृत्व ताडोबा-अंधारी व्याप प्रकल्पाचे उपसंचालक (कोर) नंदकिशोर काळे यांनी केले. ताडोबा अंधारी व्याध्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनात तसेच विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ, कोर क्षेत्रातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, जिवशास्त्रज्ञ प्राजक्ता हुशंगाबादकर यांच्या उपस्थितीत सुरु होते.

     

    शनिवारी ताडोबा वनपरिक्षेतील ताडोबा नियतक्षेत्रातील (बीट) कंपार्टमेंट क्रमांक 82 मध्ये शोध पथकांना काही अवशेष निदर्शनास आले अवशेषांमध्ये वाघाच्या सांगाड्याचा समावेश असल्याचे दिसून आले. ते सुमारे 100 चौ.मी. वनक्षेत्रात विखुरलेले होते. सर्व अवशेष एकत्र करण्यात आले. सदर अवशेष संसोधन आणि विश्लेषणासाठी पशुवैद्यकिय अधिकारी आणि जीवशास्त्रज्ञांद्वारे डिएन विश्लेषणासाठी गोळा करण्यात आले. वन्यजीव पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर अवशेष कुजण्याच्या प्रगत अवस्थेत होते. पुढील शवविच्छेदन तपासणीसाठी अवशेष योग्य नव्हते. या क्षेत्रात आणि परिसरामध्ये कोणतेही मानवी हालचाल व कृती आढळून आली नाही.

     

    टि 12 माया वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाल वर्तविला आहे. गोळा केलेले काही नमुने तात्काळ नॅशनल सेंटर फॉर सायन्स (NCBS) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी बंगलौर येथे विश्लेषणासाठी पाठविले जाणार आहेत. चालू असलेले वैज्ञानिक संशोधन व अभ्यासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या माहितीद्वारे T-12 वाघाच्या डीएनए नमुन्यांशी जुळले जाऊ शकतात आणि या संदर्भातील अहवाल 30 नोव्हेंबर 2023 प्राप्त होणार आहे. टि 12 वाघिणीच्या स्थितीबाबत अंतिम डीएनए विश्लेषण अहवालानंतर माया वाघिणीचे सत्य समोर येणार असल्याचे ताडोबा व्यवस्थापनाने सांगितले आहे.